श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ दशाधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

रावणस्य स्त्रीणां विलापः -
रावणाच्या स्त्रियांचा विलाप -
रावणं निहतं श्रुत्वा राघवेण महात्मना ।
अन्तःपुराद् विनिष्पेतू राक्षस्यः शोककर्शिताः ।। १ ।।
महात्मा राघवांच्या द्वारा रावण मारला गेल्याचा समाचार ऐकून शोकाने व्याकुळ झालेल्या राक्षसी अंतःपुरांतून बाहेर पडल्या. ॥१॥
वार्यमाणाः सुबहुशो वेष्टन्त्यः क्षितिपांसुषु ।
विमुक्तकेश्यः शोकार्ता गावो वत्सहता इव ।। २ ।।
लोकांनी वारंवार अडवूनही त्या जमिनीवरील धूळीत लोळू लागल्या. त्यांचे केस मोकळे सुटलेले होते आणि ज्यांची वासरे मेली असावीत अशा गाईंच्या प्रमाणे त्या शोकाने आतुर झाल्या होत्या. ॥२॥
उत्तरेण विनिष्क्रम्य द्वारेण सह राक्षसैः ।
प्रविश्यायो धनं घोरं विचिन्वन्त्यो हतं पतिम् ।। ३ ।।
राक्षसांच्या बरोबर लंकेच्या उत्तर दरवाजातून बाहेर पडून त्या भयंकर युद्धभूमीमध्ये प्रवेश करून आपल्या मेलेल्या पतिला शोधू लागल्या. ॥३॥
आर्यपुत्रेति वादिन्यो हा नाथेति च सर्वशः ।
परिपेतुः कबन्धाङ्‌कां महीं शोणितकर्दमाम् ।। ४ ।।
हा आर्यपुत्र ! हा नाथ ! असा ओरडा करीत त्या सर्वच्या सर्व जेथे मस्तकांशिवायची प्रेते सर्वत्र पसरलेली होती आणि रक्ताचा चिखल साठला होता अशा रणभूमीमध्ये उठत पडत सर्वत्र भटकू लागल्या. ॥४॥
ता बाष्पपरिपूर्णाक्ष्यो भर्तृशोकपराजिताः ।
करीण्य इव नर्दन्त्यः करेण्वो हतयूथपाः ।। ५ ।।
त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वहाता होत्या. त्या पतिच्या शोकाने बेशुद्ध होऊन यूथपति मारला गेलेल्या हत्तीणींच्या प्रमाणे करूण क्रंदन करत होत्या. ॥५॥
ददृशुस्ता महाकायं महावीर्यं महाद्युतिम् ।
रावणं निहतं भूमौ नीलाञ्जनचयोपमम् ।। ६ ।।
त्यांनी काळ्या कोळशाच्या ढीगाप्रमाणे पृथ्वीवर मरून पडलेल्या महाकाय, महापराक्रमी आणि महातेजस्वी रावणास पाहिले. ॥६॥
ताः पतिं सहसा दृष्ट्‍वा शयानं रणपांसुषु ।
निपेतुस्तस्य गात्रेषु च्छिन्ना वनलता इव ।। ७ ।।
रणभूमीच्या धुळीत पडलेल्या आपल्या मृतक पतिवर एकाएकी दृष्टि पडतांच त्या कापून टाकलेल्या वनातील लतांप्रमाणे त्याच्या अंगावर कोसळून पडल्या. ॥७॥
बहुमानात् परिष्वज्य काचिदेनं रुरोद ह ।
चरणौ काचिदालम्ब्य काचित् कण्ठेऽवलम्ब्य च ।। ८ ।।
त्यांच्यापैकी कुणी अत्यंत आदराने त्याला आलिंगन देऊन तर कुणी त्याचे पाय पकडून तर कुणी गळामिठी घालून रडू लागल्या. ॥८॥
उत्क्षिप्य च भुजौ काचिद् भूमौ सुपरिवर्तते ।
हतस्य वदनं दृष्ट्‍वा काचिन्मोहमुपागमत् ।। ९ ।।
कुणी स्त्री आपल्या दोन्ही भुजा वर उचलून एकाएकी जमिनीवर कोसळून पडली आणि जमिनीवर लोळू लागली तर कोणी आपल्या मेलेल्या स्वामीचे मुख पाहून मूर्च्छित झाली. ॥९॥
काचिदङ्‌के शिरः कृत्वा रुरोद मुखमीक्षती ।
स्नापयन्ती मुखं बाष्पैः तुषारैरिव पङ्‌कजम् ।। १० ।।
कुणी पतिचे मस्तक मांडीवर घेऊन त्यांचे मुख न्याहाळून पहात होती आणि दवबिंदुनी कमळास न्हाऊ घालावे त्याप्रमाणे अश्रुबिंदूनी पतीच्या मुख कमळास न्हाऊ घालीत रडू लागली. ॥१०॥
एवमार्ताः पतिं दृष्ट्‍वा रावणं निहतं भुवि ।
चुक्रुशुर्बहुधा शोकाद् भूयस्ताः पर्यदेवयन् ।। ११ ।।
याप्रकारे आपले पतिदेव रावण यास मरून जमिनीवर पडलेले पाहून त्या सर्वच्या सर्व आर्तभावाने त्यास हाका मारू लागल्या आणि शोकामुळे नाना प्रकारांनी विलाप करू लागल्या. ॥११॥
येन वित्रासितः शक्रो येन वित्रासितो यमः ।
येन वैश्रवणो राजा पुष्पकेण वियोजितः ।। १२ ।।

गन्धर्वाणां ऋषीणां च सुराणां च महात्मनाम् ।
भयं येन रणेदत्तं सोऽयं शेते रणे हतः ।। १३ ।।
त्या म्हणाल्या, हाय ! ज्यांनी यमराज आणि इंद्रालाही भयभीत करून ठेवले होते, राजाधिराज कुबेराचे पुष्पक विमान हिरावून घेतले होते तसेच गंधर्व, ऋषि आणि महामनस्वी देवतांनाही रणभूमीमध्ये भय प्रदान केले होते तेच आमचे प्राणनाथ आज या समरांगणात मारले जाऊन कायमचे झोपी गेले आहेत. ॥१२-१३॥
असुरेभ्यः सुरेभ्यो वा पन्नगेभ्योऽपि वा तथा ।
न भयं यो विजानाति तस्येदं मानुषाद् भयम् ।। १४ ।।
हाय ! जे असुर, देवता आणि नागांच्यामुळेही भयभीत होणे जाणत नव्हते, त्यांनाच आज मनुष्याकडून हे भय प्राप्त झाले आहे. ॥१४॥
अवध्यो देवतानां यः तथा दानवरक्षसाम् ।
हतः सोऽयं रणे शेते मानुषेण पदातिना ।। १५ ।।
ज्यांना देवता, दानव आणि राक्षसही मारू शकत नव्हते तेच आज एका अनवाणी मनुष्याच्या हाताने मारले जाऊन रणभूमीमध्ये झोपी गेले आहेत. ॥१५॥
यो न शक्यः सुरैर्हन्तुं न यक्षैर्नासुरैस्तथा ।
सोऽयं कश्चिदिवासत्त्वो मृत्युं मर्त्येन लम्भितः ।। १६ ।।
जे देवता, असुर तसेच यक्षांसाठीही अवध्य होते तेच एखाद्या निर्बल प्राण्याप्रमाणे एका मनुष्याच्या हाताने मृत्युला प्राप्त झाले. ॥१६॥
एवं वदन्त्यो बहुधा रुरुदुः तस्य ता दुःखिताः स्त्रियः ।
भूय एव च दुःखार्ता विलेपुश्च पुनःपुनः ।। १७ ।।
याप्रकारे बोलत रावणाच्या त्या दुःखी स्त्रिया तेथे स्फुंदून स्फुंदून रडू लागल्या तसेच दुःखाने आतुर होऊन पुनः पुनः वारंवार विलाप करू लागल्या. ॥१७॥
अशृण्वता च सुहृदां सततं हितवादिनाम् ।
मरणायाहृता सीता राक्षसाश्च निपातिताः ।
एताः सममिदानीं ते वयमात्मा च पातिताः ।। १८ ।।
त्या म्हणाल्या, प्राणनाथ ! आपण सदा हिताची गोष्ट सांगणार्‍या सुहृदांचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि आपल्या मृत्युसाठी सीतेचे अपहरण केलेत. याचे फळ हे मिळाले की राक्षस मारले गेले आणि आपण या समयी आपल्या स्वतःला रणभूमीत आणि आम्हांला महान्‌ दुःखसागरात पाडले आहे. ॥१८॥
ब्रुवाणोऽपि हितं वाक्यं इष्टो भ्राता विभीषणः ।
दृष्टं परुषितो मोहात् त्वयाऽऽत्मवधकाङ्‌क्षिणा ।। १९ ।।
आपले प्रिय भाऊ विभीषण आपल्या हिताची गोष्ट सांगत होते तरीही आपण आपल्या वधासाठी त्यांना मोहवश कटु वचन ऐकविले. त्याचेच हे फळ प्रत्यक्ष दिसून आले आहे. ॥१९॥
यदि निर्यातिता ते स्यात् सीता रामाय मैथिली ।
न नः स्याद् व्यसनं घोरं इदं मूलहरं महत् ।। २० ।।
जर आपण मैथिलीला रामांकडे परत धाडले असते तर मूळासहित आपला विनाश करणारे हे महाघोर संकट आमच्यावर आले नसते. ॥२०॥
वृत्तकामो भवेद् भ्राता रामो मित्रकुलं भवेत् ।
वयं चाविधवाः सर्वाः सकामा न च शत्रवः ।। २१ ।।
सीतेला परत केल्यावर आपले भाऊ विभीषण यांचेही मनोरथ सफल झाले असते, श्रीराम आमच्या मित्रपक्षात आले असते, आम्हा सर्वांना विधवा व्हावे लागले नसते आणि आमच्या शत्रूंची कामना पूरी झाली नसती. ॥२१॥
त्वया पुनर्नृशंसेन सीतां संरुन्धता बलात् ।
राक्षसा वयमात्मा च त्रयं तुल्यं निपातितम् ।। २२ ।।
परंतु आपण असे निष्ठुर निघालात की सीतेला बलपूर्वक कैद करून ठेवलेत तसेच राक्षसांना, आम्हा स्त्रियांना आणि आपण आपल्यालाच - तिघांना एकदमच खाली पाडून टाकलेत- विपत्तित पाडलेत. ॥२२॥
न कामकारः कामं वा तव राक्षसपुङ्‌गव ।
दैवं चेष्टयते सर्वं हतं दैवेन हन्यते ।। २३ ।।
राक्षसशिरोमणी ! आपला स्वेच्छाचारच आमच्या विनाशास कारण झाला अशी गोष्ट नाही आहे. दैवच सर्व काही करवीत आहे. दैवाने मारला गेलेलाच मारला जातो अथवा मरतो. ॥२३॥
वानराणां विनाशोऽयं राक्षसानां च ते रणे ।
तव चैव महाबाहो दैवयोगादुपागतः ।। २४ ।।
महाबाहो ! या युद्धात वानरांचा, राक्षसांचा आणि आपलाही विनाश दैवयोगानेच झाला आहे. ॥२४॥
नैवार्थेन च कामेन विक्रमेण न चाज्ञया ।
शक्या दैवगतिर्लोके निवर्तयितुमुद्यता ।। २५ ।।
संसारात फळ देण्यासाठी उन्मुख झालेल्या दैवाच्या विधानाला कुणीही धनाने, कामनेने, पराक्रमाने, आज्ञेने अथवा शक्तिने पालटू शकत नाही. ॥२५॥
विलेपुरेवं दीनास्ता राक्षसाधिपयोषितः ।
कुरर्य इव दुःखार्ता बाष्पपर्याकुलेक्षणाः ।। २६ ।।
याप्रकारे राक्षसराजाच्या सर्व स्त्रिया दुःखाने पीडित होऊन डोळ्यात अश्रु आणून दीनभावाने कुररीप्रमाणे विलाप करू लागल्या. ॥२६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे दशाधिकशततमः सर्गः ।। ११० ।।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेदहावा सर्ग पूरा झाला. ॥११०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP