॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ बालकाण्ड ॥ ॥ षष्ठः सर्ग: ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] धनुर्भंग आणि विवाह - श्रीमहादेव उवाच - विश्वामित्रोऽथ तं प्राह राघवं सहलक्ष्मणम् । गच्छामो वत्स मिथिलां जनकेनाभिपालिताम् ॥ १ ॥ श्रीभगवान शंकर म्हणाले- त्यानंतर लक्ष्मण व श्रीरामचंद्रांना विश्वामित्र म्हणाले, "वत्सांनो, महाराज जनकांनी पालन केलेल्या मिथिला नगरीला आता आपण जाऊ या. (१) दृष्ट्वा क्रतुवरं पश्चादयोध्यां गन्तुमर्हसि । इत्युक्त्वा प्रययौ गङ्गामुत्तर्तुं सहराघवः । तस्मिन्काले नाविकेन निषिद्धो रघुनन्दनः ॥ २ ॥ तेथील उत्कृष्ट यज्ञोत्सव पाहून मग तुम्ही अयोध्या नगरीला परत जा." असे बोलून ते रघुनाथांना घेऊन, गंगा पार करून जाण्यास गंगेच्या तटावर आले. त्या वेळी नावाड्याने रघुनाथांना नावेत चढण्यास मनाई केली. (२) नाविक उवाच क्षालयामि तव पादपङ्कजं नाथ दारुदृषदोः किमन्तरम् । मानुषीकरणचूर्णमस्ति ते पादयोरिति कथा प्रथीयसी ॥ ३ ॥ नाविक म्हणाला-"हे नाथा, तुमच्या पायाला मनुष्य बनविणारे चूर्ण आहे, ही गोष्ट प्रसिद्ध आहे. (नुकतेच तुम्ही एका शिळेला स्त्री बनविले आहे.) मग शिळा आणि लाकूड यांत फरक तो काय आहे ? म्हणून नौके वर चढण्यापूर्वी मी तुमचे चरणकमल धुतो. (३) पादाम्बुजं ते विमलं हि कृत्वा पश्चात्परं तीरमहं नयामि । नोचेत्तरी सद्युवती मलेन स्याच्चेद्विभो विद्धि कुटम्बहानिः ॥४ ॥ अशा प्रकारे तुमचे चरणकमल धुऊन मग मी तुम्हांला श्रीगंगानदीच्या पलीकडल्या तीरावर घेऊन जाईन. नाहीतर हे विभो, तुमच्या चरणधुळीच्या स्पर्शाने जर माझी ही नौका सुंदर तरुणी बनली, तर माझ्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचे साधन उरणार नाही. " (४) इत्युक्त्वा क्षालितौ पादौ परं तीरं ततो गताः । कौशिको रघुनाथेन सहितो मिथिलां ययौ ॥ ५ ॥ असे म्हणून नावाड्याने श्रीरामांचे चरण धुतले. मग त्याने त्यांना आनंदाने पैलतीराला नेले. ते थून लक्ष्मण व श्रीराम यांच्यासह श्रीविश्वामित्र मिथिला नगरीला गेले. (५) विदेहस्य पुरं प्रातर्ऋषिवाटं समाविशत् । प्राप्तं कौशिकमाकर्ण्य जनकोऽतिमुदान्वितः ॥ ६ ॥ पूजाद्रव्याणि संगृह्य सोपाध्यायः समाययौ । दण्डवत्प्रणिपत्याथ पूजयामास कौशिकम् ॥ ७ ॥ प्रातःकाळी ते विदेहाच्या नगरात पोचल्यावर ऋषींच्यासाठी असणार्या निवासस्थानी उतरले. विश्वामित्र आल्याचे ऐकून अतिशय आनंदाने जनकराजा पूजेची सामग्री घेऊन, आपले पुरोहित शतानंद यांना बरोबर घेऊन तेथे आले आणि साष्टांग प्रणाम करून त्यांनी विश्वामित्रांची पूजा केली. (६-७) पप्रच्छ राघवौ दृष्ट्वा सर्वलक्षणसंयुतौ । द्योतयन्तौ दिशः सर्वाश्चन्द्रसूर्याविवापरौ ॥ ८ ॥ त्यानंतर सर्व लक्षणांनी संपन्न, जणू दुसर्या सूर्य-चंद्राप्रमाणे आपल्या तेजाने सर्व दिशांना देदीप्यमान करणार्या त्या दोघा रघुकुलातील कुमारांना पाहून, जनकांनी विचारले. (८) कस्यैतौ नरशार्दूलौ पुत्रौ देवसुतोपमौ । मनःप्रीतिकरौ मेऽद्य नरनारायणाविव ॥ ९ ॥ "देव-पुत्रांप्रमाणे असणारे हे दोन नरोत्तम कुणाचे पुत्र आहेत ? या प्रसंगी हे दोघे नर-नारायणाप्रमाणे माझ्या मनात प्रीती उत्पन्न करीत आहेत." (९) प्रत्युवाच मुनिः प्रीतो हर्षयन् जनकं तदा । पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १० ॥ तेव्हां महाराज जनकांना आनंद देत मुनिश्रेष्ठ विश्वामित्र प्रसन्नतापूर्वक म्हणाले, "हे दोन भाऊ राम आणि लक्ष्मण, राजा दशरथांचे पुत्र आहेत. (१०) मखसंरक्षणार्थाय मयानीतौ पितुः पुरात् । आगच्छन् राघवो मार्गे ताटकां विश्वघातिनीम् ॥ ११ ॥ शरेणैकेन हतवान्नोदितो मेऽतिविक्रमः । ततो ममाश्रमं गत्वा मम यज्ञविहिंसकान् ॥ १२ ॥ सुबाहुप्रमुखान्हत्वा मारीचं सागरेऽक्षिपत् । ततो गङ्गातटे पुण्ये गौतमस्याश्रमं शुभम् ॥ १३ ॥ गत्वा तत्र शिलारूपा गौतमस्य वधूः स्थिता । पादपङ्कजसंस्पर्शात्कृता मानुषरूपिणी ॥ १४ ॥ दृष्ट्वाहल्यां नमस्कृत्य तया सम्यक् प्रपूजितः । इदानीं द्रष्टकामस्ते गृहे माहेश्वरं धनुः ॥ १५ ॥ यज्ञाच्या रक्षणासाठी मी त्यांना त्यांच्या पित्याच्या अयोध्या नगरीतून आणले होते. येताना रस्त्यात माझ्या प्रेरणेने या अतिशय पराक्रमी रघुनाथांनी एकाच बाणाने जगाला त्रास देणार्या ताटकेला ठार केले. त्यानंतर माझ्या आश्रमात नेऊन माझ्या यज्ञाचा विध्वंस करणा-या सुबाहू इत्यादी राक्षसांना त्यांनी मारून टाकले आणि मारीचाला शेकडो योजने दूर समुद्रात फेकून दिले. नंतर गंगेच्या पावन तीरावरील महर्षी गौतमांच्या पवित्र आश्रमात जाऊन, तेथे त्यांनी शिळारूपात असणार्या गौतमपत्नीला पाहून आपल्या चरण-कमळाच्या स्पर्शाने मनुष्यरूप दिले. (११-१४) पूजितं राजभिः सर्वैर्दृष्टमित्यनुशुश्रुवे । अतो दर्शय राजेन्द्र शैवं चापमनुत्तमम् । दृष्ट्वायोध्यां जिगमिषुः पितरं द्रष्टुमिच्छति ॥ १६ ॥ अहल्येला पाहून रामांनी तिला नमरकार केला. त्यानंतर तिच्याकडून यथासांग पूजा स्वीकारून आता ते तुमच्या राजभवनात शंकरांचे पूज्य धनुष्य पाहण्यास आले आहेत. आम्ही असे ऐकले आहे की सर्व राजे ते धनुष्य केवळ पाहून गेले आहेत. (परंतु कोणीही त्यावर बाण लावू शकला नाही.) म्हणून हे राजेंद्रा, महादेवांचे ते अतिशय उत्तम धनुष्य तुम्ही त्यांना दाखवा. ते धनुष्य पाहिल्यावर, ते आपल्या मातापित्यांना भेटण्यास लौकरच अयोध्येला जाऊ इच्छितात." (१५-१६) इत्युक्तो मुनिना राजा पूजार्हौ इति पूजया । पूजयामास धर्मज्ञो विधिदृष्टेन कर्मणा ॥ १७ ॥ मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांनी असे सांगितल्यावर, धर्मज्ञ जनकांनी राम व लक्ष्मण पूजनीय आहेत, असे जाणून त्यांची विधिपूर्वक पूजा केली. (१७) जनक उवाच ततः सम्प्रेषयामास मंत्रिणं बुद्धिमत्तरम् । शीघ्रमानय विश्वेश चापं रामाय दर्शय ॥ १८ ॥ त्यानंतर राजा जनकांनी आपल्या अतिशय बुद्धिमान मंत्र्यास बोलाविले आणि श्रीविश्वेश्वर शंकराचे धनुष्य त्वरित आणवून ते रामचंद्राला दाखविण्यास सांगितले. (१८) ततो गते मंत्रिवरे राजा कौशिकमब्रवीत् । यदि रामो धनुर्धृत्वा कोट्यामारोपयेद्गुणम् ॥ १९ ॥ तदा मयात्मजा सीता दीयते राघवाय हि । तथेति कौशिकोऽप्याह रामं संवीक्ष्य सस्मितम् ॥ २० ॥ मंत्री निघून गेल्यावर राजा जनक विश्वामित्रांना म्हणाले "ते धनुष्य सज्ज करून जर रामचंद्र त्याला दोरी लावतील तर मी रामांना माझी कन्या सीता देईन." तेव्हा स्मित करीत रामांकडे पाहून विश्वामित्रही म्हणाले, "ठीक आहे. (१९-२०) शीघ्रं दर्शय चापाग्र्यं रामायमिततेजसे । एवं ब्रुवति मौनीश आगताश्चापवाहकाः ॥ २१ ॥ चापं गृहीत्वा बलिनः पङ्चसाहस्रसङ्ख्यकाः । घण्टाशतसमायुक्तं मणिवज्रादिभूषितम् ॥ २२ ॥ हे राजा, तुम्ही लागलीच ते श्रेष्ठ धनुष्य अत्यंत तेजस्वी रामांना दाखवा." ते मुनिश्रेष्ठ असे बोलत आहेत तोच अतिशय बलवान असे पाच हजार धनुष्यवाहक धनुष्य घेऊन तेथे आले. त्या धनुष्याला शेकडो घंटा बांधलेल्या होत्या. तसेच हिरे इत्यादी रत्नानी ते मढविले होते. (२१-२२) दर्शयामास रामाय मंत्री मंत्रयतां वरः । दृष्ट्वा रामः प्रहृष्टात्मा बद्ध्वा परिकरं दृढम् ॥ २३ ॥ गृहीत्वा वामहस्तेन लीलया तोलयन् धनुः । आरोपयामास गुणं पश्यत्स्वखिलराजसु ॥ २४ ॥ तेव्हा त्या मंत्रिश्रेष्ठाने श्रीरामांना ते धनुष्य दाखविले. प्रसन्नचित्त असणार्या श्रीरामांनी ते पाहताच कंबर कसून सहजपणे ते धनुष्य डाव्या हाताने उचलून वर धरले, आणि सर्व राजेलोकांच्या देखत त्यांनी धनुष्यावर दोरी चढविली. (२३-२४) ईषदाकर्षयामास पाणिना दक्षिणेन सः । बभञ्जाखिलहृत्सारो दिशः शब्देन पूरयन् ॥ २५ ॥ नंतर सर्वांच्या हृदयात साररूपाने असणार्या भगवान श्रीरामांनी आपल्या उजव्या हाताने ते धनुष्य थोडेसे ओढले 'तोच ते धनुष्य मोडून पडले आणि त्या आवाजाने दाही दिशा भरून गेल्या. (२५) दिशश्च विदिशश्चैव स्वर्गं मर्त्यं रसातलम् । तदद्भुतमभूत्तत्र देवानां दिवि पश्यताम् ॥ २६ ॥ आच्छादयन्तः कुसुमैर्देवाः स्तुतिभिरीडिरे । देवदुन्दुभयो नेदुर्ननृतुश्चाप्सरोगणाः ॥ २७ ॥ दिशा, उपदिशा, स्वर्ग-लोक, मर्त्य लोक आणि रसातळ इत्यादी सर्व लोक त्या आवाजाने दुमदुमून गेले. हे पाहणार्या स्वर्गलोकांतील देवांना आश्चर्य वाटले. देवांनी भगवान श्रीरामावर अमाप पुष्पवर्षाव केला आणि त्यांची स्तुती केली. देव नगारे वाजवू लागले, आणि अप्सरांचे समूह नाचू लागले. (२६-२७) द्विधा भग्नं धनुर्दृष्ट्वा राजालिङ्ग्य रघूद्वहम् । विस्मयं लेभिरे सीता मातरोऽन्तःपुराजिरे ॥ २८ ॥ धनुष्याचे दोन तुकडे झालेले पाहून महाराज जनकांनी रघुनाथांना आलिंगन दिले. इकडे अंतःपुरातील अंगणामध्यें जमलेल्या सीतेच्या माता अत्यंत आ श्चर्यचकित झाल्या. (२८) सीता स्वर्णमयीं मालां गृहीत्वा दक्षिणे करे । स्मितवक्त्रा स्वर्णवर्णा सर्वाभरणभूषिता ॥ २९ ॥ त्यानंतर सर्व अलंकारांनी विभूषित., सुहास्य-वदना, सुवर्णाप्रमाणे कांती असणारी सीता आपल्या उजव्या हातात सुवर्ण वरमाला घेऊन तेथे आली. (२९) मुक्ताहारैः कर्णपत्रैः क्वणच्चरणनूपुरा । दुकूलपरिसंवीता वस्त्रान्तर्व्यञ्जितस्तनी ॥ ३० ॥ मोत्यांचे हार, कर्णफुले, आणि रुणझुण आवाज करणारी नूपुरे व सुंदर पैठणी इत्यादी ल्यालेल्या सीतेचे सौंदर्य झळकत होते. (३०) रामस्योपरि निक्षिप्य स्मयमाना मुदं ययौ । ततो मुमुदिरे सर्वे राजदाराः स्वलङ्कृतम् ॥ ३१ ॥ गवाक्षजालरन्ध्रेभ्यो दृष्ट्वा लोकविमोहनम् । ततोऽब्रवीन्मुनिं राजा सर्वशास्त्रविशारदः ॥ ३२ ॥ तेव्हा स्मित करीत श्रीरामांच्या गळ्यात वरमाला घालताना तिला परम आनंद झाला. त्या वेळी सकल अलंकारांनी भुवन-मोहन श्रीरामचंद्रांचे ते रूप गवाक्षांच्या जाळ्यांतून पाहून जनक राजाच्या सर्व राण्या आनंदित झाल्या. मग सर्व शास्त्रांत विशारद असणार्या जनक राजांनी मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांना म्हटले. (३१-३२) भो कौशिक मुनिश्रेष्ठ पत्रं प्रेषय सत्वरम् । राजा दशरथः शीघ्रमागच्छतु सपुत्रकः ॥ ३३ । विवाहार्थं कुमाराणां सदारः सहमंत्रिभिः । तथेति प्रेषयामास दूतांस्त्वरितविक्रमान् ॥ ३४ ॥ "हे मुनिश्रेष्ठ विश्वामित्रा, तुम्ही सत्वर महाराज दशरथांना पत्र पाठवा की आपल्या कुमारांच्या विवाहासाठी आपले पुत्र, राण्या आणि मंत्री यांच्यासह त्यांनी येथे या." तेव्हां ' ठीक आहे ' असे बोलून विश्वामित्रांनी शीघ्रगामी दूतांना दशरथांकडे पाठविले. (३३-३४) ते गत्वा राजशार्दूलं रामश्रेयो न्यवेदयन् । श्रुत्वा रामकृतं राजा हर्षेण महताप्लुतः ॥ ३५ ॥ अयोध्येला जाऊन, त्या दूतांनी राजश्रेष्ठ श्रीदशरथांना श्रीरामांची मंगल कीर्तिवार्ता सांगितली. रामचंद्रानी केलेल्या त्या अद्भुत कृत्याची हकीकत ऐकून महाराज दशरथ परमानंदात बुडाले. (३५) मिथिलागमनार्थाय त्वरयामास मंत्रिणः । गच्छन्तु मिथिलां सर्वे गजाश्वरथपत्तयः ॥ ३६ ॥ मिथिला नगरीत जाण्यासाठी दशरथांनी त्वरा करण्यास मंत्र्यांना सांगितले. ते म्हणाले, " हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ. सैन्यांच्यासह सर्व लोक मिथिला पुरीला जाऊ देत. (३६) रथमानय मे शीघ्रं गच्छाम्यद्यैव मा चिरम् । वसिष्ठस्त्वग्रतो यातु सदार सहितोऽग्निभिः ॥ ३७ ॥ राममातॄः समादाय मुनिर्मे भगवान् गुरुः । एवं प्रस्थाप्य सकलं राजर्षिर्विपुलं रथम् ॥ ३८ ॥ महत्या सेनया सार्धमारुह्य त्वरितो ययौ । आगतं राघवं श्रुत्वा राजा हर्षसमाकुलः ॥ ३९ ॥ प्रत्युज्जगाम जनकः शतानन्दपुरोधसा । यथोक्तपूजया पूज्यं पूजयामास सत्कृतम् ॥ ४० ॥ त्वरित माझा रथ आणा. उशीर करू नका. मी आजच मिथिलेस जाण्यास निघेन. अरुंधती पत्नीसह आणि अग्नीसह माझे गुरू मुनिश्रेष्ठ वसिष्ठ हे रामाच्या मातांना बरोबर घेऊन सर्वांच्या पुढे चालू देत." अशा प्रकारे सर्वांना कूच करावयास लावून, आणि विशाल रथावर आरूढ होऊन, राजर्षी दशरथ आपल्या चतुरंग सेनेसह लागलीच मिथिला नगरीकडे निघाले. रघुकुलतिलक दशरथ आले आहेत, हे ऐकून महाराज जनक आनंदविभोर झाला. शतानंद नावाच्या पुरोहितासह जनक राजा दशरथांना सामोरा गेला आणि त्याने पूज्य दशरथांचा यथोचित सत्कार करून त्याची पूजा केली. (३७-४०) रामस्तु लक्ष्मणेनाशु ववन्दे चरणौ पितुः । ततो हृष्टो दशरथो रामं वचनमब्रवीत् ॥ ४१ ॥ त्यानंतर लक्षमणासहित श्रीरामांनी पित्याच्या चरणाना वंदन केले. तेव्हा आनंदित झालेले दशरथ श्रीरामांना म्हणाले. (४१) दिष्ट्या पश्यामि ते राम मुखं फुल्लाम्बुजोपमम् । मुनेरनुग्रहात्सर्वं सम्पन्नं मम शोभनम् ॥ ४२ ॥ "अरे रामा, मोठ्या भाग्याने आज मी प्रफुल्लित कमलाप्रमाणे असणारे तुझे मुख पाहात आहे. मुनिश्रेष्ठांच्या अनुग्रहाने सर्व प्रकारे माझे कल्याण झाले आहे." (४२) इत्युक्त्वाघ्राय मूर्धानमालिङ्ग्य च पुनः पुनः । हर्षेण महताविष्टो ब्रह्मानन्दं गतो यथा ॥ ४३ ॥ असे बोलून रामांच्या मस्तकाचे अवघ्राण करून आणि पुनः पुनः त्यांना आलिंगन देऊन, अत्यंत आनंदित झालेले दशरथ राजा जणू ब्रह्मानंदात बुडून गेले. (४३) ततो जनकराजेन मन्दिरे सन्निवेशितः । शोभने सर्वभोगाढ्ये सदारः ससुतः सुखी ॥ ४४ ॥ त्यानंतर जनकाने सर्व राजकुमार आणि राण्या यांच्यासह आनंदी दशरशांना, सर्व सोयींनी पूर्ण असणार्या परम सुंदर महालात उतरविले. (४४) ततः शुभे दिने लग्ने सुमुहूर्ते रघूत्तमम् । आनयामास धर्मज्ञो रामं सभ्रातृकं तदा ॥ ४५ ॥ त्यानंतर एका शुभ दिवशी शुभ लग्न असणार्या सुमुहूर्तावर, धर्मज्ञ जनकांनी श्रीरामांना भावांसह बोलावून घेतले. (४५) रत्नस्तम्भसुविस्तारे सुविताने सुतोरणे । मण्डपे सर्वशोभाढ्ये मुक्तापुष्पफलान्विते ॥ ४६ ॥ वेदविद्भिः सुसम्बाधे ब्राह्मणैः स्वर्णभूषितैः । सुवासिनीभिः परितो निष्ककण्ठीभिरावृते ॥ ४७ ॥ भेरीदुन्दुभिनिर्घोषैर्गीतनृत्यैः समाकुले । दिव्यरत्नाञ्चिते स्वर्ण पीठे रामं न्यवेशयत् ॥ ४८ ॥ त्यानंतर रत्नजडित स्तंभ असणार्या, सुंदर छत, मनोहर तोरणे, मोती, फुले, फळे यांनी युक्त तसेच सर्व प्रकारच्या शोभादायक वस्तूंनी संपन्न असा विस्तृत मंडपच घातला होता. तेथे सुवर्ण अलंकारांनी भूषित असे वेदवेत्ते ब्राह्मण होते. गळ्यात सोन्याचे अलंकार घातलेल्या सुवासिनी स्त्रिया तेथे आजूबाजूला वावरत होत्या. त्या विस्तीर्ण मंडपात जनकांनी श्रीरामचंद्रांना एका दिव्य रत्नजडित सोन्याच्या सिंहासनावर बसविले. त्या वेळी तुतार्या, नगारे इत्यादी वाद्यांच्या मंगल ध्वनीने तसेच नृत्य, गायन यांनी मंडप गजबजून गेला होता. (४६-४८) वसिष्ठं कौशिकं चैव शतानन्दः पुरोहितः । यथाक्रमं पूजयित्वा रामस्योभयपार्श्वयोः ॥ ४९ ॥ स्थापयित्वा स तत्राग्निं ज्वालयित्वा यथाविधि । सीतामानीय शोभाढ्यां नानारत्नविभूषिताम् ॥ ५० ॥ सभार्यो जनकः प्रायाद्रामं राजीवलोचनम् । पादौ प्रक्षाल्य विधिवत्तदपो मूर्ध्न्यधारयत् ॥ ५१ ॥ त्यानंतर वसिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र यांचे क्रमशः पूजन करून शतानंद पुरोहिताने त्यांना रामचंद्रांच्या दोन्ही बाजूंना बसविले. तेथे त्याने विधिपूर्वक अग्नी प्रज्वलित केला. नंतर नाना रत्नालंकारांनी विभूषित आणि अतिशय सुंदर अशा सीतेला घेऊन, महाराणीसह महाराज जनक कमलनयन रामांजवळ गेले, आणि विधिपूर्वक त्यांचे चरण धुऊन, ते चरणोदक त्यांनी आपल्या मस्तकावर धारण केले. (४९-५१) या धृता मूर्ध्नि शर्वेण ब्रह्मणा मुनिभिः सदा । ततः सीतां करे धृत्वा साक्षतोदकपूर्वकम् ॥ ५२ ॥ रामाय प्रददौ प्रीत्या पाणिग्रहविधानतः । सीता कमलपत्राक्षी स्वर्णमुक्तादिभूषिता ॥ ५३ ॥ दीयते मे सुता तुभ्यं प्रीतो भव रघूत्तम । इति प्रीतेन मनसा सीतां रामकरेऽर्पयन् ॥ ५४ ॥ मुमोद जनको लक्ष्मीं क्षीराब्धिरिव विष्णवे । उर्मिलां चौरसीं कन्यां लक्ष्मणाय ददौ मुदा ॥ ५५ ॥ हेच चरणोदक शिव, ब्रह्मदेव आणि इतर मुनिजन नेहमी आपल्या मस्तकावर धारण करतात. नंतर सीतेचा एक हात धरून, पाणिग्रहणाच्या विधीप्रमाणे, अक्षता व पाणी यांसह जनकांनी आनंदाने श्रीरामांना सीतेचे दान केले, आणि ते म्हणाले, "हे रघुश्रेष्ठा, सुवर्णालंकार, म्ती इत्यादींनी विभूषित कमलनयना अह्सी माझी कन्या सीता मी तुम्हांला देत आहे, याने त्म्ही प्रसन्न व्हा." अशा प्रकारे संतुष्ट मनाने सीतेला श्रीरामचंद्रांच्या करकमळी अर्पण करून, ज्याप्रमाणे भगवान श्रीविष्णूंच्या करकमळी लक्ष्मीला अर्पण केल्यावर क्षीरसागर हा आनंदमग्न झाला, त्याप्रमाणे जनक आनंदमग्न झाले. त्यानंतर त्यांनी आनंदाने आपली औरस कन्या ऊर्मिला लक्ष्मणाला दिली. (५२-५५) तथैव श्रुतिकीर्तिं च माण्डवीं भ्रातृकन्यके । भरताय ददावेकां शत्रुघ्नायापरां ददौ ॥ ५६ ॥ तसेच मांडवी आणि श्रुतकीर्ती यांतील आपल्या भावाची पहिली मुलगी भरताला आणि दुसरी शत्रुघ्नाला दिली. (५६) चत्वारो दारसम्पन्ना भ्रातरः शुभलक्षणाः । विरेजुः प्रजया सर्वे लोकपाला इवापरे ॥ ५७ ॥ अशा प्रकारे शुभ लक्षणांनी संपन्न आणि पत्नींनी युक्त असे ते सर्व चारही भाऊ आपल्या तेजाने साक्षात लोकपालांप्रमाणे शोधू लागले. (५७) ततोऽब्रवीद्वसिष्ठाय विश्वामित्राय मैथिलः । जनकः स्वसुतोदन्तं नारदेनाभिभाषितम् ॥ ५८ ॥ त्यानंतर मिथिलापती जनकांनी आपली मुलगी जानकी हिच्या बाबतीत नारदाने पूर्वी जो वृत्तांत सांगितला होता, तो सर्व वसिष्ठ आणि विश्वामित्र यांना सांगितला. (५८) यज्ञभूमिविशुद्ध्यर्थं कर्षतो लाङ्गलेन मे । सीतामुखात्समुत्पन्ना कन्यका शुभलक्षणा ॥ ५९ ॥ जनक म्हणाले- "एकदा यज्ञभूमीच्या शुद्धीसाठी मी जमीन नांगरीत असताना, शुभ लक्षणे असणारी ही चंद्रवदना कन्या सीता नांगराच्या अग्रभागातून उत्पन्न झाली आहे. (५९) तामद्राक्षमहं प्रीत्या पुत्रिकाभावभाविताम् । अर्पिता प्रियभार्यायै शरच्चन्द्रनिभानना ॥ ६० ॥ त्या वेळी प्रेमामुळे माझ्या मनात तिच्याविषयी माझी कन्या असा भाव उत्पन्न झाला. तेव्हा शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे मुख असणार्या या सीतेला मी माझ्या प्रिय पत्नीच्या स्वाधीन केले. (६०) एकदा नारदोऽभ्यागाद्विविक्ते मयि संस्थिते । रणयन्महतीं वीणां गायन्नारायणं विभुम् ॥ ६१ ॥ एकदा मी जेव्हा एकांत स्थानी बसलो होतो त्या वेळी आपली महती नावाची वीणा वाजवीत आणि मुखाने सर्वव्यापक नारायणाचे गुण गात महर्षी नारद माझ्याजवळ आले. (६१) पूजितः सुखमासीनो मामुवाच सुखान्वितः । शृणुष्व वचनं गुह्यं तवाभ्युदयकारणम् ॥ ६२ ॥ आदर-सत्कार झाल्यावर प्रसन्नतेने ते बसले आणि मला म्हणाले, "हे राजा, तुझ्या अभ्युदयाचे कारण असणारे हे परम गुह्य वचन ऐका. (६२) परमात्मा हृषीकेशो भक्तानुग्रहकाम्यया । देवकार्यार्थसिद्ध्यर्थं रावणस्य वधाय च ॥ ६३ ॥ जातो राम इति ख्यातो मायामानुषवेषधृक् । आस्ते दाशरथिर्भूत्वा चतुर्धा परमेश्वरः ॥ ६४ ॥ भक्तांवर अनुग्रह करण्याच्या इच्छेने, देवांचे कार्य सिद्ध करण्यासाठी व रावणाचा वध करण्यासाठी परमात्मा हृषीकेश माया-मानव वेष धारण करून जन्माला आले आहेत आणि ते राम या नावाने विख्यात आहेत. ते परमेश्वर आपल्या चार अंशांनी दशरथाचे पुत्र होऊन अयोध्येत राहात आहेत. (६३-६४) योगमायापि सीतेति जाता वै तव वेश्मनि । अतस्त्वं राघवायैव देहि सीतां प्रयत्नतः ॥ ६५ ॥ नान्येभ्यः पूर्वभार्यैषा रामस्य परमात्मनः । इत्युक्त्वा प्रययौ देव-गतिं देवमुनिस्तदा ॥ ६६ ॥ तसेच परमेश्वराची योगमाया हीसुद्धा सीता या रूपाने तुमच्या घरी जन्माला आली आहे. म्हणून तुम्ही प्रयत्नपूर्वक ही सीता श्रीरामांनाच द्या. अन्य कुणालाही देऊ नका. कारण ही सीता पूर्वीपासून परमात्म्या रामांची भार्या आहे." असे सांगून देवर्षी नारद आकाश मार्गाने निघून गेले. (६५-६६) तदारभ्य मया सीता विष्णोर्लक्ष्मीर्विभाव्यते । कथं मया राघवाय दीयते जानकी शुभा ॥ ६७ ॥ इति चिन्तासमाविष्टः कार्यमेकमचिन्तयम् । मत्पितामहगेहे तु न्यासभूतमिदं धनुः ॥ ६८ ॥ ईश्वरेण पुरा क्षिप्तं पुरदाहादनन्तरम् । धनुरेतत्पणं कार्यमिति चिन्त्य कृतं तथा ॥ ६९ ॥ सीतापाणिग्रहार्थाय सर्वेषां माननाशनम् । त्वत्प्रसादान्मुनिश्रेष्ठ रामो राजीवलोचनः ॥ ७० ॥ आगतोऽत्र धनुर्द्रष्टुं फलितो मे मनोरथः । अद्य मे सफलं जन्म राम त्वां सह सीतया ॥ ७१ ॥ एकासनस्थं पश्यामि भ्राजमानं रविं यथा । त्वत्पादाम्बुधरो ब्रह्मा सृष्टिचक्रप्रवर्तकः ॥ ७२ ॥ तेव्हापासून ही सीता म्हणजे भगवान विष्णूची भार्या लक्ष्मी आहे असेच मी समजत आहे. ही शुभलक्षणा जानकी कशा प्रकारे रघुनाथांना देता येईल या विचारात मी गुंतला असताना, मी एक युक्ति लढविली. पूर्वी श्रीमहादेवाने त्रिपुरासुराची पुरे जाळल्यावर हे धनुष्य माझ्या आजोबांच्या घरी ठेव म्हणून ते दिले होते. सीतेच्या पाणिग्रहणासाठी, सर्वांचा गर्वहरण करणारे हे धनुष्यच पण म्हणून ठेवावयास हवे, असा विचार मी केला. हे मुनिश्रेष्ठा, तुमच्या कृपेने कमलनयन राम हे धनुष्य पाहण्यास येथे आले; यामुळे माझा मनोरथ सिद्ध झाला. हे रामा, सूर्याप्रमाणे देदीप्यमान अशा तुम्हांला सीतेबरोबर एकाच आसनावर विराजमान झालेले पाहून, आज माझा जन्म सफळ झाला. हे रामा, तुमचे चरणोदक मस्तकावर धारण करूनच ब्रह्मदेव हा सृष्टिचक्राचा प्रवर्तक झाला आहे. (६७-७२) बलिस्त्वत्पादसलिलं धृत्वाभूद्दिविजाधिपः । त्वत्पादपांसुसंस्पर्शादहल्या भर्तृशापतः ॥ ७३ ॥ सद्य एव विनिर्मुक्ता कोऽन्यस्त्वत्तोऽधिरक्षिता ॥ ७४ ॥ तुमच्या चरणोदकाच्या सामर्थ्याने बलीला इंद्रपद प्राप्त झाले आणि तुमच्या चरणधुळीच्या स्पर्शाने अहल्या तत्काळच पतीच्या शापातून मुक्त झाली, तुमच्यापेक्षा दुसरा असा कोण बरे आमवा रक्षक आहे ? (७३-७४) यत्पादपङ्कजपरागसुरागयोगि- वृन्दैर्जितं भवभयं जितकालचक्रैः । यन्नमकीर्तनपरा जितदुःखशोका देवास्तमेव शरणं सततं प्रपद्ये ॥ ७५ ॥ कालचक्र जिंकणार्या योग्यांच्या समूहांनी तुमच्या पादकमलांच्या परागावर अतिशय प्रेम करून संसाराचे भय सुद्धा जिंकले आहे, तसेच ज्यांच्या नामकीर्तनात तत्पर होऊन देवांनी दुःख आणि शोक जिंकले आहेत, अशा त्या तुमच्या चरणी मी निरंतर शरण आलो आहे." (७५) इति स्तुत्वा नृपः प्रादाद्राघवाय महात्मने । दीनाराणां कोटिशतं रथानामयुतं तदा ॥ ७६ ॥ अश्वानां नियुतं प्रादाद्गजानां षट्शतं तथा । पत्तीनां लक्षमेकं तु दासीनां त्रिशतं ददौ ॥ ७७ ॥ अशा प्रकारे श्रीरामांची स्तुती करून, शंभर कोटी सुवर्ण मुद्रा, दहा हजार रथ, दहा लक्ष घोडे, सहाशे हत्ती, एक लक्ष पायदळ सैन्य आणि तीनशे दासी जनक महाराजांनी महात्म्या श्रीरामांना दिल्या. (७६-७७) दिव्याम्बराणि हारांश्च मुक्तारत्नमयोज्ज्वलान् । सीतायै जनकः प्रादात्प्रीत्या दुहितृवत्सलः ॥ ७८ ॥ अनेक दिव्य वस्त्रे तसेच मोती व रत्ने घालून तयार केलेले उज्ज्वल हार कन्यावत्सल जनकांनी प्रेमाने सीतेला दिले. (७८) वसिष्ठादीन्सुसंपूज्य भरतं लक्ष्मणं तथा । पूजयित्वा यथान्यायं तथा दशरथं नृपन् ॥ ७९ ॥ प्रस्थापयामास नृपो राजानं रघुसत्तमम् । सीतामालिङ्ग्य रुदतीं मातरः साश्रुलोचनाः ॥ ८० ॥ त्यानंतर वसिष्ठ इत्यादींची व्यवस्थित पूजा केल्यावर, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न, तसेच दशरथ राजा यांचा यथोचित सत्कार करून, जनक राजांनी रघुश्रेष्ठ महाराज दशरथाला निरोप दिला. त्या प्रसंगी रुदन करणार्या सीतेला आलिंगन देऊन, डोळ्यांत अश्रू आलेल्या माता सीतेला म्हणाल्या. (७९-८०) श्वश्रूशुश्रूषणपरा नित्यं राममनुव्रता । पातिव्रत्यमुपालम्ब्य तिष्ठ वत्से यथा सुखम् ॥ ८१ ॥ "मुली, सासूच्या सेवेत तत्पर होऊन तू सदा रामचंद्रांच्या मनाप्रमाणे वागून, पतिव्रता धर्माचा अवलंब करून आनंदात राहा." (८१) प्रयाणकाले रघुनन्दनस्य भेरीमृदङ्गानकतूर्यघोषः । स्वर्वासिभेरीघनतूर्यशब्दैः संमूर्च्छितो भूतभयङ्करोऽभूत् ॥ ८२ ॥ त्यानंतर रघुकुलातील श्रीरघुनाथांच्या प्रयाणाचे वेळी तुतार्या, मृदंग, आनक इत्यादी वाद्यांचा घोष व स्वर्गात राहणार्या देवतांनी वाजविलेल्या तुतार्या, मृदंग इत्यादींच्या आवाजात मिसळून वाढत गेला आणि त्या तुमुल ध्वनीमुळे सर्व प्राणी विस्मयचकित झाले. (८२) इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे बालकाण्डे षष्ठः सर्गः ॥ ६ ॥ षष्ठ: सर्गः समाप्तः ॥ ६ ॥ |