सुग्रीवस्य लक्ष्मणसमीपे गमनं, लक्ष्मणेन तस्य भर्त्सनं च -
|
सुग्रीवांचे लक्ष्मणाजवळ जाणे आणि लक्ष्मणांनी त्यांना फटकारणे (त्यांचा धिक्कार करणे किंवा कान उघडणी करणे) -
|
तमप्रतिहतं क्रुद्धं प्रविष्टं पुरुषर्षभम् । सुग्रीवो लक्ष्मणं दृष्ट्वा बभूव व्यथितेंद्रियः ॥ १ ॥
|
लक्ष्मण कुठल्याही अडथळ्याशिवाय सरळ आत घुसले होते. त्या पुरुषश्रेष्ठांना क्रोधाविष्ट झालेले पाहून सुग्रीवाची सारी इंद्रिये व्यथित झाली. ॥१॥
|
क्रुद्धं निःश्वसमानं तं प्रदीप्तमिव तेजसा । भ्रातुर्व्यसनसंतप्तं दृष्ट्वा दशरथात्मजम् ॥ २ ॥
उत्पपात हरिश्रेष्ठो हित्वा सौवर्णमासनम् । महान्महेंद्रस्य यथा स्वलङ्कृदत इव ध्वजः ॥ ३ ॥
|
दशरथपुत्र लक्ष्मण रागाने दीर्घ श्वास घेत होते आणि तेजाने प्रज्वलित झाल्यासारखे भासत होते. आपल्या भावाला होणार्या कष्टामुळे त्यांना मनांत फार संताप आला होता. त्यांना समोर आलेले पाहून वानरश्रेष्ठ सुग्रीव सिंहासन सोडून उडी मारून खाली उतरले जणु देवराज इंद्रांचा उत्तम प्रकारे सजविला गेलेला महान् ध्वज आकाशांतून पृथ्वीवर उतरून आला असावा. ॥२-३॥
|
उत्पतंतमनूत्पेतू रुमाप्रभृतयः स्त्रियः । सुग्रीवं गगने पूर्णं चंद्रं तारागणा इव ॥ ४ ॥
|
सुग्रीव उतरतांच रूमा आदि स्त्रियाही त्यांच्या पाठोपाठ सिंहासनावरून उतरून उभ्या राहिल्या. जसे आकाशात पूर्ण चंद्रम्याचा उदय होताच तारांचा समुदायही उदित झाला असावा. ॥४॥
|
संरक्तनयनः श्रीमान् विचचाल कृताञ्जलिः । बभूवावस्थितस्तत्र कल्पवृक्षो महानिव ॥ ५ ॥
|
श्रीमान् सुग्रीवाचे नेत्र मदाने लाल झाले होते. ते हळू हळू चालत लक्ष्मणांच्या जवळ आले आणि हात जोडून उभे राहिले. लक्ष्मण तेथे महान् कल्पवृक्षाप्रमाणे स्थित होते. ॥५॥
|
रुमाद्वितीयं सुग्रीवं नारीमध्यगतं स्थितम् । अब्रवील्लक्ष्मणः क्रुद्धः सतारं शशिनं यथा ॥ ६ ॥
|
सुग्रीवांच्या बरोबर त्यांची पत्नी रूमाही होती. ते स्त्रियांच्या मध्यभागी उभे राहून तारकांनी घेरलेल्या चंद्रम्याप्रमाणे शोभत होते. त्यांना पाहून लक्ष्मण क्रोधपूर्वक म्हणाले- ॥६॥
|
सत्त्वाभिजनसंपन्नः सानुक्रोशो जितेंद्रियः । कृतज्ञः सत्यवादी च राजा लोके महीयते ॥ ७ ॥
|
’वानरराज ! धैर्यवान्, कुलीन, दयाळू, जितेन्द्रिय आणि सत्यवादी राजाचाच संसारात आदर होत असतो. ॥७॥
|
यस्तु राजा स्थितेऽधर्मे मित्राणां उपकारिणाम् । मिथ्या प्रतिज्ञां कुरुते को नृशंसतरस्ततः ॥ ८ ॥
|
’जो राजा अधर्मात स्थित होऊन उपकारी मित्रांच्या समोर केली गेलेली आपली प्रतिज्ञा खोटी करतो त्याच्याहून अधिक अत्यंत क्रूर कोण असेल ? ॥८॥
|
शतमश्वानृते हंति सहस्रं तु गवानृते । आत्मानं स्वजनं हंति पुरषः पुरुषानृते ॥ ९ ॥
|
’अश्वदानाची प्रतिज्ञा करून तिची पूर्ती केली नाही तर ’अश्वानृत’ (अश्वविषयक असत्य) नामक पाप होते. हे पाप घडले तर मनुष्य शंभर अश्वांच्या हत्येच्या पापाचा भागी होतो. याच प्रकारे गोदानविषयक प्रतिज्ञेला मिथ्या केल्याने हजार गायींच्या वधाचे पाप लागते तसेच कुणा पुरुषा समक्ष त्याचे कार्य पूर्ण करण्याची प्रतिज्ञा करून जो तिची पूर्ती करीत नाही तो पुरुष आत्मघात आणि स्वजन वधाच्या पापाचा भागी होतो. (मग जो पुरुष श्रीरामा समक्ष केलेल्या प्रतिज्ञेला मिथ्या करतो, त्याच्या पापाची काही सीमाच होऊ शकत नाही.) ॥९॥
|
पूर्वं कृतार्थो मित्राणां न तत् प्रतिकरोति यः । कृतघ्नः सर्वभूतानां स वध्यः प्लवगेश्वर ॥ १० ॥
|
’वानरराज ! जो प्रथम मित्रांच्या द्वारा आपले कार्य सिद्ध करून घेऊन त्याच्या बदल्यात त्या मित्रांवर काहीही उपकार करीत नाही, तो कृतघ्न तसेच सर्व प्राण्यांसाठी वध्य आहे. ॥१०॥
|
गीतोऽयं ब्रह्मणा श्लोकः सर्वलोकनमस्कृतः । दृष्ट्वा कृतघ्नं क्रुद्धेन तंनिबोध प्लवंगम ॥ ११ ॥
|
’कपिराज ! कुणा कृतघ्नाला पाहून कुपित झालेल्या ब्रह्मदेवांनी सर्व लोकांसाठी आदरणीय हा एक श्लोक सांगितला आहे, तो ऐक. ॥११॥
|
गोघ्ने चैव सुरापे च चोरे भग्नव्रते तथा । निष्कृतिर्विहिता सद्भिः कृतघ्ने नास्ति निष्कृतिः ॥ १२ ॥
|
’गोहत्यारा, दारूडा, चोर आणि व्रत-भंग करणार्या पुरुषासाठी सत्पुरुषांनी प्रायश्चित्ताचे विधान केले आहे, परंतु कृतघ्नाच्या उद्धारासाठी कुठलाही उपाय नाही आहे. ॥१२॥
|
अनार्यस्त्वं कृतघ्नश्च मिथ्यावादी च वानर । पूर्वं कृतार्थो रामस्य न तत् प्रतिकरोषि यत् ॥ १३ ॥
|
’वानरा ! तू अनार्य, कृतघ्न आणि मिथ्यावादी आहेस, कारण की रामांच्या सहाय्याने तू प्रथम आपले काम साधून घेतलेस, परंतु जेव्हा त्यांची सहायता करण्याची वेळ आली आहे, तेव्हा तू काहीही करीत नाहीस. ॥१३॥
|
ननु नाम कृतार्थेन त्वया रामस्य वानर । सीतया मार्गणे यत्नःा कर्तव्यः कृतमिच्छता ॥ १४ ॥
|
’वानरा ! तुझा मनोरथ सिद्ध होऊन चुकला आहे, म्हणून आता तू प्रत्युपकाराच्या इच्छेने रामपत्नी सीतेचा शोध करण्यासाठी प्रयत्न करावयास पाहिजे, ॥१४॥
|
स त्वं ग्राम्येषु भोगेषु सक्तो मिथ्याप्रतिश्रवः । न त्वां रामो विजानीते सर्पं मण्डूकराविणम् ॥ १५ ॥
|
’परंतु तुझी दशा ही आहे की आपली प्रतिज्ञा खोटी करून तू ग्राम्यभोगात आसक्त होऊन राहात आहेस. श्रीराम हे जाणत नाहीत की तू बेडका सारखी बोली बोलणारा सर्प आहेस. (ज्याप्रमाणे साप आपल्या तोंडात एखाद्या बेडकाला दाबून धरतो तेव्हा केवळ बेडूकच बोलत असतो, दूरच्या लोकांना तो बेडूक वाटतो पण वास्तविक तो सर्प असतो. तीच दशा तुझी ही आहे तुझे बोलणे काही वेगळेच आहे आणि स्वरूप काही वेगळेच आहे.)॥१५॥
|
महाभागेन रामेण पापः करुणवेदिना । हरीणां प्रापितो राज्यं त्वं दुरात्मा महात्मना ॥ १६ ॥
|
’महाभाग श्रीराम परम महात्मा तसेच दयेने द्रवित होणारे आहेत; म्हणून त्यांना तुझ्या सारख्या पापी आणि दुरात्मालाही वानरांच्या राज्यावर बासविले आहे. ॥१६॥
|
कृतं चेन्नाभिजानीषे राघवस्य महात्मनः । सद्यस्त्वं निशितैर्बाणैः हतो द्रक्ष्यसि वालिनम् ॥ १७ ॥
|
’जर तू महात्मा राघवांनी केलेल्या उपकारांना समजून घेतले नाहीस तर शीघ्रच त्यांच्या तीक्ष्ण बाणांनी मारला जाऊन वालीचे दर्शन करशील. ॥१७॥
|
न च संकुचितः पंथा येन वाली हतो गतः । समये तिष्ठ सुग्रीव मा वालिपथमन्वगाः ॥ १८ ॥
|
’सुग्रीवा ! वाली मारला जाऊन ज्या मार्गाने गेला आहे, तो आजही बंद झालेला नाही. म्हणून तू आपल्या प्रतिज्ञेवर ठाम रहा. वालीच्या मार्गाचे अनुसरण करू नकोस. ॥१८॥
|
न नूनमिक्ष्वाकुवरस्य कार्मुकात् शरांश्च तान् पश्यसि वज्रसंनिभान् । ततः सुखं नाम विषेवसे सुखी न रामकार्यं मनसाप्यवेक्षसे ॥ १९ ॥
|
’इक्ष्वाकु कुलशिरोमणी श्रीरामांच्या धनुष्यातून सुटलेल्या त्या वज्रतुल्य बाणांकडे निश्चितच तुझी दृष्टी जात नाही आहे; म्हणून तू ग्राम्य सुखाचे सेवन करीत आहेस आणि त्यातच सुख मानून श्रीरामांच्या कार्याचा मनाने ही विचार करीत नाहीस.’ ॥१९॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे चतुस्त्रिंशः सर्गः ॥ ३४ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा चौतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३४॥
|