विश्वामित्रस्य सरोषं वचनमाकर्ण्य वसिष्ठेन राज्ञः प्रबोधितम् -
|
विश्वामित्रांचे रोषशपूर्ण वचन तथा वसिष्ठांनी राजा दशरथास समजाविणे -
|
तच्छ्रुत्वा वचनं तस्य स्नेहपर्याकुलाक्षरम् ।
समन्युः कौशिको वाक्यं प्रत्युवाच महीपतिम् ॥ १ ॥
|
राजा दशरथांच्या भाषणातील एकेका अक्षरात पुत्राप्रति भरलेला स्नेह जाणवत होता. ते ऐकून महर्षि विश्वामित्र अत्यंत कुपित होऊन म्हणाले - ॥ १ ॥
|
पूर्वमर्थं प्रतिश्रुत्य प्रतिज्ञां हातुमिच्छसि ।
राघवाणामयुक्तोऽयं कुलस्यास्य विपर्ययः ॥ २ ॥
|
"राजन् ! प्रथम मी काहीही मागितले तरी ते देण्याची प्रतिज्ञा करून आता तू ती प्रतिज्ञा तोडू इच्छित आहेस. प्रतिज्ञेचा असा भंग करणे रघुवंशीयांसाठी तर योग्य नाहीच. हे वर्तन या कुळाच्या विनाशाचे सूचक आहे. ॥ २ ॥
|
यदीदं ते क्षमं राजन् गमिष्यामि यथागतम् ।
मिथ्याप्रतिज्ञः काकुत्स्थ सुखी भव सुहृद्वृतः ॥ ३ ॥
|
'नरेश्वरा ! जर तुला असे करणेच उचित वाटत असेल तर मी आलो तसा निघून जातो. काकुत्स्थ कुलरत्ना ! आता तू आपली प्रतिज्ञा खोटी करून हितैषी सुहृदांनी घेरलेला राहून सुखी रहा." ॥ ३ ॥
|
तस्य रोषपरीतस्य विश्वामित्रस्य धीमतः ।
चचाल वसुधा कृत्स्ना देवानां च भयं महत् ॥ ४ ॥
|
बुद्धिमान् विश्वामित्र कुपित होताच सारी पृथ्वी कंपायमान झाली आणि देवांनाही मोठे भय उत्पन्न झाले. ॥ ४ ॥
|
त्रस्तरूपं तु विज्ञाय जगत् सर्वं महानृषिः ।
नृपतिं सुव्रतो धीरो वसिष्ठो वाक्यमब्रवीत् ॥ ५ ॥
|
त्यांच्या रोषाने सर्व जग त्रस्त झाले आहे हे जाणून उत्तम व्रताचे पालन करणारे धीर चित्त महर्षि वसिष्ठ राजास म्हणाले - ॥ ५ ॥
|
इक्ष्वाकूणां कुले जातः साक्षाद् धर्म इवापरः ।
धृतिमान् सुव्रतः श्रीमान् न धर्मं हातुमर्हसि ॥ ६ ॥
|
"महाराज ! आपण इक्ष्वाकुवंशी राजांच्या कुळात, जो साक्षात् प्रतिधर्मच आहे, अशा कुळात उत्पन्न झाला आहात. आपण धैर्यवान, उत्तम व्रतांचे पालन करणारे आणि श्रीसंपन्न आहात. आपण धर्माचा परित्याग करता कामा नये. ॥ ६ ॥
|
त्रिषु लोकेषु विख्यातो धर्मात्मा इति राघवः ।
स्वधर्मं प्रतिपद्यस्व नाधर्मं वोढुमर्हसि ॥ ७ ॥
|
'रघुकुलभूषण दशरथ मोठे धर्मात्मा आहेत' ही गोष्ट तिन्ही लोकात प्रसिद्ध आहे. म्हणून आपण आपल्या धर्माचे पालन केले पाहिजे. अधर्माचा भार आपल्या शिरावर घेऊ नये. ॥ ७ ॥
|
प्रतिश्रुत्य करिष्येति उक्तं वाक्यमकुर्वतः ।
इष्टापूर्तवधो भूयात् तस्माद् रामं विसर्जय ॥ ८ ॥
|
'मी अमुक कार्य करीन' अशी प्रतिज्ञा करून जो त्या वचनाचे पालन करीत नाही, त्याची यज्ञयागादि इष्ट आणि विहिरी, तलाव खोदविणे आदि पूर्त कर्मांच्या पुण्याचा नाश होऊन जातो, म्हणून आपण श्रीरामास विश्वामित्रांच्या बरोबर पाठवावे. ॥ ८ ॥
|
कृतास्त्रमकृतास्त्रं वा नैनं शक्ष्यन्ति राक्षसाः ।
गुप्तं कुशिकपुत्रेण ज्वलनेनामृतं यथा ॥ ९ ॥
|
'ते अस्त्रविद्या जाणत असोत वा नसोत, राक्षस त्यांचा (श्रीरामांचा) सामना करू शकणार नाहीत. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्निद्वारा सुरक्षित अमृतास कोणी हात लावू शकत नाही त्याचप्रमाणे कुशिकनंदन विश्वामित्र द्वारा सुरक्षित असलेल्या श्रीरामांचे ते राक्षस काहीही बिघडवू शकणार नाहीत. ॥ ९ ॥
|
एष विग्रहवान् धर्म एष वीर्यवतां वरः ।
एष विद्याधिको लोके तपसश्च परायणम् ॥ १० ॥
|
'हे श्रीराम आणि महर्षि विश्वामित्र साक्षात् धर्माच्या मूर्तिच आहेत. हे बलवानांत श्रेष्ठ आहेत. विद्येच्या द्वाराच हे जगात् सर्वांहून श्रेष्ठ झाले आहेत. तपस्येचे तर हे विशाल भांडारच आहेत. ॥ १० ॥
|
एषोऽस्त्रान् विविधान् वेत्ति त्रैलोक्ये सचराचरे ।
नैनमन्यः पुमान् वेत्ति न च वेत्स्यन्ति केचन ॥ ११ ॥
|
'चराचर प्राण्यांसहित तिन्ही लोकात नाना प्रकरची जी अस्त्रे आहेत, हे त्या सर्वांना जाणतात. यांना माझ्याशिवाय दुसरा कोणीही पुरुष उत्तम प्रकारे जाणत नाही आणि कोणी जाणणारही नाही. ॥ ११ ॥
|
न देवा नर्षयः केचिन्नामरा न च राक्षसाः ।
गन्धर्वयक्षप्रवराः सकिन्नरमहोरगाः ॥ १२ ॥
|
'देवता, ऋषि, राक्षस, गंधर्व, यक्ष, किन्नर तथा मोठमोठे नागही यांचा प्रभाव जाणत नाहीत. ॥ १२ ॥
|
सर्वास्त्राणि कृशाश्वस्य पुत्राः परमधार्मिकाः ।
कौशिकाय पुरा दत्ता यदा राज्यं प्रशासति ॥ १३ ॥
|
'प्रायः सर्व अस्त्रे प्रजापति कृशाश्वाचे परम धर्मात्मा पुत्र आहेत. त्यांना प्रजापतिने पूर्वकाली जेव्हां कुशिकनंदन विश्वामित्र राज्यशासन करीत होते तेव्हां समर्पित केलेले आहे. ॥ १३ ॥
|
तेऽपि पुत्राः कृशाश्वस्य प्रजापतिसुतासुताः ।
नैकरूपा महावीर्या दीप्तिमन्तो जयावहाः ॥ १४ ॥
|
'कृषाश्वाचे हे पुत्र प्रजापति दक्षाच्या दोन कन्यांची संताने आहेत. त्यांची अनेक रूपे आहेत. ती सर्वच्या सर्व महान् शक्तिशाली, प्रकाशमान आणि विजय देणारी आहेत. ॥ १४ ॥
|
जया च सुप्रभा चैव दक्षकन्ये सुमध्यमे ।
ते सुतेऽस्त्राणि शस्त्राणि शतं परमभास्वरम् ॥ १५ ॥
|
'प्रजापति दक्षाच्या दोन सुंदर कन्या आहेत. त्यांचे नावे आहेत जया आणि सुप्रभा. त्या दोघींनी एकशे परम प्रकाशमान अस्त्र-शस्त्रांना उत्पन्न केले आहे. ॥ १५ ॥
|
