श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ अष्टात्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सलक्ष्मणेन सुग्रीवेण श्रीरामपार्श्वमागम्य तत्पादयोः प्रणमनं, श्रीरामेण तस्याश्वासनं, सुग्रीवेण स्वकृतसैन्य संग्रहोद्योगस्य कथनं, तदाकर्ण्य श्रीरामस्य संतोषश्च - लक्ष्मणांसहित सुग्रीवांनी भगवान् श्रीरामांजवळ येऊन त्यांच्या चरणी प्रणाम करणे, श्रीरामांनी त्यांना समजाविणे, सुग्रीवांनी आपण केलेल्या सैन्यसंग्रहा विषयीच्या प्रयत्‍नांबद्दल सांगणे आणि ते ऐकून श्रीरामांचे प्रसन्न होणे -
प्रतिहृह्य च तत् सर्वं उपायनमुपाहृतम् ।
वानरान् सांत्वयित्वा च सर्वानेव व्यसर्जयत् ॥ १ ॥
त्यांनी आणलेल्या त्या समस्त उपहारांना ग्रहण करून सुग्रीवांनी संपूर्ण वानरांना मधुर वचनांच्या द्वारा सांत्वना दिली. नंतर सर्वांना निरोप दिला. ॥१॥
विसर्जयित्वा स हरीन् सहस्रान् कृतकर्मणः ।
मेने कृतार्थमात्मानं राघवं च महाबलम् ॥ २ ॥
कार्य पूर्ण करून परत आलेल्या त्या हजारो वानरांना निरोप देऊन सुग्रीवांनी आपणा स्वतःला कृतार्थ मानले आणि महाबली राघवांचे कार्य सिद्धच झाले आहे असे मानले. ॥२॥
स लक्ष्मणो भीमबलं सर्ववानरसत्तमम् ।
अब्रवीत् प्रश्रितं वाक्यं सुग्रीवं संप्रहर्षयन् ॥ ३ ॥
तत्पश्चात् लक्ष्मण समस्त वानरांमध्ये श्रेष्ठ भयंकर बलशाली सुग्रीवांचा हर्ष वाढवीत त्यांना हे विनीत वचन बोलले- ॥३॥
किष्किंधाया विनिष्क्राम यदि ते सौम्य रोचते ।
तस्य तद्वचनं श्रुत्वा लक्ष्मणस्य सुभाषितम् ॥ ४ ॥

सुग्रीवः परमप्रीतो वाक्यमेतदुवाच ह ।
’सौम्य ! जर तुमची रूचि असेल तर आता किष्किंधेतून बाहेर पडा. लक्ष्मणांचे हे सुंदर वचन ऐकून सुग्रीव अत्यंत प्रसन्न झाले आणि याप्रकारे बोलले- ॥४ १/२॥
एवं भवतु गच्छामः स्थेयं त्वच्छासने मया ॥ ५ ॥

तमेवमुक्त्वा सुग्रीवो लक्ष्मणं शुभलक्षणम् ।
विसर्जयामास तदा ताराद्याश्चैव योषितः ॥ ६ ॥
’ठीक आहे ! असेच होवो. चलावे जाऊ या. मला तर आपल्या आज्ञेचे पालन करावयाचे आहे. शुभ लक्षणांनी युक्त लक्ष्मणांना असे म्हणून सुग्रीवांनी तारा आदि सर्व स्त्रियांना तात्काळ निरोप दिला. ॥५-६॥
एहीत्युच्चैर्हरिवरान् सुग्रीवः समुदाहरत् ।
तस्य तद् वचनं श्रुत्वा हरयः शीघ्रमाययुः ॥ ७ ॥

बद्धाञ्जलिपुटाः सर्वे ये स्युः स्त्रीदर्शनक्षमाः ।
 यानंतर सुग्रीवांनी शेष वानरांना ’या, या’ म्हणून उच्चस्वरांत हाका मारून बोलावले. त्यांच्या त्या हाका ऐकून सर्व वानर, जे अंतःपुरांतील स्त्रियांना पहाण्यास अधिकारी होते, दोन्ही हात जोडून शीघ्रतापूर्वक त्यांच्या जवळ आले. ॥७ १/२॥
तानुवाच ततः प्राप्तान् राजार्कसदृशप्रभः ॥ ८ ॥

उपस्थापयत क्षिप्रं शिबिकां मम वानराः ।
जवळ आलेल्या त्या वानरांना सूर्यतुल्य तेजस्वी राजा सुग्रीवांनी म्हटले- ’वानरांनो, तुम्ही लोक तात्काळ जाऊन माझी शिबिका येथे घेऊन या.’ ॥८ १/२॥
श्रुत्वा तु वचनं तस्य हरयः शीघ्रविक्रमाः ॥ ९ ॥

समुपस्थापयामासुः शिबिकां प्रियदर्शनाम् ।
त्यांचे बोलणे ऐकून शीघ्रगामी वानरांनी एक सुंदर शिबिका (पालखी) तेथे उपस्थित केली. ॥९ १/२॥
तामुपस्थापितां दृष्ट्‍वा शिबिकां वानराधिपः ॥ १० ॥

लक्ष्मणारुह्यातां शीघ्रं इति सौमित्रिमब्रवीत् ।
पालखी तेथे उपस्थित झालेली पाहून वानरराज सुग्रीवांनी सौमित्रास म्हटले- ’कुमार लक्ष्मण ! आपण शीघ्र हिच्यावर आरूढ व्हावे.’ ॥१० १/२॥
इत्युक्त्वा काञ्चनं यानं सुग्रीवः सूर्यसंनिभम् ॥ ११ ॥

बहुभिर्हरिभिर्युक्तं आरुरोह सलक्ष्मणः ।
असे म्हणून लक्ष्मणसहित सुग्रीव त्या सूर्यासारखी प्रभा असलेल्या सुवर्णमय पालखीत चढले, जिला वाहून नेण्यास बरेचसे वानर लागले होते. ॥११ १/२॥
पाण्डुरेणातपत्रेण ध्रियमाणेन मूर्धनि ॥ १२ ॥

शुक्लैश्च वालव्यजनैः धूयमानैः समंततः ।
शङ्‌खलभेरीनिनादैश्च हरिभिश्चाभिनंदितः ॥ १३ ॥

निर्ययौ प्राप्य सुग्रीवो राज्यश्रियमनुत्तमाम् ।
त्या समयी सुग्रीवावर श्वेत छत्र धरण्यात आले होते आणि सर्व बाजूने पांढर्‍या चवर्‍या ढाळल्या जात होत्या. शंख आणि भेरीच्या ध्वनी बरोबर बंदीजनांचे अभिनंदन ऐकत ऐकत राजा सुग्रीव परम उत्तम राजलक्ष्मीला प्राप्त करून किष्किंधापुरीतून बाहेर निघाले. ॥१२-१३ १/२॥
स वानरशतैस्तीक्ष्णैः बहुभिः शस्त्रपाणिभिः ॥ १४ ॥

परिकीर्णो ययौ तत्र यत्र रामो व्यवस्थितः ।
हातात शस्त्रे घेऊन तीक्ष्ण स्वभावाचे कित्येक शेकडो वानरांनी घेरलेले राजे सुग्रीव, जेथे भगवान् श्रीराम निवास करीत होते तेथे गेले. ॥१४ १/२॥
स तं देशमनुप्राप्य श्रेष्ठं रामनिषेवितम् ॥ १५ ॥

अवातरन्महातेजाः शिबिकायाः सलक्ष्मणः ।
आसाद्य च ततो रामं कृताञ्जलिपुटोऽभवत् ॥ १६ ॥
श्रीरामचंद्रांनी सेवित त्या श्रेष्ठ स्थानी पोहोचल्यावर लक्ष्मणांसहित महातेजस्वी सुग्रीव पालखीतून उतरले आणि श्रीरामांच्या जवळ जाऊन हात जोडून उभे राहिले. ॥१५-१६॥
कृताञ्जलौ स्थिते तस्मिन् वानराश्चाभवंस्तथा ।
तटाकमिव तद् दृष्ट्‍वा रामः कुड्मलपङ्‌कमजम् ॥ १७ ॥

वानराणां महत् सैन्यं सुग्रीवे प्रीतिमानभूत् ।
वानरराजा हात जोडून उभे राहिल्यावर त्यांचे अनुयायी वानरही त्यांच्या प्रमाणेच अंजली जोडून उभे राहिले. मुकुलित कमळांनी भरलेल्या विशाल सरोवराप्रमाणे वानरांची ती फारच मोठी सेना पाहून श्रीराम सुग्रीवांवर फारच प्रसन्न झाले. ॥१७ १/२॥
पादयोः पतितं मूर्ध्ना तमुत्थाप्य हरीश्वरम् ॥ १८ ॥

प्रेम्णा च बहुमानाच्च राघवः परिषस्वजे ।
श्रीरामांनी त्यांच्या चरणी मस्तक ठेवलेल्या वानरराजास हात धरून उठविले आणि मोठ्या आदराने व प्रेमाने त्यांना आपल्या हृदयाशी धरले. ॥ १८ १/२ ॥
परिष्वज्य च धर्मात्मा निषीदेति ततोऽब्रवीत् ॥ १९ ॥

तं निषण्णं ततो दृष्ट्‍वा क्षितौ रामोऽब्रवीत् ततः ।
धर्मात्मा श्रीरामांनी त्यांना हृदयाशी धरुन म्हटले- ’बसा.’ त्यांना पृथ्वीवर बसलेले पाहून श्रीराम म्हणाले- ॥१९ १/२॥
धर्ममर्थं च कामं च यस्तु काले निषेवते ॥ २० ॥

विभज्य सततं वीर स राजा हरिसत्तम ।
हित्वा धर्मं तथार्थं च कामं यस्तु निषेवते ॥ २१ ॥
स वृक्षाग्रे यथा सुप्तः पतितः प्रतिबुध्यते ।
’वीरा ! वानर शिरोमणी ! जो धर्म, अर्थ आणि कामाच्या साठी समयाचे विभाग करून सदा उचित समयावर त्यांचे (न्याययुक्त) सेवन करतो, तोच श्रेष्ठ राजा आहे. परंतु जो धर्म-अर्थाचा त्याग करून केवळ कामाचेच सेवन करतो तो वृक्षाच्या अग्रभागी असलेल्या शाखेवर झोपलेल्या मनुष्याप्रमाणे आहे. पडल्यानंतरच त्याचे डोळे उघडतात. ॥२०-२१ १/२॥
अमित्राणां वधे युक्तो मित्राणां संग्रहे रतः ॥ २२ ॥

त्रिवर्गफलभोक्ता च राजा धर्मेण युज्यते ।
’जो राजा शत्रूंचा वध आणि मित्रांच्या संग्रहामध्ये संलग्न राहून योग्य समयी धर्म, अर्थ आणि कामाचे (न्याययुक्त) सेवन करतो, तो धर्माच्या फलाचा भागी होतो. ॥२२ १/२॥
उद्योगसमयस्त्वेष प्राप्तः शत्रुनिषूदन ॥ २३ ॥

सञ्चिंत्यतां हि पिङ्‌गेटश हरिभिः सह मंत्रिभिः ।
’शत्रूसदना ! हा आपणा लोकांसाठी उद्योगाचा समय आलेला आहे. वानर राजा ! तू या विषयासंबंधी या वानरांबरोबर आणि मंत्र्यांच्या बरोबर विचार कर.’ ॥२३ १/२॥
एवमुक्तस्तु सुग्रीवो रामं वचनमब्रवीत् ॥ २४ ॥

प्रनष्टा श्रीश्च कीर्तिश्च कपिराज्यं च शाश्वतम् ।
त्वत् प्रसादान् महाबाहो पुनः प्राप्तमिदं मया ॥ २५ ॥
श्रीरामांनी असे सांगितल्यावर सुग्रीवांनी त्यांना म्हटले- ’महाबाहो ! माझी श्री, कीर्ति, तसेच सदा चालत आलेले वानरांचे राज्य - हे सर्व नष्ट झाले होते. आपल्या कृपेनेच मला पुन्हा या सर्वांची प्राप्ती झाली आहे. ॥२४-२५॥
तव देव प्रसादाच्च भ्रातुश्च जयतां वर ।
कृतं न प्रतिकुर्याद् यः पुरुषाणां स दूषकः ॥ २६ ॥
’विजयी वीरांमध्ये श्रेष्ठ देवा ! आपण आणि आपले भाऊ यांच्या कृपेनेच मी वानर-राज्यावर पुन्हा प्रतिष्ठित झालो आहे. जो केलेल्या उपकाराची परतफेड करीत नाही तो पुरुषांमध्ये धर्माला कलंकित करणारा मानला जात असतो. ॥२६॥
एते वानरमुख्याश्च शतशः शत्रुसूदन ।
प्राप्ताश्चादाय बलिनः पृथिव्यां सर्ववानरान् ॥ २७ ॥
’शत्रुसूदन ! हे शेकडो बलवान् आणि मुख्य वानर भूमंडलावरील सर्व बलशाली वानरांना बरोबर घेऊन येथे आले आहेत. ॥२७॥
ऋक्षाश्च वानराः शूरा गोलाङ्‌गू लाश्च राघव ।
कांतारवनदुर्गाणां अभिज्ञा घोरदर्शनाः ॥ २८ ॥
’रघुनदंन ! यात रीस(अस्वले) आहेत, वानर आहेत, आणि शौर्यसंपन्न गोलाङ्‌गूल (लंगूर) ही आहेत. हे सर्वच्या सर्व दिसण्यात फार भयंकर आहेत आणि घनदाट वने आणि दुर्गम स्थानांचे जाणकार आहेत. ॥२८॥
देवगंधर्वपुत्राश्च वानराः कामरूपिणः ।
स्वैः स्वैः परिवृताः सैन्यैः वर्तंते पथि राघव ॥ २९ ॥
’रघुनाथ ! जे देवातांचे आणि गंधर्वांचे पुत्र आहेत आणि इच्छेनुसार रूप धारण करण्यात समर्थ आहेत, ते श्रेष्ठ वानर आपापल्या सेनांसह निघालेले आहेत आणि यासमयी मार्गात आहेत. ॥२९॥
शतैः शतसहस्रैश्च वर्तंते कोटिभिस्तथा ।
अयुतैश्चावृता वीराः शङ्‌कुतभिश्च परंतप ॥ ३० ॥
’शत्रुंना संताप देणार्‍या वीरा ! यांच्या पैकी कांहीच्या जवळ शंभर, कांहीच्या बरोबर लाख, कुणा बरोबर कोटी तर कुणा बरोबर अयुत (दहा हजार) आणि कुणा बरोबर एक शंकु वानर आहेत. ॥३०॥
अर्बुदैरर्बुदशतैः मध्यैश्चांतैश्च वानराः ।
समुद्राश्च परार्धाश्च हरयो हरियूथपाः ॥ ३१ ॥
’कित्येक वानर अर्बुद (दहा करोड), शंभर अर्बुद (दहा अब्ज), मध्य (दहा पद्म) तसेच अंत्य (एक पद्म) वानर सैनिकांच्या बरोबर येत आहेत. कित्येक तर वानरांची आणि वानर-यूथपतिंची संख्या समुद्र (दहा नील) तसेच परार्धा (शंखा) पर्यत पोहोचली आहे.(**) ॥३१॥
(**- येथे अर्बुद, शंकु, अंत्य आणि मध्य आदि संख्यावाचक शब्दांचा आधुनिक गणितानुसार प्रमाण समजण्यासाठी प्राचीन संज्ञांचे पूर्ण रूपाने उल्लेख केले जात आहेत. आणि कंसात त्याचे आधुनिक प्रमाण दिले जात आहे.- एक(एकाई), दश(दहाई), शत(शेकडा), सहस्त्र(हजार), अयुत(दहा हजार), लक्ष(लाख), कोटी (करोड), अर्बुद(दहा कोटी), अब्ज(अरब), खर्च(दहा अरब), निखर्व(खर्व), महापद्म (दहा खर्व), शंकु(नील), जलधि(दहा नील), अंत्य(पद्म), मध्य(दहा पद्म), परार्ध(शंख) - या संख्या बोधक संज्ञा उत्तरोत्तर दहापट मानल्या गेल्या आहेत.(नारद पुराणांतून))
आगमिष्यंति ते राजन् महेंद्रसमविक्रमाः ।
मेघपर्वतसंकाशा विंध्यमेरुकृतालयाः ॥ ३२ ॥
’राजन ! ते देवराज इंद्रासमान पराक्रमी तसेच मेघांप्रमाणे आणि पर्वतांप्रमाणे विशालकाय वानर, जे मेरू आणि विंध्याचलावर निवास करीत आहेत, येथे लवकरच उपस्थित होतील. ॥३२॥
ते त्वामभिगमिष्न्यंति राक्षसं योद्धुमाहवे ।
निहत्य रावणं सङ्‌ख्येृ ह्यानयिष्यंति मैथिलीम् ॥ ३३ ॥
’जे युद्धामध्ये रावणाचा वध करून मैथिली सीतेला लंकेतून आणून देतील ते महान् शक्तिशाली वानर संग्रामात त्या राक्षसाशी युद्ध करण्यासाठी अवश्य आपल्याजवळ येतील. ’॥३३॥
ततस्तमुद्योगमवेक्ष्य वीर्यवान्
हरिप्रवीरस्य निदेशवर्तिनः ।
बभूव हर्षाद् वसुधाधिपात्मजः
प्रबुद्धनीलोत्पलतुल्यदर्शनः ॥ ३४ ॥
हे ऐकून परम पराक्रमी राजकुमार श्रीराम आपल्या आज्ञेनुसार वागणार्‍या प्रमुख वीर सुग्रीवांचा हा सैन्यविषयक उद्योग पाहून फारच प्रसन्न झाले. त्यांचे नेत्र हर्षाने विकसित झाले आणि प्रफुल्ल नील कमलासमान दिसू लागले. ॥३४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे अष्टात्रिंशः सर्गः ॥ ३८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा अडतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP