॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय चौसष्टावा ॥
ऐल राजाची कथा

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


ऐसी शक्रारिहत्यांची कथा । अति आश्चर्य अपूर्वता ।
ऐकोनियां समस्तां । झाला बोलता श्रीराम ॥१॥
होवोनि आनंदभरित । बोलावयाचा उपक्रम करित ।
पूर्वी कर्दम प्रजापतीचा सुत । ऐलनामें प्रसिद्ध ॥२॥
तेणें भुजबळेंकरुन । पृथ्वीचें नृप जिंतोन ।
स्वधर्मे राज्य करी जाण । प्रजापाळण पुत्रापरी ॥३॥
आंगवण सुरेशाहुनि आगळी । उदारते न तुळती कर्ण बळी ।
दैत्य दानवें भेणें पाताळीं । लंघोनि गेली तळातळा ॥४॥
नाना गंधर्व असुर । भेणें पूजिती नृपेश्वर ।
रायाचा पराक्रम देखोनि थोर । चरणा शरण अरी येती ॥५॥
तो कोणे एकेकाळीं पारधीलागून । ससैन अटवी प्रवेशोन ।
मृगां मारोनि लक्षावधि जाण । आणी श्वापदें नेणों किती ॥६॥
जिकडे जाय सेनासैन्य । तिकडे होय रणकंदन ।
पारधी खेळतां उमारमण । त्या स्थळाप्रति आले ॥७॥
तया वनाचे प्रदेशीं । कर्पूरगौर पार्वतीसीं ।
विचरतां देखोनि राजसैन्यासी । शाप महेशें दिधला ॥८॥
या वनाचे ठायीं जाण । पार्वतीमहेशावेगळेंकरुन ।
वनीं विचरती प्राणी भूतगण । पुरुष स्त्रीदेहीं पैं होती ॥९॥
ऐसा शाप त्या वनासी । होतां कर्दमपुत्र सैन्येंसीं ।
स्त्रीरुप झाला पालट अवयवांसी । निश्चयेंसीं देखते झाले ॥१०॥
स्त्रीरुप सकळ सैन्य । देखोनि राजा दुःखित जाण ।
जेथें पार्वतीसहित त्रिनयन । तेथें कर्दमपुत्र स्वयें आला ॥११॥
करोनि कामांतकाची स्तुती । अति नम्र विनीतवृत्तीं ।
प्रसन्न झाला उमापती । बोलतसे ते समयीं ॥१२॥
अगा ये कर्दमसुता तुजलागोन । मी प्रसन्न झालों माग वरदान ।
तंव येरें पार्वतीचें स्तवन । साष्टांग नमनी पैं केलें ॥१३॥
दोघे झालिया प्रसन्नभूत । राजा झाला बोलत ।
तुमचें हे वन होय सत्य । मज पुरुषत्व प्राप्त होवो ॥१४॥

ऐलाला एक महिना स्त्रीत्व व एक महिना पुरुषत्वाच्या प्राप्तीचा वर :

एक मासी स्त्री एक मास पुरुष जाण । ऐसा वर द्यावा कृपा करुन ।
मग महेशे म्हणे धन्य धन्य । उत्तम वरदान मागितलें ॥१५॥
अर्ध वरद महेशाचें । अर्ध वरदान पार्वतीचें ।
हें तुज दिधलें सत्य साचें । अनुमानातें धरुं नको ॥१६॥
ऐसें देवोनि वरदान । पुन्हा बोले उमा वचन ।
मागील नव्हे आठवण । सत्य जाण राजेंद्रा ॥१७॥
कर्दमपुत्रा मासपर्यंत । पुरुषत्व झालें प्राप्त ।
दुसरे मासीं योषिता अद्भूत । लावण्यें महा साजिरी ॥१८॥
श्रीराम म्हणे लक्ष्मणभरतांसी । कर्दमपुत्राची कथा ऐसी ।
वनीं विचरतां शाप त्यासी । महेशाचा पैं झाला ॥१९॥
ऐसें हे दिव्य आख्यान । ऐकोनि बुद्धि विस्मय पावोन ।
श्रीरामाप्रति कर जोडून । विनंती करिते झाले दोघे ॥२०॥
पुढें कर्दमसुताचें वर्तमान । श्रीरामा अधिक विस्तारोन ।
सांगावें जी कृपा करुन । पुढतीं नमन करिते झाले ॥२१॥
ऐलराजा स्त्रीदेह पावोन । वर्तन कैसा वनोवन ।
ऐसें हें उत्तम कथन । सविस्तर श्रीरामा सांगावें ॥२२॥
ऐकोनि भरतलक्ष्मणांचा प्रश्न । सांगता झाला ऐलाख्यान ।
श्रोते होवोनि सावधान । रम्य रामायण अवधारा ॥२३॥
ऐलराजा प्रथममासीं । पावोनियां स्त्रीदेहासी ।
सवें सेना स्त्रीरुपेंसीं । विचरतसे वनोवन ॥२४॥
तया अरण्याभीतरीं । राजा होवोनि सुंदर ।
तिच्या लावण्याची परी । श्रोतीं सावध ऐकावी ॥२५॥
मुखकमळ अति सुंदर । कमळदळासारिखे नेत्र ।
कुच अवयव देखोनि ऋषीश्वर । मदनें मुरकुंड्या पडिल्या पैं ॥२६॥
सेना स्त्रीरुपेंसीं समस्त । हस्तीवरी आरुढोनि तेथ ।
ऐल विचरतां विपिनाआंत । तंव सोमसुत बुध तेथें असे ॥२७॥
चंद्रसुत बुध अनुष्ठान । तये वनीं करी जाण ।
तयाचे आश्रमासमीप येतां पूर्ण । एक सरोवर देखिलें ॥२८॥
सेनेसहित सरोवरीं । ऐल प्रवेशला उदकाभीतरीं ।
क्रीडा करोनि बाहेरी । किंचित्सेंवकेसीं निघाला ॥२९॥
करीं शोभे धनुष्यबाण । सवें सेवक चवघे जण ।
ऐसें बुधें देखोनि आपण । मदनें विव्हळ पैं झाला ॥३०॥
बुध म्हणे तियेच्या सखियांसीं । तुम्हांत ही सुंदर कोण रुपयौवनेंसीं ।
लावण्य पाहतां पृथ्वीसीं । हीसमान दुजी नाहीं ॥३१॥
हिचें देखोनि लावण्य । सुरनरकिन्नरां काम गहन ।
इचा भ्रतार आहे कोण । काय कारण विसंबला ॥३२॥
ऐसें ऐकोन बुधाचें वचन । ऐलरायाच्या दूतीं जाण ।
सांगों आदरिलें समूळ कथन । सावधान अवधारा ॥३३॥
अहो आमुचा प्रभु निश्चितीं । याची सेना सेवक संपत्ती ।
सर्वां शापें पावली स्त्रीत्वप्राप्ती । हें नवल मुनि येथें झालें ॥३४॥
अहो जी मुनि या वनाभीतरीं । पुरुष आहेत कीं नाहींत निर्धारीं ।
आमचे प्रारब्धाची नवलपरी । स्त्रीरुप होवोनियां ठेलों ॥३५॥
या पर्वताच्या माथां जाण । बहुसाल पुरुष असती जन ।
परी आमचें प्रारब्ध असे हीन । योषिता करोन ठेविलें ॥३६॥
मुनि म्हणे तयांसी । तुम्ही विचरां या वनप्रदेशीं ।
कीं पुरुष त्यांचे सेवेसी । करोनि सावकाशीं वसावें ॥३७॥
ऐसें सोमसुतें बोलोन । तंव समीप ऐल आली जाण ।
बुधासी साष्टांगें करोनि नमन । कर जोडोन उभी असे ॥३८॥
इंद्रसुत म्हणे कलमनयने । सुभगे सुंदरे चंद्राननें ।
तुज देखिल्या भूकतहाने । सर्व विसरिजे राजबाळे ॥३९॥
मी चंद्राचा सुत जाण । मज वरावें स्व-इच्छेकरुन ।
ऐसे ऐकोनि बुधाचें वचन । ऐला काय बोलिली ॥४०॥
चहूंकडे पाहे सखीजनांसी । तंव कोणी न दिसे निर्भयेंसी ।
निःशंक निर्लज्ज होवोनि मानसीं । वचन त्या बुधासी बोलती झाली ॥४१॥
अगा ये सुंदरा सोमसुता । अत्यंत सज्ञाना गुणवंता ।
मज अभय देईं आतां । मी तुझी कांता होतसें ॥४२॥
ऐकोनि तियेचें वचन । संतोषला सोमनंदन ।
तये वनीं किंचिद्दिन । उभयतां क्रीडा करित होतीं ॥४३॥
तंव कोणे एके समयीं माधव मास । घेवोनि सुंदर ऐलेस ।
बुधु क्रीडतां होवोनि संतोष । आनंदा दोघे पावोनि भूपती ।
बुधासि म्हणता झाला सेनासंपत्ती । कोठे गेली माझी मुने ॥४५॥
तंव इंद्रसुत म्हणे रायासी । ऐकें सावध परियेसीं ।
तुम्हीं निद्रित असतां सेजेसीं । मेघ वर्षला ॥४६॥
शिळांचा पर्जन्य वर्षला शिळावारीं । सैन्या झाली चकचुरी ।
तुज असतां मम आश्रमाभीतरीं । प्राण वांचला राजेंद्रा ॥४७॥
राजा म्हणे बुधासी । माझा पुत्र शशिबिंदु नामेसीं ।
राज्य करितो आपुलें देशीं । मी सैन्येंसीं भ्रष्टलों ॥४८॥
आतां त्यजीन आपुला प्राण । एकला वांचल्या फळ कोण ।
राज्यासि आतां सैन्येंवीण । दुःख दारुण होतसे ॥४९॥
येरु म्हणे तुवां रहावें स्वस्थचित्तें । सांडोनि सैन्यचिंता येथें ।
फळमूळ भक्षोनि दिवस किंचितें । पुढे हित करीन तुझें ॥५०॥
ऐकोनि सोमसुताचें वचन । राजा ऐल आश्रमीं राहोन ।
पूर्णमास भरतां जाण । स्त्रीरुप धरिता जाहला ॥५१॥
धरोनियां स्त्रीरुपासी । बुध ऐल क्रीडातां वनासीं ।
पुत्र झाला पुरूरवा नामेंसीं । अति प्रसिद्ध धर्मात्मा ॥५२॥
सोमसुतापसोनि संभूत । ऐलेसि पुरूरवा झाला सुत ।
पुढील कथा सुनिश्चित । सावचित ऐकावी ॥५३॥
एका जनार्दना शरण । पुढील कथा अति गोड निरुपण ।
श्रोता वक्ता श्रीजनार्दन । श्रीरामरामायण जाण तेथें ॥५४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
ऐलाख्याने चतुःषष्टितमोऽध्यायः ॥६४॥ ओंव्या ॥५४॥

GO TOP