श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ चतुःसप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
नारदेन श्रीरामं प्रति तपस्विनः शूद्रस्य अधर्माचरणमेव विप्रबालकमरणे कारणं इति कथनम् -
नारदांनी श्रीरामांना एका तपस्वी शूद्राचे अधर्माचरणच ब्राह्मण बालकाच्या मृत्युचे कारण असल्याचे सांगणे -
तथा तु करुणं तस्य द्विजस्य परिदेवनम् ।
शुश्राव राघवः सर्वं दुःखशोकसमन्वितम् ॥ १ ॥
महाराज राघवांनी त्या ब्राह्मणाचे याप्रकारे दुःख आणि शोकाने भरलेले हे सारे करूण-क्रंदन ऐकले. ॥१॥
स दुःखेन च सन्तप्तो मन्त्रिणस्तानुपाह्वयत् ।
वसिष्ठं वामदेवं च भ्रातॄंश्च सह नैगमान् ॥ २ ॥
या योगे ते दुःखाने संतप्त झाले. त्यांनी आपल्या मंत्र्यांना बोलावले तसेच वसिष्ठ आणि वामदेवांना तसेच महाजनांसहित आपल्या भावांनाही आमंत्रित केले. ॥२॥
ततो द्विजा वसिष्ठेन सार्धमष्टौ प्रवेशिताः ।
राजानं देवसंकाशं वर्धस्वेति ततोऽब्रुवन् ॥ ३ ॥
तदनंतर वसिष्ठांबरोबर आठ ब्राह्मणांनी राजसभेत प्रवेश केला आणि त्या देवतुल्य नरेशांना म्हटले - महाराज ! आपला जय असो. ॥३॥
मार्कण्डेयोऽथ मौद्‌गल्यो वामदेवश्च काश्यपः ।
कात्यायनोऽथ जाबालिः गौतमो नारदस्तथा ॥ ४ ॥
त्या आठांची नावे याप्रकारे आहेत - मार्कण्डेय, मौद्‍गल्य, वामदेव, काश्यप, कात्यायन, जाबालि, गौतम तथा नारद. ॥४॥
एते द्विजर्षभाः सर्वे आसनेषूपवेशिताः ।
महर्षीन् समनुप्राप्तान् अभिवाद्य कृताञ्जलिः ॥ ५ ॥
या सर्व श्रेष्ठ ब्राह्मणांना उत्तम आसनांवर बसविले गेले. तेथे आलेल्या त्या महर्षिंना हात जोडून प्रणाम करून श्रीराम स्वतःही आपल्या स्थानावर जाऊन बसले. ॥५॥
मन्त्रिणो नैगमाश्चैव यथार्हमनुकूलतः ।
तेषां समुपविष्टानां सर्वेषां दीप्ततेजसाम् ॥ ६ ॥

राघवः सर्वमाचष्टे द्विजोऽयमुपरोधते ।
नंतर मंत्री आणि महाजनांशी यथायोग्य शिष्टाचाराचा निर्वाह त्यांनी केला. उद्दीप्त तेज असणारे ते सर्व लोक जेव्हा यथास्थानी बसले तेव्हा राघवांनी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हटले - हा ब्राह्मण राजद्वारावर धरणे देऊन बसला आहे. ॥६ १/२॥
तस्य तद् वचनं श्रुत्वा राज्ञो दीनस्य नारदः ॥ ७ ॥

प्रत्युवाच शुभं वाक्यं ऋषीणां सन्निधौ स्वयम् ।
ब्राह्मणाच्या दुःखाने दुःखी झालेल्या त्या महाराजांचे हे वचन ऐकून अन्य सर्व ऋषिंच्या सानिध्यातच नारद हे शुभ वचन बोलले - ॥७ १/२॥
शृणु राजन् यथाकाले प्राप्तो बालस्य संक्षयः ॥ ८ ॥

श्रुत्वा कर्तव्यतां राजन् कुरुष्व रघुनन्दन ।
राजन्‌ ! ज्या कारणाने या बालकाचा अकाली मृत्यु झाला आहे ते सांगतो, ऐकावे. रघुनंदन नरेश ! माझे म्हणणे ऐकून जे उचित कर्तव्य असेल त्याचे पालन करावे. ॥८ १/२॥
पुरा कृतयुगे राजन् ब्राह्मणा वै तपस्विनः ॥ ९ ॥

अब्राह्मणस्तदा राजन् न तपस्वी कथञ्चन ।
राजन्‌ ! पूर्वी सत्ययुगात केवळ ब्राह्मणच तपस्वी होत असत. महाराज ! त्या समयी ब्राह्मणेतर मनुष्ये कुठल्याही प्रकारे तपात प्रवृत्त होत नव्हती. ॥९ १/२॥
तस्मिन् युगे प्रज्वलिते ब्रह्मभूते त्वनावृते ॥ १० ॥

अमृत्यवस्तदा सर्वे जज्ञिरे दीर्घदर्शिनः ।
ते युग तपस्येच्या तेजाने प्रकाशित होत होते. त्यात ब्राह्मणांचीच प्रधानता होती. त्या समयी अज्ञानाचे वातावरण नव्हते. म्हणून त्या युगात सर्व माणसे अकाल मृत्युपासून रहित तसेच त्रिकालदर्शी होती. ॥१० १/२॥
ततस्त्रेतायुगं नाम मानवानां वपुष्मताम् ॥ ११ ॥

क्षत्रिया यत्र जायन्ते पूर्वेण तपसान्विताः ।
सत्ययुगानंतर त्रेतायुग आले. यात सुदृढ शरीराचे क्षत्रियांचे प्राध्यान्य झाले आणि ते क्षत्रिय ही त्याच प्रकारची तपस्या करू लागले. ॥११ १/२॥
वीर्येण तपसा चैव तेऽधिकाः पूर्वजन्मनि ॥ १२ ॥

मानवा ये महात्मानः तत्र त्रेतायुगे युगे ।
परंतु त्रेतायुगात जे महात्मा पुरुष आहेत त्यांच्यापेक्षा सत्ययुगातील लोक तप आणि पराक्रमाच्या दृष्टिने वरचढ होते. ॥१२ १/२॥
ब्रह्म क्षत्रं च तत् सर्वं यत् पूर्वमपरं च यत् ॥ १३ ॥

युगयोरुभयोरासीत् समवीर्यसमन्वितम् ।
याप्रकारे दोन्ही युगापैकी पहिल्या युगात जेथे ब्राह्मण उत्कृष्ट आणि क्षत्रिय अपकृष्ट होते, तेथे त्रेतायुगात दोन्ही समान शक्तिशाली झाले. ॥१३ १/२॥
अपश्यन्तस्तु ते सर्वे विशेषमधिकं ततः ॥ १४ ॥

स्थापनं चक्रिरे तत्र चातुर्वर्ण्यस्य सम्मतम् ।
तेव्हा मनु आदि सर्व धर्मप्रवर्तकांनी ब्राह्मण आणि क्षत्रियात एकापेक्षा दुसर्‍यामध्ये काही विशेषता किंवा न्यूनाधिकता न दिसल्याने सर्वलोक संमत चातुर्वण्य व्यवस्थेची स्थापना केली. ॥१४ १/२॥
तस्मिन् युगे प्रज्वलिते धर्मभूते ह्यनावृते ॥ १५ ॥

अधर्मः पादमेकं तु पातयत् पृथिवीतले ।
अधर्मेण हि संयुक्तः तेजो मन्दं भविष्यति ॥ १६ ॥
त्रेतायुग वर्णाश्रम - धर्म - प्रधान आहे. ते धर्माच्या प्रकाशाने प्रकाशित होत आहे. ते धर्मात बाधा आणणार्‍या पापा-विरहित आहे. या युगात अधर्माने भूतलावर आपला एक पाय ठेवला आहे. अधर्माने युक्त झाल्यामुळे येथे लोकांचे तेज हळू हळू घटत जाईल. ॥१५-१६॥
आमिषं यच्च पूर्वेषां राजसं च मलं भृशम् ।
अनृतं नाम तद् भूतं पादेन पृथिवीतले ॥ १७ ॥
सत्ययुगात जीविकेची साधनभूत कृषि आदि रजोगुणमूलक कर्मे अनृत म्हटली गेली होती आणि मलासमान अत्यंत त्याज्य होती. ते अनृतच अधर्माचा एक पाय होऊन त्रेतामध्ये या भूतलावर स्थित झाले. ॥१७॥
अनृतं पातयित्वा तु पादमेकमधर्मतः ।
ततः प्रादुष्कृतं पूर्वं आयुषः परिनिष्ठितम् ॥ १८ ॥
याप्रकारे अनृत (असत्य)रूपी एक पाय भूतलावर ठेवून अधर्माने त्रेतामध्ये सत्ययुगापेक्षा आयुष्याला सीमित करून टाकले. ॥१८॥
पतिते त्वनृते तस्मिन् अधर्मेण च महीतले ।
शुभान्येवाचरँल्लोकः सत्यधर्मपरायणः ॥ १९ ॥
म्हणून प्रुथ्वीवर अधर्माचा हा अनृतरूपी चरण पडल्यावर सत्यधर्मपरायण पुरुष त्या अनृताच्या कुपरिणामापासून वाचण्यासाठी शुभकर्मांचेच आचरण करतात. ॥१९॥
त्रेतायुगे च वर्तन्ते ब्राह्मणाः क्षत्रियाश्च ये ।
तपोऽतप्यन्त ते सर्वे शुश्रूषामपरे जनाः ॥ २० ॥
तथापि त्रेतायुगामध्ये जे ब्राह्मण आहेत आणि क्षत्रिय आहेत तेच सर्व तपस्या करतात. अन्य वर्णाचे लोक सेवा कार्य करतात. ॥२०॥
स धर्मः परमस्तेषां वैश्यशूद्रं तदागमत् ।
पूजां च सर्ववर्णानां शूद्राश्चक्रुर्विशेषतः ॥ २१ ॥
त्या चारी वर्णांमध्ये वैश्य आणि शूद्र यांना सेवारूपी उत्कृष्ट धर्म स्वधर्माच्या रूपात प्राप्त झाला. (वैश्य कृषि आदिच्या द्वारा ब्राह्मण आदिंची सेवा करू लागले आणि) शूद्र सर्व वर्णांची (तीन्ही वर्णाच्या लोकांची) विशेषरूपाने पूजा- आदर सत्कार करू लागले. ॥२१॥
एतस्मिन् अंतरे तेषां अधर्मे चानृते च ह ।
ततः पूर्वे भृशं पुनर्ह्रासं अगमत् नृपसत्तम ॥ २२ ॥
नृपश्रेष्ठ ! यात मध्येच जेव्हा त्रेतायुगाचे अवसान होते आणि वैश्य आणि शूद्रांना अधर्माचा एक पादरूप अनृताची प्राप्ति होऊ लागते तेव्हा पूर्व वर्णाचे ब्राह्मण आणि क्षत्रिय परत ह्रासाला प्राप्त होऊ लागतात (कारण की त्या दोन्हींना अंतिम दोन वर्णांचा संसर्गजनित दोष प्राप्त होऊ लागतो.) ॥२२॥
ततः पादमधर्मस्स द्वितीयमवतारयत् ।
ततो द्वापरसंख्या सा युगस्य समजायत ॥ २३ ॥
त्यानंतर अधर्म आपल्या दुसर्‍या चरणाला पृथ्वीवर उतरवितो. द्वितिय पाय उतरण्यामुळेच त्या युगाला द्वापर संज्ञा मिळालेली आहे. ॥२३॥
तस्मिन् द्वापरसंख्ये तु वर्तमाने युगक्षये ।
अधर्मश्चानृतं चैव ववृधे पुरुषर्षभ ॥ २४ ॥
पुरुषोत्तमा ! त्या द्वापर युगात, जे अधर्माचे दोन चरणांचा आश्रय आहेत -अधर्म आणि अनृत दोहोंची वृद्धि होऊ लागते. ॥२४॥
तस्मिन्द्वापरसंख्याने तपो वैश्यान् समाविशत् ।
त्रिभ्यो युगेभ्यस्त्रीन् वर्णान् क्रमाद् वै तप आविशत् ॥ २५ ॥
या द्वापरयुगात तपस्यारूप कर्म वैश्यांनाही प्राप्त होते. या प्रकारे तीन युगात क्रमशः तीन वर्णांना तपस्येचा अधिकार प्राप्त होतो. ॥२५॥
त्रिभ्यो युगेभ्यस्त्रीन् वर्णान् धर्मश्च परिनिष्ठितः ।
न शुद्रो लभते धर्मं युगतस्तु नरर्षभ ॥ २६ ॥
तीन युगांमध्ये तीन वर्णांचा आश्रय घेऊन तपस्यारूपी धर्म प्रतिष्ठित होत असतो. परंतु नरश्रेष्ठ ! शूद्राला या तीनही युगांपासून तपरूपी धर्माचा अधिकार प्राप्त होत नाही. ॥२६॥
हीनवर्णो नृपश्रेष्ठ तप्यते सुमहत्तपः ।
भविष्यत् शूद्रयोन्यां हि तपश्चर्या कलौ युगे ॥ २७ ॥
नृपशिरोमणी ! एक समय असा येईल, जेव्हा हीन वर्णाचा मनुष्य ही फार मोठी तपस्या करील. कलियुग आल्यावर भविष्यात होणार्‍या शूद्रयोनिमध्ये उत्पन्न मनुष्यांच्या समुदायात तपश्चर्येची प्रवृत्ति होईल. ॥२७॥
अधर्मः परमो राजन् द्वापरे शूद्रजन्मनः ।
स वै विषयपर्यन्ते तव राजन् महातपाः ॥ २८ ॥

अद्य तप्यति दुर्बुद्धिः तेन बालवधो ह्ययम् ।
राजन्‌ ! द्वापरमध्ये ही शूद्राचे तपात प्रवृत्त होणे महान्‌ अधर्म मानला गेला आहे. (मग त्रेतासाठी तर काय सांगावे ?) महाराज ! निश्चितच आपल्या राज्याच्या कुठल्यातरी सीमेवर कुणी खोटी बुद्धि असणारा शूद्र महान तपाचा आश्रय घेऊन तपस्या करीत आहे. त्याच कारणाने या बालकाचा मृत्यु झाला आहे. ॥२८ १/२॥
यो ह्यधर्ममकार्यं वा विषये पार्थिवस्य तु ॥ २९ ॥

करोति चाश्रीमूलं तत् पुरे वा दुर्मतिर्नरः ।
क्षिप्रं च नरकं याति स च राजा न संशयः ॥ ३० ॥
जो कोणी ही दुर्बुद्धि मानव ज्या कुणा राजाच्या राज्यात अथवा नगरात अधर्म अथवा न करण्यायोग्य काम करतो त्याचे ते कार्य राज्याच्या अनैश्वर्याचे (दरिद्रता) कारण बनून जाते आणि तो राजा नरकात पडतो यात संशय नाही. ॥२९-३०॥
अधीतस्य च तप्तस्य कर्मणः सुकृतस्य च ।
षष्ठं भजति भागं तु प्रजा धर्मेण पालयन् ॥ ३१ ॥
याप्रकारे जो राजा धर्मपूर्वक प्रजेचे पालन करतो, तो प्रजेच्या वेदाध्ययन, तप आणि शुभ कर्मांच्या पुण्याचा सहावा भाग प्राप्त करतो. ॥३१॥
षङ्‌भागस्य न भोक्ताऽसौ रक्षते न प्रजाः कथम् ।
स त्वं पुरुषशार्दूल मार्गस्व विषयं स्वकम् ॥ ३२ ॥

दुष्कृतं यत्र पश्येथाः तत्र यत्‍नंस समाचर ।
पुरुषसिंह ! जो प्रजेच्या शुभ कर्मांच्या सहाव्या भागाचा उपभोक्ता आहे, तो प्रजेचे रक्षण कसे करणार नाही ? म्हणून आपण राज्यांत शोध करावा आणि जेथे काही दुष्कर्म दिसून येईल, तेथे त्याला रोखून धरण्याचा प्रयत्‍न करावा. ॥३२ १/२॥
एवं चेद् धर्मवृद्धिश्च नृणां चायुर्विवर्धनम् ।
भविष्यति नरश्रेष्ठ बालस्यास्य च जीवितम् ॥ ३३ ॥
नरश्रेष्ठ ! असे करण्याने धर्माची वृद्धि होईल आणि माणसांचे आयुष्य वाढेल. त्याच बरोबर या बालकाला ही नवे जीवन प्राप्त होईल. ॥३३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे चतुःसप्ततितमः सर्गः ॥ ७४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा चौर्‍याहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP