[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ पञ्चदशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
पञ्चवट्यां रम्ये प्रदेशे श्रीरामस्याज्ञया लक्ष्मणेन सुन्दरपर्णशालाया निर्माणं तत्र सीतालक्ष्मणसहितस्य श्रीरामस्य निवासश्च -
पञ्चवटीच्या रमणीय प्रदेशात श्रीरामांच्या आज्ञेने लक्ष्मण द्वारा सुंदर पर्णशालेची निर्मिती तसेच त्यामधे सीता आणि लक्ष्मणासहित श्रीरामांचा निवास -
ततः पञ्चवटीं गत्वा नानाव्यालमृगायुताम् ।
उवाच लक्ष्मणं रामो सौमित्रिं दीप्ततेजसम् ॥ १ ॥
नाना प्रकारच्या सर्पांनी, हिंस्त्र जंतुनी आणि मृगानी भरलेल्या पञ्चवटीत पोहोचून श्रीरामांनी उद्दीप्त तेज असलेल्या आपला भाऊ लक्ष्मणास म्हटले- ॥१॥
आगताः स्म यथोद्दिष्टं यं देशं मुनिरब्रवित् ।
अयं पञ्चवटीदेशः सौम्य पुष्पितकाननः ॥ २ ॥
सौम्य ! मुनिवर अगस्त्यांनी आपल्याला ज्या स्थानाचा परिचय दिला होता, त्यांच्या तथाकथित स्थानात आपण येऊन पोहोचलो आहोत. हाच पञ्चवटीचा प्रदेश आहे. येथील वनप्रदेश पुष्पांनी किती शोभून दिसत आहे. ॥२॥
सर्वतश्चार्यतां दृष्टिः कानने निपुणो ह्यसि ।
आश्रमः कतरस्मिन् नो देशे भवति सम्मतः ॥ ३ ॥
’लक्ष्मणा ! तू या वनात चोहीकडे दृष्टी टाक. कारण की या कार्यात तू निपुण आहेस. पाहून कुठल्या स्थानी आश्रम बनविणे आपल्यासाठी चांगले ठरेल याचा निश्चय कर. ॥३॥
रमते यत्र वैदेही त्वमहं चैव लक्ष्मण ।
तादृशो दृश्यातां देशः संनिकृष्टजलाशयः ॥ ४ ॥

वनरामण्यकं यत्र जलरामण्यकं तथा ।
संनिकृष्टं च यस्मिंस्तु समित्पुष्पकुशोदकम् ॥ ५ ॥
’लक्ष्मणा ! तू असे स्थान शोधून काढ की जेथून जलाशय निकट असेल, जेथे वैदेही सीतेचे मन रमेल, जेथे तू आणि मी ही प्रसन्नतापूर्वक राहू शकू. जेथे वनाचे आणि जलाचे दोन्ही रमणीय दृश्य असेल तसेच ज्या स्थानाच्या आसपासच समिधा, फुले, कुश आणि जल मिळण्याची सुविधा असेल. ॥४-५॥
एवमुक्तस्तु रामेण लक्ष्मणः संयताञ्जलिः ।
सीतासमक्षं काकुत्स्थमिदं वचनमब्रवीत् ॥ ६ ॥
श्रीरामचंद्रांनी असे सांगितल्यावर लक्ष्मण दोन्ही हात जोडून सीतेच्या समोरच त्या काकुत्स्थ श्रीरामास या प्रकारे बोलले- ॥६॥
परवानस्मि काकुस्थं त्वयि वर्षशतं स्थिते ।
स्वयं तु रुचिरे देशे क्रियातामिति मां वद ॥ ७ ॥
’काकुत्स्थ ! आपण असतांना मी सदा पराधीनच आहे. मी शेकडो अथवा अनंत वर्षापर्यंत आपल्या आज्ञेच्या अधीनच राहू इच्छितो. म्हणून आपण स्वतःच पाहून जे स्थान सुंदर वाटेल तेथे आश्रम बनविण्याची आज्ञा मला द्यावी - मला सांगावे की तू अमुक स्थानावर आश्रम बनव.’ ॥७॥
सुप्रीतस्तेन वाक्येन लक्ष्मणस्य महाद्युतिः ।
विमृशन् रोचयामास देशं सर्वगुणान्वितम् ॥ ८ ॥

स तं रुचिरमाक्रम्य देशमाश्रमकर्मणि ।
हस्तौ गृहीत्वा हस्तेन रामः सौमित्रिमब्रवीत् ॥ ९ ॥
लक्ष्मणाच्या या वचनाने अत्यंत तेजस्वी भगवान श्रीरामांना फार प्रसन्नता वाटली आणि त्यानी स्वतःच विचार करून एक असे स्थान पसंत केले की जे सर्व प्रकारच्या उत्तम गुणांनी संपन्न आणि आश्रम बनविण्यासाठी योग्य होते. त्या स्थानी येऊन श्रीरामांनी लक्ष्मणाचा हात आपल्या हाती घेऊन म्हटले - ॥८-९॥
अयं देशः समः श्रीमान् पुष्पितैस्तरुभिर्वृतः ।
इहाश्रमपदं रम्यं यथावत् कर्तुमर्हसि ॥ १० ॥
’सुमित्रानंदन ! हे स्थान समतल आणि सुंदर आहे. तसेच फुललेल्या वृक्षांनी घेरलेले आहे. तुम्ही या स्थानावर यथोचित रूपाने एक रमणीय आश्रम निर्माण करावयास पाहिजे. ॥१०॥
इयमादित्यसङ्‌काशैः पद्मैः सुरभिगन्धिभिः ।
अदूरे दृश्यते रम्या पद्मिनी पद्मशोभिता ॥ ११ ॥
’ही जवळच सूर्यासमान उज्वल कांतीच्या मनोरम गंधयुक्त कमलांनी रमणीय प्रतीत होणारी तसेच पद्मांच्या शोभेने संपन्न पुष्करिणी दिसून येत आहे. ॥११॥
यथाख्यातमगस्त्येन मुनिना भावितात्मना ।
इयं गोदावरी रम्या पुष्पितैस्तरुभिर्वृता ॥ १२ ॥
’पवित्र अंतःकरणाच्या अगस्त्य मुनिंनी ज्याविषयी सांगितले होते ती विकसित वृक्षांच्या रांगांनी घेरलेली रमणीय गोदावरी नदी हीच आहे. ॥१२॥
हंसकारण्डवाकीर्णा चक्रवाकोपशोभिता ।
नातिदूरे न चासन्ने मृगयूथनिपीडिताः ॥ १३ ॥
’हिच्यात हंस आणि कारण्डव आदि जल पक्षी विचरत आहेत. चकवे हिची शोभा वाढवीत आहेत तसेच पाणी पिण्यासाठी येणार्‍या मृगांच्या झुंडी हिच्या तटावर (सर्वत्र) पसरल्या आहेत. ही नदी या स्थानापासून अधिक दूरही नाही अथवा अत्यंत निकटही नाही. ॥१३॥
मयूरनादिता रम्याः प्रांशवो बहुकन्दराः ।
दृश्यन्ते गिरयः सौम्य फुल्लैस्तरुभिरावृताः ॥ १४ ॥
’सौम्य ! येथे बर्‍याचशा गुफांनी युक्त उंच उंच पर्वत दिसून येत आहेत जेथे मयूरांची मधुर बोली गुंजत राहिली आहे. हे रमणीय पर्वत फुललेल्या वृक्षांनी व्याप्त आहेत. ॥१४॥
सौवर्णै राजतैस्ताम्रैर्देशे देशे तथा शुभैः ।
गवाक्षिता इवाभान्ति गजाः परमभक्तिभिः ॥ १५ ॥
’स्थाना-स्थानावर सोने, चांदी, तसेच तांब्याप्रमाणे रंग असलेल्या सुंदर गैरिक धातुनी उपलक्षित हे पर्वत जणु काय झरोख्यांच्या आकारात केल्या गेलेल्या नील, पीत आणि सफेद आदि रंगाच्या उत्तम शृगांर रचनांनी अलंकृत हत्तीच की काय असे शोभा पावत आहेत. ॥१५॥
सालैस्तालैस्तमालैश्च खर्जूरैः पनसैर्द्रुमैः ।
निवारैस्तिनिशैश्चैव पुन्नागैश्चोपशोभिताः ॥ १६ ॥

चूतैरशोकैस्तिलकैः केतकैरपि चम्पकैः ।
पुष्पगुल्मलतोपेतैस्तैस्तैस्तरुभिरावृताः ॥ १७ ॥

स्यन्दनैश्चन्दनैर्नीपैः पर्णासैर्लकुचैरपि ।
धवाश्वकर्णखदिरैः शमीकिंशुकपाटलैः ॥ १८ ॥
’पुष्पे, गुल्म तसेच लतावल्लरींनी युक्त साल, ताल, तमाल, खजूर, फणस, जलकदंब, तिनीश, पुन्नाग, आम्र ,अशोक, तिलक, केवडा, चम्पा, स्यंदन, चंदन, कदंब, पर्णास, लकुच, धव, अश्वकर्ण, खैर, शमी, पलाश आणि पाटल (पाडर) आदि वृक्षांनी घेरलेले हे पर्वत फारच शोभून दिसत आहेत. ॥१६-१८॥
इदं पुण्यमिदं रम्यमिदं बहुमृगद्विजम् ।
इह वत्स्याम सौमित्रे सार्धमेतेन पक्षिणा ॥ १९ ॥
’सुमित्रानंदन ! हे फारच पवित्र आणि अत्यंत रमणीय स्थान आहे. येथे बरेचसे पशु- पक्षी निवास करीत आहेत. आम्ही ही येथेच ह्या पक्षिराज जटायुसह राहू.’ ॥१९॥
एवमुक्तस्तु रामेण लक्ष्मणः परवीरहा ।
अचिरेणाश्रमं भ्रातुश्चकार सुमहाबलः ॥ २० ॥
श्रीरामांनी असे म्हटलावर शत्रुवीरांचा संहार करणार्‍या महाबली लक्ष्मणांनी भावासाठी शीघ्रच आश्रम बनवून तयार केला. ॥२०॥
पर्णशालां सुविपुलां तत्र सङ्‌घातमृत्तिकाम् ।
सुस्तम्भां मस्करैर्दीर्घैः कृतवंशां सुशोभनाम् ॥ २१ ॥

शमीशाखाभिरास्तीर्य दृढपाशावपाशिताम् ।
कुशकाशशरैः पर्णैः सुपरिच्छादितां तथा ॥ २२ ॥

समीकृततलां रम्यां चकार सुमहाबलः ।
निवासं राघवस्यार्थे प्रेक्षणीयमनुत्तमम् ॥ २३ ॥
तो आश्रम एका अत्यंत विस्तृत पर्ण शालेच्या रूपात बनविला गेला होता. महाबली लक्ष्मणाने प्रथम तेथे माती एकत्र करून भिंत उभी केली नंतर तिच्यात सुंदर आणि सुदृढ खांब उभे केले. खांबांच्या वर तिरके तिरके कळक ठेवले. ते ठेवल्यावर ती कुटी फार सुंदर दिसू लागली. नंतर त्या कळकावर त्यांनी शमीवृक्षाच्या फांद्या पसरल्या आणि त्यांना मजबूत दोर्‍यांनी घट्ट बांधले. त्यानंतर त्यावरून कुश, कास, बोरू आणि पाने पसरून त्या पर्णशालेला उत्तम प्रकारे शाकारले तसेच खालील जमीनीला समतल (बरोबर एक सारखी) करून कुटीला अत्यंत रमणीय बनविले. याप्रकारे लक्ष्मणांनी (राघवासाठी) श्रीरामचंद्रांसाठी परम उत्तम निवासगृह बनविले जे प्रेक्षणीय होते. ॥२१-२३॥
स गत्वा लक्ष्मणः श्रीमान् नदीं गोदावरीं तदा ।
स्नात्वा पद्मानि चादाय सफलः पुनरागतः ॥ २४ ॥
ते तयार करून श्रीमान् लक्ष्मणांनी गोदावरी नदीच्या तटावर जाऊन तात्काळ तिच्यात स्नान केले आणि कमळाची फुले आणि फळे घेऊन ते तेथेच परत आले. ॥२४॥
ततः पुष्पबलिं कृत्वा शान्तिं च स यथाविधि ।
दर्शयामास रामाय तदाश्रमपदं कृतम् ॥ २५ ॥
त्यानंतर शास्त्रीय विधिस अनुसरून देवतांसाठी फुलांचा बळी (उपहार सामग्री) अर्पित केला तसेच वास्तुशांती करून त्यांनी आपण बनविलेला आश्रम श्रीरामचंद्रांना दाखविला. ॥२५॥
स तं दृष्ट्‍वा कृतं सौम्यं आश्रमं सह सीतया ।
राघवः पर्णशालायां हर्षमाहारयत् परम् ॥ २६ ॥
भगवान राघव सीतेसह त्या नवीन बनविलेल्या सुंदर आश्रमास पाहून फार प्रसन्न झाले आणि काही काळ पर्यंत त्याच्या आंत उभे राहिले. ॥२६॥
सुसंहृष्टः परिष्वज्य बाहुभ्यां लक्ष्मणं तदा ।
अतिस्निग्धं च गाढं च वचनं चेदमब्रवीत् ॥ २७ ॥
तत्पश्चात अत्यंत हर्षाने युक्त होऊन त्यांनी दोन्ही भुजांनी लक्ष्मणाला हृदयाशी घट्ट आवळून धरले आणि अत्यंत स्नेहाने या प्रकारे म्हणाले - ॥२७॥
प्रीतोऽस्मि ते महत् कर्म त्वया कृतमिदं प्रभो ।
प्रदेयो यन्निमित्तं ते परिष्वङ्‌गो मया कृतः ॥ २८ ॥
’सामर्थ्यशाली लक्ष्मणा ! मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे. तू हे फार महान कार्य केले आहेस. यासाठी कुठलाही समुचित पुरस्कार नसल्याने मी तुला गाढ आलिङ्‌गन प्रदान केले आहे. ॥२८॥
भावज्ञेन कृतज्ञेन धर्मज्ञेन च लक्ष्मण ।
त्वया पुत्रेण धर्मात्मा न संवृत्तः पिता मम ॥ २९ ॥
’लक्ष्मणा ! तुम्ही माझ्या मनोभावास तात्काळ समजणारे, कृतज्ञ आणि धर्मज्ञ आहात. तुमच्या सारख्या पुत्राच्या कारणामुळे माझे धर्मात्मा पिता अद्याप मेलेले नाहीत - तुमच्या रूपाने ते आताही जीवितच आहेत. ’ ॥२९॥
एवं लक्ष्मणमुक्त्वा तु राघवो लक्ष्मिवर्धनः ।
तस्मिन् देशे बहुफले न्यवसत् स सुखं सुखी ॥ ३० ॥
लक्ष्मणास असे म्हणून आपल्या शोभेचा विस्तार करणारे सुखी (श्रीरामचंद्र) राघव प्रचुर फळांनी संपन्न त्या पञ्चवटी प्रदेशात सर्वांसह सुखपूर्वक राहू लागले. ॥३०॥
कञ्चित् कालं स धर्मात्मा सीतया लक्ष्मणेन च ।
अन्वास्यमानो न्यवसत् स्वर्गलोके यथामरः ॥ ३१ ॥
सीता आणि लक्ष्मणांनी सेवित होऊन धर्मात्मा श्रीराम काहीकाल पर्यंत तेथे स्वर्गलोकात देवता निवास करतात त्याप्रमाणे राहिले. ॥३१॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे पञ्चदशः सर्गः ॥ १५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाडाचा पंधरावा सर्ग पूरा झाला. ॥१५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP