सीताया मार्मिकवचसा प्रेरितस्य लक्ष्मणस्य श्रीरामपार्श्वे गमनम् -
|
सीतेच्या मर्मभेदी वचनांनी प्रेरित होऊन लक्ष्मणांचे श्रीरामांकडे जाणे -
|
आर्तस्वरं तु तं भर्तुर्विज्ञाय सदृशं वने ।
उवाच लक्ष्मणं सीता गच्छ जानीहि राघवम् ॥ १ ॥
|
त्या समयी वनात जो आर्तनाद झाला, तो आपल्या पतिच्या स्वराशी मिळता-जुळता आहे असे जाणून सीता लक्ष्मणास म्हणाली - जा ! राघवांचा शोध घ्या- त्यांचा समाचार (कुशल) जाणून घ्या. ॥१॥
|
नहि मे जीवितं स्थाने हृदयं वावतिष्ठते ।
क्रोशतः परमार्तस्य श्रुतः शब्दो मया भृशम् ॥ २ ॥
|
त्यांनी अत्यंत आर्तस्वराने आपणास हाका मारल्या आहेत. मी त्यांचा तो शब्द ऐकला आहे. तो अत्यंत उच्च स्वरात उच्चारला गेला होता. तो ऐकून माझे प्राण आणि मन आपल्या ठिकाणी राहिलेले नाहीत. मी घाबरून गेले आहे. ॥२॥
|
आक्रन्दमानं तु वने भ्रातरं त्रातुमर्हसि ।
तं क्षिप्रमभिधाव त्वं भ्रातरं शरणैषिणम् ॥ ३ ॥
रक्षसां वशमापन्नं सिंहानामिव गोवृषम् ।
न जगाम तथोक्तस्तु भ्रातुराज्ञाय शासनम् ॥ ४ ॥
|
तुमचे बंधु वनात आर्तनाद करीत आहेत. त्यांना कुणाच्या आश्रयाची आवश्यकता आहे. तुम्ही त्यांना वाचवा. तात्काळ आपल्या भावाजवळ धावत जा. ज्याप्रमाणे एखादा वळू सिंहाच्या पंजात फसतो त्याप्रमाणे ते राक्षसांच्या ताब्यात सापडले आहेत. म्हणून जा ! सीतेने असे म्हटल्यावरही भावाच्या आदेशाचा विचार करून लक्ष्मण गेले नाहीत. ॥३-४॥
|
तमुवाच ततस्तत्र क्षुभिता जनकात्मजा ।
सौमित्रे मित्ररूपेण भ्रातुस्त्वमसि शत्रुवत् ॥ ५ ॥
यस्त्वमस्यामवस्थायां भ्रातरं नाभिपद्यसे ।
इच्छसि त्वं विनश्यन्तं रामं लक्ष्मण मत्कृते ॥ ६ ॥
|
त्यांच्या या वागण्याने जनकनंदिनी सीता अत्यंत क्षुब्ध झाली आणि त्यांना या प्रकारे म्हणाली - सौमित्र ! तुम्ही मित्ररूपाने आपल्या भावाचे शत्रूच आहात असे वाटते, म्हणून तुम्ही अशा संकटाच्या अवस्थेतही भावाजवळ पोहोचत नाही आहात. लक्ष्मणा ! मी जाणते आहे की तुम्ही माझ्यावर अधिकार मिळविण्यासाठीच या वेळी श्रीरामांच्या विनाशाची इच्छा करीत आहात. ॥५-६॥
|
लोभात्तु मत्कृते नूनं नानुगच्छसि राघवम् ।
व्यसनं ते प्रियं मन्ये स्नेहो भ्रातरि नास्ति ते ॥ ७ ॥
|
माझ्या संबंधी तुमच्या मनात लोभ उत्पन्न झाला आहे. निश्चितच म्हणून तुम्ही राघवाच्या पाठोपाठ जात नाही आहात. मी समजते आहे की श्रीराम संकटात पडणे हेच तुम्हांला प्रिय आहे. तुमच्या मनात आपल्या भावासंबंधी स्नेह नाही आहे. ॥७॥
|
तेन तिष्ठसि विस्रब्धं तमपश्यन् महाद्युतिम् ।
किं हि संशयमापन्ने तस्मिन्निह मया भवेत् ॥ ८ ॥
कर्तव्यमिह तिष्ठन्त्या यत्प्रधानस्त्वमागतः ।
|
याच कारणाने तुम्ही त्या महातेजस्वी श्रीरामचंद्रांना पहाण्यास न जाता येथे निश्चिन्त उभे आहात. हाय ! जे मुख्यतः तुमचे सेव्य आहेत, ज्यांचे रक्षण आणि सेवा करण्यासाठी तुम्ही येथे आला आहात, त्यांचे प्राण जर संकटात पडलेले असतील तर येथे माझे रक्षण करून काय साधणार आहे ? ॥८ १/२॥
|
इति ब्रुवाणां वैदेहीं बाष्पशोकसमन्विताम् ॥ ९ ॥
अब्रवील्लक्ष्मणस्त्रस्तां सीतां मृगवधूमिव ।
|
वैदेही सीतेची दशा भयभीत झालेल्या हरिणी सारखी झाली होती. तिने शोकमग्न होऊन अश्रु ढाळीत जेव्हा या प्रमाणे भाषण केले तेव्हा लक्ष्मण तिला या प्रमाणे म्हणाले - ॥ ९ १/२॥
|
पन्नगासुरगन्धर्वदेवदानवराक्षसैः ॥ १० ॥
अशक्यस्तव वैदेहि भर्ता जेतुं न संशयः ।
|
वैदेही ! आपण विश्वास करावा. नाग, असुर, गंधर्व, देवता, दानव तसेच राक्षस, हे सर्व मिळूनही आपल्या पतिला परास्त करू शकत नाहीत. मी जे हे सांगत आहे यात संशयास जागा नाही आहे. ॥१० १/२॥
|
देवि देवमनुष्येषु गन्धर्वेषु पतत्रिषु ॥ ११ ॥
राक्षसेषु पिशाचेषु किन्नरेषु मृगेषु च ।
दानवेषु च घोरेषु न स विद्येत शोभने ॥ १२ ॥
यो रामं प्रतियुध्येत समरे वासवोपमम् ।
अवध्यः समरे रामो नैवं त्वं वक्तुमर्हसि ॥ १३ ॥
|
देवी ! शोभने ! देवता, मनुष्य, गंधर्व, पक्षी, राक्षस, पिशाच्च, किन्नर मृग अथवा घोर दानवातही असा कोणी वीर नाही की जो समरांगणात इंद्रासमान पराक्रमी श्रीरामांचा सामना करू शकेल. भगवान् श्रीराम युद्धात अवध्य आहेत म्हणून आपण अशा प्रकारच्या गोष्टी बोलता कामा नयेत. ॥११-१३॥
|
न त्वामस्मिन् वने हातुमुत्सहे राघवं विना ।
अनिवार्यं बलं तस्य बलैर्बलवतामपि ॥ १४ ॥
त्रिभिर्लोकैः समुदितैः सेश्वरैः सामरैरपि ।
हृदयं निर्वृतं तेऽस्तु सन्तापस्त्यज्यतां तव ॥ १५ ॥
|
श्रीराघवांच्या अनुपस्थितीत या वनामध्ये मी आपल्याला एकटी सोडून जाऊ शकत नाही. सैनिक बलाने संपन्न मोठ मोठे राजेही आपल्या सार्या सेनांच्या द्वारे श्रीरामांच्या बलास कुण्ठित करू शकत नाहीत. देवता तसेच इंद्र आदिसह मिळून तीन्ही लोकांनी आक्रमण केले तरी ते श्रीरामांच्या बळाचा वेग रोखू शकत नाहीत. म्हणून आपले हृदय शान्त होवो. आपण संताप सोडून द्यावा. ॥१४-१५॥
|
आगमिष्यति ते भर्ता शीघ्रं हत्वा मृगोत्तमम् ।
न च तस्य स्वरो व्यक्तं न कश्चिदपि दैवतः ॥ १६ ॥
गन्धर्वनगरप्रख्या माया तस्य च रक्षसः ।
|
आपले पतिदेव त्या सुंदर मृगाला मारून लवकरच परत येतील. तो शब्द जो आपण ऐकला, तो निश्चितच त्यांचा (श्रीरामांचा) नव्हता. कुणी देवतेने तो शब्द प्रकट केला असेल अशी गोष्ट नाही आहे. ती तर त्या राक्षसाची माया होती, गंधर्वनगरा प्रमाणेच. ॥१६ १/२॥
|
न्यासभूतासि वैदेहि न्यस्ता मयि महात्मना ॥ १७ ॥
रामेण त्वं वरारोहे न त्वां त्यक्तुमिहोत्सहे ।
|
हे सुंदरी ! वैदेही ! महात्मा रामांनी माझ्यावर तुमच्या रक्षणाचा भार सोपविला आहे. या समयी आपण माझ्यापाशी त्यांची ठेव या रूपात आहात. म्हणून आपल्याला मी येथे एकटी सोडून जाऊ शकत नाही. ॥१७ १/२॥
|
कृतवैराश्च कल्याणि वयमेतैर्निशाचरैः ॥ १८ ॥
खरस्य निधने देवि जनस्थानवधं प्रति ।
|
कल्याणमयी देवी ! ज्या समयी खराचा वध केला गेला त्या समयी जनस्थान निवासी दुसरेही बरेचसे राक्षस मारले गेले आहेत. या कारणामुळे या निशाचरांनी आपल्याशी वैर धरले आहे. ॥१८ १/२॥
|
राक्षसा विविधा वाचो विसृजन्ति महावने ॥ १९ ॥
हिंसाविहारा वैदेहि न चिन्तयितुमर्हसि ।
|
वैदेही ! प्राण्यांची हिंसा हीच क्रीडा आहे, विहार आहे अथवा मनोरंजन आहे. ते राक्षस या विशाल वनात नाना प्रकारच्या बोली (भाषा) बोलतात; म्हणून आपण चिन्ता करता कामा नये. ॥१९ १/२॥
|
लक्ष्मणेनैवमुक्ता तु क्रुद्धा संरक्तलोचना ॥ २० ॥
अब्रवीत् परुषं वाक्यं लक्ष्मणं सत्यवादिनम् ।
|
लक्ष्मणांनी असे म्हटल्यावर सीतेला फार क्रोध आला, तिचे डोळे लाल झाले आणि ती सत्यवादी लक्ष्मणास कठोर वचने बोलू लागली- ॥२० १/२॥
|
अनार्याकरुणारम्भ नृशंस कुलपांसन ॥ २१ ॥
अहं तव प्रियं मन्ये रामस्य व्यसनं महत् ।
रामस्य व्यसनं दृष्ट्वा तेनैतानि प्रभाषसे ॥ २२ ॥
|
अनार्य ! निर्दयी ! क्रूरकर्मा ! कुलाङ्गार ! मी तुला खूप जाणून आहे. श्रीराम एखाद्या मोठ्या संकटात पडावेत हेच तुला प्रिय आहे. म्हणूनच तू रामांवर संकट आलेले पाहून ही अशा प्रकारच्या गोष्टी बनवून सांगत आहेस. ॥ २१-२२॥
|
नैव चित्रं सपत्नेषु पापं लक्ष्मण यद् भवेत् ।
त्वद् विधेषु नृशंसेषु नित्यं प्रच्छन्नचारिषु ॥ २३ ॥
|
लक्ष्मणा ! तुझ्या सारख्या क्रूर आणि सदा लपून राहणार्या शत्रूच्या मनात या प्रकारचा पापपूर्ण विचार असणे ही आश्चर्याची गोष्ट नाही आहे. ॥२३॥
|
सुदुष्टस्त्वं वने राममेकमेकोऽनुगच्छसि ।
मम हेतोः प्रतिच्छन्नः प्रयुक्तो भरतेन वा ॥ २४ ॥
|
तू फार दुष्ट आहेस. श्रीरामांना एकटे वनात जातांना पाहून मला प्राप्त करण्यासाठीच आपला भाव लपवून ठेवून तू एकटाच त्यांच्या पाठोपाठ निघून आला आहेस अथवा हेही संभव आहे की भरतानेच तुला धाडले असावे. ॥२४॥
|
तन्न सिध्यति सौमित्रे तवापि भरतस्य वा ।
कथमिन्दीवरश्यामं रामं पद्मनिभेक्षणम् ॥ २५ ॥
उपसंश्रित्य भर्तारं कामयेयं पृथग्जनम् ।
|
परंतु सौमित्र ! तुझा अथवा भरताचा हा मनोरथ सिद्ध होऊ शकणार नाही. नील कमलासमान श्यामसुंदर कमलनयन श्रीरामांची पतिरूपाने प्राप्ती झाल्यावर मी दुसर्या कुणा क्षुद्र पुरुषाची कामना कशी करू शकेन ? ॥२५ १/२॥
|
समक्षं तव सौमित्रे प्राणांस्त्यक्ष्याम्यसंशयम् ॥ २६ ॥
रामं विना क्षणमपि नहि जीवामि भूतले ।
|
सौमित्र ! मी तुझ्या समक्षच निःसंदेह आपल्या प्राणांचा त्याग करीन. परंतु श्रीरामांच्या विना एक क्षणही या भूतलावर जिंवत राहूं शकणार नाही. ॥२६ १/२॥
|
इत्युक्तः परुषं वाक्यं सीतया रोमहर्षणम् ॥ २७ ॥
अब्रवील्लक्ष्मणः सीतां प्राञ्जलिः स जितेन्द्रियः ।
उत्तरं नोत्सहे वक्तुं दैवतं भवती मम ॥ २८ ॥
|
सीतेने जेव्हा या प्रकारे कठोर तसेच अंगावर काटा येईल अशी वचने उच्चारली तेव्हा जितेन्द्रिय लक्ष्मण हात जोडून तिला म्हणाले - देवी ! मी आपल्या बोलण्याला उत्तर देऊ शकत नाही कारण की आपण माझ्यासाठी आराधनीय देवीसमान आहात. ॥२७-२८॥
|
वाक्यमप्रतिरूपं तु न चित्रं स्त्रीषु मैथिलि ।
स्वभावस्त्वेष नारीणामेषु लोकेषु दृश्यते ॥ २९ ॥
|
मैथिली ! अशा अनुचित आणि प्रतिकूल गोष्टी तोंडातून काढणे हे स्त्रियांच्या बाबतीत आश्चर्याचे नाही आहे; कारण की या संसारात स्त्रियांचा असा स्वभाव बहुतेक वेळा दिसून येत असतो. ॥२९॥
|
विमुक्तधर्माश्चपलास्तीक्ष्णा भेदकराः स्त्रियः ।
न सहे हीदृशं वाक्यं वैदेहि जनकात्मजे ॥ ३० ॥
श्रोत्रयोरुभयोर्मध्ये तप्तनाराचसंनिभम् ।
|
स्त्रिया प्रायः विनय आदि धर्मरहित, चंचल, कठोर, तसेच घरांत फूट पाडणार्याच असतात. वैदेही जानकी ! आपले हे बोलणे माझ्या दोन्ही कानात तापलेल्या लोखंडासारखे लागले आहे. मी असे बोलणे सहन करू शकत नाही. ॥३० १/२॥
|
उपशृण्वन्तु मे सर्वे साक्षिभूता वनेचराः ॥ ३१ ॥
न्यायवादी यथा वाक्यमुक्तोऽहं परुषं त्वया ।
धिक् त्वामद्य विनश्यन्तीं यन्मामेवं विशङ्कसे ॥ ३२ ॥
स्त्रीत्वाद् दुष्टभावेन गुरुवाक्ये व्यवस्थितम् ।
गमिष्ये यत्र काकुत्स्थः स्वस्ति तेऽस्तु वरानने ॥ ३३ ॥
|
या वनात विचरणारे सर्व प्राणी साक्षी होऊन माझे कथन ऐकोत. मी न्याययुक्त गोष्ट सांगितली आहे तरीही आपण माझ्या प्रति अशी कठोर वचने आपल्या मुखातून काढलीत, निश्चितच आज आपली बुद्धि भ्रष्ट झाली आहे. आपण नष्ट होऊ इच्छित आहात. मी मोठ्या भावाच्या आज्ञेचे पालन करण्यात दृढतापूर्वक तत्पर आहे आणि आपण केवळ स्त्री असल्यामुळे साधारण स्त्रियांच्या दुष्ट स्वभावाला आपलासा करून माझ्या प्रति अशी आशंका करीत आहात. ठीक आहे; आता मी जेथे माझे बंधु श्रीराम आहेत तिकडे निघून जात आहे. सुमुखी ! आपले कल्याण होवो ! ॥३१-३३॥
|
रक्षन्तु त्वां विशालाक्षि समग्रा वनदेवताः ।
निमित्तानि हि घोराणि यानि प्रादुर्भवन्ति मे ।
अपि त्वां सह रामेण पश्येयं पुनरागतः ॥ ३४ ॥
|
विशाल लोचने ! वनातील संपूर्ण देवता आपले रक्षण करोत ! कारण की या समयी माझ्या समोर जे अत्यंत भयंकर अपशकुन प्रकट होत आहेत त्यांनी मला संशयात पाडले आहे. काय मी रामांसह परत येथे येऊन आपल्याला सकुशल पाहू शकेन ? ॥३४॥
|
लक्ष्मणेनैवमुक्ता तु रुदती जनकात्मजा ।
प्रत्युवाच ततो वाक्यं तीव्रबाष्पपरिप्लुता ॥ ३५ ॥
|
लक्ष्मणांनी असे म्हटलावर जनककिशोरी सीता रडू लागली. तिच्या नेत्रांतून अश्रूंची तीव्र धार वाहू लागली. ती त्यांना या प्रकारे उत्तर देत म्हणाली- ॥३५॥
|
गोदावरीं प्रवेक्ष्यामि हीना रामेण लक्ष्मण ।
आबन्धिष्येऽथवा त्यक्ष्ये विषमे देहमात्मनः ॥ ३६ ॥
पिबामि वा विषं तीक्ष्णं प्रवेक्ष्यामि हुताशनम् ।
न त्वहं राघवादन्यं कदापि पुरुषं स्पृशे ॥ ३७ ॥
|
लक्ष्मणा ! श्रीरामांशी वियोग झाला तर मी गोदावरी नदीत सामावून जाईन अथवा गळ्याला फास लावून घेईन अथवा पर्वताच्या दुर्गम शिखरावर चढून तेथून आपल्या शरीराला खाली झोकून देईन अथवा तीव्र विषपान करीन अथवा जळत्या आगीत प्रवेश करीन. परंतु राघवाशिवाय दुसर्या कुणाही पुरुषाला कदापि स्पर्श करणार नाही. ॥३६-३७॥
|
इति लक्ष्मणमाश्रुत्य सीता शोकसमन्विता ।
पाणिभ्यां रुदती दुःखादुदरं प्रजघान ह ॥ ३८ ॥
|
लक्ष्मणा समोर ही प्रतिज्ञा करून शोकमग्न होऊन रडत रडत सीता अधिक दुःखामुळे दोन्ही हातांनी आपल्या उदरावर आघात करून घेऊ लागली - छाती बडवून घेऊ लागली. ॥३८॥
|
तामार्तरूपां विमना रुदन्तीं
सौमित्रिरालोक्य विशालनेत्राम् ।
आश्वासयामास न चैव भर्तु-
स्तं भ्रातरं किंचिदुवाच सीता ॥ ३९ ॥
|
विशाल लोचना सीतेला आर्त होऊन रडताना पाहून सौमित्र लक्ष्मणाने मनातल्या मनात तिला सांत्वना दिली, परंतु सीता त्या समयी आपल्या दीराशी काहीही बोलली नाही. ॥३९॥
|
ततस्तु सीतामभिवाद्य लक्ष्मणः
कृताञ्जलिः किंचिदभिप्रणम्य ।
अवेक्षमाणो बहुशः स मैथिलीं
जगाम रामस्य समीपमात्मवान् ॥ ४० ॥
|
तेव्हा मनाला स्वाधीन ठेवणार्या लक्ष्मणाने दोन्ही हात जोडून थोडेसे वाकून मैथिली सीतेस प्रणाम केला आणि वारंवार तिच्याकडे पहात ते श्रीरामचंन्द्राकडे जाण्यास निघाले. ॥४०॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे पञ्चचत्वारिंशः सर्गः ॥ ४५ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा पंचेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४५॥
|