पञ्चाशतं सुताँल्लेभे जया लब्धवरा वरान् ।
वधायासुरसैन्यानामप्रमेयानरूपिणः ॥ १६ ॥
|
'त्यापैकी जयाने वर मिळवून पन्नास श्रेष्ठ पुत्रांना प्राप्त केले आहे जे अपरिमित शक्तिशाली आणि रूपरहित आहेत. ते सर्वच्या सर्व असुरांच्या सेनांचा वध करण्यासाठी प्रकट झाले आहेत. ॥ १६ ॥
|
सुप्रभाजनयच्चापि पुत्रान् पञ्चाशतं पुनः ।
संहारान् नाम दुर्धर्षान् दुराक्रामान् बलीयसः ॥ १७ ॥
|
'नंतर सुप्रभेनेही संहार नामक पन्नास पुत्रांना जन्म दिला, जे अत्यंत दुर्जय आहेत. त्यांच्यावर आक्रमण करणे कुणालाही सर्वथा कठीण आहे आणि तेही सर्वच्या सर्व अत्यंत बलिष्ठ आहेत. ॥ १७ ॥
|
तानि चास्त्राणि वेत्त्येष यथावत् कुशिकात्मजः ।
अपूर्वाणां च जनने शक्तो भूयस्य धर्मवित् ॥ १८ ॥
|
'हे धर्मज्ञ कुशिकनंदन त्या सर्व अस्त्र-शस्त्रांना उत्तम प्रकारे जाणतात. जी अस्त्रे आजपर्यंत उपलब्ध झालेली नाहीत त्यांनाही उत्पन्न करण्याची यांच्या ठिकाणी पूर्ण क्षमता आहे. ॥ १८ ॥
|
तेनास्य मुनिमुख्यस्य धर्मज्ञस्य महात्मनः ।
नि किंचिदस्त्यविदितं भूतं भव्यं च राघव ॥ १९ ॥
|
'रघुनंदन ! म्हणून या मुनिश्रेष्ठ धर्मज्ञ महात्मा विश्वामित्रांपासून भूत अथवा भविष्यातील कुठलीही गोष्ट लपून राहिलेली नाही. ॥ १९ ॥
|
एवंवीर्यो महातेजा विश्वामित्रो महायशाः ।
न रामगमने राजन् संशयं गन्तुमर्हसि ॥ २० ॥
|
'राजन् ! हे महातेजस्वी, महायशस्वी विश्वामित्र असे प्रभावशाली आहेत. म्हणून यांच्याबरोबर रामाला पाठवण्यात आपण कोणत्याही प्रकारचा संदेह करू नये. ॥ २० ॥
|
तेषां निग्रहणे शक्तः स्वयं च कुशिकात्मजः ।
तव पुत्रहितार्थाय त्वामुपेत्याभियाचते ॥ २१ ॥
|
महर्षि कौशिक स्वतःही त्या राक्षसांचा संहार करण्यास समर्थ आहेत. परंतु ते आपल्या पुत्राचे कल्याण करू इच्छितात म्हणून येथे येऊन आपल्यापाशी याचना करीत आहेत." ॥ २१ ॥
|
इति मुनिवचनात् प्रसन्नचित्तो
रघुवृषभश्च मुमोद पार्थिवाराग्र्यः ।
गमनमभिरुरोच राघवस्य
प्रथितयशाः कुशिकात्मजाय बुद्ध्या ॥ २२ ॥
|
महर्षि वसिष्ठांच्या या खुलासाने यश असणार्या रघुकुल शिरोमणि नृपश्रेष्ठ दशरथांचे मन प्रसन्न झाले. ते आनंदमग्न झाले आणि बुद्धीने विचार केल्यावर विश्वामित्रांच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्या बरोबर श्रीरामांचे जाणे त्यांच्या रुचिला अनुकूल प्रतीत होऊ लागले. ॥ २२ ॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे एकविंशः सर्गः ॥ २१ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा एकविसावा सर्ग समाप्त झाला. ॥ २१ ॥
|