रावणाज्ञया प्रहस्तस्य विपुलसैन्येन सह युद्धाय प्रस्थानम् -
|
प्रहस्ताचे रावणाच्या आज्ञेने विशाल सेनेसह युद्धासाठी प्रस्थान -
|
अकम्पनवधं श्रुत्वा क्रुद्धो वै राक्षसेश्वरः । किञ्चिद् दीनमुखश्चापि सचिवांस्तानुदैक्षत ॥ १ ॥
|
अकंपनाच्या वधाचा समाचार ऐकून राक्षसराज रावणाला फार क्रोध आला. त्याच्या मुखावर काहीशी दीनताही पसरली आणि तो मंत्र्यांकडे पाहू लागला. ॥१॥
|
स तु ध्यात्वा मुहूर्तं तु मंत्रिभिः संविचार्य च । ततस्तु रावणः पूर्व दिवसे राक्षसाधिपः । पुरीं परिययौ लङ्कां सर्वान् गुल्मानवेक्षितुम् ॥ २ ॥
|
प्रथम तर तो एक मुहूर्तपर्यंत विचार करीत राहिला. नंतर त्याने मंत्र्यांशी विचार - विनिमय केला आणि त्यानंतर दिवसाच्या पूर्वभागात राक्षसराज रावण स्वयं लंकेतील सर्व मोर्च्यांचे निरीक्षण करण्यासाठी गेला. ॥२॥
|
तां राक्षसगणैर्गुप्तां गुल्मैर्बहुभिरावृताम् । ददर्श नगरीं लङ्कां पताकाध्वजमालिनीम् ॥ ३ ॥
|
राक्षसगणांच्या द्वारा सुरक्षित आणि बर्याचशा छावण्यांनी घेरलेली, ध्वजा पताकांनी सुशोभित त्या नगरीला राजा रावणाने चांगल्या प्रकारे पाहिले. ॥३॥
|
रुद्धां तु नगरीं दृष्ट्वा रावणो राक्षसेश्वरः । उवाचात्महितं काले प्रहस्तं युद्धकोविदम् ॥ ४ ॥
|
लंकापुरी चोहोबाजूंनी शत्रुंच्या द्वारा घेरली गेली होती. हे पाहून राक्षसराज रावणाने आपल्या हितैषी युद्धकलाकोविद् प्रहस्तास ही समयोचित गोष्ट सांगितली- ॥४॥
|
पुरस्योपनिविष्टस्य सहसा पीडितस्य वा । नान्यं युद्धात् प्रपश्यामि मोक्षं युद्धविशारद ॥ ५ ॥
|
युद्धविशारद वीरा ! नगराच्या अत्यंत निकट शत्रूंची सेना छावणी ठोकलेली आहे, म्हणून सारे नगर एकाएकी व्यथित झाले आहे. आता दुसर्या कोणी युद्ध केल्याने यांतून सुटका होईल असे दिसून येत नाही. ॥५॥
|
अहं वा कुंभकर्णो वा त्वं वा सेनापतिर्मम । इन्द्रजिद्वा निकुंभो वा वहेयुर्भारमीदृशम् ॥ ६ ॥
|
आता तर या प्रकारच्या युद्धाचा भार मी, कुंभकर्ण, माझे सेनापति तुम्ही, मुलगा इंद्रजित अथवा निकुंभ हेच पेलू शकतात. ॥६॥
|
स त्वं बलमतः शीघ्रं आदाय परिगृह्य च । विजयायाभिनिर्याहि यत्र सर्वे वनौकसः ॥ ७ ॥
|
म्हणून तुम्ही शीघ्रच सेना घेऊन विजयासाठी प्रस्थान करा आणि जेथे हे सर्व वानर एकत्रित झाले आहेत, तेथे जा. ॥७॥
|
निर्याणादेव तूर्णं च चलिता हरिवाहिनी । नर्दतां राक्षसेन्द्राणां श्रुत्वा नादं द्रविष्यति ॥ ८ ॥
|
तुम्ही निघताच सारी वानरसेना विचलित होऊन जाईल आणि गर्जणार्या राक्षसशिरोमणींचा सिंहनाद ऐकून पळून जाऊ लागेल. ॥८॥
|
चपला ह्यविनीताश्च चलचित्ताश्च वानराः । न सहिष्यन्ति ते नादं सिंहनादमिव द्विपाः ॥ ९ ॥
|
वानरलोक फार चञ्चल, उध्दट आणि भित्रे असतात. जशी सिंहाची गर्जना हत्ती सहन करु शकत नाहीत त्याच प्रकारे हे वानर तुमचा सिंहनाद सहन करू शकणार नाहीत. ॥९॥
|
विद्रुते च बले तस्मिन् रामः सौमित्रिणा सह । अवशस्ते निरालम्बः प्रहस्त वशमेष्यति ॥ १० ॥
|
प्रहस्ता ! जेव्हा वानरसेना पळून जाईल तेव्हा काही आश्रय न राहिल्याने लक्ष्मणासहित राम विवश होऊन तुमच्या अधीन होतील. ॥१०॥
|
आपत् संशयिता श्रेयो न तु निस्संशयीकृता । प्रतिलोमानुलोमं वा यत् तु नो मन्यसे हितम् ॥ ११ ॥
|
युद्धात मृत्यु संदिग्ध असतो अथवा होतही नाही. परंतु असा मृत्यु श्रेष्ठ आहे. याच्या उलट जीवन धोक्यात न घालता युद्धस्थळाखेरिज जो मृत्यु येतो, तो श्रेष्ठ नसतो असा माझा विचार आहे. याच्या अनुकूल अथवा प्रतिकूल जे काही तुम्ही आपल्यासाठी हितकर समजता, ते सांगा. ॥११॥
|
रावणेनैवमुक्तस्तु प्रहस्तो वाहिनीपतिः । राक्षसेन्द्रमुवाचेदं असुरेन्द्रमिवोशना ॥ १२ ॥
|
रावणाने असे म्हटल्यावर, ज्याप्रमाणे शुक्राचार्य असुरराज बळीला आपला सल्ला देत असत त्याप्रमाणे सेनापति प्रहस्ताने त्या राक्षसराजा समक्ष आपले विचार व्यक्त केले. ॥१२॥
|
राजन् मंत्रितपूर्वं नः कुशलैः सह मंत्रिभिः । विवादश्चापि नो वृत्तः समवेक्ष्य परस्परम् ॥ १३ ॥
|
(त्याने म्हटले-) राजन् ! आपण लोकांनी कुशल मंत्र्यांसमवेत पूर्वीही या विषयावर विचार केला आहे. त्या दिवसात एक दुसर्याच्या मताची आलोचना करून आपणांमध्ये विवादही उपस्थित झाला होता. (आपण लोक सर्वांच्या संमतिने कुठल्याही एका निर्णयाप्रत पोहोचूं शकलो नव्हतो.) ॥१३॥
|
प्रदानेन तु सीतायाः श्रेयो व्यवसितं मया । अप्रदाने पुनर्युद्धं दृष्टमेव तथैव नः ॥ १४ ॥
|
माझा पहिल्यापासूनच हा निश्चय राहिला आहे की सीतेला परत करण्यानेच आम्हा सर्वांचे कल्याण होईल आणि परत केले नाही तर युद्ध अवश्य होईल. या निश्चयास अनुसरूनच आम्हांला आज हे युद्धाचे संकट दिसून येत आहे. ॥१४॥
|
सोऽहं दानैश्च मानैश्च सततं पूजितस्त्वया । सान्त्वैश्च विविधैः काले किं न कुर्यां हितं तव ॥ १५ ॥
|
परंतु आपण दान, मान आणि विविध सान्त्वनांच्या द्वारे वेळोवेळी सदाच माझा सत्कार केला आहे. मग मी आपले हितसाधन कसे करणार नाही ? (अथवा आपल्या हितासाठी कोणते कार्य करू शकणार नाही ?) ॥१५॥
|
न हि मे जीवितं रक्ष्यं पुत्रदारधनानि वा । त्वं पश्य मां जुहूषन्तं त्वदर्थं जीवितं युधि ॥ १६ ॥
|
मला आपले जीवन, स्त्री, पुत्र आणि धन आदिचे रक्षण करावयाचे नाही - यांच्या रक्षणाची मला काही चिंता नाही. आपण पहा की मी कशा प्रकारे आपल्यासाठी युद्धाच्या ज्वाळेत आपल्या जीवनाची आहूति देत आहे. ॥१६॥
|
एवमुक्त्वा तु भर्तारं रावणं वाहिनीपतिः । उवाचेदं बलाध्यक्षान् प्रहस्तः पुरतः स्थितान् ॥ १७ ॥
|
आपले स्वामी रावण यांना असे सांगून प्रधान सेनापती प्रहस्ताने आपल्या समोर उभे असलेल्या सेनाध्यक्षांना याप्रकारे सांगितले- ॥१७॥
|
समानयत मे शीघ्रं राक्षसानां महद्बलम् । मद्बाणानां तु वेगेन हतानां च रणाजिरे ॥ १८ ॥ अद्य तृप्यन्तु मांसादाः पक्षिणः काननौकसाम् ।
|
तुम्ही लोक शीघ्र माझ्या जवळ राक्षसांची विशाल सेना घेऊन या. आज मांसाहारी पक्षी समरांगणामध्ये माझ्या बाणांच्या वेगाने मारले गेलेल्या वानरांचे मांस खाऊन तृप्त होऊन जावोत. ॥१८ १/२॥
|
तस्य तद् वचनं श्रुत्वा बलाध्यक्षाः महाबलाः ॥ १९ ॥ बलमुद्योजयामासुः तस्मिन् राक्षसमन्दिरे ।
|
प्रहस्ताचे हे बोलणे ऐकून महाबली सेनाध्यक्षांनी रावणाच्या त्या महालाच्या जवळ विशाल सेनेला युद्धासाठी तयार केले. ॥१९ १/२॥
|
सा बभूव मुहूर्तेन भीमैर्नानाविधायुधैः ॥ २० ॥ लङ्का राक्षसवीरैस्तैः गजैरिव समाकुला ।
|
एकाच मुहूर्तात नाना प्रकारची अस्त्रे-शस्त्रे घेऊन हत्तींसारख्या भयानक राक्षसवीरांनी लंकापुरी भरून गेली. ॥२० १/२॥
|
हुताशनं तर्पयतां ब्राह्मणांश्च नमस्यताम् ॥ २१ ॥ आज्यगन्धप्रतिवहः सुरभिर्मारुतो ववौ ।
|
कित्येक राक्षस तुपाची आहूति देऊन अग्निदेवाला तृप्त करू लागले आणि ब्राह्मणांना नमस्कार करून आशीर्वाद घेऊ लागले. त्या समयी तुपाचा गंध घेऊन सुगंधित वायु सर्व बाजूस वाहू लागला. ॥२१ १/२॥
|
स्रजश्च विविधाकारा जगृहुस्त्वभिमंत्रिताः ॥ २२ ॥ संग्रामसज्जाः संहृष्टा धारयन् राक्षसास्तदा ।
|
राक्षसांनी मंत्रांच्या द्वारा अभिमंत्रित नाना प्रकारच्या माला ग्रहण केल्या आणि हर्ष आणि उत्साहाने युक्त होऊन युद्धोपयोगी वेषभूषा धारण केली. ॥२२ १/२॥
|
सधनुष्काः कवचिनो वेगादाप्लुत्य राक्षसाः ॥ २३ ॥ राक्षसं प्रेक्ष्य राजानं प्रहस्तं पर्यवारयन् ।
|
धनुष्य आणि कवच धारण केलेले राक्षस वेगाने उड्या मारून पुढे सरकले आणि राजा रावणाचे दर्शन करून प्रहस्ताला चारी बाजूनी घेरून उभे राहिले. ॥२३ १/२॥
|
अथामंत्र्य च राजानं भेरीमाहत्य भैरवाम् ॥ २४ ॥ आरुरोह रथं युक्तः प्रहस्तः सज्जकल्पितम् ।
|
तदनंतर राजाची आज्ञा घेऊन भयंकर भेरी वाजविल्या गेल्या आणि कवच आदि धारण करून युद्धासाठी उद्यत झालेला प्रहस्त अस्त्र-शस्त्रांनी सुसज्जित होऊन रथावर आरूढ झाला. ॥२४ १/२॥
|
हयैर्महाजवैर्युक्तं सम्यक्सूतं सुसंयतम् ॥ २५ ॥ महाजलदनिर्घोषं साक्षाच्चन्द्रार्कभास्वरम् ।
|
प्रहस्ताच्या त्या रथाला अत्यंत वेगवान् घोडे जुंपलेले होते. त्याचा सारथीही आपल्या कार्यात कुशल होता. तो रथ पूर्णतः सारथ्याच्या नियंत्रणात होता. तो चालू लागल्यावर महान् मेघांच्या गर्जनेप्रमाणे घर घर ध्वनि होत होता. तो रथ साक्षात् चंद्र आणि सूर्यासमान प्रकाशित होत होता. ॥२५ १/२॥
|
उरगध्वजदुर्द्धर्षं सुवरूथं स्वपस्करम् ॥ २६ ॥ सुवर्णजालसंयुक्तं प्रहसन्तमिव श्रिया ।
|
सर्पाकार अथवा सर्पचिन्हित ध्वजेमुळे तो दुर्धर्ष प्रतीत होत होता. त्या रथाच्या रक्षणासाठी जे कवच होते ते फारच सुंदर दिसत होते. त्याचे सर्व अंग सुंदर होते आणि त्यात उत्तमोत्तम सामग्री ठेवलेली होती. त्या रथामध्ये सोन्याची जाळी बसविलेली होती. तो आपल्या कांतिने जणु हसत असल्यासारखा भासत होता (अथवा दुसर्या कांतिमान् पदार्थांचा उपहास करत होता.) ॥२६ १/२॥
|
ततस्तं रथमास्थाय रावणार्पितशासनः ॥ २७ ॥
लङ्काया निर्ययौ तूर्णं बलेन महता वृतः ।
|
त्या रथावर बसून रावणाची आज्ञा शिरोधार्य करून विशाल सेनेने घेरलेला प्रहस्त तात्काळ लंकेतून बाहेर पडला. ॥२७ १/२॥
|
ततो दुन्दुभिनिर्घोषः पर्जन्यनिनदोपमः । वादित्राणां च निनदः पूरयन्निव मेदिनीम् ॥ २८ ॥
|
तो बाहेर निघताच मेघाच्या गंभीर गर्जनेसमान दुंदुभि घोष होऊ लागला. अन्य रणवाद्यांचा निनादही पृथ्वीला परिपूर्ण करत आहे असे प्रतीत होऊ लागले. ॥२८॥
|
शुश्रुवे शङ्खशब्दश्च प्रयाते वाहिनीपतौ । निनदन्तः स्वरान् घोरान् राक्षसा जग्मुरग्रतः ॥ २९ ॥
भीमरूपा महाकायाः प्रहस्तस्य पुरःसराः ।
|
सेनापतीच्या प्रस्थानसमयी शंखांचा ध्वनीही ऐकू येऊ लागला. प्रहस्ताच्या पुढे जाणारे भयानक रूप असलेले विशालकाय राक्षस भयंकर स्वराने गर्जना करत पुढे निघाले. ॥२९ १/२॥
|
नरान्तकः कुंभहनुः महानादः समुन्नतः । प्रहस्तसचिवा ह्येते निर्ययुः परिवार्य तम् ॥ ३० ॥
|
नरान्तक, कुंभहनु, महानाद आणि समुन्नात - हे प्रहस्ताचे चार सचिव त्याला चारी बाजूनी घेरून बाहेर पडले. ॥३०॥
|
व्यूढेनैव सुघोरेण पूर्वद्वारात् स निर्ययौ । गजयूथनिकाशेन बलेन महता वृतः ॥ ३१ ॥
|
प्रहस्ताची ती विशाल सेना हत्तींच्या समूहासारखी अत्यंत भयंकर भासत होती. तिची व्यूहरचना केली गेली होती. त्या व्यूहबद्ध सेनेसहितच प्रहस्त लंकेच्या पूर्वद्वारातून बाहेर पडला. ॥३१॥
|
सागरप्रतिमौघेन वृतस्तेन बलेन सः । प्रहस्तो निर्ययौ क्रुद्धः कालान्तकयमोपमः ॥ ३२ ॥
|
समुद्रासमान त्या अपार सेनेसह जेव्हा प्रहस्त बाहेर पडला त्यासमयी तो क्रोधाविष्ट झालेल्या प्रलयकालच्या संहारकारी यमराजासारखा दिसत होता. ॥३२॥
|
तस्य निर्याणघोषेण राक्षसानां च नर्दताम् । लङ्कायां सर्वभूतानि विनेदुर्विकृतैः स्वरैः ॥ ३३ ॥
|
त्याच्या प्रस्थान समयी जो भेरी आदि वाद्यांचा आणि गर्जना करणार्या राक्षसांचा गंभीर घोष झाला, त्यामुळे भयभीत होऊन लंकेतील सर्व प्राणी विकृत स्वरात चीत्कार करू लागले. ॥३३॥
|
व्यभ्रमाकाशमाविश्य मांसशोणितभोजनाः । मण्डलान्यपसव्यानि खगाश्चक्रू रथं प्रति ॥ ३४ ॥
|
त्यासमयी ढगरहित आकाशात उडून रक्त-मासांचे भोजन करणारे पक्षी मण्डल बनवून प्रहस्ताच्या रथाची दक्षिणावर्त परिक्रमा करू लागले. ॥३४॥
|
वमन्त्यः पावकज्वालाः शिवा घोरं ववाशिरे । अन्तरिक्षात् पपातोल्का वायुश्च परुषं ववौ ॥ ३५ ॥
|
भयानक कोल्हीणी तोंडातून आगीच्या ज्वाळा ओकत अशुभसूचक बोली बोलू लागल्या. आकाशांतून उल्कापात होऊ लागला आणि प्रचण्ड वारा वाहू लागला. ॥३५॥
|
अन्योन्यमभिसंरब्धा ग्रहाश्च न चकाशिरे । मेघाश्च खरनिर्घोषा रथस्योपरि रक्षसः ॥ ३६ ॥
ववर्षू रुधिरं चास्य सिषिचुश्च पुरःसरान् । केतुमूर्धनि गृध्रस्तु विलीनो दक्षिणामुखः ॥ ३७ ॥
नदन्नुभयतः पार्श्वं समग्रां श्रियमाहरत् ।
|
ग्रह रोषपूर्वक आपापसात युद्ध करू लागले, ज्यामुळे त्यांचा प्रकाश मंदावला तसेच मेघ त्या राक्षसाच्या रथावर गाढवा सारख्या आवाजात गर्जना करु लागले, रक्ताचा वर्षाव करू लागले आणि पुढे चालणार्या सैनिकांना ओढू लागले. त्याच्या ध्वजावर दक्षिणेकडे तोंड करून गिधाड येऊन बसले. त्याने दोहो बाजूस आपली अशुभ बोली बोलून त्या राक्षसाची सारी शोभा संपत्ति हरण केली. ॥३६-३७ १/२॥
|
सारथेर्बहुशश्चास्य संग्राममवगाहतः ॥ ३८ ॥
प्रतोदो न्यपतद्धस्तात् सूतस्य हयसादिनः ।
|
संग्रामभूमी मध्ये प्रवेश करते समयी घोड्यांना काबूत ठेवणार्या त्याच्या सारथ्याच्या हातातून कित्येक वेळा चाबूक खाली पडला. ॥३८ १/२॥
|
निर्याणश्रीश्च या च स्याद् भास्वरा च सुदुर्लभा ॥ ३९ ॥
सा ननाश मुहूर्तेन समे च स्खलिता हयाः ।
|
युद्धासाठी निघतांना प्रहस्ताची जी परम दुर्लभ आणि प्रकाशमान शोभा दिसत होती ती एका मुहूर्तामध्येच नष्ट होऊन गेली. त्याचे घोडे समतल भूमीवरही अडखळून खाली पडले. ॥३९ १/२॥
|
प्रहस्तं त्वं हि निर्यान्तं प्रख्यातबलपौरुषम् । युधि नानाप्रहरणा कपिसेनाभ्यवर्तत ॥ ४० ॥
|
ज्याचे गुण आणि पौरुष विख्यात होते, तो प्रहस्त ज्याक्षणी युद्धभूमीत उपस्थित झाला, की त्याच क्षणी शिला, वृक्ष आदि नाना प्रकारची प्रहार-साधने घेतलेली वानरसेना त्याचा सामना करण्यासाठी उपस्थित झाली. ॥४०॥
|
अथ घोषः सुतुमुलो हरीणां समजायत । वृक्षानारुजतां चैव गुर्वीर्वै गृह्णतां शिलाः ॥ ४१ ॥
|
तदनंतर वृक्षांना उपटणार्या आणि भारी शिलांना उचलणार्या वानरांचा अत्यंत भयंकर कोलाहल सर्वत्र पसरला. ॥४१॥
|
नदतां राक्षसानां च वानराणां च गर्जताम् । उभे प्रमुदिते सैन्ये रक्षोगणवनौकसाम् ॥ ४२ ॥
|
एका बाजूस राक्षस सिंहनाद करत होते तर दुसरीकडे वानर गर्जत होते. त्या सर्वांचा तुमुलनाद तेथे पसरला गेला. राक्षस आणि वानर ह्या दोन्ही सेना हर्ष आणि उत्साहाने भरलेल्या होत्या. ॥४२॥
|
वेगितानां समर्थानां अन्योन्यवधकाङ्क्षिणाम् । परस्परं चाह्वयतां निनादः श्रूयते महान् ॥ ४३ ॥
|
अत्यंत वेगवान्, समर्थ तसेच एक दुसर्याच्या वधाची इच्छा करणारे योद्धे परस्परात आव्हान देत होते. त्यांचा महान कोलाहल सर्वांना ऐकू येत होता. ॥४३॥
|
ततः प्रहस्तः कपिराजवाहिनीं अभिप्रतस्थे विजयाय दुर्मतिः । विवृद्धवेगां च विवेश तां चमूं यथा मुमूर्षुः शलभो विभावसुम् ॥ ४४ ॥
|
त्याच समयी दुर्बुद्धी प्रहस्त विजयाच्या अभिलाषेने वानरराज सुग्रीवाच्या सेनेकडे वळला आणि पतंग जसे मरण्यासाठी आगीवर तुटून पडतात त्याच प्रकारे तो वाढलेल्या वेगवान् वानरसेनेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागला. ॥४४॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे सप्तपञ्चाशः सर्गः ॥ ५७ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा सत्तावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५७॥
|