रावणेन स्वपराक्रमस्य वर्णनं सीतया तस्य भर्त्सनं च -
|
रावणद्वारा आपल्या पराक्रमाचे वर्णन आणि सीतेच्या द्वारे त्याची कडक शब्दात कान उघाडणी -
|
एवं ब्रुवत्यां सीतायां संरब्धः परुषं वचः ।
ललाटे भ्रुकुटीं कृत्वा रावणः प्रत्युवाच ह ॥ १ ॥
|
सीतेने असे म्हटल्यावर रावण फारच रागवला आणि भुवया कपाळावर चढवून तो कठोर वाणीने म्हणाला - ॥१॥
|
भ्राता वैश्रवणस्याहं सापत्नो वरवर्णिनि ।
रावणो नाम भद्रं ते दशग्रीवः प्रतापवान् ॥ २ ॥
|
वरवर्णिनी ! मी कुबेराचा सावत्र भाऊ परम प्रतापी दशग्रीव रावण आहे. तुझे भले होवो. ॥२॥
|
यस्य देवाः सगन्धर्वाः पिशाचपतगोरगाः ।
विद्रवन्ति सदा भीता मृत्योरिव सदा प्रजाः ॥ ३ ॥
येन वैश्रवणो भ्राता वैमात्रः कारणान्तरे ।
द्वन्द्वमासादितः क्रोधाद् रणे विक्रम्य निर्जितः ॥ ४ ॥
|
ज्याप्रमाणे प्रजा मृत्युच्या भयाने नेहमी घाबरत असते त्या प्रकारेच देवता, गंधर्व, पिशाच्च, पक्षी आणि नाग सदा ज्यांच्यामुळे भयभीत होऊन पळून जातात, ज्याने काही कारणामुळे आपला सावत्र भाऊ कुबेर यांच्याशी द्वंद युद्ध केले आणि क्रोधपूर्वक पराक्रम करून रणभूमीमध्ये त्यास परास्त केले तोच रावण मी आहे. ॥३-४॥
|
यद्भयार्तः परित्यज्य स्वमधिष्ठानमृद्धिमत् ।
कैलासं पर्वतश्रेष्ठमध्यास्ते नरवाहनः ॥ ५ ॥
|
माझ्याच भयाने पीडित होऊन नरवाहन कुबेराने आपली समृद्धशालिनी पुरी लंका हिचा त्याग करून या समयी पर्वतश्रेष्ठ कैलासाचा आश्रय घेतला आहे. ॥५॥
|
यस्य तत् पुष्पकं नाम विमानं कामगं शुभम् ।
वीर्यादावर्जितं भद्रे येन यामि विहायसम् ॥ ६ ॥
|
भद्रे ! ज्यांचे सुप्रसिद्ध पुष्पक नामक सुंदर विमान, जे इच्छेनुसार चालणारे आहे मी पराक्रमाने जिंकले आहे आणि विमानद्वारा मी आकाशात विचरत असतो. ॥६॥
|
मम संजातरोषस्य मुखं दृष्ट्वैव मैथिलि ।
विद्रवन्ति परित्रस्ताः सुराः शक्रपुरोगमाः ॥ ७ ॥
|
मैथिली ! जेव्हा मला राग येतो त्या समयी इंद्र आदि सर्व देवता माझे मुख पाहून भयाने कापू लागतात आणि इकडे तिकडे पळून जातात. ॥७॥
|
यत्र तिष्ठाम्यहं तत्र मारुतो वाति शंकितः ।
तीव्रांशुः शिशिरांशुश्च भयात् सम्पद्यते दिवि ॥ ८ ॥
|
जेथे मी उभा राहातो तेथे वायु ही घाबरून हळू हळू वाहू लागतो. माझ्या भयाने आकाशात प्रचण्ड किरणांचा सूर्य ही चंद्रम्या प्रमाणे शीतल होऊन जातो. ॥८॥
|
निष्कम्पपत्रास्तरवो नद्यश्च स्तिमितोदकाः ।
भवन्ति यत्र तत्राहं तिष्ठामि च चरामि च ॥ ९ ॥
|
ज्या स्थानावर मी थांबतो अथवा भ्रमण करतो तेथील वृक्षांची पाने सुद्धा हलत नाहीत आणि नद्यांचे पाणी स्थिर होऊन जाते. ॥९॥
|
मम पारे समुद्रस्य लङ्का नाम पुरी शुभा ।
सम्पूर्णा राक्षसैर्घोरैर्यथेन्द्रस्यामरावती ॥ १० ॥
|
समुद्राच्या त्या तीरावर लंका नामक माझी सुंदर पुरी आहे जी इंद्राच्या अमरावतीसमान मनोहर तसेच घोर राक्षसांनी भरलेली आहे. ॥१०॥
|
प्राकारेण परिक्षिप्ता पाण्डुरेण विराजता ।
हेमकक्ष्या पुरी रम्या वैदूर्यमयतोरणा ॥ ११ ॥
|
तिच्या चारी बाजूस बनविलेली पांढरी तटबंदी त्या पुरीची शोभा वाढवीत आहेत आणि तिचे बाहेरचे दरवाजे वैडूर्यमय आहेत. ही पुरी फारच रमणीय आहे. ॥११॥
|
हस्त्यश्वरथसम्बाधा तूर्यनादविनादिता ।
सर्वकामलफलैर्वृक्षैः सङ्कुलोद्यानभूषिता ॥ १२ ॥
|
हत्ती, घोडे आणि रथांनी तेथील मार्ग परिपूर्ण असतात. विविध प्रकारच्या वाद्यांचे ध्वनी गुंजत असतात. सर्व प्रकारच्या मनोवांछित फल देणार्या वृक्षांनी लंकापुरी व्याप्त आहे. नाना प्रकारची उद्याने तिची शोभा वाढवीत आहेत. ॥१२॥
|
तत्र त्वं वस हे सीते राजपुत्रि मया सह ।
न स्मरिष्यसि नारीणां मानुषीणां मनस्विनी ॥ १३ ॥
|
राजकुमारी सीते ! तू माझ्यासह त्या पुरीत येऊन निवास कर. मनस्विनी ! तेथे राहून तू मानवी स्त्रियांना विसरून जाशील. ॥१३॥
|
भुञ्जाना मानुषान् भोगान् दिव्यांश्च वरवर्णिनि ।
न स्मरिष्यसि रामस्य मानुषस्य गतायुषः ॥ १४ ॥
|
हे सुंदरी ! लंके मध्ये दिव्य आणि मानुष भोगांचा उपभोग करीत असता तू त्या मनुष्य रामाचे कधी स्मरणही करणार नाहीस; ज्याचे आयुष्य आता समाप्त होत आले आहे. ॥१४॥
|
स्थापयित्वा प्रियं पुत्रं राज्ये दशरथो नृपः ।
मन्दवीर्यस्ततो ज्येष्ठः सुतः प्रस्थापितो वनम् ॥ १५ ॥
तेन किं भ्रष्टराज्येन रामेण गतचेतसा ।
करिष्यसि विशालाक्षि तापसेन तपस्विना ॥ १६ ॥
|
विशाल लोचने ! राजा दशरथांनी आपल्या प्रिय पुत्राला राज्यावर बसवून ज्या अल्पपराक्रमी ज्येष्ठ पुत्राला वनात धाडले त्या राज्यभ्रष्ट, बुद्धिहीन तसेच तपस्येमध्ये लागलेल्या तापस रामास घेऊन तू काय करशील ? ॥१५-१६॥
|
रक्ष राक्षसभर्तारं कामय स्वयमागगतम् ।
न मन्मथशराविष्टं प्रत्याख्यातुं त्वमर्हसि ॥ १७ ॥
|
हा राक्षसांचा स्वामी स्वतःहून तुझ्या द्वारावर आला आहे, तू त्याचे रक्षण कर, त्याची मनापासून इच्छा कर. हा कामदेवाच्या बाणांनी पीडित आहे. त्याला लाथाडणे तुझ्यासाठी उचित नाही आहे. ॥१७॥
|
प्रत्याख्याय हि मां भीरु पश्चात्तापं गमिष्यसि ।
चरणेनाभिहत्येव पुरूरवसमुर्वशी ॥ १८ ॥
|
भीरू ! ज्याप्रमाणे पुरूरव्याला लाथ मारून उर्वशीला पश्चात्ताप झाला होता त्याप्रमाणे मला लाथाडून तुलाही तसाच पश्चात्ताप होईल. ॥१८॥
|
अङ्गुल्या न समो रामो मम युद्धे स मानुषः ।
तव भाग्येन सम्प्राप्तं भजस्व वरवर्णिनि ॥ १९ ॥
|
सुंदरी ! युद्धात मनुष्य जातीय राम माझ्या एका अंगुली बरोबर ही नाही आहे. तुझ्या भाग्यानेच मी येथे आलो आहे. तू माझा स्वीकार कर. ॥१९॥
|
एवमुक्ता तु वैदेही क्रुद्धा संरक्तलोचना ।
अब्रवीत् परुषं वाक्यं रहिते राक्षसाधिपम् ॥ २० ॥
|
रावणाने असे म्हटल्यावर वैदेही सीतेचे नेत्र क्रोधाने लाल झाले. तिने त्या एकान्त स्थानी राक्षसराज रावणास कठोर वाणीने म्हटले- ॥२०॥
|
कथं वैश्रवणं देवं सर्वदेवनमस्कृतम् ।
भ्रातरं व्यपदिश्य त्वमशुभं कर्तुमिच्छसि ॥ २१ ॥
|
अरे ! भगवान कुबेर तर सर्व देवतांना वंदनीय आहेत. तू त्यांना आपले भाऊ म्हणवून असे पापकर्म कसे करू इच्छितोस ? ॥२१॥
|
अवश्यं विनशिष्यन्ति सर्वे रावण राक्षसाः ।
येषां त्वं कर्कशो राजा दुर्बुद्धिरजितेन्द्रियः ॥ २२ ॥
|
रावणा ! ज्यांचा तुझ्या सारखा क्रूर, दुर्बुद्धि आणि अजितेन्द्रिय राजा आहे ते सर्व राक्षस अवश्यच नष्ट होऊन जातील. ॥२२॥
|
अपहृत्य शचीं भार्यां शक्यमिन्द्रस्य जीवितुम् ।
न हि रामस्य भार्यां मामानीय स्वस्तिमान् भवेत् ॥ २३ ॥
|
इंद्राची पत्नी शची हिचे अपहरण करून संभव आहे की कोणी जिवंत राहू शकेल परंतु रामपत्नी जी मी सीता, तिचे हरण करुन कोणी कुशल राहू शकत नाही. ॥२३॥
|
जीवेच्चिरं वज्रधरस्य पश्चा-
च्छचीं प्रधृष्याप्रतिरूपरूपाम् ।
न मादृशीं राक्षस धर्षयित्वा
पीतामृतस्यापि तवास्ति मोक्षः ॥ २४ ॥
|
राक्षसा ! वज्रधारी इंद्राची अनुपम रूपवती भार्या शची हिचा तिरस्कार करून संभव आहे की कोणी त्यानंतरही चिरकाल पर्यत जीवित राहील, परंतु माझ्या सारख्या स्त्रीचा अपमान करून तू अमृत जरी प्यायलास तरीही तुला जिवंतपणी त्यातून सुटता येणे शक्य होणार नाही. ॥२४॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे अष्टचत्वारिंशः सर्गः ॥ ४८ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा अठ्ठेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४८॥
|