[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। । चतुश्चत्वारिंशः सर्गः । ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सुमित्रया कौसल्याया आश्वासनम् - सुमित्राने कौसल्येला आश्वासन देणे -
विलपन्तीं तथा तां तु कौसल्यां प्रमदोत्तमाम् ।
इदं धर्म्ये स्थिता धर्म्यं सुमित्रा वाक्यमब्रवीत् ॥ १ ॥
स्त्रियांमध्ये श्रेष्ठ अशा कौसल्येला याप्रकारे विलाप करतांना पाहून धर्मपरायण सुमित्रा हे धर्मयुक्त वचन बोलली - ॥१॥
तवार्ये सद्‍गुणैर्युक्तः स पुत्रः पुरुषोत्तमः ।
किं ते विलपितेनैवं कृपणं रुदितेन वा ॥ २ ॥
'आर्ये ! तुमचे पुत्र श्रीराम सद्‌गुणांनी युक्त असून पुरूषांमध्ये श्रेष्ठ आहेत. त्यांच्यासाठी अशा प्रकारे विलाप करणे आणि दीनता पूर्वक रडणे व्यर्थ आहे. अशा प्रकारे रडून काय लाभ होणार आहे ? ॥२॥
यस्तवार्ये गतः पुत्रस्त्यक्त्वा राज्यं महाबलः ।
साधु कुर्वन् महात्मानं पितरं सत्यवादिनम् ॥ ३ ॥

शिष्टैराचरिते सम्यक्शश्वत् प्रेत्य फलोदये ।
रामो धर्मे स्थितः श्रेष्ठो न स शोच्यः कदाचन ॥ ४ ॥
'आर्ये ! जे राज्य सोडून आपल्या महात्मा पित्याला उत्तमप्रकारे सत्यवादी बनविण्यासाठी वनात निघून गेले आहेत, ते तुझे महाबलवान श्रेष्ठ पुत्र ज्या उत्तम धर्माचे सत्पुरुषांनी सर्वदा आणि सम्यक प्रकारे पालन केले आहे आणि जो परलोकातही फल प्रदान करणारा आहे त्यात स्थित आहेत, अशा धर्मात्म्यासाठी कदापि शोक करता कामा नाही. ॥३-४॥
वर्त्तते चोत्तमां वृत्तिं लक्ष्मणोऽस्मिन् सदाऽनघः ।
दयावान् सर्वभूतेषु लाभस्तस्य महात्मनः ॥ ५ ॥
'निष्पाप लक्ष्मण समस्त प्राण्यांविषयी दयाळू आहेत. ते सदा श्रीरामांप्रति उत्तम वर्तन करीत असतात, म्हणून त्या महात्मा लक्ष्मणांसाठी तर ही लाभाचीच गोष्ट आहे. ॥५॥
अरण्यवासे यद् दुःखं जानन्त्येव सुखोचिता ।
अनुगच्छति वैदेही धर्मात्मानं तवात्मजम् ॥ ६ ॥
'वैदेही सीता सुद्धा, जी सुख भोगण्यास योग्य आहे, वनवासांतील दुःखे उत्तम प्रकारे जाणून, विचारपूर्वक तुमच्या धर्मात्मा पुत्राचे अनुसरण करीत आहे. ॥६॥
कीर्तिभूतां पताकां यो लोके भ्रमयति प्रभुः ।
धर्मसत्यव्रतपरः किं न प्राप्तस्तवात्मजः ॥ ७ ॥
'जे प्रभु संसारात आपली किर्तिमय पताका फडकवीत आहेत आणि सदा सत्यव्रताच्या पालनात तत्पर रहात आहेत, त्या धर्मस्वरूप तुझे पुत्र श्रीरामांना कोणते श्रेय प्राप्त झालेले नाही बरे ? ॥७॥
व्यक्तं रामस्य विज्ञाय शौचं माहात्म्यमुत्तमम् ।
न गात्रमंशुभिः सूर्यः सन्तापयितुमर्हति ॥ ८ ॥
'श्रीरामांची पवित्रता आणि उत्तम माहात्म्य जाणून निश्चितच सूर्यही आपल्या किरणांच्या द्वारा त्यांच्या शरीरास संतप्त करू शकत नाही. ॥८॥
शिवः सर्वेषु कालेषु काननेभ्यो विनिःसृतः ।
राघवं युक्तशीतोष्णः सेविष्यति सुखोऽनिलः ॥ ९ ॥
'सर्व समयी वनात उत्पन्न (झालेला) होणारा उचित शीतलता आणि उष्णता युक्त सुखद आणि मंगलमय वायु राघवाची सेवाच करील. ॥९॥
शयानमनघं रात्रौ पितेवाभिपरिष्वजन् ।
रश्मिभिः संस्पृशञ्छीतश्चन्द्रमा ह्लादयिष्यति ॥ १० ॥
'रात्रीच्या वेळी उन्हाचे कष्ट दूर करणारा शीतल चंद्रमा झोपलेल्या निष्पाप श्रीरामांना (पित्याप्रमाणे) आपल्या किरणरूपी करांनी (हातांनी) आलिंगन देऊन आणि स्पर्श करून त्यांना आल्हाद प्रदान करेल. ॥१०॥
ददौ चास्त्राणि दिव्यानि यस्मै ब्रह्मा महौजसे ।
दानवेन्द्रं हतं दृष्ट्‍वा तिमिध्वजसुतं रणे ॥ ११ ॥
'श्रीरामांच्या द्वारे रणभूमीवर तिमिध्वजा (शंबर) चा पुत्र दानवराज सुबाहु मारला गेला हे पाहून विश्वामित्रांनी त्या महातेजस्वी वीराला अनेक दिव्यास्त्रे प्रदान केलेली आहेत. ॥११॥
स शूरः पुरुषव्याघ्रः स्वबाहुबलमाश्रितः ।
असन्त्रस्तो ह्यरण्येऽसौ वेश्मनीव निवत्स्यते ॥ १२ ॥
'ते पुरुषसिंह राम अत्यंत शूरवीर आहेत. ते आपल्याच बाहुबलाचा आश्रय घेऊन जसे घरी (महालात) राहात होते तसेच निर्भय होऊन वनात ही राहातील. ॥१२॥
यस्येषुपथमासाद्य विनाशं यान्ति शत्रवः ।
कथं न पृथिवी तस्य शासने स्थातुमर्हति ॥ १३ ॥
'ज्यांच्या बाणांचे लक्ष्य बनून शत्रू विनाशास प्राप्त होतात. त्यांच्या शासनात ही पृथ्वी आणि येथील प्राणी कसे बरे सुखात राहाणार नाहीत ? ॥१३॥
या श्रीः शौर्यं च रामस्य या च कल्याणसत्त्वता ।
निवृत्तारण्यवासः स्वं क्षिप्रं राज्यमवाप्स्यति ॥ १४ ॥
'श्रीरामांची जशी शारीरिक शोभा आहे, जसा पराक्रम आहे आणि जशी कल्याणकारिणी शक्ती आहे, यावरून ते वनांतून परत येऊन शीघ्रच आपले राज्य प्राप्त करतील हे (स्पष्ट) जाणून येत आहे. ॥१४॥
सूर्यस्यापि भवेत् सूर्यो ह्यग्नेरग्निः प्रभोः प्रभुः ।
श्रियः श्रीश्च भवेदग्र्या कीर्तिः कीर्त्याः क्षमाक्षमा ॥ १५ ॥

दैवतं दैवतानां च भूतानां भूतसत्तमः ।
तस्य के ह्यगुणा देवि राष्ट्रे वाप्यथवा पुरे ॥ १६ ॥
'देवी ! श्रीराम हे सूर्याचेही प्रकाशक आहेत, तसेच अग्निला दाहकत्व प्रदान करणारे आहेत. ते प्रभूंचेही प्रभू, लक्ष्मीची उत्तम लक्ष्मी आणि क्षमेची क्षमा आहेत. एवढेच नव्हे तर ते देवतांचे देव आणि भूतांचे उत्तम भूत आहेत. ते वनात राहोत अथवा नगरात, त्यांच्यासाठी कोणता चराचर प्राणी दोषासह असू शकतो. ॥१५-१६॥
पृथिव्या सह वैदेह्या श्रिया च पुरुषर्षभः ।
क्षिप्रं तिसृभिरेताभिः स ह रामोऽभिषेक्ष्यते ॥ १७ ॥
'पुरुषश्रेष्ठ श्रीराम लवकरच ही पृथ्वी, सीता आणि लक्ष्मी या तीन्हीसह राज्यावर अभिषिक्त होतील. ॥१७॥
दुःखजं विसृजत्यश्रु निष्क्रामन्तमुदीक्ष्य यम् ।
अयोध्यायां जनः सर्वः शोकवेगसमाहतः ॥ १८ ॥

कुशचीरधरं देवं गच्छन्तमपराजितम् ।
सीतेवानुगता लक्ष्मीस्तस्य किन्नाम दुर्लभम् ॥ १९ ॥
'ज्यांना नगरातून निघून जातांना पाहून अयोध्येतील सारा जनसमुदाय शोकाच्या वेगाने आहत नेत्रांतून दुःखाश्रू ढाळीत आहे, कुश आणि चीर धारण करून वनात जाणार्‍या ज्या अपराजित नित्यविजयी वीराच्या मागोमाग सीतेच्या रूपात साक्षात लक्ष्मीच गेलेली आहे, त्यांना काय बरे दुर्लभ आहे ? ॥१८-१९॥
धनुर्ग्रहवरो यस्य बाणखड्गास्त्रभृत् स्वयम् ।
लक्ष्मणो व्रजति ह्यग्रे तस्य किन्नाम दुर्लभम् ॥ २० ॥
'ज्यांच्या पुढे धनुर्धरिलोकात श्रेष्ठ लक्ष्मण स्वतः बाण आणि खड्‌ग आदि अस्त्रे घेऊन जात आहेत, त्यांच्यासाठी नगरात कोणती वस्तु दुर्लभ आहे ? ॥२०॥
निवृत्तवनवासं तं द्रष्टासि पुनरागतम् ।
जहि शोकं च मोहं च देवि सत्यं ब्रवीमि ते ॥ २१ ॥
'देवी ! मी तुम्हाला सत्य सांगत आहे. तुम्ही वनवासाचा अवधी पूर्ण झाल्यावर येथे परत आलेल्या श्रीरामांना पुन्हा पहाल; म्हणून तुम्ही शोक आणि मोह सोडून द्या.' ॥२१॥
शिरसा चरणावेतौ वन्दमानमनिन्दिते ।
पुनर्द्रक्ष्यसि कल्याणि पुत्रं चन्द्रमिवोदितम् ॥ २२ ॥
'कल्याणी ! अनिंदिते ! तू नवोदित चंद्रम्याप्रमाणे आपल्या पुत्राला पुन्हा आपल्या चरणी मस्तक ठेवून प्रणाम करतांना पहाशील. ॥२२॥
पुनः प्रविष्टं दृष्ट्‍वा तमभिषिक्तं महाश्रियम् ।
समुत्स्रक्ष्यसि नेत्राभ्यां क्षिप्रमानन्दजं जलं ॥ २३ ॥
'राजभवनात प्रविष्ट होऊन पुन्हा राजपदावर अभिषिक्त झालेल्या आपल्या पुत्राला फार मोठ्या राजलक्ष्मीने संपन्न पाहून तू शीघ्रच आपल्या नेत्रांतून आनंदाश्रु ढाळशील. ॥२३॥
मा शोको देवि दुःखं वा न रामे दृश्यतेऽशिवम् ।
क्षिप्रं द्रक्ष्यसि पुत्रं तं ससीतं सहलक्ष्मणम् ॥ २४ ॥
'देवी ! श्रीरामासाठी तुमच्या मनात शोक आणि दुःख असता कामा नये. कारण की त्यांच्या ठिकाणी कुठलीही अशुभ गोष्ट दिसून येत नाही. तू सीता आणि लक्ष्मणासह आपल्या पुत्राला श्रीरामाला शीघ्रच येथे उपस्थित पहाशील. ॥२४॥
त्वयाशेषो जनश्चायं समाश्वास्यो यतोऽनघे ।
किमिदानीमिदं देवि करोषि हृदि विक्लवम् ॥ २५ ॥
'हे अनघे ! तुम्ही तर या सर्व लोकांना धीर द्यावयास हवा; मग स्वतःच या समयी आपल्या हृदयात इतके दुःख का बरे करीत आहांत ? ॥२५॥
नार्हा त्वं शोचितुं देवि यस्यास्ते राघवः सुतः ।
न हि रामात् परो लोके विद्यते सत्पथे स्थितः ॥ २६ ॥
'देवी ! ज्या अर्थी तुम्हाला राघवा सारखा पुत्र प्राप्त झाला आहे तर तुम्ही जराही शोक करता कामा नये. श्रीरामापेक्षा या संसारात सन्मार्गात स्थिर राहाणारा वरचढ मनुष्य दुसरा कोणीही नाही. ॥२६॥
अभिवादयमानं तं दृष्ट्‍वा ससुहृदं सुतम् ।
मुदाश्रु मोक्ष्यसे क्षिप्रं मेघरेखेव वार्षिकी ॥ २७ ॥
'ज्याप्रमाणे वर्षाकालातील मेघांचा समुदाय जलाची वृष्टी करतो, त्याप्रमाणे तुम्ही सुहृदांसहित आपला पुत्र श्रीराम यास आपल्या चरणी प्रणाम करतांना लवकरच पाहून आनंदपूर्वक अश्रूंची वृष्टी कराल. ॥२७॥
पुत्रस्ते वरदः क्षिप्रमयोध्यां पुनरागतः ।
कराभ्यां मृदुपीनाभ्यां चरणौ पीडयिष्यति ॥ २८ ॥
'तुमचा वरदायक पुत्र पुन्हा शीघ्रच अयोध्येत येऊन आपल्या मोठ-मोठ्या कोमल हातांनी तुमचे दोन्ही पाय चेपील. ॥२८॥
अभिवाद्य नमस्यन्तं शूरं ससुहृदं सुतम् ।
मुदास्रैः प्रोक्ष्यसे पुत्रं मेघराजिरिवाचलम् ॥ २९ ॥
'ज्याप्रमाणे मेघमाला पर्वताला न्हाऊ घालते त्या प्रकारे तुम्ही अभिवादन करून नमस्कार करणार्‍या सुहृदांसहित आपल्या शूरवीर पुत्राचा आनंदाश्रूनी अभिषेक कराल.' ॥२९॥
आश्वासयन्ती विविधैश्च वाक्यै-
     र्वाक्योपचारे कुशलानवद्या ।
रामस्य तां मातरमेवमुक्त्वा
     देवी सुमित्रा विरराम रामा ॥ ३० ॥
संभाषण करण्यात कुशल, दोषरहित तथा रमणीय रूप असणारी देवी सुमित्रा या प्रकारच्या गोष्टी सांगून राममाता कौसल्येला आश्वासन देऊन गप्प झाली. ॥३०॥
निशम्य तल्लक्ष्मणमातृवाक्यं
     रामस्य मातुर्नरदेवपत्‍न्याः ।
सद्यः शरीरे विननाश शोकः
     शरद्‍गतो मेघ इवाल्पतोयः ॥ ३१ ॥
लक्ष्मणांच्या मातेचे हे वचन ऐकून दशरथ महाराजांची पत्‍नी तथा श्रीरामांची माता कौसल्या हिचा सारा शोक तिच्या शरीरांत (मनात)च तात्काळ विलीन होऊन गेला. शरदऋतूतील थोड्याशा पाण्याने युक्त असलेला ढग जसा लवकरच छिन्न-भिन्न होऊन जावा अगदी त्याच प्रमाणे. ॥३१॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे चतुश्चत्वारिंशः सर्गः ॥ ४४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा चौवेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP