[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ षष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
विलपता श्रीरामेण वृक्षान् पशूंश्च सीताविषयकवार्ताया जिज्ञासनं भ्रान्तस्य तस्य रोदनं भूयो भूयस्तेन सीताया अन्वेषणं च -
श्रीरामांचे विलाप करीत वृक्षांना आणि पशुंना सीतेचा पत्ता विचारणे, भ्रान्त होऊन रडणे आणि वारंवार तिचा शोध करणे -
भृशमाव्रजमानस्य तस्याधो वामलोचनम् ।
प्रास्फुरच्चास्खलद् रामो वेपथुश्चास्य जायते ॥ १ ॥
आश्रमाकडे जाते समयी श्रीरामांच्या डाव्या डोळ्याची खालची पापणी जोरजोराने लवू लागली. श्रीराम चालता चालता अडखळू लागले आणि त्यांचे शरीरात कंप उत्पन्न झाला. ॥१॥
उपालक्ष्य निमित्तानि सोऽशुभानि मुहुर्मुहुः ।
अपि क्षेमं नु सीताया इति वै व्याजहार च ॥ २ ॥
वारंवार हे अपशकुन पाहून ते म्हणू लागले - काय सीता सकुशल असेल ? ॥२॥
त्वरमाणो जगामाथ सीतादर्शनलालसः ।
शून्यमावसथं दृष्ट्‍वा बभूवोद्विग्नमानसः ॥ ३ ॥
सीतेला पाहण्यासाठी उत्कण्ठित होऊन ते अत्यंत उतावीळपणाने आश्रमाकडे गेले. तेथे पर्णकुटी सुनी पाहून त्यांचे मन अत्यंत उद्विग्न होऊन गेले. ॥३॥
उद्‌भ्रमन्निव वेगेन विक्षिपन् रघुनन्दनः ।
तत्र तत्रोटजस्थानमभिवीक्ष्य समन्ततः ॥ ४ ॥

ददर्श पर्णशालां च सीतया रहितां तदा ।
श्रिया विरहितां ध्वस्तां हेमन्ते पद्मिनीमीव ॥ ५ ॥
रघुनंदन अत्यंत वेगाने इकडे तिकडे चकरा मारू लागले आणि हात-पाय हलवू लागले. त्यांनी तेथे इथे तिथे निर्माण केलेल्या एकेका पर्णशाळेला चारी बाजूनी शोधून पाहिले परंतु त्यांना त्या समयी ती सीते विरहित सुनी दिसून आली. जसे हेमंत ऋतुमध्यें कमलिनी हिमामुळे उध्वस्त होऊन श्रीहीन होऊन जाते त्याप्रकारे प्रत्येक पर्णशाळा शोभाशून्य झाली होती. ॥४-५॥
रुदन्तमिव वृक्षैश्च ग्लानपुष्पमृगद्विजम् ।
श्रिया विहीनं विध्वस्तं संत्यक्तं वनदेवतैः ॥ ६ ॥
ते स्थान वृक्षांच्या (सळसळण्याणे) जणु काही रडत होते. फुले कोमजून गेली होती, मृग आणि पक्षी मन मारून बसून राहिलेले होते. तेथील संपूर्ण शोभा नष्ट होऊन गेली होती. सर्व कुटी उजाड दिसून येत होती. वनातील देवताही त्या स्थानास सोडून निघून गेल्या होत्या. ॥६॥
विप्रकीर्णाजिनकुशं विप्रविद्धबृसीकटम् ।
दृष्ट्‍वा शून्योटजस्थानं विललाप पुनः पुनः ॥ ७ ॥
सगळीकडे मृगचर्म आणि कुश विखरून गेले होते. चटया अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. पर्णशाळा शून्य असलेली पाहून भगवान्‌ श्रीराम वारंवार विलाप करू लागले- ॥७॥
हृता मृता वा नष्टा वा भक्षिता वा भविष्यति ।
निलीनाप्यथवा भीरुरथवा वनमाश्रिता ॥ ८ ॥
हाय ! सीतेचे कुणी हरण करून तर तिला नेले नाही ना ? तिचा मृत्यु तर झाला नाही ना ? अथवा ती हरवली तर नाही ना, कुणा राक्षसाने तिला खाऊन तर टाकली नाही ना ? अथवा फळे-फुले आणण्यासाठी ती वनात तर निघून गेली नाही ना ? ॥८॥
गता विचेतुं पुष्पाणि फलान्यपि च वा पुनः ।
अथवा पद्मिनीं याता जलार्थं वा नदीं गता ॥ ९ ॥
संभव आहे की फळे-फुले आणण्यासाठीच गेली असेल अथवा जल आणण्यासाठी कुठल्या पुष्करिणीच्या किंवा नदीच्या तटावर गेली असेल. ॥९॥
यत्‍नान्मृगयमाणस्तु नाससाद वने प्रियाम् ।
शोकरक्तेक्षणः श्रीमानुन्मत्त इव लक्ष्यते ॥ १० ॥
श्रीरामांनी प्रयत्‍नपूर्वक आपली प्रिय पत्‍नी सीता हिला वनात चोहोबाजूस शोधले, परंतु कोठेही तिचा पत्ता लागला नाही. शोकामुळे श्रीमान्‌ रामांचे डोळे लाल होऊन गेले. ते उत्मत्तासारखे दिसून येऊं लागले. ॥१०॥
वृक्षाद् वृक्षं प्रधावन् स गिरींश्चापि नदीनदम् ।
बभ्राम विलपन् रामः शोकपङ्‌कार्णवप्लुतः ॥ ११ ॥
एका वृक्षाकडून दुसर्‍या वृक्षाकडे धावत जाऊन ते पर्वत, नद्या आणि नद्यांच्या किनार्‍यावरून हिंडू लागले. शोकाच्या समुद्रात बुडलेले श्रीराम विलाप करीत करीत वृक्षांना विचारू लागले- ॥११॥
अस्ति कच्चित्त्वया दृष्टा सा कदम्बप्रिया प्रिया ।
कदम्ब यदि जानीषे शंस सीतां शुभाननाम् ॥ १२ ॥

स्निग्धपल्लवसंकाशां पीतकौशेयवासिनीम् ।
शंसस्व यदि सा दृष्टा बिल्व बिल्वोपमस्तनी ॥ १३ ॥
कदंबा ! माझी प्रिया सीता तुझ्या फुलांवर फार प्रेम करीत होती, काय ती येथे आहे ? काय तू तिला पाहिले आहेस ? जर जाणत असशील तर त्या शुभानना सीतेचा पत्ता सांग. तिचे अंग सुस्निग्ध पल्लवांप्रमाणे कोमल आहे. तसेच शरीरावर पिवळ्या रंगाची रेशमी साडी शोभून दिसत आहे. बिल्व ! माझ्या प्रियेचे स्तन तुझ्या सारखेच आहेत. जर तू तिला पाहिले असशील तर सांग. ॥१२-१३॥
अथवार्जुन शंस त्वं प्रियां तामर्जुनप्रियाम् ।
जनकस्य सुता तन्वी यदि जीवति वा न वा ॥ १४ ॥
अथवा अर्जुना ! तुझ्या फुलांवर माझ्या प्रियेचा विशेष अनुराग होता, म्हणून तूच तिचा समाचार सांग. कृशांगी जनककिशोरी जीवित आहे अथवा नाही ? ॥१४॥
ककुभः ककुभोरुं तां व्यक्तं जानाति मैथिलीम् ।
यथा पल्लवपुष्पाढयो भाति ह्येष वनस्पतिः ॥ १५ ॥

भ्रमरैरुपगीतश्च यथा द्रुमवरो ह्यसि ।
एष व्यक्तं विजानाति तिलकस्तिलकप्रियाम् ॥ १६ ॥
अहा ककुभ(*) आपल्याच समान ऊरू असणार्‍या मैथिलीला अवश्य जाणत असेल, कारण हा वनस्पति, लता, पल्लव तसेच फुलांनी संपन्न होऊन फारच शोभून दिसत आहे. ककुभ ! तू सर्व वृक्षात श्रेष्ठ आहेस कारण की भ्रमर तुझ्या जवळ येऊन आपल्या गुंजारवांच्या द्वारे तुझे यशोगान करीत असतात. (तूच सीतेचा पत्ता सांग. अहो ! हा ही काही उत्तर देत नाही) हा तिलक वृक्ष अवश्य सीते विषयी जाणत असेल कारण की माझी प्रिया सीता हिला तिलकाचेही प्रेम होते. ॥१५-१६॥
(* रामायणाच्या टीकाकारांपैकी काहींनी ककुभचा अर्थ मरूवक लिहिला आहे. आणखी कोणी अर्जुनविशेष लिहिला आहे परंतु कोषांमध्ये हा कुटजचा पर्याय सांगितला गेला आहे.)
अशोक शोकापनुद शोकोपहतचेतनम् ।
त्वन्नामानं कुरु क्षिप्रं प्रियासन्दर्शनेन माम् ॥ १७ ॥
अशोक ! तू शोक दूर करणारा आहेस. इकडे मी शोकाने आपली चेतना हरवून बसलो आहे. मला माझ्या प्रियतमेचे दर्शन करवून शीघ्रच आपल्या प्रमाणे (नाव असलेला) बनवून टाक- मला अशोक (शोकहीन) करून टाक. ॥१७॥
यदि ताल त्वया दृष्टा पक्वतालोपमस्तनी ।
कथयस्व वरारोहां कारुण्यं यदि ते मयि ॥ १८ ॥
ताल वृक्षा ! तुझ्या पिकलेल्या फळासमान स्तन असणार्‍या सीतेला जर तू पाहिले असशील तर सांग. जर तुला माझी दया येत असेल तर त्या सुंदरी विषयी अवश्य मला काही सांग. ॥१८॥
यदि दृष्टा त्वया जम्बो जाम्बूनदसमप्रभा ।
प्रियां यदि विजानासि निःशङ्‌कं कथयस्व मे ॥ १९ ॥
जांभळा ! जाम्बूनदा (सुवर्णा) प्रमाणे कांति असलेली माझी प्रिया जर तुझ्या दृष्टिस पडली असेल, जर तू तिच्या विषयी काही जाणत असशील तर निशंक होऊन मला सांग. ॥१९॥
अहो त्वं कर्णिकाराद्य पुष्पितः शोभसे भृशम् ।
कर्णिकारप्रियां साध्वीं शंस दृष्टा यदि प्रिया ॥ २० ॥
कण्हेर ! आज तर फुले लागण्यामुळे तुझी फार शोभा दिसत आहे. अहो ! माझी प्रिया साध्वी सीता हिला तुझीही फुले फार पसंत होती. जर तू तिला कोठे पाहिले असशील तर मला सांग. ॥२०॥
चूतनीपमहासालान् पनसान् कुरवान् धवान् ।
दाडिमानपि तान् गत्वा दृष्ट्‍वा रामो महायशाः ॥ २१ ॥

बकुलानथ पुन्नागांश्चन्दनान् केतकांस्तस्था ।
पृच्छन् रामो वने भ्रान्त उन्मत्त इव लक्ष्यते ॥ २२ ॥
या प्रकारे आंबा, कदंब, विशाल साल, फणस, कुरव, धव आणि डाळिंब आदि वृक्षांना ही पाहून महायशस्वी श्रीरामचंद्र त्यांच्या जवळ गेले आणि बकुळ, पुन्नाग, चंदन तसेच केतकी आदि वृक्षांनाही विचारित हिंडू लागले. त्यावेळी ते वनात वेड्‍याप्रमाणे इकडे-तिकडे भटकतांना दिसून येत होते. ॥२१-२२॥
अथवा मृगशावाक्षीं मृग जानासि मैथिलीम् ।
मृगविप्रेक्षणी कान्ता मृगीभिः सहिता भवेत् ॥ २३ ॥
आपल्या समोर हरिणाला पाहून ते म्हणाले- मृगा ! अथवा तू तरी सांग ! मृगनयनी मैथिलीला जाणतोस ना. माझ्या प्रियेची दृष्टी तुम्हा हरिणींच्या सारखीच आहे म्हणून संभव आहे की ती हरिणींच्या बरोबरच असेल. ॥२३॥
गज सा गजनासोरुर्यदि दृष्टा त्वया भवेत् ।
तां मन्ये विदितां तुभ्यं आख्याहि वरवारण ॥ २४ ॥
श्रेष्ठ गजराज ! तुमच्या सोंडेप्रमाणेच जिच्या मांड्‍या आहेत, त्या सीतेला संभवतः तुम्ही पाहिले असेल. असे कळून येत आहे की तुम्हांला तिचा पत्ता माहीत आहे. म्हणून सांगा बरे ती कोठे आहे ? ॥२४॥
शार्दूल यदि सा दृष्टा प्रिया चन्द्रनिभानना ।
मैथिली मम विस्रब्धः कथयस्व न ते भयम् ॥ २५ ॥
व्याघ्रा ! जर तू माझी प्रिया चंद्रमुखी मैथिलीला पाहिले असशील तर निशंक होऊन सांग, माझ्यापासून तुला काही भय होणार नाही. ॥२५॥
किं धावसि प्रिये नूनं दृष्टाऽसि कमलेक्षणे ।
वृक्षैराच्छाद्य चात्मानं किं मां न प्रतिभाषसे ॥ २६ ॥
(इतक्यात त्यांना भ्रम झाला की सीता तिकडे पळून जाऊन लपून राहिली आहे, तेव्हा ते म्हणाले-) प्रिये ! का पळून जात आहेस. कमललोचने ! निश्चितच मी तुला पाहिले आहे. तू वृक्षांच्या आड स्वतःच लपवून माझ्याशी का बरे बोलत नाहीस ? ॥२६॥
तिष्ठ तिष्ठ वरारोहे न तेऽस्ति करुणा मयि ।
नात्यर्थं हास्यशीलासि किमर्थं मामुपेक्षसे ॥ २७ ॥
वरारोहे ! थांब ! थांब ! तुला माझी दया येत नाही कां ? अधिक चेष्टा-मस्करी करण्याचा तुझा स्वभाव तर नव्हता मग कशासाठी माझी उपेक्षा करीत आहेस ? ॥२७॥
पीतकौशेयकेनासि सूचिता वरवर्णिनि ।
धावन्त्यपि मया दृष्टा तिष्ठ यद्यस्ति सौहृदम् ॥ २८ ॥
सुंदरी ! पिवळ्या रेशमी साडी वरूनच, तू कोठे आहेस याची सूचना मिळत असते. तू पळून जात असलीस तरीही मी तुला पाहिले आहे. जर माझ्या प्रति स्नेह तसेच सौहार्द असेल तर तू उभी राहा. ॥२८॥
नैव सा नूनमथवा हिंसिता चारुहासिनी ।
कृच्छ्रं प्राप्तं न मां नूनं यथोपेक्षितुमर्हति ॥ २९ ॥
(नंतर भ्रम दूर झाल्यावर ते म्हणाले-) अथवा निश्चितच ती नाही. त्या मनोहर हास्य करणार्‍या सीतेला राक्षसांनी मारून टाकले असावे. अन्यथा या प्रकारे संकटात पडलेल्याची (माझी) ती कधीही उपेक्षा करू शकली नसती. ॥२९॥
व्यक्तं सा भक्षिता बाला राक्षसैः पिशिताशनैः ।
विभज्याङ्‌गानि सर्वाणि मया विरहिता प्रिया ॥ ३० ॥
स्पष्ट कळून येत आहे की मांसभक्षी राक्षसांनी माझ्यापासून ताटातूट झालेल्या माझ्या भोळ्या-भाबड्‍या प्रिय मैथिलीला तिची सारी अंगे वाटून घेऊन खाऊन टाकले आहे. ॥३०॥
नूनं तच्छुभदन्तोष्ठं सुनासं शुभकुण्डलम् ।
पूर्णचन्द्रमिव ग्रस्तं मुखं निष्प्रभतां गतम् ॥ ३१ ॥
सुंदर दात, मनोहर ओठ, सुंदर सरळ नासिका यांनी युक्त तसेच रूचिर कुण्डलांनी अलंकृत ते पूर्ण चंद्रम्याप्रमाणे अभिराम मुख राक्षसांचा ग्रास बनून निश्चितच आपली प्रभा हरवून बसले असावे. ॥३१॥
सा हि चम्पकवर्णाभा ग्रीवा ग्रैवेयकोचिता ।
कोमला विलपन्त्यास्तु कान्ताया भक्षिता शुभा ॥ ३२ ॥
रडणार्‍या, विलाप करणार्‍या प्रियतमा सीतेची ती चंपकाप्रमाणे वर्ण असलेली कोमल आणि सुंदर ग्रीवा (मान) जी हार आणि सरी आदि आभूषणे धारण करण्यायोग्य होती, निशाचरांचा आहार बनली. ॥३२॥
नूनं विक्षिप्यमाणौ तौ बाहू पल्लवकोमलौ ।
भक्षितौ वेपमानाग्रौ सहस्ताभरणाङ्‌गदौ ॥ ३३ ॥
त्या नूतन पल्लवांसमान कोमल भुजा ज्या इकडे तिकडे आपटल्या गेल्या असतील आणि ज्यांचे अग्रभाग कांपत राहिले असतील, हातांतील आभूषणे तसेच बाजूबंदांसहित निश्चितच राक्षसांच्या पोटात गेल्या आहेत. ॥३३॥
मया विरहिता बाला रक्षसां भक्षणाय वै ।
सार्थेनेव परित्यक्ता भक्षिता बहुबान्धवा ॥ ३४ ॥
मी राक्षसांचे भक्ष्य बनण्यासाठीच त्या बालेला एकटी सोडून दिली. यद्यपि तिचे बंधु-बांधव अनेक आहेत. तथापि ती यात्रेकरूंच्या समुदायापासून अलग झालेल्या कुणा एकाकी स्त्रीप्रमाणे निशाचरांचा ग्रास बनली. ॥३४॥
हा लक्ष्मण महाबाहो पश्यसि त्वं प्रियां क्वचित् ।
हा प्रिये क्व गता भद्रे हा सीतेति पुनः पुनः ॥ ३५ ॥

इत्येवं विलुपन् रामः परिधावन् वनाद् वनम् ।
क्वचिदुद्‌भ्रमते वेगात् क्वचिद् विभ्रमते बलात् ॥ ३६ ॥
हा महाबाहु लक्ष्मणा ! काय तू कोठे माझ्या प्रियतमेला पहात आहेस का ! हा प्रिये ! हा भद्रे ! हा सीते ! तू कोठे निघून गेलीस ? या प्रकारे वारंवार विलाप करीत श्रीराम एका वनातून दुसर्‍या वनात धावू लागले. ते काही ठिकाणी सीतेची समानता पाहून उद्‍भ्रांत होत होते. (धाव घेत होते) आणि काही वेळा शोकाच्या प्रबलतेमुळे विभ्रान्त होऊन जात होते (कधी वेड्‍याप्रमाणे चकरा मारू लागत होते). ॥३५-३६॥
क्वचिन्मत्त इवाभाति कान्तान्वेषणतत्परः ।
स वनानि नदीः शैलान् गिरिप्रस्रवणानि च ।
काननानि च वेगेन भ्रमत्यपरिसंस्थितः ॥ ३७ ॥
आपल्या प्रियतमेचा शोध करीत कधी कधी ते वेड्‍यासारखी चेष्टा करू लागत होते. त्यांनी खूप धांवाधाव करून कोठेही विश्रांती न घेता वने, नद्या, पर्वत, पहाड, झरे, निर्झर आणि विभिन्न काननात फिरून फिरून अन्वेषण केले. ॥३७॥
तदा स गत्वा विपुलं महद् वनं
     परीत्य सर्वं त्वथ मैथिलीं प्रति ।
अनिष्ठिताशः स चकार मार्गणे
     पुनः प्रियायाः परमं परिश्रमम् ॥ ३८ ॥
त्या समयी मैथिलीला शोधण्यासाठी ते त्या विशाल तसेच विस्तृत वनात गेले आणि सर्व ठिकाणी चकरा मारून थकून गेले तरीही निराश झाले नाहीत. त्यांनी पुन्हा आपल्या प्रियतमेच्या अनुसंधानासाठी फारच मोठे परिश्रम केले. ॥३८॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे षष्टितमः सर्गः ॥ ६० ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा साठावा सर्ग पूरा झाला. ॥६०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP