यमरावणयोर्युद्धं, यमेन रावणवधार्थं उत्थापितस्य कालदण्डस्य ब्रह्मण आज्ञया निवर्तनं, विजयिनो रावणस्य यमलोकात् प्रस्थानं -
|
यमराज आणि रावणाचे युद्ध, यमाने रावणाच्या वधासाठी उचललेल्या कालदण्डास ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून परत घेणे, विजयी रावणाचे यमलोकांतून प्रस्थान -
|
स तस्य तु महानादं श्रुत्वा वैवस्वतः प्रभुः । शत्रुं विजयिनं मेने स्वबलस्य च संक्षयम् ॥ १ ॥
|
(अगस्त्य ऋषि म्हणतात - रघुनंदना !) रावणाचा तो महानाद ऐकून सूर्यपुत्र भगवान् यमांनी हे जाणले की शत्रु विजयी झाला आहे आणि माझी सेना मारली गेली आहे. ॥१॥
|
स हि योधान्हतान् मत्वा क्रोधसंरक्तलोचनः । अब्रवीत्त्वरितं सूतं रथो मे उपनीयताम् ॥ २ ॥
|
माझे योद्धे मारले गेले हे जाणून यमराजाचे नेत्र क्रोधाने लाल झाले आणि ते उतावीळ होऊन सारथ्याला म्हणाले -माझा रथ घेऊन ये. ॥२॥
|
तस्य सूतस्तदा दिव्यं उपस्थाप्य महारथम् । स्थितः स च महातेजा अध्यारोहत तं रथम् ॥ ३ ॥
|
तेव्हा त्याच्या सारथ्याने तात्काळ एक दिव्य आणि विशाल रथ तेथे उपस्थित केला आणि तो समोर विनीत भावाने उभा राहिला. नंतर ते महातेजस्वी यमदेव त्या रथावर आरूढ झाले. ॥३॥
|
प्राशमुद्गरहस्तश्च मृत्युस्तस्याग्रतः स्थितः । येन संक्षिप्यते सर्वं त्रैलोक्यमिदमव्ययम् ॥ ४ ॥
|
त्यांच्या पुढे प्रास आणि मुद्गर हातात घेऊन साक्षात् मृत्यु उभा होता. जो प्रवाहरूपाने सदा टिकून राहाणार्या या समस्त त्रिभुवनाचा संहार करत असतो. ॥४॥
|
कालदण्डस्तु पार्श्वस्थो मूर्तिमानस्य चाभवत् । यमप्रहरणं दिव्यं तेजसा ज्वलदग्निमत् ॥ ५ ॥
|
त्यांच्या पार्श्वभागी कालदण्ड मूर्तीमान् होऊन उभा होता, जे त्यांचे मुख्य आणि दिव्य आयुध आहे. तो आपल्या तेजाने अग्निसमान प्रज्वलित होत होता. ॥५॥
|
तस्य पार्श्वेषु निच्छिद्राः कालपाशाः प्रतिष्ठिताः । पावकस्पर्शसंकाशः स्थितो मूर्तश्च मुद्गरः ॥ ६ ॥
|
त्यांच्या दोन्ही बाजूला छिद्ररहित कालपाश उभे होते आणि ज्याचा स्पर्श अग्निसमान दुःसह आहे ते मुद्गरही मूर्तीमान् होऊन उपस्थित होते. ॥६॥
|
ततो लोकत्रयं क्षुब्धं अकम्पन्त दिवौकसः । कालं दृष्ट्वा तथा क्रुद्धं सर्वलोकभयावहम् ॥ ७ ॥
|
समस्त लोकांना भयभीत करणारा साक्षात् काळ कुपित झालेला पाहून तीन्ही लोकात खळबळ माजली. समस्त देवतांचा थरकाप उडाला. ॥७॥
|
ततः त्वचोदयत् सूतः तानश्वान् रुचिरप्रभान् । प्रययौ भीमसन्नादो यत्र रक्षःपतिः स्थितः ॥ ८ ॥
|
त्यानंतर सारथ्याने सुंदर कान्ति असलेल्या घोड्यांना हाकलले आणि तो रथ भयानक आवाज करीत जेथे राक्षसराज रावण उभा होता त्या स्थानी येऊन पोहोंचला. ॥८॥
|
मुहूर्तेन यमं ते तु हया हरिहयोपमाः । प्रापयन् मनसस्तुल्या यत्र तत् प्रस्तुतं रणम् ॥ ९ ॥
|
इंद्राच्या घोड्यांसमान तेजस्वी आणि मनासमान शीघ्रगामी त्या घोड्यांनी यमराजांना क्षणभरात जेथे युद्ध चालू होते त्या स्थानी आणून पोहोचविले. ॥९॥
|
दृष्ट्वा तथैव विकृतं रथं मृत्युसमन्वितम् । सचिवा राक्षसेन्द्रस्य सहसा विप्रदुद्रुवुः ॥ १० ॥
|
मृत्युदेवतेसह तो विशाल रथ आलेला पाहून राक्षसराजाचे सचिव एकाएकी पळून गेले. ॥१०॥
|
लघुसत्त्वतया ते हि नष्टसंज्ञा भयार्दिताः । नेह योद्धुं समर्थाः स्म इत्युक्त्वा प्रययुर्दिशः ॥ ११ ॥
|
त्यांची शक्ति थोडी होती, म्हणून ते भयाने पीडित होऊन आपले देहभान विसरले आणि आम्ही येथे युद्ध करण्यास समर्थ नाही, असे म्हणून विभिन्न दिशांमध्ये पळून गेले. ॥११॥
|
स तु तं तादृशं दृष्ट्वा रथं लोकभयावहम् । नाक्षुभ्यत दशग्रीवो न चापि भयमाविशत् ॥ १२ ॥
|
परंतु समस्त संसाराला भयभीत करणार्या त्या विकराळ रथाला पाहूनही दशग्रीवाच्या मनांत क्षोभही झाला नाही आणि भयही वाटले नाही. ॥१२॥
|
स तु रावणमासाद्य व्यसृजत् शक्तितोमरान् । यमो मर्माणि सङ्क्रुद्धो रावणस्य न्यकृन्तत ॥ १३ ॥
|
अत्यंत क्रोधाने भरलेल्या यमराजांनी रावणाच्या जवळ पोहोंचून शक्ति आणि तोमरांचा प्रहार केला आणि रावणाच्या मर्मस्थानांना छेदून टाकले. ॥१३॥
|
रावणस्तु ततः स्वस्थः शरवर्षं मुमोच ह । तस्मिन् वैवस्वतरथे तोयवर्षमिवाम्बुदः ॥ १४ ॥
|
तेव्हा रावणानेही स्वतःस सावरून यमराजांच्या रथावर बाणांची झड लावली जणुं मेघच जलाची वृष्टि करत असावा. ॥१४॥
|
ततो महाशक्तिशतैः पात्यमानैर्महोरसि । नाशक्नोत् प्रतिकर्तुं स राक्षसः शल्यपीडितः ॥ १५ ॥
|
त्यानंतर त्याच्या विशाल छातीवर शेकडो महाशक्तिंचा मार पडू लागला. तो राक्षस-शल्यांच्या प्रहाराने इतका पीडित झाला की यमराजांचा बदला घेण्यास समर्थ होऊ शकला नाही. ॥१५॥
|
एवं नानाप्रहरणैः यमेनामित्रकर्षिणा । सप्तरात्रं कृतः संख्ये विसंज्ञो विमुखो रिपुः ॥ १६ ॥
|
याप्रकारे शत्रुसूदन यमांनी नाना प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांचा प्रहार करत रणभूमिमध्ये निरंतर सात रात्रीपर्यंत युद्ध केले. यामुळे त्यांचा शत्रु रावण आपली शुद्धि हरवून युद्धापासून विमुख झाला. ॥१६॥
|
तदासीत् तुमुलं युद्धं यमराक्षसयोर्द्वयोः । जयमाकाङ्क्षतोर्वीर समरेष्वनिवर्तिनोः ॥ १७ ॥
|
वीर रघुनंदना ! ते दोन्ही योद्धे समरभूमीमध्ये मागे हटणारे नव्हते आणि दोघेही आपल्या विजयाची इच्छा करत होते, म्हणून त्या यमराज आणि राक्षस या दोघांमध्ये त्यासमयी घनघोर युद्ध होऊ लागले. ॥१७॥
|
ततो देवाः सगन्धर्वाः सिद्धाश्च परमर्षयः । प्रजापतिं पुरस्कृत्य समेतास्तद् रणाजिरम् ॥ १८ ॥
|
तेव्हा देवता, गंधर्व, सिद्ध आणि महर्षिगण प्रजापतिला पुढे करून त्या समरांगणात एकत्रित झाले. ॥१८॥
|
संवर्त इव लोकानां युध्यतोरभवत् तदा । राक्षसानां च मुख्यस्य प्रेतानामीश्वरस्य च ॥ १९ ॥
|
त्या समयी राक्षसांचा राजा रावण तसेच प्रेतराज यम (दोघेही) युद्ध परायण झाल्यावर समस्त लोकांचा प्रलय होण्याचा समय उपस्थित झाला की काय असे वाटू लागले. ॥१९॥
|
राक्षसेन्द्रोऽपि विस्फार्य चापमिन्द्राशनिप्रभम् । निरन्तरमिवाकाशं कुर्वन् बाणांस्ततोऽसृजत् ॥ २० ॥
|
राक्षसराज रावणही इंद्राच्या अशनि सदृश्य असणार्या आपल्या धनुष्यास खेचून बाणांची वृष्टि करू लागला, यामुळे आकाश ठसाठस भरून गेले, त्यात तिळभरही मोकळी जागा राहिली नाही. ॥२०॥
|
मृत्युं चतुर्भिर्विशिखैः सूतं सप्तभिरार्दयत् । यमं शतसहस्रेण शीघ्रं मर्मस्वताडयत् ॥ २१ ॥
|
त्याने चार बाण मारून मृत्युला आणि सात बाणांनी यमाच्या सारथ्यालाही पीडित करून टाकले. नंतर भराभर लाख बाण मारून यमराजांच्या मर्मस्थानांना गंभीर इजा पोहोचवली. ॥२१॥
|
ततः क्रुद्धस्य वदनाद् यमस्य समजायत । ज्वालामाली सनिःश्वासः सधूमः कोपपावकः ॥ २२ ॥
|
तेव्हा यमराजांच्या क्रोधाला सीमा राहिली नाही. त्यांच्या मुखांतून तो रोष अग्नि बनून प्रकट झाला. ती आग ज्वाळा -माळांनी मण्डित श्वासवायुने संयुक्त तेथे धूमांनी आच्छन्न दिसून येत होती. ॥२२॥
|
तदाश्चर्यमथो दृष्ट्वा देवदानवसन्निधौ । प्रहर्षितौ सुसंरब्धौ मृत्युकालौ बभूवतुः ॥ २३ ॥
|
देवता आणि दानवांच्या समीप ही आश्चर्यजनक घटना पाहून रोषावेशाने भरलेल्या मृत्यु एवं काळाला फार हर्ष झाला. ॥२३॥
|
ततो मृत्युः क्रुद्धतरो वैवस्वतमभाषत । मुञ्च मां समरे यावद् हन्मीमं पापराक्षसम् ॥ २४ ॥
|
त्यानंतर मृत्युदेवांनी अत्यंत कुपित होऊन वैवस्वत यमास म्हटले -आपण मला सोडावे - आज्ञा द्यावी, मी समरांगणात या पापी राक्षसाला आत्ता मारून टाकतो. ॥२४॥
|
नैषा रक्षो भवेदद्य मर्यादा हि निसर्गतः । हिरण्यकशिपुः श्रीमान् नमुचिः शम्बरस्तथा ॥ २५ ॥
निसन्धिर्धूमकेतुश्च बलिर्वैरोचनोऽपि च । दम्भुर्दैत्यो महाराजो वृत्रो बाणस्तथैव च ॥ २६ ॥ राजर्षयः शास्त्रविदो गन्धर्वाः समहोरगाः । ऋषयः पन्नगा दैत्या यक्षाश्च ह्यप्सरोगणाः ॥ २७ ॥
युगान्तपरिवर्ते च पृथिवी समहार्णवा । क्षयं नीता महाराज सपर्वतसरिद्द्रुमा ॥ २८ ॥
एते चान्ये च बहवो बलवन्तो दुरासदाः । विनिपन्ना मया दृष्टाः किमुतायं निशाचरः ॥ २९ ॥
|
महाराज ! ही माझी स्वभावसिद्ध मर्यादा आहे की माझ्याशी भिडल्यावर हा राक्षस जिवंत राहू शकत नाही. श्रीमान् हिरण्यकशिपु, नमुचि, शंबर, निसंदि, धूमकेतु, विरोचनकुमार बलि, शंभुनामक दैत्य, महाराज वृत्र तसेच बाणासुर, कित्येक शास्त्रवेत्ते राजर्षि, गंधर्व, मोठ मोठे नाग, ऋषि, सर्प, दैत्य, यक्ष, अप्सरांचे समुदाय, युगान्तकाळात समुद्र, पर्वत, सरिता आणि वृक्षांसहित पृथ्वी - ही सर्व माझ्या द्वारा क्षयाला प्राप्त होत आहेत, हे तसेच दुसरे बरेचसे बलवान् एवं दुर्जय वीरही माझ्या द्वारा विनाशाला प्राप्त होऊन चुकले आहेत, मग या निशाचराची काय कथा ? ॥२५-२९॥
|
मुञ्चं मां साधु धर्मज्ञ यावदेनं निहन्म्यहम् । नहि कश्चिन्मया दृष्टो बलवानपि जीवति ॥ ३० ॥
|
धर्मज्ञ ! आपण मला सोडा. मी याला अवश्य मारून टाकीन. ज्याला मी पहातो तो बलवान् असला तरीही जिवंत राहू शकत नाही. ॥३०॥
|
बलं मम न खल्वेतन् मर्यादैषा निसर्गतः । स दृष्टो न मया काल मुहुर्तमपि जीवति ॥ ३१ ॥
|
काळा ! माझी दृष्टि पडल्यावर हा रावण मुहूर्तभरही जीवन धारण करू शकणार नाही. माझ्या या कथनाचे तात्पर्य केवळ आप्ल्या बळाला प्रकाशित करणे एवढेच मात्र नाही अपितु ही स्वभावसिद्ध मर्यादा आहे. ॥३१॥
|
तस्यैवं वचनं श्रुत्वा धर्मराजः प्रतापवान् । अब्रवीत् तत्र तं मुत्युं त्वं तिष्ठैनं निहन्म्यहम् ॥ ३२ ॥
|
मृत्युचे वचन ऐकून प्रतापी धर्मराजाने त्याला म्हटले - तू थांब. मीच याला मारून टाकतो. ॥३२॥
|
ततः संरक्तनयनः क्रुद्धो वैवस्वतः प्रभुः । कालदण्डममोघं तु तोलयामास पाणिना ॥ ३३ ॥
|
त्यानंतर क्रोधाने लाल डोळे करून सामर्थ्यशाली वैवस्वत यमाने आपला अमोघ कालदण्ड हाताने उचलला. ॥३३॥
|
यस्य पार्श्वेषु निखिला कालपाशाः प्रतिष्ठिताः । पावकाशनिसंकाशो मुद्गरो मूर्तिमान् स्थितः ॥ ३४ ॥
|
त्या कालदण्डाच्या पार्श्वभागी कालपाश प्रतिष्ठित होते आणि वज्र तसेच अग्नितुल्य तेजस्वी मुद्गरही मूर्तिमान होऊन स्थित होते. ॥३४॥
|
दर्शनादेव यः प्राणान् प्राणिनामपि कर्षति । किं पुनः स्पृश्यमानस्य पात्यमानस्य वा पुनः ॥ ३५ ॥
|
तो कालदण्ड वृष्टिमध्ये येताच प्राण्यांच्या प्राणांचे अपहरण करून घेत होता. मग ज्याला त्याचा स्पर्श होईल अथवा ज्याच्यावर त्याचा मार पडेल, त्या पुरुषाच्या प्राणांचा संहार करणेही त्याच्यासाठी काय मोठीशी गोष्ट होती ? ॥३५॥
|
स ज्वालापरिवारस्तु निर्दहन्निव राक्षसम् । तेन स्पृष्टो बलवता महाप्रहरणोऽस्फुरत् ॥ ३६ ॥
|
ज्वालांनी घेरलेला तो कालदण्ड त्या राक्षसाला दग्धसा करून टाकण्यासाठी उद्यत होता. बलवान् यमराजाच्या हातात घेतले गेलेले ते महान आयुध आपल्या तेजाने प्रकाशित होऊन राहिले होते. ॥३६॥
|
ततो विदुद्रुवुः सर्वे तस्मात् त्रस्ता रणाजिरे । सुराश्च क्षुभिताः सर्वे दृष्ट्वा दण्डोद्यतं यमम् ॥ ३७ ॥
|
तो कालदण्ड उचलला जातांच समरांगणात उभे असलेले समस्त सैनिक भयभीत होऊन पळू लागले. कालदण्ड उचलेल्या यमराजाला पाहून समस्त देवताही क्षुब्ध झाल्या. ॥३७॥
|
तस्मिन् प्रहर्तुकामे तु यमे दण्डेन रावणम् । यमं पितामहः साक्षाद् दर्शयित्वेदमब्रवीत् ॥ ३८ ॥
|
यमराज त्या दण्डाने रावणावर प्रहार करू इच्छित होते की इतक्यात साक्षात् पितामह ब्रह्मदेव तेथे येऊन पोहोंचले. त्यांनी दर्शन देऊन याप्रकारे सांगितले - ॥३८॥
|
वैवस्वत महाबाहो न खल्वमितविक्रम । न हन्तव्यस्त्वयैतेन दण्डेनैव निशाचरः ॥ ३९ ॥
|
अमित पराक्रमी महाबाहु वैवस्वता ! तू या कालदण्डाच्या द्वारा निशाचर रावणाचा वध करू नको. ॥३९॥
|
वरः खलु मयैतस्मै दत्तस्त्रिदशपुङ्गव । स त्वया नानृतः कार्यो यन्मया व्याहृतं वचः ॥ ४० ॥
|
देवप्रवर ! मी त्याला देवतांच्या द्वारा न मारला जाऊ शकण्याचा वर दिला आहे. माझ्या मुखातून जे वचन बाहेर पडले आहे, ते तू असत्य करता कामा नये. ॥४०॥
|
यो हि मामनृतं कुर्याद् देवो वा मानुषोऽपि वा । त्रैलोक्यमनृतं तेन कृतं स्यान्नात्र संशयः ॥ ४१ ॥
|
जी देवता वा मनुष्य मला असत्यवादी बनवेल त्याला समस्त त्रैलोक्याला मिथ्याभाषी बनविल्याचा दोष लागेल, यात संशय नाही. ॥४१॥
|
क्रुद्धेन विप्रमुक्तोऽयं निर्विशेषं प्रियाप्रिये । प्रजाः संहरते रौद्रो लोकत्रयभयावहः ॥ ४२ ॥
|
हा कालदण्ड तीन्ही लोकांसाठी भयंकर तसेच रौद्र आहे. तुझ्याकडून क्रोधपूर्वक सोडला गेल्यावर हा प्रिय अप्रिय जनांत भेदभाव न ठेवता समोर असलेल्या सर्व प्रजेचा संहार करून टाकील. ॥४२॥
|
अमोघो ह्येष सर्वेषां प्राणिनाममितप्रभः । कालदण्डो मया सृष्टः पूर्वं मृत्युपुरस्कृतः ॥ ४३ ॥
|
या अमित तेजस्वी कालदण्डाला पूर्वकाळी मीच बनवले आहे. हा कुठल्याही प्राण्यावर व्यर्थ होत नाही. याच्या प्रहाराने सर्वांना मृत्यु येतो. ॥४३॥
|
तन्न खल्वेष ते सौम्य पात्यो रावणमूर्धनि । नह्यस्मिन् पतिते कश्चिन् मुहूर्तमपि जीवति ॥ ४४ ॥
|
म्हणून सौम्या ! तू याला रावणाच्या मस्तकावर पडू देऊ नको. याचा मार लागताच कोणीही एक मुहूर्तही जिवंत राहू शकत नाही. ॥४४॥
|
यदि ह्यन्मिन् निपतिते न म्रियेतैष राक्षसः । म्रियते वा दशग्रीवः तदाप्युभयतोऽनृतम् ॥ ४५ ॥
|
कालदण्ड पडूनही जर हा राक्षस रावण मेला नाही अथवा मरून गेला तरी - दोन्ही स्थितिमध्ये माझे वचन असत्य होईल. ॥४५॥
|
तन्निवर्तय लङ्केशाद् दण्डमेतं समुद्यतम् । सत्यं च मां कुरुष्वाद्य लोकांस्त्वं यद्यवेक्षसे ॥ ४६ ॥
|
म्हणून हातात उचलेल्या या कालदण्डास तू लंकापति रावणापासून दूर कर. जर समस्त लोकांवर तुझी दृष्टि असेल तर आज रावणाचे रक्षण करून मला सत्यवादी बनव. ॥४६॥
|
एवमुक्तस्तु धर्मात्मा प्रत्युवाच यमस्तदा । एष व्यावर्तितो दण्डः प्रभविष्णुर्हि नो भवान् ॥ ४७ ॥
|
ब्रह्मदेवांनी असे म्हटल्यावर धर्मात्मा यमराजांनी उत्तर दिले - जर अशी गोष्ट असेल तर हे घ्या मी या दण्डाला मागे घेतो. आपण आम्हां सर्व लोकांचे प्रभु आहात. (म्हणून आपल्या आज्ञेचे पालन करणे आमचे कर्तव्य आहे.) ॥४७॥
|
किं त्विदानीं मया शक्यं कर्तुं रणगतेन हि । न मया यद्ययं शक्यो हन्तुं वरपुरस्कृतः ॥ ४८ ॥
|
परंतु वरदानाने युक्त होण्यामुळे जर माझ्या द्वारा या निशाचराचा वध होऊ शकत नसेल तर या समयी याच्याशी युद्ध करून मी काय करूं ? ॥४८॥
|
एष तस्मात् प्रणश्यामि दर्शनादस्य रक्षसः । इत्युक्त्वा सरथः साश्वः तत्रैवान्तरधीयत ॥ ४९ ॥
|
म्हणून आता मी याच्या दृष्टिपासून अदृश्य होत आहे. असे म्हणून यमराज रथ आणि घोड्यांसहित तेथेच अंतर्धान झाले. ॥४९॥
|
दशग्रीवस्तु तं जित्वा नाम विश्राव्य चात्मनः । आरुह्य पुष्पकं भूयो निष्क्रान्तो यमसादनात् ॥ ५० ॥
|
याप्रकारे यमराजाला जिंकून आपल्या नावाची घोषणा करून दशग्रीव रावण पुष्पक विमानावर आरूढ होऊन यमलोकांतून निघून गेला. ॥५०॥
|
स तु वैवस्वतो देवैः सह ब्रह्मपुरोगमैः । जगाम त्रिदिवं हृष्टो नारदश्च महामुनिः ॥ ५१ ॥
|
त्यानंतर सूर्यपुत्र यमराज तसेच महामुनि नारद ब्रह्मदेव आदि देवतांबरोबर प्रसन्नतापूर्वक स्वर्गात गेले. ॥५१॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे द्वाविंशः सर्गः ॥ २२ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा बाविसावा सर्ग पूरा झाला . ॥२२॥
|