श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ चतुस्त्रिंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सीताया अनुनयेन सरमया तां प्रति मंत्रिसहित रावणसंबंधि निश्चित विचारस्य कथनम् - सीतेच्या अनुरोधाने सरमेने तिला मंत्र्यांसहित रावणाचा निश्चित विचार सांगणे -
अथ तां जातसंतापां तेन वाक्येन मोहिताम् ।
सरमा ह्लादयामास महीं दग्धामिवांभसा ॥ १ ॥
ग्रीष्मऋतूच्या तापाने दग्ध झालेल्या पृथ्वीला वर्षाकाळची मेघमाला आपल्या जलाने ज्याप्रमाणे आल्हादित करते त्याप्रमाणे रावणाच्या पूर्वोक्त वचनांनी मोहित आणि संतप्त झालेल्या सीतेला सरमेने आपल्या वाणीद्वारा आल्हादित केले. ॥१॥
ततस्तस्या हितं सख्याः चिकीर्षन्ती सखी वचः ।
उवाच काले कालज्ञा स्मितपूर्वाभिभाषिणी ॥ २ ॥
त्यानंतर समयास जाणणारी आणि हसून भाषण करणारी सखी सरमा आपली प्रिय सखी सीता हिचे हित करण्याच्या इच्छेने हे समयोचित वचन बोलली- ॥२॥
उत्सहेयमहं गत्वा त्वद्वाक्यमसितेक्षणे ।
निवेद्य कुशलं रामे प्रतिच्छन्ना निवर्तितुम् ॥ ३ ॥
काळे भोर डोळे असलेल्या सखी ! माझ्यामध्ये हे साहस आणि उत्साह आहे की रामांजवळ जाऊन तुझा संदेश आणि कुशल -समाचार निवेदन करीन आणि नंतर लपून छपून तेथून परत येईन. ॥३॥
न हि मे क्रममाणाया निरालम्बे विहायसि ।
समर्थो गतिमन्वेतुं पवनो गरुडोऽपि वा ॥ ४ ॥
निराधार आकाशातून तीव्र वेगाने जाणार्‍या माझ्या गतिचे अनुसरण करण्यास वायु अथवा गरूडही समर्थ नाहीत. ॥४॥
एवं ब्रुवाणां तां सीता सरमामिदमब्रवीत् ।
मधुरं श्लक्ष्णया वाचा पूर्वंशोकाभिपन्नया ॥ ५ ॥
असे म्हणणार्‍या सरमेला सीतेने स्नेहाने भरलेल्या मधुर वाणीने जी पूर्वी शोकाने व्याप्त होती, या प्रकारे म्हटले- ॥५॥
समर्था गगनं गन्तुं अपि च त्वं रसातलम् ।
अवगच्छाद्य कर्तव्यं कर्तव्यं ते मदन्तरे ॥ ६ ॥
सरमे ! तू आकाश आणि पाताळ सर्व जागी जाण्यास समर्थ आहेस. माझ्यासाठी जे कर्तव्य तुला करावयाचे आहे, ते आता मी सांगत आहे, ऐक आणि समजून घे. ॥६॥
मत्प्रियं यदि कर्तव्यं यदि बुद्धिः स्थिरा तव ।
ज्ञातुमिच्छामि तं गत्वा किं करोतीति रावणः ॥ ७ ॥
जर तुला माझे प्रिय कार्य करावयाचे आहे आणि जर या विषयात तुझी बुद्धि स्थिर आहे तर मी हे जाणू इच्छित आहे की रावण येथून जाऊन काय करत आहे ? ॥७॥
स हि मायाबलः क्रूरो रावणः शत्रुरावणः ।
मां मोहयति दुष्टात्मा पीतमात्रेव वारुणी ॥ ८ ॥
शत्रूंना रडविणारा रावण मायाबळाने संपन्न आहे. तो दुष्टात्मा मला, वारूणी अधिक मात्रेमध्ये प्यायल्यावर ती जशी पिणार्‍याला मोहित (अचेत) करून टाकते, त्याप्रमाणे मोहित करत आहे. ॥८॥
तर्जापयति मां नित्यं भर्त्सापयति चासकृत् ।
राक्षसीभिः सुघोराभिः यो मां रक्षन्ति नित्यशः ॥ ९ ॥
तो राक्षस अत्यंत भयानक राक्षसींच्या द्वारा प्रतिदिन मला धमकावत आहे, दरडावत आहे आणि सदा माझे रक्षण करत आहे, माझ्यावर पहारा ठेवत आहे. ॥९॥
उद्विग्ना शंकिता चास्मि न स्वस्थं च मनो मम ।
तद्‌भयाच्चाहमुद्विग्ना अशोकवनिकां गता ॥ १० ॥
मी सदा त्याच्यामुळे उद्विग्न आणि शंकित रहात आहे. माझे चित्त स्वस्थ होऊ शकत नाही. मी त्याच्याच भयाने व्याकुळ होऊन अशोक वाटिकेत निघून आले होते. ॥१०॥
यदि नाम कथा तस्य निश्चितं वापि यद्‌भवेत् ।
निवेदयेथाः सर्वं तत् परो मे स्यादनुग्रहः ॥ ११ ॥
जर मंत्र्यांच्या बरोबर त्याची चर्चा चालली असेल तर तेथे जो काही निश्चय होईल अथवा रावणाचा जो निश्चित विचार होईल, ते सर्व मला सांगत रहा. ही माझ्यावर तुझी फार मोठी कृपा होईल. ॥११॥
साप्येवं ब्रुवतीं सीतां सरमा मृदुभाषिणी ।
उवाच वदनं तस्याः स्पृशन्ती बाष्पविक्लवम् ॥ १२ ॥
असे सांगण्यार्‍या सीतेला मधुरभाषिणी सरमेने, तिचे अश्रुंनी भिजलेले नेत्र आपल्या हातांनी पुसत याप्रकारे म्हटले- ॥१२॥
एष ते यद्यभिप्रायः तदा गच्छामि जानकि ।
गृह्य शत्रोरभिप्रायं उपावर्तामि मैथिलि ॥ १३ ॥
मैत्रिण वैदेही ! जर तुझी हीच इच्छा असेल तर मी जाते आणि शत्रुचा अभिप्राय जाणून आत्ता परत येते. ॥१३॥
एवमुक्त्वा ततो गत्वा समीपं तस्य रक्षसः ।
शुश्राव कथितं तस्य रावणस्य समंत्रिणः ॥ १४ ॥
असे म्हणून सरमेने त्या राक्षसांजवळ जाऊन मंत्र्यासहित रावणाने सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकल्या. ॥१४॥
सा श्रुत्वा निश्चयं तस्य निश्चयज्ञा दुरात्मनः ।
पुनरेवागमत् क्षिप्रमं अशोकवनिकां शुभाम् ॥ १५ ॥
त्या दुरात्म्याचा निश्चय ऐकून तिने चांगल्याप्रकारे तो समजून घेतला आणि नंतर लगेचच ती सुंदर अशोकवाटिकेमध्ये परत आली. ॥१५॥
सा प्रविष्टा ततस्तत्र ददर्श जनकात्मजाम् ।
प्रतीक्षमाणां स्वामेव भ्रष्टपद्मामिव श्रियम् ॥ १६ ॥
तेथे प्रवेश करून तिने आपलीच प्रतिक्षा करीत बसलेल्या जनककिशोरीला पाहिले, जी लक्ष्मीप्रमाणे वाटत होती, जिच्या हातातील कमळ कुठेतरी गळून पडले आहे. ॥१६॥
तां तु सीता पुनः प्राप्तां सरमां प्रियभाषिणीम् ।
परिष्वज्य च सुस्निग्धं ददौ च स्वयमासनम् ॥ १७ ॥
नंतर परत आलेल्या प्रियभाषिणी सरमेला मोठ्‍या प्रेमाने गळ्याशी लावून सीतेने स्वत: तिला बसण्यासाठी आसन दिले आणि म्हटले- ॥१७॥
इहासीना सुखं सर्वं आख्याहि मम तत्त्वतः ।
क्रूरस्य निश्चयं तस्य रावणस्य दुरात्मनः ॥ १८ ॥
सखी ! येथे सुखाने बसून सर्व गोष्टी ठीक ठीक सांग. त्या क्रूर आणि दुरात्मा रावणाने काय निश्चय केला आहे ? ॥१८॥
एवमुक्ता तु सरमा सीतया वेपमानया ।
कथितं सर्वमाचष्ट रावणस्य समंत्रिणः ॥ १९ ॥
कांपत असणार्‍या सीतेने याप्रकारे विचारल्यावर सरमेने मंत्र्यांसहित रावणाने सांगितलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या- ॥१९॥
जनन्या राक्षसेन्द्रो वै त्वन्मोक्षार्थं बृहद्वचः ।
अविद्धेन च वैदेहि मंत्रिवृद्धेन चोदितः ॥ २० ॥
वैदेही ! राक्षसराज रावणाच्या मातेने तसेच रावणाच्या प्रति अत्यंत स्नेह बाळगण्यार्‍या एका वृद्ध मंत्र्यानेही, मोठ मोठ्‍या गोष्टी सांगून तुम्हांला सोडून देण्यासाठी रावणाला प्रेरित केले.॥२०॥
दीयतामभिसत्कृत्य मनुजेन्द्राय मैथिली ।
