अगस्त्येन रणे विजयलार्थमादित्यहृदयस्तोत्रपाठाय श्रीरामं प्रति सम्मतिदानम् - ।। [ आदित्यहृदयप्रारम्भः ]
|
अगत्स्य मुनीनी श्रीरामांच्या विजयासाठी आदित्य हृदय च्या पाठास सम्मति देणे -
|
ततो युद्धपरिश्रान्तं समरे चिन्तया स्थितम् । रावणं चाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितम् ।। १ ।।
दैवतैश्च समागम्य द्रष्टुमभ्यागतो रणम् । उपागम्याब्रवीद् रामं अगस्त्यो भगवान् तदा ।। २ ।।
|
तिकडे श्रीरामचंद्र युद्धाने थकून चिंता करीत रणभूमीमध्ये उभे होते. इतक्यातच रावणही युद्धासाठी त्यांच्या समोर उपस्थित झाला. हे पाहून भगवान् अगस्त्य मुनि, जे देवतांच्या बरोबर युद्ध पहाण्यासाठी आले होते, श्रीरामांजवळ येऊन म्हणाले- ॥१-२॥
|
राम राम महाबाहो शृणु गुह्यं सनातनम् । येन सर्वानरीन् वत्स समरे विजयिष्यसे ।। ३ ।।
|
सर्वांच्या हृदयात रमण करणार्या महाबाहो रामा ! हे सनातन गोपनीय स्तोत्र ऐक. वत्सा ! याच्या जपाने तू युद्धात आपल्या समस्त शत्रूंवर विजय प्राप्त करशील. ॥३॥
|
आदित्यहृदयं पुण्यं सर्वशत्रुविनाशनम् । जयावहं जपं नित्यं अक्षय्यं परमं शिवम् ।। ४ ।।
सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वपापप्रणाशनम् । चिन्ताशोकप्रशमनं आयुर्वर्धनमुत्तमम् ।। ५ ।।
|
या गोपनीय स्तोत्राचे नाम आहे आदित्य हृदय. हे परम पवित्र आणि संपूर्ण शत्रूंचा नाश करणारे आहे. याच्या जपाने सदा विजयाची प्राप्ती होत असते. हे नित्य अक्षय आणि परम कल्याणमय स्तोत्र आहे. संपूर्ण मंगलांचे ही मंगल आहे. याने सर्व पापांचा नाश होऊन जातो. हे चिंता आणि शोक मिटविणारे आणि आयुष्य वाढविण्याचे उत्तम साधन आहे. ॥४-५॥
|
रश्मिमन्तं समुद्यन्तं देवासुरनमस्कृतम् । पूजयस्व विवस्वन्तं भास्करं भुवनेश्वरम् ।। ६ ।।
|
भगवान् सूर्य आपल्या अनंत किरणांनी सुशोभित आहेत. ते नित्य उदय पावणारे, देवता आणि असुरांच्या द्वारा नमस्कृत, विवस्वान् नावाने प्रसिद्ध, प्रभेचा विस्तार करणारे (भास्कर) आणि संसाराचे स्वामी (भुवनेश्वर) आहेत. तू यांचे (रश्मिमते नमः, समुद्यते नमः, देवासुर नमस्कृताय नमः, विवस्वते नमः, भास्कराय नमः, भुवनेश्वराय नमः) - या नाममंत्रांच्याद्वारे पूजन कर. ॥६॥
|
सर्वदेवात्मको ह्येष तेजस्वी रश्मिभावनः । एष देवासुरगणान् लोकान् पाति गभस्तिभिः ।। ७ ।।
एष ब्रह्मा च विष्णुश्च शिवः स्कन्दः प्रजापतिः । महेन्द्रो धनदः कालो यमः सोमो ह्यपां पतिः ।। ८ ।।
पितरो वसवः साध्या ह्यश्विनौ मरुतो मनुः । वायुर्वह्निः प्रजाः प्राण ऋतुकर्ता प्रभाकरः ।। ९ ।।
|
संपूर्ण देवता यांचेच स्वरूप आहेत. हे तेजाची राशी तसेच आपल्या किरणांनी जगताला सत्ता आणि स्फूर्ति प्रदान करणारे आहेत. हेच ब्रह्मा, विष्णु, शिव, स्कंद, प्रजापति, इंद्र, कुबेर, काल, यम, चंद्रमा, वरूण, पितर, वसु, साध्य, अश्विनीकुमार, मरूद्गण, मनु, वायु, अग्नि, प्रजा, प्राण ऋतूंना प्रकट करणारे तसेच प्रभेचे पुञ्ज आहेत. ॥७-९॥
|
आदित्यः सविता सूर्यः खगः पूषा गभस्तिमान् । सुवर्णसदृशो भानुः हिरण्यरेता दिवाकरः ।। १० ।।
हरिदश्वः सहस्रार्चिः सप्तसप्तिर्मरीचिमान् । तिमिरोन्मथनः शम्भुः त्वष्टा मार्तण्डकोंऽशुमान् ।। ११ ।।
हिरण्यगर्भः शिशिरः तपनोऽहस्करो रविः । अग्निगर्भोऽदितेः पुत्रः शङ्खः शिशिरनाशनः ।। १२ ।।
व्योमनाथस्तमोभेदी ऋग्यजुस्सामपारगः । घनवृष्टिरपां मित्रो विन्ध्यवीथीप्लवङ्गमः ।। १३ ।।
आतपी मण्डली मृत्युः पिङ्गलः सर्वतापनः । कविर्विश्वो महातेजा रक्तः सर्वभवोद्ऽभवः ।। १४ ।।
नक्षत्रग्रहताराणां अधिपो विश्वभावनः । तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन् नमोऽस्तु ते ।। १५ ।।
|
यांची नावे - आदित्य (अदिति पुत्र) सविता (जगताला उत्पन्न करणारे), सूर्य (सर्वव्यापक), खग (आकाशांत विचरण करणारे), पूषा (पोषण करणारे), गभास्तिमान् (प्रकाशमान), सुवर्णसदृश्य, भानु (प्रकाशक), हिरण्यरेता (ब्रह्माण्डाच्या उत्पत्तिचे बीज), दिवाकर (रात्रीचा अंधकार दूर करून दिवसाचा प्रकाश पसरविणारे), हरिदश्व (दिशांमध्ये व्यापक अक्षय हिरव्या रंगाचे घोडे असणारे), सहस्त्रार्चि (हजारो किरणांनी सुशोभित), सप्तसप्ति (सात घोडे असणारे), मरीचिमान् (किरणांनी सुशोभित), तिमिरोन्मथन (अंधकाराचा नाश करणारे), शंभु (कल्याणाचे उद्गमस्थान), त्वष्टा (भक्तांचे दुःख दूर करणारे अथवा जगताचा संहार करणारे), मार्तण्डक (ब्रह्माण्डाला जीवन प्रदान करणारे), अंशुमान (किरण धारण करणारे), हिरण्यगर्भ (ब्रह्मदेव), शिशिर (स्वभावानेच सुख देणारे), तपन (उष्णता उत्पन्न करणारे), अहस्कर (दिनकर), रवि (सर्वांच्या स्तुतिला पात्र), अग्निगर्भ (अग्निला गर्भात धारण करणारे), अदितिपुत्र, शंख (आनंदरूप एवं व्यापक), शिशिर-नाशन (थंडीचा नाश करणारे), व्योमनाथ (आकाशाचे स्वामी), तमोभेदी (अंधकाराचा नाश करणारे), ऋग्, यजुः आणि सामवेदाचे पारगामी, घनवृष्टि (मेघांच्या वृष्टिचे कारण), अपांमित्र (जलाला उत्पन्न करणारे), विंध्यवीथीप्लवंगम (आकाशात तीव्र वेगाने चालणारे), आतपी (घाम उत्पन्न करणारे), मण्डली (किरणसमूहाला धारण करणारे), मृत्यु (मरणाचे कारण), पिङ्गल (भुर्या रंगाचे), सर्वतापन (सर्वांना ताप देणारे), कवि (त्रिकाळदर्शी), विश्व (सर्वस्वरूप), महातेजस्वी, रक्त (लाल रंगाचे), सर्वभवोद्भव (सर्वांच्या उत्पत्तिचे कारण), नक्षत्र, ग्रह आणि तारांचे स्वामी, विश्वभावन (जगताचे रक्षण करणारे), तेजस्वींमध्ये अति तेजस्वी तसेच द्वादशात्मा (बारा रूपात अभिव्यक्त) आहेत. (या सर्व नावांनी प्रसिद्ध सूर्यदेवा !) आपल्याला नमस्कार असो. ॥१०-१५॥
|
नमः पूर्वाय गिरये पश्चिमायाद् र गिरये नमः । ज्योतिर्गणानां पतये दिनाधिपतये नमः ।। १६ ।।
|
पूर्वगिरि - उदयाचल तसेच पश्चिम गिरि - अस्ताचलाच्या रूपात आपल्याला नमस्कार आहे. ज्योतिर्गणांचे (ग्रह आणि तारांचे) स्वामी तसेच दिनाचे अधिपति असलेल्या आपणास प्रणाम आहे. ॥१६॥
|
जयाय जयभद्राय हर्यश्वाय नमो नमः । नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः ।। १७ ।।
|
आपण जयस्वरूप तसेच विजय आणि कल्याणाचे दाता आहात. आपल्या रथाला हिरव्या रंगाचे घोडे जुंपलेले आहेत. आपल्याला वारंवार नमस्कार आहे. सहस्त्र किरणांनी सुशोभित भगवान् सूर्या आपल्याला वारंवार प्रणाम आहे. आपण अदितिचे पुत्र असल्याने आदित्य नामाने प्रसिद्ध आहात, आपल्याला नमस्कार असो. ॥१७॥
|
नम उग्राय वीराय सारङ्गाय नमो नमः । नमः पद्मप्रबोधाय मार्ताण्डाय नमोऽस्तुते ।। १८ ।।
|
उग्र (अभक्तांसाठी भयंकर), वीर (शक्ति -संपन्न) आणि सारंग (शीघ्रगामी) सूर्यदेवाला नमस्कार असो. कमलांना विकसित करणार्या प्रचण्ड तेजधारी मार्तण्डाला प्रणाम असो. ॥१८॥
|
ब्रह्मेशान् अच्युतेशाय सूरायादित्यवर्चसे । भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नमः ।। १९ ।।
|
(परात्पर-रूपात) आपण ब्रह्मा, शिव आणि विष्णुंचे स्वामी आहात. सूर आपलीच संज्ञा आहे, हे सूर्यमण्डल आपलेच तेज आहे. आपण प्रकाशाने परिपूर्ण आहात. सर्वांना स्वाहा करून टाकणारा अग्नि हे आपलेच स्वरूप आहे. आपण रौद्ररूप धारण करणारे आहात, आपल्याला नमस्कार असो. ॥१९॥
|
तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नायामितात्मने । कृतघ्नघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नमः ।। २० ।।
|
आपण अज्ञान आणि अंधकाराने नाशक, जडता आणि शीत यांचे निवारक आणि शत्रूचा नाश करणारे आहात. आपले स्वरूप अप्रमेय आहे. आपण कृतघ्नांचा नाश करणारे, संपूर्ण ज्योतींचे स्वामी आणि देवस्वरूप आहात, आपल्याला नमस्कार आहे. ॥२०॥
|
तप्तचामीकराभाय हरये विश्वकर्मणे । नमस्तमोऽभिनिघ्नाय रुचये लोकसाक्षिणे ।। २१ ।।
|
आपली प्रभा तप्त सुवर्णासमान आहे, आपण हरि (अज्ञानाचे हरण करणारे) आणि विश्वकर्मा (संसाराची सृष्टि करणारे आहात), तमाचे नाशक, प्रकाशस्वरूप आणि जगताचे साक्षी आहात. आपल्याला नमस्कार आहे. ॥२१॥
|
नाशयत्येष वै भूतं तमेव सृजति प्रभुः । पायत्येष तपत्येष वर्षत्येष गभस्तिभिः ।। २२ ।।
|
रघुनंदना ! हे भगवान् सूर्यच संपूर्ण भूतांचा संहार, सृष्टि आणि पालन करतात. हेच आपल्या किरणांनी उष्णता पोहोचवितात आणि वृष्टि करतात. ॥२२॥
|
एष सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठितः । एष चैवाग्निहोत्रं च फलं चैवाग्निहोत्रिणाम् ।। २३ ।।
|
हे सर्व भूतांच्या अंतर्यामीरूपाने स्थित होऊन, ती झोपल्यावरही जागत राहातात. हेच अग्निहोत्र तथा अग्निहोत्री पुरूषांना मिळणारे फळ आहे. ॥२३॥
|
वेदाश्च क्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च । यानि कृत्यानि लोकेषु सर्वेषु परमप्रभुः ।। २४ ।।
|
(यज्ञात भाग ग्रहण करणारी) देवता, यज्ञ आणि यज्ञांचे फळही हेच आहेत. लोकात जितक्या क्रिया होतात त्या सर्वांचे फळ देण्यास हेच पूर्ण समर्थ आहेत. ॥२४॥
|
एनमापत्सु कृच्छ्रेषु कान्तारेषु भयेषु च । कीर्तयन् पुरुषः कश्चित् नावसीदति राघव ।। २५ ।।
|
राघवा ! विपत्तिमध्ये, कष्टात, दुर्गम मार्गात तसेच आणखीही कुठल्या भयाच्या वेळीही जो कोणी पुरूष या सूर्यदेवाचे कीर्तन करतो, त्याला दुःख भोगावे लागत नाही. ॥२५॥
|
पूजयस्वैनमेकाग्रो देवदेवं जगत्पतिम् । एतत् त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि ।। २६ ।।
|
म्हणून तू एकाग्रचित्त होऊन या देवाधिदेव जगदेश्वराची पूजा कर. या आदित्यहृदयाचा तीन वेळा जप करण्याने तुला युद्धात विजय प्राप्त होईल. ॥२६॥
|
अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं जहिष्यसि । एवमुक्त्वा तदाऽगस्त्यो जगाम च यथागतम् ।। २७ ।।
|
महाबाहो ! तू या क्षणी रावणाचा वध करू शकशील. असे म्हणून अगस्त्य जसे आले होते, त्याचप्रकारे परत निघून गेले. ॥२७॥
|
एतच्छुत्वा महातेजा नष्टशोकोऽभवत् तदा । धारयामास सुप्रीतो राघवः प्रयतात्मवान् ।। २८ ।।
आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदं परं हर्षमवाप्तवान् । त्रिराचम्य शुचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान् ।। २९ ।।
रावणं प्रेक्ष्य हृष्टात्मा युद्धाय समुपागमत् । सर्वयत्नेान महता वृतस्तस्य वधेऽभवत् ।। ३० ।।
|
त्यांचा उपदेश ऐकून महातेजस्वी राघवांचा शोक दूर झाला. त्यांनी परम प्रसन्न होऊन शुद्धचित्ताने आदित्यहृदय धारण केले आणि तीन वेळा आचमन करून शुद्ध होऊन भगवान् सूर्यांकडे पहात याचा तीन वेळा जप केला. यामुळे त्यांना फार हर्ष झाला. नंतर परम पराक्रमी राघवांनी धनुष्य उचलून रावणाकडे पाहिले आणि उत्साहपूर्वक विजय मिळविण्यासाठी ते पुढे निघाले. त्यांनी पूर्ण प्रयत्न करून रावणाच्या वधाचा निश्चय केला. ॥२८-३०॥
|
अथ रविरवदन्निरीक्ष्य रामं मुदितमनाः परमं प्रहृष्यमाणः । निशिचरपतिसङ्क्षयं विदित्वा सुरगणमध्यगतो वचस्त्वरेति ।। ३१ ।।
|
त्यासमयी देवतांच्या मध्यभागी उभे असलेल्या भगवान् सूर्यानी प्रसन्न होऊन श्रीरामचंद्रांकडे पाहिले आणि निशाचर राजा रावणाच्या विनाशाचा समय निकट आलेला जाणून हर्षपूर्वक म्हणाले - "रघुनंदना ! आता त्वरा करा ! ॥३१॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे पञ्चाधिकशततमः सर्गः ।। १०५ ।।
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेपाचावा सर्ग पूरा झाला. ॥१०५॥
|