॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ बालकाण्ड ॥

॥ पंचमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण, मारीच आणि सुबाहू यांचे दमन आणि अहल्योद्धार -


श्रीमहादेव उवाच
तत्र कामाश्रमे रम्ये कानने मुनिसङ्‌कुले ।
उषित्वा रजनीमेकां प्रभाते प्रस्थिताः शनैः ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले-हे पार्वती, त्यानंतर मुनिजनांनी गजबजलेल्या त्या अतिशय सुंदर, कामाश्रम नावाच्या वनात एक रात्र राहून, प्रातःकाळ होताच ते तेथून सावकाश निघाले. (१)

सिद्धाश्रमं गताः सर्वे सिद्धचारणसेवितम् ।
विश्वामित्रेण संदिष्टा मुनयस्तन्निवासिनः ॥ २ ॥
पूजां च महतीं चक्रू रामलक्ष्मणयोर्द्रुतम् ।
श्रीरामः कौशिकं प्राह मुने दीक्षां प्रविश्यताम् ॥ ३ ॥
नंतर सकल सिद्ध आणि चारण जेथे राहात होते अशा सिद्धाश्रमात ते सर्वजण पोचले. विश्वामित्रांच्या आज्ञेने तेथे राहणार्‍या मुनींनी लगबगीने येऊन श्रीराम आणि लक्ष्मण यांचा मोठा सत्कार क्र्ला. त्यानंतर श्रीराम विश्वामित्रांना म्हणाले, "हे मुने, आपण यज्ञदीक्षा घ्यावी. (२-३)

दर्शयस्व महाभाग कुतस्तौ राक्षसाधमौ ।
तथेत्युक्त्वा मुनिर्यष्टुमारेभे मुनिभिः सह ॥ ४ ॥
तसेच हे महामुने, ते दोघे अधम राक्षस कोठे आहेत ते आम्हांला दाखवा." तेव्हा 'ठीक आहे' असे म्हणून, अन्य मुनींच्यासह विश्वामित्र मुनींनी यज्ञ करण्यास प्रारंभ केला. (४)

मध्याह्ने ददृशाते तौ राक्षसौ कामरूपिणौ ।
मारीचश्च सुबाहुश्च वर्षन्तौ रुधिरास्थिनी ॥ ५ ॥
मध्यान्हाच्या वेळी मारीच आणि सुबाह हे दोघे इच्छेप्रमाणे रूप धारण करणारे राक्षस रक्त आणि हाडे यांचा वर्षाव करीत असताना दिसू लागले. (५)

रामोऽपि धनुरादाय द्वौ बाणौ सन्दधे सुधीः ।
आकर्णान्तं समाकृष्य विससर्ज तयोः पृथक् ॥ ६ ॥
बुद्धिमान रामांनीसुद्धा धनुष्य घेऊन त्याला दोन बाण जोडले आणि कानापर्यंत दोरी खेचून, त्या दोन राक्षसांवर सोडले. (६)

तयोरेकस्तु मारीचं भ्रामयञ्छतयोजनम् ।
पातयामास जलधौ तदद्‌भुतमिवाभवत् ॥ ७ ॥
त्या बाणांतील एका बाणाने मारीचाला आकाशात गरगर फिरवून शेकडो योजने दूर असणार्‍या समुद्रात पाडले. श्रीरामांचे ते अद्‌भुत कृत्यच झाले. (७)

द्वितीयोऽग्निमयो बाणः सुबाहुमजयत्क्षणात् ।
अपरे लक्षमणेनाशु हतास्तदनुयायिनः ॥ ८ ॥
दुसर्‍या अग्निमय बाणाने सुबाहूला क्षणात भस्मसात करून टाकले. तसेच त्यांचे जे इतर अनुयायी होते त्या सर्वांना लक्ष्मणाने एका झटक्यातच ठार केले. (८)

पुष्पौघैराकिरन्देवा राघवं सहलक्ष्मणम् ।
देवदुन्दुभयो नेदुस्तुष्टुवः सिद्धचारणाः ॥ ९ ॥
तेव्हा श्रीराम व लक्ष्मण यांचा लोकोत्तर प्रभाव पाहून देवांनी पुष्पवर्षाव केला, दुंदुभी इत्यादी देववाद्यांचा घोष केला आणि त्याच वेळी सिद्ध आणि चारण यांचे समूह त्यांची स्तुती करू लागले. (९)

विश्वामित्रस्तु संपूज्य पूजार्हं रघुनन्दनम् ।
अङ्‌के निवेश्य चालिङ्‌ग्य भक्त्या बाष्पाकुलेक्षणः ॥ १० ॥
आनंदाश्रूंनी डोळे भरून आलेल्या विश्वामित्रांनी पूजनीय रघुनाथांचे भक्तिभावाने पूजन केले आणि त्यांना आलिंगन देऊन आपल्याजवळ बसविले. (१०)

भोजयित्वा सह भ्रात्रा रामं पक्वफलादिभिः ।
पुराणवाक्यैर्मधुरैर्निनाय दिवसत्रयम् ॥ ११ ॥
नंतर लक्ष्मणासह रामांना पिकलेली फळे इत्यादींचे भोजन देऊन, त्यांना पुराणे आणि इतिहास इत्यादींतील मधुर कथा ऐकवीत, विश्वामित्रांनी तीन दिवस तेथे घालविले. (११ )

चतुर्थेऽहनि संप्राप्ते कौशिको राममब्रवीत् ।
राम राम महायज्ञं द्रष्टुं गच्छामहे वयम् ॥ १२ ॥
विदेहराजनगरे जनकस्य महात्मनः ।
तत्र माहेश्वरं चापमस्ति न्यस्तं पिनाकिना ॥ १३ ॥
चौथ्या दिवशी, विश्वामित्रांनी श्रीरामांना म्हटले, "अरे रामा, महात्म्या जनकाचा फार मोठा यज्ञ पाहण्यास आपण जनक राजाच्या नगरीला जाऊ या. तेथे महादेवांनी ठेवलेले एक फार अवजड माहेश्वर धनुष्य आहे. (१२-१३)

द्रक्ष्यसि त्वं महासत्त्वं पूज्यसे जनकेन च ।
इत्युक्त्वा मुनिभिस्ताभ्यां ययौ गङ्‌गासमीपगम् ॥ १४ ॥
गौतमस्याश्रमं पुण्यं यत्राहल्यास्थिता तपः ।
दिव्यपुष्पफलोपेतपादपैः परिवेष्टितम् ॥ १५ ॥
ते सुदृढ धनुष्य तू पाहशील आणि महाराज जनक तुझा चांगल्या प्रकारे सत्कार करतील." असे सांगून, विश्वामित्र रामलक्ष्मण आणि अन्य मुनिजन यांच्यासह गंगानदीच्याजवळ असणार्‍या मुनिश्रेष्ठ गौतमांच्या पवित्र आश्रमात गेले. तो आश्रम दिव्य अशा फुला-फळांनी भरलेल्या वृक्षांनी वेढलेला होता आणि तेथे अहल्या तप करीत राहिली होती. (१४-१५)

मृगपक्षिगणैर्हीनं नानाजन्तुविवर्जितम् ।
दृष्ट्‍वोवाच मुनिं श्रीमान् रामो राजीवलोचनः ॥ १६ ॥
कस्यैतदश्रमपदं भाति भास्वच्छुभं महत् ।
पत्रपुष्पफलैर्युक्तं जन्तुभिः परिवर्जितम् ॥ १७ ॥
आह्लादयति मे चेतो भगवन् ब्रूहि तत्त्वतः ॥ १८ ॥
मृग, पक्षी किंवा नाना प्रकारच्या प्राण्यांनी रहित असा तो आश्रम पाहिल्यावर, कमलनयन श्रीरामांनी विश्वामित्रांना प्रश्न केला. "पाने, फुले, फळे इत्यादींनी संपन्न तथापि जीवजंतूंनी रहित असा हा रमणीय आणि पवित्र मोठा आश्रम दिसत आहे, तो कुणाचा बरे ? हा आश्रम पाहून माझे मन आनंदित होत आहे. हे भगवन्, याचा वृत्तांत आपण मला सांगावा." (१६-१८)

विश्वामित्र उवाच -
शृणु राम पुरा वृत्तं गौतमो लोकविश्रुतः ।
सर्वधर्मभृतां श्रेष्ठस्तपसाराधयन् हरिम् ॥ १९ ॥
विश्वामित्र म्हणाले- "हे रामा, या आश्रमाचा पूर्वीचा वृत्तांत ऐका. पूर्वी येथे जगद्‌विख्यात, सर्व धार्मिक माणसांत श्रेष्ठ असें मुनिवर गौतम श्रीहरीची आराधना करीत राहात होते. (१९)

तस्मै ब्रह्मा ददौ कन्यामहल्यां लोकसुन्दरीम् ।
ब्रह्मचर्येण सन्तुष्टः शुश्रूषणपरायणाम् ॥ २० ॥
त्यांच्या ब्रह्मचर्याने संतुष्ट होऊन भगवान ब्रह्मदेवांनी त्यांना अहल्या नावाची सेवापरायण, जगत्‌सुंदरी अशी कन्या दिली. (२०)

तया सार्धमिहावत्सीद्‌‍गौतमस्तपतां वरः ।
शक्रस्तु तां धर्षयितुमन्तरं प्रेप्सुरन्वहम् ॥ २१ ॥
तापसश्रेष्ठ असे ते गौतम मुनी तिच्यासह येथे राहू लागले. तिला भ्रष्ट करण्याची एखादी संधी इंद्र दररोज पाहू लागला. (२१)

कदाचिन्मुनिवेषेण गौतमे निर्गते गृहात् ।
धर्षयित्वाथ निरगात्त्वरितं मुनिरप्यगात् ॥ २२ ॥
एकदा मुनिश्रेष्ठ गौतम आश्रमातून बाहेर गेले असता इंद्राने गौतम मुनींचा वेष धारण करून, तिला भ्रष्ट केले. तो झटपट तेथून निघाला. त्याच वेळी गौतम मुनीसुद्धा तेथे परत आले. (२२)

दृष्ट्‍वा यान्तं स्वरूपेण मुनिः परमकोपनः ।
पप्रच्छ कस्त्वं दुष्टात्मन्मम रूपधरोऽधमः ॥ २३ ॥
आपले रूप धारण करून तेथून जाणार्‍या त्या इंद्राला पाहून, गौतम मुनींना अतिशय क्रोध आला आणि त्यांनी त्याला विचारले, "अरे दुष्टात्म्या, अरे अधमा, माझे रूप धारण करणारा तू कोण आहेस ? (२३)

सत्यं ब्रूहि न चेद्‌भस्म करिष्यामि न संशयः ।
सोऽब्रवीद्देवराजोऽहं पाहि मां कामकिङ्‌करम् ॥ २४ ॥
खरे बोल. जर खरे सांगितले नाहीस तर मी नक्की तुला भस्म करून टाकीन." तेव्हा तो म्हणाला, "भगवन, कामवश झालेला मी देवराज इंद्र आहे. माझे रक्षण करा. (२४)

कृतं जुगुप्सितं कर्म मया कुत्सितचेतसा ।
गौतमः क्रोधताम्राक्षः शशाप दिविजाधिपम् ॥ २५ ॥
वाईट मनाने मी अतिशय निंद्य कृत्य केले आहे." तेव्हा क्रोधाने डोळे लाल झालेल्या गौतमांनी देवराज इंद्राला शाप दिला. (२५)

योनिलम्पट दुष्टात्मन्सहस्रभगवान्भव ।
शप्त्वा तं देवराजानं प्रविश्य स्वाश्रमं द्रुतम् ॥ २६ ॥
दृष्ट्‍वाहल्यां वेपमानां प्राञ्जलिं गौतमोऽब्रवीत् ।
दुष्टे त्वं तिष्ठ दुर्वृत्ते शिलायामाश्रमे मम ॥ २७ ॥
"अरे दुष्टात्म्या, तू योनिलंपट आहेस. म्हणून तुझ्या शरीरावर हजार छिद्रे उत्पन्न होतील." अशा प्रकारे देवराज इंद्राला शाप देऊन मुनींनी त्वरित स्वतःच्या आश्रमात प्रवेश केला. तेव्हां भीतीने कापणारी आणि हात जोडून उभी असणारी अहल्या त्यांना दिसली. तिला पाहून गौतमांनी म्हटले, "हे दुष्टे, हे दुराचारिणी, माझ्या आश्रमातील शिळा होऊन तू राहा. (२६-२७)

निराहारा दिवारात्रं तपः परममास्थिता ।
आतपानिलवर्षादिसहिष्णुः परमेश्वरम् ॥ २८ ॥
ध्यायन्ती राममेकाग्रमनसा हृदि संस्थितम् ।
नानाजन्तुविहीनोऽयमाश्रमो मे भविष्यति ॥ २९ ॥
येथे तू निराहार राहून ऊन, वारा, पाऊस इत्यादी सहन करीत, रात्रंदिवस कठोर तप कर आणि एकाग्र मनाने आपल्या हृदयात विराजमान असणार्‍या परमात्म्या श्रीरामांचे ध्यान कर. या क्षणापासून हा माझा आश्रम विविध प्रकारच्या जीवजंतूंनी रहित होईल. (२८-२९)

एवं वर्षसहस्रेषु ह्यनेकेषु गतेषु च ।
रामो दाशरथिः श्रीमानागमिष्यति सानुजः ॥ ३० ॥
अशा प्रकारे कित्येक हजार वर्षे निघून गेल्यावर येथे राजा दशरथांचे चिरंजीव पुत्र श्रीमान श्रीराम आपल्या धाकट्या भावासह येथे येतील. (३०)

यदा त्वदाश्रयशिलां पादाभ्यामाक्रमिष्यति ।
तदैव धूतपापा त्वं रामं संपूज्य भक्तितः ॥ ३१ ॥
परिक्रम्य नमस्कृत्य स्तुत्वा शापाद्विमोक्ष्यसे ।
पूर्ववन्मम शुश्रूषां करिष्यसि यथासुखम् ॥ ३२ ॥
आणि जेव्हां ते तुझा आश्रय असणार्‍या शिळेवर आपले दोन्ही पाय ठेवतील, त्या वेळीच तू पापमुक्त होशील. नंतर भक्तिपूर्वक श्रीरामचंद्रांचे पूजन करून, त्यांना प्रदक्षिणा करून, नमस्कारपूर्वक त्याची स्तुती करून, तू शापातून सुटशील आणि मग पूर्वीप्रमाणेच आनंदाने माझी सेवा करू लागशील." (३१-३२)

इत्युक्त्वा गौतमः प्रागाद्धिमवन्तं नगोत्तमम् ।
तदाद्यहल्या भूतानामदृश्या स्वाश्रमे शुभे ॥ ३३ ॥
तव पादरजःस्पर्शं काङ्‌क्षते पवनाशना ।
आस्तेऽद्यापि रघुश्रेष्ठ तपो दुष्करमास्थिता ॥ ३४ ॥
असे बोलून महर्षी गौतम पर्वतश्रेष्ठ हिमालयात निघून गेले. हे रघुश्रेष्ठा, त्या दिवसापासून वायुभक्षण करून कठोर तप करणारी अहल्या तुमच्या चरणरजांच्या रयर्शाची इच्छा करीत, अन्य प्राण्यांना न दिसता, आपल्या पवित्र आश्रमात आजसुद्धा राहात आहे. (३३-३४)

पावयस्व मुनेर्भार्यामहल्यां ब्रह्मणः सुताम् ।
इत्युक्त्वा राघवं हस्ते गृहीत्वा मुनिपुङ्‌गवः ॥ ३५ ॥
दर्शयामास चाहल्यामुग्रेण तपसा स्थिताम् ।
रामः शिलां पदा स्पृष्ट्‍वा तां चापश्यत्तपोधनाम् ॥ ३६ ॥
हे रामा, आज तुम्ही ब्रह्मदेवाची कन्या आणि गौतम मुनींची पत्‍नी जी अहल्या हिचा उद्धार करा." असे सांगून रघुनाथाचा हात पकडून, मुनिवर विश्वामित्रांनी, उग्र तपात रत असणारी अहल्या रामांना दाखविली. तेव्हा श्रीरामचंद्रांनी आपल्या पायाने त्या शिळेला स्पर्श करून तपोनिधी अहल्येला पाहिले. (३५-३६)

ननाम राघवोऽहल्यां रामोऽहमिति चाब्रवीत् ।
ततो दृष्ट्‍वा रघुश्रेष्ठं पीतकौशेयवाससम् ॥ ३७ ॥
तिला पाहून 'मी राम आहे' असे सांगून भगवान रामांनी तिला प्रणाम केला. तेव्हा रेशमी पीतांबर परिधान केलेल्या श्रीरधुनाथांना अहल्येने (प्रथम विष्णूरूपात) पाहिले. (३७)

चतुर्भुजं शङ्‌खचक्रगदापङ्‌कजधारिणम् ।
धनुर्बाणधरं रामं लक्ष्मणेन समन्वितम् ॥ ३८ ॥
त्यांच्या चार हातात शंख, चक्र, गदा आणि पद्य हे शोभत होते. (नंतर रामरूपात पाहिले तेव्हा) त्यांच्या खांद्यावर धनुष्य बाण विराजमान होते. त्यांच्याबरोबर लक्ष्मण होता. (३८)

स्मितवक्त्रं पद्मनेत्रं श्रीवत्साङ्‌कितवक्षसम् ।
नीलमाणिक्यसङ्‌काशं द्योतयन्तं दिशो दश ॥ ३९ ॥
त्यांच्या मुखावर स्मित होते. त्यांचे डोळे कमळाप्रमाणे होते. त्यांचे वक्षःस्थळ हे श्रीवत्सांकाने सुशोभित होते. नील-मण्यासारख्या कांतीने ते दाही दिशा प्रकाशित करीत होते. (३९)

दृष्ट्‍वा रामं रमानाथं हर्षविस्फारितेक्षणा ।
गौतमस्य वचः स्मृत्वा ज्ञात्वा नारायणं परम् ॥ ४० ॥
संपूज्य विधिवद्‍राममर्घ्यादिभिरनिन्दिता ।
हर्षाश्रुजलनेत्रान्ता दण्डवत्प्रणिपत्य सा ॥ ४१ ॥
त्या रमानाथ श्रीरामचंद्रांना पाहून अहल्येचे डोळे आनंदाने विस्फारित झाले. तिला मुनिश्रेष्ठ गौतमांच्या वचनांचे स्मरण झाले. तेव्हा ते साक्षात श्रेष्ठ श्रीनारायण आहेत असे जाणून, त्या पुण्यशील अहल्येने अर्घ्य इत्यादींनी श्रीरामांचे विधिवत पूजन केले, त्या वेळी तिचे नेत्र आनंदाश्रूंनी भरले होते. तिने श्रीरामांना दंडवत प्रणाम केला. (४०-४१)

उत्थाय च पुनर्दृष्ट्‍वा रामं राजीवलोचनम् ।
पुलकाङ्‌कितसर्वाङ्‌गा गिरा गद्‍गदयैलत ॥ ४२ ॥
नंतर उठून उभे राहून आणि पुनः कमलनयन रामांना पाहून तिचे सर्वांग पुलकित झाले आणि ती सद्‌गदित वाणीने श्रीरामांची स्तुती करू लागली. ४२

अहल्योवाच
अहो कृतार्थास्मि जगन्निवास ते
     पादाब्जसंलग्न रजःकणादहम् ।
स्पृशामि यत्पद्मजशंकरादिभि-
     र्विमृग्यते रन्धितमानसैः सदा ॥ ४३ ॥
अहल्या म्हणाली. 'हे जगन्निवासा रामा, आज मी कृतार्थ झाले आहे ! तुमच्या ज्या पदरजांचे अनुसंधान ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव शुद्ध अंतःकरणाने नेहमी करीत असतात, त्या तुमच्या चरणकमलांच्या रजःकणांना मी स्पर्श करीत आहे. (४३)

अहो विचित्रं तव राम चेष्टितं
     मनुष्यभावेन विमोहितं जगत् ।
चलस्यजस्रं चरणादिवर्जितः
     सम्पूर्ण आनन्दमयोऽतिमायिकः ॥ ४४ ॥
अहो रामा, तुमच्या लीला अनाकलनीय आहेत. तुमच्या मनुष्यरूपामुळे सर्व जग मोहित होत आहे. तुम्ही संपूर्ण, पूर्ण आनंदमय आणि अतिशय मायावी आहात; कारण तुम्ही चरण इत्यादींनी रहित असूनसुद्धा निरंतर चालतच असता. ४४

यत्पादपङ्‌कजपरागपवित्रगात्रा
     भागीरथी भवविरिञ्चिमुखान्पुनाति ।
साक्षात्स एव मम दृग्विषयो यदास्ते
     किं वर्ण्यते मम पुराकृतभागधेयम् ॥ ४५ ॥
ज्यांच्या चरणकमळांच्या परागांनी शरीर पवित्र झालेली भागिरथी नदी शंकर, ब्रह्मदेव इत्यादि जगदीश्वरांनासुद्धा पवित्र करते, तेच तुम्ही आज माझ्यासमोर प्रत्यक्ष उभे आहात. तेव्हा मी माझ्या पुण्याईचे किती वर्णन करू ? (४५)

मर्त्यावतारे मनुजाकृतिं हरिं
     रामाभिधेयं रमणीयदेहिनम् ।
धनुर्धरं पद्मविशाललोचनं
     भजामि नित्यं न परान्भजिष्ये ॥ ४६ ॥
परम सुंदर अशा मानव देहात श्रीहरीने या मर्त्यलोकात अवतार घेतला आहे, त्या धनुर्धारी, कमलाप्रमाणे विशाल लोचन असणार्‍या भगवान रामांना मी नित्य भजते. अन्य दुसर्‍या कोणालाही मी भजू इच्छित नाही. (४६)

यत्पादपङ्‌कजरजः श्रुतिभिर्विमृग्यं
     यन्नाभिपङ्‌कजभवः कमलासनश्च ।
यन्नामसार-रसिको भगवान्पुरारि-
     स्तं रामचन्द्रमनिशं हृदि भावयामि ॥ ४७ ॥
ज्यांच्या चरणकमळांचे रजःकण श्रुतींकडून-सुद्धा शोधले जातात, ज्यांच्या नाभीतून उत्पन्न झालेल्या कमळात ब्रह्मदेव प्रकट झाले, तसेच ज्यांच्या नामामृताचे रसिक स्वतः भगवान शंकर आहेत, अशा त्या रामचंद्रांचे मी माझ्या हृदयात अहर्निश ध्यान करते. (४७)

यस्यावतारचरितानि विरिञ्चिलोके
     गायन्ति नारदमुखा भवपद्मजाद्याः ।
आनन्दजाश्रुपरिषिक्तकुचाग्रसीमा
     वागीश्वरी च तमहं शरणं प्रपद्ये ॥ ४८ ॥
ब्रह्मलोकामध्ये नारद इत्यादि देवर्षि गण, ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देवेश्वर तसेच आनंदाश्रूंनी जिचे वक्ष भिजले आहेत अशी सरस्वतीसुद्धा ज्यांच्या अवतार-चरित्रांचे निरंतर गायन करते, त्या प्रभूंना मी शरण आले आहे. (४८)

सोऽयं परात्मा पुरुषः पुराण
     एकः स्वयंज्योतिरनन्त आद्यः ।
मायातनुं लोकविमोहनीयां
     धत्ते परानुग्रह एष रामः ॥ ४९ ॥
ते हे पुराणपुरुष परमात्मा, श्रीराम हे एक, स्वयंप्रकाशी, अनंत आणि सर्वांचे आद्य कारण आहेत. असे असूनही जगाला मोहित करणारे मायामय मानवी रूप लोकांवर परम अनुग्रह करण्यासाठी त्यांनी धारण केले आहे. (४९)

अयं हि विश्वोद्‌भवसंयमाना-
     मेकः स्वमायागुणबिम्बितो यः ।
विरिञ्चिविष्ण्वीश्वरनामभेदान्
     धत्ते स्वतंत्रः परिपूर्ण आत्मा ॥ ५० ॥
जे एकटेच या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्यासाठी आपल्या मायेच्या तीन गुणांत प्रतिबिंबित होऊन ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव या नावांनी तीन रूपे धारण करतात, तो स्वतंत्र आणि परिपूर्ण असा आत्मा तुम्हीच आहात. (५०)

नमोऽस्तु ते राम तवाङ्‌घ्रिपङ्‌कजं
     श्रिया धृतं वक्षसि लालितं प्रियात् ।
आक्रान्तमेकेन जगत्त्रयं पुरा
     ध्येयं मुनीन्द्रैरभिमानवर्जितैः ॥ ५१ ॥
अहो रामा, तुमची चरणकमळे श्रीलक्ष्मी आपल्या व क्षःस्थळावर ठेवून प्रेमाने सेवा करते, ज्यांनी पूर्वी (बलिराजाच्या यज्ञामध्ये) एकाच पायाने संपूर्ण त्रैलोक्य व्याप्त केले होते, तसेच अभिमान-रहित अशा मुनिश्रेष्ठांकडून ज्या चरणांचे निरंतर ध्यान केले जाते, त्या तुमच्या चरणकमळांना मी नमस्कार करते. (५१)

जगतां आदिभूतस्त्वं जगत्त्वं जगदाश्रयः ।
सर्वभूतेष्वसंयुक्त एको भाति भवान्परः ॥ ५२ ॥
हे प्रभो, तुम्हीच सर्व जगतांचे आदिकारण आहात, तुम्हीच जगद्-रूप आहात, तुम्हीच जगाचे आश्रय आहात. तथापि सर्व चराचराहून तुम्ही अगदी वेगळे आहात आणि अद्वितीय परमात्यरूपाने प्रकाशमान आहात. (५२)

ओंकारवाच्यस्त्वं राम वाचामविषयः पुमान् ।
वाच्यवाचकभेदेन भवानेव जगन्मयः ॥ ५३ ॥
अहो रामा, तुम्ही ॐ कार शब्दाने वाच्य आहात. तसेच वाणीला अगोचर असे परम पुरुष तुम्हीच आहात. हे प्रभो, वाच्य आणि वाचक (=शब्द व अर्थ) या भेदाने तुम्हीच संपूर्ण जगत्-रूप आहात. (५३)

कार्यकारणकर्तृत्वफलसाधनभेदतः ।
एको विभासि राम त्वं मायया बहुरूपया ॥ ५४ ॥
अहो रामा, पुष्कळ रूपे असणार्‍या मायेच्या आश्रयाने तुम्ही एकटेच कार्य, कारण, कर्तृत्व, फळ आणि साधनांचे भेद यांचे द्वारा अनेक रूपांमध्ये भासमान होता. (५४)

त्वन्मायामोहितधियस्त्वां न जानन्ति तत्त्वतः ।
मानुषं त्वाभिमन्यन्ते मायिनं परमेश्वरम् ॥ ५५ ॥
तुमच्या मायेमुळे ज्यांची बुद्धी मोहित झाली आहे असे लोक तुम्हाला यथार्थपणे जाणत नाहीत. ते मूढ लोक मायापती परमेश्वर अशा तुम्हांला सामान्य माणूस असे समजतात. (५५)

आकाशवत्त्वं सर्वत्र बहिरन्तर्गतोऽमलः ।
असङ्‌गो ह्यचलो नित्यः शुद्धो बुद्धः सदव्ययः ॥ ५६ ॥
आकाशाप्रमाणे तुम्ही आंत बाहेर विराजमान आहात. तुम्ही निर्मळ, असंग, अचल, नित्य, शुद्ध, बुद्ध, सत्-स्वरूप आणि अव्यय आहात. (५६)

योषिन्मूढाहमज्ञा ते तत्त्वं जाने कथं विभो ।
तस्मात्ते शतशो राम नमस्कुर्यामनन्यधीः ॥ ५७ ॥
मीं एक मूढ अज्ञानी स्त्री आहे. अहो विभो, तुमचे सत्य स्वरूप मी कसे बरे जाणू शकेन ? म्हणून अहो रामा, मी अनन्य भावाने तुम्हांला शेकडो वेळा नमरकार करीत आहे. (५७)

देव मे यत्र कुत्रापि स्थिताया अपि सर्वदा ।
त्वत्पादकमले सक्ता भक्तिरेव सदास्तु मे ॥ ५८ ॥
अहो देवा, मी जिथे कुठेही असेन, तेथे सर्वत्र सदा तुमच्या पदकमलांचे ठिकाणी माझी अढळ भक्तीच असू दे. (५८)

नमस्ते पुरुषाध्यक्ष नमस्ते भक्तवत्सल ।
नमस्तेऽस्तु हृषीकेश नारायण नमोऽस्तुते ॥ ५९ ॥
अहो पुरुषोत्तमा, तुम्हांला नमस्कार असो. अहो भक्तवत्सला, तुम्हाला नमरकार असो. हे हृषीकेशा, तुम्हांला नमस्कार असो. हे नारायणा, तुम्हांला वारंवार माझा नमस्कार असो. (५९)

भवभयहरमेकं भानुकोटिप्रकाशं
     करधृतशरचापं कालमेघावभासम् ।
कनकरुचिरवस्त्रं रत्‍नवत्कुण्डलाढ्यं
     कमलविशदनेत्रं सानुजं राममीडे ॥ ६० ॥
जे एक मात्र संसाराचे भय दूर करणारे आहेत, जे कोट्यवधी सूर्यांप्रमाणे प्रकाशमान आहेत, ज्यांनी आपल्या करकमळांत धनुष्य आणि बाण धारण केले आहेत, ज्यांची कांती श्याम मेघाप्रमाणे आहे, ज्यांनी सोन्याप्रमाणे सुंदर असे पीत वस्त्रच परिधान केले आहे, जे रत्‍नाच्या कुंडलांनी सुशोभित आहेत आणि ज्यांचे नेत्र कमलाप्रमाणे विशाल व अतिसुंदर आहेत, अशा लक्ष्मणासह असणार्‍या श्रीरामांची मी स्तुती करीत आहे." (६०)

स्तुत्वैवं पुरुषं साक्षाद्‌राघवं पुरतः स्थितम् ।
परिक्रम्य प्रणम्याशु सानुज्ञाता ययौ पतिम् ॥ ६१ ॥
अशा प्रकारे पुढे असणार्‍या साक्षात परम पुरुष श्रीरघुनाथांची स्तुती करून, त्यांना प्रदक्षिणा घालून तिने नमरकार केला, आणि त्यांच्या अनुमतीने ती लगेच पतीकडे निघून गेली. (६१)

अहल्यया कृतं स्तोत्रं यः पठेद्‌भक्तिसंयुतः ।
स मुच्यतेऽखिलैः पापैः परं ब्रह्माधिगच्छति ॥ ६२ ॥
अहल्येने केलेले रामाचे हे स्तोत्र जो कोणी भक्तिपूर्वक पठन करील, तो सर्व पापांतून मुक्त होऊन परब्रह्म पदाला प्राप्त होईल. (६२)

पुत्राद्यर्थे पठेद्‌भक्त्या रामं हृदि निधाय च ।
संवत्सरेण लभते वन्ध्या अपि सुपुत्रकम् ॥ ६३ ॥
श्रीरामचंद्रांचे हृदयात ध्यान करून पुत्रादींच्या प्राप्तीसाठी जी वंध्या स्त्री या स्तोत्राचे भक्तीने पठन करील, तिला एका वर्षातच चांगला पुत्र प्राप्त होईल. (६३)

सर्वान्कामानवाप्नोति रामचन्द्रप्रसादतः ॥ ६४ ॥
आणि श्रीरामचंद्रांच्या प्रसादाने तिच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. (६४)

ब्रह्मघ्नो गुरुतल्पगोऽपि पुरुषः
     स्तेयी सुरापोऽपि वा
मातृभ्रातृविहिंसकोऽपि सततं
     भोगैकबद्धातुरः ।
नित्यं स्तोत्रमिदं जपन् रघुपतिं
     भक्त्या हृदिस्थं स्मरन्
ध्यायन्मुक्तिमुपैति किं पुनरसौ
     स्वाचारयुक्तो नरः ॥ ६५ ॥
ब्राह्मणाचा वध करणाला, गुरुपत्‍नीगमन करणारा चोरी करणारा, दारू पिणारा, आई-बाप- भाऊ यांची हिंसा करणारा तसेच निरंतर भोगांत रमणारा असा पुरुषसुद्धा जर आपल्या हृदयात विराजमान असणार्‍या रघुपतीचे भक्तीने नित्य स्ममण करीत आणि ध्यान करीत या स्तोत्राचे नित्य पठण करील, तर त्याला मुक्ती प्राप्त होईल. मग स्वधर्मपरायण अशा पुरुषाबद्दल काय सांगावे ? (६५)

इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे बालकाण्डे
अहल्योद्धरणं नाम पञ्चमः सर्गः ॥ ५ ॥
पंचमः सर्गः समाप्तः ॥ ५ ॥



GO TOP