श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ द्विपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अयोध्यायां राजभवने प्रविष्टेन लक्ष्मणेन खिन्नं श्रीरामं दृष्ट्‍वा तस्मै सान्त्वनादानम् -
अयोध्येच्या राजभवनात पोहोचून लक्ष्मणांची दुःखी श्रीरामांशी भेट आणि त्यांना सान्त्वना देणे -
तत्र तां रजनीमुष्य केशिन्यां रघुनन्दनः ।
प्रभाते पुनरुत्थाय लक्ष्मणः प्रययौ तदा ॥ १ ॥
केशिनीच्या तटावर ती रात्र घालवून रघुनंदन लक्ष्मण प्रातःकाळी उठले आणि नंतर तेथून पुढे निघाले. ॥१॥
ततोऽर्धदिवसे प्राप्ते प्रविवेश महारथः ।
अयोध्यां रत्‍नसम्पूर्णां हृष्टपुष्टजनावृताम् ॥ २ ॥
दुपार होता होता त्यांच्या विशाल रथाने रत्‍ने-धन यांनी संपन्न आणि हृष्ट-पुष्ट मनुष्यांनी भरलेल्या अयोध्यापुरीत प्रवेश केला. ॥२॥
सौमित्रिस्तु परं दैन्यं जगाम सुमहामतिः ।
रामपादौ समासाद्य वक्ष्यामि किमहं गतः ॥ ३ ॥
तेथे पोहोचताच परम बुद्धिमान्‌ सौमित्राला फार दुःख झाले. ते विचार करू लागले - मी श्रीरामचंद्रांच्या चरणांपाशी जाऊन काय सांगू ? ॥३॥
तस्यैवं चिन्तयानस्य भवनं शशिसंनिभम् ।
रामस्य परमोदारं पुरस्तात् समदृश्यत ॥ ४ ॥
ते याप्रकारे विचार करतच होते की चंद्रम्यासमान उज्ज्वल श्रीरामांचे विशाल राजभवन समोरच दृष्टीस पडले. ॥४॥
राज्ञस्तु भवनद्वारि सोऽवतीर्य नरोत्तमः ।
अवाङ्‌मुखो दीनमनाः प्रविवेशानिवारितः ॥ ५ ॥
राजमहालाच्या द्वारावर रथातून उतरून ते नरश्रेष्ठ लक्ष्मण खाली मान घालून दुःखी मनाने अडवले न जाता सरळ आत गेले. ॥५॥
स दृष्ट्‍वा राघवं दीनं आसीनं परमासने ।
नेत्राभ्यामश्रुपूर्णाभ्यां ददर्शाग्रजमग्रतः ॥ ६ ॥

जग्राह चरणौ तस्य लक्ष्मणो दीनचेतनः ।
उवाच दीनया वाचा प्राञ्जलिः सुसमाहितः ॥ ७ ॥
त्यांनी पाहिले की राघव दुःखी होऊन एका सिंहासनावर बसलेले आहेत आणि त्यांचे दोन्ही नेत्र अश्रुंनी डबडबलेले आहेत. या अवस्थेत मोठ्‍या भावाला पाहून दुःखी मनाने लक्ष्मणांनी त्यांचे दोन्ही पाय धरले आणि हात जोडून चित्त एकाग्र करून ते दीनवाणीने म्हणाले- ॥६-७॥
आर्यस्याज्ञां पुरस्कृत्य विसृज्य जनकात्मजाम् ।
गङ्‌गातीरे यथोद्दिष्टे वाल्मीकेराश्रमे शुभे ॥ ८ ॥

तत्र तां च शुभाचारां आश्रमान्ते यशस्विनीम् ।
पुनरप्यागतो वीर पादमूलमुपासितुम् ॥ ९ ॥
वीर महाराजांची आज्ञा शिरोधार्य करून मी सदा शुभ आचरण करणार्‍या, यशस्विनी जनकात्मजा सीतेला गंगेच्या तटावर वाल्मीकिंच्या शुभ आश्रमाच्या समीप निर्दिष्ट स्थानावर सोडून पुन्हा आपल्या श्रीचरणांच्या सेवेसाठी येथे परत आलो आहे. ॥८-९॥
मा शुचः पुरुषव्याघ्र कालस्य गतिरीदृशी ।
त्वद्विधा न हि शोचन्ति बुद्धिमन्तो मनस्विनः ॥ १० ॥
पुरुषसिंह ! आपण शोक करू नये. काळाची गति अशीच असते. आपल्यासारखा बुद्धिमान्‌ आणि मनस्वी मनुष्य शोक करीत नाही. ॥१०॥
सर्वे क्षयान्ता निचयाः पतनान्ताः समुच्छ्रयाः ।
संयोगा विप्रयोगान्ता मरणान्तं च जीवितम् ॥ ११ ॥
संसारात जितके संचय आहेत त्या सर्वांचा विनाश आहे, उत्थानाचा अंत पतन आहे, संयोगाचा अंत वियोग आहे आणि जीवनाचा अंत मरण आहे. ॥११॥
तस्मात् पुत्रेषु दारेषु मित्रेषु च धनेषु च ।
नातिप्रसङ्‌गः कर्तव्यो विप्रयोगो हि तैर्ध्रुवम् ॥ १२ ॥
म्हणून स्त्री, पुत्र, मित्र आणि धनांत विशेष आसक्ती करता उपयोगी नाही, कारण त्यांचा वियोग होणे निश्चितच आहे. ॥१२॥
शक्तस्त्वं आत्मनाऽऽत्मानं विनेतुं मनसा मनः ।
लोकान् सर्वांश्च काकुत्स्थ किं पुनः शोकमात्मनः ॥ १३ ॥
काकुत्स्थ ! आपण आत्म्याने आत्म्याला, मनाने मनाला तसेच संपूर्ण लोकांनाही संयत ठेवण्यास समर्थ आहात, मग आपल्या शोकाला काबूत ठेवणे आपल्यासाठी काय मोठीशी गोष्ट आहे. ॥१३॥
नेदृशेषु विमुह्यन्ति त्वद्विधाः पुरुषर्षभाः ।
अपवादः स किल ते पुनरेष्यति राघव ॥ १४ ॥
आपल्यासारखे श्रेष्ठ पुरुष या प्रकारचा प्रसंग आल्यावर मोहित होत नाहीत. राघवा ! जर आपण दुःखी रहाल तर तो अपवाद आपल्यावर फिरून येईल. ॥१४॥
यदर्थं मैथिली त्यक्ता अपवादभयान्नृप ।
सोऽपवादः पुरे राजन् भविष्यति न संशयः ॥ १५ ॥
राजन्‌ ! ज्या अपवादाच्या भयाने आपण मैथिलीचा त्याग केला आहे, निःसंदेह तो अपवाद नगरात परत पसरू लागेल. (लोक म्हणतील की दुसर्‍याच्या घरी राहिलेल्या स्त्रीचा त्याग करून हे रात्रंदिवस तिच्या चिंतेने दुःखी रहात आहेत.) ॥१५॥
स त्वं पुरुषशार्दूल धैर्येण सुसमाहितः ।
त्यजैनां दुर्बलां बुद्धिं सन्तापं मा कुरुष्व ह ॥ १६ ॥
म्हणून पुरुषसिंह ! आपण धैर्याने चित्त एकाग्र करून या दुर्बल शोकबुद्धिचा त्याग करावा - संतप्त होऊ नये. ॥१६॥
एवमुक्तः स काकुत्स्थो लक्ष्मणेन महात्मना ।
उवाच परया प्रीत्या सौमित्रिं मित्रवत्सलः ॥ १७ ॥
महात्मा लक्ष्मणांनी याप्रकारे सांगितल्यावर मित्रवत्सल काकुत्स्थांनी अत्यंत प्रसन्नतेने सौमित्रास म्हटले - ॥१७॥
एवमेतन्नरश्रेष्ठ यथा वदसि लक्ष्मण ।
परितोषश्च मे वीर मम कार्यानुशासने ॥ १८ ॥
नरश्रेष्ठ वीर लक्ष्मणा ! तू जसे सांगतो आहेस, ते अगदी बरोबर आहे. तू माझ्या आदेशाचे पालन केलेस, त्यामुळे मला फार संतोष झाला. ॥१८॥
निवृत्तिश्चागता सौम्य सन्तापश्च निराकृतः ।
भवद्‌वाक्यैः सुरुचिरैः अनुनीतोऽस्मि लक्ष्मण ॥ १९ ॥
सौम्य लक्ष्मणा ! आता मी दुःखापासून निवृत्त झालो आहे. संतापाला मी आपल्या हृदयांतून हाकलून दिले आहे आणि तुझ्या सुंदर वचनांनी मला फार शांती मिळाली आहे. ॥१९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे द्विपञ्चाशः सर्गः ॥ ५२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा बावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP