[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। एकाधिकशततमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्य भरतं प्रति वनागमनहेतुविषयिकी जिज्ञासा, भरतस्य तं प्रति राज्यग्रहणाय प्रार्थना, श्रीरामेण तदस्वीकरणम् -
श्रीरामांनी भरताला वनांतील आगमनाचे प्रयोजन विचारणे, भरताचे त्यांना राज्य ग्रहण करण्यासाठी सांगणे आणि श्रीरामांनी त्यास नकार देणे -
तं तु रामः समाज्ञाय भ्रातरं गुरुवत्सलम् ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा प्रष्टुं समुपचक्रमे ॥ १ ॥
लक्ष्मणासहित श्रीरामांनी आपला गुरुभक्त बंधु भरत यास उत्तम प्रकारे समजावून अथवा त्यांना आपल्यामध्ये अनुरक्त जाणून त्यांना या प्रकारे विचारण्यास आरंभ केला - ॥ १ ॥
किमेतदिच्छेयमहं श्रोतुं प्रव्याहृतं त्वया ।
यस्मात् त्वमागतो देशमिमं चीरजटाजिनी ॥ २ ॥

यन्निमित्तमिमं देशं कृष्णाजिनजटाधरः ।
हित्वा राज्यं प्रविष्टस्त्वं तत्सर्वं वक्तुमर्हसि ॥ ३ ॥
"हे बंधो ! तुम्ही राज्य सोडून वल्कल, कृष्णचर्म आणि जटा धारण करून जे या देशात आला आहात, याचे कारण काय आहे ? ज्या निमित्ताने या वनात तुमचा प्रवेश झाला आहे ते मी तुमच्याच मुखाने ऐकू इच्छितो. तुम्ही सर्वकाही स्पष्टपणे सांगितले पाहिजे. ॥ २-३ ॥ "
इत्युक्तः कैकयीपुत्रः काकुत्स्थेन महात्मना ।
प्रगृह्य बलवद्‌ भूयः प्राञ्जलिर्वाक्यमब्रवीत् ॥ ४ ॥
काकुत्स्थ रामांनी याप्रकारे विचारल्यावर भरतांनी आपला आंतरिक शोक बलपूर्वक दाबून पुन्हा हात जोडून याप्रकारे म्हटले - ॥ ४ ॥
आर्य तातः परित्यज्य कृत्वा कर्म सुदुष्करम् ।
गतः स्वर्गं महाबाहुः पुत्रशोकाभिपीडितः ॥ ५ ॥
’आर्य ! आपले महाबाहु पिता अत्यंत दुष्कर कर्म करून पुत्रशोकाने पीडित होऊन आपल्याला सोडून स्वर्गलोकास निघून गेले. ॥ ५ ॥
स्त्रिया नियुक्तः कैकेय्या मम मात्रा परंतप ।
चकार सा महत्पापमिदमात्मयशोहरम् ॥ ६ ॥
’शत्रुंना संताप देणार्‍या रघुनंदना ! आपली स्त्री एवं माझी माता कैकेयी हिच्या प्रेरणेने विवश होऊन पित्यांनी असे कठोर कार्य केले होते. माझ्या मातेने आपले सुयश नष्ट करणारे हे फार मोठे पाप केले आहे. ॥ ६ ॥
सा राज्यफलमप्राप्य विधवा शोककर्शिता ।
पतिष्यति महाघोरे निरये जननी मम ॥ ७ ॥
’म्हणून हे राज्यरूपी फळ न मिळता ती विधवा होऊन गेली. आता माझी माता शोकाने दुर्बल होऊन महाघोर नरकात पडेल. ॥ ७ ॥
तस्य मे दासभूतस्य प्रसादं कर्तुमर्हसि ।
अभिषिञ्चस्व चाद्यैव राज्येन मघवानिव ॥ ८ ॥
’आता आपण आपल्या दासस्वरूप माझ्यावर, या भरतावर, कृपा करावी, आणि इंद्राप्रमाणे आजच राज्य ग्रहण करण्यासाठी आपला राज्याभिषेक करवून घ्यावा. ॥ ८ ॥
इमाः प्रकृतयः सर्वा विधवा मातरश्च याः ।
त्वत्सकाशमनुप्राप्ताः प्रसादं कर्तुमर्हसि ॥ ९ ॥
या सार्‍या प्रकृति (प्रजा आदि) आणि सर्व विधवा माता आपल्याजवळ आलेल्या आहेत. आपण या सर्वांवर कृपा करावी. ॥ ९ ॥
तथानुपूर्व्या युक्तश्च युक्तं चात्मनि मानद ।
राज्यं प्राप्नुहि धर्मेण सकामान् सुहृदः कुरु ॥ १० ॥
’दुसर्‍यांना मान देणार्‍या रघुवीरा ! आपण ज्येष्ठ असल्याने राज्यप्राप्तिच्या क्रमिक अधिकाराने युक्त आहात. न्यायतः आपल्यालाच राज्य मिळणे उचित आहे; म्हणून आपण धर्मानुसार राज्य ग्रहण करावे आणि आपल्या सुहृदांना सफल मनोरथ बनवावे. ॥ १० ॥
भवत्वविधवा भूमिः समग्रा पतिना त्वया ।
शशिना विमलेनेव शारदी रजनी यथा ॥ ११ ॥
’आपल्या सारख्या पतिने युक्त होऊन ही सारी वसुधा वैधव्यरहित होऊन जावो आणि निर्मळ चंद्रम्याने सनाथ झालेल्या शरत्कालांतील रात्रीप्रमाणे शोभा पावू लागो. ॥ ११ ॥
एभिश्च सचिवैः सार्धं शिरसा याचितो मया ।
भ्रातुः शिष्यस्य दासस्य प्रसादं कर्तुमर्हसि ॥ १२ ॥
मी या समस्त सचिवांसह आपल्या चरणांवर मस्तक ठेवून ही याचना करीत आहे की आपण राज्य ग्रहण करावे. मी आपला भाऊ, शिष्य आणि दास आहे. आपण माझ्यावर कृपा करा. ॥ १२ ॥
तदिदं शाश्वतं पित्र्यं सर्वं सचिवमण्डलम् ।
पूजितं पुरुषव्याघ्र नातिक्रमितुमर्हसि ॥ १३ ॥
’पुरुषसिंह ! हे सारे मंत्रीमंडल आपल्या येथे कुलपरंपरेने चालत आलेले आहे. हे सर्व सचिव पित्याच्या समयीही होते. आपण सदाच यांचा सन्मान करीत आला आहात. म्हणून आपण यांची प्रार्थना लाथाडू नये." ॥ १३ ॥
एवमुक्त्वा महाबाहुः सबाष्पः कैकयीसुतः ।
रामस्य शिरसा पादौ जग्राह भरतः पुनः ॥ १४ ॥
असे म्हणून कैकेयीपुत्र महाबाहु भरतांनी नेत्रातून अश्रु गळत असता पुन्हा श्रीरामांच्या चरणांवर मस्तक ठेवले. ॥ १४ ॥
तं मत्तमिव मातङ्‌गं निःश्वसन्तं पुनः पुनः ।
भ्रातरं भरतं रामः परिष्वज्येदमब्रवीत् ॥ १५ ॥
त्या समयी मत्त हत्तीप्रमाणे ते वारंवार दीर्घ श्वास घेऊ लागले, तेव्हां श्रीरामांनी आपला भाऊ भरत यांना उठवून हृदयाशी धरले आणि या प्रकारे बोलले - ॥ १५ ॥
कुलीनः सत्त्वसम्पन्नस्तेजस्वी चरितव्रतः ।
राज्यहेतोः कथं पापमाचरेन्मद्विधो जनः ॥ १६ ॥
"हे बंधो ! तूच सांग बरे ! उत्तम कुळात उत्पन्न, सत्वगुणसंपन्न, तेजस्वी आणि श्रेष्ठ व्रताचे पालन करणारा माझ्यासारखा मनुष्य राज्यासाठी पित्याच्या आज्ञेचे उल्लंघनरूपी पाप कसे करू शकेल ? ॥ १६ ॥ "
न दोषं त्वयि पश्यामि सूक्ष्ममप्यरिसूदन ।
न चापि जननीं बाल्यात् त्वं विगर्हितुमर्हसि ॥ १७ ॥
’शत्रुसूदन ! मला तुझ्या ठिकाणी थोडासाही दोष दिसत नाही. अज्ञानवश तुम्ही आपल्या मातेची निंदा करता कामा नये. ॥ १७ ॥
कामकारो महाप्राज्ञ गुरूणां सर्वदानघ ।
उपपन्नेषु दारेषु पुत्रेषु च विधीयते ॥ १८ ॥
निष्पाप महाप्राज्ञ ! गुरुजनांचा आपल्या अभीष्ट स्त्रिया आणि प्रिय पुत्रांवर सदा पूर्ण अधिकार असतो. ते त्यांना हवी तशी आज्ञा देऊ शकतात. ॥ १८ ॥
वयमस्य यथा लोके सङ्‌ख्याताः सौम्य साधुभिः ।
भार्याः पुत्राश्च शिष्याश्च त्वमपि ज्ञातुमर्हसि ॥ १९ ॥
सौम्या ! मातांसहित आपणही या लोकात श्रेष्ठ पुरुषांच्या द्वारे महाराजांचे स्त्री-पुत्र आणि शिष्य म्हटले जातो, म्हणून आपल्याला हवी ती आज्ञा देण्याचा त्यांना अधिकार होता ही गोष्ट समजून घेण्यास तूही योग्य आहेस. ॥ १९ ॥
वने वा चीरवसनं सौम्य कृष्णाजिनाम्बरम् ।
राज्ये वापि महाराजो मां वासयितुमीश्वरः ॥ २० ॥
सौम्य ! महाराज मला वल्कल वस्त्रें आणि मृगचर्म धारण करवून वनात धाडोत अथवा राज्यावर बसवोत, या दोन्ही गोष्टी करण्यासाठी ते सर्वथा समर्थ होते. ॥ २० ॥
यावत् पितरि धर्मज्ञ गौरवं लोकसत्कृते ।
तावद् धर्मकृतां श्रेष्ठ जनन्यामपि गौरवम् ॥ २१ ॥
धर्मज्ञ ! धर्मात्म्यांच्यामध्ये श्रेष्ठ भरता ! मनुष्याला विश्ववंद्य पित्याच्या ठिकाणी जितकी गौरवबुद्धी असते तितकीच मातेमध्येही असली पाहिजे. ॥ २१ ॥
एताभ्यां धर्मशीलाभ्यां वनं गच्छेति राघव ।
मातापितृभ्यामुक्तोऽहं कथमन्यत् समाचरे ॥ २२ ॥
राघव भरत ! या धर्मशील माता आणि पिता, दोघांनी ज्यावेळी मला वनात जाण्याची आज्ञा दिली आहे, अशावेळी मी त्यांच्या आज्ञेच्या विपरीत दुसरे कुठलेही वर्तन कसे करू शकेन ? ॥ २२ ॥
त्वया राज्यमयोध्यायां प्राप्तव्यं लोकसत्कृतम् ।
वस्तव्यं दण्डकारण्ये मया वल्कलवाससा ॥ २३ ॥
’तुम्ही अयोध्येत राहून समस्त जगतासाठी आदरणीय राज्य प्राप्त केले पाहिजे आणि मला वल्कल वस्त्रे धारण करून दण्डकारण्यात राहिले पाहिजे. ॥ २३ ॥
एवमुक्त्वा महाराजो विभागं लोकसन्निधौ ।
व्यादिश्य च महाराजो दिवं दशरथो गतः ॥ २४ ॥
’कारण की दशरथ महाराजांनी बर्‍याच लोकांच्या समोर आपल्या दोघांसाठी याप्रकारे पृथक् पृथक् दोन आज्ञा देऊन ते स्वर्गलोकास गेले आहेत. ॥ २४ ॥
स च प्रमाणं धर्मात्मा राजा लोकगुरुस्तव ।
पित्रा दत्तं यथाभागमुपभोक्तुं त्वमर्हसि ॥ २५ ॥
’या विषयात लोकगुरु धर्मात्मा राजाच तुमच्यासाठी प्रमाणभूत आहे. त्यांचीच आज्ञा तुम्ही मानली पाहिजे आणि पित्याने तुमच्या हिश्श्यामध्ये जे काही दिले आहे, त्याचाच तुम्हाला यथावत रूपाने उपभोग घेतला पाहिजे. ॥ २५ ॥
चतुर्दश समाः सौम्य दण्डकारण्यमाश्रितः ।
उपभोक्ष्ये त्वहं दत्तं भागं पित्रा महात्मना ॥ २६ ॥
सौम्य ! चौदा वर्षे दण्डकारण्यात राहिल्या नंतर महात्मा पित्याने दिलेल्या राज्य भागाचा मी उपभोग घेईन. ॥ २६ ॥
यदब्रवीन्मां नरलोकसत्कृतः
     पिता महात्मा विबुधाधिपोपमः ।
तदेव मन्ये परमात्मनो हितं
     न सर्वलोकेश्वरभावमव्ययम् ॥ २७ ॥
’मनुष्यलोकात सन्मानित आणि देवराज इंद्रतुल्य तेजस्वी अशा माझ्या महात्मा पित्याने मला जी वनवासाची आज्ञा दिली आहे, तिलाच मी माझ्या स्वतःसाठी परम हितकारी समजतो. त्यांच्या आज्ञेच्या विरुद्ध सर्वलोकेश्वर ब्रह्मदेवांचे अविनाशी पदही माझ्यासाठी श्रेयस्कर नाही. ॥ २७ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकाधिकशततमः सर्गः ॥ १०१ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे एकावा सर्ग पूरा झाला ॥ १०१ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP