श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ पञ्चचत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
बन्धूनां समक्षे सर्वत्र प्रसृतस्य लोकापवादस्य वर्णनं कृत्वा श्रीरामेण सीतां वने विसर्जयितुं लक्ष्मणं प्रत्यादेशः -
श्रीरामांनी भावांच्या समक्ष सर्वत्र पसरलेल्या लोकापवादाची चर्चा करून सीतेला वनांत सोडून येण्यासाठी लक्ष्मणास आदेश देणे -
तेषां समुपविष्टानां सर्वेषां दीनचेतसाम् ।
उवाच वाक्यं काकुत्स्थो मुखेन परिशुष्यता ॥ १ ॥
याप्रकारे सर्व भाऊ दुःखी अंतःकरणांनी तेथे बसलेले होते. त्या समयी काकुत्स्थ रामांनी कोरड पडलेल्या मुखाने त्यांच्यासमोर ही गोष्ट सांगितली - ॥१॥
सर्वे शृणुत भद्रं वो मा कुरुध्वं मनोऽन्यथा ।
पौराणां मम सीतायां यादृशी वर्तते कथा ॥ २ ॥
बंधुंनो ! तुमचे कल्याण असो. तुम्ही सर्वजण माझे म्हणणे ऐका. मनाला इकडे तिकडे भरकटू देऊ नका. पुरवासी लोकामध्ये माझ्या आणि सीतेच्या विषयी जी चर्चा चालत आहे तिच्याविषयी सांगतो आहे. ॥२॥
पौरापवादः सुमहान् तथा जनपदस्य च ।
वर्तते मयि बीभत्सा सा मे मर्माणि कृन्तति ॥ ३ ॥
यासमयी पुरवासी आणि जनपदांतील लोकामध्ये सीतेच्या संबंधी महान्‌ अपवाद पसरलेला आहे. माझ्या प्रतिही त्यांचा फार घृणास्पद भाव आहे. त्या सर्वांची ती घृणा माझ्या मर्मस्थळाला विदीर्ण करून टाकत आहे. ॥३॥
अहं किल कुले जात इक्ष्वाकूणां महात्मनाम् ।
सीताऽपि सत्कुले जाता जनकानां महात्मनाम् ॥ ४ ॥
मी इक्ष्वाकुवंशी महात्मा नरेशांच्या कुळात उत्पन्न झालो आहे. सीतेनेही महात्मा जनकांच्या उत्तम कुळात जन्म घेतलेला आहे. ॥४॥
जानासि त्वं यथा सौम्य दण्डके विजने वने ।
रावणेन हृता सीता स च विध्वंसितो मया ॥ ५ ॥
सौम्य लक्ष्मणा ! तू तर जाणतोसच की कशा प्रकारे रावणाने निर्जन दण्डकारण्यातून तिला हरण करून नेले होते आणि मी कशा प्रकारे त्याचा विध्वंस केला. ॥५॥
तत्र मे बुद्धिरुत्पन्ना जनकस्य सुतां प्रति ।
अत्रोषितामिमां सीतां आनयेयं कथं पुरीम् ॥ ६ ॥
त्यानंतर लंकेतच जानकीच्या विषयी माझ्या अंतःकरणात हा विचार उत्पन्न झाला होता की ही इतक्या दिवसपर्यंत येथे राहिल्यावरही मी हिला राजधानीमध्ये कसा घेऊन जाऊ शकेन ? ॥६॥
प्रत्ययार्थं ततः सीता विवेश ज्वलनं तदा ।
प्रत्यक्षं तव सौमित्रे देवानां हव्यवाहनः ॥ ७ ॥

अपापां मैथिलीमाह वायुश्चाकाशगोचरः ।
चन्द्रादित्यौ च शंसेते सुराणां सन्निधौ पुरा ॥ ८ ॥

ऋषीणां चैव सर्वेषां अपापां जनकात्मजाम् ।
सुमित्राकुमार ! त्यासमयी आपल्या पावित्र्याचा विश्वास उत्पन्न व्हावा म्हणून सीतेने तुमच्या समोरच अग्निमध्ये प्रवेश केला होता आणि देवतांच्या समक्ष स्वयं अग्निदेवांनी तिला निर्दोष म्हटले होते. आकाशचारी वायु, चंद्रमा आणि सूर्यानेही पहिल्याने देवता आणि समस्त ऋषिंच्या समीप जनकनंदिनीला निष्पाप घोषित केले होते. ॥७-८ १/२॥
एवं शुद्धसमाचारा देवगन्धर्वसन्निधौ ॥ ९ ॥

लङ्‌काद्वीपे महेन्द्रेण मम हस्ते निवेशिता ।
याप्रकारे विशुद्ध आचार असणार्‍या सीतेला देवता आणि गंधर्वांचा समीप साक्षात्‌ देवराज इन्द्राने लंकाद्वीपामध्ये माझ्या हाती सोपविले होते. ॥९ १/२॥
अन्तरात्मा च मे वेत्ति सीतां शुद्धां यशस्विनीम् ॥ १० ॥

ततो गृहीत्वा वैदेहीं अयोध्यां अहमागतः ।
माझा अंतरात्माही यशस्विनी सीतेला शुद्ध समजत आहे. म्हणून मी या वैदेहीला बरोबर घेऊन अयोध्येस आलो होतो. ॥१० १/२॥
अयं तु मे महान् वादः शोकश्च हृदि वर्तते ॥ ११ ॥

पौरापवादः सुमहान् तथा जनपदस्य च ।
परंतु आता हा महान्‌ अपवाद पसरू लागला आहे. पुरवासी आणि जनपदांतील लोकात माझी फार निन्दा होत आहे. त्यामुळे माझ्या हृदयात फार शोक होत आहे. ॥११ १/२॥
अकीर्तिर्यस्य गीयेत लोके भूतस्य कस्यचित् ॥ १२ ॥

पतत्येवाधमाँल्लोकान् यावच्छब्दः प्रकीर्त्यते ।
ज्या कुणाही प्राण्याची अपकीर्ति लोकात सर्वांच्या चर्चेचा विषय बनून जाते तो अधम लोकांमध्ये पतन पावतो आणि जोपर्यंत त्या अपयशाची चर्चा होत असते तो पर्यंत तेथेच पडून राहातो. ॥१२ १/२॥
अकीर्तिर्निन्द्यते देवैः कीर्तिर्लोकेषु पूज्यते ॥ १३ ॥

कीर्त्यर्थं तु समारम्भः सर्वेषां सुमहात्मनाम् ।
देवगण लोकांमध्ये अपकीर्तिची निन्दा आणि कीर्तिची प्रशंसा करतात. समस्त श्रेष्ठ महात्म्यांचे सर्व शुभ आयोजन उत्तमकीर्तिच्या स्थापनेसाठीच होत असते. ॥१३ १/२॥
अप्यहं जीवितं जह्यां युष्मान्वा पुरुषर्षभाः ॥ १४ ॥

अपवादभयाद् भीतः किं पुनर्जनकात्मजाम् ।
नरश्रेष्ठ बंधुंनो ! मी लोकनिन्देच्य भयाने आपल्या प्राणांचा आणि तुम्हा सर्वांचा त्याग करू शकतो ! मग सीतेचा त्याग करण्यात काय मोठीशी गोष्ट आहे ? ॥१४ १/२॥
तस्माद् भवन्तः पश्यन्तु पतितं शोकसागरे ॥ १५ ॥

नहि पश्याम्यहं भूतं किञ्चिद्दुःखमतोऽधिकम् ।
म्हणून तुम्ही माझ्याकडे पहा. मी शोक समुद्रात पडून राहिलो आहे. याहून वरचढ दुःख मला कधी सहन करावे लागले आहे याचे तर मला स्मरण नाही. ॥१५ १/२॥
श्वस्त्वं प्रभाते सौमित्रे सुमन्त्राधिष्ठितं रथम् ॥ १६ ॥

आरुह्य सीतामारोप्य विषयान्ते समुत्सृज ।
म्हणून सौमित्रा ! उद्या सकाळी तू सारथि सुमंत्रद्वारा संचलित रथावर आरूढ होऊन सीतेला त्या रथावर चढवून या राज्याच्या सीमेच्या बाहेर सोडून दे. ॥१६ १/२॥
गङ्‌गायास्तु परे पारे वाल्मीकेस्तु महात्मनः ॥ १७ ॥

आश्रमो दिव्यसङ्‌काशः तमसातीरमाश्रितः ।
गंगेच्या पलिकडे तमसा तटावर महात्मा वाल्मीकिमुनिंचा दिव्य आश्रम आहे. ॥१७ १/२॥
तत्रैनां विजने देशे विसृज्य रघुनन्दन ॥ १८ ॥

शीघ्रमागच्छ सौमित्रे कुरुष्व वचनं मम ।
न चास्मि प्रतिवक्तव्यः सीतां प्रति कथञ्चन ॥ १९ ॥
रघुनंदना ! त्या आश्रमाच्या जवळ निर्जन वनात तू सीतेला सोडून शीघ्र परत ये. सौमित्र ! माझ्या या आज्ञेचे पालन कर. सीतेच्या विषयी माझ्याशी कुठल्याही प्रकारे दुसरी गोष्ट तू बोलता कामा नये. ॥१८-१९॥
तस्मात् त्व गच्छ सौमित्रे नात्र कार्या विचारणा ।
अप्रीतिर्हि परा मह्यं त्वयेतत्प्रतिवारिते ॥ २० ॥
म्हणून लक्ष्मणा ! आता तू जा. या विषयी काहीही विचार करू नको. जर माझ्या या निश्चयात तू कुठल्याही प्रकारे अडचण आणलीस तर मला महान्‌ कष्ट होतील. ॥२०॥
शापिता हि मया यूयं भुजाभ्यां जीवितेन च ।
ये मां वाक्यान्तरे ब्रूयुः अनुनेतुं कथञ्चन ॥ २१ ॥

अहिता नाम ते नित्यं मदभीष्टविघातनात् ।
मी तुला आपल्या चरणांची आणि जीवनाची शपथ घालीत आहे. माझ्या निर्णयाच्या विरूद्ध काहीही बोलू नको. जो माझ्या या कथनाच्या मध्येच उडी मारून कुठल्याही प्रकारे अनुनय-विनय करण्यासाठी काही बोलेल, तो माझ्या अभीष्ट कार्यांत बाधा आणण्यामुळे सदासाठी माझा शत्रु होईल. ॥२१ १/२॥
मानयन्तु भवन्तो मां यदि मच्छासने स्थिताः ॥ २२ ॥

इतोऽद्य नीयतां सीता कुरुष्व वचनं मम ।
जर तुम्ही माझा सन्मान करत असाल आणि माझ्या आज्ञेत राहू इच्छित असाल तर आता सीतेला येथून वनात घेऊन जा. माझ्या या आज्ञेचे पालन करा. ॥२२ १/२॥
पूर्वमुक्तोऽहमनया गङ्‌गातीरेऽहमाश्रमान् ॥ २३ ॥

पश्येयमिति तस्याश्च कामः संवर्त्यतामयम् ।
सीतेने प्रथम मला सांगितले होते की मी गंगेच्या तटावरील ऋषिंचे आश्रम पाहू इच्छिते, म्हणून तिची ही इच्छाही पूर्ण केली जावी. ॥२३ १/२॥
एवमुक्त्वा तु काकुत्स्थो बाष्पेण पिहितेक्षणः ॥ २४ ॥

संविवेश स धर्मात्मा भ्रातृभिः परिवारितः ।
शोकसंलग्नहृदयो निशश्वास यथा द्विपः ॥ २५ ॥
याप्रकारे सांगता सांगता काकुत्स्थ रामांचे दोन्ही नेत्र अश्रुंनी भरून आले. नंतर ते धर्मात्मा श्रीराम आपल्या भावांसह महालात निघून गेले. त्या समयी त्यांचे हृदय शोकाने व्याकुळ होते आणि ते हत्तीप्रमाणे दीर्घ श्वास घेत होते. ॥२४-२५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे पञ्चचत्वारिंशः सर्गः ॥ ४५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा पंचेचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP