॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय बेचाळिसावा ॥
अशोकवाटिकेचे वर्णन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


गतकथा झाली ऐसी । जे राजे जावोनि स्वदेशासी ।
मागें श्रीराम बंधूसहपरिवारेंसीं । राज्य करित अयोध्ये ॥१॥
भरतें करोनियां स्तवन । संतोषला रघुनंदन ।
देवोनि क्षेम आलिंगन । दोघे सुखसंपन्न पैं असती ॥२॥
तयाउपरी जनकजामात । जानकीसहित सुखें वर्तत ।
इच्छा उपजली वनवाटिकेंत । सीतायुक्त क्रीडा करणें ॥३॥
धरणिजेसहवर्तमान । राजीवनेत्र श्रीरघुनंदन ।
तयाचें करावया वर्णन । मी अपुरतें दीन काय वर्णू ॥४॥

अशोकवनाचे वर्णन :

अत्यंत सुंदर तें वन । क्रीडा करावया वाटिके जाण ।
सेवकांसहित श्रीरघुनंदन । येता झाला वनातें ॥५॥
तया वनीं वृक्ष जाती । नानापरींच्या अनुपम्य असती ।
तितुक्या सांगतां विस्ताराप्रती । कथा निगुतीं जाईल ॥६॥
तरी सांगों संकळित । जे श्रोतयां संतोष होत ।
आणि पुढारां चालेल ग्रंथ । श्रीरघुनाथगुणांनीं ॥७॥
चंदन अगर धूप वृक्ष । देवदारु पाटल पलाश ।
चंपक नागकेशर लक्षानुलक्ष । मधूक फणस अपार ॥८॥
पारिजातक मघमघीत । भ्रमर तेथें सुवास घेत ।
अर्जुनसाडदे अगणति । सप्तपर्ण वृक्ष असंख्य ॥९॥
मांदारकर्दळींची दाटी । इंगुदी कदंब कोट्यानुकोटी ।
जांबुळी दाळींबियांच्या थाटी । मार्ग दृष्टी लक्षेना ॥१० ॥
कोविदार वट पिंपळ । निंबें नारिंगें नारिकेळ ।
जंबीर कविंठ बेलपरिमळ । औदुंबर स्थूळ गगनचुंबित ॥११॥
भोंकरी करवंदी रायआवळी । चौरें बोरें टेंबरें कायफळी ।
लगडी लिंबोरें नाना वळी । परिमळ अत्यंत ॥१२॥
आम्रवृक्ष अति घनदाट । वरी पक्षियांचें बैसले थाट ।
हंस कोकिळा शुक्र सरळ पाठ । श्रीरामनामें आलापिती ॥१३॥
आतां सांगों पुष्पयाती । मालती मोगरे शेवंती ।
जाई जुई परिमळें घुमती । श्रीरघुपतिसुखार्थ ॥१४॥
वापी कारंजीं पोखरणी । माजी भरलें निर्मळ पाणी ।
तयांचे पाय-यां नवरत्नमणी । ठायीं ठायीं जडियेले ॥१५॥
माजी कमळिणी चतुर्विधा । अंजनी आरक्त पीत सुधा ।
भ्रमर रुणझुणती नादा । दश दिशा व्यापिलिया ॥१६॥
भ्रमर ते रामभक्त । पुष्पें सुवासरुपें अच्युत ।
तेथें लोभलें होवोनि विरक्त । देहभावातें नाठविती ॥१७॥
तंव येरीकडे रवि अस्तमानीं । जातां पुष्पें जातीं मिळोनी ।
माजी भ्रमर गुंतोनी । मेला म्हणती मूर्खत्वें ॥१८॥
तया सरोवराचे तीरीं । हंस बक मारसें कुक्कुट नानापरी ।
चक्रवाकें सहित नारी । जळक्रीडा करिताती ॥१९॥
तया वाटिकेसीं चौफेर । दुर्गदारवंटे दुर्धर ।
काळासही तेथें सत्वर । प्रवेश नाहीं जावया ॥२०॥
ठायीं ठायीं नवरत्नांचें । बुरुज केले श्रीमंतें कनकाचे ।
तयांच्या प्रभे रविसोमांचें । तेज कोणिकडे कळेना ॥२१॥
पुष्पतरुंसीं झगडतां पवन । तळीं पुष्पें पडती तेण ।
शोभायमान जेंवी नक्षत्रीं गगन । अत्यंत साजिरे पैं दिसे ॥२२॥
अमरावतीसी नंदनवन । तें सरी न पावे यासीं जाण ।
वैश्रवणाचें चैत्रवन । लज्जयमान यापुढें ॥२३॥
ऐसें वन शोभायमान । तें पाहता झाला जानकीजीवन ।
अशोकवृक्ष मर्यादेवीण जाण । त्या वनीं गगनचुंबित ॥२४॥
अशोक जेथें बहुत असती । तया अशोकवाटिका म्हणती ।
तेथें प्रवेशला श्रीरघुपती । वनकिडेकारणें ॥२५॥
वना येतो श्रीरघुनंदन । म्हणोनि वनपाळीं सज्जिलें पूर्ण ।
कुशासनें व्याघ्रांबरें कृष्णाजिनें । नानापरींचीं साजिरीं ॥२६॥
जानकीचा धरोनि हात । श्रीराम रसप्राशनें करवित ।
आपणही घेवोनि त्वरित । स्वानंदें डुल्लत पैं असे ॥२७॥
नवल त्या रसाचें महिमान । इतर रस त्यापुढें तृण ।
ऐसा ब्रह्मानंद रस सेवून । डुल्लतीं झालीं पैं दोघें ॥२८॥
शचीसहित सुरपती । अमृतप्राशना जेंवी बैसती ।
तेंवी जाण तो रघुपती । जानकीसहित रस प्याला ॥२९॥
नानापरींची मधुर फळें । सेविलीं जानकीसहित घननीळें ।
सुखस्वानंदें तये वेळे । वरासनीं दोघें बैसलीं ॥३०॥
नगरवासी पुत्रदारांसहित । तेहि मद्य घेवोनि झाले उन्मत्त ।
पुढें गंधर्व येवोनि गीत नृत्य । श्रीरामसुखार्थ पैं करिती ॥३१॥
जानकीसहित रघुनंदन । रमत असतां सुखसंपन्न ।
दहा सहस्त्र वर्षे क्रमिलीं जाण । पुढील कथन अवधारा ॥३२॥

जानकी गर्भवती झालेली पाहून श्रीरामांना हर्ष :

जानकीउदरीं गर्भचिन्ह । तेणें वपु झाली शुभ्रवर्ण ।
तें देखोनि रघुनंदन । अति उल्हाससंपन्न पैं जाहला ॥३३॥
पुत्रकामाची चिंता होती । तंव भार्या देखिली गर्भवती ।
शास्त्राज्ञेनें श्रीरघुपती । जानकीस पुसता झाला ॥३४॥
आधींच सुंदर वेल्हाळ । गर्भें टवटवीत मुखकमळ ।
ऐसें देखोनि घननीळ । जानकीसॊ बोलतसे ॥३५॥
चापशरपाणि पुसे सीतेतें । काय आवडी आवडे तूतें ।
ते माग वो रुचे तें । आणोनि तुजला तें देईन ॥३६॥
हांसोनि म्हणे जनकात्मजा । अहो जी स्वामी गरुडध्वजा ।
तुझिये प्रसादें श्रीरघुराजा । काहीं वासना नुरलीसे ॥३७॥
तुमचेनि प्रसादें श्रीरघुपती । म्यां भोगिली सर्व संपत्तीं ।
कांहीं इच्छा माझे चित्तीं । मागावयाची पैं नाहीं ॥३८॥
कल्पवृक्ष जयाचे मंदिरीं । कामधेनूंचीं खिल्लरें जया घरीं ।
त्या नरा कोणे पदार्थाची उरी । उरली असेल राजेंद्रा ॥३९॥
चिंतामणि अंगणींचे खडे । परीस जयाचे घरीं लोळत पडे ।
तया नरा कोण सांकडें । काय मागण्याचें उरलेंसे ॥४०॥

तपोववनांत ऋषींच्या सहवासांत राहण्याचे सीतेला डोहाळे :

परी वर्ते जीवीं एक वीरचूडामणी । जे तपोवनें पुण्यस्थानीं ।
पहावीं ऐसी इच्छा मनीं । वर्ततसे राजेंद्रा ॥४१॥
उभय जें गंगातीर । आश्रयोनि राहिले ऋषीश्वर ।
तयांचे सन्निध फळमूळाहार । करोनियां वसावें ॥४२॥
ऐसें थोडेच दिवसवरी । वसावें जी मुनिशेजारीं ।
हेंचि मागणें श्रीहरी । कृपा करोनि सिद्धि न्यानें ॥४३॥
ऐकोनि जानकीचें वचन । खुणेसि पावला श्रीरघुपती ।
म्हणे शीघ्र काळें मनोरथ पूर्ण । आत्माराम पुरवील ॥४४॥
इतुकें बोलोनि श्रीरघुपती । शब्दें बुझाविली सीता सती ।
मग गृहा येवोनि सभेप्रती । बंधूंसहित बैसला ॥४५॥
राज्य करितां श्रीरघुपती । असत्य नाहीं जनांप्रती ।
पुरवासी आपुले स्वधर्मस्थितीं । नगरीं वसती स्वानंदें ॥४६॥
यथाकाळीं पर्जन्य पडे । घरोघरीं गोधनांचे वाडे ।
घरोघरीं मुंजी व-हाडें । कुमरकुमरीचें जन करिती ॥४७॥
एका जनार्दना शरण । श्रीरामें गोड रामायण ।
पुढें सीते वनासी गमन । सावधान अवधारा ॥४८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
अशोकवाटिकावर्णनं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥४२॥ ओंव्या ॥४८॥

GO TOP