शुनःशेपं रक्षितुं वुश्वामित्रस्य सफलः प्रयत्नस्तपस्या च -
|
विश्वामित्रद्वारा शुनःशेपाचे रक्षणाचा सफल प्रयत्न अणि तपस्या -
|
शुनःशेपं नरश्रेष्ठ गृहीत्वा तु महायशाः ।
व्यश्रमत् पुष्करे राजा मध्याह्ने रघुनन्दन ॥ १ ॥
|
[शतानन्द सांगत आहेत - ] 'नरश्रेष्ठ रघुनन्दना ! महायशस्वी राजा अंबरीष शुनःशेपाला बरोबर घेऊन दुपारच्या वेळी पुष्कर तीर्थात आले आणि तेथे विश्राम करू लागले. ॥ १ ॥
|
तस्य विश्रममाणस्य शुनःशेपो महायशाः ।
पुष्करं ज्येष्टमागम्य विश्वामित्रं ददर्श ह ॥ २ ॥
तप्यन्तमृषिभिः सार्धं मातुलं परमातुरः ।
विषण्णवदनो दीनस्तृष्णया च श्रमेण च ॥ ३ ॥
पपाताङ्के मुने राम वाक्यं चेदमुवाच ह ।
|
'श्रीरामा ! ज्यावेळी ते विश्राम करू लागले त्या समयी महायशस्वी शुनःशेप ज्येष्ठ पुष्करमध्ये येऊन ऋषिंच्या बरोबर तपस्या करीत असलेल्या आपले मामा विश्वामित्रांना भेटला. तो अत्यंत आतुर आणि दीन झाला होता. त्याच्या मुखावर विषाद पसरलेला होता. तो भूक तहान आणि परिश्रमाने दीन होऊन मुनिंच्या मांडीवर येऊन पडला आणि या प्रकारे म्हणाला - ॥ २-३ १/२ ॥
|
न मेऽस्ति माता न पिता ज्ञातयो बान्धवाः कुतः ॥ ४ ॥
त्रातुमर्हसि मां सौम्य धर्मेण मुनिपुङ्गव ।
|
'सौम्य ! मुनिपुङ्गव ! मला ना आई आहे ना पिता. ! मग बंधु बांधव कुठले असणार ? (मी असहाय आहे म्हणून) आपणच माझे धर्माच्याद्वारे रक्षण करावे. ॥ ४ १/२ ॥
|
त्राता त्वं हि नरश्रेष्ठ सर्वेषां त्वं हि भावनः ॥ ५ ॥
राजा च कृतकार्यः स्यादहं दीर्घायुरव्ययः ।
स्वर्गलोकमपाश्नीयां तपस्तप्त्वा ह्यनुत्तमम् ॥ ६ ॥
|
'नरश्रेष्ठ ! आपण सर्वांचे रक्षक आणि अभीष्ट वस्तूंची प्राप्ति करून देणारे आहात. हा राजा अंबरीष कृतार्थ व्हावा आणि मीही विकाररहित दीर्घायु होऊन सर्वोत्तम तपस्या करून स्वर्गलोक प्राप्त करावा - अशी आपण ऋपा करावी. ॥ ५-६ ॥
|
त्वं मे नाथो ह्यनाथस्य भव भव्येन चेतसा ।
पितेव पुत्रं धर्मात्मंस्त्रातुमर्हसि किल्बिषात् ॥ ७ ॥
|
धर्मात्मन् ! आपल्या अनिर्मल चित्ताने मज अनाथाचे नाथ (असहाय्याचे संरक्षक) होऊन जावे. ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचे रक्षण करतो त्याच प्रकारे आपण मला या पापकमूलक विपत्तिपासून वाचवा.' ॥ ७ ॥
|
तस्य तद् वचनं श्रुत्वा विश्वामित्रो महातपाः ।
सान्त्वयित्वा बहुविधं पुत्रानिदमुवाच ह ॥ ८ ॥
|
शुनःशेपाचे हे बोलणे ऐकून महातपस्वी विश्वामित्रांनी नाना प्रकारे त्याचे सांत्वन केले आणि आपल्या पुत्रांना या प्रमाणे म्हणाले - ॥ ८ ॥
|
यत्कृते पितरः पुत्राञ्जनयन्ति शुभार्थिनः ।
परलोकहितार्थाय तस्य कालोऽयमागतः ॥ ९ ॥
|
'मुलांनो ! शुभाची अभिलाषा करणारा पिता ज्या पारलौकिक हिताच्या उद्देशाने पुत्रांना जन्म देतो, त्याच्या पूर्तीचा हा समय आला आहे. ॥ ९ ॥
|
अयं मुनिसुतो बालो मत्तः शरणमिच्छति ।
अस्य जीवितमात्रेण प्रियं कुरुत पुत्रकाः ॥ १० ॥
|
'पुत्रांनो ! हा बालक मुनिकुमार माझ्याकडून आपले रक्षण व्हावे अशी इच्छा करीत आहे. तुम्ही लोक आपले जीवनमात्र देऊन त्याचे प्रिय करा. ॥ १० ॥
|
सर्वे सुकृतकर्माणः सर्वे धर्मपरायणाः ।
पशुभूता नरेन्द्रस्य तृप्तिमग्नेः प्रयच्छत ॥ ११ ॥
|
'तुम्ही सर्वच्या सर्व पुण्यात्मे आणि धर्मपरायण आहात. म्हणून राजाच्या यज्ञात पशु बनून अग्निदेवाला तृप्ति प्रदान करा. ॥ ११ ॥
|
नाथवांश्च शुनःशेपो यज्ञश्चाविघ्नतो भवेत् ।
देवतास्तर्पिताश्च स्युः मम चापि कृतं वचः ॥ १२ ॥
|
यामुळे शुनःशेप सनाथ होईल. राजाचा यज्ञही कोणतेही विघ्न वा बाधारहित होऊन पूर्ण होईल. देवताही तृप्त होतील आणि तुमच्याद्वारा माझ्या आज्ञेचे पालनही होईल.' ॥ १२ ॥
|
मुनेस्तद् वचनं श्रुत्वा मधुच्छंदादयः सुताः ।
साभिमानं नरश्रेष्ठ सलीलमिदमब्रुवन् ॥ १३ ॥
|
'नरश्रेष्ठा ! विश्वामित्र मुनिंचे हे वचन ऐकून त्यांचे मधुच्छंद आदि पुत्र अभिमान आणि अवहेलनापूर्वक या प्रकारे बोलले - ॥ १३ ॥
|
कथमात्मसुतान् हित्वा त्रायसेऽन्यसुतं विभो ।
अकार्यमिव पश्यामः श्वमांसमिव भोजने ॥ १४ ॥
|
'प्रभो ! आपण आपल्या बर्याचशा पुत्रांचा त्याग करून दुसर्याच्या एका पुत्राचे रक्षण कसे काय करता आहात ? ज्याप्रमाणे पवित्र भोजनात कुत्र्याचे मांस पडले तर ते अग्राह्यच होऊन जाते त्याप्रकारे जेथे आपल्या पुत्रांचे रक्षण करणे आवश्यक आहे तेथे दुसर्याच्या पुत्राचे रक्षणाच्या कार्याला आम्ही अकर्तव्याच्या कोटीतच पहात आहोत.' ॥ १४ ॥
|
तेषां तद् वचनं श्रुत्वा पुत्राणां मुनिपुङ्गवः ।
क्रोधसंरक्तनयनो व्याहर्तुमुपचक्रमे ॥ १५ ॥
|
त्या पुत्रांचे हे कथन ऐकून मुनिवर विश्वामित्रांचे नेत्र क्रोधाने लाल झाले आणि ते म्हणाले - ॥ १५ ॥
|
निःसाध्वसमिदं प्रोक्तं धर्मादपि विगर्हितम् ।
अतिक्रम्य तु मद्वाक्यं दारुणं रोमहर्षणम् ॥ १६ ॥
श्वमांसभोजिनः सर्वे वासिष्ठा इव जातिषु ।
पूर्णं वर्षसहस्रं तु पृथिव्यामनुवत्स्यथ ॥ १७ ॥
|
'अरे ! तुम्ही लोकांनी निर्भय होऊन जी धर्मरहित आणि निंदित आहे अशी गोष्ट सांगितली आहे; माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून जी ही दारुण आणि रोमांचकारी गोष्ट तुमच्या मुखातून निघाली आहे, या अपराधामुळे तुम्ही सर्वजण वसिष्ठांच्या पुत्रांप्रमाणेच कुत्रांचे मांस खाणार्या मुष्टिक आदि जातिमध्ये जन्म घेऊन पूर्ण एक हजार वर्षेपर्यंत पृथ्वीवर राहाल. ॥ १६-१७ ॥
|
कृत्वा शापसमायुक्तान् पुत्रान् मुनिवरस्तदा ।
शुनःशेपमुवाचार्तं कृत्वा रक्षां निरामयम् ॥ १८ ॥
|
याप्रकारे आपल्या पुत्रांना शाप देऊन मुनिवर विश्वामित्रांनी त्या समयी शोकार्त शुनःशेपाचे निर्विघ्न रक्षण करून त्यास याप्रकारे म्हटले - ॥ १८ ॥
|
पवित्रपाशैराबद्धो रक्तमाल्यानुलेपनः ।
वैष्णवं यूपमासाद्य वाग्भिरग्निमुदाहर ॥ १९ ॥
इमे च गाथे द्वे दिव्ये गायेथा मुनिपुत्रक ।
अम्बरीषस्य यज्ञेऽस्मिंस्ततः सिद्धिमवाप्स्यसि ॥ २० ॥
|
'मुनिकुमार ! अंबरीषाच्या यज्ञात जेव्हां तुम्हाला कुश आदिच्या पवित्र पाशांनी बांधून लाल फुलांच्या माळा आणि लाल चंदन धारण केले जाईल, त्या सर्व समयी तू विष्णुदेवता संबंधी ज्या यूपाच्या जवळ जाऊन वाणीद्वारा अग्निची (इंद्र आणि विष्णुची) स्तुति करा आणि या दोन दिव्य गाथांचे गान करा. या योगे तू मनोवांच्छित सिद्धि प्राप्त करून घेशील. ॥ १९-२० ॥
|
शुनःशेपो गृहीत्वा ते द्वे गाथे सुसमाहितः ।
त्वरया राजसिंहं तमम्बरीषमुवाच ह ॥ २१ ॥
|
शुनःशेपाने एकचित्त होऊन त्या दोन्ही गाथांचे ग्रहण केले आणि राजसिंह अंबरीषाजवळ जाऊन त्यांना शीघ्रतापूर्वक सांगितले - ॥ २१ ॥
|
राजसिंह महाबुद्धे शीघ्रं गच्छावहे वयम् ।
निर्वर्तयस्व राजेन्द्र दीक्षां च समुदाहर ॥ २२ ॥
|
'राजेंद्र ! परम बुद्धिमान राजसिंह ! आता आपण दोघे शीघ्र निघूया. आपण यज्ञाची दीक्षा घ्या आणि यज्ञकर्म संपन्न करा.' ॥ २२ ॥
|
तद् वाक्यमृषिपुत्रस्य श्रुत्वा हर्षसमन्वितः ।
जगाम नृपतिः शीघ्रं यज्ञवाटमतन्द्रितः ॥ २३ ॥
सदस्यानुमते राजा पवित्रकृतलक्षणम् ।
पशुं रक्ताम्बरं कृत्वा यूपे तं समबन्धयत् ॥ २४ ॥
|
ऋषिकुमाराचे ते वचन ऐकून राजा अंबरीषांनी शुनःशेपाला कुशाच्या पवित्र पाशांनी बांधून त्याला पशूच्या लक्षणांनी संपन्न केले गेले आणि त्या यज्ञपशुला लाल वस्त्र नेसवून यूपाला बांधून ठेवले. ॥ २३-२४ ॥
|
स बद्धो वाग्भिरग्र्याभिरभितुष्टाव वै सुरौ ।
इंद्रमिन्द्रानुजं चैव यथावन्मुनिपुत्रकः ॥ २५ ॥
|
बांधल्या गेलेल्या मुनिपुत्र शुनःशेपाने उत्तम वाणीद्वारे इंद्र आणि उपेंद्र या दोन्ही देवतांची यथावत् स्तुति केली. ॥ २५ ॥
|
ततः प्रीतः सहस्राक्षो रहस्यस्तुतितोषितः ।
दीर्घमायुस्तदा प्रादाच्छुनःशेपाय वासवः ॥ २६ ॥
|
या रहस्यभूत स्तुतिने संतुष्ट होऊन सहस्र नेत्रधारी इंद्र फार प्रसन्न झाले. त्यावेळी त्यांनी शुनःशेपास दीर्घायु प्रदान केले. ॥ २६ ॥
|
स च राजा नरश्रेष्ठ यज्ञस्य च समाप्तवान् ।
फलं बहुगुणं राम सहस्राक्षप्रसादजम् ॥ २७ ॥
|
'नरश्रेष्ठ श्रीरामा ! राजा अंबरीषानेही देवराज इंद्राच्या कृपेने त्या यज्ञाचे बहुगुण संपन्न उत्तम फल प्राप्त केले. ॥ २७ ॥
|
विश्वामित्रोऽपि धर्मात्मा भूयस्तेपे महातपाः ।
पुष्करेषु नरश्रेष्ठ दशवर्षशतानि च ॥ २८ ॥
|
'पुरुषप्रवर ! या नंतर महातपस्वी धर्मात्मा विश्वामित्रांनीही पुष्कर तीर्थात पुन्हा एक हजार वर्षे तीव्र तपस्या केली. ॥ २८ ॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे द्विषष्टितमः सर्गः ॥ ६२ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा बासष्टावा सर्ग समाप्त झाला. ॥ ६२ ॥
|