॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ अरण्यकाण्ड ॥

॥ पंचमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



शूर्पणखेला शिक्षा, खर इत्यादी राक्षसांचा वध आणि शूर्पणखेचे रावणाकडे गमन -


श्री महादेव उवाच
तस्मिन्काले महारण्ये राक्षसी कामरूपिणी ।
विचचार महासत्त्वा जनस्थाननिवासिनी ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, त्या काळी त्या महाघोर अरण्यात, जनस्थानात राहाणारी महा-सामर्थ्यसंपन्न, इच्छेनुसार रूपे धारण करणारी एक राक्षसी फिरत असे. (१)

एकदा गौतमीतीरे पञ्चवट्याः समीपतः ।
पद्मवज्राङ्‌कुशाङ्‌कानि पदानि जगतीपतेः ॥ २ ॥
दृष्ट्‍वा कामपरीतात्मा पादसौन्दर्यमोहिता ।
पश्यन्ती सा शनैरायाद्‌राघवस्य निवेशनम् ॥ ३ ॥
एकदा गौतमी नदीच्या तीरावर, पंचवटीच्या जवळ, जगत्पती श्रीरामांची पद्म, वज्र व अंकुश यांनी युक्त असणारी पदचिन्हे पाहूनच, त्या पावलांच्या सौंदर्याने मोहित झाल्याने, तिचे मन कामेच्छेने भरून गेले; आणि पदचिन्हे पाहात पाहात ती हळूहळू श्रीरामाच्या आश्रमात आली. (२-३)

तत्र सा तं रमानाथं सीतया सह संस्थितम् ।
कन्दर्पसदृशं रामं दृष्ट्‍वा कामविमोहिता ॥ ४ ॥
राक्षसी राघवं प्राह कस्य त्वं कः किमाश्रमे ।
युक्तो जटावल्कलाद्यैः साध्यं किं तेऽत्र मे वद ॥ ५ ॥
तेथे मदन-सदृश, लक्ष्मीपती अशा श्रीरामचंद्रांना सीतेसहित बसलेले पाहून, ती कामातुर झालेली राक्षसी राघवांना म्हणाली, "तू कुणाचा पुत्र आहेस ? तुझे नाव काय आहे ? जटा, वल्कल इत्यादी धारण करून तू या आश्रमात का राहात आहेस ? येथे तुला काय मिळवायचे आहे ? हे सर्व मला सांग. (४-५)

अहं शूर्पणखा नाम राक्षसी कामरूपिणी ।
भगिनी राक्षसेन्द्रस्य रावणस्य महात्मनः ॥ ६ ॥
राक्षसराज महात्म्या रावणाची बहीण आणि इच्छेप्रमाणे कोणतेही रूप धारण करणारी शूर्पणखा नावाची मी राक्षसी आहे. (६)

खरेण सहिता भ्रात्रा वसाम्यत्रैव कानने ।
राज्ञा दत्तं च मे सर्वं मुनिभक्षा वसाम्यहम् ॥ ७ ॥
खर नावाच्या भावासह मी येथेच वनात राहात असते. राजाने मला हे सर्व वन दिले आहे. मुनींना भक्षण करीत मी येथेच राहात असते. (७)

त्वां तु वेदितुमिच्छामि वद मे वदतां वर ।
तामाह रामनामाहमयोध्याधिपतेः सुतः ॥ ८ ॥
वक्त्यांमध्ये श्रेष्ठ असणार्‍या हे पुरुषा, मी तुझ्याविषयी सर्व काही जाणू इच्छिते. म्हणून ते मला सांग." तेव्हा श्रीराम तिला सांगू लागले, "मी अयोध्यापती दशरथ राजांचा राम नावाचा पुत्र आहे, (८)

एषा मे सुन्दरी भार्या सीता जनकनन्दिनी ।
स तु भ्रात्रा कनीयान्मे लक्ष्मणोऽस्तीव सुन्दरः ॥ ९ ॥
ही सुंदर स्त्री, जनककन्या सीता ही माझी भार्या आहे. आणि अतिशय सुंदर असणारा हा माझा धाकटा भाऊ लक्ष्मण आहे. (९)

किं कृत्यं ते मया ब्रूहि कार्यं भुवनसुन्दरि ।
इति रामवचः श्रुत्वा कामार्ता साब्रवीदिदम् ॥ १० ॥
हे त्रिभुवनसुंदरी, मी तुझे कोणते कार्य करू, ते मला सांग." असे श्रीरामांचे वचन ऐकल्यावर ती काम-पीडित शूर्पणखा म्हणाली. (१०)

एहि राम मया सार्धं रमस्व गिरिकानने ।
कामार्ताहं न शक्नोमि त्यक्तुं त्वां कमलेक्षणम् ॥ ११ ॥
"रामा, चल. एखाद्या गिरिकाननात तू माझ्याबरोबर रममाण हो. मी कामेने पीडित आहे. कमलनयन असलेल्या तुला मी सोडू शकत नाही." (११)

रामः सीतां कटाक्षेण पश्यन् सस्मितमब्रवीत् ।
भार्या ममैषा कल्याणी विद्यते ह्यनपायिनी ॥ १२ ॥
सीतेकडे कटाक्ष टाकून स्मित करीत श्रीराम म्हणाले, "हे सुंदरी, ही माझी कल्याणकारक भार्या आहे आणि मला तिला टाकता येणे शक्य नाही. (१२)

त्वं तु सापत्‍न्यदुःखेन कथं स्थास्यसि सुन्दरि ।
बहिरास्ते मम भ्राता लक्ष्मणोऽतीव सुन्दरः ॥ १३ ॥
हे सुंदरी, तू सवतीचे दुःख भोगत कशी बरे राहू शकशील ? या आश्रमाच्या बाहेर अतिशय सुंदर असा माझा भाऊ लक्ष्मण आहे. (१३)

तवानुरूपो भविता पतिस्तेनैव सञ्चर ।
इत्युक्त्वा लक्ष्मणं प्राह पतिर्मे भव सुन्दर ॥ १४ ॥
तो तुला अनुरूप पती आहे. त्याच्याबरोबरच तू राहा." श्रीरामांनी असे म्हटल्यावर ती लक्ष्मणाकडे आली, "भावाची आज्ञा शिरोधार्थ मागून, हे सुंदर पुरुषा, तू माझा पती हो. आज आपणा दोघांचे मीलन होवो. उशीर करू नको." कामाने मो हित झाले ली ती भयंकर राक्षसी लक्ष्मणाला असे म्हणाली. (१४-१५)

भ्रातुराज्ञां पुरस्कृत्य सङ्‌गच्छावोऽद्य मा चिरम् ।
इत्याह राक्षसी घोरा लक्ष्मणं काममोहिता ॥ १५ ॥
तामाह लक्ष्मणः साध्वि दासोऽहं तस्य धीमतः ।
दासी भविष्यसि त्वं तु ततो दुःखतरं नु किम् ॥ १६ ॥
तिला लक्ष्मण म्हणाला, "बाई ग, त्या बुद्धिमान श्रीरामांचा मी दास आहे. माझ्याशी विवाह करून तुला त्यांची दासी व्हावे लागेल. यापेक्षा अधिक दुःखकारक काय असेल बरे ? (१६)

तमेव गच्छ भद्रं ते स तु राजाखिलेश्वरः ।
तत्श्रुत्वा पुनरप्यागाद्‌राघवं दुष्टमानसा ॥ १७ ॥
तेव्हा तू त्यांच्याकडेच जा. तुझे कल्याण असो. ते महाराज सर्वांचे स्वामी आहेत." हे लक्ष्मणाचे वचन ऐकून ती दुष्ट मनाची राक्षसी पुन्हा राघवाकडे गेली. (१७)

क्रोधाद्‍राम किमर्थं मां भ्रामयस्यनवस्थितः ।
इदानीमेव तां सीतां भक्षयामि तवाग्रतः ॥ १८ ॥
आणि रागाने रामांना म्हणाली, " अरे रामा, चंचल चित्त असणारा तू मला का बरे इकडे तिकडे फिरवीत आहेस ? तुझ्यासमोर मी आत्ताच या सीतेला खाऊन टाकते." (१८)

इत्युक्त्वा विकटाकारा जानकीमनुधावति ।
ततो रामाज्ञया खड्गमादाय परिगृह्य ताम् ॥ १९ ॥
चिच्छेद नासां कर्णौ च लक्ष्मणो लघुविक्रमः ।
ततो घोरध्वनिं कृत्वा रुधिराक्तवपुर्द्रुतम् ॥ २० ॥
क्रन्दमाना पपाताग्रे खरस्य परुषाक्षरा ।
किमेतदिति तामाह खरः खरतराक्षरः ॥ २१ ॥
असे बोलून आणि भयंकर रूप धारण करून ती जानकीकडे धावली. तेव्हा श्रीरामांच्या आज्ञेवरून, तिला पकडून, आणि हातात खड्‌ग घेऊन, महापराक्रमी लक्ष्मणाने तिचे नाक आणि दोन्ही कान कापून टाकले. तेव्हा भयंकर किंकाळी मारून, रक्ताने लडबडलेले शरीर घेऊन, ती रडत ओरडत आणि कठोर शब्द बोलत घाईघाईने जाऊन खरापुढे पडली. कर्कश बोलणार्‍या खराने तिला म्हटले, "अग, काय हे ? (१९-२१)

केनैवं कारितासि त्वं मृत्योर्वक्त्रानुवर्तिना ।
वद मे तं वधिष्यामि कालकल्पमपि क्षणात् ॥ २२ ॥
मृत्यूच्या मुखात जाऊ इच्छिणार्‍या कुणी बरे तुझी अशी दशा केली आहे ? मला सांग तू. तो जरी काळाप्रमाणे असला तरी मी क्षणात त्याचा वध करीन." (२२)

तमाह राक्षसी रामः सीतालक्ष्मणसंयुतः ।
दण्डकं निर्भयं कुर्वन्नास्ते गोदावरीतटे ॥ २३ ॥
तेव्हा ती राक्षसी त्याला म्हणाली, "सीता आणि लक्ष्मण यांच्यासह असणारा राम दंडकारण्याला निर्भय करीत, गोदावरीच्या तीरावर राहात आहे. (२३)

मामेवं कृतवांस्तस्य भ्राता तेनैव चोदितः ।
यदि त्वं कुलजातोऽसि वीरोऽसि जहि तौ रिपू ॥ २४ ॥
त्या रामाच्या सांगण्यावरून त्याच्या भावानेच माझी अशी दशा केली आहे. जर तू उच्च कुळात जन्माला आला असशील आणि जर तू वीर असशील, तर तू त्या दोन शत्रूंना ठार कर. (२४)

तयोस्तु रुधिरं पास्ये भक्षयैतौ सुदुर्मदौ ।
नो चेत्प्राणान्परित्यज्य यास्यामि यमसादनम् ॥ २५ ॥
त्या दोघांचे रक्त मी पिईन. त्या दोन अतिशय मन्योन्मत्त माणसांना तू खाऊन टाक. नाही तर प्राणत्याग करून मी यमसदनास जाईन." (२५)

तत्छ्रुत्वा त्वरितं प्रागात्खरः क्रोधेन मूर्च्छितः ।
चतुर्दश सहस्राणि रक्षसां भीमकर्मणाम् ॥ २६ ॥
चोदयामास रामस्य समीपं वधकाङ्‌क्षया
खरस्य त्रिशिराश्चैव दूषणश्चैव राक्षसः ॥ २७ ॥
सर्वे रामं ययुः शीघ्रं नानाप्रहरणोद्यताः ।
श्रुत्वा कोलाहलं तेषां रामः सौमित्रिमब्रवीत् ॥ २८ ॥
ते ऐ कल्यावर, क्रोधाने झपाटलेला खर रामांबरोबर युद्ध करण्यास त्वरित निघाला. आणि श्रीरामांचा वध करण्याच्या इच्छेने त्याने भयंकर कर्मे करणार्‍या चौदा हजार राक्षसांना श्रीरामावर चालून जाण्याची आज्ञा केली. तसेच खर, त्रिशिरा आणि दूषण असे हे सर्व राक्षस नाना प्रकारची अस्त्रे परजून झटक्यात श्रीरामांकडे गेले. त्यांचा कोलाहल ऐकल्यावर श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले. (२६-२८)

श्रूयते विपुलः शब्दो नूनमायान्ति राक्षसाः ।
भविष्यति महद्युद्धं नूनमद्य मया सह ॥ २९ ॥
"लक्ष्मणा, बघ. प्रचंड आवाज ऐकू येत आहे. निश्चितपणे राक्षस आपल्यावर चालून येत आहेत. आज खरेच माझ्याबरोबर त्यांचे प्रचंड युद्ध होईल. (२९)

सीतां नीत्वा गुहां गत्वा तत्र तिष्ठ महाबल ।
हन्तुमिच्छाम्यहं सर्वान् राक्षसान् घोररूपिणः ॥ ३० ॥
म्हणून, हे महाबली लक्ष्मणा, सीतेला घेऊन एका गुहेत जाऊन तू तेथेच थांब. भयंकर रूप असणार्‍या सर्व राक्षसांचा वध करण्याची माझी इच्छा आहे. (३०)

अत्र किञ्चिन्न वक्तव्यं शापितोऽसि ममोपरि ।
तथेति सीतामादाय लक्ष्मणो गह्वरं ययौ ॥ ३१ ॥
या बाबतीत तू काहीही बोलावयाचे नाही. तुला माझी शपथ आहे." "ठीक आहे," असे म्हणून सीतेला घेऊन लक्ष्मण एका गुहेत गेला. (३१)

रामः परिकरं बद्ध्वा धनुरादाय निष्ठुरम् ।
तूणीरावक्षयशरौ बद्ध्वायत्तोऽभवत्प्रभुः ॥ ३२ ॥
इकडे कंबर कसून, बळकट धनुष्य घेऊन, अक्षय बाण असणारे दोन भाते पाठीवर बांधून प्रभू रामचंद्र युद्धासाठी सज झाले. (३२)

तत आगत्य रक्षांसि रामस्योपरि चिक्षिपुः ।
आयुधानि विचित्राणि पाषाणान्पादपानपि ॥ ३३ ॥
त्यानंतर राक्षस तेथे आले आणि त्यांनी श्रीरामावर नाना प्रकारची विचित्र शस्त्रे, दगड आणि वृक्षसुद्धा फेकले. (३३)

तानि चिच्छेद रामोऽपि लीलया तिलशः क्षणात् ।
ततो बाणसहस्रेण हत्वा तान् सर्वराक्षसान् ॥ ३४ ॥
खरं त्रिशिरसं चैव दूषणं चैव राक्षसम् ।
जघान प्रहरार्धेन सर्वानेव रघूत्तमः ॥ ३५ ॥
श्रीरामांनीसुद्धा एका क्षणात त्यांचे तिळतिळ तुकडे करून ती अस्त्रे तोडून टाकली. नंतर हजारो बाणांनी त्या सर्व राक्षसांना ठार करून, खर, त्रिशिरा व दूषण या सर्वच राक्षसांना त्यांनी ठार केले. अशा प्रकारे अर्ध्या प्रहरातच रघूत्तमांनी त्या सर्वच राक्षसांना मारून टाकले. (३४-३५)

लक्ष्मणोऽपि गुहामध्यात्सीतामादाय राघवे ।
समर्प्य राक्षसान्दृष्ट्‍वा हतान्विस्मयमाययौ ॥ ३६ ॥
नंतर गुहेमधून सीतेला परत आणून लक्ष्मणाने तिला श्रीरामांच्या स्वाधीन केले. सर्व राक्षस मेलेले पाहून लक्ष्मण विस्मय-चकित झाला. (३६)

सीता रामं समालिङ्‌ग्य प्रसन्नमुखपङ्‌कजा ।
शस्त्रव्रणानि चाङ्‌गेषु ममार्ज जनकात्मजा ॥ ३७ ॥
जिचे मुखकमल प्रसन्न झाले आहे अशा सीतेने श्रीरामांना आलिंगन दिले आणि जनककन्या सीतेने श्रीरामाच्या अंगावरील शस्त्रांच्या जखमा धुवून काढल्या. (३७)

सापि दुद्राव दृष्ट्‍वा तान्हतान् राक्षसपुङ्‌गवान् ।
लङ्‌कां गत्वा सभामध्ये क्रोशन्ती पादसन्निधौ ॥ ३८ ॥
रावणस्य पपातोर्व्यां भगिनी तस्य रक्षसः ।
दृष्ट्‍वा तां रावणः प्राह भगिनीं भयविह्वलाम् ॥ ३९ ॥
ते सर्व महाभयंकर राक्षस मारले गेले आहेत हे पाहून राक्षसराज रावणाची ती बहीण पळत सुटली, आणि लंकेत जाऊन, राजसभेमध्ये बसलेल्या रावणाच्या पायाजवळ आक्रोश करीत जमिनीवर पडली. भयाने विव्हळ झालेल्या आपल्या बहिणीला पाहून रावण तिला म्हणाला. (३८-३९)

उत्तिष्ठोत्तिष्ठ वत्से त्वं विरूपकरणं तव ।
कृतं शक्रेण वा भद्रे यमेन वरुणेन वा ॥ ४० ॥
"अग वत्से, ऊठ, ऊठ. हे भद्रे, तुझे हे रूप कुणी विद्रूप केले ? इंद्राने की यमाने की वरुणाने की कुबेराने ? मला सांग. एका क्षणात मी त्याला भस्म करून टाकीन." तेव्हा रक्षसी त्याला असे म्हणाली, " रावणा, तू निष्काळजी झाला आहेस. आणि तुझ्या बुद्धीला मोह पडला आहे. (४०-४१)

कुबेरेणाथवा ब्रूहि भस्मीकुर्यां क्षणेन तम् ।
राक्षसी तमुवाचेदं त्वं प्रमत्तो विमूढधीः ॥ ४१ ॥
पानासक्तः स्त्रीविजितः षण्ढः सर्वत्र लक्ष्यसे ।
चारचक्षूर्विहीनस्त्वं कथं राजा भविष्यसि ॥ ४२ ॥
तू मद्यपानात आसक्त आहेस. तू स्त्री-वश झाला आहेस. सर्वच बाबतीत तू एकाद्या षंढाप्रमाणे दिसतोस. गुप्तहेररूपी नेत्र नसलेला तू राजा कसा बरे राहाशील ? (४२)

खरश्च निहतः सङ्‌ख्ये दूषणस्त्रिशिरास्तथा ।
चतुर्दश सहस्त्राणि राक्षसानां महात्मनाम् ॥ ४३ ॥
निहतानि क्षणेनैव रामेणासुरशत्रुणा ।
जनस्थानमशेषेण मुनीनां निर्भयं कृतम् ।
न जानासि विमूढस्त्वमत एव मयोच्यते ॥ ४४ ॥
युद्धात खर मारला गेला. तसेच दूषण आणि त्रिशिरा हेही मारले गेले. तसेच चौदा हजार महाशक्तिशाली भयंकर राक्षसही असुरांचा शत्रू असणार्‍या रामाकडून एका क्षणातच ठार केले गेले. अशा प्रकारे ते जनस्थान रामाने मुनींच्यासाठी संपूर्णपणे निर्भय करून टाकले आहे. परंतु तुला माहिती दिसत नाही. म्हणूनच तू फार मूर्ख आहेस, असे मी म्हणाले." (४३-४४)

रावण उवाच
को वा रामः किमर्थं वा कथं तेनासुरा हताः ।
सम्यक्कथय मे तेषां मूलघातं करोम्यहम् ॥ ४५ ॥
रावण म्हणाला-"अग, हा राम कोण आहे ? त्याने असुरांना कशासाठी आणि कसे ठार केले ? तू मला सर्व नीट सांग. मी त्याचा समूळ नाश करीन." (४५)

शूर्पणखोवाच
जनस्थानादहं याता कदाचिद्‌गौतमीतटे ।
तत्र पञ्चवटी नाम पुरा मुनिजनाश्रया ॥ ४६ ॥
शूर्पणखा म्हणाली -एकदा मी जनस्थानातून गौतमीच्या तीरावर गेले होते. पूर्वी जेथे मुनीजनांनी आश्रय घेतला होता, असा पंचवटी नावाचा एक आश्रम तेथे आहे. (४६)

तत्राश्रमे मया दृष्टो रामो राजीवलोचनः ।
धनुर्बाणधरः श्रीमान् जटावल्कलमण्डितः ॥ ४७ ॥
कमळाप्रमाणे नेत्र असणारा, धनुष्य व बाण धारण करणारा, शोभेने संपन्न, जटा आणि वल्कले यांनी मंडित असा राम मी तेथे त्या आश्रमात पाहिला. (४७)

कनीयाननुजस्तस्य लक्ष्मणोऽपि तथाविधः ।
तस्य भार्या विशालाक्षी रूपिणी श्रीरिवापरा ॥ ४८ ॥
त्याचा धाकटा भाऊ लक्ष्मणसुद्धा त्या रामाप्रमाणे आहे. त्या रामाची भार्या ही विशाल नेत्र असणारी, रूप संपन्न, आणि दुसर्‍या लक्ष्मीप्रमाणे आहे. (४८)

देवगन्धर्वनागानां मनुष्याणां तथाविधा ।
न दृष्टा न श्रुता राजन्द्योतयन्ती वनं शुभा ॥ ४९ ॥
हे राजन, देव, गंधर्व, नाग आणि मनुष्य यांच्यामध्ये तिच्यासारखी सुंदर स्त्री कुणी पाहिलेली नाही आणि कुणी ऐकलेली नाही. शुभ लक्षणे असणारी ती स्त्री संपूर्ण वनाला सुशोभित करीत होती. (४९)

आनेतुं अहमुद्युक्ता तां भार्यार्थं तवानघ ।
लक्ष्मणो नाम तद्‌भ्राता चिच्छेद मम नासिकाम् ॥ ५० ॥
हे निष्पापा, तुझी भार्या बनविण्यासाठी मी तिला आणण्याचा प्रयत्‍न केला. तेव्हा लक्ष्मण नावाच्या त्या रामाच्या भावाने माझे नाक कापले. (५०)

कर्णौ च नोदितस्तेन रामेण स महाबलः ।
ततोऽहमतिदुःखेन रुदती खरमन्वगाम् ॥ ५१ ॥
त्या रामाच्या प्रेरणेनेच त्या महाबली लक्ष्मणाने माझे कानही कापले. त्या वेळी अतिशय दुःखाने रडत रडत मी खराच्याजवळ गेले. (५१)

सोऽपि रामं समासाद्य युद्धं राक्षसयूथपैः ।
अतः क्षणेन रामेण तेनैव बलशालिना ॥ ५२ ॥
सर्वे तेन विनष्टा वै राक्षसा भीमविक्रमाः ।
यदि रामो मनः कुर्यात्त्रैलोक्यं निमिषार्धतः ॥ ५३ ॥
भस्मीकुर्यान्न सन्देह इति भाति मम प्रभो ।
यदि सा तव भार्या स्यात्सफलं तव जीवितम् ॥ ५४ ॥
राक्षस सैन्याच्या सेनापतीसह त्या खरानेसुद्धा रामाबरोबर युद्ध केले. आणि त्या बलशाली रामाने एका क्षणात ते सर्व भयंकर पराक्रम करणारे राक्षस नष्ट करून टाकले. मला असे वाटते की राम जर मनात आणील, तर तो अर्ध्या निमिषात सर्व त्रैलोक्य भस्मसात करून टाकील, यात शंका नाही. हे प्रभो, जर ती सीता तुझी भार्या बनेल, तर तुझे जीवन सफल होईल. (५२-५४)

अतो यतस्व राजेन्द्र यथा ते वल्लभा भवेत् ।
सीता राजीवपत्राक्षी सर्वलोकैकसुन्दरी ॥ ५५ ॥
म्हणून हे राजेंद्रा, कमलपत्राप्रमाणे नयन असणारी, सर्व लोकांत एकमात्र सुंदर असणारी ती सीता तुझी प्राणप्रिया होईल, असा प्रयत्‍न तू कर. (५५)

साक्षाद्‍रामस्य पुरतः स्थातुं त्वं न क्षमः प्रभो ।
मायया मोहयित्वा तु प्राप्स्यसे तां रघूत्तमम् ॥ ५६ ॥
हे स्वामी, रामापुढे या रूपाने साक्षात उभे राहणे तुला शक्य नाही. तेव्हा कपटाने त्याला भुलवून तू सीतेला प्राप्त करून घे. (५६)

श्रुत्वा तत्सूक्तवाक्यैश्च दानमानादिभिस्तथा ।
आश्वास्य भगिनीं राजा प्रविवेश स्वकं गृहम् ।
तत्र चिन्तापरो भूत्वा निद्रां रात्रौ न लब्धवान् ॥ ५७ ॥
शूर्पणखेचे ते वचन ऐकल्यावर, चांगल्या शब्दांनी तिला धीर देऊन आणि तिला दान, मान इत्यादी देऊन राक्षसराज रावणाने आपल्या बहिणीचे सांत्वन केले व तो स्वतःच्या महालात शिरला. पण काळजीमुळे त्याला रात्री झोप आली नाही. (५७)

एकेन रामेण कथं मनुष्य-
     मात्रेण नष्टः सबलः खरो मे ।
भ्राता कथं मे बलवीर्यदर्प-
     युतो विनष्टो बत राघवेण ॥ ५८ ॥
तो विचार करीत होता. "काय आश्चर्य आहे ! सामर्थ्य, वीर्य आणि दर्प यांनी युक्त असा माझा भाऊ खर याला सैन्यासकट मनुष्य असणार्‍या रामाने केवळ एकटा असून कसे बरे मारले ? (५८)

यद्वा न रामो मनुजः परेशो
     मां हन्तुकामः सबलं बलौघैः ।
सम्प्रार्थितोऽयं द्रुहिणेन पूर्वं
     मनुष्यरूपोऽद्य रघोः कुलेऽभूत् ॥ ५९ ॥
अथवा राम हा माणूस नव्हे. पूर्वीच्या काळी ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यामुळे वानरसेनेच्या समूहाद्वारे मला सैन्यासह मारण्याच्या इच्छेने, परमेश्वरच आता रघूच्या कुळात मनुष्यरूपाने जन्माला आला असावा. (५९)

वध्यो यदि स्यां परमात्मनाहं
     वैकुण्ठराज्यं परिपालयेऽहम् ।
नो चेदिदं राक्षसराज्यमेव
     भोक्ष्ये चिरं राममतो व्रजामि ॥ ६० ॥
जर मी परमात्म्याकडून मारला गेलो तर मी वैकुंठाचे राज्य भोगीन. तसे न घडल्यास मी चिरकाल हे राक्षसांचे राज्य भोगत राहीन. म्हणून मी आता रामाकडेच जातो." (६०)

इत्थं विचिन्त्याखिलराक्षसेन्द्रो
     रामं विदित्वा परमेश्वरं हरिम् ।
विरोधबुद्ध्यैव हरिं प्रयामि
     द्रुतं न भक्त्या भगवान्प्रसीदेत् ॥ ६१ ॥
अशा प्रकारे विचार करून, सर्व राक्षसांचा राजा असणार्‍या रावणाने राम हे साक्षात परमेश्वर आहेत असे जाणले. आणि त्याने ठरविले की, मी विरोध-बुद्धीनेच रामांकडे जाईन. कारण प्रेमपूर्ण भक्तीने भगवंत शीघ प्रसन्न होत नाही. (६१)

इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे
अरण्यकाण्डे पञ्चमः सर्गः ॥ ५ ॥
इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अरण्यकाण्डे पंचमःसर्गः ॥ ५ ॥


GO TOP