सीतायाः करुणो विलापः, स्वप्रणपरित्यागनिश्चयश्च -
|
सीतेचा करूण विलाप आणि आपल्या प्राणांचा त्याग करण्याचा निश्चय करणे -
|
प्रसक्ताश्रुमुखीत्येवं ब्रुवती जनकात्मजा ।
अधोगतमुखी बाला विलप्तुमुपचक्रमे ॥ १ ॥
उन्मत्तेव प्रमत्तेव भ्रान्तचित्तेव शोचती ।
उपावृत्ता किशोरीव विवेष्टन्ती महीतले ॥ २ ॥
|
मुखावर अश्रूंचे ओघळ आलेले आहेत अशी ती जनककन्या बाला सीता खाली मान घालून विलाप करू लागली व याप्रमाणे बोलू लागली. तेव्हा पिशाचादिकांनी झपाटल्या प्रमाणे अथवा पित्ताचा अतिरेक झाल्याने मत्त झाल्याप्रमाणे, अथवा दिग्भ्रम आदि कारणांनी भ्रान्त चित्त झाल्यामुळे शोकाकुळ होऊन ती जमिनीवर गडाबडा लोळू लागली असता, श्रमपरिहार करण्यासाठी जमिनीवर लोळणार्या गाईच्या बछडी सारखी भासू लागली ॥१-२॥
|
राघवस्य प्रमत्तस्य रक्षसा कामरूपिणा ।
रावणेन प्रमथ्याहमानीता क्रोशती बलात् ॥ ३ ॥
|
या अवस्थेत सरल हृदयी सीतेने विलाप करण्यास प्रारंभ केला. ती म्हणाली - इच्छेप्रमाणे रूप धारण करणार्या मारीच राक्षसाने राघवाला मोहात पाडून दूर नेले आणि त्यामुळे रावणाने माझे हाल हाल करून, मी आक्रोश करीत असता बलात्काराने मला येथे आणले. ॥३॥
|
राक्षसीवशमापन्ना भर्त्स्यमाना च दारुणम् ।
चिन्तयन्ती सुदुःखार्ता नाहं जीवितुमुत्सहे ॥ ४ ॥
|
येथे आता मी राक्षसस्त्रियांच्या तावडीत सांपडले असून त्यांच्या कठोर धमकावण्या ऐकत आहे, सहन करीत आहे. अशा अवस्थेत मी अत्यन्त दुःखी आणि आर्त झाले असून मनात चिन्तेने जळत आहे. त्यामुळे मला यापुढे जगावेसेही वाटत नाही. ॥४॥
|
नहि मे जीवितेनार्थो नैवार्थैर्न च भूषणैः ।
वसन्त्या राक्षसीमध्ये विना रामं महारथम् ॥ ५ ॥
|
महारथी श्रीरामांना सोडून ज्या अर्थी मला राक्षसस्त्रियांच्या संगतीत राहावे लागत आहे, त्या अर्थी जीविताशी, संपत्तीशी आणि भूषणांशी मला काहीही कर्तव्य नाही. ॥५॥
|
अश्मसारमिदं नूनं अथवाप्यजरामरम् ।
हृदयं मम येनेदं न दुःखेन विशीर्यते ॥ ६ ॥
|
माझे हे हृदय खरोखर अगदी बळकट पाषाणाचे असावे अथवा अजरामर तरी असले पाहिजे म्हणूनच मला इतके असह्य दुःख झाले असूनही ते फुटून जात नाही. ॥६॥
|
धिङ्मामनार्यामसतीं याहं तेन विना कृता ।
मुहूर्तमपि जीवामि जीवितं पापजीविका ॥ ७ ॥
|
मी खरोखरच अनार्य आणि असती आहे. माझा धिक्कार असो, कारण श्रीरामाचा विरह होऊन एक मुहूर्तभर सुद्धा मला जिवन्त राहाणे योग्य नसतांही मी हे पापी जीवन जगत आहे. आता तर हे जीवन केवळ दुःख भोगण्यासाठीच आहे ॥७॥
|
चरणेनापि सव्येन न स्पृशेयं निशाचरम् ।
रावणं किं पुनरहं कामयेयं विगर्हितम् ॥ ८ ॥
|
त्या लोकनिन्दित निशाचर रावणाला तर मी डाव्या पायानेही स्पर्श करू शकत नाही, मग मनात त्याची इच्छा करण्याची तर गोष्टच कशाला ? ॥८॥
|
प्रत्याख्यातं न जानाति नात्मानं नात्मनः कुलम् ।
यो नृशंसस्वभावेन मां प्रार्थयितुमिच्छति ॥ ९ ॥
|
हा राक्षस आपल्या क्रूर स्वभावामुळे माझ्या अनिच्छेकडे, नकाराकडे हीलक्ष्य देत नाही आहे, अथवा त्यास स्वतःचे महत्व अथवा आपल्या कुळाची प्रतिष्ठा याचाही विचार कळत नाही. वारंवार राक्षसींना मध्यस्थी घालून, तो मला वश करून घेण्याची इच्छा करीत आहे. ॥९॥
|
छिन्ना भिन्ना प्रभिन्ना वा दीप्ता वाग्नौ प्रदीपिता ।
रावणं नोपतिष्ठेयं किं प्रलापेन वश्चिरम् ॥ १० ॥
|
हे राक्षसस्त्रियांनो ! तुमच्या या बडबडीचा काहीही उपयोग नाही. तुम्ही मला छिन्न भिन्न करा, माझे तुकडे तुकडे करा, ते भाजा अथवा पेटवा तरीही मी रावणाचा स्वीकार करणार नाही. ॥१०॥
|
ख्यातः प्राज्ञः कृतज्ञश्च सानुक्रोशश्च राघवः ।
सद्वृत्तो निरनुक्रोशः शङ्के मद्भाग्यसंक्षयात् ॥ ११ ॥
|
राघव श्रीराम विश्वविख्यात ज्ञानी, कृतज्ञ, सदाचारी आणि परम दयाळू आहेत, परन्तु सांप्रत माझे भाग्य नाहीसे झाल्यामुळेच की काय, पण मला शंका येत आहे की ते माझ्या प्रति निर्दय तर झाले नाहीन्त ना ? ॥११॥
|
राक्षसानां जनस्थाने सहस्राणि चतुर्दश ।
एनैकेन निरस्तानि स मां किं नाभिपद्यते ॥ १२ ॥
|
अन्यथा ज्यांनी एकट्याने जनस्थानात चौदा हजार राक्षसांचा नाश केला ते राम माझ्याजवळ कां बरे येत नाहीन्त ? राम आज मला येथून घेऊन का जात नाहीत ? ॥१२॥
|
निरुद्धा रावणेनाहमल्पवीर्येण रक्षसा ।
समर्थः खलु मे भर्ता रावणं हन्तुमाहवे ॥ १३ ॥
|
या अल्प बळ असणार्या रावणाने राक्षसाने मला येथे कैद करून ठेवले आहे. माझे पतिदेव समरांगणात या रावणाचा वध करण्यास निश्चितच समर्थ आहेत. ॥१३॥
|
विराधो दण्डकारण्ये येन राक्षसपुङ्गवः ।
रणे रामेण निहतः स मां किं नाभिपद्यते ॥ १४ ॥
|
ज्या श्रीरामाने दण्डकारण्यात राक्षस शिरोमणी विराधास युद्धात ठार केले, ते माझे रक्षण करण्यास येथे का बरे येत नाहीत ? ॥१४॥
|
कामं मध्ये समुद्रस्य लङ्केयं दुष्प्रधर्षणा ।
न तु राघवबाणानां गतिरोधो भविष्यति ॥ १५ ॥
|
ही लङ्का समुद्राच्या मध्ये वसली आहे म्हणून दुसर्या कुणालाही हिच्यावर आक्रमण करणे कठीण असेलही, परन्तु श्रीरघुनाथाच्या बाणांची गती येथेही कुंठीत होऊ शकत नाही. ॥१५॥
|
किं तु तत्कारणं येन रामो दृढपराक्रमः ।
रक्षसापहृतां भार्यां इष्टां यो नाभिपद्यते ॥ १६ ॥
|
असे कोणते बरे कारण असेल की ज्यामुळे बाधित होऊन अत्यन्त महापराक्रमी श्रीराम राक्षसाचे द्वारा अपहरण केल्या गेलेल्या आपल्या प्राणप्रिय पत्नी सीतेला सोडविण्यासाठी अद्याप येत नाहीत ? ॥१६॥
|
इहस्थां मां न जानीते शङ्के लक्ष्मणपूर्वजः ।
जानन्नपि स तेजस्वी धर्षणां मर्षयिष्यति ॥ १७ ॥
|
मला तर हीच शंका येत आहे की लक्ष्मणाच्या ज्येष्ठ भ्रात्याला श्रीरामचन्द्राला मी लंकेत आहे ही गोष्ट अद्याप माहीत नसावी. मी येथे आहे ही गोष्ट जर त्यांना ज्ञात असती तर त्यांच्या सारख्या तेजस्वी पुरुषाने आपल्या पत्नीचा हा अपमान कसा सहन केला असता. ॥१७॥
|
हृतेति मां योऽधिगत्य राघवाय निवेदयेत् ।
गृध्रराजोऽपि स रणे रावणेन निपातितः ॥ १८ ॥
|
ज्यांनी श्रीरघुनाथास माझ्या अपहरणाची सूचना दिली असती त्या गृध्रराज जटायुलाही रावणाने युद्धात ठार मारून टाकले. ॥१८॥
|
कृतं कर्म महत् तेन मां तथाभ्यवपद्यता ।
तिष्ठता रावणवधे वृद्धेनापि जटायुषा ॥ १९ ॥
|
जटायु वृद्ध असूनही माझ्यावर अनुग्रह करून रावणाचा वध करण्यासाठी उद्यत होऊन त्यांनी मोठा अद्भुत पराक्रम केला होता. ॥१९॥
|
यदि मामिह जानीयाद् वर्तमानां हि राघवः ।
अद्य बाणैरभिक्रुद्धः कुर्याल्लोकमराक्षसम् ॥ २० ॥
|
जर राघवाला मी येथे आहे या गोष्टीचा पत्ता लागला असता तर त्यांनी आजही क्रुद्ध होऊन सर्व संसार राक्षसरहित करून टाकला असता. ॥२०॥
|
निर्दहेच्च पुरीं लङ्कां निर्दहेच्च महोदधिम् ।
रावणस्य च नीचस्य कीर्तिं नाम च नाशयेत् ॥ २१ ॥
|
त्यांनी लङ्कापुरीलाही जाळले असते आणि महासागरालाही भस्म करून टाकले असते. तसेच या नीच निशाचर रावणाच्या नावाचा आणि यशाचाही नाश केला असता. ॥२१॥
|
ततो निहतनाथानां राक्षसीनां गृहे गृहे ।
यथाहमेवं रुदती तथा भूयो न संशयः ॥ २२ ॥
|
मग तर ज्या प्रमाणे आज मी रडत आहे, निःसन्देह त्याप्रमाणे आपल्या पतींचा संहार झाल्याने घरा घरान्तून राक्षसीणींचा आक्रोश सुरू झाला असता. ॥२२॥
|
अन्विष्य रक्षसां लङ्कां कुर्याद् रामः सलक्ष्मणः ।
न हि ताभ्यां रिपुर्दृष्टो मुहूर्तमपि जीवति ॥ २३ ॥
|
लंकेचा पत्ता लागल्यावर श्रीराम आणि लक्ष्मण निश्चितच सर्व राक्षसांचा संहार करतील. ज्या शत्रूकडे त्या दोन्ही भावांनी एक वेळ जरी दृष्टी टाकली तरी तो दोन घटकाही जिवन्त राहू शकणार नाही. ॥२३॥
|
चिताधूमाकुलपथा गृध्रमण्डलमण्डिता ।
अचिरेणैव कालेन श्मशानसदृशी भवेत् ॥ २४ ॥
|
आता थोड्याच अवधित ही लङ्कापुरी स्मशानभूमी प्रमाणे होईल. येथील मार्गांवर चितांचा धूर पसरेल आणि गिधाडांची जमात या भूमीची शोभा वाढवील. ॥२४॥
|
अचिरेणैव कालेन प्रप्स्याम्येनं मनोरथम् ।
दुष्प्रस्थानोऽयमाभाति सर्वेषां वो विपर्ययः ॥ २५ ॥
|
माझा हा मनोरथ पूर्ण होईल, असा समय लवकरच येईल. तुम्हा सर्व लोकांचा हा दुराचार लवकरच तुमच्या पुढे विपरीत परिणाम उपस्थित करील असे स्पष्ट कळून येत आहे. ॥२५॥
|
यादृशानि तु दृश्यन्ते लङ्कायामशुभानि तु ।
अचिरेणैव कालेन भविष्यति हतप्रभा ॥ २६ ॥
|
लंकेमध्ये जशी जशी अशुभ लक्षणे दिसून येत आहेत, त्यावरून कळून येत आहे की आता लवकरच येथील सर्व थाटमाट नष्ट होणार आहे. ॥२६॥
|
नूनं लङ्का हते पापे रावणे राक्षसाधमे ।
शोषमेष्यति दुर्धर्षा प्रमदा विधवा यथा ॥ २७ ॥
|
पापाचारी राक्षसधम रावण मारला गेला की ही दुर्धर्ष लङ्कापुरीही निश्चितच विधवा युवतीप्रमाणे सुकून जाईल, नष्ट होईल. ॥२७॥
|
पुण्योत्सवसमृद्धा च नष्टभर्त्री सराक्षसा ।
भविष्यति पुरी लङ्का नष्टभर्त्री यथाङ्गना ॥ २८ ॥
|
आज ज्या लंकेत पुण्यमय उत्सव होत असतात, ते उत्सव बन्द पडून ती राक्षसांसहित आपला स्वामी नष्ट झाल्यावर विधवा स्त्री प्रमाणे श्रीहीन होऊन जाईल. ॥२८॥
|
नूनं राक्षसकन्यानां रुदन्तीनां गृहे गृहे ।
श्रोष्यामि नचिरादेव दुःखार्तानामिह ध्वनिम् ॥ २९ ॥
|
निश्चितच मी अगदी लवकरच लंकेतील घरा घरातून दुःखाने आतुर होऊन रडाणार्या राक्षसकन्यांचा आक्रोश ऐकेन. ॥२९॥
|
सान्धकारा हतद्योता हतराक्षसपुङ्गवा ।
भविष्यति पुरी लङ्का निर्दग्धा रामसायकैः ॥ ३० ॥
|
श्रीरामचन्द्रांच्या बाणांनी दग्ध झाल्याने लङ्कापुरीची प्रभा सर्व नष्ट होऊन जाईल. लंकेत अन्धकार पसरेल आणि येथील सर्व प्रमुख राक्षस मृत्युमुखी पडतील. ॥३०॥
|
यदि नाम स शूरो मां रामो रक्तान्तलोचनः ।
जानीयाद् वर्तमानां यां राक्षसस्य निवेशने ॥ ३१ ॥
|
परन्तु ज्यांचे नेत्राभोवतलाचा भाग आरक्त वर्णाचा आहे त्या शूरवीर भगवान श्रीरामांना, जर मी येथे राक्षसांच्या अन्तःपुरात कैदेत ठेवली गेले आहे याचा पत्ता लागला तरच हे सर्व संभव होईल. ॥३१॥
|
अनेन तु नृशंसेन रावणेनाधमेन मे ।
समयो यस्तु निर्दिष्टस्तस्य कालोऽयमागतः ॥ ३२ ॥
|
या नीच आणि नृशंस रावणाने माझ्यासाठी जो अवधी निश्चित केला आहे त्याची पूर्तीही निकट भविष्यकाळात होऊन जाईल. ॥३२॥
|
स च मे विहितो मृत्युरस्मिन् दुष्टेन वर्तते ।
अकार्यं ये न जानन्ति नैर्ऋताः पापकारिणः ॥ ३३ ॥
|
हा पापाचारी राक्षस हेही जाणत नाही की काय केले पाहिजे आणि काय करू नये. ॥३३॥
|
अधर्मात् तु महोत्पातो भविष्यति हि साम्प्रतम् ।
नैते धर्मं विजानन्ति राक्षसाः पिशिताशनाः ॥ ३४ ॥
|
यावेळी अधर्मामुळेच महान उत्पात घडून येत आहे. हे मांसभक्षी राक्षस धर्म म्हणजे काय हे अजिबात जाणत नाहीत. ॥३४॥
|
ध्रुवं मां प्रातराशार्थं राक्षसः कल्पयिष्यति ।
साहं कथं करिष्यामि तं विना प्रियदर्शनम् ॥ ३५ ॥
|
तो राक्षस आपल्या न्याहारीसाठी क्वचितच माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकील. यावेळी आपल्या प्रियदर्शन पतिविना मी असहाय अबला काय बरे करणार ? ॥३५॥
|
रामं रक्तान्तनयनमपश्यन्ती सुदुःखिता ।
क्षिप्रं वैवस्वतं देवं पश्येयं पतिना विना ॥ ३६ ॥
|
ज्यांचा नेत्रप्रान्त अरुण वर्णाचा आहे त्या श्रीरामचन्द्रांचे दर्शन होत नसल्याने मी अत्यन्त दुःखी झाले आहे. अशा मला असहाय्य अबलेला पतिचा चरणस्पर्श न करताच शीघ्र यमदेवतेचे दर्शन करावे लागेल. ॥३६॥
|
नाजानाज्जीवतीं रामः स मां भरतपूर्वजः ।
जानन्तौ तु न कुर्यातां नोर्व्यां हि परिमार्गणम् ॥ ३७ ॥
|
भरताचे ज्येष्ठ बन्धु भगवान श्रीराम मी अद्याप जिवन्त आहे हे जाणत नाहीत. जर त्यांना या गोष्टीचा पत्ता लागला असता तर त्यांनी पृथ्वीवर माझा शोध निश्चितच घेतला असता. ॥३७॥
|
नूनं ममैव शोकेन स वीरो लक्ष्मणाग्रजः ।
देवलोकमितो यातः त्यक्त्वा देहं महीतले ॥ ३८ ॥
|
मला तर असे निश्चित वाटते आहे की माझ्याच शोकामुळे लक्ष्मणाचे मोठे बन्धु वीरवर श्रीराम या भूतलावर आपल्या शरीराचा त्याग करून येथून देवलोकास निघून गेले असावे. ॥३८॥
|
धन्या देवाः सगन्धर्वाः सिद्धाश्च परमर्षयः ।
मम पश्यन्ति ये वीरं रामं राजीवलोचनम् ॥ ३९ ॥
|
माझे पतिदेव वीर-शिरोमणी कमलनयन श्रीरामांचे दर्शन ज्यांना होत असेल ते देव, गन्धर्व, सिद्ध आणि महर्षिगण खरोखरच धन्य आहेत. ॥३९॥
|
अथवा नहि तस्यार्थो धर्मकामस्य धीमतः ।
मया रामस्य राजर्षेर्भार्यया परमात्मनः ॥ ४० ॥
|
अथवा केवळ धर्माचीच कामना ठेवणार्या परमात्मस्वरूप बुद्धिमान राजर्षि श्रीरामास भार्येचे काही प्रयोजन नाही, म्हणूनच ते माझा शोध घेत नाहीत. ॥४०॥
|
दृश्यमाने भवेत् प्रीतिः सौहृदं नास्त्यदृश्यतः ।
नाशयन्ति कृतघ्नास्तु न रामो नाशयिष्यति ॥ ४१ ॥
|
जे स्वजन आपल्या दृष्टीसमोर असतात, त्यांच्यावरील प्रेम टिकून राहाते. जे दृष्टीआड होतात, त्यांच्यावर लोकांचा स्नेह टिकून राहात नाही. कदाचित म्हणून राम मला विसरून गेले असतील. परन्तु हेही संभवनीय नाही कारण, कृतघ्न मनुष्यच त्याच्याकडे पाठ फिरली की प्रेम लाथाडून देतो. भगवान श्रीराम असे कधीही करणार नाहीत. ॥४१॥
|
किं वा मय्यगुणाः केचित् किं वा भाग्यक्षयो हि मे ।
या हि सीता वरार्हेण हीना रामेण भामिनी ॥ ४२ ॥
|
अथवा माझ्यात काही दुर्गुण आहेत अथवा माझे भाग्यच फुटले आहे आणि म्हणून यावेळी मी मानिनी सीता आपल्या परम पूजनीय पतीपासून, श्रीरामांपासून दुरावले आहे. त्यांचा वियोग झाला आहे. ॥४२॥
|
श्रेयो मे जीवितान्मर्तुं विहीनाया महात्मना ।
रामादक्लिष्टचारित्राच्छूराच्छत्रुनिबर्हणात् ॥ ४३ ॥
|
माझे पति भगवान श्रीराम यांचा सदाचार अक्षुण आहे. ते शूरवीर असून शत्रूंचा संहार करण्यास समर्थ आहेत. मी त्यांच्या कडून संरक्षण प्राप्त होण्यास योग्य आहे, परन्तु त्या महात्म्या पासून माझी ताटातूट झाली आहे. अशा स्थितिमध्ये जिवन्त राहाण्यापेक्षा मरून जाणे माझ्यासाठी श्रेयस्कर आहे. ॥४३॥
|
अथवा न्यस्तशस्त्रौ तौ वने मूलफलाशिनौ ।
भ्रातरौ हि नरश्रेष्ठौ संवृत्तौ वनगोचरौ ॥ ४४ ॥
|
अथवा वनात विचरण करणार्या, फळे-मुळे खाऊन राहणार्या त्या दोन नरश्रेष्ठ वनवासी बन्धूंनी, राम-लक्ष्मणांनी आता अहिंसेचे व्रत घेऊन आपल्या शस्त्रास्त्रांचा त्यांनी परित्याग केला आहे ? ॥४४॥
|
अथवा राक्षसेन्द्रेण रावणेन दुरात्मना ।
छद्मना घातितौ शूरौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ ४५ ॥
|
अथवा दुरात्मा राक्षसराज रावणाने त्या दोन्ही शूरवीर बन्धूना, राम-लक्ष्मणांना छळकपटाने मारून टाकले आहे ? ॥४५॥
|
साहमेवंविधे काले मर्तुमिच्छामि सर्वतः ।
न च मे विहितो मृत्युरस्मिन् दुःखेऽतिवर्तति ॥ ४६ ॥
|
म्हणून अशा समयी मी सर्व प्रकारांनी आपल्या जीवनाचा अन्त करण्याची इच्छा करीत आहे. परन्तु असे कळून येत आहे की या अशा महान दुःखात असूनही अद्याप माझा मृत्यु लिहिला गेलेला नाही. ॥४६॥
|
धन्याः खलु महात्मानो मुनयः सत्यसम्मताः ।
जितात्मानो महाभागा येषां न स्तः प्रियाप्रिये ॥ ४७ ॥
|
ज्यांचा ठिकाणी कुठलेही किल्बिष नाही असे महात्मा मुनिजन खरोखर धन्य होत, कारण की त्यांच्या ठिकाणी कोणी प्रिय कोणी अप्रिय, असा भावच नसतो. ॥४७॥
|
प्रियान्न संभवेद् दुःखमप्रियादधिकं भवेत् ।
ताभ्यां हि ते वियुज्यन्ते नमस्तेषां महात्मनाम् ॥ ४८ ॥
|
ज्यांना प्रिय व्यक्तीच्या वियोगाने दुःख होत नाही आणि अप्रियाच्या संयोगाने अधिक कष्टाचाही अनुभव होत नाही, त्याप्रमाणे जे प्रिय आणि अप्रिय दोन्हींच्या पलिकडे पोहोंचलेले असतात अशा महात्म्यांना माझा नमस्कार असो. ॥४८॥
|
साहं त्यक्ता प्रियेणैव रामेण विदितात्मना ।
प्राणांस्त्यक्ष्यामि पापस्य रावणस्य गता वशम् ॥ ४९ ॥
|
मी आपल्या प्रियतम अत्मज्ञानी भगवान रामापासून दुरावले आहे, आणि पापी रावणाच्या जाळ्यात फसले आहे. म्हणून आता मी या प्राणांचा परित्यागच करीन. ॥४९॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे षड्विंशः सर्गः ॥ २६ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा सव्वीसावा सर्ग पूरा झाला. ॥२६॥
|