सुग्रीवेण श्रीरामस्य प्रोत्साहनम् -
|
सुग्रीवांनी श्रीरामांना उत्साह प्रदान करणे -
|
तं तु शोकपरिद्यूनं रामं दशरथात्मजम् । उवाच वचनं श्रीमान् सुग्रीवः शोकनाशनम् ॥ १ ॥
|
याप्रकारे शोकाने संतप्त झालेल्या दशरथनंदन रामांना सुग्रीवांनी त्यांच्या शोकाचे निवारण करणारी गोष्ट सांगितली- ॥१॥
|
किं त्वया तप्यते वीर यथान्यः प्राकृतस्तथा । मैवं भूस्त्यज संतापं कृतघ्न इव सौहृदम् ॥ २ ॥
|
वीरवर ! आपण दुसर्या साधारण मनुष्याप्रमाणे का संताप करत आहात ? आपण याप्रकारे चिंतित होऊ नये. ज्याप्रमाणे कृतघ्न पुरूष सौहार्दाचा त्याग करतो, त्याप्रमाणे आपणही हा संताप सोडून द्या. ॥२॥
|
संतापस्य च ते स्थानं न हि पश्यामि राघव । प्रवृत्तावुपलब्धायां ज्ञाते च निलये रिपोः ॥ ३ ॥
|
रघुनंदना (राघवा) ! जर आता सीतेचा समाचार मिळाला आहे आणि शत्रुचा निवास-स्थानाचा पत्ता लागला आहे तर मला आपल्या या दु:ख आणि चिंतेचे काही कारण दिसून येत नाही. ॥३॥
|
मतिमान् शास्त्रवित् प्राज्ञः पण्डितश्चासि राघव । त्यजेमां प्राकृतां बुद्धिं कृतात्मेवार्थदूषिणीम् ॥ ४ ॥
|
राघवा ! आपण बुद्धिमान, शास्त्रांचे ज्ञाते, विचारकुशल आणि पंडित आहात, म्हणून कृतात्मा पुरूषाप्रमाणे या अर्थदूषक प्राकृत बुद्धिचा परित्याग करावा. ॥४॥
|
समुद्रं लङ्घयित्वा तु महानक्रसमाकुलम् । लङ्कामारोहयिष्यामो हनिष्यामश्च ते रिपुम् ॥ ५ ॥
|
मोठमोठ्या नक्रांनी भरलेल्या समुद्रास ओलांडून आम्ही लोक लंकेवर चढाई करू आणि आपल्या शत्रूला नष्ट करून टाकू. ॥५॥
|
निरुत्साहस्य दीनस्य शोकपर्याकुलात्मनः । सर्वाथा व्यवसीदन्ति व्यसनं चाधिगच्छति ॥ ६ ॥
|
जो पुरूष उत्साहशून्य, दीन आणि मनातल्या मनात शोकाने व्याकुळ राहातो त्याची सारी कामे बिघडून जातात आणि तो मोठ्या विपत्तित पडतो. ॥६॥
|
इमे शूराः समर्थाश्च सर्वतो हरियूथपाः । त्वत्प्रियार्थं कृतोत्साहाः प्रवेष्टुमपि पावकम् । एषां हर्षेण जानामि तर्कश्चापि दृढो मम ॥ ७ ॥
|
हे वानर यूथपति सर्व प्रकारे समर्थ आणि शूरवीर आहेत. आपले प्रिय करण्यासाठी यांच्या मनात मोठा उत्साह आहे. हे आपल्यासाठी जळत्या आगीतही प्रवेश करू शकतात. समुद्र ओलांडणे आणि रावणास मारण्याच्या प्रसंगाची चर्चा होते तेव्हां त्यांचे चेहरे प्रसन्नतेने फुलून जातात. यांचा हा हर्ष आणि उत्साह या योगेच मी ही गोष्ट जाणतो, तसेच याविषयी माझा स्वत:चा तर्क (निश्चय) ही सुदृढ आहे. ॥७॥
|
विक्रमेण समानेष्ये सीतां हत्वा यथा रिपुम् । रावणं पापकर्माणं तथा त्वं कर्तुमर्हसि ॥ ८ ॥
|
आपण असे करावे की ज्यायोगे आम्ही पराक्रमपूर्वक आपला शत्रु पापाचारी रावण याचा वध करून सीतेला येथे घेऊन येऊ. ॥८॥
|
सेतुरत्र यथा बद्ध्येद् यथा पश्येम तां पुरीम् । तस्य राक्षसराजस्य तथा त्वं कुरु राघव ॥ ९ ॥
|
हे राघवा ! आपण असा कुठला तरी उपाय करावा, ज्यायोगे समुद्रावर सेतु बांधणे शक्य होईल आणि आम्ही त्या राक्षसराजाच्या लंकापुरीस पाहू शकू. ॥९॥
|
दृष्ट्वा तां हि पुरीं लङ्कां त्रिकूटशिखरे स्थिताम् । हतं च रावणं युद्धे दर्शनादवधारय ॥ १० ॥
|
त्रिकूट पर्वताच्या शिखरावर बसलेली लंकापुरी एकदा दृष्टिस पडली तर आपण हे निश्चित समजा की युद्धात रावण दिसून आला आहे आणि मारला गेला आहे. ॥१०॥
|
अबद्ध्वा सागरे सेतुं घोरे तु वरुणालये । लङ्का न मर्दितुं शक्या सेन्द्रैरपि सुरासुरैः ॥ ११ ॥
|
वरूणाच्या निवासभूत घोर समुद्रावर सेतु बांधल्याशिवाय तर इंद्रासहित संपूर्ण देवता आणि असुरही लंकेला पददलित करू शकत नाहीत. ॥११॥
|
सेतुबंधः समुद्रे च यावल्लङ्कासमीपतः । सर्वं तीर्णं च मे सैन्यं जितमित्युपधारय । इमे हि समरे शूरा हरयः कामरूपिणः ॥ १२ ॥
|
म्हणून जेव्हा लंकेच्या निकटपर्यंत समुद्रावर पूल बांधला जाईल तेव्हा आमची सर्व सेना त्या पैलतीरास जाईल. मग तर आपण असेच समजा की आपला जय झाला आहे. कारण इच्छेनुसार रूप धारण करणारे हे वानर युद्धात मोठी वीरता दाखविणारे आहेत. ॥१२॥
|
तदलं विक्लवां बुद्धिं राजन् सर्वार्थनाशिनीम् । पुरुषस्य हि लोकेऽस्मिन् शोकः शौर्यापकर्षणः ॥ १३ ॥
|
म्हणून राजन ! आपण या व्याकुळ बुद्धिचा आश्रय घेऊ नये. बुद्धिच्या या व्याकुळतेचा त्याग करावा, कारण ही व्याकुळता समस्त कार्यांना बिघडविणारी आहे; आणि या जगतात शोक पुरूषाच्या शौर्याला नष्ट करून टाकतो. ॥१३॥
|
यत् तु कार्यं मनुष्येण शौटीर्यमवलंब्यताम् । तदलंकरणायैव कर्तुर्भवति सत्वरम् ॥ १४ ॥
|
मनुष्याने ज्याचा आश्रय केला पाहिजे त्या शौर्याचेच त्याने अवलंबन करावे; कारण ते कर्त्याला शीघ्रच अलंकृत करून टाकते- त्याच्या अभिष्ट फळाची सिद्धि करून देते. ॥१४॥
|
अस्मिन् काले महाप्राज्ञ सत्त्वमातिष्ठ तेजसा । शूराणां हि मनुष्याणां त्वद्विधानां महात्मनाम् । विनष्टे वा प्रणष्टे वा शोकः सर्वार्थनाशनः ॥ १५ ॥
|
म्हणून महाप्राज्ञ श्रीरामा ! आपण या समयी तेजासह धैर्याचा आश्रय घ्यावा. कुठली वस्तु हरवली असली अथवा नष्ट झाली असली तरी त्यासाठी आपल्यासारख्या शूरवीर महात्मा पुरूषाने शोक करता कामा नये, कारण की शोक सर्व कामांना बिघडवून टाकतो. ॥१५॥
|
तत्त्वं बुद्धिमतां श्रेष्ठः सर्वशास्त्रार्थकोविदः । मद्विधैः सचिवैः सार्धं अरिं जेतुं समर्हसि ॥ १६ ॥
|
आपण बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ आणि संपूर्ण शास्त्रांचे मर्मज्ञ आहात. म्हणून आमच्या सारख्या मंत्र्याबरोबर आणि सहायकांबरोबर राहून अवश्यच शत्रुवर विजय प्राप्त करू शकता. ॥१६॥
|
न हि पश्याम्यहं कञ्चित् त्रिषु लोकेषु राघव । गृहीतधनुषो यस्ते तिष्ठेद् अभिमुखो रणे ॥ १७ ॥
|
राघवा ! मला तर तीन्ही लोकात असा कोणीही वीर दिसून येत नाही जो रणभूमीमध्ये धनुष्य घेऊन उभे असणार्या आपल्या समोर उभा राहू शकेल. ॥१७॥
|
वानरेषु समासक्तं न ते कार्यं विपत्स्यते । अचिराद् द्रक्ष्यसे सीतां तीर्त्वा सागरमक्षयम् ॥ १८ ॥
|
ज्याचा भार वानरांच्यावर ठेवला गेला आहे, ते आपले कार्य बिघडणार नाहीत. आपण लवकरच या अक्षय समुद्रास पार करून सीतेचे दर्शन कराल. ॥१८॥
|
तदलं शोकमालम्ब्य क्रोधमालम्ब भूपते । निश्चेष्टाः क्षत्रिया मन्दाः सर्वे चण्डस्य बिभ्यति ॥ १९ ॥
|
पृथ्वीनाथ ! आपल्या हृदयात शोकाला स्थान देणे व्यर्थ आहे. यासमयी तर आपण शत्रुंच्या प्रति क्रोध धारण करावा. जे क्षत्रिय मंद (क्रोधशून्य) असतात त्यांच्या कडून काही प्रयत्न होत नाही, परंतु जो शत्रुच्या प्रति आवश्यक रोषाने भरलेला असतो त्याला सर्व घाबरतात. ॥१९॥
|
लङ्घनार्थं च घोरस्य समुद्रस्य नदीपतेः । सहास्माभिरिहोपेतः सूक्ष्मबुद्धिर्विचारय ॥ २० ॥
|
नद्यांचा स्वामी घोर समुद्रास पार करण्यासाठी काय उपाय करावा या विषयी आपण आमच्या बरोबर बसून विचार करावा, कारण आपली बुद्धि फार सूक्ष्म आहे. ॥२०॥
|
लंकितेअ तत्र तैः सैन्यैः जितमित्येव निश्चिनु । सर्वं तीर्णं च मे सैन्यं जितमित्यवधार्यताम् ॥ २१ ॥
|
जर आमचे सैनिक समुद्र ओलांडून गेले तर निश्चितच समजा की आपला जय अवश्य होईल. सर्व सेनेचे पैलतीरास पोहोंचणे हाच आपला विजय समजावा. ॥२१॥
|
इमे हि हरयः शूराः समरे कामरूपिणः । तानरीन् विधमिष्यन्ति शिलापादपवृष्टिभिः ॥ २२ ॥
|
हे वानर संग्रामात फार शूरवीर आहेत आणि इच्छेनुसार रूप धारण करू शकतात. हे दगडांची आणि वृक्षांची वृष्टी करूनच त्या शत्रूंचा संहार करून टाकतील. ॥२२॥
|
कथञ्चित् परिपष्यामि लंकितं वरुणालयम् । हतमित्येव तं मन्ये युद्धे शत्रुनिबर्हण ॥ २३ ॥
|
शत्रुसूदन रामा ! जर कुठल्याही प्रकारे मी या वानरसेनेला समुद्राच्या दुसर्या तीरावर पोहोचलेली पाहू शकलो तर मी रावणाला युद्धात मेलेलाच समजतो. ॥२३॥
|
किमुक्त्वा बहुधा चापि सर्वथा विजयी भवान् । निमित्तानि च पश्यामि मनो मे संप्रहृष्यति ॥ २४ ॥
|
फार बोलून काय लाभ ? माझा तर विश्वास आहे की आपण सर्वथा विजयी व्हाल, कारण मला तसेच शकुन दिसून येत आहेत आणि माझे हृदयही हर्ष आणि उत्साहाने भरून आले आहे. ॥२४॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा दुसरा सर्ग पूर्ण झाला. ॥२॥
|