वनवासे क्लेशं वर्णयता श्रीमेण सीतायास्तत्र गमनान्निवारणम् -
|
श्रीरामांनी वनवासाच्या कष्टाचे वर्णन करून सीतेला वनात येण्यास मनाई करणे -
|
स एव ब्रुवतीं सीतां धर्मज्ञां धर्मवत्सलः ।
न नेतुं कुरुते बुद्धिं वने दुःखानि चिन्तयन् ॥ १ ॥
|
धर्माला जाणणार्या सीतेने अशा प्रकारे सांगितल्यावरही धर्मवत्सल रामांनी वनात होणार्या दुखांचा विचार करून तिला बरोबर नेण्याचा विचार केला नाही. ॥१॥
|
सान्त्वयित्वा ततस्तां तु बाष्पदूषितलोचनाम् ।
निवर्तनार्थे धर्मात्मा वाक्यमेतदुवाच ह ॥ २ ॥
|
सीतेच्या नेत्रात अश्रु दाटले होते. धर्मात्मा रामांनी तिला वनवासाच्या विचारापासून निवृत्त करण्यासाठी सांत्वना देत याप्रकारे म्हटले - ॥२॥
|
सीते महाकुलीनासि धर्मे च निरता सदा ।
इहाचरस्व धर्मं त्वं यथा मे मनसः सुखम् ॥ ३ ॥
|
'सीते ! तू अत्यंत उत्तम कुळात उत्पन्न झाली आहेस आणि सदा धर्माच्या आचरणात तत्पर राहात असतेस, म्हणून येथेच राहून धर्माचे पालन कर म्हणजे माझ्या मनाला संतोष होईल. ॥३॥
|
सीते यथा त्वां वक्ष्यामि तथा कार्यं त्वयाबले ।
वने दोषा हि बहवो वदतस्तान् निबोध मे ॥ ४ ॥
|
'सीते ! मी तुला जसे सांगेन तसेच करणे हे तुझे कर्तव्य आहे. तू अबला आहेस, वनात राहणार्या मनुष्यात बरेच दोष प्राप्त होत असतात, ती मी सांगतो, माझ्या कडून ऐकून घे. ॥४॥
|
सीते विमुच्यतामेषा वनवासकृता मतिः ।
बहुदोषं हि कान्तारं वनमित्यभिधीयते ॥ ५ ॥
|
'सीते ! वनवासासाठी येण्याचा विचार सोडून दे. वनाला अनेक प्रकारच्या दोषांनी (युक्त) व्याप्त आणि दुर्गम म्हटले गेले आहे. ॥५॥
|
हितबुद्ध्या खलु वचो मयैतदभिधीयते ।
सदा सुखं न जानामि दुःखमेव सदा वनम् ॥ ६ ॥
|
'तुझ्या हिताच्या भावनेनेच मी या सर्व गोष्टी सांगत आहे. जेथपर्यंत माझी माहिती आहे त्यावरुन वनात सदा सुख मिळत नाही, तेथे तर सदा दुःखच प्राप्त होत असते. ॥६॥
|
गिरिनिर्झरसम्भूता गिरिनिर्दरिवासिनाम् ।
सिंहानां निनदा दुःखाः श्रोतुं दुःखमतो वनम् ॥ ७ ॥
|
'पर्वतांवरून पडणार्या निर्झरांचा शब्द ऐकून त्या पर्वताच्या कंदरात राहाणारे सिंह गर्जना करू लागतात. त्यांची ती गर्जना ऐकण्यास फारच दुःखदायक प्रतीत होते. म्हणून वन दुःखमयच आहे. ॥७॥
|
क्रीडमानाश्च विस्रब्धा मत्ताः शून्ये तथा मृगाः ।
दृष्ट्वा समभिवर्तन्ते सीते दुःखमतो वनम् ॥ ८ ॥
|
'सीते ! शून्य वनात निर्भय होऊन क्रीडा करणारे उन्मत्त जंगली पशु मनुष्याला पहाताच चहूबाजूने त्याच्यावर तुटून पडतात म्हणून वन हे दुःखाने भरलेले आहे. ॥८॥
|
सग्राहाः सरितश्चैव पङ्कवत्यस्तु दुस्तराः ।
मत्तैरपि गजैर्नित्यमतो दुःखतरं वनम् ॥ ९ ॥
|
'वनात ज्या नद्या असतात त्यात ग्राह (मगर) निवास करतात, शिवाय त्यांच्यात चिखल अधिक असल्याने त्यांना पार करणे अत्यंत कठीण असते. या शिवाय वनात मदमस्त हत्ती सदा हिंडत राहातात. या सर्व कारणांच्या मुळे वन फारच दुःखदायक होत असते. ॥९॥
|
लताकण्टकसङ्कीर्णाः कृकवाकूपनादिताः ।
निरपाश्च सुदुःखाश्च मार्गा दुःखमतो वनम् ॥ १० ॥
|
'वनांतील मार्गात लता आणि काटे पसरलेले असतात. तेथे जंगली कोंबडे ओरडत असतात, त्या मार्गावरून चालतांना फारच कष्ट होतात, तसेच तेथे जवळपास पाणीही मिळत नाही यामुळे वनांत दुःखच दुःख आहे. ॥१०॥
|
सुप्यते पर्णशय्यासु स्वयंभग्नासु भूतले ।
रात्रिषु श्रमखिन्नेन तस्माद् दुःखमतो वनम् ॥ ११ ॥
|
'दिवसभराच्या परिश्रमाने थकले- भागलेल्या मनुष्याला रात्री जमीनवर आपोआप गळून पडलेल्या वाळलेल्या पानांचे अंथरूणावर झोपावे लागते, म्हणून वन दुःखांनी भरलेले आहे. ॥११॥
|
अहोरात्रं च संतोषः कर्तव्यो नियतात्मना ।
फलैर्वृक्षावपतितैः सीते दुःखमतो वनम् ॥ १२ ॥
|
'सीते ! तेथे मनाला वश होऊन वृक्षांपासून आपोआप गळून पडलेल्या फळांच्या आहारावरच रात्रंदिवस संतोष मानावा लागतो. म्हणून वन हे दुःख देणारेच आहे. ॥१२॥
|
उपवासश्च कर्तव्यो यथाप्राणेन मैथिलि ।
जटाभारश्च कर्तव्यो वल्कलाम्बरधारणम् ॥ १३ ॥
|
'मैथिली ! आपल्या शक्तिला अनुसरून उपवास करणे, मस्तकावर जटेचा भार वहाणे आणि वत्कल वस्त्र धारण करणे-हीच येथील जीवनशैली आहे. ॥१३॥
|
देवतानां पितॄणां च कर्तव्यं विधिपूर्वकम् ।
प्राप्तानामतिथीनां च नित्यशः प्रतिपूजनम् ॥ १४ ॥
|
'देवतांचे, पितरांचे तथा आलेल्या अतिथिंचे प्रतिदिन शास्त्रोक्त विधिला अनुसरून पूजन करणे - हे वनवासी (मनुष्या)चे प्रथम कर्तव्य आहे. ॥१४॥
|
कार्यस्त्रिरभिषेकश्च काले काले च नित्यशः ।
चरतां नियमेनैव तस्माद् दुःखतरं वनम् ॥ १५ ॥
|
'वनवासीला प्रतिदिन नियमपूर्वक तिन्ही समयी स्नान करावे लागते. म्हणून वन फारच कष्ट देणारे आहे. ॥१५॥
|
उपहारश्च कर्तव्यः कुसुमैः स्वयमाहृतैः ।
आर्षेण विधिना वेद्यां बाले दुःखमतो वनम् ॥ १६ ॥
|
'सीते ! तेथे स्वतः वेचून आणलेल्या फुलांच्या द्वारा वेदोक्त विधिने वेदिवर देवतांची पूजा करावी लागते. म्हणून वनाला कष्टप्रद म्हटले गेले आहे. ॥१६॥
|
यथालब्धेन कर्तव्यः संतोषस्तेन मैथिलि ।
यताहारैर्वनचरैः सीते दुःखमतो वनम् ॥ १७ ॥
|
'मैथिली ! वनवासी लोकांना ज्यावेळी जसा आहार मिळेल त्यावरच संतोष मानावा लागतो, म्हणून वन दुःखरूपच आहे. ॥१७॥
|
अतीव वातस्तिमिरं बुभुक्षा चात्र नित्यशः ।
भयानि च महान्त्यत्र ततो दुःखतरं वनम् ॥ १८ ॥
|
'वनात प्रचण्ड वावटळी, घोर अंधकार , प्रतिदिन भुकेचा त्रास तसेच आणखीही महान भय प्राप्त होत असते म्हणून वन अत्यंत कष्टप्रद आहे. ॥१८॥
|
सरीसृपाश्च बहवो बहुरूपाश्च भामिनि ।
चरन्ति पथि ते दर्पात् ततो दुःखतरं वनम् ॥ १९ ॥
|
'भामिनी ! तेथे बरेच पहाडी सर्प जे अनेक रूपाचे असतात दर्पवश मार्गाच्या मध्ये विचरत राहातात म्हणून वन अत्यंत दुःखदायक आहे. ॥१९॥
|
नदीनिलयनाः सर्पा नदीकुटिलगामिनः ।
तिष्ठन्त्यावृत्य पन्थानमतो दुःखतरं वनम् ॥ २० ॥
|
'जे नद्यांमध्येच निवास करतात आणि नद्यांच्या प्रमाणे कुटील गतीने चालतात असे बहुसंख्य सर्प वनात रस्त्याला घेरून पडून राहिलेले असतात म्हणून वन अत्यंत कष्टदायक आहे. ॥२०॥
|
पतङ्गा वृश्चिकाः कीटा दंशाश्च मशकैः सह ।
बाधन्ते नित्यमबले सर्वं दुःखमतो वनम् ॥ २१ ॥
|
'अबले ! पतंग, विंचू, कीडे, डास आणि मच्छरे तेथे सदा बाधा करीत राहातात म्हणजे सर्व वन दुःखरूपच आहे. ॥२१॥
|
द्रुमाः कण्टकिनश्चैव कुशाः काशाश्च भामिनि ।
वने व्याकुलशाखाग्रास्तेन दुःखमतो वनम् ॥ २२ ॥
|
'भामिनी ! वनात काटेरी वृक्ष, कुश आणि काश असतात, ज्यांच्या शाखांचे अग्रभाग सर्व बाजूस पसरलेले असतात म्हणून वन विशेष कष्टदायक आहे. ॥२२॥
|
कायक्लेशाश्च बहवो भयानि विविधानि च ।
अरण्यवासे वसतो दुःखमेव सदा वनम् ॥ २३ ॥
|
'वनात राहाणार्या माणसांना बरेचसे शारिरीक क्लेशांचा आणि नाना प्रकारच्या भयांचा सामना करावा लागतो म्हणून वन सदा दुःखरूपच असते. ॥२३॥
|
क्रोधलोभौ विमोक्तव्यौ कर्तव्या तपसे मतिः ।
न भेतव्यं च भेतव्ये दुःखं नित्यमतो वनम् ॥ २४ ॥
|
'तेथे क्रोध आणि लोभ यांचा त्याग करावा लागतो, तपस्येन मन लावावे लागते आणि जेथे भयाला स्थान आहे तेथेही भयभीत न होण्याची आवश्यकता असते, म्हणून वनात सदा दुःखच दुःख आहे. ॥२४॥
|
तदलं ते वनं गत्वा क्षेमं नहि वनं तव ।
विमृशन्निव पश्यामि बहुदोषकरं वनम् ॥ २५ ॥
|
'म्हणून तुझे वनात येणे उचित नाही. तेथे जाऊन तू सकुशल राहू शकत नाहीस. मी खूप विचार करून पाहतो आहे आणि समजत आहे- की वनात राहाणे अनेक दोषांचे उत्पादक आणि फारच कष्टदायक आहे. ॥२५॥
|
वनं तु नेतुं न कृता मतिर्यदा
बभूव रामेण यदा महात्मना ।
न तस्य सीता वचनं चकार तं
ततोऽब्रवीद् राममिदं सुदुःखिता ॥ २६ ॥
|
जेव्हा महात्मा रामाने त्या समयी सीतेला वनात घेऊन जाण्याचा विचार केला नाही तेव्हा सीतेनेही त्यांचीही गोष्ट मान्य केली नाही. ती अत्यंत दुःखी होऊन रामांना या प्रकारे म्हणाली. ॥२६॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे अष्टाविंशः सर्गः ॥ २८ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकण्डाचा अठ्ठाविसावा सर्ग पूरा झाला. ॥२८॥
|