॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ युद्धकाण्ड ॥

॥ द्वितीयः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



रावणाकडून बिभीषणाचा धिक्कार


श्रीमहादेव उवाच
लङ्‌कायां रावणो दृष्ट्वा कृतं कर्म हनूमता ।
दुष्करं दैवतैर्वापि ह्रिया किञ्चिदवाङ्‌मुखः ॥ १ ॥
आहूय मंत्रिणः सर्वान् इदं वचनमब्रवीत् ।
हनूमता कृतं कर्म भवद्‌भिर्दृष्टमेव तत् ॥ २ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, तिकडे लंकेमध्ये हनुमानाने देवतांनासुद्धा दुष्कर असणारे कर्म केले आहे हे पाहून, रावणाने आपल्या सर्व मंत्र्यांना बोलावले आणि लज्जेने आपले मस्तक किंचित खाली वाकवून तो त्यांना म्हणाला, "हनुमानाने केलेले सर्व कर्म तुम्ही पाहिलेले आहेच. (१-२)

प्रविश्य लङ्‌कां दुर्धर्षां दृष्ट्वा सीतां दुरासदाम् ।
हत्वा च राक्षसीन्वीरान् अक्षं मन्तोदरीसुतम् ॥ ३ ॥
दग्ध्वा लङ्‌कां अशेषेण लङ्‌घयित्वा च सागरम् ।
युष्मान सर्वान् अतिक्रम्य स्वस्थोऽगात्पुनरेव सः ॥ ४ ॥
प्रवेश करणे सुद्धा अवघड आहे अशा लंकेत प्रवेश करून, जी दृष्टीस पडणे कठीण अशा सीतेला भेटून, मंदोदरीचा पुत्र अक्ष व राक्षस वीर यांनाही ठार करून, लंकेला संपूर्णपणे जाळून टाकून, सागर ओलांडून आणि तुम्हा सर्वाना तुच्छ ठरवून, तो हनुमान सुखरूप परत गेला आहे. (३-४)

किं कर्तव्यमितोऽस्माभिः युयं मंत्रविशारदाः ।
मंत्रयध्वं प्रयत्‍नेन यत्कृतं मे हितं भवेत् ॥ ५ ॥
तुम्ही सर्वजण विचार करण्यात तरबेज आहात. तेव्हा आता यापुढे आपण काय करावयास हवे आणि जे केले असता माझे हित होईल, त्या गोष्टीचा तुम्ही काळजीपूर्वक विचार करा." (५)

रावणस्य वचःश्रुत्वा राक्षसास्तमथाब्रुवन् ।
देव शङ्‌का कुतो रामात् तव लोकजितो रणे ॥ ६ ॥
रावणाचे वचन ऐकल्यानंतर ते राक्षस मंत्री त्याला म्हणाले, "महाराज, युद्धात सर्व लोकांना जिंकणाऱ्या तुम्हांला रामापासून कसली भीती आहे ? (६)

इन्द्रस्तु बद्‍ध्वा निक्षिप्तं पुत्रेण तव पत्तने ।
जित्वा कुबेरमानीय पुष्पकं भुज्यते त्वया ॥ ७ ॥
तुमच्या इंद्रजित नामक पुत्राने इंद्रालासुद्धा बांधून आपल्या राजधानीच्या नगरात टाकले होते आणि तुम्ही स्वतः कुबेराला जिंकून, त्याचे पुष्पक विमान आणून, त्याचा उपभोग घेत आहात. (७)

