पथि विविधामाशङ्कां कुर्वतो लक्ष्मणसहितस्य श्रीरामस्य स्वाश्रमे आगमनं तत्र सीतां अदृष्ट्वा व्यथायां निमज्जनम् -
|
मार्गात अनेक प्रकारच्या आशंका करीत लक्ष्मणासहित श्रीरामांचे आश्रमात येणे आणि तेथे सीता न मिळल्याने व्यथित होणे -
|
स दृष्ट्वा लक्ष्मणं दीनं शून्ये दशरथात्मजः ।
पर्यपृच्छत धर्मात्मा वैदेहीमागतं विना ॥ १ ॥
|
लक्ष्मणाला दीन, संतोषरहित तसेच सीतेला बरोबर न घेतां आलेला पाहून धर्मात्मा दशरथनंदन श्रीरामांनी विचारले- ॥१॥
|
प्रस्थितं दण्डकारण्यं या मामनुजगाम ह ।
क्व सा लक्ष्मण वैदेही यां हित्वा त्वमिहागतः ॥ २ ॥
|
लक्ष्मण ! जी दण्डकारण्याकडे प्रस्थित झाल्यावर अयोध्येहून माझ्या मागोमाग निघून आली तसेच जिला तू एकटी सोडून येथे आला आहेस, ती वैदेही सीता यासमयी कोठे आहे ? ॥२॥
|
राज्यभ्रष्टस्य दीनस्य दण्डकान् परिधावतः ।
क्व सा दुःखसहाया मे वैदेही तनुमध्यमा ॥ ३ ॥
|
मी राज्यभ्रष्ट आणि दीन होऊन दण्डकारण्यात फिरत राहिलो आहे, या दुःखात जी मला सहाय्यक बनली ती तनुमध्यमा (सूक्ष्मकटिप्रदेश असणारी) वैदेही कोठे आहे ? ॥३॥
|
यां विना नोत्सहे वीर मुहूर्तमपि जीवितुम् ।
क्व सा प्राणसहाया मे सीता सुरसुतोपमा ॥ ४ ॥
|
वीर ! जिच्या शिवाय मी दोन घटकाही जिवंत राहू शकत नाही तसेच जी माझ्या प्राणांची सहचरी आहे ती देवकन्यां प्रमाणे सुंदर असलेली सीता या समयी कोठे आहे ? ॥४॥
|
पतित्वममराणां वा पृथिव्याश्चापि लक्ष्मण ।
विना तां तपनीयाभां नेच्छेयं जनकात्मजाम् ॥ ५ ॥
|
लक्ष्मणा ! तापविलेल्या सोन्याप्रमाणे कांति असलेल्या जनकनंदिनी सीतेविना मी पृथ्वीचे आणि देवतांचे अधिपत्य याचीही इच्छा करीत नाही. ॥५॥
|
कच्चिज्जीवति वैदेही प्राणैः प्रियतरा मम ।
कच्चित् प्रव्राजनं वीर न मे मिथ्या भविष्यति ॥ ६ ॥
|
वीरा ! जी मला प्राणांहून अधिक प्रिय आहे, ती वैदेही सीता काय आता जिवंत असेल ? माझे वनात येणे सीतेला गमावून बसण्यामुळे व्यर्थ तर होऊन जाणार नाही ना ? ॥६॥
|
सीतानिमित्तं सौमित्रे मृते मयि गते त्ययि ।
कच्चित् सकामा कैकेयी सुखिता सा भविष्यति ॥ ७ ॥
|
सौमित्र ! सीता नष्ट होण्यामुळे जेव्हा मी मरून जाईन आणि तू एकटाच अयोध्येस परत जाशील, त्या समयी माता कैकेयी सफल मनोरथ तसेच सुखी होईल कां ? ॥७॥
|
सपुत्रराज्यां सिद्धार्थां मृतपुत्रा तपस्विनी ।
उपस्थास्यति कौसल्या कच्चित् सौम्येन कैकयीम् ॥ ८ ॥
|
जिचा एकुलता एक पुत्र मी मरून जाईन ती तपस्विनी माता कौसल्या काय पुत्र आणि राज्यानी संपन्न तसेच कृतकृत्य झालेल्या कैकेयीच्या सेवेमध्ये विनीतभावाने उपस्थित होईल ? ॥८॥
|
यदि जीवति वैदेही गमिष्याम्याश्रमं पुनः ।
संवृत्ता यदि वृत्ता सा प्राणांस्त्यक्ष्यामि लक्ष्मण ॥ ९ ॥
|
लक्ष्मणा ! जर वैदेही सीता जिवंत असेल तरच मी परत आश्रमात पाय ठेवीन. जर सदाचार- परायणा मैथिली मरून गेलेली असेल तर मीही प्राणांचा परित्याग करीन. ॥९॥
|
यदि मामाश्रमगतं वैदेही नाभिभाषते ।
पुनः प्रहसिता सीता विनशिष्यामि लक्ष्मण ॥ १० ॥
|
लक्ष्मणा ! जर आश्रमात गेल्यावर वैदेही सीता हसतमुखाने समोर येऊन माझ्याशी बोलली नाही तर मी जिवंत राहाणार नाही. ॥१०॥
|
ब्रूहि लक्ष्मण वैदेही यदि जीवति वा न वा ।
त्वयि प्रमत्ते रक्षोभिर्भक्षिता वा तपस्विनी ॥ ११ ॥
|
लक्ष्मणा ! बोल तर खरे ! वैदेही जिवंत आहे की नाही ? तुझ्या असावधान राहाण्यामुळे राक्षसांनी त्या तपस्विनीला खाऊन तर टाकले नाही ना ? ॥११॥
|
सुकुमारी च बाला च नित्यं चादुःखभागिनी ।
मद्वियोगेन वैदेही व्यक्तं शोचति दुर्मनाः ॥ १२ ॥
|
जी सुकुमार आहे भोळी भाबडी आहे, तसेच जिला वनवासाच्या दुःखाचा पूर्वी अनुभव आलेला नाही ती वैदेही आज माझ्या वियोगाने व्यथित-चित्त होऊन निश्चितच शोक करीत राहिली असेल. ॥१२॥
|
सर्वथा रक्षसा तेन जिह्मेन सुदुरात्मना ।
वदता लक्ष्मणेत्युच्चैस्तवापि जनितं भयम् ॥ १३ ॥
|
त्या कुटील आणि दुरात्मा राक्षसाने उच्चस्वराने हा लक्ष्मण ! अशी हाक मारून तुझ्या मनात सर्वथा भय उत्पन्न केले होते. ॥१३॥
|
श्रुतश्च मन्ये वैदेह्या स स्वरः सदृशो मम ।
त्रस्तया प्रेषितस्त्वं च द्रष्टुं मां शीघ्रमागतः ॥ १४ ॥
|
असे कळून येत आहे की वैदेहीने माझ्या स्वराशी मिळताजुळता त्या राक्षसाचा स्वर ऐकला होता आणि भयभीत होऊन तुला धाडून दिले आणि तूही शीघ्र मला पहाण्यासाठी निघून आलास. ॥१४॥
|
सर्वथा तु कृतं कष्टं सीतामुत्सृजता वने ।
प्रतिकर्तुं नृशंसानां रक्षसां दत्तमन्तरम् ॥ १५ ॥
|
काही का असेना, - तू वनात सीतेला एकटी सोडून सर्वथा दुःखद कार्य केले आहेस. क्रूर कर्म करणार्या राक्षसांना बदला घेण्याची संधी तू दिलीस. ॥१५॥
|
दुःखिताः खरघातेन राक्षसाः पिशिताशनाः ।
तैः सीता निहता घोरैर्भविष्यति न संशयः ॥ १६ ॥
|
मांसभक्षी निशाचर माझ्या हाताने खर मारल्या गेल्याने फार दुःखी झाले होते. त्या घोर राक्षसांनी सीतेला मारून टाकले असेल यात संशय नाही. ॥१६॥
|
अहोऽस्मि व्यसने मग्नः सर्वथा रिपुनासन ।
किं त्विदानीं करिष्यामि शङ्के प्राप्तव्यमीदृशम् ॥ १७ ॥
|
शत्रुनाशन ! मी सर्वथा संकटाच्या समुद्रात बुडून गेलो आहे. अशा दुःखाचा अवश्यच अनुभव करावा लागेल- अशी शंका येत आहे. म्हणून मी आता काय बरे करूं ? ॥१७॥
|
इति सीतां वरारोहां चिन्तयन्नेव राघवः ।
आजगाम जनस्थानं त्वरया सहलक्ष्मणः ॥ १८ ॥
|
याप्रकारे सुंदरी सीतेच्या विषयी चिंता करीतच लक्ष्मणासहित राघव तात्काळ जनस्थानात आले. ॥१८॥
|
विगर्हमाणोऽनुजमार्तरूपं
क्षुधाश्रमेणैव पिपासया च ।
विनिःश्वसञ्शुष्कमुखो विषण्णः
प्रतिश्रयं प्राप्य समीक्ष्य शून्यम् ॥ १९ ॥
|
आपला दुःखी अनुज लक्ष्मण यांस दोष देत व भूक-तहान तसेच परिश्रमामुळे दीर्घ श्वास घेत कोरड्या तोंडाने श्रीराम आश्रमाच्या निकटवर्ती स्थानावर येऊन त्यास सुने पाहून विषादात बुडून गेले. ॥१९॥
|
स्वमाश्रमं स प्रविगाह्य वीरो
विहारदेशाननुसृत्य कांश्चित् ।
एतत्तदित्येव निवासभूमौ
प्रहृष्टरोमा व्यथितो बभूव ॥ २० ॥
|
वीर श्रीरामांनी आश्रमात प्रवेश करून तो शून्य पाहून काही अशा स्थळामध्ये अनुसंधान केले जी सीतेची विहारस्थाने होती. ती स्थानेही शून्य असल्याचे पाहून ते क्रीडाभूमी मध्ये - हेच ते स्थान आहे जेथे मी अमुक क्रीडा केली होती असे स्मरण होऊन त्यांच्या शरीरावर रोमांच आले आणि ते व्यथेने पीडित झाले. ॥२०॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे अष्टपञ्चाशः सर्गः ॥ ५८ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा अठ्ठावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५८॥
|