राक्षसीवचोऽनङ्गीकृत्य शोकसन्तप्तायाः सीताया विलापः -
|
राक्षसींची गोष्ट मानण्यास नकार देऊन शोक-सन्तप्त सीतेचे विलाप करणे -
|
तथा तासां वदन्तीनां परुषं दारुणं बहु । राक्षसीनामसौम्यानां रुरोद जनकात्मजा ॥ १ ॥
|
ज्यावेळी त्या क्रूर राक्षसीणी याप्रकारचे अत्यन्त कठोर आणि क्रूरतेने युक्त असे भाषण करू लागल्या, त्यावेळी जनकनन्दिनी सीता रडू लागली. ॥१॥
|
एवमुक्ता तु वैदेही राक्षसीभिर्मनस्विनी ।
उवाच परमत्रस्ता बाष्पगद्गदया गिरा ॥ २ ॥
|
त्या राक्षसीणींनी याप्रकारे भाषण केल्यावर अत्यन्त भयभीत झालेली मनस्विनी विदेहराजकुमारी सीता डोळ्यातून अश्रु ढाळीत गद्गद वाणीने म्हणाली - ॥२॥
|
न मानुषी राक्षसस्य भार्या भवितुमर्हति ।
कामं खादत मां सर्वा न करिष्यामि वो वचः ॥ ३ ॥
|
राक्षसीणींनो ! मनुष्याची कन्या कधी राक्षसाची भार्या होऊ शकत नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही सर्वजणी खुशाल मला खाऊन टाका. परन्तु मी तुमचे म्हणणे कधीही मान्य करणार नाही. ॥३॥
|
सा राक्षसीमध्यगता सीता सुरसुतोपमा ।
न शर्म लेभे शोकार्ता रावणेनेव भर्त्सिता ॥ ४ ॥
|
राक्षसींच्या मध्ये बसलेली ती देवकन्ये प्रमाणे सुन्दर अशी सीता रावणाच्या द्वारेच जणुं धमकावली जावी तशी दुःखाने, शोकाने आर्त झाली आणि ती अत्यन्त बेचैन झाली. ॥४॥
|
वेपते स्माधिकं सीता विशन्तीवाङ्गमात्मनः ।
वने यूथपरिभ्रष्टा मृगी कोकैरिवार्दिता ॥ ५ ॥
|
ज्याप्रमाणे वनात आपल्या कळपापासून दूरावलेली, ताटातूट झालेली हरिणी लांडग्यांनी घेरली असता भयाने थरथर कापू लागते तशी सीतेची स्थिती झाली. तिने आपले शरीर आखडून घेतले आणि ती भयाने लटलट कापू लागली. ॥५॥
|
सा त्वशोकस्य विपुलां शाखामालम्ब्य पुष्पिताम् ।
चिन्तयामास शोकेन भर्तारं भग्नमानसा ॥ ६ ॥
|
तिचा मनोरथ भंग झाला होता. ती अगतिक होऊन अशोकवृक्षाच्या प्रफुल्लित अशा एका विशाल शाखेचा आश्रय घेऊन शोकाने पीडित होऊन आपल्या पतिदेवाचे चिन्तन करू लागली. ॥६॥
|
सा स्नापयन्ती विपुलौ स्तनौ नेत्रजलस्रवैः ।
चिन्तयन्ती न शोकस्य तदान्तमधिगच्छति ॥ ७ ॥
|
दोन्ही डोळ्यातील अश्रूंनी आपल्या मोठ मोठ्या स्तनांना जणु अभिषेक करीत ती सीता मनात जो जो श्रीरामांचे चिन्तन करू लागली तो तो तिच्या शोकाला पारावर उरला नाही. ॥७॥
|
सा वेपमाना पतिता प्रवाते कदली यथा ।
राक्षसीनां भयत्रस्ता विवर्णवदनाभवत् ॥ ८ ॥
|
झंझावताने उन्मळून पडलेल्या केळीच्या झाडाप्रमाणे ती राक्षसींच्या भयाने त्रस्त होऊन जमिनीवर कोसळली. त्यावेळी तिच्या मुखाची कान्ती निस्तेज झाली होती. ॥८॥
|
तस्याः सा दीर्घविपुला वेपन्त्याः सीतया तदा ।
ददृशे कम्पिता वेणी व्यालीव परिसर्पती ॥ ९ ॥
|
त्यावेळी लटलट कापणार्या सीतेची ती विशाल आणि लांबसडक वेणीही कंपित होत होती, त्यामुळे ती सरपटणार्या नागिणी प्रमाणे भासत होती. ॥९॥
|
सा निःश्वसन्ती शोकार्ता कोपोपहतचेतना ।
आर्ता व्यसृजदश्रूणि मैथिली विललाप च ॥ १० ॥
|
ती शोकाने पीडित होऊन दीर्घ श्वास घेत होती आणि क्रोधाने सन्तप्त होऊन आर्तभावाने अश्रु ढाळीत विलाप करू लागली - ॥१०॥
|
हा रामेति च दुःखार्ता हा पुनर्लक्ष्मणेति च ।
हा श्वश्रुर्मम कौसल्ये हा सुमित्रेति भामिनी ॥ ११ ॥
|
हे रामा ! हे लक्ष्मणा ! अहो माझ्या सासूबाई कौसल्या आणि आर्ये सुमित्रे ! असे म्हणून दुःखाने पीडित झालेली भामिनी सीता शोक करू लागली ॥११॥
|
लोकप्रवादः सत्योऽयं पण्डितैः समुदाहृतः ।
अकाले दुर्लभो मृत्युः स्त्रिया वा पुरुषस्य वा ॥ १२ ॥
|
ती म्हणाली, हाय ! पण्डितांनी जी लोकोक्ती लिहून ठेवली आहे की कुणाही स्त्रीला अथवा पुरुषाला वेळ आल्यावाचून मृत्यु येणे दुर्लभ आहे ती अगदी खरी आहे. ॥१२॥
|
यत्राहमाभिः क्रूराभी राक्षसीभिरिहार्दिता ।
जीवामि हीना रामेण मुहूर्तमपि दुःखिता ॥ १३ ॥
|
म्हणून तर मी श्रीरामाच्या दर्शनापासून वंचित होऊन या क्रूर राक्षसींच्या द्वारे पीडित होऊनही येथे मुहूर्तभरही जिवन्त राहिले आहे. ॥१३॥
|
एषाल्पपुण्या कृपणा विनशिष्याम्यनाथवत् ।
समुद्रमध्ये नौः पूर्णा वायुवेगैरिवाहता ॥ १४ ॥
|
मी पूर्व जन्मात फारच थोडे पुण्य केले असले पाहिजे म्हणून तर या दीन दशेत, सामानाने पूर्ण भरलेली नौका वार्याने तडाखे बसल्यावर जशी समुद्रात नष्ट होऊन जाते, तशी मीही अनाथाप्रमाणे नष्ट होऊन जाईन. ॥१४॥
|
भर्तारं तमपश्यन्ती राक्षसीवशमागता ।
सीदामि खलु शोकेन कूलं तोयहतं यथा ॥ १५ ॥
|
मला माझ्या पतिदेवांचे दर्शन तर होतच नाही. मी या राक्षसीणींच्या तावडीत पुरती सांपडले आहे आणि पाण्याच्या लाटांच्या तडाख्याने खचून जात असलेल्या तीराप्रमाणे मीही शोकांच्या लाटांनी खचून जात आहे. ॥१५॥
|
तं पद्मदलपत्राक्षं सिंहविक्रान्तगामिनम् ।
धन्याः पश्यन्ति मे नाथं कृतज्ञं प्रियवादिनम् ॥ १६ ॥
|
आज ज्या लोकांना सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि सिंहाप्रमाणेच पराक्रमसूचक गति असलेल्या आणि कमलदल लोचन अशा माझ्या कृतज्ञ आणि प्रियभाषी प्राणनाथांचे दर्शन होत असेल, ते धन्य आहेत. ॥१६॥
|
सर्वथा तेन हीनाया रामेण विदितात्मना ।
तीक्ष्णं विषमिवास्वाद्य दुर्लभं मम जीवनम् ॥ १७ ॥
|
एखादे जालीम विष सेवन केल्यावर जगणे जसे दुर्लभ आहे. त्याप्रमाणेच सर्व प्रकारे त्या आत्मज्ञानी भगवान श्रीरामाचा आणि माझा वियोग झाल्यामुळे मी जिवन्त राहाणे सर्वथा अशक्य आहे. ॥१७॥
|
कीदृशं तु महापापं मया देहान्तरे कृतम् ।
तेनेदं प्राप्यते घोरं महादुःखं सुदारुणम् ॥ १८ ॥
|
कुणास ठाऊक माझ्या हातून पूर्व जन्मान्तरी कसले महान पातक घडले आहे की ज्यामुळे हे अत्यन्त दारूण आणि भयंकर कठोर घोर दुःख भोगणे प्राप्त झाले आहे. ॥१८॥
|
जीवितं त्यक्तुमिच्छामि शोकेन महता वृता ।
राक्षसीभिश्च रक्ष्यन्त्या रामो नासाद्यते मया ॥ १९ ॥
|
या राक्षसस्त्रियांच्या संरक्षणात राहात असतां तर मी आपल्या प्राणप्रिय श्रीरामास कधीच भेटू शकणार नाही. म्हणून अतिशय मोठ्या शोकाने मी ग्रस्त झाले आहे आणि म्हणून मी आता जीवनाचा त्याग करण्याची इच्छा करीत आहे. ॥१९॥
|
धिगस्तु खलु मानुष्यं धिगस्तु परवश्यताम् ।
न शक्यं यत् परित्यक्तुं आत्मच्छन्देन जीवितम् ॥ २० ॥
|
जगणे अशक्य झाल्यामुळे त्याचा आपल्या इच्छेने त्याग करण्या इतकेही स्वातन्त्र्य ज्यात नाही अशा त्या मानवी जीवनाचा आणि परन्तन्त्रतेचा धिक्कार असो. ॥२०॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे पञ्चविंशः सर्गः ॥ २५ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा पंचविसावा सर्ग पूरा झाला ॥२५॥
|