यमो जितः कालदण्डाद् भयं नाभूत्तव प्रभो ।
वरुणो हुङ्‍कृतेनैव जितः सर्वेऽपि राक्षसाः ॥ ८ ॥
मयो महासुरो भीत्या कन्यां दत्त्वा स्वयं तव ।
त्वद्वशे वर्ततेऽद्यापि किमुतान्ये महासुराः ॥ ९ ॥
हनूमद्धर्षणं यत्तु तदवज्ञानकृतं च नः ।
वानरोऽयं किमस्माकं अस्मिन् पौरुषदर्शने ॥ १० ॥
इत्युपेक्षितमस्माभिः धर्षणं तेन किं भवेत् ।
वयं प्रमत्ता किं तेन वञ्चिताः स्मो हनूमता ॥ ११ ॥
जानीमो यदि तं सर्वे कथं जीवन् गमिष्यति ।
आज्ञापय जगत्कृत्स्नं अवानरं अमानुषम् ॥ १२ ॥
कृत्वायास्यामहे सर्वे प्रत्येकं वा नियोजय ।
कुम्भकर्णस्तदा प्राह रावणं राक्षसेश्वरम् ॥ १३ ॥
आरब्धं यत्त्वया कर्म स्वात्मनाशाय केवलम् ।
न दृष्टोऽसि तदा भाग्यात् त्वं रामेण महात्मना ॥ १४ ॥
हे प्रभो, तुम्ही यमाला जिंकले आहे. त्यामुळे कालदंडाची भीतीसुद्धा तुम्हांला नाही. तसेच केवळ हुंकार टाकून तुम्ही वरुणाला तसेच इतर सर्व राक्षसांना जिंकले आहे. मय या महा असुराने तुम्हांला भिऊन स्वतःच तुम्हांला आपली कन्या दिली आणि तो अद्यापिही तुम्हांला वश होऊन राहिला आहे. मग अन्य महान असुरांचे ते काय ? हनुमानाने जो काही आपल्याला त्रास दिला तो केवळ आपण त्याची उपेक्षा केल्यामुळे 'हा तर साधा वानर आहे. त्याला आमचा पराक्रम दाखवून काय उपयोग ?' असा विचार करून आम्ही त्याची उपेक्षा केली होती. नाही तर तो आमची अवज्ञा कशी काय करू शकला असता ? आम्ही निष्काळजी राहिलो. तेव्हा आम्हांला हनुमंताने फसविले. त्याला काय महत्त्व द्यायचे ? तो असे काही करील हे आम्हां सर्वांना कळले असते तर तो जिवंतपणी कसा जाऊ शकला असता ? तुम्ही आम्हांला आज्ञा करा. संपूर्ण जग वानररहित आणि मानवरहित करून आम्ही सर्वजण परत येऊ. अथवा आम्हापैकी कोणाही एकाकडे हे कार्य सोपवा." त्या वेळी राक्षसराज रावणाला कुंभकर्ण म्हणाला, "अरे रावणा, जे कार्य तू सुरू केले आहेस, ते केवळ तुझ्या नाशालाच कारणीभूत होणार आहे. (सीतेला हरण करण्याच्या वेळी) केवळ तुझे नशीब म्हणून महात्म्या रामाची दृष्टी तुझ्यावर पडली नाही. (८-१४)

यदि पश्यति रामस्त्वां जीवन्नायासि रावण ।
रामो न मानुषो देवः साक्षात् नारयणोऽव्ययः ॥ १५ ॥
हे रावणा, जर त्यावेळी रामाने तुला पाहिले असते तर तू जिवंत परत आला नसतास. राम हा सामान्य मनुष्य नाही, तर तो साक्षात् अविनाशी नारायण देव आहे. (१५)

सीता भगवति लक्ष्मी रामपत्‍नी यशस्विनी ।
राक्षसानां विनाशाय त्वयानीता सुमध्यमा ॥ १६ ॥
रामाची यशस्विनी पत्नी सीता ही साक्षात भगवती लक्ष्मी आहे. आम्हां राक्षसांचा नाश करण्यासाठीच तू त्या सुंदर स्त्रीला पळवून आणले आहेस. (१६)

विषपिण्डमिवागीर्य महामीनो यथा तथा ।
आनीता जानकी पश्चात् त्वया किं वा भविष्यति ॥ १७ ॥
ज्या प्रमाणे एखादा मोठा मासा विषाचा गोळा गिळतो आणि मरतो त्या प्रमाणे तू जानकीला पळवून आणले आहेस. तर आणखी काय होणार ? (१७)

यद्यप्यनुचितं कर्म त्वया कृतमजानता ।
सर्वं समं करिष्यामि स्वस्थचित्तो भव प्रभो ॥ १८ ॥
जरी तू नकळत अनुचित कर्म केले आहेस तरी मी सर्व काही ठीक करीन. हे राजा, तू स्वस्थ राहा." (१८)

कुम्भकर्णवचः श्रुत्वा वाक्यमिन्द्रजिदब्रवीत् ।
देहि देव ममानुज्ञां हत्वा रामं सलक्ष्मणम् ।
सुग्रीवं वानरांश्चैव पुनर्यास्यामि तेऽन्तिकम् ॥ १९ ॥
कुंभकर्णाचे वचन ऐकल्यावर इंद्रजित म्हणाला, "महाराज, मला आज्ञा द्या. लक्ष्मणासह राम, सुग्रीव आणि सर्व वानर या सर्वांचा वध करून मी पुन्हा तुमच्याजवळ येईन." (१९)

तत्रागतो भागवतप्रधानो
    विभीषणो बुद्धिमतं वरिष्ठः ।
श्रीरामपादद्वय एकतानः ।
    प्रणम्य देवारिमुपोपविष्टः ॥ २० ॥
तितक्यात भगवद्‌भक्तात अग्रगण्य, बुद्धिमंतांमध्ये श्रेष्ठ, असा बिभीषण तेथे आला. श्रीरामांच्या पायांशी त्याच्या मनाची वृत्ती एकतान झाली होती. तो देवशत्रू रावणाला नमस्कार करून बसला. (२०)

विलोक्य कुम्भश्रवणादिदैत्यान्-
    मत्तप्रमत्तान् अतिविस्मयेन ।
विलोक्य कामातुरमप्रमत्तो
    दशाननं प्राह विशुद्धबुद्धिः ॥ २१ ॥
उन्मत्त अशा कुंभकर्ण इत्यादी दैत्यांकडे अतिशय आश्चर्याने पाहून आणि कामातुर रावणाकडे दृष्टी टाकून, सावध असणारा व निर्मळ बुद्धी असणारा तो बिभीषण शांतपणे रावणाला म्हणाला. (२१)

न कुम्भकर्णेन्द्रजितौ च राजन्-
    तथा महापार्श्वमहोदरौ तौ ।
निकुम्भकुम्भौ च तथातिकायः
    स्थास्तु न शक्ता युधि राघवस्य ॥ २२ ॥
"हे राजन, कुंभकर्ण, इंद्रजित, महापार्श्व, महोदर, निकुंभ, कुंभ तसाच अतिकाय यांपैकी कोणीही युद्धामध्ये रामांच्यापुढे उभे राहण्यास समर्थ नाही. (२२)

सीताभिधानेन महाग्रहेण
    ग्रस्तोऽसि राजन् न च ते विमोक्षः ।
तामेव सत्कृत्य महाधनेन
    दत्त्वाभिरामाय सुखी भव त्वम् ॥ २३ ॥
हे राजा, सीता नावाच्या महाग्रहाने तुला ग्रासले आहे; त्यातून तुझी सुटका होणार नाही. म्हणून त्या सीतेचाच सत्कार करून आणि विपुल धन देऊन, तू तिला रामांना परत देऊन सुखी हो. (२३)

यावन्न रामस्य शिताः शिलीमुखा
    लङ्‌कामभिव्याप्य शिरांसि रक्षसाम् ।
छिन्दन्ति तावद्रघुनायकस्य भो-
    स्तां जानकीं त्वं प्रतिदातुमर्हसि ॥ २४ ॥
लंकेला व्यापून, सर्व राक्षसांची मस्तके रामांच्या तीष्ण बाणांनी जोपर्यंत तोडली जात नाहीत, तोपर्यंतच अरे रावणा, तू त्या रघुनायकाला ती जानकी परत करावीस, हेच योग्य आहे. (२४)

यावन्नगाभाः कपयो महाबला
    हरिन्द्रतुल्या नखदंष्ट्रयोधिनः ।
लङ्‌कां समाक्रम्य विनाशयन्ति ते
    तावद् द्रुतं देहि रघूत्तमाय ताम् ॥ २५ ॥
पर्वताप्रमाणे असणाऱ्या, महाबलवान श्रेष्ठ सिंहासारख्या पराक्रमी, नखे व दाढा यांनी युद्ध करणाऱ्या त्या वानरांनी लंकेवर आक्रष्मण करून जोपर्यंत ती नष्ट करून टाकलेली नाही, तोपर्यंतच तू रघूत्तम श्रीरामांना सीता सत्वर परत देऊन टाक. (२५)

जीवन्न रामेण विमोक्ष्यसे त्वं
    गुप्तः सुरेन्द्रैरपि शङ्‌करेण ।
न देवराजाङ्‌कगतो न मृत्योः
    पाताललोकानपि सम्प्रविष्टः ॥ २६ ॥
(तू असे केले नाहीस तर) अगदी देवदेवांनीसुद्धा तुझे रक्षण केले किंवा शंकराने रक्षण केले, किंवा तू देवराज इंद्राच्या किंवा यमाच्या मांडीवर जाऊन बसलास, अथवा पाताळामध्ये जरी तू प्रवेश करून बसलास, तरी तू श्रीरामांच्या हातून जिवंत सुटणार नाहीस." (२६)

शुभं हितं पवित्रं च विभीषणवचः खलः ।
प्रतिजग्राह नैवासौ म्रियमाण इवौषधम् ॥ २७ ॥
ज्या प्रमाणे मरायला टेकलेला माणूस औषध घेत नाही, त्या प्रमाणे त्या दुष्ट रावणाने बिभीषणाचे कल्याणकारक, हितकारक आणि पवित्र असे म्हणणे मानले नाही. (२७)

कालेन नोदितो दैत्यो विभीषणमथाब्रवीत् ।
मद्दत्तभोगैः पुष्टाङ्‌गो मत्समीपे वसन्नपि ॥ २८ ॥
प्रतीपमाचरत्येष ममैव हितकारिणः ।
मित्रभावेन शत्रुर्मे जातो नास्त्यत्र संशयः ॥ २९ ॥
काळाकडून प्रेरणा मिळालेला तो दैत्य रावण नंतर बिभीषणाला म्हणाला, "पाहा, मी दिलेल्या भोगांनी शरीर पुष्ट झालेला हा बिभीषण माझ्याजवळ राहात असून सुद्धा तो माझ्याविरुद्ध आचरण करीत आहे. मित्ररूपाने हा माझा शत्रू झाला आहे, यात संशय नाही. (२८-२९)

अनार्येण कृतघ्नेन सङ्‌गतिर्मे न युज्यते ।
विनाशमभिकाङ्‌क्षन्ति ज्ञातीनां ज्ञातयः सदा ॥ ३० ॥
या नीच आणि कृतघ्न बिभीषणाशी माझी संगत असणे योग्य नाही. प्रायः असे दिसून येते की नातेवाईकच नातेवाईकांच्या नाशाची इच्छा करीत असतात. (३०)

योऽन्यस्त्वेवंविधं ब्रूयाद् वाक्यमेकं निशाचरः ।
हन्मि तस्मिन् क्षणे एव धिक् त्वां रक्षः कुलाधमम् ॥ ३१ ॥
दुसऱ्या कुणी राक्षसाने जर अशा प्रकारचे एक वाक्य उच्चारले तर मी त्याला त्याच क्षणात ठार करीन. हे राक्षस कुळातील अधमा, तुझा धिक्कार असो." (३१)

रावणेनैवमुक्तः सन् परुषं स विभीषणः ।
उत्पपात सभामध्याद् गदापाणिर्महाबलः ॥ ३२ ॥
अशा प्रकारे रावणाने कठोर वचन उच्चारल्यानंतर तो महाबली बिभीषण हातात गदा घेऊन, त्या राजसभेमधून एकदम वर उडाला. (३२)

चतुर्भिर्मंत्रिभिः सार्धं गगनस्थोऽब्रविद्वचः ।
क्रोधेन महताविष्टो रावणं दशकन्धरम् ।
मा विनाशमुपैहि त्वं प्रियवादिनमेव माम् ॥ ३३ ॥
धिक्करोषि तथापि त्वं ज्येष्ठो भ्राता पितुः समः ।
कालो राघवरूपेण जातो दशरथालये ॥ ३४ ॥
आणि आपल्या चार मंत्र्यांसह आकाशातच स्थिर होऊन आणि अतिशय क्रोधाने तो रावणाला म्हणाला, "अरे रावणा, तू स्वतःच्या नाशाप्रत जाऊ नकोस. तुझ्या कल्याणाची गोष्ट सांगणाऱ्याचा तू धिक्कार करीत आहेस. ठीक आहे. ज्येष्ठ भाऊ हा पित्यासमान असतो. (म्हणून मी काही वाईट बोलत नाही.) तुझा साक्षात काळ राघवांच्या रूपाने दशरथाच्या घरी जन्माला आला आहे. (३३-३४)

काली सीताभिधानेन जाता जनकनन्दिनी ।
तावुभावागतावत्र भूर्मेभारापनुत्तये ॥ ३५ ॥
आणि महाशक्ती काली ही सीता या नावाने कन्या म्हणून जन्माला आली आहे. भूमीचा भार करण्यासाठी ते दोघे येथे आले आहेत. (३५)

तेनैव प्रेरितस्त्वं तु न शृणोषि हितं मम ।
श्रीरामः प्रकृतेः साक्षात् परस्तात्सर्वदा स्थितः ॥ ३६ ॥
त्या कालरूपी रामांनीच प्रेरणा दिल्यामुळे तू माझे हितकारक वचन ऐकत नाहीस. श्रीराम हे साक्षात परमात्मा असून ते सर्वदा प्रकृतीच्या पलीकडे असतात. (३६)

बहिरन्तश्च भूतानां समः सर्वत्र संस्थितः ।
नामरूपादिभेदेन तत्तन्मय इवामलः ॥ ३७ ॥
ते प्राण्यांच्या आत- बाहेर सर्वत्र समरूपाने स्थित असतात. जरी ते मूलतः निर्मळ आहेत, तरी नाम आणि रूप यांच्या भेदामुळे ते जणू नामरूपात्मक आहेत, असे दिसतात. (३७)

यथा नानाप्रकारेषु वृक्षेष्वेको महानलः ।
तत्तदाकृतिभेदेन भिद्यतेऽज्ञानचक्षुषाम् ॥ ३८ ॥
पञ्चकोशादिभेदेन तत्तन्मय इवाबभौ ।
नीलपीतादियोगेन निर्मलः स्फटिको यथा ॥ ३९ ॥
ज्या प्रमाणे अज्ञानी माणसांच्या दृष्टीने नाना प्रकारच्या वृक्षांमध्ये असणारा एकच महान अग्नी हा त्या त्या वृक्षाच्या आकारभेदाने भिन्न आहे असे वाटते, किंवा निर्मळ असणारा स्फटिक मणी हा नील, पीत, इत्यादी प्रकारच्या वस्तूंच्या सान्निध्याने त्या त्या रंगाचा भासतो, त्या प्रमाणे (अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा) पांच कोशांच्या भेदामुळे आत्मा हा त्या त्या कोशाच्या स्वरूपात आहे असे भासते. (३८-३९)

स एव नित्यमुक्तोऽपि स्वमायागुणबिम्बितः ।
कालः प्रधानं पुरुषोऽव्यक्तं चेति चतुर्विधः ॥ ४० ॥
ते परमात्मा राम जरी नित्य मुक्त आहेत तरी स्वतःच्या मायेच्या गुणांमध्ये प्रतिबिंबितझाल्यावर ते काल, प्रधान, पुरुष, आणि अव्यक्त अशा चार प्रकारचे होतात, असे भासते. (४०)

प्रधानपुरुषाभ्यां स जगत्कृत्स्नं सृजत्यजः ।
कालरूपेण कलनां जगतः कुरुतेऽव्ययः ॥ ४१ ॥
ते परमात्मा स्वतः जन्मरहित असूनही प्रधान (प्रकृती) आणि पुरुष यांच्या द्वारा ते संपूर्ण जग निर्माण करतात. तसेच ते स्वतः अविनाशी असूनही काळाच्या रूपाने जगाचा संहार करतात. (४१)

कालरूपी स भगवान् रामरूपेण मायया ॥ ४२ ॥
ब्रह्मणा प्रार्थितो देवः त्वद्वधार्थमिहागतः ।
तदन्यथा कथं कुर्यात् सत्यसंकल्प ईश्वरः ॥ ४३ ॥
ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेमुळे काळरूपी ते भगवान रामांच्या रूपाने स्वतः च्या मायेसह तुझ्या वधासाठी येथे आले आहेत. ईश्वर हा सत्यसंकल्प असतो. तेव्हा ते आपली प्रतिज्ञा कशी बरे मोडतील ? (४२-४३)

हनिष्यति त्वां रामस्तु सपुत्रबलवाहनम् ।
हन्यमानं न शक्नोमि द्रष्टुं रामेण रावण ॥ ४४ ॥
त्वां राक्षसकुलं कृत्स्नं ततो गच्छामि राघवम् ।
मयि याते सुखीभूत्वा रमस्व भवने चिरम् ॥ ४५ ॥
म्हणून श्रीराम हे तुला तुझे पुत्र, सैन्य आणि वाहने यांच्या सकट ठार करतील. हे रावणा, रामांकडून सर्व राक्षस कुळासह तुला ठार केलेले मी पाहू शकणार नाही. म्हणून मी आत्ताच राघवांकडे जात आहे. मी गेल्यावर तू सुखी होऊन पुष्कळ काळ भोगांत रममाण होऊन आपल्या महालात राहा." (४४-४५)

विभीषणो रावणवाक्यतः क्षणा-
    द्विसृज्य सर्वं सपरिच्छदं गृहम् ।
जगाम रामस्य पदारविन्दयोः
    सेवाभिकाङ्‌क्षी परिपूर्णमानसः ॥ ४६ ॥
अशा प्रकारे रावणाच्या बोलण्यामुळे आपल्या घरादाराचा त्याग करून, बिभीषण एका क्षणातच रामांच्या चरणकमळांची सेवा करण्याच्या इच्छेने प्रसन्न मनाने रामांकडे जाण्यास निघाला. (४६)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
युद्धकाण्डे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥
इति श्रीमद्‌अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥


GO TOP