निदर्शनं ते पर्याप्तं जनस्थाने यदद्‌भुतम् ॥ २१ ॥
राक्षसराज ! तुम्ही महाराज श्रीरामांना सत्कारपूर्वक त्यांची पत्‍नी सीता परत द्या. जनस्थानात जी अद्‌भुत घटना घडली, तीच श्रीरामांचा पराक्रम जाणून घेण्यास पर्याप्त प्रमाण एवं उदाहरण आहे. ॥२१॥
लङ्‌घनं च समुद्रस्य दर्शनं च हनूमतः ।
वधं च रक्षसां युद्धे कः कुर्यान् मानुषो युधि ॥ २२ ॥
त्यांच्या सेवकातही अद्‌भुत शक्ति आहे. हनुमंतांनी जो समुद्र ओलांडला, सीतेस भेटले आणि युद्धात बर्‍याचशा राक्षसांचा वध केला- हे सर्व कार्य दुसरा कोण मनुष्य करू शकतो आहे ? ॥२२॥
एवं स मंत्रिवृद्धैश्च मात्रा च बहुबोधितः ।
न त्वामुत्सहते मोक्तुं अर्थमर्थपरो यथा ॥ २३ ॥
याप्रकारे वृद्ध मंत्री आणि मातेने बरेच समजाविल्यावरही तो तुम्हांला, धनलोभी जसा धनाचा त्याग करू इच्छित नाही त्याप्रमाणे सोडू इच्छित नाही. ॥२३॥
नोत्सहत्यमृतो मोक्तुं युद्धे त्वामिति मैथिलि ।
सामात्यस्य नृशंसस्य निश्चयो ह्येष वर्तते ॥ २४ ॥
मैथिली ! तो युद्धांत मेल्याशिवाय तुम्हांला सोडण्याचे साहस करू शकत नाही. मंत्र्यांसहित त्या नृशंस निशाचराचा हाच निश्चय आहे. ॥२४॥
तदेषा सुस्थिरा बुद्धिः मृत्युलोभादुपस्थिता ।
भयान्न शक्तस्त्वां मोक्तुं अनिरस्तस्तः संयुगे ॥ २५ ॥

राक्षसानां च सर्वेषां आत्मनश्च वधेन हि ।
रावणाच्या शिरावर काळ नाचत आहे. म्हणून त्याच्या मनात मृत्युविषयी लोभ उत्पन्न झाला आहे. हेच कारण आहे की ज्यामुळे तुम्हांला परत न करण्याविषयी त्याची बुद्धि सुस्थिर झालेली आहे. तो जो पर्यंत युद्धात राक्षसांचा संहार आणि आपल्या वधाच्या द्वारा नष्ट होणार नाही, केवळ भय दाखविण्याने तो तुम्हांला सोडू शकत नाही. ॥२५ १/२॥
निहत्य रावणं संख्ये सर्वथा निशितैः शरैः ।
प्रतिनेष्यति रामस्त्वां अयोध्यामसितेक्षणे ॥ २६ ॥
काळे भोर नेत्र असणार्‍या सीते ! याचा परिणाम हाच होईल की भगवान्‌ श्रीराम आपल्या सर्वथा तीक्ष्ण बाणांनी युद्धस्थळावर रावणाचा वध करून तुम्हांला अयोध्येला घेऊन जातील. ॥२६॥
एतस्मिन्नन्तरे शब्दो भेरीशङ्‌खसमाकुलः ।
श्रुतो वै सर्वसैन्यानां कंपयन् धरणीतलम् ॥ २७ ॥
त्याचवेळी भेरीनाद आणि शंखध्वनि मिसळलेला समस्त सैनिकांचा महान्‌ कोलाहल ऐकू आला, जो भूकंप उत्पन्न करत होता. ॥२७॥
श्रुत्वा तु तं वानरसैन्यनादं
लङ्‌कागता राक्षसराजभृत्याः ।
नष्टौजसो दैन्यपरीतचेष्टाः
श्रेयो न पश्यन्ति नृपस्य दोषाद् ॥ २८ ॥
वानरसैनिकांचा तो भीषण सिंहनाद ऐकून लंकेत राहणार्‍या राक्षसराज रावणाचे सेवक हतोत्साह (उत्साह रहित) होऊन गेले. त्यांची सारी हालचाल दीनतेने व्याप्त होऊन गेली. रावणाच्या दोषाने त्यांनाही कल्याणाचा कुठलाही उपाय दिसून येत नव्हता. ॥२८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे चतुस्त्रिंशः सर्गः ॥ ३४ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा चौतीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥३४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP