॥ अद्‌भुत रामायणम् ॥

तृतीयः सर्गः

नारद-पर्वतयोः अम्बरीषराजसभायां आगमनम् -



तस्यैवं वर्त्तमानस्य कन्या कमल लोचना ।
श्रीमती नाम विख्याता सर्वलक्षणशोभिता ॥ १ ॥
अशा प्रकारे त्याचे कालक्रमण होत असता त्याला श्रीमती नावाची एक अत्यंत सुलक्षणी आणि सुंदर नेत्र असलेली अशी मुलगी झाली. १

प्रदानसमयं प्राप्ता देवमायेव शोभना ।
तस्मिन्काले मुनिः श्रीमान् नारदोऽभ्यागतो गृहम् ॥ २ ॥
देवोपम सौंदर्यवती अशी ती विवाहयोग्य झाल्यानंतर राजा अंबरीषाकडे श्रीमान् नारदमुनी आले. महातेजस्वी पर्वतही त्यांच्यासह होते. २

अम्बरीषस्य राज्ञो वै पर्वतश्च महाद्युतिः ।
तावुभावागतौ दृष्ट्वा प्रणिपत्य यथाविधि ॥ ३ ॥
त्या दोघा ऋषींना आलेले पाहून महातेजस्वी अंबरीषाने त्यांना प्रणिपात करून यथाविधी त्यांची पूजा केली. ३

अम्बरीषो महातेजाः पूजयामास तावृषी ।
कन्यां तां प्रेक्ष्य भगवान् नारदः प्राह विस्मितः ॥ ४ ॥
केयं राजन् महाभागा कन्या सुरसुतोपमा ।
ब्रूहि धर्मभृतां श्रेष्ठ सर्वलक्षणशोभिता ॥ ५ ॥
अंबरीशाच्या कन्येला पाहून नारद अत्यंत विस्मित झाले आणि त्यांनी विचारले - 'हे धर्मपरायण श्रेष्ठ राजन ! ही देवपुत्रीप्रमाणे लावण्यवती सुलक्षणी कन्या कोण आहे, सांग बरे.' ४-५

निशम्य वचनं तस्य राजा प्राह कृताञ्जलिः ।
दुहितेयं मम विभो श्रीमती नाम नामतः ॥ ६ ॥
त्यांचे बोलणे ऐकून राजा हात जोडून म्हणाला - 'हे महात्म्या, समर्था, ही माझी कन्या श्रीमती. ती विवाहयोग्य झाल्याने वरसंशोधनाचा योग्य झाली आहे.' ६

प्रदानसमयं प्राप्ता वरमन्विषती शुभा ।
इत्युक्तो मुनिशार्दूलस्तामैच्छन्नारदो द्विजः ॥ ७ ॥
राजाने असे सांगितल्यावर मुनिश्रेष्ठ नारदाच्या मनात तिच्या प्राप्तीची अभिलाषा निर्माण झाली. ऋषिश्रेष्ठ पर्वतालाही तिला प्राप्त करण्याची इच्छा होतीच. ७

पर्वतोऽपि मुनिस्तां वै चकमे सर्षिसत्तमः ।
अनुज्ञाप्य च राजानं नारदो वाक्यमब्रवीत् ॥ ८ ॥
रहस्याहूय धर्मात्मा मम देहि सुतामिमाम् ।
पर्वतोऽपि तथा प्राह राजानं रहसि प्रभुम् ॥ ९ ॥
तेव्हा राजाला बोलण्याची अनुज्ञा देऊन नारद एकांतात राजाला म्हणाले - 'हे धर्मात्म्या, ही तुझी कन्या तू मला अर्पण कर.' पर्वतानेही त्या राजाला एकांतात बोलावून तसेच सांगितले ८-९

तावुभौ प्राह धर्मात्मा प्रणिपत्य भयार्दितः ।
उभौ भवन्तौ कन्यां मे प्रार्थमानौ कथं त्वहम् ॥ १० ॥
करिष्यामि महाप्राज्ञौ शृणु नारद मे वचः ।च्
त्वञ्च पर्वत मे वाक्यं शृणु वक्ष्यामि यत्प्रभो ॥ ११ ॥
कन्येयं युवयोरेकं वरयिष्यति चेच्छुभा ।
तस्मै कन्यां प्रयच्छामि नान्यथा शक्तिरस्ति मे ॥ १२ ॥
राजा मात्र ते ऐकून घाबरला व त्या दोघांना नमस्कार करून म्हणाला - 'माझ्या एकाच कन्येचा हात आपण दोघेही मागत आहात. तेव्हा हे नारदा, हे बुद्धिमान पर्वता, अशा परिस्थितीत मी माझे वचन कसे बरे पूर्ण करावे ? तेव्हा आता मी जे सांगतो, ते उभयतांनी ऐकावे. ही माझी कन्या आपणा दोघांपैकी ज्या एकाला वरील, त्याला मी ती अर्पण करेन. यापेक्षा दुसरे काही देण्याची ताकद माझ्यात नाही.' १०-१२

तथेत्युक्त्वा तु तौ विप्रौ श्व आयास्याव एवहि ।
इत्युक्त्वा मुनिशार्दूलौ जग्मतुः प्रीतमानसौ ॥ १३ ॥
'ठीक आहे, उद्या आम्ही दोघे येऊ.' असे आनंदाने ते ऋषी श्रेष्ठ म्‍हणाले व तेथून निघून गेले. १३

वासुदेवपरो नित्यमुभौ ज्ञानवतां वरौ ।
विष्णुलोकं ततो गत्वा नारदो मुनिसत्तमः ॥ १४ ॥
प्रणिपत्य हृषीकेशं वाक्यमेतदुवाच ह ।
वृत्तान्तञ्च निवेद्याग्रे नाथ नारायणाव्यय ॥ १५ ॥
नंतर मुनिश्रेष्ठ नारद विष्णू लोकी गेले व कृष्णाला नमस्कार करून त्यांनी सर्व वृत्तांत त्याला कथन केला. आणि नंतर म्हणाले - 'हे भुवनेश्वरा ! नमस्कार. हे नारायणा, नंतर एकांतात मी तुला काही सांगणार आहे.' १४-१५

रहसि त्वां प्रवक्ष्यामि नमस्ते भुवनेश्वर ।
ततः प्रहस्य गोविन्दः सर्वात्मा कर्मठं मुनिम् ॥ १६ ॥
ब्रूहीत्याह स विश्वात्मा मुनिराह च केशवम् ।
त्वदीयो नृपतिः श्रीमानम्बरीषो महामतिः ॥ १७ ॥
तस्य कन्या विशालाक्षी श्रीमती नाम नामतः ।
परिणेतुमहं तां वै इच्छामि वचनं शृणु ॥ १८ ॥
पर्वतोऽयं मुनिः श्रीमान् तव भृत्यस्तपोनिधिः ।
तामैछत्सोऽपि भगवन्सनावाह जनाधिपः ॥ १९ ॥
अम्बरीषो महातेजाः कन्येयं युवयोर्वरम् ।
लावण्ययुक्तं वृणुयात् यदि तस्मै ददाम्यहम् ॥ २० ॥
तेव्हा सर्वात्मा श्रीकृष्ण हसून त्या कर्मठ मुनीला म्हणाले सांग. मुनी कृष्णाला म्हणाले - 'राजा अंबरीष तुझा भक्त आहे. त्याला श्रीमती नावाची विशाललोचना कन्या आहे. तिच्याशी विवाह करण्याची माझी इच्छा आहे. आता ऐक. श्रीमान् पर्वत नावाचा तपोनिधीही तुझा भक्त आहे. आणि त्याचीही तिच्याशी विवाह करण्याची इच्छा आहे. तेजस्वी अंबरीषाने सांगितले आहे की, तुम्हा दोघांपैकी जो कन्येला सुंदर वाटेल आणि पसंत पडेल त्याला तो आपली कन्या देईल.' १६-२०

इत्याहावां नृपस्तत्र तथेत्युक्त्वाप्यहं ततः ।
आगमिष्यामि ते राजन् श्वः प्रभाते गृहं प्रति ॥ २१ ॥
'ठीक आहे,' मी उद्या सकाळी तुझ्या घरी येईन असे म्हणून हे जगन्नाथा मी तुझ्याकडे आलो आहे. माझे प्रिय होईल असे तू कर. २१

आगतोऽहं जगन्नाथ कर्तुमर्हसि मे प्रियम् ।
वानराननवद्‌भाति पर्वतस्य मुखं यथा ॥ २२ ॥
तथा कुरु जगन्नाथ मम चेदिच्छसि प्रियम् ।
श्रीमतीं तु कुरु यथा नान्यंपश्येत्तथाविधम् ॥ २३ ॥
'मला हवे तसे जर तुला करायचे असेल, तर ज्यायोगे पर्वताचे मुख्य वानराप्रमाणे होईल, कर. मात्र त्याचे ते वानराप्रमाणे असलेले रुप केवळ श्रीमतीच पाहू शकेल, दुसरे कोणी नाही.' २२-२३

तथेत्युक्त्वा स गोविन्दः प्रहस्य मधुसूदनः ।
त्वयोक्तं तत्करिष्यामि गच्छ सौम्य ! यथासुखम् ॥ २४ ॥
'ठीक आहे,' असे म्हणून मधुसूदनाने स्मितहास्य केले आणि 'हे सौम्या, तू सांगितलेस त्याप्रमाणेच करीन. आता आनंदाने परत जा.' असे तो म्हणाला. २४

एवमुक्तो मुनिर्हृष्टः प्रणिपत्य जनार्दनम् ।
मन्यमानः कृतात्मानमयोध्यां वै जगाम सः ॥ २५ ॥
ते ऐकून मुनि अतिशय संतुष्ट झाले. त्यांनी जनार्दनाला नमस्कार केला आणि स्वतःला धन्य धन्य मानीत ते अयोध्येला गेले. २५

गते मुनिवरे तस्मिन् पर्वतोऽपि महामुनिः ।
प्रणम्य माधवं हृष्टो रहस्येनमुवाच ह ॥ २६ ॥
वृत्तान्तश्च निवेद्याग्रे नारदस्य जगत्पतेः ।
गोलाङ्गुलमुखं यद्वन्मुखं भाति तथा कुरु ॥ २७ ॥
ते मुनीवर निघून गेल्यानंतर मुनिश्रेष्ठ पर्वताने आनंदाने माधवाला प्रणाम केला. एकांतात त्यांना हे रहस्य सांगताना प्रथम नारदाचा वृत्तांत जगत्पतीला सांगून ते म्हणाले, नारदाचे मुख मर्कटाप्रमाणे होईल असे कर. पण ते केवळ श्रीमती पाहू शकेल, इतर कोणी नाही, असे कर. २६-२७

श्रीमती तु यथा पश्येन्नान्यं पश्येत्तथाविधम् ।
तच्छ्रुत्वा भगवान्विष्णुस्त्वयोक्तं च करोमि वै ॥ २८ ॥
गच्छ शीघ्रमयोध्यां त्वं मा वादीर्नारदस्य वै ।
त्वया मे सम्विदं यच्च तथेत्युक्त्वा जगाम सः ॥ २९ ॥
हे ऐकून, तू सांगितल्याप्रमाणे सर्व काही होईल. असे सांगून ते म्हणाले - 'आता तू ताबडतोब आयोध्येला जा, नारदाला मात्र यातले काही सांगू नको.' 'ठीक आहे, आपण सांगितल्या प्रमाणे करीन.' असे म्हणून तो निघून गेला. २८-२९

ततो राजा समाज्ञाय प्राप्तौ मुनिवरौ तदा ।
माङ्गल्यैर्विविधैर्भद्रैरयोध्यां ध्वजमालिनीम् ॥ ३० ॥
तेव्हा राजाला असे दिसले की दोन्ही मुनिश्रेष्ठ तिथे आले आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या पवित्र आणि मंगल पताकांनी युक्त होऊन अयोध्यानगरी चहूबाजूंनी पानाफुलांनी नटली आहे. ३०

मण्डयामास लाजैश्च पुष्पैश्चैव समन्ततः ।
अभिषिक्तगृहद्वारां सिक्ताङ्गणमहापथाम् ॥ ३१ ॥
दिव्यगन्धरसोपेतां धूपितां दिव्यधूपकैः ।
कृत्वा च नगरीं राजा मण्डयामास तां सभाम् ॥ ३२ ॥
घराची दारे तोरणांनी सजली आहेत. सडा घातलेले राजमार्ग दिव्य अशा रस-गंधांनी, युक्त अशा धूपांनी सुगंधित झाले आहेत. अशाप्रकारे नगरीला सजवून राजाने दिव्य गंध तसेच निरनिराळ्या प्रकारच्या रत्नानी सभेलाही मंडित केले आहे. ३१-३२

दिव्यैर्गन्धैस्तथा धूपै रत्‍नैश्च विविधैस्तथा ।
अलंकृतां मणिस्तम्भैर्नानामाल्योपशोभितैः ॥ ३३ ॥
परार्ध्यास्तरणोपेतैर्दिव्यैर्भद्रासनैर्वृताम् ।
नानाजनसमावेशैर्नरेन्द्रैरभिसंवृताम् ॥ ३४ ॥
निरनिराळ्या प्रकारच्या रत्नांनी आणि मळांनी स्तंभ अलंकृत केले आहेत. उत्तम प्रकारची आसने मांडली असून त्या मांडलेल्या आसनांवर अनेकांसह वर्तमान राजे लोक आसनस्थ झाले आहेत. ३३-३४

कृत्वा नृपेन्द्रस्तां कन्यामादाय प्रविवेश ह ।
सर्वाभरणसम्पन्ना श्रीरिवायतलोचना ॥ ३५ ॥
करसम्मितमध्याङ्गी पञ्चस्निग्धा शुभानना ।
स्त्रीभिः परिवृता दिव्या श्रीमती संस्थिता सती ॥ ३६ ॥
नंतर आपल्या अनेक सख्यांनी वेढलेल्या आणि लक्ष्मीप्रमाणे विशाल नेत्र असणाऱ्या आपल्या विवाहेच्छुक कन्येला घेऊन राजाने सभेत प्रवेश केला. मुलायम कांती असणाऱ्या त्या सुमुखीने आपल्या देहावर अनेक प्रकारचे अलंकार धारण केले होते. ३५-३६

सभा तु सा भूमिपतेः समृद्धा
     मणिप्रवेकोत्तमरत्‍नचित्रा ।
न्यस्तासना माल्यवती सुगन्धा
     तामन्वयुस्ते सुरराजवर्याः ॥ ३७ ॥
राजाची ती सभा अनेक रत्नांनी युक्त होती. मग हातामध्ये सुगंधित पुष्पमाला धारण केलेली ती राजकन्या तेथील एका आसनावर विराजमान झाली. इतरांनीही तिचे अनुकरण केले. ३७

अथाययौ ब्रह्मवरात्मजो महां-
     स्त्रैविद्यवृद्धोभगवान्महात्मा ।
सपर्वतो ब्रह्मविदां वरिष्ठो
     महामुनिर्नारद आजगाम ॥ ३८ ॥
नंतर सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ते, त्रैविद्यांचे वरिष्ठ जाणकार, ज्ञानवृद्ध महात्मा असे ब्रह्मदेवाचे सुपुत्र, मुनिश्रेष्ठ नारद पर्वतासह तेथे उपस्थित झाले. ३८

इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये अद्‌भुतोत्तरकाण्डे
नारदपर्वत सभाप्रवेशो नाम तृतीयः सर्गः ॥ ३ ॥
नारद-पर्वत सभाप्रवेशनामक तृतीय सर्ग समाप्त.

GO TOP