सीतालक्ष्मण सहितस्य श्रीरामस्य दुःखमग्नपौरजनमुखेभ्यो विविधा वार्ताः श्रावं श्रावं पितुर्दर्शनार्थं कैकेय्या भवने गमनम् -
|
सीता आणि लक्ष्मणासहित श्रीरामांचे, दुःखी नगरवासी यांच्या मुखाने तर्हे तर्हेच्या गोष्टी ऐकत, पित्याच्या दर्शनासाठी कैकेयीच्या महालात जाणे -
|
दत्त्वा तु सह वैदेह्या ब्राह्मणेभ्यो धनं बहु ।
जग्मतुः पितरं द्रष्टुं सीतया सह राघवौ ॥ १ ॥
|
वैदेही बरोबर दोन्ही राघव (राम, लक्ष्मण) यांनी ब्राह्मणांना बरेचसे धन दान केले आणि ते वनात जाण्यासाठी उद्यत होऊन पित्याचे दर्शन करण्यासाठी गेले. ॥१॥
|
ततो गृहीते प्रेष्याभामशोभेतां तदायुधे ।
मालादामभिरासक्ते सीतया समलङ्कृते ॥ २ ॥
|
त्यांच्या बरोबर दोन सेवक रामलक्ष्मणांची ती धनुष्ये आदि आयुधे घेऊन चालले. त्यांना फुलांच्या माळानी सजविलेले होते आणि जी सीतेने पूजेसाठी लाविलेल्या चंदन आदिनी अलंकृत केलेली होती; त्या दोघांच्या आयुधाची त्या अमयी अत्यंत शोभा दिसून येत होती. ॥२॥
|
ततः प्रासादहर्म्याणि विमानशिखराणि च ।
अधिरुह्य जनः श्रीमानुदासीनो व्यलोकयत् ॥ ३ ॥
|
त्या वेळी धनिक लोक प्रासाद ( तीन मजली महाल), हर्म्यगृहे (राजभवने), तथा विमाने (सात मजली महाल) यांच्या छतावर चढून उदासीन भावाने त्या तीघांच्या कडे पाहू लागले. ॥३॥
|
न हि रथ्याः सुशक्यन्ते गन्तुं बहुजनाकुलाः ।
आरुह्य तस्मात् प्रासादाद् दीनाः पश्यन्ति राघवम् ॥ ४ ॥
|
त्या समयी रस्ते मनुष्यांच्या गर्दीनी भरून गेलेले होते. म्हणून त्यांवर सुगमतापूर्वक चालणे कठीण झाले होते. म्हणून अधिकांश माणसे प्रासादांच्या वर चढून तेथून दुःखी होऊन राघवाकडे पहात राहिली होती. ॥४॥
|
पदातिं सानुजं दृष्ट्वा ससीतं च जनास्तदा ।
ऊचुर्बहुजना वाचः शोकोपहतचेतसः ॥ ५ ॥
|
श्रीरामांना आपले लहान भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्या बरोबर पायी जातांना पाहून अनेक लोकांची हृदये शोकाने व्याकुळ होऊन गेली. ते खेदपूर्वक म्हणू लागले - ॥५॥
|
यं यान्तमनुयाति स्म चतुरङ्गबलं महत् ।
तमेकं सीतया सार्धमनुयाति स्म लक्ष्मणः ॥ ६ ॥
|
'हाय ! यात्रेच्या समयी ज्यांच्या पाठीमागे विशाल चतुरंगिणी सेना चालत असे, तेच श्रीराम आज एकटेच जात आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ सीतेसह लक्ष्मण चालले आहेत. ॥६॥
|
ऐश्वर्यस्य रसज्ञः सन् कामानां चाकरो महान् ।
नेच्छत्येवानृतं कर्तुं वचनं धर्मगौरवात् ॥ ७ ॥
|
'जे ऐश्वर्याच्या सुखाचा अनुभव करणारे तथा भोग्य वस्तूंचे महान भाण्डार होते- जेथे सर्वांच्या कामना पूर्ण होत होत्या, तेच श्रीराम आज धर्माचा गौरव ठेवण्यासाठी पित्याचे वचन खोटे ठरवू इच्छित नाहीत. ॥७॥
|
या न शक्या पुरा द्रष्टुं भूतैराकाशगैरपि ।
तामद्य सीतां पश्यन्ति राजमार्गगता जनाः ॥ ८ ॥
|
'ओह ! प्रथम जिला आकाशात विचरण करणारे प्राणीही पाहू शकत नव्हते, त्याच सीतेला या समयी रस्त्यावर उभे असलेले लोकही पहात आहेत. ॥८॥
|
अङ्गरागोचितां सीतां रक्तचन्दनसेविनीम् ।
वर्षमुष्णं च शीतं च नेष्यत्याशु विवर्णताम् ॥ ९ ॥
|
'सीता -अंगराग सेवनास योग्य आहे, लाल चंदनाचे सेवन करणारी आहे. आता वर्षा (पाऊस), उष्णता (ऊन) आणि थंडीही लवकरच तिच्या अंगाची कांति फीकी करून टाकतील. ॥९॥
|
अद्य नूनं दशरथः सत्त्वमाविश्य भाषते ।
न हि राजा प्रियं पुत्रं विवासयितुमर्हति ॥ १० ॥
|
'निश्चितच राजा दशरथ कुणा पिशाच्चाच्या आवेशात पडून अनुचित गोष्ट सांगत आहेत कारण की आपल्या स्वाभाविक स्थितीत असणारा कोणीही राजा आपल्या प्रिय पुत्राला घरांतून घालवून देऊ शकत नाही. ॥१०॥
|
निर्गुणस्यापि पुत्रस्य कथं स्याद् विनिवासनम् ।
किं पुनर्यस्य लोकोऽयं जितो वृत्तेन केवलम् ॥ ११ ॥
|
'पुत्र गुणहीन असला तरीही त्याला घरातून हाकलून देण्याचे साहस कसे होऊ शकेल ? मग ज्याच्या केवळ चारित्र्यानेच हा सर्व संसार वशीभूत होऊन जातो त्याला वनवास देण्याची तर गोष्ट्च कशी केली जाईल ? ॥११॥
|
आनृशंस्यमनुक्रोशः श्रुतं शीलं दमः शमः ।
राघवं शोभयन्त्येते षड्गुणाः पुरुषर्षभम् ॥ १२ ॥
|
क्रूरतेचा अभाव, दया, विद्या, शील, दम (इंद्रिय संयम) आणि शम (मनोनिग्रह) - हे सहा गुण नरश्रेष्ठ राघवाला सदाच सुशोभित करीत आहेत. ॥१२॥
|
तस्मात् तस्योपघातेन प्रजाः परमपीडिताः ।
औदकानीव सत्त्वानि ग्रीष्मे सलिलसङ्क्षयात् ॥ १३ ॥
|
म्हणून यांच्यावर आघात केल्याने - यांच्या राज्याभिषेकात विघ्न आणण्याने, ज्याप्रमाणे उन्हाळात जलाशयाचे पाणी आटल्याने त्यात राहाणारे जीव तडफडू लागतात त्याप्रमाणे प्रजेला महान क्लेश पोहोंचले आहेत. ॥१३॥
|
पीडया पीडितं सर्वं जगदस्य जगत्पतेः ।
मूलस्येवोपघातेन वृक्षः पुष्पफलोपगः ॥ १४ ॥
|
ज्याप्रमाणे मूळ छाटले गेल्याने पुष्प आणि फळासहित सारा वृक्ष सुकून जातो त्याचप्रमाणे या जगदीश्वर श्रीरामाच्या व्यथेने संपूर्ण जगत व्यथित झाले आहे. ॥१४॥
|
मूलं ह्येष मनुष्याणां धर्मसारो महाद्युतिः ।
पुष्पं फलं च पत्रं च शाखाश्चास्येतरे जनाः ॥ १५ ॥
|
हे महान तेजस्वी राम संपूर्ण मनुष्यांचे मूळ आहेत. धर्म हेच यांचे बळ आहे. जगातील दुसरे प्राणि पत्र, पुष्प, फळ आणि शाखा आहेत. ॥१५॥
|
ते लक्ष्मण इव क्षिप्रं सपत्न्यः सहबान्धवाः ।
गच्छन्तमनुगच्छामो येन गच्छति राघवः ॥ १६ ॥
|
म्हणून आपणही लक्ष्मणा प्रमाणे पत्नी आणि बंधुबांधवासह शीघ्रच या जाणार्या राघवाच्या मागे मागे चालू लागू या. ज्या मार्गाने राघव जात आहेत त्याचेच अनुसरण करू या. ॥१६॥
|
उद्यानानि परित्यज्य क्षेत्राणि च गृहाणि च ।
एकदुःखसुखा राममनुगच्छाम धार्मिकम् ॥ १७ ॥
|
बाग बगीचे, घर-दार, आणि शेतीवाडी -सर्व सोडून धर्मात्मा श्रीरामाचे अनुगमन करू या. यांच्या दुःख सुखात सहभागी होऊ या. ॥१७॥
|
समुद्धृतनिधानानि परिध्वस्ताजिराणि च ।
उपात्तधनधान्यानि हृतसाराणि सर्वशः ॥ १८ ॥
रजसाभ्यवकीर्णानि परित्यक्तानि दैवतैः ।
मूषकैः परिधावद्भिरुद्बिलैरावृतानि च ॥ १९ ॥
अपेतोदकधूमानि हीनसम्मार्जनानि च ।
प्रणष्टबलिकर्मेज्यामन्त्रहोमजपानि च ॥ २० ॥
दुष्कालेनेव भग्नानि भिन्नभाजनवन्ति च ।
अस्मत्त्यक्तानि कैकेयी वेश्मानि प्रतिपद्यताम् ॥ २१ ॥
|
आपण आपल्या घरात पुरलेले धन सर्व बाहेर काढू, अंगण्यातील फरशी खोदून टाकू. सारे धन-धान्य बरोबर घेऊ. सार्या आवश्यक वस्तू येथून हटवू. यात धूळ भरून जाईल. देवता या घरांना सोडून पळून जातील. उंदीर बिळातून बाहेर निघून चहू बाजूस धावू लागतील आणि त्यानीच हे घर भरून जाईल. यात कधी चूल पेटणार नाही. कधी पाणी राहाणार नाही आणि कधी कुणी याला झाडून काढणार नाही. येथील बलिवैश्व देव, यज्ञ, मंत्रपाठ होम आणि जप बंद होऊन जातील. जणु फार मोठा दुष्काळ पडला असावा त्याप्रमाणेही सारी घरे पडून जातील- यात फुटकी भांडी जिकडे तिकडे विखरून पडलेली असतील, आणि आम्ही त्यांना कायमचे सोडलेले असेल- अशा दशेत या घरांवर कैकेयी येऊन अधिकार गाजवू दे. ॥१८-२१॥
|
वनं नगरमेवास्तु येन गच्छति राघवः ।
अस्माभिश्च परित्यक्तं पुरं सम्पद्यतां वनम् ॥ २२ ॥
|
जेथे पोहोचण्यासाठी राघव जात आहेत ते वनच नगर होऊन जाईल आणि आम्ही सोडून गेल्यावर हे नगरच वनाच्या रूपात परिणत होईल. ॥२२॥
|
बिलानि दंष्ट्रिणः सर्वे सानूनि मृगपक्षिणः ।
त्यजन्त्वस्मद्भयाद्भीता गजाः सिंहा वनान्यपि ॥ २३ ॥
|
वनात आम्हा लोकांच्या भयाने सांप आपली बिळे सोडून पळून जातील. पर्वतावर राहाणारे मृग आणि पक्षी त्याच्या शिखरांना सोडून देतील तथा हत्ती आणि सिंहही त्या वनांना त्यागून दूर निघून जातील. ॥२३॥
|
अस्मत्त्यक्तं प्रपद्यन्तु सेव्यमानं त्यजन्तु च ।
तृणमांसफलादानां देशं व्यालमृगद्विजम् ॥ २४ ॥
प्रपद्यतां हि कैकेयी सपुत्रा सह बान्धवैः ।
राघवेण वयं सर्वे वने वत्स्याम निर्वृताः ॥ २५ ॥
|
ते सर्प आदि ज्या स्थानांना आम्ही सोडले आहे तेथे निघून जावोत आणि ज्या स्थानांचे सेवन आम्ही करू ते त्यागून जावोत. हा देश गवत चरणार्या पशुंचे, मांसभक्षी हिंसक जंतूंचे आणि फळे खाणार्या पक्ष्यांचे निवासस्थान बनून जावो. येथे सर्प, पशु आणि पक्षी राहू लागू देत. अशा दशेत पुत्र आणि बंधु-बांधवा सहित कैकेयी याला आपल्या अधिकारात करू दे. आम्ही सर्व लोक वनात राघवासह मोठ्या आनंदात राहू. ॥२४-२५॥
|
इत्येवं विविधा वाचो नानाजनसमीरिताः ।
शुश्राव राघवः श्रुत्वा न विचक्रेऽस्य मानसम् ॥ २६ ॥
स तु वेश्म पुनर्मातुः कैलासशिखरप्रभम् ।
अभिचक्राम धर्मात्मा मत्तमातङ्गविक्रमः ॥ २७ ॥
|
याप्रकारे राघवाने अनेक मनुष्यांच्या तोडून निघालेल्या तर्हेतरहेच्या गोष्टी ऐकल्या, परंतु ऐकूनही त्यांच्या मनात काहीही विकार उत्पन्न झाला नाही. मत्त गजराजाप्रमाणे पराक्रमी धर्मात्मा राम पुन्हा माता कैकेयीच्या कैलास शिखर सदृश शुभ्र भवनात गेले. ॥२६-२७॥
|
विनीतवीरपुरुषं प्रविश्य तु नृपालयम् ।
ददर्शावस्थितं दीनं सुमन्त्रमविदूरतः ॥ २८ ॥
|
विनयशील वीर पुरुषांनी युक्त त्या राजभवनात प्रवेश करतांच त्यांनी पाहिले कि सुमंत्र जवळच दुःखी होऊन उभे आहेत. ॥२८॥
|
प्रतीक्षमाणोऽभिजनं तदार्त-
मनार्तरूपः प्रहसन्निवाथ ।
जगाम रामः पितरं दिदृक्षुः
पितुर्निदेशं विधिवच्चिकीर्षुः ॥ २९ ॥
|
पूर्वजांची निवासभूमी असलेल्या अयोध्येतील लोक तेथे शोकाने आतुर होऊन उभे होते. त्यांना पाहूनही श्रीराम स्वयं शोकाने पीडीत झाले नाहीत. त्यांच्या शरीरावर व्यथेचे कुठलेही चिन्ह प्रकट झाले नाही. ते पित्याच्या आज्ञेचे विधिपूर्वक पालन करण्याच्या इच्छेने त्यांचे दर्शन घेण्यासाठी हसतच पुढे निघाले. ॥२९॥
|
तत्पूर्वमैक्ष्वाकसुतो महात्मा
रामो गमिष्यन् नृपमार्तरूपम् ।
व्यतिष्ठत प्रेक्ष्य तदा सुमन्त्रं
पितुर्महात्मा प्रतिहारणार्थम् ॥ ३० ॥
|
शोकाकुल होऊन पडलेल्या राजांच्या जवळ जाणार्या महात्मना महामना इक्ष्वाकुकुलनंदन रामांनी तेथे पोहोचण्यापूर्वी प्रथम सुमंत्रांना पाहून पित्याजवळ आपल्या आगमनाची सूचना धाडण्यासाठी ते त्या समयी तेथेच थांबले. ॥३०॥
|
पितुर्निदेशेन तु धर्मवत्सलो
वनप्रदेशे कृतबुद्धिनिश्चयः ।
स राघवः प्रेक्ष्य सुमंत्रमब्रवी-
न्निवेदयस्वागमनं नृपाय मे ॥ ३१ ॥
|
पित्याच्या आदेशावरून वनात प्रवेश करणाचा बुद्धिपूर्वक निश्चय करून आलेल्या धर्मवत्सल रामांनी सुमंत्रांकडे पाहिले आणि म्हणाले - 'आपण महाराजांना माझ्या आगमनाची सूचना द्यावी.' ॥३१॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे त्रयस्त्रिंशः सर्गः ॥ ३३ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा तेहतिसावा सर्ग पूरा झाला. ॥३३॥
|