श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ द्वादशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

पुर्याः परिरक्षणाय सैनिकानां नियुक्तिः; सीतायां स्वीयामासक्तिं प्रतिपाद्य रावणेन तस्या हरणप्रसंगस्य वर्णनं; भाविककर्तव्य निर्णयाय सभासत्सम्मतेः प्रार्थनं; कुंभकर्णेन रावणं निर्भर्त्स्य समस्तशत्रुवधभारस्य स्वयमेव उत्थापनम् - नगराच्या रक्षणासाठी सैनिकांची नियुक्ति, रावणाने सीतेप्रति आपली आसक्ती सांगून हरणाचा प्रसंग सांगणे आणि भावी कर्तव्यासाठी सभासदांची सम्मति मागणे. कुंभकर्णाने प्रथम तर त्याला खडसावणे नंतर समस्त शत्रूंच्या वधाचा भार स्वत:च उचलणे -
स तां परिषदं कृत्स्नां समीक्ष्य समितिञ्जयः । प्रचोदयामास तदा प्रहस्तं वाहिनीपतिम् ॥ १ ॥
शत्रुविजयी रावणाने त्या संपूर्ण सभेकडे दृष्टिपात करून सेनापति प्रहस्तला त्या समयी या प्रकारे आदेश दिला- ॥१॥
सेनापते यथा ते स्युः कृतविद्याश्चतुर्विधाः ।
योधा नगररक्षायां तथा व्यादेष्टुमर्हसि ॥ २ ॥
सेनापते ! तुम्ही सैनिकांना अशी आज्ञा द्या, ज्यायोगे तुमचे अस्त्रविद्येत पारंगत रथी, घोडेस्वार, हत्तीस्वार आणि पायदळ योद्धे नगराच्या रक्षणात तत्पर राहातील. ॥२॥
स प्रहस्तः प्रणीतात्मा चिकीर्षन् राजशासनम् ।
विनिक्षिपद् बलं सर्वं बहिरन्तश्च मन्दिरे ॥ ३ ॥
आपल्या मनाला वश ठेवणार्‍या प्रहस्ताने राजाच्या आदेशाचे पालन करण्याच्या इच्छेने सर्व सेनेला नगराच्या बाहेर आणि आत यथायोग्य स्थानांवर नियुक्त केले. ॥३॥
ततो विनिक्षिप्य बलं सर्वं नगरगुप्तये ।
प्रहस्तः प्रमुखे राज्ञो निषसाद जगाद च ॥ ४ ॥
नगराच्या रक्षणासाठी सर्व सेनेला तैनात करून प्रहस्त राजा रावणाच्या समोर येऊन बसला आणि याप्रकारे बोलला- ॥४॥
निहितं बहिरन्तश्च बलं बलवतस्तव ।
कुरुष्वाविमनाः क्षिप्रं यदभिप्रेतमस्तु ते ॥ ५ ॥
राक्षसराज ! आपल्या, महाबली महाराजांच्या सेनेला मी नगराच्या बाहेर आणि आत यथास्थान नियुक्त केले आहे. आता आपण स्वस्थचित्त होऊन शीघ्रच आपल्या अभीष्ट कार्याचे संपादन करावे. ॥५॥
प्रहस्तस्य वचः श्रुत्वा राजा राज्यहितैषिणः ।
सुखेप्सुः सुहृदां मध्ये व्याजहार स रावणः ॥ ६ ॥
राज्याचे हित इच्छिणार्‍या प्रहस्ताचे हे बोलणे ऐकून आपल्या सुखाची इच्छा ठेवणार्‍या रावणाने सुहृदांच्या समोर ही गोष्ट सांगितली- ॥६॥
प्रियाप्रिये सुखे दुःखे लाभालाभे हिताहिते ।
धर्मकामार्थकृच्छ्रेषु यूयमर्हथ वेदितुम् ॥ ७ ॥
सभासदांनो ! धर्म, अर्थ आणि कामविषयक संकट उपस्थित झाल्यावर आपण प्रिय-अप्रिय, सुख-दु:ख, लाभ-हानि आणि हिताहिताचा विचार करण्यामध्ये समर्थ आहात. ॥७॥
सर्वकृत्यानि युष्माभिः समारब्धानि सर्वदा ।
मंत्रकर्मनियुक्तानि न जातु विफलानि मे ॥ ८ ॥
आपण सर्व लोकांनी सदा परस्परात विचार करून ज्या ज्या कार्यांचा आरंभ केला आहे ती सर्वच्या सर्व माझ्यासाठी कधी ही निष्फळ झालेली नाहीत. ॥८॥
स सोमग्रहनक्षत्रैः मरुद्‌भिरिव वासवः ।
भवद्‌भिरहमत्यर्थं वृतः श्रियमवाप्नुयाम् ॥ ९ ॥
ज्याप्रमाणे चंद्रमा, ग्रह आणि नक्षत्रांसहित मरूद्‍गणांनी घेरलेला इंद्र स्वर्गातील संपत्तिचा उपभोग करतो, त्याच प्रमाणे आपणा लोकांकडून घेरलेला राहून मी लंकेच्या प्रचुर राजलक्ष्मीचे सुख भोगत रहावे- हीच माझी अभिलाषा आहे. ॥९॥
अहं तु खलु सर्वान् वः समर्थयितुमुद्यतः ।
कुम्भकर्णस्य तु स्वप्नान् नेममर्थमचोदयम् ॥ १० ॥
मी जे काम केले आहे ते मी प्रथमच आपणा सर्वां समोर ठेवून आपल्या द्वारा त्याचे समर्थन इच्छित होतो परंतु त्या समयी कुंभकर्ण झोपलेले होते म्हणून मी ह्याची चर्चा केली नाही. ॥१०॥
अयं हि सुप्तः षण्मासान् कुम्भकर्णो महाबलः ।
सर्वशस्त्रभृतां मुख्यः स इदानीं समुत्थितः ॥ ११ ॥
समस्त शस्त्रधारी लोकांमध्ये श्रेष्ठ महाबली कुंभकर्ण सहा महिन्यापासून झोपलेले होते. आत्ताच त्यांची झोप पूर्ण झाली आहे. ॥११॥
इयं च दण्डकारण्याद् रामस्य महिषी प्रिया ।
रक्षोभिश्चरिताद्देशाद् आनीता जनकात्मजा ॥ १२ ॥
मी दंडकारण्यातून, जे राक्षसांचे निवासस्थान आहे, रामांची प्रिय राणी जनकात्मजा सीता हरण करून घेऊन आलो आहे. ॥१२॥
सा मे न शय्यामारोढुं इच्छत्यलसगामिनी ।
त्रिषु लोकेषु चान्या मे न सीतासदृशी तथा ॥ १३ ॥
परंतु ती मंदगामिनी सीता माझ्या शय्येवर आरूढ होऊ इच्छित नाही. माझ्या दृष्टिमध्ये तीन्ही लोकांमध्ये सीतेसमान सुंदर दुसरी कोणीही स्त्री नाही आहे. ॥१३॥
तनुमध्या पृथुश्रोणी शारदेन्दुनिभानना ।
हेमबिम्बनिभा सौम्या मायेव मयनिर्मिता ॥ १४ ॥
तिच्या शरीराचा मध्यभाग अत्यंत सूक्ष्म आहे, कटिच्या मागील भाग स्थूल आहे, मुख शरत्कालांतील चंद्रम्यास लज्जित करत आहे, ती सौम्य रूप आणि स्वभावाची सीता सोन्याच्या बनविलेल्या प्रतिमेसारखी भासत असते. असे वाटते की जणु मयासुरांनी रचलेली कुठली तरी मायाच आहे. ॥१४॥
सुलोहिततलौ श्लक्ष्णौ चरणौ सुप्रतिष्ठितौ ।
दृष्ट्‍वा ताम्रनखौ तस्या दीप्यते मे शरीरजः ॥ १५ ॥
तिच्या चरणांचे तळवे लाल रंगाचे आहेत. दोन्ही पाय सुंदर, तकतकीत आणि सुडौल आहेत तसेच त्यांची नखे तांब्यासारखी लाल आहेत. सीतेच्या त्या चरणांना पाहून माझा कामाग्नि प्रज्वलित होऊन उठतो. ॥१५॥
हुताग्रेरर्चिसङ्‌काशां एनां सौरीमिव प्रभाम् ।
उन्नसं वदनं वल्गु विपुलं चारुलोचनम् ॥ १६ ॥

पश्यंस्तदा वशस्तस्याः कामस्य वशमेयिवान् ।
ज्यात तुपाची आहुति दिली गेली आहे अशा अग्निच्या ज्वाळेप्रमाणे आणि सूर्याच्या प्रभेसमान त्या तेजस्विनी सीतेला पाहून तसेच उंच नाक आणि विशाल नेत्रांनी सुशोभित तिचे निर्मल आणि मनोहर मुख अवलोकन करून मी आपल्या स्वत:च्या अधीन राहिलेलो नाही. कामाने मला आपल्या अधीन करून घेतले आहे. ॥१६ १/२॥
क्रोधहर्षसमानेन दुर्वर्णकरणेन च ॥ १७ ॥

शोकसंतापनित्येन कामेन कलुषीकृतः ।
जो क्रोध आणि हर्ष दोन्ही अवस्थांमध्ये समान रूपाने टिकून रहातो, शरीराची कांती फिक्की करून टाकतो आणि शोक तसेच संतापाच्या समयीही कधी मनांतून दूर जात नाही त्या कामाने माझ्या हृदयाला व्याकुळ करून टाकले आहे. ॥१७ १/२॥
सा तु संवत्सरं कालं मामयाचत भामिनी ॥ १८ ॥

प्रतीक्षमाणा भर्तारं राममायतलोचना ।
तन्मया चारुनेत्रायाः प्रतिज्ञातं वचः शुभम॥ १९ ॥
विशाल नेत्र असणार्‍या माननीय सीतेने माझ्याकडून एक वर्षाची मुदत मागितली आहे. या काळात ती आपले पति श्रीरामांची प्रतीक्षा करील. मी मनोहर नेत्र असणार्‍या सीतेचे ते सुंदर वचन ऐकून ते पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली आहे. (**) ॥१८-१९॥
(**- येथे रावणाने सभासदांच्या समोर आपली खोटी उदारता दाखविण्यासाठी सर्वथा असत्य सांगितले आहे. सीतेने कधी आपल्या मुखाने असे म्हटले नव्हते की मला एक वर्षाचा समय द्या, जर इतक्या दिवसापर्यंत श्रीराम आले नाहीत तर मी तुमची होईन. सीतेने तर सदा तिरस्कारपूर्वक त्याचा जघन्य प्रस्ताव फेटाळून लावला होता याने स्वत:च आपल्याकडून तिला एक वर्षाचा अवधि दिला होता. (पहा अरण्यकांड सर्ग ५६ श्लोक २४-२५)
श्रान्तोऽहं सततं कामाद् यातो हय इवाध्वनि ।
कथं सागरमक्षोभ्यं तरिष्यन्ति वनौकसः ॥ २० ॥

बहुसत्त्वझषाकीर्णं तौ वा दशरथात्मजौ ।
जसा मोठ्‍या मार्गात चालता चालता घोडा थकून जातो, त्याच प्रकारे मीही कामपीडेमुळे थकव्याच्या अनुभव करीत आहे. तसे तर मला शत्रूंच्या कडून काही भय नाही आहे कारण की ते वनवासी वानर अथवा ते दोन्ही दशरथकुमार राम आणि लक्ष्मण असंख्य जल जंतुनी तसेच मस्त्यांनी भरलेल्या अलंघ्य महासागराला कसे पार करू शकतील ? ॥२० १/२॥
अथवा कपिनैकेन कृतं नः कदनं महत् ॥ २१ ॥

दुर्ज्ञेयाः कार्यगतयो ब्रूत यस्य यथा मतिः ।
मानुषान्नो भयं नास्ति तथापि तु विमृश्यताम॥ २२ ॥
अथवा एकाच वानराने येऊन आपल्या येथे महान्‌ संहार आरंभला होता, म्हणून कार्यसिद्धिच्या उपायांना समजून घेणे अत्यंत कठीण आहे. म्हणून ज्याला आपल्या बुद्धिला अनुसरून जो उचित वाटत असेल त्याने तसा उपाय सांगावा. तुम्ही सर्व लोक आपले विचार अवश्य व्यक्त करा. जरी आपल्याला मनुष्यांपासून काही भय नाही आहे तथापि तुम्हांला विजयाच्या उपायावर विचार तर केलाच पाहिजे. ॥२१-२२॥
तदा देवासुरे युद्धे युष्माभिः सहितोऽजयम् ।
ते मे भवन्तश्च तथा सुग्रीवप्रमुखान् हरीन् ॥ २३ ॥

परे पारे समुद्रस्य पुरस्कृत्य नृपात्मजौ ।
सीतायाः पदवीं प्राप्य संप्राप्तौ वरुणालयम् ॥ २४ ॥
त्या दिवसात, ज्यावेळी देवता आणि असुरांचे युद्ध चालले होते, त्यात आपणा सर्वांच्या मदतीनेच मी विजय प्राप्त केला होता. आजही आपण माझे त्याच प्रकारे सहाय्यक आहात. ते दोन्ही राजकुमार सीतेच्या पत्ता लागल्यामुळे सुग्रीव आदि वानरांना बरोबर घेऊन समुद्राच्या त्या तटापर्यंत येऊन पोहोचले आहेत. ॥२३-२४॥
अदेया च यथा सीता वध्यौ दशरथात्मजौ ।
भवद्‌भिर्मंत्र्यतां मंत्रः सुनीतं चाभिधीयताम् ॥ २५ ॥
आता आपण लोक आपसात सल्ला-मसलत करा आणि काही अशी सुंदर नीति सांगा की ज्यायोगे सीतेला परत द्यावे लागणार नाही आणि ते दोन्ही दशरथकुमार मारले जातील. ॥२५॥
न हि शक्तिं प्रपश्यामि जगत्यन्यस्य कस्यचित् ।
सागरं वानरैस्तीर्त्वा निश्चयेन जयो मम ॥ २६ ॥
वानरांसह समुद्राला पार करून येथपर्यंत येण्याची शक्ति जगतात रामाशिवाय आणखी दुसर्‍या कोणातही दिसून येत नाही. (परंतु राम आणि वानर येथे येऊनही माझे काही बिघडवू शकत नाहीत.) म्हणून हे निश्चित आहे की जय माझाच होईल. ॥२६॥
तस्य कामपरीतस्य निशम्य परिदेवितम् ।
कुम्भकर्णः प्रचुक्रोध वचनं चेदमब्रवीत् ॥ २७ ॥
कामातुर रावणाचे हे खेदपूर्ण प्रलाप ऐकून कुंभकर्णाला क्रोध आला आणि त्याने याप्रकारे म्हटले- ॥२७॥
यदा तु रामस्य सलक्ष्मणस्य
प्रसह्य सीता खलु सा इहाहृता ।
सकृत् समीक्ष्यैव सुनिश्चितं तदा
भजेत चित्तं यमुनेव यामुनम् ॥ २८ ॥
जेव्हा तू लक्ष्मणासहित श्रीरामांच्या आश्रमांतून एक वेळा स्वत:च मनमाना विचार करून सीतेला बळपूर्वक येथे हरण करून घेऊन आला होतास त्याच समयी तुझ्या चित्ताने आम्हा लोकांबरोबर या विषयी सुनिश्चित विचार करावयास हवा होता, ज्याप्रमाणे यमुना जेव्हा पृथ्वीवर उतरण्यास उद्यत झाली होती तेव्हाच तिने यमुनोत्री पर्वताच्या कुण्ड विशेषास आपल्या जलाने पूर्ण केले होते त्याप्रमाणेच. (पृथ्वीवर उतरल्यावर तिचा वेग जेव्हा समुद्रात जाऊन शांत झाला होता, तेव्हा ती पुन्हा त्या कुण्डाला भरू शकली नसती, त्या प्रकारे तूही जेव्हा विचार करण्याचा अवसर होता तेव्हा तर आमच्या बरोबर बसून विचार केला नाहीस. आता अवसर निघून जाऊन सारे काम बिघडून गेल्यावर तू विचार करण्यास निघाला आहेस.) ॥२८॥
सर्वमेतन्महाराज कृतमप्रतिमं तव ।
विधीयेत सहास्माभिः आदावेवास्य कर्मणः ॥ २९ ॥
महाराज ! तुम्ही जे हे छळपूर्वक लपून छपून परस्त्री-हरण आदि कार्य केले आहे हे सर्व तुमच्यासाठी फारच अनुचित आहे. हे पापकर्म करण्यापूर्वीच आपण आमच्या बरोबर परामर्श करावयास हवा होता. ॥२९॥
न्यायेन राजकार्याणि यः करोति दशानन ।
न स सन्तप्यते पश्चात् निश्चितार्थमतिर्नृपः ॥ ३० ॥
दशानन ! जो राजा सर्व राजकार्य न्यायपूर्वक करत असतो त्याची बुद्धि निश्चयपूर्ण असल्यामुळे त्याला नंतर पश्चात्ताप करावा लागत नाही. ॥३०॥
अनुपायेन कर्माणि विपरीतानि यानि च ।
क्रियमाणानि दुष्यन्ति हवींष्यप्रयतेष्विव ॥ ३१ ॥
जी कर्मे उचित उपायाचे अवलंबन केल्याशिवायच केली जातात तसेच जी लोक आणि शास्त्र यांच्या विपरीत असतात ती पापकर्मे, ज्याप्रमाणे अपवित्र अभिचारिक यज्ञात हवन केले गेलेले हविष्य दोषाची प्राप्ति करविते त्याप्रमाणेच दोषाची प्राप्ति करवितात. ॥३१॥
यः पश्चात् पूर्वकार्याणि कर्माण्यभिचिकीर्षति ।
पूर्वं चापरकार्याणि न स वेद नयानयौ ॥ ३२ ॥
जो प्रथम करण्यायोग्य कार्यांना नंतर करू इच्छितो आणि मागाहून करण्यायोग्य कामे पहिल्यानेच करून टाकतो, तो नीति आणि अनीतिला जाणत नाही. ॥३२॥
चपलस्य तु कृत्येषु प्रसमीक्ष्याधिकं बलम् ।
छिद्रमन्ये प्रपद्यन्ते क्रौञ्चस्य खमिव द्विजाः ॥ ३३ ॥
शत्रुलोक आपल्या विपक्षीच्या बळाला आपल्यापेक्षा अधिक पाहूनही जर तो प्रत्येक कामात चपळ (उतावळा) असेल तर त्याचे दमन करण्यासाठी, पक्षी ज्याप्रमाणे दुर्लंघ्य क्रौंच पर्वताला ओलांडून पुढे जाण्यासाठी त्याच्या छिद्राचा(**) आश्रय घेतात त्याप्रमाणे शत्रुचे छिद्र शोधत रहातात. (कुमार कार्तिकेयाने आपल्या शक्तिचा प्रहार करून क्रौंच पर्वतामध्ये छिद्र बनविले होते) ॥३३॥
(** कुमार कार्तिकेयाने आपल्या शक्तिच्या द्वारा क्रौंच पर्वतास विदीर्ण करून त्याच्यात छिद्र केले होते - हा प्रसंग महाभारतात आला आहे (पहा शल्य पर्व ४६/८४))
त्वयेदं महदारब्धं कार्यमप्रतिचिन्तितम् ।
दिष्ट्या त्वां नावधीद् रामो विषमिश्रमिवामिषम् ॥ ३४ ॥
महाराज ! तुम्ही भावी परिणामाचा विचार न करताच हे फार मोठे दुष्कर्म आरंभले आहे. ज्याप्रमाणे विषमिश्रित भोजन, खाणाराचे प्राण हरण करून घेते त्याप्रमाणेच श्रीराम तुझा वध करून टाकतील. त्यांनी अद्यापपर्यंत तुम्हांला मारून टाकले नाही, ही सौभाग्याची गोष्ट समज. ॥३४॥
तस्मात्त्वया समारब्धं कर्म ह्यप्रतिमं परैः ।
अहं समीकरिष्यामि हत्वा शत्रूंस्तवानघ ॥ ३५ ॥
अनघा ! जरी तुम्ही शत्रूंच्या बरोबर अनुचित कर्म आरंभले आहेत, तथापि मी तुमच्या शत्रूंचा संहार करून सर्वांना ठीक करीन. ॥३५॥
अहमुत्सादयिष्यामि शत्रूंस्तव निशाचर ।
यदि शक्रविवस्वन्तौ यदि पावकमारुतौ ।
तावहं योधयिष्यामि कुबेरवरुणावपि ॥ ३६ ॥
निशाचरा ! तुमचे शत्रु जरी इंद्र, सूर्य, अग्नि, वायु, कुबेर आणि वरूणही असले तरी मी त्यांच्याशी युद्ध करीन आणि तुमच्या सर्व शत्रूंना उपटून फेकून देईन. ॥३६॥
गिरिमात्रशरीरस्य महापरिघयोधिनः ।
नर्दतस्तीक्ष्णदंष्ट्रस्य बिभीयाद् वै पुरंदरः ॥ ३७ ॥
मी पर्वतासमान विशाल आणि तीक्ष्ण दाढांनी युक्त शरीर धारण करून महान्‌ परिघ हातात घेऊन समरभूमीत झुंजत असता जेव्हा गर्जना करीन, त्या समयी देवराज इंद्रही भयभीत होऊन जाईल. ॥३७॥
पुनर्मां स द्वितीयेन शरेण निहनिष्यति ।
ततोऽहं तस्य पास्यामि रुधिरं काममाश्वस ॥ ३८ ॥
राम मला एका बाणाने मारून जेव्हा दुसरा बाण मारू लागतील, त्यावेळी मध्येच मी त्यांचे रक्त पिऊन टाकीन म्हणून तुम्ही पूर्णत: निश्चिंत होऊन जा. ॥३८॥
वधेन वै दाशरथेः सुखावहं
जयं तवाहर्तुमहं यतिष्ये ।
हत्वा च रामं सह लक्ष्मणेन
खादामि सर्वान् हरियूथमुख्यान् ॥ ३९ ॥
मी दशरथनंदन श्रीरामांचा वध करून तुमच्यासाठी सुखदायिनी विजय सुलभ करण्याचा प्रयत्‍न करीन. लक्ष्मणसहित रामांना मारून समस्त वानरयूथपतिंना खाऊन टाकीन. ॥३९॥
रमस्व कामं पिब चाग्र्यवारुणीं
कुरुष्व कार्याणि हितानि विज्वरः ।
मया तु रामे गमिते यमक्षयं
चिराय सीता वशगा भविष्यति ॥ ४० ॥
तू मौजेने विहार कर. उत्तम वारूणीचे पान कर आणि निश्चिंत होऊन आपल्यासाठी हितकर कार्य करत रहा. माझ्या द्वारे रामांना यमलोकात धाडले गेल्यावर सीता चिरकालपर्यंत तुमच्या अधीन होईल. ॥४०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे द्वादशः सर्गः ॥ १२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा बारावा सर्ग पूर्ण झाला. ॥१२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP