[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। नवनवतितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भरतेन शत्रुघ्नादिभिः सह श्रीरामाश्रमे गत्वा तत्पर्णशालाया निरीक्षणं रुदता तेन भ्रातुश्चरणयोर्निपतनम्, श्रीरामेण तैः सार्धं समालिङ्‌गनम् -
भरतांचे शत्रुघ्न आदिंचे सह श्रीरामांच्या आश्रमावर जाणे, त्यांची पर्णशाला पाहणे आणि रडत रडत त्यांच्या चरणांवर पडणे. श्रीरामांनी त्या सर्वांना हृदयाशी धरणे आणि भेटणे -
निविष्टायां तु सेनायामुत्सुको भरतस्ततः ।
जगाम भ्रातरं द्रष्टुं शत्रुघ्नमनुदर्शयन् ॥ १ ॥
सेना एकाजागी थांबवल्यावर आपल्या भावाच्य दर्शनासाठी उत्कंठित होऊन भरत आपला लहान भाऊ शत्रुघ्न याला आश्रमाची चिन्हे दाखवीत आश्रमाकडे जाऊ लागले. ॥ १ ॥
ऋषिं वसिष्ठं संदिश्य मातॄर्मे शीघ्रमानय ।
इति त्वरितमग्रे स जगाम गुरुवत्सलः ॥ २ ॥
गुरुभक्त भरत महर्षि वसिष्ठांना हा संदेश देऊन की ’आपण माझ्या मातांना बरोबर घेऊन त्वरित यावे’, तात्काळ पुढे निघाले. ॥ २ ॥
सुमन्त्रस्त्वपि शत्रुघ्नमदूरादन्वपद्यत ।
रामदर्शनजस्तर्षो भरतस्येव तस्य च ॥ ३ ॥
सुमंत्रही शत्रुघ्नाच्या समीपच पाठोपाठ चालले होते. त्यांनाही भरताप्रमाणेच श्रीरामचंद्रांच्या दर्शनाची तीव्र अभिलाषा होती. ॥ ३ ॥
गच्छन्नेवाथ भरतस्तापसालयसंस्थिताम् ।
भ्रातुः पर्णकुटीं श्रीमानुटजं च ददर्श ह ॥ ४ ॥
चालता चालताच श्रीमान् भरतांनी तपस्वी जनांच्या आश्रमांप्रमाणे प्रतिष्ठित झालेली भावाची पर्णकुटी आणि झोपडी पाहिली. ॥ ४ ॥
शालायास्त्वग्रतस्तस्या ददर्श भरतस्तदा ।
काष्ठानि चावभग्नानि पुष्पाण्यपचितानि च ॥ ५ ॥
त्या पर्णशालेच्या समोर भरतांनी त्या समयी बरेचसे कापलेले लाकडाचे तुकडे पाहिले जे होमासाठी साठवून ठेवलेले होते. त्याच बरोबर तेथे पूजेसाठी जमविलेली फुलेही दृष्टिगोचर झाली. ॥ ५ ॥
सलक्ष्मणस्य रामस्य ददर्शाश्रममीयुषः ।
कृतं वृक्षेष्वभिज्ञानं कुशचीरैः क्वचित् क्वचित् ॥ ६ ॥
आश्रमाकडे येण्याजाण्याच्या मार्गावर श्रीराम आणि लक्ष्मण यांच्याद्वारा निर्मित मार्गबोधक चिन्हेही त्यांना वृक्षांवर लावलेली दिसून आली, जी कुश आणि चीरद्वारा तयार करून कोठे कोठे वृक्षांच्या शाखांवर लटकत ठेवलेली होती. ॥ ६ ॥
ददर्श च वने तस्मिन् महतः सञ्चयान् कृतान् ।
मृगाणां महिषाणां च करीषैः शीतकारणात् ॥ ७ ॥
त्या वनात शीत निवारणासाठी मृगांच्या लेंड्या आणि रेड्यांच्या वाळलेल्या शेण्यांचे ढीग एकत्र करून ठेवलेले होते, जे भरतांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. ॥ ७ ॥
गच्छन्नेव महाबाहुर्द्युतिमान् भरतस्तदा ।
शत्रुघ्नं चाब्रवीद्धृष्टस्तानमात्यांश्च सर्वशः ॥ ८ ॥
त्यासमयी चालता चालताच परम कांतिमान् महाबाहु भरताने शत्रुघ्न तसेच संपूर्ण मंत्र्यांना अत्यंत प्रसन्न होऊन म्हटले - ॥ ८ ॥
मन्ये प्राप्ताः स्म तं देशं भरद्वाजो यमब्रवीत् ।
नातिदूरे हि मन्येऽहं नदीं मन्दाकिनीमितः ॥ ९ ॥
’असे कळून येत आहे की महर्षि भरद्वाजांनी ज्या स्थानाचा पत्ता सांगितला होता तेथे आपण आलो आहोत. मी समजतो की मंदाकिनी नदी येथून अधिक दूर नाही. ॥ ९ ॥
उच्चैर्बद्धानि चीराणि लक्ष्मणेन भवेदयम् ।
अभिज्ञानकृतः पन्था विकाले गन्तुमिच्छता ॥ १० ॥
’वृक्षांमध्ये ऊंचावर चीर (वस्त्रे) बांधलेली दिसत आहेत. म्हणून समय असमय जल आदि आणण्याच्या निमित्ताने बाहेर जाण्याची इच्छा करणार्‍या लक्ष्मणाने ज्याची ओळख पटण्यासाठी ही चिन्हे बनविली आहेत, त्या आश्रमाला जाण्याचा मार्ग हाच असू शकतो. ॥ १० ॥
इतश्चोदात्तदन्तानां कुञ्जराणां तरस्विनाम् ।
शैलपार्श्वे परिक्रान्तमन्योन्यमभिगर्जताम् ॥ ११ ॥
’येथून मोठ मोठे दात असणारे वेगवान हत्ती निघून एक दुसर्‍या प्रति गर्जना करीत या पर्वताच्या पार्श्वभागात चकरा मारीत राहतात, म्हणून चुकून तिकडे जाऊ नये ह्यासाठी लक्ष्मणांनी ही चिन्हे बनविली असावीत. ॥ ११ ॥
यमेवाधातुमिच्छन्ति तापसाः सततं वने ।
तस्यासौ दृश्यते धूमः सङ्‌कु्लः कृष्णवर्त्मनः ॥ १२ ॥
’वनात तपस्वी मुनि सदा ज्याचे आधान करण्याची इच्छा करतात त्या अग्निदेवाचा हा अति सघन धूर दृष्टिगोचर होत आहे. ॥ १२ ॥
अत्राहं पुरुषव्याघ्रं गुरुसंस्कारकारिणम् ।
आर्यं द्रक्ष्यामि संहृष्टं महर्षिमिव राघवम् ॥ १३ ॥
’येथे मी गुरुजनांचा सत्कार करणार्‍या पुरुषसिंह आर्य राघवाचे सदा आनंदमग्न राहणार्‍या महर्षिंच्या प्रमाणे दर्शन करीन. ॥ १३ ॥
अथ गत्वा मुहूर्तं तु चित्रकूटं स राघवः ।
मंदाकिनीमनु प्राप्तस्तं जनं चेदमब्रवीत् ॥ १४ ॥
त्यानंतर रघुकुलभूषण भरत एका मुहूर्तातच मंदाकिनीच्या तटावर विराजमान चित्रकूटाच्या जवळ जाऊन पोहोंचले आणि आपल्या बरोबरच्या लोकांना याप्रमाणे बोलले - ॥ १४ ॥
जगत्यां पुरुषव्याघ्र आस्ते वीरासने रतः ।
जनेन्द्रो निर्जनं प्राप्य धिङ्‌मे जन्म सजीवितम् ॥ १५ ॥
’अहो ! माझ्यामुळेच पुरुषसिंह महाराज श्रीरामचंद्र या निर्जन वनात येऊन खुल्या पृथ्वीवर वीरासनात बसत आहेत, म्हणून माझा जन्म आणि जीवन यांचा धिक्कार असो. ॥ १५ ॥
मत्कृते व्यसनं प्राप्तो लोकनाथो महाद्युतिः ।
सर्वान् कामान् परित्यज्य वने वसति राघवः ॥ १६ ॥
’माझ्यामुळेच महातेजस्वी लोकनाथ रघुनाथ भारी संकटात पडून समस्त कामनांचा परित्याग करून वनात निवास करीत आहेत. ॥ १६ ॥
इति लोकसमाक्रुष्टः पादेष्वद्य प्रसादयन् ।
रामं तस्य पतिष्यामि सीताया लक्ष्मणस्य च ॥ १७ ॥
’म्हणून मी सर्व लोकांच्या द्वारा निंदित आहे म्हणून माझ्या जन्माचा धिक्कार आहे. आज मी श्रीरामांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या चरणांवर पडून जाईन. सीता आणि लक्ष्मणांच्याही पाया पडेन.’॥ १७ ॥
एवं स विलपंस्तस्मिन् वने दशरथात्मजः ।
ददर्श महतीं पुण्यां पर्णशालां मनोरमाम् ॥ १८ ॥
या प्रकारे विलाप करीत दशरथकुमार भरतांनी त्या वनात एक मोठी पर्णशाला पाहिली जी परम पवित्र आणि मनोरम वाटत होती. ॥ १८ ॥
सालतालाश्वकर्णानां पर्णैर्बहुभिरावृताम् ।
विशालां मृदुभिस्तीर्णां कुशैर्वेदिमिवाध्वरे ॥ १९ ॥
ती शाल, ताल आणि अश्वकर्ण नामक वृक्षांच्या बर्‍याचशा पानांनी शाकारली गेली होती म्हणून यज्ञशाळेत ज्यावर कोमल कुश पसरले गेले आहेत अशा लांब रुंद वेदीच्या समान शोभत होती. ॥ १९ ॥
शक्रायुधनिकाशैश्च कार्मुकैर्भारसाधनैः ।
रुक्मपृष्ठैर्महासारैः शोभितां शत्रुबाधकैः ॥ २० ॥
तेथे इंद्रधनुष्याप्रमाणे बरीचशी धनुष्ये ठेवलेली होती जी गुरुतर कार्य साधण्यास समर्थ होती. ज्यांचे पृष्ठभाग सोन्यांनी मढविलेले होते आणि जी फार प्रबल आणि शत्रुंना पीडा देणारी होती. त्यांच्यामुळे त्या पर्णकुटीला फार शोभा प्राप्त झाली होती. ॥ २० ॥
अर्करश्मिप्रतीकाशैर्घोरैस्तूणगतैः शरैः ।
शोभितां दीप्तवदनैः सर्पैर्भोगवतीमिव ॥ २१ ॥
तेथे भात्यामध्ये सूर्याच्या किरणांप्रमाणे चमकदार आणि भयंकर असे बरेचसे बाण भरलेले होते. दीप्तिमान् मुख असणार्‍या सर्पांनी भोगावतीपुरी जशी शोभते त्याप्रमाणे त्या बाणांनी ती पर्णशाला सुशोभित झाली होती. ॥ २१ ॥
महारजतवासोभ्यामसिभ्यां च विराजिताम् ।
रुक्मबिंदुविचित्राभ्यां चर्मभ्यां चापि शोभिताम् ॥ २२ ॥
सोन्याच्या म्यान्यांमध्ये ठेवलेल्या दोन तलवारी आणि स्वर्णमय बिंदुंनी विभूषित दोन विचित्र ढालीही त्या आश्रमाची शोभा वाढवीत होत्या. ॥ २२ ॥
गोधाङ्‌गुलित्रैरासक्तैश्चित्रकाञ्चनभूषितैः ।
अरिसङ्‌घैरनाधृष्यां मृगैः सिंहगुहामिव ॥ २३ ॥
तेथे घोरपडीच्या चामड्याची बनविलेली बरीचशी सुवर्णजडित दस्तानेही टांगलेली होती. ज्याप्रमाणे मृगसिंहाच्या गुहेवर आक्रमण करू शकत नाहीत त्याप्रमाणे ती पर्णशाला शत्रुसमूहासाठी अगम्य आणि अजय होती. ॥ २३ ॥
प्रागुदक्प्रवणां वेदिं विशालां दीप्तपावकाम् ।
ददर्श भरतस्तत्र पुण्यां रामनिवेशने ॥ २४ ॥
श्रीरामांच्या ज्या निवासस्थानावर भरतांनी एक पवित्र आणि एक विशाल वेदी पाहिली जी ईशान्य कोपर्‍यात थोडी खालच्या बाजूस होती, तिच्यावर अग्नि प्रज्वलित होत होता. ॥ २४ ॥
निरीक्ष्य स मुहूर्तं तु ददर्श भरतो गुरुम् ।
उटजे राममासीनं जटामण्डलधारिणम् ॥ २५ ॥

कृष्णाजिनधरं तं तु चीरवल्कलवाससम् ।
ददर्श राममासीनमभितः पावकोपमम् ॥ २६ ॥
पर्णशालेकडे थोडा वेळ पाहून भरतांनी कुटीमध्ये बसलेल्या आपला पूजनीय भ्राता श्रीराम यास पाहिले, ज्यांनी मस्तकावर जटामंडल धारण केलेले होते. त्यांनी आपल्या अंगावर कृष्ण मृगचर्म तसेच चीर आणि वल्कल वस्त्रे धारण केलेली होती. भरतांना दिसून आले की श्रीराम जवळच बसलेले आहेत आणि प्रज्वलित अग्निप्रमाणे आपली दिव्य प्रभा पसरवीत आहेत. ॥ २५-२६ ॥
सिंहस्कन्धं महाबाहुं पुण्डरीकनिभेक्षणम् ।
पृथिव्याः सागरान्ताया भर्तारं धर्मचारिणम् ॥ २७ ॥

उपविष्टं महाबाहुं ब्रह्माणमिव शाश्वतम् ।
स्थण्डिले दर्भसंस्तीर्णे सीतया लक्ष्मणेन च ॥ २८ ॥
समुद्रापर्यंत पृथ्वीचे स्वामी, धर्मात्मा, महाबाहु श्रीराम सनातन ब्रह्माप्रमाणे कुश अंथरलेल्या वेदीवर बसलेले होते. त्यांचे खांदे सिंहासमान, भुजा मोठमोठ्या आणि नेत्र विकसित कमलाप्रमाणे होते. त्या वेदीवर ते सीता आणि लक्ष्मणासह विराजमान होते. ॥ २७-२८ ॥
तं दृष्ट्‍वा भरतः श्रीमाञ्शोकमोहपरिप्लुतः ।
अभ्यधावत धर्मात्मा भरतः कैकयीसुतः ॥ २९ ॥
त्यांना या अवस्थेत पाहून धर्मात्मा श्रीमान कैकेयीकुमार भरत शोक आणि मोहात बुडून गेले आणि मोठ्या वेगाने त्यांच्याकडे धावले. ॥ २९ ॥
दृष्ट्‍वैव विललापार्तो बाष्पसंदिग्धया गिरा ।
अशक्नुवन् वारयितुं धैर्याद् वचनमब्रुवन् ॥ ३० ॥
भावाकडे दृष्टी जाताच भरत आर्तभावाने विलाप करू लागले. ते आपल्या शोकाच्या आवेगाला धैर्याने रोखू शकले नाहीत आणि अश्रु ढाळीत गद्‌गद वाणीने म्हणू लागले - ॥ ३० ॥
यः संसदि प्रकृतिभिर्भवेद् युक्त उपासितुम् ।
वन्यैर्मृगैरुपासीनः सोऽयमास्ते ममाग्रजः ॥ ३१ ॥
’हाय ! जे राजसभेत बसून प्रजा आणि मंत्रीवर्गाकडून सेवा आणि सन्मान मिळण्यास योग्य आहेत तेच हे माझे ज्येष्ठ बंधु श्रीराम येथे जंगली पशूंनी घेरलेले बसलेले आहेत. ॥ ३१ ॥
वासोभिर्बहुसाहस्रैर्यो महात्मा पुरोचितः ।
मृगाजिने सोऽयमिह प्रवस्ते धर्ममाचरन् ॥ ३२ ॥
’जे महात्मा पूर्वी कित्येक हजार वस्त्रांचा उपभोग घेत होते ते आता धर्माचरण करीत केवळ दोन मृगचर्म धारण करीत आहेत. ॥ ३२ ॥
अधारयद् यो विविधाश्चित्राः सुमनसः सदा ।
सोऽयं जटाभारमिमं सहते राघवः कथम् ॥ ३३ ॥
जे सदा नाना प्रकारच्या विचित्र फुलांना आपल्या मस्तकावर धारण करीत होते तेच हे राघव या समयी या जटाभारास कसे सहन करीत आहेत ? ॥ ३३ ॥
यस्य यज्ञैर्यथादिष्टैर्युक्तो धर्मस्य सञ्चयः ।
शरीरक्लेशसम्भूतं स धर्मं परिमार्गते ॥ ३४ ॥
’ज्यांच्यासाठी शास्त्रोक्त यज्ञांच्या अनुष्ठानांच्या द्वारे धर्माचा संग्रह करणे उचित आहे, ते या समयी शरीराला कष्ट देण्याने प्राप्त होणार्‍या धर्माचे अनुसंधान करीत आहेत. ॥ ३४ ॥
चंदनेन महार्हेण यस्याङ्‌गमुपसेवितम् ।
मलेन तस्याङ्‌गमिदं कथमार्यस्य सेव्यते ॥ ३५ ॥
’ज्यांच्या अंगांची बहुमूल्य चंदनाने सेवा होत होती त्या माझ्या पूज्य भ्रात्याचे हे शरीर कसे मलाने सेवित होत आहे. ॥ ३५ ॥
मन्निमित्तमिदं दुःखं प्राप्तो रामः सुखोचितः ।
धिग्जीवितं नृशंसस्य मम लोकविगर्हितम् ॥ ३६ ॥
’हाय ! जे सर्वथा सुख भोगण्यास योग्य आहेत ते श्रीराम माझ्याच कारणाने अशा दुःखात पडले आहेत. ओह ! मी किती क्रूर आहे ? माझ्या या लोकनिंदित जीवनाचा धिक्कास असो’. ॥ ३६ ॥
इत्येवं विलपन् दीनः प्रस्विन्नमुखपङ्‌कजः ।
पादावप्राप्य रामस्य पपात भरतो रुदन् ॥ ३७ ॥
याप्रकारे विलाप करीत करीत भरत अत्यंत दुःखी झाले. त्यांच्या मुखारविंदावर घामाचे थेंब दिसून येऊ लागले. ते श्रीरामांच्या चरणापर्यंत पोहोंचण्यापूर्वीच पृथ्वीवर कोसळून पडले. ॥ ३७ ॥
दुःखाभितप्तो भरतो राजपुत्रो महाबलः ।
उक्त्वाऽऽर्येति सकृद् दीनं पुनर्नोवाच किञ्चन ॥ ३८ ॥
अत्यंत दुःखाने संतप्त होऊन महाबली राजकुमार भरतांनी एक वेळ दीनवाणीने ’आर्य’ म्हणून हाक मारली. नंतर ते काही बोलू शकले नाहीत. ॥ ३८ ॥
बाष्पैः पिहितकण्ठश्च प्रेक्ष्य रामं यशस्विनम् ।
आर्येत्येवाभिसंक्रुश्य व्याहर्तुं नाशकत् ततः ॥ ३९ ॥
अश्रुंनी गळा रुद्ध झाला. यशस्वी श्रीरामांकडे पाहून ते ’हा ! आर्य ! ’असे म्हणून ओरडले. त्याच्या पुढे त्यांच्याने काही बोलणे शक्य झाले नाही ॥ ३९ ॥
शत्रुघ्नश्चापि रामस्य ववन्दे चरणौ रुदन् ।
तावुभौ स समालिङ्‌ग्य रामोऽप्यश्रूण्यवर्तयत् ॥ ४० ॥
नंतर शत्रुघ्नानेही रडत रडत श्रीरामांच्या चरणी प्रणाम केला. श्रीरामांनी त्या दोघांना उठवून हृदयाशी धरले. नंतर तेही नेत्रातून अश्रुंच्या धारा ढाळू लागले. ॥ ४० ॥
ततः सुमंत्रेण गुहेन चैव
     समीयतू राजसुतावरण्ये ।
दिवाकरश्चैव निशाकरश्च
     यथाम्बरे शुक्रबृहस्पतिभ्याम् ॥ ४१ ॥
तत्पश्चात् राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण त्या वनात सुमंत्र आणि निषादराज गुहाला भेटले. जणु कही आकाशात सूर्य आणि चंद्रमा, शुक्र आणि बृहस्पतीला भेटत आहेत. ॥ ४१ ॥
तान् पार्थिवान् वारणयूथपार्हान्
     समागतांस्तत्र महत्यरण्ये ।
वनौकसस्तेऽभिसमीक्ष्य सर्वे
     त्वश्रूण्यमुञ्चन् प्रविहाय हर्षम् ॥ ४२ ॥
यूथपति गजराजावर बसून यात्रा करण्यास योग्य अशा त्या चार राजकुमारांना त्या विशाल वनात आलेले पाहून समस्त वनवासी हर्ष सोडून शोकाचे अश्रु ढाळू लागले. ॥ ४२ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकोनशततमः सर्गः ॥ ९९ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा नव्याण्णवावा सर्ग पूरा झाला ॥ ९९ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP