॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ युद्धकाण्ड ॥ ॥ चतुर्दशः सर्ग: ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] अयोध्या-यात्रा. भरद्वाज आतिथ्य आणि भरत भेट श्रीमहादेव उवाच पातयित्वा ततश्चक्षुः सर्वतो रघुनन्दनः । अब्रवीन्मैथिलीं सीतां रामः शशिनिभाननाम् ॥ १ ॥ श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, त्यानंतर सर्व बाजूकडे दृष्टिक्षेप करून, रघुनंदन रामचंद्रानना सीतेला म्हणाले. (१) त्रिकूटशिखराग्रस्थां पश्य लङ्कां महाप्रभाम् । एतां रणभुवं पश्य मांसकर्दम पङ्किलाम् ॥ २ ॥ "हे सीते, त्रिकूट पर्वताच्या शिखरावर असलेली आणि अतिशय प्रभा असणारी ही लंका बघ. तसेच मांसाच्या चिखलाने भरून गेलेली ही रणभूमी बघ. (२) असुराणां प्लवङ्गानां अत्र वैशसनं महत् । अत्र मे निहतः शेते रावणो राक्षसेश्वरः ॥ ३ ॥ येथे राक्षस आणि वानर यांचा फार मोठा संहार झाला. मी मारलेला राक्षसराज रावण येथे पडला होता. (३) कुम्भकर्णेन्द्रजिन्मुख्याः सर्वे चात्र निपातिताः । एष सेतुर्मया बद्धः सागरे सलिलाशये ॥ ४ ॥ कुंभकर्ण, इंद्रजित इत्यादी सर्व राक्षस येथेच पडले होते. सागरावर हा सेतू मी बांधला. (४) एतच्च दृश्यते तीर्थं सागरस्य महात्मनः । सेतुबन्धमिति ख्यातं त्रैलोक्येन च पूजितम् ॥ ५ ॥ या महात्म्या विशाल सागराचे सेतुबंध नावाने प्रख्यात असणारे आणि तिन्ही लोकांकडून पूजिले जाणारे हे तीर्थ दिसून येत आहे. (५) एतत्पवित्रं परमं दर्शनात्पातकापहम् । अत्र रामेश्वरो देवो मया शम्भुः प्रतिष्ठितः ॥ ६ ॥ हे अतिशय पवित्र असून, केवळ त्याच्या दर्शनानेच ते पातकांचे हरण करते. येथे रामेश्वर महादेवांची मी स्थापना केली आहे. (६) अत्र मां शरणं प्राप्तो मन्त्रिभिश्च विभीषणः । एषा सुग्रीवनगरी किष्किन्धा चित्रकानना ॥ ७ ॥ मंत्र्यांसह बिभीषण मला येथे शरण आला होता. विचित्र उपवनांनी युक्त असणारी ही सुग्रीवाची नगरी किष्किंधा आहे." (७) तत्र रामाज्ञया तारा-प्रमुखा हरियोषितः । आनयामास सुग्रीवः सीतायाः प्रियकाम्यया ॥ ८ ॥ तेथे सीतेला प्रसन्न करण्यासाठी, रामांच्या आज्ञेने तारा इत्यादी वानरस्त्रिया सुग्रीवाने आणवल्या. (८) ताभिः सहोत्थितं शीघ्रं विमानं प्रेक्ष्य राघवः । प्राह चाद्रिमृष्यमूकं पश्य वाल्यत्र मे हतः ॥ ९ ॥ त्या स्त्रियांना बरोबर घेऊन त्यांच्यासह चट्दिशी उड्डाण करणारे ते विमान पाहून, राघव सीतेला म्हणाले, "सीते, हा क्रष्यमूक पर्वत पाहा. येथे मी वालीचा वध केला होता. (९) एषा पञ्चवटी नाम राक्षसा यत्र मे हताः । अगस्तस्य सुतीक्ष्णस्य पश्याश्रमपदे शुभे ॥ १० ॥ जेथे मी खर, दूषण इत्यादी राक्षसांचा वध केला होता, ती ही पंचवटी नावाची जागा आहे. हे कलाणी, अगस्त्य आणि सुतीक्ष्ण या ऋषींचीही आश्रमस्थाने तू पाहा. (१०) एते ते तापसाः सर्वे दृश्यन्ते वरवर्णिनि । असौ शैलवरो देवि चित्रकूटः प्रकाशते ॥ ११ ॥ हे कांतिमती सीते, हे सर्व तापस येथे दिसत आहेत. हे देवी, हा तो सर्वश्रेष्ठ चित्रकूट पर्वत स्पष्टपणे दिसत आहे. (११) अत्र मां कैकयीपुत्रः प्रसादयितुमागतः । भरद्वाजाश्रमं पश्य दृश्यते यमुनातटे ॥ १२ ॥ येथेच कैकयीपुत्र भरत मला प्रसन्न करण्यास आला होता. यमुनेच्या तीरावरील हा भरद्वाज ऋषींचा आश्रम पाहा. (१२) एषा भागीरथी गङ्गा दृश्यते लोकपावनी । एषा सा दृश्यते सीते सरयूर्यूपमालिनी ॥ १३ ॥ एषा सा दृश्यतेऽयोध्या प्रणामं कुरु भामिनी । एवं क्रमेण संप्राप्तो भरद्वाजाश्रमं हरिः ॥ १४ ॥ सर्व लोकांना पावन करणारी ही भागीरथी येथे दिसत आहे. हे सीते, सूर्यवंशी राजांनी केलेल्या यज्ञांच्या स्तूपांच्या समूहांनी युक्त अशी ही सरयू नदी येथे दिसत आहेत. ही अयोध्या दिसते आहे. हे सुंदरी, तिला प्रणाम कर." अशा प्रकारे क्रमाने जाता जाता राम भरद्वाजांच्या आश्रमात पोचले. (१३-१४) पूर्णे चतुर्दशे वर्षे पञ्चम्यां रघुनन्दनः । भरद्वाजं मुनिं दृष्ट्वा ववन्दे सानुजः प्रभुः ॥ १५ ॥ चौदा वर्ष पूर्ण झाल्यावर, पंचमी तिथीला, रघुनंदनांनी भरद्वाज मुनींना पाहिले आणि लक्ष्मणासह प्रभू रामांनी त्यांना वंदन केले. (१५) पप्रच्छ मुनिमासीनं विनयेन रघूत्तमः । श्रुणोषि कच्चिद्भरतः कुशल्यास्ते सहानुजः ॥ १६ ॥ आश्रमात बसलेल्या मुनींना रघुनंदनांनी विनयपूर्वक विचारले, "भरताविषयी तुम्ही काही ऐकले आहे काय ? शत्रुघ्न व भरत कुशल आहेत ना ? (१६) सुभिक्षा वर्ततेऽयोध्या जीवन्ति च हि मातरः । श्रुत्वा रामस्य वचनं भरद्वाजः प्रहृष्टधीः ॥ १७ ॥ प्राह सर्वे कुशलिनो भरतस्तु महामनाः । फलमूलकृताहारो जटावल्कलधारकः ॥ १८ ॥ अयोध्येत सुबत्ता आहे ना ? माझ्या माता सुखरूप आहेत ना ?" रामांचे बोलणे ऐकून आनंदित झालेल्या भरद्वाजांनी उत्तर दिले, "रामा, सर्वजण कुशल आहेत. उदार मनाचा भरत हा फळे व मुळे यांचा आहार घेतो. त्याने जटा आणि वल्कले धारण केली आहे. (१७-१८) पादुके सकलं न्यस्य राज्यं त्वां सुप्रतीक्षते । यद्यत्कृतं त्वया कर्म दण्डके रघुनन्दन ॥ १९ ॥ राक्षसानां विनाशं च सीताहरणपूर्वकम् । सर्वं ज्ञातं मया राम तपसा ते प्रसादतः ॥ २० ॥ राज्याचा संपूर्ण कारभार तुमच्या पादुकांवर सोपवून तो तुमचीच प्रतीक्षा करीत आहे. हे रघुनंदना, दंडकारण्यात तुम्ही जी कृत्ये केलीत, आणि सीतेचे हरण झाल्यावर तुम्ही जो राक्षसांचा विनाश केलात, हे रामा, ते सर्व तुमच्या कृपाप्रसादामुळे मी तपोबळाने जाणलेले आहे. (१९-२०) त्वं ब्रह्म परमं साक्षात् आदिमध्यान्तवर्जितः । त्वमग्रे सलिलं सृष्ट्वा तत्र सुप्तोऽसि भूतकृत् ॥ २१ ॥ नारायणोऽसि विश्वात्मन् नराणां अन्तरात्मकः । त्वन्नाभिकमलोत्पन्नो ब्रह्मा लोकपितामहः ॥ २२ ॥ हे रामा आदी, मध्य आणि अंत यांनी रहित असे साक्षात परब्रह्म तुम्हीच आहात. सर्व भूतांना निर्माण करणारे तुम्ही आहात. प्रथम पाणी निर्माण करून नंतर तुम्ही तेथे निद्रा करता. म्हणून तुम्ही नारायण (नार म्हणजे पाणी हे ज्याचे अयन म्हणजे आश्रय आहे तो नारायण) आहात. हे विश्वाल्पन, तुम्ही सर्व माणसांचे अंतरात्मा आहात. तुमच्या नाभिकमळातून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव हे सर्व लोकांचे पितामह आहेत. (२१-२२) अतस्त्वं जगतामीशः सर्वलोकनमस्कृतः । त्वं विष्णुर्जानकीलक्ष्मीः शेषोऽयं लक्ष्मणाभिधः ॥ २३ ॥ म्हणून तुम्ही सर्व जगाचे ईश्वर आहात. तुम्ही सर्व लोकाकडून वंदिले जाता. तुम्ही साक्षात विष्णू आहात. सीता ही लक्ष्मी आहे आणि लक्ष्मण हा शेष नाग आहे. (२३) आत्मना सृजसीदं त्वं आत्मन्येवात्ममायया । न सज्जसे नभोवत्त्वं चिच्छक्त्या सर्वसाक्षिकः ॥ २४ ॥ स्वतःच्या मायेने तुम्ही स्वतःच्या ठिकाणी स्वतःच हे संपूर्ण विश्व उत्पन्न करता. परंतु आकाशाप्रमाणे तुम्ही कशानेही लिप्त होत नाही. स्वतःच्या चित्-ज्ञान-शक्तीच्या द्वारा तुम्ही सर्वांचे साक्षी असता. (२४) बहिरन्तश्च भूतानां त्वमेव रघुनन्दन । पूर्णोऽपि मूढदृष्टीनां विच्छिन्न इव लक्ष्यसे ॥ २५ ॥ हे रघुनंदना, सर्व प्राण्यांच्या आत-बाहेर तुम्हीच आहात. आणि जरी तुम्ही पूर्ण म्हणजे अखंड आहात तरी लोकांना तुम्ही मर्यादित असल्यासारखे भासता. (२५) जगत्त्वं जगदाधारः त्वमेव परिपालकः । त्वमेव सर्वभूतानां भोक्ता भोज्यं जगत्पते ॥ २६ ॥ हे जगताच्या स्वामी रामा, तुम्हीच जग आहात. तुम्हीच जगाचा आधार आहात आणि तुम्हीच जगाचे पालनकर्ते आहात आणि तुम्हीच सर्व भूतांमध्ये भोक्ते आणि अन्नरूपाने भोज्य आहात. (२६) दृश्यते श्रूयते यद्यत् स्मर्यते वा रघूत्तम । त्वमेव सर्वमखिलं त्वद्विनान्यन्न किञ्चन ॥ २७ ॥ हे रघूतमा, जे जे काही दिसून येते, ऐकले जाते किंवा स्मरले जाते ते ते सर्व काही तुम्हीच आहात. तुमच्याशिवाय कुठेही काहीही वेगळे असे नाही. (२७) माया सृजति लोकांश्च स्वगुणैरहमादिभिः । त्वच्छक्तिप्रेरिता राम तस्मात्त्वय्युपचर्यते ॥ २८ ॥ हे रामा, तुमच्याच शक्तीने प्रेरणा मिळालेली माया हीच अहंकार इत्यादी स्वतःच्या गुणांनी सर्व लोक उत्पन्न करते. म्हणून सर्व काही करण्याचे कर्तृत्व हे तुमच्यावर आरोपिले जाते. (२८) यथा चुम्बकसान्निध्यात् चलन्त्येवायसादयः । जडास्तथा त्वया दृष्टा माया सृजति वै जगत् ॥ २९ ॥ ज्या प्रमाणे चुंबकाच्या सान्निध्याने लोखंड इत्यादी जड- अचेतन पदार्थ हलू लागतात, त्या प्रमाणे तुमची दृष्टी पडताच माया ही संपूर्ण जग निर्माण करते. (२९) देहद्वयं अदेहस्य तव विश्वं रिरक्षिषोः । विराट् स्थूलं शरीरं ते सूत्रं सूक्ष्मं उदाहृतम् ॥ ३० ॥ तुम्ही स्वतः देहरहित असूनसुद्धा तुम्ही विश्वाचे रक्षण करण्याच्या इच्छेने दोन देह धारण करता. विराट हे तुमचे स्थूल शरीर आहे तर तुमचे सूक्ष्म शरीर हे सूत्र (हिरण्य गर्भ) आहे, असे म्हटले जाते. (३०) विराजः सम्भवन्त्येते अवताराः सहस्रशः । कार्यान्ते प्रविशन्त्येव विराजं रघुनन्दन ॥ ३१ ॥ हे रघुनन्दना, तुमच्या विराट शरीरापासून तुमचे हजारो अवतार उत्पन्न होतात आणि आपले कार्य पूर्ण झाल्यावर ते पुनः तुमच्या विराट शरीरातच प्रवेश करतात. (३१) अवतारकथां लोके ये गायन्ति गृणन्ति च । अनन्यमनसो मुक्तिः तेषामेव रघूत्तम ॥ ३२ ॥ हे रघूत्तमा, या जगात जे लोक अनन्य चित्त होऊन तुमच्या अवतारांच्या कथा गातात आणि वर्णन करतात त्यांनाच मुक्ती प्राप्त होते. (३२) त्वं ब्रह्मणापुरा भूमेः भारहाराय राघव । प्रार्थितस्तपसा तुष्टः त्वं जातोऽसि रघोः कुले ॥ ३३ ॥ हे राघवा, पूर्वी भूमीचा भार हरण करण्यास ब्रह्मदेवाने तुमची प्रार्थना केली होती. त्यांच्या तपस्येने संतुष्ट होऊन तुम्ही रघूच्या कुळात अवतार घेतला. (३३) देवकार्यमशेषेण कृतं ते राम दुष्करम् । बहुवर्षसहस्राणि मानुषं देहमाश्रितः ॥ ३४ ॥ कुर्वन् दुष्करकर्माणि लोकद्वयहिताय च । पापहारीणि भुवनं यशसा पूरयिष्यसि ॥ ३५ ॥ हे रामा, आता तुम्ही देवांचे ते दुष्कर कार्य पूर्णपणे पार पाडले आहे. आता अनेक सहस्र वर्षे या मनुष्य देहात राहूनच, दोन्ही लोकांच्या कल्याणासाठी, तुम्ही अनेक कठीण आणि पापहारक कार्ये करून, स्वतःच्या कीर्तीने हे संपूर्ण विश्व भरून टाकाल. (३४-३५) प्रार्थयामि जगन्नाथ पवित्रं कुरु मे गृहम् । स्थित्वाद्य भुक्त्वा सबलः श्वो गमिष्यसि पत्तनम् ॥ ३६ ॥ हे जगन्नाथा, आज माझे घर तुम्ही पवित्र करा, अशी माझी तुम्हांला प्रार्थना आहे. आज येथे सैन्यासह राहून, भोजन करून, मग उद्या स्वतःच्या नगरीला जा. " (३६) तथेति राघवोऽतिष्ठत् तस्मिन् आश्रम उत्तमे । ससैन्यः पूजितस्तेन सीतया लक्ष्मणेन च ॥ ३७ ॥ "ठीक आहे" असे म्हणून राघव त्या उत्तम आश्रमात राहिले. त्या वेळी सीता, लक्ष्मण व सैन्य यांच्यासह त्यांचा भरद्वाजांनी सत्कार केला. (३७) ततो रामश्चिन्तयित्वा मुहूर्तं प्राह मारुतिम् । इतो गच्छ हनूमन् त्वं अयोध्यां प्रति सत्वरः ॥ ३८ ॥ नंतर क्षणभर विचार करून राम मारुतीला म्हणाले, 'हे हनुमंता, आता येथून तू सत्वर अयोध्येकडे जा. (३८) जानीहि कुशली कश्चित् जनो नृपतिमंदिरे । शृङ्गवेरपुरं गत्वा ब्रूहि मित्रं गुहं मम ॥ ३९ ॥ तेथे राजमंदिरातील सर्व लोक कुशल आहेत ना, हे जाणून घे. तसेच शृंगवेरपुरात जाऊन तू गुह या माझ्या मित्राशी बोल. (३९) जानकीलक्ष्मणोपेतं आगतं मां निवेदय । नन्दिग्रामं ततो गत्वा भ्रातरं भरतं मम ॥ ४० ॥ दृष्ट्वा ब्रूहि सभार्यस्य सभ्रातुः कुशलं मम । सीतापहरणादीनि रावणस्य वधादिकम् ॥ ४१ ॥ ब्रूहि क्रमेण मे भ्रातुः सर्वं तत्र विचेष्टितम् । हत्वा शत्रुगणान् सर्वान् सभार्यः सहलक्ष्मणः ॥ ४२ ॥ उपयाति समृद्धार्थः सह ऋक्षहरीश्वरैः । इत्युक्त्वा तत्र वृत्तान्तं भरतस्य विचेष्टितम् ॥ ४३ ॥ सर्वं ज्ञात्वा पुनः शीघ्रं आगच्छ मम सन्निधिम् । तथेति हनुमांस्तत्र मानुषं वपुरास्थितः ॥ ४४ ॥ नन्दिग्रामं ययौ तूर्णं वायुवेगेन मारुतिः । गरुत्मानिव वेगेन जिघृक्षन् भुजगोत्तमम् ॥ ४५ ॥ जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह मी परत आलो आहे, असे तू त्याला निवेदन कर. त्यानंतर नंदिग्रामात जाऊन, माझ्या भरताला भेटून, पत्नी व भाऊ यांच्यासह माझे कुशल आहे, असे सांग. त्यानंतर सीतेचे अपहरण झाल्यापासून रावणाचा वध इत्यादी माझी सर्व हकीगत तू तेथे क्रमाने त्याला सांग आणि सर्व शत्रू-समूहाचा वध करून, कृतकृत्य होऊन, राम पत्नी व लक्ष्मण याचेसह तसेच श्रेष्ठ अस्वले आणि वानर यांना बरोबर घेऊन येत आहेत, असे तू सांग. हा सर्व वृत्तांत तेथे सांगून, भरताचा समाचार घेऊन, पुनः सत्वर माझ्याजवळ ये." "ठीक आहे" असे म्हणून हनुमंताने तेथेच मानवी शरीर धारण केले आणि नंतर ज्या प्रमाणे गरुड सर्पाला पकडण्याच्या इच्छेने वेगाने जातो त्याप्रमाणे तो लगेच वायुवेगाने नंदिग्रामाकडे निघाला. (४०-४५) शृङ्गवेरपुरं प्राप्य गुहमासाद्य मारुतिः । उवाचा मधुरं वाक्यं प्रहृष्टेनान्तरात्मना ॥ ४६ ॥ प्रथम शृंगवेरपुरात पोचल्यावर, गुहाजवळ जाऊन, आनंदित मनाने मारुतीने असे गोड शब्दांत म्हटले. (४६) रामो दाशरथिः श्रीमान् सखा ते सह सीतया । सलक्ष्मणस्त्वां धर्मात्मा क्षेमी कुशलमब्रवीत् ॥ ४७ ॥ "श्रीमान् धर्मात्मा, तुझे मित्र दशरथपुत्र रामांनी सीता व लक्ष्मण यांसह मी कुशल आहे, अशी आपली कुशल वार्ता तुला सांगितली आहे. (४७) अनुज्ञातोऽद्य मुनिना भरद्वाजेन राघवः । आगमिष्यति तं देवं द्रक्ष्यसि त्वं रघुत्तमम् ॥ ४८ ॥ मुनि भरद्वाजांनी अनुज्ञा दिल्यावर, आजच राघव तुझ्याकडे येतील, त्या वेळी तू रघूत्तम देवांना भेटशील." (४८) एवमुक्त्वा महातेजाः संप्रहृष्टतनूरुहम् । उत्पपात महावेगो वायुवेगेन मारुतिः ॥ ४९ ॥ आनंदाने गुहाच्या अंगावर रोमांच आले होते. त्याला असे सांगून, महातेजस्वी आणि प्रचंड वेग असणारा मारुती वायुवेगाने आकाशात उडाला. (४९) सोऽपश्यद्रामतीर्थं च सरयूं च महानदीम् । तां अतिक्रम्य हनूमान् नन्दिग्रामं ययौ मुदा ॥ ५० ॥ पुढे वाटेत त्याने रामतीर्थ व महानदी सरयू पाहिली. ती नदी ओलांडून हनुमान आनंदाने नंदीग्रामात शिरला. (५०) क्रोशमात्रे त्वयोध्यायाः चीरकृष्णाजिनाम्बरम् । ददर्श भरतं दीनं कृशं आश्रमवासिनम् ॥ ५१ ॥ अयोध्येपासून एक कोस अंतरावर असणाऱ्या नंदीग्रामात वल्कले व कृष्णाजिन वापरणारा, आश्रमात राहाणारा, कृश, दीन असा भरत त्याला दिसला. (५१) मलपङ्कविदिग्धाङ्गं जटिलं वल्कलाम्बरम् । फलमूलकृताहारं रामचिन्तापरायणम् ॥ ५२ ॥ पादुके ते पुरस्कृत्य शासयन्तं वसुंधराम् । मन्त्रिभिः पौरमुख्यैश्च काषायाम्बरधारिभिः ॥ ५३ ॥ वृतदेहं मूर्तिमन्तं साक्षाद्धर्मं इव स्थितम् । उवाच प्राञ्जलिर्वाक्यं हनूमान् मारुतात्मजः ॥ ५४ ॥ भरताचे अंग अभ्यंगादी संस्कार न झाल्यामुळे मळकट झाले होते. त्याच्या डोक्यावर जटा होत्या. त्याने वल्कल वस्त्र धारण केले होते. फळे व मुळे यांचा आहार घेऊन, तो रामांचे ध्यान करण्यात मग्न होता. रामांच्या पादुका पुढे ठेऊन तो पृथ्वीचे राज्य करीत होता. काषाय वस्त्र परिधान करणारे मंत्री आणि मुख्य नागरिक त्यांच्यासमवेत तो साक्षात् मूर्तिमंत धर्माप्रमाणे दिसत होता. अशा त्या भरतापुढे पवनपुत्र हनुमानाने हात जोडले आणि म्हटले. (५२-५४) यं त्वं चिन्तयसे रामं तापसं दण्डके स्थितम् । अनुशोचसि काकुत्स्थः स त्वां कुशलमब्रवीत् ॥ ५५ ॥ "हे भरता, दंडकारण्यात राहाणाऱ्या ज्या तपस्वी रामांचे तू चिंतन करीत आहेस आणि ज्यांच्याविषयी तू शोक करीत आहेस, त्या काकुरूथ रामांनी तुला आपले कुशल कळविण्यास सांगितले आहे. (५५) प्रियमाख्यामि ते देव शोकं त्यज सुदारुणम् । अस्मिन्मुहूर्ते भ्रात्रा त्वं रामेण सह सङ्गतः ॥ ५६ ॥ हे देवा, मी आता तुम्हांला प्रिय वार्ता सांगतो. तुम्ही आता आपला दारुण शोक टाकून द्या. याच मुहूर्तावर तुम्ही तुमच्या बंधू रामांना भेटाल. (५६) समरे रावणं हत्वा रामः सीतामवाप्य च । उपयाति समृद्धार्थः ससीतः सहलक्ष्मणः ॥ ५७ ॥ युद्धामध्ये रावणाचा वध करून आणि सीतेला प्राप्त करून घेऊन, मनोरथ सफल झालेले राम हे सीता व लक्ष्मण याचेसह जवळ येत आहेत." (५७) एवमुक्तो महातेजा भरतो हर्षमूर्च्छितः । पपात भुवि चास्वस्थः कैकयीप्रियनन्दनः ॥ ५८ ॥ मारुतीने असे सांगितल्यावर, महातेजस्वी भरत तळमळीने व आनंदातिरेकाने मूर्च्छित होऊन जमिनीवर पडला. (५८) आलिङ्ग्य भरतः शीघ्रं मारुतिं प्रियवादिनम् । आनन्दजैरश्रुजलैः सिषेच भरतः कपिम् ॥ ५९ ॥ शुद्धीवर आल्यावर, गोड बोलणाऱ्या मारुतीला भरताने लगेच आलिंगन दिले आणि आनंदाभूंनी त्याला न्हाऊ घातले. (५९) देवो वा मानुषो वा त्वं अनुक्रोशादिहागतः । प्रियाख्यानस्य ते सौम्य ददामि ब्रुवतः प्रियम् ॥ ६० ॥ गवां शतसहस्रं च ग्रामाणां च शतं वरम् । सर्वाभरणसम्पन्ना मुग्धाः कन्यास्तु षोडश ॥ ६१ ॥ (मग भरत हनुमानाला म्हणाला,) "अरे तू देव आहेस की माणूस आहेस ? माझ्यावरील दयेमुळे तू येथे आला आहेस. हे साधो, प्रिय वार्ता सांगणाऱ्या तुला मी एक लक्ष गाई, उत्तम सुंदर अशी शंभर गावे, आणि सर्व अलंकारांनी युक्त अशा सोळा सुंदर कन्या देत आहे." (६०-६१) एवमुक्त्वा पुनः प्राह भरतो मारुतात्मजम् । बहूनीमानि वर्षाणि गतस्य सुमहद्वनम् ॥ ६२ ॥ शृणोम्यहं प्रीतिकरं मम नाथस्य कीर्तनम् । कल्याणी बत गाथेयं लौकिकी प्रतिभाति मे ॥ ६३ ॥ एति जीवन्तमानन्दो नरं वर्षशतादपि । राघवस्य हरीणां च कथमासीत्समागमः ॥ ६४ ॥ तत्त्वमाख्याहि भद्रं ते विश्वसेयं वचस्तव । एवमुक्तोऽथ हनुमान् भरतेन महात्मना ॥ ६५ ॥ आचचक्षेऽथ रामस्य चरितं कृत्स्नशःक्रमात् । श्रुत्वा तु परमानन्दं भरतो मारुतात्मजात् ॥ ६६ ॥ असे सांगून भरत हनुमानाला पुनः म्हणाला, "माझे स्वामी राम हे घोर अरण्यात गेल्याला अनेक वर्षे झाली आणि आज मी त्यांची आनंददायक वार्ता ऐकत आहे. आज मला एक कल्याणकारी लौकिक उक्ती अगदी सार्थ आहे असे वाटत आहेः माणूस जर जिवंत राहिला तर शंभर वर्षानी का होईना, त्याला आनंद प्राप्त होतो. तुझे कल्याण होवो. आता तू मला सांग की राघव आणि वानर यांची भेट कशी काय झाली बरे ? तू मला खरे खरे सांग. मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवीन." महात्म्या भरताने असे म्हटल्यावर, हनुमानाने त्याला रामांचे संपूर्ण चरित्र क्रमाने सांगितले. पवनपुत्राकडून ते ऐकल्यावर, भरताला परमानंद झाला. (६२-६६) आज्ञापयच्छत्रुहणं मुदा युक्तं मुदान्वितः । दैवतानि च यावन्ति नगरे रघुनन्दन ॥ ६७ ॥ नानोपहारबलिभिः पूजयन्तु महाधियः । सूता वैतालिकाश्चैव बन्दिनः स्तुतिपाठकाः ॥ ६८ ॥ वारमुख्याश्च शतशो निर्यान्त्वद्यैव सङ्घशः । राजदारास्तथामात्याः सेना हस्त्यश्वपत्तयः ॥ ६९ ॥ ब्राह्मणाश्च तथा पौरा राजानो ये समागताः । निर्यान्तु राघवस्याद्य द्रष्टुं शशिनिभाननम् ॥ ७० ॥ तेव्हा आनंदित झालेल्या भरताने आनंदित झालेल्या शत्रुघ्नाला आज्ञा केली, "हे रघुनंदना शत्रुघ्ना, या नगरीत जितकी दैवते आहेत त्या सर्वांची नाना प्रकारच्या पूजासामग्रींनी पूजा करा. सूत, वैतालिक, बंदीजन, स्तुतिपाठक आणि मुख्य मुख्य वारांगना यांचे शेकडो समुदाय आजच नगराच्या बाहेर पडू देत. खेरीज राज-स्त्रिया तसेच अमात्य, हत्ती, घोडे आणि पायदळ यांनी युक्त सेना, ब्राह्मण, नागरिक आणि येथे एकत्र आलेले सर्व राजे लोक हे सर्व जण राघवांचा मुखचंद्र पाहाण्यास आजच अयोध्येच्या बाहेर पडू देत." (६७-७०) भरतस्य वचः श्रुत्वा शत्रुघ्नपरिचोदिताः । अलञ्चक्रुश्च नगरीं मुक्तारत्नमयोज्ज्वलैः ॥ ७१ ॥ तोरणैश्च पताकाभिः विचित्राभिः अनेकधा । अलङ्कुर्वन्ति वेश्मानि नानाबलिविचक्षणाः ॥ ७२ ॥ भरताचे वचन ऐकल्यावर, शत्रुघ्नाने आज्ञा दिली. त्या आज्ञेमुळे नाना प्रकारच्या कलांमध्ये कुशल असणाऱ्या नागरिकांनी आपापली घरे सुशोभित केली. तसेच उज्ज्वल मोती व रत्ने यांनी युक्त अशी नाना प्रकारची तोरणे, नाना प्रकारच्या चित्र- विचित्र पताका यांच्या द्वारे त्यांनी अयोध्या नगरी सुशोभित केली. (७१-७२) निर्यान्ति वृन्दशः सर्वे रामदर्शनलालसाः । हयानां शतसाहस्रं गजानामयुतं तथा ॥ ७३ ॥ रथानां दशसाहस्रं स्वर्णसूत्रविभूषितम् । पारमेष्ठिन्युपादाय द्रव्याण्युच्चावचानि च । ॥ ७४ ॥ त्या वेळी रामांच्या दर्शनाची लालसा असणारे लोक गटागटाने नगराच्या बाहेर पडले. त्यांनी आपल्याबरोबर एक लक्ष घोडे, दहा हजार हत्ती, सोन्याच्या तारांनी सुशोभित केलेले दहा हजार रथ आणि ईश्वराला अर्पण करण्यास योग्य अशा ऐश्वर्यसंपन्न लहान मोठ्या वस्तू घेतल्या होत्या. (७३-७४) ततस्तु शिबिकारूढा निर्ययू राजयोषितः । भरतः पादुके न्यस्य शिरस्येव कृताञ्जलिः ॥ ७५ ॥ शत्रुघ्नसहितो रामं पादचारेण निर्ययौ । तदैव दृश्यते दूराद् विमानं चन्द्रसन्निभम् ॥ ७६ ॥ पुष्पकं सूर्यसङ्काशं मनसा ब्रह्मनिर्मितम् । एतस्मिन् भ्रातरौ वीरौ वैदेह्या रामलक्ष्मणौ ॥ ७७ ॥ सुग्रीवश्च कपिश्रेष्ठो मन्त्रिभिश्च विभीषणः । दृश्यते पश्यत जना एत्याह पवनात्मजः ॥ ७८ ॥ त्यानंतर पालखीत आरूढ होऊन राजस्त्रिया बाहेर पडल्या आणि रामांना भेटण्यास, शत्रुघ्नाला बरोबर घेऊन, भरत हा रामांच्या पादुका मस्तकावर धारण करून आणि हात जोडून पायी पायी निघाला. तितक्यातच ब्रह्मदेवांनी मनाने निर्माण केलेले, सूर्याप्रमाणे तेजस्वी, चंद्राची कांती असणारे पुष्पक विमान सर्वांना दुरूनच दिसून आले. त्या वेळी हनुमान म्हणाला, "लोकहो, बघा. या विमानात वैदेहीसहित राम व लक्ष्मण हे वीर बंधू, कपिश्रेष्ठ सुग्रीव आणि मंत्र्यांसहित बिभीषण बसलेले दिसून येत आहेत." (७५-७८) ततो हर्षसमुद्भूतो निःस्वनो दिवमस्पृशत् । स्त्री-बाल-युव-वृद्धानां रामोऽयमिति कीर्तनात् ॥ ७९ ॥ त्या वेळी स्त्रिया, बालके, तरुण आणि वृद्ध यांच्या तोंडून आनंदामुळे निर्माण झालेला "हे राम आले, हे राम आले" असा हा ध्वनी स्वर्गाला जाऊन भिडला. (७९) रथकुञ्जरवादिस्था अवतीर्य महीं गताः । ददृशुस्ते विमानस्थं जनाः सोमं इवाम्बरे ॥ ८० ॥ रथ, हत्ती, घोडे यांवर बसून आलेले लोक खाली उतरून जमिनीवर उभे राहिले. विमानात बसलेले राम त्या लोकांना आकाशातील चंद्राप्रमाणे दिसले. (८०) प्राञ्जलिर्भरतो भूत्वा प्रहृष्टो राघवोन्मुखः । ततो विमानाग्रगतं भरतो राघवं मुदा ॥ ८१ ॥ ववन्दे प्रणतो रामं मेरुस्थमिव भास्करम् । ततो रामाभ्यनुज्ञातं विमानं अपतद्भुवि ॥ ८२ ॥ त्यानंतर अतिशय आनंदित झालेल्या भरताने आपले हात जोडून रामांकडे तोंड करून वर पाहिले. तेव्हा विमानाच्या अग्रभागी बसलेले राघव भरताला मेरु पर्वतावरील सूर्याप्रमाणे दिसले. आनंदपूर्वक नम्र होऊन भरताने श्रीरामांना वंदन केले. त्यानंतर रामांच्या अनुज्ञेने ते विमान जमिनीवर खाली उतरले. (८१-८२) आरोपिता विमानं तद् भरतः सानुजस्तदा । राममासाद्य मुदितः पुनरेवाभ्यवादयत् ॥ ८३ ॥ त्यानंतर धाकटा भाऊ शत्रुघ्नानासह भरताला रामांनी त्या विमानात घेतले. रामांजवळ गेल्यावर आनंदित झालेल्या भरताने रामांना पुनः वंदन केले. (८३) समुत्थाय चिराद्दृष्टं भरतं रघुनन्दनः । भ्रातरं स्वाङ्कमारोप्य मुदा तं परिषस्वजे ॥ ८४ ॥ ततो लक्ष्मणमासाद्य वैदेहीं नाम कीर्तयन् । अभ्यवादयत प्रीतो भरतः प्रेमविह्वलः ॥ ८५ ॥ बर्याच काळानंतर भेटलेल्या भरताला रघुनंदनांनी स्वतःच्या जवळ बसवून त्याला आनंदानें आलिंगन दिले. त्यानंतर प्रेमाने विव्हल झालेल्या भरताने लक्ष्मणाची भेट घेतली आणि स्वतःचे नाव उच्चारीत आनंदित झालेल्या भरताने जानकीला अभिवादन केले. (८४-८५) सुग्रीवं जाम्बवन्तं च युवराजं तथाङ्गदम् । मैन्द द्विविद नीलांश्च ऋषभं चैव सस्वजे ॥ ८६ ॥ नंतर सुग्रीव, जांबवंत, युवराज अंगद, तसेच मैंद, द्विविद, नील आणि ऋषभ यांनाही भरताने आलिंगन दिले. (८६) सुषेणं च नलं चैव गवाक्षं गन्धमादनम् । शरभं पनसं चैव भरतः परिषस्वजे ॥ ८७ ॥ तसेच सुषेण, नल, गवाक्ष, गंधमादन, शरभ आणि पनस यांनाही भरताने आलिंगन दिले. (८७) सर्वे ते मानुषं रूपं कृत्वा भरतमादृताः । पप्रच्छुः कुशलं सौम्याः प्रहृष्टाश्च प्लवङ्गमाः ॥ ८८ ॥ अशा प्रकारे भरताकडून आदर दाखविल्या गेलेल्या त्या सौम्य व आनंदित झालेल्या वानरांनी मनुष्य रूप धारण करून भरताला त्याचे कुशल विचारले. (८८) ततः सुग्रीवमालिङ्ग्य भरतः प्राह भक्तितः । त्वत्सहायेन रामस्य जयोऽभूद् रावणो हतः ॥ ८९ ॥ त्वमस्माकं चतुर्णां तु भ्राता सुग्रीव पञ्चमः । शत्रुघ्नश्च तदा रामं अभिवाद्य सलक्ष्मणम् ॥ ९० ॥ सीतायाश्चरणौ पश्चात् ववन्दे विनयान्वितः । रामो मातरमासाद्य विवर्णां शोकविह्वलाम् ॥ ९१ ॥ जग्राह प्रणतः पादौ मनो मातुः प्रसादयन् । कैकेयीं च सुमित्रां च ननामेतरमातरौ ॥ ९२ ॥ त्यानंतर सुग्रीवाला आलिंगन देऊन, भरताने प्रेमपूर्वक म्हटले, "हे सुग्रीवा, तुझ्या सहाय्यामुळे रामांचा जय झाला आणि रावण मारला गेला. म्हणून हे सुग्रीवा, आम्हा चौघा भावांचा तू पाचवा भाऊ झाला आहेस." मग शत्रुघ्नाने विनयपूर्वक लक्ष्मणासह रामांना वंदन केले आणि त्यानंतर त्याने सीतेच्या चरणांना वंदन केले. शोकाने विव्हल आणि निस्तेज व कृश झालेल्या कौसल्या मातेजवळ जाऊन, रामांनी अतिशय नम्रपणाने तिच्या पायांना वंदन करून तिचे मन प्रसन्न केले. नंतर कैकेयी आणि सुमित्रा या इतर मातांना त्यांनी नमस्कार केला. (८९-९२) भरतः पादुके ते तु राघवस्य सुपूजिते । योजयामास रामस्य पादयोः भक्तिसंयुतः ॥ ९३ ॥ इतका काळ आदरपूर्वक व चांगल्या प्रकारे पूजिलेल्या रामांच्या त्या पादुका भरताने भक्तिपूर्वक रामांच्या पायांत घातल्या. (९३) राज्यं एतन् न्यासभूतं मया निर्यातितं तव । अद्य मे सफलं जन्म फलितो मे मनोरथः ॥ ९४ ॥ यत्पश्यामि समायातं अयोध्यां त्वामहं प्रभो । कोष्ठागारं बलं कोशं कृतं दशगुणं मया ॥ ९५ ॥ त्वत्तेजसा जगन्नाथ पालयस्व पुरं स्वकम् । इति ब्रुवाणं भरतं दृष्ट्वा सर्वे कपीश्वराः ॥ ९६ ॥ मुमुचुर्नेत्रजं तोयं प्रशशंसुः मुदान्विताः । ततो रामः प्रहृष्टात्मा भरतं स्वाङ्कगं मुदा ॥ ९७ ॥ ययौ तेन विमानेन भरतस्याश्रमं तदा । अवरुह्य तदा रामो विमानाग्र्यान् महीतलम् ॥ ९८ ॥ अब्रवीत्पुष्पकं देवो गच्छ वैश्रवणं वह । अनुगच्छानुजानामि कुबेरं धनपालकम् ॥ ९९ ॥ (आणि मग भरत रामांना म्हणाला,) "हे रामा, माझ्याजवळ इतके दिवस ठेव म्हणून असलेले हे राज्य आज मी तुम्हांला परत करीत आहे. हे प्रभो, अयोध्येत परत आलेल्या तुम्हाला मी आज पाहात आहे; यामुळे आज माझा जन्म सफल झाला आहे आणि माझे मनोरथ आज पूर्ण झाले आहेत, हे जगन्नाथा, तुमच्या प्रतापामुळे या राज्याची कोठारे, सैन्य, कोश हे माझ्याकडून दहापट केले गेले आहेत. आता तुम्ही स्वतःच या तुमच्या नगरीचे व राज्याचे पालन करा." अशा प्रकारे बोलणाऱ्या भरताला पाहून सर्व वानर श्रेष्ठांनी डोळ्यांतून आनंदाचे अश्रू ढाळले आणि आनंदित मनाने त्यांनी भरताची प्रशंसा केली. त्यानंतर प्रसन्न चित्ताने रामांनी भरताला पुनः आपल्याजवळ घेतले आणि त्याच विमानाने राम आनंदपूर्वक भरताच्या आश्रमाकडे गेले. तेथे त्या उत्तम विमानातून राम जमिनीवर उतरले आणि पुष्पक विमानास म्हणाले की, "जा, मी तुला आज्ञा देतो. आता यानंतर तू धनपालक कुबेराची सेवा कर आणि त्याला वाहून नेत जा." (९४-९९) रामो वसिष्ठस्य गुरोः पदाम्बुजं नत्वा यथा देवगुरोः शतक्रतुः । दत्त्वा महार्हासनमुत्तमं गुरो - रूपा विवेशाथ गुरोः समीपतः ॥ १०० ॥ त्यानंतर इंद्र ज्या प्रमाणे देवगुरू बृहस्पतीला वंदन करतो, त्या प्रमाणे रामांनी वसिष्ठ गुरूंच्या चरणकमळांना नमन केले आणि त्यांना एक अतिशय उत्तम बहुमूल्य आसन देऊन, नंतर राम स्वतः गुरूंच्याजवळ बसले. (१००) इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे चतुर्दशः सर्गः ॥ १४ ॥ इति श्रीमद्अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे चतुर्दशः सर्गः ॥ १४ ॥ |