श्रीरामेण कुपितं सौमित्रिं परिसान्त्व्य भरतसद्भावस्य वर्णनम्, लज्जितस्य लक्ष्मणस्य श्रीरामपार्श्वे गमनम्, तस्य शैलस्य समन्ताद् भरतसैन्यस्य निवेशनम् -
|
श्रीरामांनी लक्ष्मणाचा रोष शांत करून भरताच्या सद्भावाचे वर्णन करणे, लक्ष्मणांचे लज्जित होऊन श्रीरामांजवळ उभे राहणे आणि भरताच्या सेनेने पर्वताच्या पायथ्याशी छावणी ठोकणे -
|
सुसंरब्धं तु भरतं लक्ष्मणं क्रोधमूर्च्छितम् ।
रामस्तु परिसान्त्व्याथ वचनं चेदमब्रवीत् ॥ १ ॥
|
लक्ष्मण भरतांच्या प्रति रोषावेशामुळे क्रोधास वश होऊन आपला विवेक गमावून बसले होते, त्या अवस्थेत श्रीरामांनी त्यांना समजावून शांत केले आणि या प्रकारे म्हटले - ॥ १ ॥
|
किमत्र धनुषा कार्यमसिना वा सचर्मणा ।
महाबले महोत्साहे भरते स्वयमागते ॥ २ ॥
|
लक्ष्मणा ! महाबली आणि महान् उत्साही भरत जर स्वतः येथे आले आहेत तर यासमयी धनुष्य अथवा ढाल-तलवारीचे काय काम आहे ? ॥ २ ॥
|
पितुः सत्यं प्रतिश्रुत्य हत्वा भरतमाहवे ।
किं करिष्यामि राज्येन सापवादेन लक्ष्मण ॥ ३ ॥
|
’लक्ष्मणा पित्याच्या सत्याच्या रक्षणाची प्रतिज्ञा करून जर मी युद्धात भरताला मारून त्याचे राज्य हिरावून घेईन तर जगात माझी किती निंदा होईल आणि मग या कलंकित राज्याला घेऊन मी काय करूं ? ॥ ३ ॥
|
यद् द्रव्यं बान्धवानां वा मित्राणां वा क्षये भवेत् ।
नाहं तत् प्रतिगृह्णीयां भक्ष्यान् विषकृतानिव ॥ ४ ॥
|
’आपल्या बंधु-बांधवांचा अथवा मित्रांचा विनाश करून ज्या धनाची प्राप्ती होते ती तर विषमिश्रित भोजनाप्रमाणे सर्वथा त्याग करण्यायोग्यच आहे. त्याला मी कदापि ग्रहण करणार नाही. ॥ ४ ॥
|
धर्ममर्थं च कामं च पृथिवीं चापि लक्ष्मण ।
इच्छामि भवतामर्थे एतत् प्रतिशृणोमि ते ॥ ५ ॥
|
’लक्ष्मणा ! मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो आहे की धर्म, अर्थ काम आणि पृथ्वीचे राज्यही मी तुम्हा लोकांसाठीच इच्छितो. ॥ ५ ॥
|
भ्रातॄणां सङ्ग्रहार्थं च सुखार्थं चापि लक्ष्मण ।
राज्यमप्यहमिच्छामि सत्येनायुधमालभे ॥ ६ ॥
|
’लक्ष्मणा ! मी भावांच्या संग्रहासाठी आणि सुखासाठीच राज्याचीही इच्छा करतो आणि ही गोष्ट सत्य आहे यासाठी मी आपल्या धनुष्याला स्पर्श करून शपथ घेत आहे. ॥ ६ ॥
|
नेयं मम मही सौम्य दुर्लभा सागराम्बरा ।
नहीच्छेयमधर्मेण शक्रत्वमपि लक्ष्मण ॥ ७ ॥
|
’सौम्य लक्ष्मणा ! समुद्रांनी घेरलेली ही पृथ्वी माझ्यासाठी दुर्लभ नाही, परंतु मी अधर्माने इंद्राचे पद मिळविण्याचीही इच्छा करू शकत नाही. ॥ ७ ॥
|
यद् विना भरतं त्वां च शत्रुघ्नं वापि मानद ।
भवेन्मम सुखं किञ्चिद् भस्म तत् कुरुतां शिखी ॥ ८ ॥
|
मानद ! भरताला, तुला, शत्रुघ्नाला सोडून जर मला काही सुख मिळत असेल तर त्याला अग्निदेव जाळून भस्म करून टाको. ॥ ८ ॥
|
मन्येऽहमागतोऽयोध्यां भरतो भ्रातृवत्सलः ।
मम प्राणैः प्रियतरः कुलधर्ममनुस्मरन् ॥ ९ ॥
श्रुत्वा प्रव्राजितं मां हि जटावल्कलधारिणम् ।
जानक्या सहितं वीर त्वया च पुरुषर्षभ ॥ १० ॥
स्नेहेनाक्रान्तहृदयः शोकेनाकुलितेन्द्रियः ।
द्रष्टुमभ्यागतो ह्येष भरतो नान्यथाऽऽगतः ॥ ११ ॥
|
’वीर ! पुरुषप्रवर ! भरत मोठे भातृभक्त आहेत. ते मला प्राणांपेक्षा अधिक प्रिय आहेत. मला तर असे वाटत आहे की भरताने अयोध्येस आल्यावर जेव्हां ऐकले की मी तुझ्यासह आणि जानकीसह जटा-वल्कले धारण करून वनात आलो आहे, तेव्हां त्यांची इंद्रिये शोकाने व्याकुळ होऊन गेली असावी आणि ते कुलधर्माचा विचार करून स्नेहयुक्त हृदयाने आम्हाला भेटण्यासाठी आले आहेत. या भरतांच्या आगमनाचा याशिवाय दुसरा कुठलाही उद्देश असूच शकत नाही. ॥ ९-११ ॥
|
अम्बां च कैकयीं रुष्य भरतश्चाप्रियं वदन् ।
प्रसाद्य पितरं श्रीमान् राज्यं मे दातुमागतः ॥ १२ ॥
|
’माता कैकेयीवर कुपित होऊन, तिला कठोर वचने ऐकवून आणि पित्याला प्रसन्न करून श्रीमान् भरत मला राज्य देण्यासाठी आले आहेत. ॥ १२ ॥
|
प्राप्तकालं यथैषोऽस्मान् भरतो द्रष्टुमर्हति ।
अस्मासु मनसाप्येष नाप्रियं किञ्चिदाचरेत् ॥ १३ ॥
|
’भरताचे आम्हाला भेटण्यासाठी येणे सर्वथा समयोचित आहे. ते आम्हाला भेटण्यासाठीच योग्य आहेत. लोकांचे काही अहित करण्याचा विचार तर ते कधी मनांतही आणू शकत नाहीत. ॥ १३ ॥
|
विप्रियं कृतपूर्वं ते भरतेन कदा नु किम् ।
ईदृशं वा भयं तेऽद्य भरतं यद् विशङ्कसे ॥ १४ ॥
|
’भरतांनी तुमच्या प्रति पूर्वी केव्हा आणि कोणते अप्रिय आचरण केले आहे की ज्यामुळे आज तुम्हाला त्यांच्यापासून भय वाटत आहे आणि तुम्ही त्याच्याविषयी या तर्हेची आशंका करीत आहात ? ॥ १४ ॥
|
नहि ते निष्ठुरं वाच्यो भरतो नाप्रियं वचः ।
अहं ह्यप्रियमुक्तः स्यां भरतस्याप्रिये कृते ॥ १५ ॥
|
’भरत् आल्यावर तू त्याला काही कठोर वा अप्रिय वचन बोलू नको. जर तू त्याच्याशी काही प्रतिकूल गोष्ट बोललास तर ती माझ्याच प्रति बोललास असे समजले जाईल. ॥ १५ ॥
|
कथं नु पुत्राः पितरं हन्युः कस्यांचिदापदि ।
भ्राता वा भ्रातरं हन्यात् सौमित्रे प्राणमात्मनः ॥ १६ ॥
|
’सौमित्र ! कितीही मोठी आपत्ती आली तरी पुत्र आपल्या पित्याला मारू शकेल काय ? अथवा भाऊ आपल्या प्राणांसारख्या प्रिय भावाची हत्या कशी करू शकेल ? ॥ १६ ॥
|
यदि राज्यस्य हेतोस्त्वमिमां वाचं प्रभाषसे ।
वक्ष्यामि भरतं दृष्ट्वा राज्यमस्मै प्रदीयताम् ॥ १७ ॥
|
’जर तू राज्यासाठी अशी कठोर वचने बोलत असशील तर मी भरत भेटल्यावर त्यांना सांगेन की हे राज्य लक्ष्मणाला दे. ॥ १७ ॥
|
उच्यमानो हि भरतो मया लक्ष्मण तद्वचः ।
राज्यमस्मै प्रयच्छेति बाढमित्येव मंस्यते ॥ १८ ॥
|
’लक्ष्मणा ! जर मी भरतांना सांगितले की, "तुम्ही राज्य यांना देऊन टाका" तर ते "फार चांगले" असे म्हणून अवश्य माझे म्हणणे मान्य करतील. ॥ १८ ॥
|
तथोक्तो धर्मशीलेन भ्रात्रा तस्य हिते रतः।
लक्ष्मणः प्रविवेशेव स्वानि गात्राणि लज्जया ॥ १९ ॥
|
आपल्या धर्मपरायण भावाने असे म्हटल्यावर त्यांच्याच हितात तत्पर राहणार्या लक्ष्मणांनी लाजेने जणु आपले अंगच चोरून घेतले. ते लज्जेने चूर चूर झाले. ॥ १९ ॥
|
तद्वाक्यं लक्ष्मणः श्रुत्वा व्रीडितः प्रत्युवाच ह ।
त्वां मन्ये द्रष्टुमायातः पिता दशरथः स्वयम् ॥ २० ॥
|
श्रीरामांचे पूर्वोक्त वचन ऐकून लज्जित झालेल्या लक्ष्मणाने म्हटले - "भाऊ ! मला वाटते आमचे पिता महाराज दशरथ स्वतःच आपल्याला भेटायला आहे आहेत". ॥ २० ॥
|
व्रीडितं लक्ष्मणं दृष्ट्वा राघवः प्रत्युवाच ह ।
एष मन्ये महाबाहुरिहास्मान् द्रष्टुमागतः ॥ २१ ॥
|
लक्ष्मणाला असे लज्जित झालेला आहून श्रीरामांनी उत्तर दिले - "मीही असेच मानतो आहे की आमचे महाबाहु पिताच आम्हाला भेटण्यासाठी आले आहेत." ॥ २१ ॥
|
अथवा नौ ध्रुवं मन्ये मन्यमानः सुखोचितौ ।
वनवासमनुध्याय गृहाय प्रतिनेष्यति ॥ २२ ॥
|
’अथवा मी असे समजतो की आम्हाला सुख भोगण्यास योग्य मानून पिताश्री वनवासाच्या कष्टाचा विचार करून आम्हां दोघांना निश्चितच परत घरी घेऊन जातील. ॥ २२ ॥
|
इमां चाप्येष वैदेहीमत्यंतसुखसेविनीम् ।
पिता मे राघवः श्रीमान् वनादादाय यास्यति ॥ २३ ॥
|
’माझे पिता रघुकुलतिलक श्रीमान् दशरथ महाराज अत्यंत सुखाचे सेवन करणार्या या वैदेही सीतेलाही वनातून आपल्या बरोबर घेऊनच घरी परत जातील. ॥ २३ ॥
|
एतौ तौ सम्प्रकाशेते गोत्रवन्तौ मनोरमौ ।
वायुवेगसमौ वीरौ जवनौ तुरगोत्तमौ ॥ २४ ॥
|
’उत्तम घोड्यांच्या कुळात उत्पन्न झालेले तेच हे दोन्ही वायुसारखा वेग असणारे, शीघ्रगामी, वीर आणि मनोरम आपले उत्तम घोडे चमकत आहेत. ॥ २४ ॥
|
स एष सुमहाकायः कम्पते वाहिनीमुखे ।
नागः शत्रुंजयो नाम वृद्धस्तातस्य धीमतः ॥ २५ ॥
|
’परम बुद्धिमान पित्याच्या स्वारीत राहणारा हाच तो विशालकाय शत्रुंजय नामक वृद्ध गजराज आहे, जो सेनेच्या अग्रभागी डुलत डुलत चालत येत आहे. ॥ २५ ॥
|
न तु पश्यामि तच्छत्रं पाण्डुरं लोकविश्रुतम् ।
पितुर्दिव्यं महाबाहो संशयो भवतीह मे ॥ २६ ॥
|
’महाभाग ! परंतु त्याच्यावर पित्याचे ते विश्वविख्यात दिव्य श्वेत छत्र मला दिसून येत नाही, त्यामुळे माझ्या मनात संशय उत्पन्न होत आहे. ॥ २६ ॥
|
वृक्षाग्रादवरोह त्वं कुरु लक्ष्मण मद्वचः ।
इतीव रामो धर्मात्मा सौमित्रिं तमुवाच ह ॥ २७ ॥
अवतीर्य तु सालाग्रात् तस्मात् स समितिञ्जयः ।
लक्ष्मणः प्राञ्जलिर्भूत्वा तस्थौ रामस्य पार्श्वतः ॥ २८ ॥
|
’लक्ष्मणा ! आता माझे ऐक आणि झाडावरून खाली उतरून ये’. धर्मात्मा श्रीरामांनी सौमित्रास जेव्हां असे सांगितले तेव्हां युद्धात विजय मिळविणारे लक्ष्मण त्या शालवृक्षाच्या अग्रभागापासून उतरले आणि श्रीरामांजवळ हात जोडून उभे राहिले. ॥ २७-२८ ॥
|
भरतेनाथ संदिष्टा सम्मर्दो न भवेदिति ।
समन्तात् तस्य शैलस्य सेना वासमकल्पयत् ॥ २९ ॥
|
तिकडे भरतांनी सेनेला आज्ञा दिली की ’येथे कोणालाही आम्हा लोकांपासून बाधा पोहोंचता कामा नये’. त्यांचा हा आदेश मिळताच समस्त सैनिक पर्वताच्या चोहोबाजूस पायथ्यापाशीच उतरले. ॥ २९ ॥
|
अध्यर्धमिक्ष्वाकुचमूर्योजनं पर्वतस्य ह ।
पार्श्वे न्यविशदावृत्य गजवाजिनराकुला ॥ ३० ॥
|
त्यासमयी हत्ती, घोडे आणि मनुष्यांनी भरलेली इक्ष्वाकु वंशीय नरेशाची ती सेना पर्वताच्या आसपासच्या दीड योजने (सहा कोस) भूमिला घेरून छावणी ठोकून राहिली होती. ॥ ३० ॥
|
सा चित्रकूटे भरतेन सेना
धर्मं पुरस्कृत्य विधूय दर्पम् ।
प्रसादनार्थं रघुनन्दनस्य
विराजते नीतिमता प्रणीता ॥ ३१ ॥
|
नीतिज्ञ भरत धर्माला समोर ठेऊन गर्वाचा त्याग करून रघुनंदन श्रीरामांना प्रसन्न करण्यासाठी, जिला ते आपल्या बरोबर घेऊन आले होते ती सेना चित्रकूट पर्वताच्या समीप फारच शोभून दिसत होती. ॥ ३१ ॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे सप्तनवतितमः सर्गः ॥ ९७ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा सत्त्याण्णवावा सर्ग पूरा झाला ॥ ९७ ॥
|