॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीरामविजय ॥

॥ अध्याय अठरावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अखिलरघुनाथगुणसमुद्र ॥ रामउपासक तेथें जळचर ॥
ब्रह्मानंदें क्रीडती साचार ॥ प्रेमबळें मातोनियां ॥१॥
स्वानंदाचे उमाळे देती ॥ सारासारविचारें तळपती ॥
जीवनावांचोनि गति ॥ दुजी नसे तयांतें ॥२॥
अविद्याविपिन शुष्क बहुत ॥ कांहींच वासना न करी तेथ ॥
नंदनवनींचा मिलिंद सत्य ॥ अर्कींपुष्पीं बैसेना ॥३॥
जो करी सुधारसपान ॥ तो कंटाळे देखोनि वमन ॥
जेणें आत्मशयनीं केलें शयन ॥ तो भवकानन कां सेवी ॥४॥
कल्पद्रुम ज्याचे अंगणीं ॥ नित्य सुरभी दुभे सदनीं ॥
तो तृणबीज काढोनी ॥ कदाकाळीं भक्षीना ॥५॥
प्रारब्धयोगें वावरे शरीर ॥ ते विषयीं न धरिती आदर ॥
तैसे रघुवीर भजनीं सादर ॥ हेंही नेणती कदा ते ॥६॥
सतरावे अध्यायी गतकथार्थ ॥ श्रीरामें मारिला शक्रसुत ॥
सुग्रीव उसां मांडी देत ॥ देहांतसमयीं वाळीच्या ॥७॥
तों अंगदसमवेत तारा सती ॥ सत्वर पातली जेथें पति ॥
मग म्हणे अयोध्यापति ॥ काय ऐसें केलें तुवां ॥८॥
आतां टाकोनि एक बाण ॥ राघवा घेई माझा प्राण ॥
मी पतिसमागमें जाईन ॥ काय वांचोनि व्यर्थ आतां ॥९॥
कवळोनि वाळीचें प्रेत ॥ तारा अत्यंत शोक करीत ॥
ऐसें जाणोनि जनकजामात ॥ काय बोले तें ऐका ॥१०॥
कोण्या अर्थालागीं देख ॥ तारे तूं करिशी शोक ॥
येरी म्हणे पतिवियोगपावक ॥ तेणें दग्ध जाहल्यें मी ॥११॥
ताटिकांतक म्हणे ते काळीं ॥ कलेवराचें नाम वाळी ॥
तरी तें पडलें तुजजंवळी ॥ जैसें तैसें संचलें ॥१२॥
ज्यालागीं शोक करिसी बहुत ॥ तरी तें पडलें वाळीचें प्रेत ॥
येरी म्हणे हृदयस्थ ॥ आत्मा गेला निघोनियां ॥१३॥
मग बोले अयोध्याविहारी ॥ तूं काय आत्म्याची अंतुरी ॥
कीं शरीराची निर्धारीं ॥ सांगें मज विचारोनि ॥१४॥
शरीर तंव नाशिवंत ॥ आत्मा अविनाश शाश्वत ॥
तरी शोक करावा किमर्थ ॥ पाहें बरवें विचारोनि ॥१५॥
जैसा घटीं आणि रांजणीं ॥ एक बिंबला वासरमणी ॥
तैसा स्त्रीपुरुष अभिधानीं ॥ आत्मा एक अव्यंग ॥१६॥
घट मठ मोडितां निःशेष ॥ जेवीं न मोडेचि आकाश ॥
कीं तरंग मोडतां सागरास ॥ नाश नसे सहसाही ॥१७॥
मायामय लटिका खेळ ॥ जैसें नसतां दिसे मृगजळ ॥
कीं गंधर्वनगर केवळ ॥ मिथ्या भास आभासे ॥१८॥
सुधापानी स्वर्गी असती ॥ तेही नाश पावती कल्पांतीं ॥
जें जें दिसे आकाररीतीं ॥ नाश निश्चितीं असे तेथें ॥१९॥
भग्नपात्रीचें गेलें नीर ॥ माजी बिंबला राहिणीवर ॥
तो न दिसे म्हणोनि अपार ॥ शोक करी अज्ञानी ॥२०॥
मळे पिकवीन अपार ॥ यालागीं इच्छी रोहिणीनीर ॥
तें अदृश्य होतां साचार ॥ शोक करिती मूर्खत्वें ॥२१॥
सकळ पिंडांसमवेत ॥ ब्रह्मांड अवघें मिथ्याभूत ॥
आत्मा अक्षय शाश्वत ॥ शोक किमर्थ करिसी तूं ॥२२॥
ऐशीं रावणारीचीं वचनें ॥ अमृताहून गोड गहनें ॥
कीं बोधसमुद्रींचीं चिद्रत्‍नें ॥ तारेलागीं दीधलीं ॥२३॥
कीं तीं विश्रांतीची मंदिरें ॥ कीं अनुभवभींचीं नक्षत्रें ॥
कीं स्वानंदाचीं पात्रें ॥ मुखावरी उचंबळती ॥२४॥
कीं रामवचन अगस्ति थोर ॥ शोषिला तिचा शोकसागर ॥
कीं वचनरूपें दिनकर ॥ अज्ञानतिमिरनाशक ॥२५॥
मदनारीमित्राचे चरण ॥ तारेनें धरिले प्रीतीकरून ॥
श्वासोच्छ्वास टाकून ॥ तटस्थरूपें राहिली ॥२६॥
श्रीराम म्हणे तारेलागून ॥ माझें वचन मानीं प्रमाण ॥
सुग्रीवासी माळ घालून ॥ सुखेंकरून वर्तावें ॥२७॥
तारा म्हणे चापपाणी ॥ हे वेदविरुध्द दिसे करणी ॥
मग म्हणे कैवल्यदानी ॥ वचन मानीं माझें हें ॥२८॥
तूं पतिव्रतांमाजीं विख्यात ॥ तारे होशी यथार्थ ॥
अघटित घडवी रघुनाथ ॥ महिमा अद्‌भुत जयाचा ॥२९॥
देवाचें अघटित आचरण ॥ तें मानव करूं म्हणती आपण ॥
तरी तें नरकासी कारण ॥ होईल निश्चयें जाण पां ॥३०॥
अघटित घडवी रघुनंदन ॥ स्तंभाविण राहिलें गगन ॥
उदकावरी पृथ्वी संपूर्ण ॥ न बुडे सहसाही ॥३१॥
त्याचें कर्तृत्व करिती इतर ॥ तरी अनर्थासी नाहीं पार ॥
स्वेच्छा वर्ते सर्वेश्वर ॥ नव्हे म्हणे कोण त्यातें ॥३२॥
यावरी उत्तरक्रिया समस्त ॥ वाळीची करी सूर्यसुत ॥
अंगदावरी रघुनाथ ॥ प्रीति अत्यंत करीत पैं ॥३३॥
असो ते तारा सुंदरी ॥ रामें बोधिली ऐशियापरी ॥
सुग्रीवासी दिधली निर्धारीं ॥ शेसपाट भरोनियां ॥३४॥
यावरी तारेनें माळ ॥ सुग्रीवासी घातली तात्काळ ॥
जेणें प्रसन्न होय तमालनीळ ॥ आचरण तेंचि उत्तम ॥३५॥
सकल कपि जयजयकारें ॥ गर्जना करिती लहान थोरें ॥
नभ नादावलें भुभुःकारें ॥ महागजरें दुमदुमत ॥३६॥
राघव म्हणे सुग्रीवास ॥ आम्ही येथें राहिलों चार मास ॥
तुम्ही भोगोनि राज्यविलास ॥ सत्वर परतोनि येइंजे ॥३७॥
अर्कज म्हणे रघुनाथा ॥ आपण किष्किंधेसी चलावे आतां ॥
श्रीराम म्हणे माझिया भरता ॥ कारणें मी व्रतस्थ ॥३८॥
माझिया जिवालागाविण ॥ न करी मी मंगळस्नान ॥
आठवोनि भरताचे गुण ॥ रघुनंदन गहिंवरला ॥३९॥
मी चित्रकूटींहूनि निघतां ॥ भरतासि जाहली जे अवस्था ॥
ते सुग्रीवा नये सांगतां ॥ धीर चित्ता न धरवे ॥४०॥
जैसें बाळक परदेशीं ॥ माता टाकोनि जाय तयासी ॥
मजविणें माझ्या भरतासी ॥ तैसें जाहलें असेल ॥४१॥
सांगतां भरताचे गुण ॥ सद्रद जाहला रघुनंदन ॥
सुग्रीव धांवोनि धरी चरण ॥ लक्ष्मणही गहिंवरला ॥४२॥
असो याउपरी राजीवनेत्र ॥ बोलतां जाहला नीरदगात्र ॥
म्हणे सुग्रीवावरी धरीं छत्र ॥ सौमित्रा सत्वर जाऊनियां ॥४३॥
रघुपतीचे चरणांबुज ॥ वंदी तेव्हां सुमित्रातनुज ॥
आशीर्वाद देत भरताग्रज ॥ विजयी होई सर्वदा ॥४४॥
मग सौमित्रें जावोनि सत्वर ॥ सुग्रीवावरी धरिलें छत्र ॥
अमात्यपद पवित्र ॥ वाळीपुत्रासी दीधलें ॥४५॥
सवेंच परतोन लक्ष्मण ॥ आला जेथें जानकीजीवन ॥
जवळी उभा वायुनंदन ॥ कर जोडोनि सर्वदा ॥४६॥
किष्किंधेसी नित्य जाऊन ॥ राघवापाशीं येईं परतोन ॥
तों चातुर्मास लोटले पूर्ण ॥ सुग्रीवासी स्मरण नव्हेचि ॥४७॥
देखोनियां शरत्काळ ॥ बोलता झाला तमालनीळ ॥
म्हणे सुग्रीव जाहला सबळ ॥ राज्यमदेंकरूनियां ॥४८॥
विषयसंगें रमलें मन ॥ धनविद्यामदें गेला भुलोन ॥
परी सज्जनीं त्यास दंडोन ॥ सन्मार्गातें लावावें ॥४९॥
तरी किष्किंधेसी जाईं लक्ष्मणा ॥ आठव देईं सूर्यनंदना ॥
तो जरी न मानी माझिया वचना ॥ तरी वधोनि त्यासी येईंजे ॥५०॥
तारा रुमा दोघी घेऊन ॥ नित्य करी मद्यपान ॥
जो न करी माझे स्मरण ॥ त्यास अवश्य दंडावें ॥५१॥
जो ब्राह्मण देखोनि उपहास करी ॥ संत भक्तांचा द्वेष धरी ॥
सद्रुवचन अव्हेरी ॥ त्यासी अवश्य दंडावें ॥५२॥
निंदी हरिहरांची चरित्रें ॥ अपमानी जो सत्पात्रें ॥
अपूज्य पूजी आदरें ॥ त्यासी अवश्य दंडावें ॥५३॥
कायावाचामनें ॥ ज्यासी परपीडा अगत्य करणें ॥
आणि वेदविरूध्द ज्यासी वर्तणें ॥ त्यासी अवश्य दंडावें ॥५४॥
ऐश्वर्यमदें जे मातले ॥ हिंसा करितां न कंटाळले ॥
धर्मपंथ ज्यांनीं मोडिले ॥ त्यांसी अवश्य दंडावें ॥५५॥
कमळा आणि चक्रपाणी ॥ भेटों इच्छिती धर्मसदनीं ॥
कार्पण्यलोभें विघडी दोनी ॥ त्यास अवश्य दंडावें ॥५६॥
यावरी वीरचूडामणी ॥ किष्किंधेसी जाईं ये क्षणीं ॥
तो जरी माझें वचन अवगणी ॥ तरी तेचि क्षणीं वधावा ॥५७॥
वाळी निर्दाळिला ज्या बाणें ॥ त्याच शरें त्याचा प्राण घेणें ॥
ऐसें ऐकतां लक्ष्मणें ॥ राघवचरण वंदिले ॥५८॥
धनुष्यासी चढवूनि गुण ॥ वेगें चालिला उर्मिलाजीवन ॥
किष्किंधेसमीप येऊन ॥ लाविला बाण चापासी ॥५९॥
तों इकडे सूचना मारुति ॥ जाणवीत सुग्रीवाप्रति ॥
म्हणे एकला वनीं रघुपति ॥ चला वेगीं दर्शना ॥६०॥
सीताशुद्धीसी त्वरीत ॥ वानर धाडावे निश्चित ॥
तूं जाहलासि उन्मत्त बहुत ॥ रामकार्यार्थ नाठवे ॥६१॥
तारुण्यमदें आधींच उन्मत्त ॥ त्यावरीं मद्यपानीं रत ॥
उपरी धनमद दाटला बहुत ॥ मान विशेष त्यावरी ॥६२॥
जाले अत्यंत वाचाळपण ॥ कोणासी बोलों नेदी वचन ॥
जैसें मद्यपियाचें भाषण ॥ सव्यापसव्य नेणेचि ॥६३॥
तैसा तूं जाहलासी निश्चित ॥ स्त्रियांच्या संगें उन्मत्त ॥
विसरलासि स्वामिकायार्थ ॥ सूर्यसुत मग बोले ॥६४॥
जाहले धूर्णित लोचन ॥ बोले उदासीन वचन ॥
म्हणे वानरसेना मेळवून ॥ सिद्ध करा हळू हळू ॥६५॥
ऐसें बोलोनि सूर्यसुत ॥ राणीवसामाजीं प्रवेशत ॥
तों नगरद्वारीं उर्मिलानाथ ॥ येवोनि उभा ठाकला ॥६६॥
धनुष्यासि लाऊनि बाण ॥ क्षोभे जैसा प्रळयाग्न ॥
पळों लागले वानरगण ॥ येती शरण सुग्रीवा ॥६७॥
तेव्हां सुग्रीव गजबजिला ॥ म्हणे हनुमंता रक्षी मला ॥
येरु म्हणे सौमित्र कोपला ॥ तो नाटोपें कवणातें ॥६८॥
उभयदारांसमवेत ॥ शरण येत सूर्यसुत ॥
आणिक वानरभार समस्त ॥ सांगे हनुमंत समस्तां ॥६९॥
म्हणे हो नम्रता धरून ॥ अवघे घाल लोटांगण ॥
तैसेंच करिती वानरगण ॥ सुग्रीवासहित तेधवां ॥७०॥
तारा रुमा पुढें होऊन ॥ सौमित्रास मागती चुडेदान ॥
सुग्रीव धरी दृढ चरण ॥ ऊर्मिलापतीचे तेधवां ॥७१॥
सौमित्र म्हणे क्रोधायमान ॥ ऐसे तुम्ही निर्दय पूर्ण ॥
श्रीरामसच्चिदानंदघन ॥ वनीं सोडोनि राज्य करितां ॥७२॥
तो अनंत ब्रह्मांडनायक ॥ अयोध्यानाथ पुण्यश्र्लोक ॥
त्यास वनीं सांडोनि राज्यसुख ॥ गोड कैसें वाटलें ॥७३॥
हनुमंत बोले वचन ॥ सर्व अपराध क्षमा करून ॥
उठवावा सूर्यनंदन ॥ प्रीती करोन येसमयीं ॥७४॥
मग उठवोनि सूर्यसुत ॥ राघवानुज आलिंगित ॥
तंव वानरभार अद्‌भुत ॥ चहूंकडोन धांविन्नले ॥७५॥
वानरचमूसमवेत ॥ चालिला तेव्हां तमारिसुत ॥
जैसी नदी उचंबळोन बहुत ॥ मिळूं जाय जलार्णवा ॥७६॥
आवेशें वानरगण धांवत ॥ जैसें गोकुळ तृषाक्रांत ॥
सरितापंथें जलपानार्थ ॥ चपळत्वेंकरून लोटती ॥७७॥
कीं दात्याचें गृह लक्षून ॥ धांवती वेगें याचकजन ॥
कीं पाहावया सद्रुरुचरण ॥ सच्छिष्य येती त्वरेनें ॥७८॥
कीं लग्नघडी उरली थोडी ॥ देखोनि धांवती वऱ्हाडी ॥
कीं मिलिंदचक्रें धांवती तांतडी ॥ पद्मकरंद सेवावया ॥७९॥
तैसे आले रघुपतीजवळी ॥ लोटांगणें घालिती सकळी ॥
रामें आलिंगिला हृदयकमळीं ॥ मित्रतनुज आदरें ॥८०॥
आणीकही सकळ वानरां ॥ भेटला परत्रींचा सोयरा ॥
कर जोडोनि पुढारां ॥ किष्किंधेश स्तवीतसे ॥८१॥
जय निगमागमवंद्या रघुवीरा ॥ भक्तकैवारिया आनंदसमुद्रा ॥
पंचकद्वययरथपुत्रा ॥ विश्वनेत्रा विश्वपाळा ॥८२॥
शरणागतासी तूं वज्रपंजर ॥ कदा नुपेक्षी शाङर्‌रधर ॥
जैसें सबळ काष्ठ तारी नीर ॥ आपण वाढविलें म्हणोनि ॥८३॥
तिळभरी पाषाण न तरे जळीं ॥ वृक्षा तारी सर्व काळीं ॥
शरणागतांची माउली ॥ तैसाचि तूं श्रीरामा ॥८४॥
पद्मासी ढका न लावी भ्रमर ॥ काष्ठें तात्काळ करी चूर ॥
तेंवि भक्तपाळक अभक्तसंहार ॥ सीतावल्लभा करिसी तूं ॥८५॥
असो भूरत्‍नशुद्धीसी वानर ॥ जावया इच्छिती सर्वत्र ॥
मग बोले विषकंठमित्र ॥ जाऊंद्या सत्वर चहूंकडे ॥८६॥
अर्कसुतें पाठवून दूत ॥ वानर आणिले समस्त ॥
अष्टदश पद्में बल अद्‌भुत ॥समरीं कृतांता जिंकिती ॥८७॥
सुग्रीवें घालोन आण ॥ आणिले वेगें सप्तद्वीपींचे हरिगण ॥
समस्तांसी म्हणे सूर्यनंदन ॥ ऐका वचन सत्य माझें ॥८८॥
सीताशुद्धि करून तत्वतां ॥ जानकी भेटवूं रघुनाथा ॥
हें कार्य सिद्धीस न पावतां ॥ निजनगरासी न जावें ॥८९॥
सीता न भेटवितां रघुवीरा ॥ जो कोणी जाईल माघारा ॥
तो मात्रागमनी अवधारा ॥ ब्रह्महत्यारी पापिष्ठ ॥९०॥
त्यासी रासभावरी बैसवून ॥ तात्काळ छेदीन नासिका कर्ण ॥
पृथ्वीवरी फिरवीन ॥ स्वामिद्रोही म्हणोनियां ॥९१॥
सीताशुद्धि नोहे म्हणोन ॥ जो कोणी येईल परतोन ॥
त्यासी मी स्वहस्तें दंडीन ॥ छेदीन कर चरण तयांचे ॥९२॥
तंव द्वीपद्वीपींचे वानर ॥ गिरिकंदरीं जे राहणार ॥
मेरुपाठारवासी समग्र ॥ देत भुभुःकार पातले ॥९३॥
नाद न मायेचि गगनीं ॥ चालतां दणाणी मंगळजननी ॥
शेष कूर्म दचकले मनीं ॥ भुभुःकारध्वनि ऐकोनियां ॥९४॥
एक हरि पर्वत उचलोनि ॥ कंदुकवत् धाडी गगनीं ॥
एक वरचेवर झेलोनि ॥ भिकावित दुसरीकडे ॥९५॥
एक महावृक्ष उपडोनि बळें ॥ झोडोनियां भक्षिती फळें ॥
पृथ्वी अंबर समग्र भरलें ॥ रीसवानरीं तेधवां ॥९६॥
एक गगनपंथें उडिया घेती ॥ खालीं पाडूं पाहती गभस्ती ॥
खुंटली समीराची गति ॥ वाट न फुटे चालावया ॥९७॥
एक पश्चिमसमुद्रा धांवती ॥ तों अस्तासी गेला दिनपति ॥
एक समुद्रीं पुच्छें बुडविती ॥ ओढून काढिती जलचरें ॥९८॥
दशलक्ष योनि उदकांत ॥ नाना जातींचे जीव बहुत ॥
आणोनि राघवासी दावित ॥ चतुःसमुद्र धुंडोनियां ॥९९॥
नानाजातींचे वानर ॥ बहुत रंग बहुत विकार ॥
एक उभे राघवासमोर ॥ वांकुल्या दाविती विनोदें ॥१००॥
अति विशाळ धरोनि द्रुम ॥ आनंदें नाचती प्लवंगम ॥
एक गायन करिती सप्रेम ॥ डुल्लती राम ऐकोनियां ॥१॥
राग उपराग भार्येसहित ॥ मूर्च्छना शरीर कंपित ॥
सप्त ताल अति संगीत ॥ गीत प्रबंध खंडरचना ॥२॥
गद्यपद्यछंदगति ॥ ऐकतां तटस्थ होय गभस्ति ॥
ठायींच्या ठायीं विरती ॥ गायन ऐकतां तयांचें ॥३॥
असो यावरी मित्रपुत्र ॥ मित्रकुठमंडणातें समग्र ॥
दावीतसे सकळ भार ॥ पृथ्वी अंबर भरलें तें ॥४॥
जैसे कां जलतरंग ॥ सागरीं तळपती सवेग ॥
परि तो पाहतांचि सांग ॥ सागरचि एकला ॥५॥
तैसा ब्रह्मानंद सागर रघुवीर ॥ तेथींच्या लहरी ते वानर ॥
असो पृथ्वी दिशा अंबर ॥ वानरमय दिसतसे ॥६॥
ते रघुनाथाची मनोवृत्ति ॥ सकळ सुर अवतरले क्षितीं ॥
वानवेषें अपार शक्ति ॥ उचलूं भाविती भूगोल ॥७॥
नळ केला दळाधीश ॥ अठरा पद्में वानर विशेष ॥
बहात्तर कोटी रीस ॥ छप्पन्न कोटी गोलांगूळ ॥८॥
सीतावल्लभ म्हणे किष्किंधानाथा ॥ मज वाटते बहुत चिंता ॥
अन्न वस्त्रें या समस्तां ॥ कोठून आतां पुरवावीं ॥९॥
अर्कज म्हणे जनकजावरा ॥ यांसी फळ मूळ कंद आहारा ॥
न मिळे तरी भक्षिती समीरा ॥ तेणेंचि तृप्त होती हे ॥११०॥
अंबर तरी हे दिगंबर ॥ शस्त्रें पर्वत किंवा तरुवर ॥
ऐकतां मंगळभगिनीचा वर ॥ परम आश्चर्य मानित ॥११॥
सुग्रीव म्हणे राजीवनेत्रा ॥ हा खेळ तुझा कोमलगात्रा ॥
जाणोनि पुससी विचारा ॥ पदवी वानरां देऊनियां ॥१२॥
असो यावरी ताराकांत ॥ सकळ वानरां आज्ञापित ॥
त्रिभुवन धुंडोनि समस्त ॥ सीताशुद्धि करावी ॥१३॥
महीतळ अतळ वितळ ॥ सुतळ तळातळ महातळ ॥
सातवें तें रसातळ ॥ शोधावया धाडिले ॥१४॥
विलोकावे चतुर्दश लोक ॥ वैकुंठकैलासादि सकळिक ॥
धुंडोनियां आवश्यक ॥ सीताशोध करावा ॥१५॥
कैलासादि ब्रह्मलोक ॥ इंद्रचंद्रसूर्यलोक ॥
जनलोक तपोलोक ॥ सकळ शोधूं धाडिले ॥१६॥
वरुणलोक भूलोक ॥ यमलोक पितृलोक ॥
मृत्युलोकासी विशेष देख ॥ लोक चतुर्दश धुंडावे ॥१७॥
भरतखंड रमणकखंड ॥ हरित सत्य विधिविशेष प्रचंड ॥
केतु सुवर्ण द्राक्ष वितंड ॥ हरिखंड नववें पैं ॥१८॥
जंबुद्वीप शाकद्वीप ॥ शाल्मली क्रौंच द्राक्षाद्वीप ॥
अंग वंगादि दक्षद्वीप ॥ छप्पन्न देश शोधिले ॥१९॥
वनें उपवनें पर्वत ॥ ऋषिआश्रम विवरें मठ बहुत ॥
भक्तांची स्थानें बहुत ॥ शोधावया धाडिले ॥१२०॥
तीर्थें क्षेत्रें शोधिलीं नाना ॥ परी रामांगना कोठें दिसेना ॥
सीतेचें स्वरूप समजेना ॥ कष्टती हे बहुसाल ॥२१॥
सीता रामाची ज्ञानशक्ति ॥ तिची कैसी आह स्थिती ॥
न पुसतां व्यर्थचि भ्रमती ॥ अहंमती भुलोनियां ॥२२॥
सद्रुरूसी न रिघतां शरण ॥ कदापि नोहे आत्मज्ञान ॥
नवनीत मंथनावांचून ॥ हाता न चढे सर्वथा ॥२३॥
व्यर्थ हिंडतां भागले वानर ॥ दृष्टी न पडे सीता सुंदर ॥
परतोनि येती समग्र ॥ अधोवदन लज्जित ॥२४॥
मग तयांचें समाधान ॥ स्वयें करीत रघुनंदन ॥
दक्षिणादिशेसी कोण कोण ॥ गेले तेंचि ऐका हो ॥२५॥
मुख्य अंगद वाळिसुत ॥ नळ नीळ ऋषभ जांबुवंत ॥
पांचवा तो हनुमंत ॥ जो उमाकांत अवतरला ॥२६॥
आणिक एक शत वानरगण ॥ रघुपतीची आज्ञा घेऊन ॥
आक्रमिलें सकळीं गगन ॥ वायुवेगें करोनियां ॥२७॥
तंव तो कृतांतासी शिक्षा करणार ॥ महाराज जो रुद्रावतार ॥
अंगदासी म्हणे क्षण एक स्थिर ॥ तुम्हीं रहावें समस्तीं ॥२८॥
कांहीं आठवलें मानसीं ॥ पुसोन येतों रघुपतीसी ॥
ऐसें बोलोनि तयांसी ॥ वायुसुत परतला ॥२९॥
एकाएकीं येऊन ॥ दृढ धरिले रामचरण ॥
उभा ठाकला कर जोडून ॥ जैसा सुपर्ण विष्णुजवळी ॥१३०॥
तो बोले मंजुळ उत्तरीं ॥ म्हणे भार्गवजिता अवधारीं ॥
सीताशुद्धि वानरीं ॥ कैशी करावी तें सांगा ॥३१॥
सीतेचें स्वरूप कैसें स्वामी ॥ केवीं ओळखिजे प्लवंगमीं ॥
रूपरेखा कैशी आम्हीं ॥ जाणावी ती राघवा ॥३२॥
ऐसे हनुमंत बोलतां ॥ संतोषला कमलोद्‌भवपिता ॥
म्हणे तुझिया बुद्धीस तुळितां ॥ वाचस्पति हळुवट ॥३३॥
पुसिलें सीतास्वरूप ॥ तरी तें जाण माझेंचि रूप ॥
जैसी प्रभा आणि दीप ॥ एकरूप दोहींचें ॥३४॥
जैसी कनक आणि कांति ॥ कीं रजत आणि त्याची दीप्ति ॥
तैसी जाण सीता सती ॥ स्वरूप माझें अभेद ॥३५॥
सीतेच्या अंगींचा सुवास ॥ मृगमदाहूनि विशेष ॥
अर्धयोजन आसपास ॥ घ्राणदेवीसी संघटे ॥३६॥
खूण ऐकावी मारुति ॥ मुखीं कर्पूराची वसे दीप्ति ॥
माझें स्मरण अहोरातीं ॥ सीता सती करीतसे ॥३७॥
द्वादश हस्तप्रमाण साचार ॥ सीतेसमीप पाषाण तरुवर ॥
त्यांसी माझें स्मरण निरंतर ॥ खुण साचार ओळखें ॥३८॥
अंतरखूण सांग सीतेतें ॥ कैकयीगृहीं म्यां स्वहस्तें ॥
वल्कलें नेसविलीं तियेतें ॥ वनवासासी निघतां पैं ॥३९॥
मग विनवी समीरात्मज ॥ ऐसी खूण द्यावी मज ॥
जेणें अवनिजा मानी सहज ॥ दास मी तुमचा सत्य कीं ॥१४०॥
ऐकोनि मारुतीचें वचन ॥ तोषलें रघुनाथाचें मन ॥
धन्य धन्य म्हणवून ॥ शब्दरत्‍नें गौरविला ॥४१॥
धन्य तो अंजनी सज्ञान ॥ ऐसें प्रसवली निधान ॥
ज्याच्या प्रतापाखालीं संपूर्ण ॥ ब्रह्मांड ठेंगणें होय कीं ॥४२॥
प्रेम नावरे रघुनाथा ॥ हृदयीं आलिंगिलें हनुमंता ॥
वरदहस्त ठेवोन माथां ॥ करीं मुद्रिका घातली ॥४३॥
खूण दिघल अवतारमुद्रिका ॥ जेणें मानी जनककन्यका ॥
मग साष्टांगें रघुनायका ॥ हनुमंत वंदी ते काळीं ॥४४॥
पुढती विलोकी रामवदन ॥ हृदयीं रेंखिलें तैसेंचि ध्यान ॥
श्रीराम सद्रद होऊन ॥ बोलता जाहला ते काळीं ॥४५॥
कधीं येशील परतोन ॥ मग म्हणे वायुनंदन ॥
एक मास सरतां पूर्ण ॥ सीतादर्शन घेऊनि येतों ॥४६॥
ऐसें बोलून हनुमंत ॥ यशस्वी पूर्ण अयोध्यानाथ ॥
आनंदें गर्जोनि अकस्मात ॥ गगनपंथें उडाला ॥४७॥
जैसा योगभ्रष्ट जन्म पावत ॥ मागुतीं स्वरूपीं ऐक्य होत ॥
तैसे कपि वाट पाहात ॥ वायुसुत आला तेथें ॥४८॥
रामस्मरणें अवघे गर्जती ॥ सपक्ष नग जैसे उडती ॥
तैसे निराळमार्गे सर्व जाती ॥ अगस्तिदिशा लक्षोनी ॥४९॥
चपळ पाणिद्वयचरण ॥ गगनीं झेंपावती हरिगण ॥
यशस्वी अयोध्याप्रभु म्हणोन ॥ वारंवार गर्जती ॥१५०॥
अंतरिक्षीं जाती कपिगण ॥ तों देखिलें शापदग्ध वन ॥
वानरांचीं किरणें अडखळून ॥ मुरकुंडी वळोन पडियेले ॥५१॥
मागुती उड्डाण घेऊं जाती ॥ समस्तांच्या आकर्षिल्या शक्ती ॥
एकाकडे एक पाहती ॥ तटस्थ मारुति जाहला ॥५२॥
ऐसें काय कारण व्हावयासी ॥ तरी तेथें पूर्वीं दंडक ऋषी ॥
महातापसी तेजोराशी ॥ पुत्र त्यासी एक होता ॥५३॥
अष्टादश वरुषांचा सुत ॥ वनीं क्रीडतां अकस्मात ॥
वनदेवता अद्‌भुत ॥ भयानक धांविन्नली ॥५४॥
तिनें भक्षिला ऋषिनंदन ॥ दंडक तें जाणोन ॥
शापिलें तेव्हां तें कानन ॥ महाक्रोधेंकरूनियां ॥५५॥
जो या वनीं संचरेल पाणी ॥ तो मरण पावेल तेचि क्षणीं ॥
कपी सावध रामस्मरणीं ॥ म्हणोनि प्राण वांचले ॥५६॥
असो तो दंडकाचा नंदन ॥ विशाळ ब्रह्मराक्षस होऊन ॥
नित्य भक्षी जीव मारून ॥ द्वादशयोजनें भोंवते ॥५७॥
तेणें देखोन वानर ॥ मुख पसरोनि भयंकर ॥
भक्षावया आला सत्वर ॥ कपिवीर गजबजिले ॥५८॥
ऐसें देखोन वालिकुमर ॥ परमप्रतापी प्रचंडवीर ॥
निःशंक धांवोनि सत्वर ॥ राक्षस चरणीं धरियेला ॥५९॥
गगनीं गरगरां भोवंडिला ॥ उर्वीवरी आपटिला ॥
शरीर चूर जाहलें ते वेळां ॥ मृन्मयघटशकलासारिखें ॥१६०॥
ऐसा तो दंडकाचा पुत्र ॥ पावला तात्काळ पूर्वशरीर ॥
मग तेणें आपुला समाचार ॥ वानरांसी सांगितला ॥६१॥
वंदोनियां वानरगणा ॥ तात्काळ गेला पितृदर्शना ॥
पुढें रामदूतां पंथ सुचेना ॥ दिशा समजेना कोणती ॥६२॥
वृक्ष फळ ना जळ ॥ दग्ध वन दिसे सकळ ॥
क्षुधेतृषेनें सकळ ॥ वानर तेव्हां चडफडती ॥६३॥
ओंढवलें परम कठिण ॥ शोधिती शुष्क विपिन ॥
तंव एका विवरांतून ॥ पक्षीफळें आणिती ॥६४॥
त्या विवरद्वारीं येऊन ॥ थोकले तेव्हां वानरगण ॥
एक योजन लंबायमान ॥ तमेंकरून पूर्ण तें ॥६५॥
पुढें जाहला वायुकुमर ॥ मागें येती समस्त वानर ॥
जैसी संतांची कांस मुमुक्षु नर ॥ धरिती आत्मसाधनासी ॥६६॥
कीं वेदाध्ययनेंकरून ॥ वर्तती जैसे विद्वज्जन ॥
कीं खड्रधारें तीर्थस्नान ॥ करूनि स्वर्गस्थ होती तैसे ॥६७॥
हनुमंताच्या आधारें समस्त ॥ तैसे वानर विराजत ॥
परी कासाविस जाहले तेथ ॥ मूर्च्छा येऊनि पडती पै ॥६८॥
श्वासोच्छ्वास कोंडोन ॥ आकर्षिले सर्वांचे प्राण ॥
मग हनुमंतें पुच्छेंकरून ॥ सकळ बांधोन उचलिले ॥६९॥
योजन एक क्रमोनि विवर ॥ मारुति गेला सत्वर ॥
पुढें प्रकाश देखिला अपार ॥ वन सुंदर सफळ तें ॥१७०॥
पुष्पफळभारें द्रुम ॥ वाढिन्नले भेदीत व्योम ॥
त्या वृक्षांवरी प्लंगम ॥ चढावया शकती ना ॥७१॥
शरीर जाहले परम क्षीण ॥ यालागीं ऊर्ध्व न होती किरण ॥
तों सुप्रभा खेचरी येऊन ॥ उभी ठाकली तेधवां ॥७२॥
तियेप्रति पुसे वायुनंदन ॥ हेममय नगर पूर्ण ॥
फळोदक अमृतासमान ॥ कवणें हें स्थान निर्मिलें ॥७३॥
सुप्रभा सांगे पूर्ववृत्तांत ॥ ये स्थळीं होता मय दैत्य ॥
तेणें करून अद्‌भुत ॥ विष्णुसुत प्रसन्न केला ॥७४॥
त्याकारणें हें स्थान ॥ विरिंचीनें निर्मिलें येऊन ॥
त्यासी दिधलें वरदान ॥ विवरामाजी चिरंजीव तूं ॥७५॥
विवराबाहेर येतां जाण ॥ तात्काळचि पावसी मरण ॥
तो नानाकौटिल्यविंदान ॥ मंत्रहवन जाणतसे ॥७६॥
बहुत तप आचरोन ॥ दैत्यांचें इच्छी कल्याण ॥
मग इंद्रें विधीस प्रार्थून ॥ हेमा नारी निर्मिली ॥७७॥
स्वरूपें लावण्यें आगळी ॥ त्या विवरांत प्रवेशली ॥
मयदैत्यें देखिली ते वेळीं ॥ देखोनि तियेसी भूलला ॥७८॥
म्हणे मज तू वरी वो सुंदरी ॥ ते म्हणे चाल विवराबाहेरी ॥
मरण विसरोन दुराचारी ॥ उर्वीवरी पातला ॥७९॥
तों इंद्रें घालोनि वज्रप्रहार ॥ तेथेंचि मारिला मयासुर ॥
मग हेमेलागीं नगर ॥ ब्रह्मदेवें दिधलें ॥१८०॥
मग कित्येक काळ क्रमोनि देखा ॥ हेमा गेली सत्यलोका ॥
मी तिची परिचारिका ॥ वननगर रक्षीतसें ॥८१॥
देवां दुर्गम हें स्थान ॥ मज हेमा बोलिली वचन ॥
येथें येतील वानरगण ॥ तुज उद्धरोनि जाती ते ॥८२॥
हनुमंत सांगे पूर्ववृत्तांत ॥ सीताशुद्धीसी जातों समस्त ॥
क्षुधाक्रांत तृषाक्रांत ॥ या विवरांत प्रवेशलों ॥८३॥
मग तिनें घातला नमस्कार ॥ फळें पुष्पें आणोनि सत्वर ॥
वानरांसहित वायुकुमर ॥ षोडशोपचारीं पूजिला ॥८४॥
फळें उदक सेवून ॥ तृप्त जाहले वानरगण ॥
मग परतले तेथून ॥ परी विवरद्वार न सांपडे ॥८५॥
मग सुप्रभेसी म्हणे हनुमंत ॥ माते आम्हां दावीं शुद्ध पंथ ॥
तेव्हां ते खेचरी बोलत ॥ नेत्र समस्त झांका तुम्ही ॥८६॥
ऐसें ऐकतांचि वचन ॥ समस्तीं विवरीं झांकिले नयन ॥
सुमुहूर्ती एक मंत्र जपोन ॥ काय तेव्हां बोलिली ॥८७॥
मग म्हणे उघडा नेत्र ॥ तों समुद्रतीरीं उभे वानर ॥
सुप्रभा न दिसे साचार ॥ नवल थोर वर्तलें ॥८८॥
कपी आश्चर्य करिती ते क्षणीं ॥ जैसे संसारदुःखें वेष्टिले प्राणी ॥
त्यांसी निजज्ञान उपदेशूनि ॥ सद्रुरु काढी बाहेर ॥८९॥
कीं जळते घरींहून काढिलें ॥ कीं पूरीं बुडतां वांचविलें ॥
कीं शिर छेदितां सोडविलें ॥ तैसें केलें सुप्रभेनें ॥१९०॥
कृपाळु तो रविकुळभूषण ॥ तेणेंच ते दीधली धाडोन ॥
समुद्रतीरीं वानरगण ॥ ब्रह्मानंदें नाचती ॥९१॥
इकडे तें विवर त्यजूनि सुप्रभा ॥ किष्किंधेसी जाऊन सीतावल्लभा ॥
भेटली कौसल्यागर्भा ॥ दृष्टीभरोन न्याहाळित ॥९२॥
म्हणे ब्रह्मानंदा आत्मयारामा ॥ मज पावन करीं मेघश्यामा ॥
तीस ज्ञान सांगोन वदरिकाश्रमा ॥ राघवेंद्रें पाठविली ॥९३॥
काळांतरें बदरिकाश्रमीं ॥ देह ठेवोनि कैवल्यधामीं ॥
जैसा आर्द्रघट मिळे भूमीं ॥ तैसीच स्वरूपीं समरसली ॥९४॥
इकडे समुद्रतीरीं वानर ॥ चिंताक्रांत करिती विचार ॥
म्हणती शुद्धि न लागे अणुमात्र ॥ कैसा प्रकार करावा ॥९५॥
एक म्हणती परतोनि जावें ॥ काय रघुवीरांते सांगावें ॥
आमुचेनि हें कदा नोहे ॥ सीताशुद्धि म्हणोनियां ॥९६॥
तरी आतां द्यावे जी प्राण ॥ परी न जावें परतोन ॥
व्यर्थ वांचोन ॥ प्रेतवत संसारीं ॥९७॥
मग आणोन काष्ठभार ॥ ढीग रचिले पर्वताकार ॥
तात्काळचि वैश्वानर ॥ वानरवीरीं चेतविला ॥९८॥
तों जांबुवंत बोले वचन ॥ मीच आधीं सेवीन कृशान ॥
यावरी अंजनीगर्भरत्‍न ॥ ऋक्षपतीप्रती बोले ॥९९॥
म्हणे जांबुवंता सर्वज्ञा ॥ मजप्रती द्यावी आधीं आज्ञा ॥
यावरी तो ऋक्षराणा ॥ प्रत्युत्तर देतसे ॥२००॥
मी बहु वडील तुम्हांहून ॥ मज आधीं देइंजे हा मान ॥
मग बोले वायुनंदन ॥वडील आयुष्यें मी असे ॥१॥
जयाचे गांठीं आयुष्य फार ॥ तोचि वृद्ध म्हणावा साचार ॥
ज्याचें मरण जवळी निर्धार ॥ तोच धाकुटा बोलिजे ॥२॥
तुझें आयुष्य मागें सरलें ॥ माझें बहुत पुढें उरलें ॥
ज्याचे गांठीचें धन वेंचलें ॥ तरी भाग्यवंत नव्हे तो ॥३॥
असो मग जांबुवंताप्रती ॥ समस्त वानर विनविती ॥
श्रीराममुद्रांकित मारुति ॥ त्यासी आज्ञा देइंजे ॥४॥
मग हनुमंतें झांकून नेत्र ॥ हृदयीं आठविला कामांतकमित्र ॥
जो जीमूतवर्ण कोमलगात्र ॥ अति पवित्र नाम ज्याचें ॥५॥
स्मरण करूनि हनुमंत ॥ लोटला तेव्हां अग्निआंत ॥
उडीसरसा अग्नि शांत ॥ परम अद्‌भुत वर्तलें ॥६॥
वानर म्हणती कच्चें जाहलें ॥ काष्ठढीग पुढती रचिले ॥
आकाश कवळिलें ज्वाळें ॥ दिशा धूमें दाटल्या ॥७॥
सपक्ष नग येत अकस्मात ॥ तैसा लोटला हनुमंत ॥
तात्काळ जाहला अग्नि शांत ॥ न दिसे किंचित कोठें पैं ॥८॥
ऐसेंच केले तीन वेळ ॥ परी न मरे अंजनीबाळ ॥
आश्चर्य करिती कपी सकळ ॥ वर्णिती बळ मारुतीचें ॥९॥
कपी म्हणती हनुमंता ॥ आम्हांसी मरो दे तरी आतां ॥
येरू म्हणे सागरीं तत्वतां ॥ प्राण देऊं चला हो ॥२१०॥
तेथोन निघाले वानर ॥ तों समीप देखिला सरितेश्वर ॥
चिंताक्रांत वायुकुमर ॥ ध्यानस्थ बैसला एकीकडे ॥११॥
वरकड ते वानरगण ॥ चिंतातुर करिती शयन ॥
तों संपाती मुख पसरून ॥ भक्षावया पातला ॥१२॥
अरुणपुत्र तो पक्षी थोर ॥ जटायूचा ज्येष्ठ सहोदर ॥
मुख पसरोनि भयंकर ॥ वानरांसी भेडसावी ॥१३॥
जवळ देखोनि संपाती ॥ कपी एकमेकांसी बोलती ॥
जटायूसारिखा निश्चितीं ॥ दिसतसे द्विजराज हा ॥१४॥
म्हणती अनायासेंकरून ॥ आम्हांसी आलें जवळी मरण ॥
मग आठवून रघुनंदन ॥ नामस्मरणें गर्जती ॥१५॥
ज्याचें नाम घेतां संकटीं ॥ निर्विघ्न होय सकळ सृष्टी ॥
अपाय ते उपाय शेवटीं ॥ दुःख तें सुख होय ॥१६॥
असो नामघोषें कपी गर्जती ॥ तों पक्ष फुटले सपातीप्रती ॥
तेणें लोटांगण घातले क्षितीं ॥ जयजयकारेंकरूनियां ॥१७॥
म्हणे धन्य धन्य तुम्ही वानर ॥ केला माझा आजि उद्धार ॥
कोठें आहे रघुवीर ॥ माझा सहोदर तेथें असे ॥१८॥
बहुत दिवस जाहले ॥ परी त्याचा समाचार न कळे ॥
तों कपिवर बोलिले ॥ जटायु मारिला रावणें ॥१९॥
पितृव्य म्हणोनि रघुनाथ ॥ जटायूसी होता मानित ॥
त्याची उत्तरक्रिया समस्त ॥ राघवें केली निजांगें ॥२२०॥
जटायूचें सार्थक केलें ॥ संपातीनें आंग धरणीवरी टाकिलें ॥
म्हणे अहा ओखटें जाहलें ॥ दिशा शून्य बंधूविणें ॥२१॥
सूर्यमंडळ पहावयालागोनि ॥ दोघे गेलों होतो उडोनि ॥
तैं म्यां पक्षांखाली घालूनि ॥ जिवलग आपुला वांचविला ॥२२॥
माझे पक्ष दग्ध जाहले ते वेळीं ॥ मग म्यां भयें हांक फोडिली ॥
सूर्यरथीं अरुणें ऐकिली ॥ स्नेहेंकरूनि कळवळला ॥२३॥
मग सूर्यासी प्रार्थून ॥ वर दिधला मजलागून ॥
रामदूतांचें होतां दर्शन ॥ पक्ष संपूर्ण फुटतील ॥२४॥
जैसा पक्षहीन पर्वत ॥ तैसा पडिलों होतों येथ ॥
आजि पक्ष आले अकस्मात ॥ तुमच्या प्रतापें करूनियां ॥२५॥
हा चंद्रगिरि पर्वत ॥ ऐथें चंद्रनामा आहे महंत ॥
तो सद्रुरु माझा यथार्थ ॥ मज वेदांतज्ञान सांगे ॥२६॥
असो संपाती पुसे वानरातें ॥ कोठें जातां येणें पंथें ॥
कपी म्हणती सीताशुद्धीतें ॥ करूं जातों पक्षींद्रा ॥२७॥
संपाती मग बोलत ॥ पैल ते लंका दिसत ॥
सीता सती अशोकवनांत ॥ बैसली असे ध्यानस्थ ॥२८॥
तरी तुम्हीं समस्त वानरीं ॥ बैसावें माझिये पृष्ठीवरी ॥
नेऊन घालीन पैलपारीं ॥ लंकेमाजी येधवां ॥२९॥
अथवा एकोत्तरशत माझे सुत ॥ पृथक् पृथक् बैसा समस्त ॥
मग म्हणे जांबुवंत ॥ मार्गचि सांग आम्हांतें ॥२३०॥
संपाती बोले वचन ॥ ऐलतीरीं मलयागिरिचंदन ॥
त्याची शाखा शतयोजन ॥ लंकेमाजी प्रवेशली ॥३१॥
परी तेथें कृष्णसर्प असती ॥ तेथें तुमची न चले गती ॥
शतयोजन सरितापती ॥ लंकेसी परिघ आडवा ॥३२॥
नमस्कार करोनि वानरांसी ॥ संपाती गेला निजाश्रमासी ॥
मग कपी बैसले विचारासी ॥ जांबुवंतासहित पैं ॥३३॥
सागराचें जीवन ॥ रुंद असे शतयोजन ॥
उडावया सामर्थ्य पूर्ण ॥ कोणा किती सांगा तें ॥३४॥
परस्परें ते वानर ॥ करिती उडावयाचा विचार ॥
शतयोजनें समुद्र ॥ उडवे कोणासी एकदां ॥३५॥
जांबुवंत म्हणे मी जाईन ॥ परी भागले माझे चरण ॥
मी आणि वैद्य सुषेण ॥ दोघेजण श्रमलों बहु ॥३६॥
बळीचिये अद्‌भुत ॥ त्रिविक्रम जाहला वैकुंठनाथ ॥
सात प्रदक्षिणा एके दिवसांत ॥ केल्या आम्ही साक्षेपें ॥३७॥
तेणें भागले बहुत चरण ॥ त्याहीवरी वृद्धपण ॥
आणिक एकदां मेरूवरून ॥ उडी घातली म्यां तळवटीं ॥३८॥
तेव्हां सूर्यरथींचें चक्र ॥ मांडीस झगटलें जेवीं वज्र ॥
तेणें व्यथा अहोरात्र ॥ वृद्धपणीं जाचीतसे ॥३९॥
याकरितां नवजाय उड्डाण ॥ मग बोले वालिनंदन ॥
मी तेथें जाईन उडोन ॥ परी बाळ नेणतें ॥२४०॥
वानर म्हणती करावें काय ॥ या पैलतीरा कोण जाय ॥
जांबुवंत म्हणे वायुतनय ॥ याचे पाय धरा आतां ॥४१॥
तंव तो अंजनीचा नंदन ॥ करीत बैसला रामध्यान ॥
वानर घालिती लोटांगण ॥ करिती स्तवन मारुतीचें ॥४२॥
वानर म्हणती हनुमंतासी ॥ तूं सांग सखया किती उडसी ॥
हंसें आलें मारुतीसी ॥ काय तयांसी बोलिला ॥४३॥
अंजनी जैं मज प्रसवली ॥ बाळभूक बहु लागली ॥
तैं लक्ष योजनें उडी घातली ॥ गभस्तीवरी अकस्मात ॥४४॥
ऐसें वचन ऐकिलें ॥ वानर चरणीं लागले ॥
राघवें बळ संपूर्ण ओळखिलें ॥ तरीच मुद्रा दीधली ॥४५॥
तरी आपुलें कार्य आतां ॥ सत्वर साधीं हनुमंता ॥
ऐसें म्हणतां कपिनाथा ॥ स्फुरण आलें ते काळीं ॥४६॥
हनुमंत म्हणे वानरासी ॥ तुम्हीं पर्वत धरा पोटेंसी ॥
माझिया अंगवातें घंघाटेंसीं ॥ समुद्रांत पडाल कीं ॥४७॥
झाडें खोडें वानर कवळित ॥ महेंद्रपर्वतीं चढे हनुमंत ॥
जांबुवंतादि वानर समस्त ॥ कौतुक पाहती मारुतीचें ॥४८॥
अघवे जे कां वानर ॥ त्यांसी पुसोन वायुकुमर ॥
आधीं पुच्छाचा फडत्कार ॥ गाजविला हनुमंतें ॥४९॥
हृदयीं केलें रामस्मरण ॥ शक्तिदाता तूं म्हणोन ॥
अहंकर्ता भाव गाळून ॥ मन निमग्न रघुनाथीं ॥२५०॥
तो परात्पर राजहंस ॥ जो रविकुळदिनेश ॥
ब्रह्मानंद पुराणपुरुष ॥ हृदयीं आठविला मारुतीनें ॥५१॥
रामविजय ग्रंथ वरिष्ठ ॥ षड्रसान्नांचें भरलें ताट ॥
ज्यांसी श्रवणाची क्षुधा उत्कट ॥ ते जेवोत आदरें ॥५२॥
किष्किंधाकांड येथें संपलें ॥ पुढें सुंदरकांड आरंभिलें ॥
ग्रंथाचें पूर्वार्ध जाहलें ॥ उत्तरार्ध परिसा आतां ॥५३॥
ब्रह्मानंदा जानकीजीवना ॥ श्रीधरवरदा जगद्‌भूषणा ॥
अज अजिता अव्यय निर्गुणा ॥ अक्षय अभंग अव्यया ॥५४॥
स्वति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मिकीनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ अष्टादशोऽध्याय गोड हा ॥२५५॥
किष्किंधाकांड समाप्त ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥




GO TOP