॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ किष्किन्धाकाण्ड ॥

॥ चतुर्थः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



भगवान राम लक्ष्मणाला क्रियायोग वर्णन करून सांगतात -


तत्र वार्षिकदिनानि राघवो
    लीलया मणिगुहासु सञ्चरन् ।
पक्वमूलफलभोगतोषितो
    लक्ष्मणेन सहितोऽवसत्सुखम् ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले-हे पार्वती, तेथे मणिमय गुहांमध्ये लीलेने फिरत, आणि पक्व मुळे आणि फळे खाऊन संतुष्ट होत, श्रीराम लक्ष्मणासह पावसाळ्याच्या दिवसांत तेथेच सुखाने राहिले. (१)

वातनुन्नजलपुरितमेघान्-
    अन्तरस्तनितवैद्युतगर्भान् ।
वीक्ष्य विस्मयमगाद्‍गजयूथान्-
    यद्वदाहितसुकाञ्चनकक्षान् ॥ २ ॥
वायूने प्रेरणा दिलेले, पाण्याने भरलेले, आणि ज्यांच्या मधून विजा चमकत होत्या असे मेघ म्हणजे ज्यांच्या पाठीवर सोन्याच्या झुली घातल्या आहेत, असे हत्तीचे कळप आहेत, असे वाटत होते. ते मेघ पाहून श्रीरामांना विस्मय वाटला. (२)

नवघासं समास्वाद्य हृष्टपुष्टमृगद्विजाः ।
धावन्तो परितो रामं वीक्ष्य विस्फारितेक्षणाः ॥ ३ ॥
न चलन्ति सदाध्यान-निष्ठा इव मुनीश्वराः ।
रामं मानुषरूपेण गिरिकाननभूमिषु ॥ ४ ॥
चरन्तं परमात्मानं ज्ञात्वा सिद्धगणा भुवि ।
मृगपक्षिगणा भूत्वा राममेवानुसेविरे ॥ ५ ॥
नवीन गवताचा आस्वाद घेऊन, आनंदित आणि पुष्ट झालेले पशू आणि पक्षी आसपास धावत होते, त्यांनी श्रीरामांना पाहिल्यावर, त्यांचे डोळे मुग्ध होऊन, ते सदा ध्याननिष्ठ असणार्‍या श्रेष्ठ मुनींप्रमाणे स्थिर होत, इकडे तिकडे जात नसत. या वेळी परमात्मा श्रीराम हे मनुष्यरूपाने पर्वत आणि वनभूमी यांवर फिरत आहेत, असे कळल्यावर सिद्धांचे समूह पृथ्वीवरील पशू व पक्षी यांचे समूह बनून श्रीरामांची सेवा करीत आहेत, असे वाटत होते. (३-५)

सौमित्रिरेकदा रामं एकान्ते ध्यानतत्परम् ।
समाधिविरमे भक्‍त्या प्रणयाद्विनयान्वितः ॥ ६ ॥
अब्रवीद्देव ते वाक्यात् पूर्वोक्ताद्विगतो मम ।
अनाद्यविद्यासम्भूतः संशयो हृदि संस्थितः ॥ ७ ॥
राम तेथे एकांतात ध्यानामध्ये तत्पर होत असत. एकदा त्यांची समाधी उतरल्यावर, विनयाने युक्त अशा लक्ष्मणाने भक्तिप्रेमाने श्रीरामांना म्हटले, "हे देवा, पूर्वी तुम्ही केलेल्या उपदेश-वाक्यांनी माझ्या मनात असणारा आणि अनादी अविद्येने निर्माण झालेला संशय दूर झाला आहे. (६-७)

इदानीं श्रोतुमिच्छामि क्रियामार्गेण राघव ।
भवदाराधनं लोके यथा कुर्वन्ति योगिनः ॥ ८ ॥
आता हे राघवा, या जगात योगी लोक ज्या क्रियामार्गाने, पूजा पद्धतीने तुमची आराधना करतात, तो क्रियामार्ग जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. (८)

इदमेव सदा प्राहुः योगिनो मुक्तिसाधनम् ।
नारदोऽपि तथा व्यासो ब्रह्मा कमलसम्भवः ॥ ९ ॥
योगिजन, देवर्षी नारद, महर्षी व्यास आणि कमळातून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव हेसुद्धा हाच क्रियामार्ग (पूजा पद्धत) मुक्ती चे साधन आहे, असे म्हणत असतात. (९)

ब्रह्मक्षत्रादिवर्णानां आश्रमाणां च मोक्षदम् ।
स्त्रीशूद्राणां च राजेन्द्र सुलभं मुक्तिसाधनम् ।
तव भक्ताय मे भ्रात्रे ब्रूहि लोकोपकारकम् ॥ १० ॥
हे राजेंद्रा, ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादी वर्ण व ब्रह्मचर्य इत्यादी सर्व आश्रमातील लोक यांना मुक्ती देणारे, तसेच स्त्री, शूद्र यांना सुलभ असणारे हे मुक्तीचे साधन आहे, तेव्हा तुमचा भक्त आणि भाऊ असणार्‍या मला तुम्ही लोकांना उपकारक असणारे हे साधन सांगा. (१०)

श्रीराम उवाच
मम पूजाविधानस्य नान्तोऽपि रघुनन्दन ।
तथापि वक्ष्ये सङ्‌क्षेपात् यथावदनुपूर्वशः ॥ ११ ॥
श्रीराम म्हणाले- "हे रघुनंदन लक्ष्मणा, माझ्या पूजा विधानाला काही अंत नाही. तथापि मी ते तुला शास्त्रानुसार क्रमशः संक्षेपाने सांगतो. (११)

स्वगृह्योक्तप्रकारेण द्विजत्वं प्राप्य मानवः ।
सकाशात् सत्‍गुरोर्मंत्रं लब्ध्वा मद्‌भक्तिसंयुतः ॥ १२ ॥
तेन सन्दर्शितविधिः मां एव आराधयेत्सुधीः ।
हृदये वानले वा अर्चेत् प्रतिमादौ विभावसौ ॥ १३ ॥
माणसाने स्वतःच्या वेदाच्या शाखेच्या गृह्य सूत्रात सांगितलेल्या प्रकाराने उपनयन संस्कारानंतर द्विजत्व प्राप्त करून घ्यावे व माझ्या भक्तीने युक्त होऊन, चांगल्या गुरूं जवळून मंत्र प्राप्त करून घेऊन त्या गुरूंनी दाखवून दिलेल्या विधीप्रमाणे, चांगली बुद्धी बाळगून माणसाने माझी आराधना करावी; किंवा हृदय, अग्नी, मूर्ती इत्यादी अथवा सूर्य इत्यादी ठिकाणी माझी पूजा करावी. (१२-१३)

शालग्रामशिलायां वा पूजयेत् मां अतन्द्रितः ।
प्रातःस्नानं प्रकुर्वीत प्रथमं देहशुद्धये ॥ १४ ॥
वेदतन्त्रोदितैर्मंत्रैः मृल्लेपनविधानतः ।
सन्ध्यादि कर्म यन्नित्यं तत्कुर्याद् विधिना बुधः ॥ १५ ॥
अथवा निरलसपणे शाळीग्राम शिळेच्या ठिकाणी माझी पूजा करावी. बुद्धिमान उपासक भक्ताने प्रथम देहाच्या शुद्धीसाठी प्रातःकाली वेदात किंवा तंत्रात सांगितलेल्या मंत्रांचा उच्चार करीत, शरीरावर शास्त्रविधानाप्रमाणे माती इत्यादी लावून स्नान करावे. नंतर संध्या इत्यादी नित्य कर्मे विधिपूर्वक करावीत. (१४-१५)

सङ्पल्पमादौ कुर्वीत सिद्ध्यर्थं कर्मणां सुधीः ।
स्वगुरुं पूजयेद्‌भक्‍त्या मद्‌बुद्ध्या पूजको मम ॥ १६ ॥
कर्माची सिद्धी व्हावी म्हणून चांगली बुद्धी असणार्‍या माझ्या पूजकाने प्रथम संकल्प करावा आणि नंतर आपला गुरू म्हणजे मी ( राम, परमेश्वर) आहे या बुद्धीने त्याने गुरूची पूजा करावी. (१६)

शिलायां स्नपनं कुर्यात् प्रतिमासु प्रमार्जनम् ।
प्रसिद्धैर्गन्धपुष्पाद्यैः मत्पूजा सिद्धिदायिका ॥ १७ ॥
पूजेसाठीची माझी मूर्ती शालीग्रामाची असल्यास त्या शिलेला त्याने नान घालावे. आणि जर ती प्रतिमा मातीची असेल तर तिच्यावर मार्जन करावे. प्रसिद्ध असलेल्या गंध, फुले इत्यादींनी माझी पूजा करावी. ही पूजा सिद्धी प्राप्त करून देणारी आहे. (१७)

अमायिकोऽनुवृत्त्या मां पूजयेत् नियतव्रतः ।
प्रतिमादिष्वलङ्‌कारः प्रियो मे कुलनन्दन ॥ १८ ॥
दांभिकपणा सोडून आणि गुरूंनी सांगितलेल्या व्रतांचे नियमाने पालन करीत, माणसाने विधिपूर्वक माझी पूजा व्रत म्हणून करावी. हे कुलनंदन लक्ष्मणा, माझ्या प्रतिमा इत्यादीवर अलंकार घालणे व सजविणे हे तर मला प्रिय आहे. (१८)

अग्नौ यजेत हविषा भास्करे स्थण्डिले यजेत् ।
भक्तेनोपहृतं प्रीत्यै श्रद्धया मम वार्यपि ॥ १९ ॥
किं पुनर्भक्ष्यभोज्यादि गन्धपुष्पाक्षतादिकम् ।
पूजाद्रव्याणि सर्वाणि सम्पाद्यैवं समारभेत् ॥ २० ॥
चैलाजिनकुशैः सम्यक् आसनं परिकल्पयेत् ।
तत्रोपविश्य देवस्य सम्मुखे शुद्धमानसः ॥ २१ ॥
ततो न्यासं प्रकूर्वीत मातृकाबहिरान्तरम् ।
केशवादि ततः कूर्यात् तत्त्वन्यासं ततः परम् ॥ २२ ॥
अग्नीची पूजा करावयाची असेल तर अग्नीमध्ये हविर्द्रव्ये अर्पण करून त्याची पूजा करावी. जर सूर्याची पूजा करावयाची असेल तर वेदीवर सूर्याची आकृती काढून त्याची पूजा करावी. माझ्या भक्ताने श्रद्धापूर्वक मला अर्पण केलेले पाणीसुद्धा माझ्या प्रसन्नतेला कारण होते. तर मग भक्ष्य, भोज्य इत्यादी पदार्थ, तसेच गंध, फुले, अक्षता इत्यादी मला अर्पण केल्यास मी संतुष्ट होतो, हे काय सांगावयास हवे ? सर्व पूजा द्रव्ये मिळवून अशा प्रकारे माझ्या पूजेचा प्रारंभ करावा. (आता प्रत्यक्ष पूजा कशी करावी ते मी तुला सांगतो ऐक) प्रथम खाली दर्भ, त्यावर मृगाजिन आणि त्यावर वस्त्र पसरून पूजकाने स्वतःसाठी योग्य आसन तयार करावे. मग शुद्ध मनाने देवाकडे तोंड करून त्या आसनावर बसावे. त्यानंतर बहिर्मातृका आणि अंतर्मातृका न्यास करावा. अर्थात् अंगन्यास-करन्यासपूर्वक अंतर्बाह्य शुद्ध व पवित्र व्हावे. तसेच केशव, नारायण इत्यादी चोवीस नावांचा न्यास करावा आणि त्यानंतर पूजकाने तत्त्वन्यास करावा. (१९-२२)

मन्मूर्तिपञ्जरन्यासं मंत्रन्यासं ततो न्यसेत् ।
प्रतिमादावपि तथा कुर्यात् नित्यमतन्द्रितः ॥ २३ ॥
नंतर विष्णूपंजर स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे मूर्तीवरपण स्न्यास आणि मंत्रन्यास करावा. याचप्रमाणे माझ्या प्रतिमा इत्यादींवरसुद्धा तशा प्रकारचा न्यास पूजकाने निरलसपणाने करावा. (२३)

कलशं स्वपुरो वामे क्षिपेत्पुष्पादि दक्षिणे ।
अर्घ्यपाद्यप्रदानार्थं मधुपर्कार्थमेव च ॥ २४ ॥
तथैव आचमनार्थं तु न्यसेत्पात्रचतुष्टयम् ।
हृत्पद्मे भानुविमले मत्कलां जीवसंज्ञिताम् ॥ २५ ॥
ध्यायेत्स्वदेहमखिलं तया व्याप्तमरिन्दम ।
तामेव आवाहयेन्नित्यं प्रतिमादिषु मत्कलाम् ॥ २६ ॥
आपल्या स्वतःच्यापुढे डाव्या बाजूला पाण्याचा कलश आणि उजव्या बाजूला फुले इत्यादी सामग्री ठेवावी. त्याचप्रमाणे अर्घ्य आणि पाद्य देण्यासाठी तसेच मधुपर्कासाठी आणि आचमनासाठी चार पात्रे ठेवावीत. त्यानंतर सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा आपल्या हृदयकमळात जीव हे नाव असणार्‍या माझ्या कलेचे ध्यान करावे आणि हे शत्रुदमना लक्ष्मणा, आपला संपूर्ण देह हा त्या कलेने व्यापलेला आहे असे समजून घ्यावे आणि प्रतिमा इत्यादींचे पूजन करताना त्या प्रतिमा इत्यादींच्या ठिकाणी त्याच माझ्या जीवकलेचे आवाहन करावे. (२४-२६)

पाद्यार्घ्याचमनीयाद्यैः स्नानवस्त्राविभूषणैः ।
यावच्छक्योपचारैर्वा त्वर्चयेन्माममायया ॥ २७ ॥
त्यानंतर पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, अलंकार यांनी किंवा जितके उपचार शक्य आहे तितक्यांचे द्वारा निष्कपटपणे माझे पूजन करावे. (२७)

विभवे सति कर्पूर कुङ्‌कुमागरुचन्दनैः ।
अर्चयेन्मंत्रवन्नित्यं सुगन्धकुसुमैः शुभैः ॥ २८ ॥
जर पूजकाजवळ वैभव असेल तर कापूर, केशर, रक्तचंदन, चंदन तसेच उत्तम सुवासिक फुले यांनी मंत्रोच्चार करीत माझी पूजा नित्य करावी. (२८)

दशावरणपूजां वै ह्यागमोक्तां प्रकारयेत् ।
नीराजनैर्धूपदीपैः नैवेद्यैर्बहुविस्तरैः ॥ २९ ॥
तसेच नीराजन (पंचारती) धूप, दीप आणि नाना प्रकारचे नैवेद्य यांचे द्वारा शास्त्रात सांगितल्याप्रमाणे माझी दशावरण पूजा करावी. (२९)

श्रद्धयोपहरेन्नित्यं श्रद्धाभुगहमीश्वरः ।
होमं कुर्यात्प्रयत्‍नेन विधिना मंत्रकोविदः ॥ ३० ॥
(हे सर्व उपचार) नित्य मला श्रद्धेने अर्पण करावेत; कारण मी परमेश्वर श्रद्धेने दिलेल्या पदार्थांचा भोक्ता आहे. मंत्र जपणार्‍या पूजकाने पूजेनंतर विधिपूर्वक होम करावा. ३०

अगस्त्येनोक्तमार्गेण कुण्डेनागमवित्तमः ।
जुहुयात् मूलमंत्रेण पुंसूक्तेनाथवा बुधः ॥ ३१ ॥
अगस्त्य ऋषींनी सांगितलेल्या पद्धतीनुसार एक कुंड तयार करवून घेऊन, त्या कुंड्यामध्ये गुरूने सांगितलेल्या मूल मंत्राचा किंवा पुरुषसूक्ताचा वापर करून, आगम जाणणार्‍या बुद्धिमान पुरुषाने होम करावा. (३१)

अथवौपासनाग्नौ वा चरुणा हविषा तथा ।
तप्तजाम्बूनदप्रख्यं दिव्याभरणभूषितम् ॥ ३२ ॥
ध्यायेदनलमध्यस्थं होमकाले सदा बुधः ।
पार्षदेभ्यो बलिं दत्त्वा होमशेषं समापयेत् ॥ ३३ ॥
अथवा अग्निहोत्रासाठी सिद्ध केलेल्या अग्नीमध्ये चरू (भात) आणि अन्य हविर्द्रव्ये यांचा होम करावा. होम करण्याच्या वेळी तापलेल्या सोन्याप्रमाणे असणारी, दिव्य आभरणांनी भूषित असणारी यज्ञपुरुषाच्या रूपातील माझी मूर्ती अग्नीमध्ये उभी आहे असे कल्पून, शहाण्या याजकाने परमात्म्याचे ध्यान करावे. त्यानंतर माझ्या पार्षदांसाठी बली अर्पण करून, होमाचा उरलेला भाग पूर्ण करावा. (३२-३३)

ततो जपं प्रकूर्वीत ध्यायेन्मां यतवाक् स्मरन् ।
मुखवासं च ताम्बूलं दत्त्वा प्रीतीसमन्वितः ॥ ३४ ॥
मदर्थे नृत्यगीतादि स्तुतिपाठादि कारयेत् ।
प्रणमेद्दण्डवद्‌भूमौ हृदये मां निधाय च ॥ ३५ ॥
त्यानंतर वाचेवर नियंत्रण ठेवून, माझे स्मरण करीत ध्यान क रावे आणि जप करावा. त्यानंतर मुखवासासाठी प्रेमपूर्व क तांबूल अर्पण करावा. नंतर माझ्यासाठी नृत्य, गीत इत्यादी तसेच स्तुतिपाठ इत्यादीही करवून घ्यावेत. हृदयात माझी स्थापना करून, जमिनीवर साष्टांग दडवत घालून प्रणाम करावा. (३४-३५)

शिरस्याधाय मद्दत्तं प्रसादं भावनामयम् ।
पाणिभ्यां मत्पदे मूर्ध्नि गृहीत्वा भक्तिसंयुतः ॥ ३६ ॥
मी दिलेला भावनामय प्रसाद हा 'भगवंताचा प्रसाद' आहे अशा भावनेने तो मस्तकी धारण करावा; नंतर भक्तीने युक्त होऊन माझे पाय धरून ते आपल्या मस्तकावर पूजकाने धारण करावेत. (३६)

रक्ष मा घोरसंसारात् इत्युक्‍त्वा प्रणमेत्सुधीः ।
उद्वासयेद्यथापूर्वं प्रत्यग्ज्योतिषि संस्मरन् ॥ ३७ ॥
नंतर 'हे प्रभो, घोर संसारातून माझे रक्षण करा' असे म्हणून त्या बुद्धिमान उपासकाने मला नमस्कार करावा. शेवटी प्रतिमेत आवाहन केलेली जीवकला आता माझ्या हृदयातील तेजात पूर्वीप्रमाणे आली आहे, असे स्मरण करून विसर्जन करावे. (३७)

एवं उक्तप्रकारेण पूजयेत् विधिवद्यदि ।
इहामूत्र च संसिद्धिं प्राप्नोति मदनुग्रहात् ॥ ३८ ॥
अशा प्रकारे आत्ता मी सांगितलेल्या पद्धतीने जर कोणी विधिवत माझी पूजा करील, तर त्याला माझ्या अनुग्रहामुळे इहलोकी व परलोकी उत्तम सिद्धी प्राप्त होईल. (३८)

मद्‌भक्तो यदि मामेवं पूजां चैव दिने दिने ।
करोति मम सारूप्यं प्राप्नोत्येव न संशयः ॥ ३९ ॥
अशा पद्धतीने माझा भक्त जर दररोज माझी पूजा करीत राहील, तर त्याला माझे सारूप्य प्राप्त होईलच, यात संशय नाही. (३९)

इदं रहस्यं परमं च पावनं
    मयैव साक्षात्कथितं सनातनम् ।
पठत्यजस्रं यदि वा शृणोति यः
    स सर्वपूजाफलभाङ् न संशयः ॥ ४० ॥
हे अतिशय गुप्त, अतिशय पवित्र आणि पूर्वीपासून चालत आलेले सनातन असे माझ्या पूजेचे तंत्र साक्षात मीच तुला सांगितले आहे. जो कुणी हे निरंतर पठण करील अथवा ऐकेल त्याला पूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होईल, यात संशय नाही. " (४०)

एवं परात्मा श्रीरामः क्रियायोगमनुत्तमम् ।
पृष्टः प्राह स्वभक्ताय शेषांशाय महात्मने ॥ ४१ ॥
लक्ष्मणाने विचारल्यानंतर, स्वतःचा भक्त, शेषाचा अंश आणि महात्मा असलेल्या लक्ष्मणाला अशा प्रकारे श्रीराम परमात्म्यांनी अतिशय उत्तम क्रियायोग (पूजाविधी) सांगितला. (४१)

पुनः प्राकृतवद्‍रामो मायामालम्ब्य दुःखितः ।
हा सीतेति वदन्नैव निद्रां लेभे कथञ्चन ॥ ४२ ॥
त्यानंतर पुनःआपल्या मायेचा आधार घेऊन राम सामान्य माणसाप्रमाणे दुःखी दिसू लागले. 'हाय सीते' असे म्हणत राहिल्याने रात्री त्यांना झोपही येत नसे. (४२)

एतस्मिन्नन्तरे तत्र किष्किन्धायां सुबुद्धिमान् ।
हनूमान्प्राह सुग्रीवं एकान्ते कपिनायकम् ॥ ४३ ॥
दरम्यानच्या काळात तेथे किष्किंधा नगरीत अतिशय बुद्धिमान् असा हनुमान वानरराज सुग्रीवाला एकांत स्थानी म्हणाला. (४३)

शृणु राजन् प्रवक्ष्यामि तवैव हितमुत्तमम् ।
रामेण ते कृतः पूर्वं उपकारो ह्यनुत्तमः ॥ ४४ ॥
"हे राजन ऐक. मी तुझ्याच हिताची उत्तम गोष्ट सांगत आहे. या पूर्वी श्रीरामांनी तुझ्यावर फार मोठा उपकार केलेला आहे." (४४)

कृतघ्नवत्त्वया नूनं विस्मृतः प्रतिभाति मे ।
त्वत्कृते निहितो वाली वीरस्त्रैलोक्यसम्मतः ॥ ४५ ॥
राज्ये प्रतिष्ठितोऽसि त्वं तारां प्राप्तोऽसि दुर्लभाम् ।
स रामः पर्वताग्रे भ्राता सह वसन्सुधीः ॥ ४६ ॥
त्वदागमनमेकाग्रं ईक्षते कार्यगौरवात् ।
त्वं तु वानरभावेन स्त्रीसक्तो नावबुद्ध्यसे ॥ ४७ ॥
"परंतु मला वाटते की तू एखाद्या कृतघ्न माणसाप्रमाणे तो उपकार खरोखर विसरून गेला आहेस. लक्षात ठेव, तुझ्यासाठी रामांनी त्रैलोक्याला मान्य असणार्‍या अशा वीर वालीला ठार केला व तुला राज्यपदावर प्रतिष्ठित केले. त्या श्रीरामांमुळेच तुला दुर्लभ अशी तारा प्राप्त झाली. परंतु चांगल्या बुद्धीचे राम मात्र सध्या आपल्या भावासह पर्वताच्या शिखरावर राहून, सीतेच्या शोधाच्या आपल्या महान कार्याचा विचार करीत एकाग्रपणाने तुझ्या आगमनाची वाट पाहात आहेत. परंतु तू मात्र वानर स्वभावाला अनुसरून स्त्रीलंपट होऊन सर्व काही विसरून गेला आहेस. (४५-४७)

करोमीति प्रतिज्ञाय सीतायाः परिमार्गणम् ।
न करोषि कृतघ्नस्त्वं हन्यसे वालिवद्‍द्रुतम् ॥ ४८ ॥
'मी सीतेचा शोध करीन' अशी प्रतिज्ञा करून तू आता तसे काहीही करीत नाहीस. तू कृतघ्न आहेस. मला वाटते वालीप्रमाणेच तूही लवकरच मारला जाशील." (४८)

हनूमद्वचनं श्रुत्वा सुग्रीवो भयविह्वलः ।
प्रत्युवाच हनूमन्तं सत्यमेव त्वयोदितम् ॥ ४९ ॥
हनूमानाचे वचन ऐकल्यावर भयाने विव्हल झालेल्या सुग्रीवाने हनुमंताला प्रत्युत्तर दिले, तू जे म्हणालास ते खरेच आहे. (४९)

शीघ्रं कुरु ममाज्ञां त्वं वानराणां तरस्विनाम् ।
सहस्राणि दशेदानीं प्रेषयाशु दिशो दश ॥ ५० ॥
आता तू माझी आज्ञा त्वरित पाळ. अतिशय वेगवान असणारे दहा हजार वानर तू आत्ता दाही दिशांना पाठवून दे. (५०)

सप्तद्वीपगतान्सर्वान् वानरान् आनयन्तु ते ।
पक्षमध्ये समायान्तु सर्व वानरपुङ्‌गवा ॥ ५१ ॥
सात द्वीपांत राहाणार्‍या सर्व वानरांना त्यांनी येथे बोलावून आणावे. पंधरा दिवसांत सर्वश्रेष्ठ वानर येथे एकत्र येवोत. (५१)

ये पक्षमतिवर्तन्ते ते वध्या मे न संशयः ।
इत्याज्ञाप्य हनूमन्तं सुग्रीवो गृहमाविशत् ॥ ५२ ॥
जे वानर पंधरा दिवसांची मुदत मोडतील त्यांना मी ठार मारीन, यात संशय नाही. हनुमंताला अशी आज्ञा करून सुग्रीव आपल्या घरात गेला. (५२)

सुग्रीवाज्ञां पुरस्कृत्य हनूमान् मंत्रिसत्तमः ।
तत्क्षणे प्रेषयामास हरीन्दश दिशः सुधीः ॥ ५३ ॥
सुग्रीवाची आज्ञा शिरसावंद्य मापून अतिशय बुद्धिमान मंत्रिश्रेष्ठ हनुमानाने त्याच क्षणी दाही दिशांना वानरांना पाठवून दिले. (५३)

अगणितगुणसत्त्वान् वायुवेगप्रचारान्
    वनचरगणमुख्यान् पर्वताकाररूपान् ।
पवनहितकुमारः प्रेषयामास दूतान् -
    अतिरभसतरात्मा दानमानादितृप्तान् ॥ ५४ ॥
अगणित गुण आणि पराक्रम यांनी युक्त, वायूच्या गतीने हिंडू शकणारे, पर्वताप्रमाणे आकार व रूप असणारे, आणि वनात हिंडणार्‍या वानर समूहांचे मुख्य, अशा वानरांना देणग्या व मानसन्मान देऊन संतुष्ट केले व त्यांना श्रीरामांच्या कार्यासाठी ज्याचे मन अतिशय उतावळे झाले होते, अशा वायूच्या प्रिय पुत्र हनुमानाने सर्वांना दाही दिशांना पाठवून दिले. (५४)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
किष्किन्धाकाण्डे चतुर्थः सर्गः ॥ ४ ॥
इति श्रीमदध्यात्मसमायणे उमामहेश्वरसंवादे किष्किन्याकाण्डे चतुर्थ: सर्गः ॥ ४ ॥


GO TOP