तारया युक्तियुक्तया वाचा लक्ष्मणस्य प्रशमनम् -
|
तारेने लक्ष्मणांना युक्तीयुक्त वचनांच्या द्वारा शांत करणे -
|
तथा ब्रुवाणं सौमित्रिं प्रदीप्तमिव तेजसा । अब्रवील्लक्ष्मणं तारा ताराधिपनिभानना ॥ १ ॥
|
सौमित्र लक्ष्मण आपल्या तेजाने जणु प्रज्वलित होत होते. जेव्हा ते उपर्युक्त गोष्ट सांगून चुकले तेव्हा चंद्रमुखी तारा त्यांना म्हणाली - ॥१॥
|
नैवं लक्ष्मण वक्तव्यो नायं परुषमर्हति । हरीणामीश्वरः श्रोतुं तव वक्त्राद् विषेषतः ॥ २ ॥
|
’कुमार लक्ष्मण ! आपण सुग्रीवांना अशा प्रकारे बोलता कामा नये. ते वानरांचे राजे आहेत म्हणून त्यांना उद्देशून असे कठोर वचन बोलणे उचित नाही. विशेषतः आपल्या सारख्या सुहृदांकडून तर असे कटु वचन ऐकण्याचे ते कदापिही अधिकारी नाहीत. ॥२॥
|
नैवाकृतज्ञः सुग्रीवो न शठो नापि दारुणः । नैवानृतकथो वीर न जिह्मश्च कपीश्वरः ॥ ३ ॥
|
’वीर ! कपिराज सुग्रीव कृतघ्नही नाहीत, शठही नाहीत, अथवा क्रूरही नाहीत. तसेच ते असत्यवादी आणि कुटीलही नाहीत. ॥३॥
|
उपकारं कृतं वीरो नाप्ययं विस्मृतः कपिः । रामेण वीर सुग्रीवो यदन्यैर्दुष्करं रणे ॥ ४ ॥
|
’वीर लक्ष्मणा ! श्रीरामांनी यांच्यावर जो उपकार केला आहे, तो युद्धात दुसर्या कुणासाठीही दुष्कर आहे. तो उपकार हे वीर कपिराज कधीही विसरलेले नाही आहेत.॥४॥
|
रामप्रसादात् कीर्तिं च कपिराज्यं च शाश्वतम् । प्राप्तवानिह सुग्रीवो रुमां मां च परंतप ॥ ५ ॥
|
’परंतप सौमित्र ! श्रीरामांच्या कृपा प्रसादेच सुग्रीवांनी वानरांचे अक्षय राज्य, यश, रूमाला आणि मलाही प्राप्त केले आहे. ॥५॥
|
सुदुःखशयितः पूर्वं प्राप्येदं सुखमुत्तमम् । प्राप्तकालं न जानीते विश्वामित्रो यथा मुनिः ॥ ६ ॥
|
’प्रथम यांनी खूप दुःख सहन केले आहे. आता हे उत्तम सुख प्राप्त झाल्यावर ते यात असे रमून गेले की त्यांना प्राप्त समयाचे ज्ञान राहिले नाही. ज्याप्रमाणे विश्वामित्र मुनींना मेनकेत आसक्त झाल्या कारणाने समयाची शुद्ध-बुद्ध राहिली नाही, अगदी त्याच प्रमाणे (यांची स्थिति झाली)** ॥६॥ (**- हा प्रसंग बालकाण्डाच्या त्रेसष्टाव्या सर्गात आला आहे.)
|
घृताच्यां किल संसक्तो दश वर्षाणि लक्ष्मण । अहोऽमन्यत धर्मात्मा विश्वामित्रो महामुनिः ॥ ७ ॥
|
’लक्ष्मण ! असे म्हणतात की धर्मात्मा महामुनि विश्वामित्रांनी घृताची (मेनका) नामक अप्सरेमध्ये आसक्त होण्यामुळे दहा वर्षाच्या काळाला एक दिवसच मानले. ॥७॥
|
स हि प्राप्तं न जानीते कालं कालविदां वरः । विश्वामित्रो महातेजाः किं पुनर्यः पृथग्जनः ॥ ८ ॥
|
’कालाचे ज्ञान बाळगण्यांत श्रेष्ठ महातेजस्वी विश्वामित्रांनाही भोगासक्त झाल्यावर काळाचे भान राहिले नाही, तर मग दुसर्या साधारण प्राण्याला कसे राहू शकेल ? ॥८॥
|
देहधर्मगतस्यास्य परिश्रांतस्य लक्ष्मण । अवितृप्तस्य कामेषु कामं क्षंतुमिहार्हति ॥ ९ ॥
|
’कुमार लक्ष्मण ! आहार, निद्रा आणि मैथुन आदि जे देहाचे धर्म आहेत (जे पशुमध्येही समान रूपाने आढळून येतात) त्यात स्थित झालेल्या सुग्रीवांनी तर प्रथम दीर्घ काळपर्यंत दुःख भोगल्यामुळे ते थकून-भागून गेले होते आणि खिन्न झालेले होते. आता भगवान् श्रीरामांच्या कृपेने यांना जे काम-भोग प्राप्त झाले आहेत त्यांनी अजूनपर्यंत त्यांची तृप्ति झालेली नाही, म्हणून यांच्याकडून थोडीशी असावधानी घडली आहे. म्हणून परम कृपाळू श्रीरामांनी येथे यांचा हा अपराध क्षमा केला पाहिजे. ॥९॥
|
न च रोषवशं तात गंतुमर्हसि लक्ष्मण । निश्चयार्थमविज्ञाय सहसा प्राकृतो यथा ॥ १० ॥
|
’तात लक्ष्मण ! आपण यथार्थ गोष्ट न जाणता साधारण मनुष्याप्रमाणे एकाएकी क्रोधाच्या अधीन होता कामा नये. ॥१०॥
|
सत्त्वयुक्ता हि पुरुषाः त्वद्विधाः पुरुषर्षभ । अविमृश्य न रोषस्य सहसा यांति वश्यताम् ॥ ११ ॥
|
’पुरुषप्रवर ! आपल्या सारखे सत्वगुणसंपन्न पुरुष विचार न करता एकाएकी रोषाच्या वशीभूत होत नाहीत. ॥११॥
|
प्रसादये त्वां धर्मज्ञ सुग्रीवार्थे समाहिता । महान् रोषसमुत्पन्नः संरंभस्त्यज्यतामयम् ॥ १२ ॥
|
’धर्मज्ञ ! मी एकाग्र हृदयाने सुग्रीवांसाठी आपल्या कृपेची याचना करीत आहे. आपण क्रोधापासून उत्पन्न झालेल्या ह्या महान् क्षोभाचा परित्याग करावा. ॥१२॥
|
रुमां मां चाङ्गदं राज्यं धनधान्यपशूनि च । रामप्रियार्थं सुग्रीवः त्यजेदिति मतिर्मम ॥ १३ ॥
|
’माझा तर असा विश्वास आहे की सुग्रीव श्रीरामांचे प्रिय करण्यासाठी रूमाचा, माझा, कुमार अंगदाचा तसेच धन-धान्य आणि पशुंसहित संपूर्ण राज्याचाही परित्याग करू शकतात. ॥१३॥
|
समानेष्यति सुग्रीवः सीतया सह राघवम् । शशाङ्क्मिव रोहिण्या हत्वा तं राक्षसाधमम् ॥ १४ ॥
|
’सुग्रीव त्या अधम राक्षसाचा वध करून श्रीरामांची सीतेशी अशी भेट घडवून आणतील की जसा चंद्रम्याचा रोहिणीशी संयोग झाला असावा. ॥१४॥
|
शतकोटिसहस्राणि लङ्का्यां किल रक्षसाम् । अयुतानि च षट्त्रिंशत् सहस्राणि शतानि च ॥ १५ ॥
|
’असे सांगतात की लंकेत शंभर हजार कोटी, छत्तीस अयुत, छत्तीस हजार आणि छत्तीसशे राक्षस राहात आहेत. (*)॥१५॥ (*- आधुनिक गणनेच्या अनुसार ही संख्या दहा खर्व तीन लाख नव्याण्ण्व हजार सहाशे होते.)
|
अहत्वा तांश्च दुर्धर्षान् राक्षसान् कामरूपिणः । न शक्यो रावणो हंतुं येन सा मैथिली हृता ॥ १६ ॥
|
’ते सर्वच्या सर्व राक्षस इच्छानुसार रूप धारण करणारे तसेच दुर्जय आहेत. त्या सर्वांचा संहार केल्याशिवाय, ज्याने मैथिली सीतेचे अपहरण केले आहे त्या रावणाचा वध होऊ शकत नाही. ॥१६॥
|
ते न शक्या रणे हंतुं असहायेन लक्ष्मण । रावणः क्रूरकर्मा च सुग्रीवेण विशेषतः ॥ १७ ॥
|
’लक्ष्मणा ! कुणाची तरी मदत घेतल्याखेरिज एकट्या कुणा वीराकडून त्या राक्षसांचा संग्रामात वध केला जाणार नाही आणि क्रूरकर्मा रावणाचाही वध केला जाऊ शकत नाही. म्हणून सुग्रीवाकडून मदत घेण्याची विशेष आवश्यकता आहे. ॥१७॥
|
एवमाख्यातवान् वाली स ह्यभिज्ञो हरीश्वरः । आगमस्तु न मे व्यक्तः श्रवात् तस्य ब्रवीम्यहम् ॥ १८ ॥
|
’वानरराज वाली लंकेतील राक्षसांच्या या संख्येशी परिचित होते, त्यांनीच मला त्यांची याप्रकारे गणना सांगितली होती. रावणाने इतक्या सेनेचा संग्रह कसा केला, हे मला माहीत नाही. परंतु ही संख्या मी त्यांच्या (वालीच्या) मुखाने ऐकली होती. ती मी या समयी आपल्याला सांगत आहे. ॥१८॥
|
त्वत्सहायनिमित्तं वै प्रेषिता हरिपुंगवाः । आनेतुं वानरान् युद्धे सुबहून् हरिपुंगवान् ॥ १९ ॥
|
’आपल्या सहायतेसाठी सुग्रीवांनी बर्याचशा श्रेष्ठ वानरांना युद्धाच्या निमित्ताने असंख्य वानर वीरांची सेना एकत्र करण्यासाठी आज्ञा देऊन ठेवलेली आहे. ॥१९॥
|
तांश्च प्रतीक्षमाणोऽयं विक्रांतान् सुमहाबलान् । राघवस्यार्थसिद्ध्यर्थं न निर्याति हरीश्वरः ॥ २० ॥
|
’वानरराज सुग्रीव त्या महाबलाढ्य आणि पराक्रमी वीरांच्या येण्याची प्रतीक्षा करीत आहेत, म्हणून भगवान् श्रीरामांचे कार्य सिद्ध करण्यासाठी आता नगराच्या बाहेर निघू शकले नाहीत. ॥२०॥
|
कृता सुसंस्था सौमित्रे सुग्रीवेण यथा पुरा । अद्य तैर्वानरैः सर्वैः आगंतव्यं महाबलैः ॥ २१ ॥
|
’सौमित्र ! सुग्रीवांनी त्या सर्वांना एकत्र येण्यासाठी पहिल्यानेच जो अवधि निश्चित केलेला आहे त्यास अनुसरून त्या समस्त महाबली वानरांनी आजच येथे उपस्थित व्हावयास पाहिजे आहे. ॥२१॥
|
ऋक्षकोटिसहस्राणि गोलाङ्गूसलशतानि च । अद्य त्वामुपयास्यंति जहि कोपमरिंदम । कोट्योऽनेकास्तु काकुत्स्थ कपीनां दीप्ततेजसाम् ॥ २२ ॥
|
’शत्रुदमन लक्ष्मणा ! आज आपल्या सेवेमध्ये कोटी सहस्त्र (दहा अरब) अस्वले, शंभर करोड (एक अब्ज) लंगूर तसेच आणखी ही ज्यांचे तेज वाढलेले आहे असे कित्येक कोटी वानर उपस्थित होतील. म्हणून आपण क्रोधाचा त्याग करावा. ॥२२॥
|
तव हि मुखमिदं निरीक्ष्य कोपात् क्षतजसमे नयने निरीक्षमाणाः । हरिवरवनिता न यांति शांतिं प्रथमभयस्य हि शङ्किणताः स्म सर्वाः ॥ २३ ॥
|
’आपले मुख क्रोधाने भडकून उठले आहे आणि डोळे रोषाने लाल झाले आहेत. हे सर्व पाहून आम्हांला वानरराजांच्या स्त्रियांना शांती वाटत नाही आहे. आम्हा सर्वांना वाली वधासमयी उत्पन्न झालेल्या भयासमानच कुठल्या तरी अनिष्टाची आशंका होत आहे.’ ॥२३॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे पञ्चत्रिंशः सर्गः ॥ ३५ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा पस्तीसावा सर्व पूरा झाला. ॥३५॥
|