प्रहस्तपुत्रस्य जम्बुमालिनो वधः -
|
प्रहस्तपुत्र जंबुमाळीचा वध -
|
सन्दिष्टो राक्षसेन्द्रेण प्रहस्तस्य सुतो बली ।
जम्बुमाली महादंष्ट्रो निर्जगाम धनुर्धरः ॥ १ ॥
|
राक्षसराज रावणाची आज्ञा मिळताच प्रहस्ताचा पुत्र जंबुमाळी ज्याच्या दाढा फार मोठ्या होत्या, हातात धनुष्य घेऊन राजमहालातून बाहेर पडला. ॥१॥
|
रक्तमाल्याम्बरधरः स्रग्वी रुचिरकुण्डलः ।
महान् विवृत्तनयनश्चण्डः समरदुर्जयः ॥ २ ॥
|
त्या धिप्पाड आणि प्रचंड जंबुमाळीचे डोळे रागाने लाल झाले होते, युद्धात त्याचा पराजय होणे कठीण होते. त्याने आरक्तवर्ण पुष्पे आणि वस्त्रे धारण केली होती. कानात मनोहर कुंडले आणि गळ्यात माळा घातलेल्या होत्या. रागाने त्याचे डोळे गरगरा फिरत होते. ॥२॥
|
धनुः शक्रधनुःप्रख्यं महद् रुचिरसायकम् ।
विस्फारयाणो वेगेन वज्राशनिसमस्वनम् ॥ ३ ॥
|
त्याचे धनुष्य इन्द्रधनुष्याप्रमाणे विशाल होते. त्याचे बाणही फार सुन्दर होते आणि जेव्हा तो वेगाने त्या धनुष्यास खेंचत असे त्यावेळी त्यान्तून वज्राप्रमाणे आणि विद्युल्लतेप्रमाणे गडगडाट उत्पन्न होत असे. ॥३॥
|
तस्य विस्फारघोषेण धनुषो महता दिशः ।
प्रदिशश्च नभश्चैव सहसा समपूर्यत ॥ ४ ॥
|
तो तसा धनुष्याचा टणत्कार करित निघाला. त्या धनुष्याच्या प्रचंड टणत्काराने दिशा, उपदिशा आणि आकाशही एकदम दणाणून गेले. ॥४॥
|
रथेन खरयुक्तेन तमागतमुदीक्ष्य सः ।
हनुमान् वेगसम्पन्नौ जहर्ष च ननाद च ॥ ५ ॥
|
इतक्यात गाढव जोडलेल्या रथावर आरूढ होऊन आलेल्या त्या जंबुमाळीला पाहून वेगवान हनुमान अत्यन्त प्रसन्न झाले आणि मोठमोठ्याने गर्जना करू लागले. ॥५॥
|
तं तोरणविटङ्कस्थं हनुमन्तं महाकपिम् ।
जम्बुमाली महातेजा विव्याध निशितैः शरैः ॥ ६ ॥
|
नन्तर महातेजस्वी जंबुमाळीने दरवाजाच्या कमानीखालच्या दोन खांबावरील आडव्या लाकडावर बसलेल्या त्या महाकपि हनुमन्तास तीक्ष्ण बाणांनी विन्धण्यास आरंभ केला. ॥६॥
|
अर्धचन्द्रेण वदने शिरस्येकेन कर्णिना ।
बाह्वोर्विव्याध नाराचैर्दशभिस्तु कपीश्वरम् ॥ ७ ॥
|
त्याने अर्धचन्द्र नामक बाणाने हनुमन्ताच्या मुखाचा वेध केला, कर्णी नामक एका बाणाने मस्तकाच्या ठिकाणी वेध केला आणि दहा बाणांनी त्या कपीश्वराच्या दोन्ही बाहूंच्या ठिकाणी वेध केला आणि असे विन्धून त्यास जखमी केले. ॥७॥
|
तस्य तच्छुशुभे ताम्रं शरेणाभिहतं मुखम् ।
शरदीवाम्बुजं फुल्लं विद्धं भास्कररश्मिना ॥ ८ ॥
|
त्याच्या बाणांनी जखमी झालेल्या हनुमन्ताचे ताम्रवर्णाचे मुख शरद ऋतूमध्ये सूर्य किरणांनी विद्ध झालेल्या प्रफुल्लित कमळाप्रमाणे दिसू लागले. ॥८॥
|
तत्तस्य रक्तं रक्तेन रञ्जितं शुशुभे मुखम् ।
यथाऽऽकाशे महापद्मं सिक्तं काञ्चनबिन्दुभिः ॥ ९ ॥
|
रक्ताने रञ्जित झालेले त्यांचे आरक्तवर्ण मुख जणु आकाशात लाल रंगाच्या विशाल कमळाला, सुवर्णमय जलबिन्दूचे सिंचन केलेले असावे अशा रीतीने शोभून दिसू लागले. ॥९॥
|
चुकोप बाणाभिहतो राक्षसस्य महाकपिः ।
ततः पार्श्वेऽतिविपुला ददर्श महतीं शिलाम् ॥ १० ॥
तरसा तां समुत्पाट्य चिक्षेप जववद् बली ।
|
राक्षस जंबुमाळीच्या बाणांनी जखमी झाल्याने महाकपि हनुमन्तांना अत्यन्त क्रोध आला आणि शेजारीच असलेल्या एका अति प्रचंड शिळेकडे त्यांनी आपली नजर वळवली आणि नन्तर ती प्रचंड लांबरून्द शिळा उपटून बलाढ्य हनुमन्तानी अत्यन्त वेगाने ती त्या जंबुमाळीवर फेकली. ॥१० १/२॥
|
तां शरैर्दशभिः क्रुद्धः ताडयामास राक्षसः ॥ ११ ॥
विपन्नं कर्म तद् दृष्ट्वा हनुमांश्चण्डविक्रमः ।
सालं विपुलमुत्पाट्य भ्रामयामास वीर्यवान् ॥ १२ ॥
|
परन्तु क्रुद्ध राक्षसाने दहा बाण मारून ती प्रस्तर शिळा तोडून फोडून टाकली. तेव्हा आपले ते कार्य व्यर्थ झालेले पाहून, प्रचंड पराक्रमी आणि वीर्यवान हनुमन्तानी एका विशाल सालवृक्ष उपटून त्यास गरगरा फिरविण्यास आरंभ केला. ॥११-१२॥
|
भ्रामयन्तं कपिं दृष्ट्वा सालवृक्षं महाबलम् ।
चिक्षेप सुबहून् बाणाञ्जम्बुमाली महाबलः ॥ १३ ॥
|
परन्तु तो महाबलाढ्य वानर सालवृक्ष गरगरा फिरवित आहे, हे पाहून महाबलाढ्य जंबुमाळीने पुष्कळ बाणांची त्यांच्यावर वृष्टी केली. ॥१३॥
|
सालं चतुर्भिश्चिच्छेद वानरं पञ्चभिर्भुजे ।
उरस्येकेन बाणेन दशभिस्तु स्तनान्तरे ॥ १४ ॥
|
चार बाणांनी त्याने तो सालवृक्ष तोडून टाकला आणि पाच बाणांनी हाताच्या ठिकाणी एका बाणाने त्यांची छाती आणि दहा बाणांनी त्यांच्या दोन्ही स्तनांच्या मध्यभागी त्यांस विद्ध केले. ॥१४॥
|
स शरैः पूरिततनुः क्रोधेन महता वृतः ।
तमेव परिघं गृह्य भ्रामयामास वेगतः ॥ १५ ॥
|
याप्रमाणे बाणांनी देह भरून गेला असता ते हनुमान अत्यन्त क्रुद्ध झाले आणि तोच परिघ हातात घेऊन मोठ्या वेगाने फिरवू लागले. ॥१५॥
|
अतिवेगोऽतिवेगेन भ्रामयित्वा बलोत्कटः ।
परिघं पातयामास जम्बुमालेर्महोरसि ॥ १६ ॥
|
नन्तर त्या अतिवेगवान आणि महाबलाढ्य हनुमन्तानी अतिशय वेगाने तो परिघ फिरवून जंबुमाळीच्या विशाल वक्षःस्थळावर फेकला. ॥१६॥
|
तस्य चैव शिरो नास्ति न बाहू न च जानुनी ।
न धनुर्न रथो नाश्वास्तत्रादृश्यन्त नेषवः ॥ १७ ॥
|
मग तर त्या जंबुमाळीचे मस्तक, हात, पाय , धनुष्य. रथ आणि गाढव अथवा बाण यापैकी काहीच शिल्लक राहिले नाही. (येथे अश्व शब्द आहे पण तो गाढव जुंपलेल्या रथातून आला होता म्हणून गाढव हाच अर्थ घ्यावा- इति श्रीगोविन्दराजीय व्याख्या) ॥१७॥
|
स हतस्तरसा तेन जम्बुमाली महारथः ।
पपात निहतो भूमौ चूर्णिताङ्ग इव द्रुमः ॥ १८ ॥
|
त्या परिघाच्या वेगपूर्वक आघाताने तो महारथी जंबुमाळी मरण पावला आणि शाखा, उपशाखा वगैरेचा चुरडा होऊन पडलेल्या वृक्षाप्रमाणे भूमीवर पडला. ॥१८॥
|
जम्बुमालिं सुनिहतं किङ्करांश्च महाबलान् ।
चुक्रोध रावणः श्रुत्वा कोपसंरक्तलोचनः ॥ १९ ॥
|
महाबली किंकर राक्षस आणि जंबुमाळी यांचा वध झाल्याचे ऐकून रावण रागावला आणि क्रोधाने त्याचे नेत्र लाल होऊन गेले. ॥१९॥
|
स रोषसंवर्तितताम्रलोचनः
प्रहस्तपुत्रे निहते महाबले ।
अमात्यपुत्रानतिवीर्यविक्रमान्
समादिदेशाशु निशाचरेश्वरः ॥ २० ॥
|
महाबलाढ्य प्रहस्त पुत्र जंबुमाळी मरण पावला असता निशाचराधिपती रावणाचे डोळे रागाने लाल होऊन गेले आणि त्याने ताबडतोब अतिवीर्यवान अतिपराक्रमी अमात्यपुत्रांना युद्धासाठी जाण्याची आज्ञा केली. ॥२०॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे चतुश्चत्वारिंशः सर्गः ॥ ४४ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा चौव्वेचाळिसावा सर्ग पूर्ण झाला. ॥४४॥
|