श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ चतुःसप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

जाम्बवद् आदेशेन हनुमता हिमालयाद्दिव्यौषधीनां पर्वतस्यानयनं तासां गन्धेन श्रीरामलक्ष्मणयोः समेषां वानराणां च स्वास्थ्यलाभः -
जांबवानाच्या आदेशाने हनुमानांचे हिमालयातून दिव्य औषधींचा पर्वत आणणे आणि त्या औषधिंच्या गंधाने श्रीराम, लक्ष्मण तसेच समस्त वानरांचे पुन्हा स्वस्थ होणे -
तयोस्तदा सादितयो रणाग्रे
मुमोह सैन्यं हरियूथपानाम् ।
सुग्रीवनीलाङ्‌गदजाम्बवन्तो
न चापि किञ्चित् प्रतिपेदिरे ते ॥ १ ॥
युद्धाच्या तोंडावरच जेव्हा ते दोघे भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण निश्चेष्ट होऊन पडले, तेव्हा वानर-सेनापतिंची सेना किंकर्तव्य-विमूढ झाली. सुग्रीव, नील, अंगद आणि जांबवान्‌ यांनाही त्यासमयी कांही सुचत नव्हते. ॥१॥
ततो विषण्णं समवेक्ष्य सर्वं
विभीषणो बुद्धिमतां वरिष्ठः ।
उवाच शाखामृगराजवीरान्
आश्वासयन्नप्रतिमैर्वचोभिः ॥ २ ॥
त्यासमयी सर्वांना विषादात बुडालेले पाहून बुद्धिमंतांमध्ये श्रेष्ठ विभीषणांनी वानरराजाच्या वीर सैनिकांना आश्वासन देत अनुपम वाणीमध्ये म्हटले - ॥२॥
मा भैष्ट नास्त्यत्र विषादकालो
यदार्यपुत्रौ ह्यवशौ विषण्णौ ।
स्वयंभुवो वाक्यमथोद् वहन्तौ
यत् सादिताविन्द्रजितास्त्रजालैः ॥ ३ ॥
वानरवीरांनो ! आपण भयभीत होऊ नये. येथे विषादाला अवसर नाही, कारण या दोन्ही आर्यपुत्रांनी ब्रह्मदेवांच्या वचनांचा आदर आणि पालन करीत स्वयं ही हत्यार उचलले नव्हते, म्हणून इंद्रजिताने या दोघांना आपल्या अस्त्र समूहांनी आच्छादित केले होते. म्हणून हे दोघे भाऊ केवळ विषादग्रस्त, मूर्च्छित झाले आहेत. यांच्या प्राणांवर संकट आलेले नाही. ॥३॥
तस्मै तु दत्तं परमास्त्रमेतत्
स्वयंभुवा ब्राह्मममोघवीर्यम्म् ।
तन्मानयन्तौ युधि राजपुत्रौ
निपातितौ कोऽत्र विषादकालः ॥ ४ ॥
स्वयंभू ब्रह्मदेवांनी हे उत्तम अस्त्र इंद्रजिताला दिले होते. ब्रह्मास्त्र या नावाने हे प्रसिद्ध आहे आणि याचे बळ अमोघ आहे. संग्रामात त्याचा समादर - त्याच्या मर्यादेचे रक्षण करतच हे दोघे राजकुमार धराशायी झाले आहेत, म्हणून यात खेदाची कुठली गोष्ट आहे ? ॥४॥
ब्राह्ममस्त्रं ततो धीमान् मानयित्वा तु मारुतिः ।
विभीषणवचः श्रुत्वा हनुमानिदमब्रवीत् ॥ ५ ॥
विभीषणाचे बोलणे ऐकून बुद्धिमान्‌ पवनकुमार हनुमानांनी ब्रम्हास्त्राचा सन्मान करत त्यांना याप्रकारे म्हटले - ॥५॥
अस्मिन् अस्त्रहते सैन्ये वानराणां तरस्विनाम् ।
यो यो धारयते प्राणांन् तं तमाश्वासयावहै ॥ ६ ॥
राक्षसराज ! या अस्त्राने घायाळ झालेल्या वेगवान्‌ वानर-सैनिकांमध्ये जे जे प्राण धारण करत असतील, त्यांना त्यांना आपण जाऊन आश्वासन दिले पाहिजे. ॥६॥
तावुभौ युगपद् वीरौ हनुमद् राक्षसोत्तमौ ।
उल्काहस्तौ तदा रात्रौ रणशीर्षे विचेरतुः ॥ ७ ॥
त्यासमयी रात्र झालेली होती म्हणून हनुमान्‌ आणि राक्षसप्रवर विभीषण दोन्ही वीर आपल्या आपल्या हातात मशाल घेऊन एकत्रच रणभूमी मध्ये विचरण करू लागले. ॥७॥
भिन्नलाङ्‌गूलहस्तोरु पादाङ्‌गुलिशिरोधरैः ।
स्रवद्‌भिः क्षतजं गात्रैः प्रस्रवद्‌भिः समन्ततः ॥ ८ ॥

पतितैः पर्वताकारैः वानरैः अभिसंवृताम् ।
शस्त्रैश्च पतितैर्दीप्तैः ददृशाते वसुंधराम् ॥ ९ ॥
ज्यांचे पुच्छ, हात, पाय, जांघा, बोटे आणि ग्रीवा आदि अंगे कापली गेली होती आणि म्हणून जे आपल्या शरीरातून रक्त वहावत होते असे पर्वताकार वानरांच्या पडण्यामुळे तेथील सारी भूमी सर्व बाजूनी भरून गेली होती. तसेच तेथे पडलेल्या चमकदार अस्त्र-शस्त्रांनी ही आच्छादित झाली होती. हनुमान्‌ आणि विभीषणाने या अवस्थेमध्ये त्या युद्धभूमीचे निरीक्षण केले. ॥८-९॥
सुग्रीवं अङ्‌गदं नीलं शरभं गन्धमादनम् ।
गवाक्षं च सुषेणं च वेगदर्शिनमेव च ॥ १० ॥

मैन्दं नलं ज्योतिमुखं द्विविदं पनसं तथा ।
एतांश्चान्यांस्ततो वीरौ ददृशाते हतान् रणे ॥ ११ ॥
सुग्रीव, अंगद, नील, शरभ, गंधमादन, जांबवान्‌, सुषेण, वेगदर्शी, मैंद, नल, ज्योतिर्मुख तसेच द्विविद या सर्व वानरांना हनुमान्‌ आणि विभीषणांनी युद्धात घायाळ होऊन पडलेले पाहिले. ॥१०-११॥
सप्तषष्टिर्हताः कोट्यो वानराणां तरस्विनाम् ।
अह्नः पञ्चमशेषेणः वल्लभेन स्वयंभुवः ॥ १२ ॥
ब्रह्मदेवांच्या प्रिय अस्त्राने - ब्रह्मास्त्राने दिवसाचे चार भाग व्यतीत होता होता सदुसष्ट कोटी वानरांना आहत करून टाकले होते. जेव्हा केवळ पाचवा भाग - सायाह्नकाळ शेष राहिला होता तेव्हा ब्रह्मास्त्राचा प्रयोग बंद झाला होता. ॥१२॥
सागरौघनिभं भीमं दृष्ट्‍वा बाणार्दितं बलम् ।
मार्गते जाम्बवन्तं स हनुमान् सविभीषणः ॥ १३ ॥
समुद्रासमान विशाल आणि भयंकर वानर सेनेला बाणांनी पीडित पाहून विभीषण सहित हनुमान्‌ जांबवानास शोधू लागले. ॥१३॥
स्वभावजरया युक्तं वृद्धं शरशतैश्चितम् ।
प्रजापतिसुतं वीरं शाम्यन्तमिव पावकम् ॥ १४ ॥

दृष्ट्‍वा तं अभिसङ्‌क्रम्य पौलस्त्यो वाक्यमब्रवीत् ।
कच्चिदार्य शरैस्तीक्ष्णैः न प्राणा ध्वंसितास्तव ॥ १५ ॥
ब्रह्मदेवांचे पुत्र वीर जांबवान्‌ एक तर स्वाभाविक वृद्धावस्थेने युक्त होते, दुसरे त्यांच्या शरीरात शेकडो बाण घुसलेले होते. त्यांना पाहून विभीषण तात्काळच त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले - आर्य ! या तीक्ष्ण बाणांच्या प्रहाराने आपले प्राण निघून तर गेले नाहीत ना ? ॥१४-१५॥
विभीषणवचः श्रुत्वा जाम्बवान् ऋक्षपुङ्‌गवः ।
कृच्छ्रादभ्युद्‌गिरन् वाक्यं इदं वचनमब्रवीत् ॥ १६ ॥
विभीषणाचे हे बोलणे ऐकून जांबवान्‌ मोठ्‍या कष्टाने वाक्याचे उच्चारण करत या प्रकारे बोलले - ॥१६॥
नैर्ऋतेन्द्र महावीर्य स्वरेण त्वाऽभिलक्षये ।
विद्धगात्रः शितैर्बाणैः न त्वां पश्यामि चक्षुषा ॥ १७ ॥
महापराक्रमी राक्षसराज ! मी केवळ स्वरावरून तुम्हाला ओळखत आहे. माझी सर्व अंगे तीक्ष्ण बाणांनी विंधली गेली आहेत, म्हणून मी डोळे उघडून तुम्हाला पाहू शकत नाही. ॥१७॥
अञ्जना सुप्रजा येन मातरिश्वा च सुव्रत ।
हनुमान् वानरश्रेष्ठः प्राणान् धारयते क्वचित् ॥ १८ ॥
उत्तम व्रताचे पालक विभीषण ! हे तर सांगा, ज्यांना जन्म देऊन अंजनादेवी उत्तम पुत्राची जननी आणि वायुदेव श्रेष्ठ पुत्राचे जनक मानले जात आहेत, ते वानरश्रेष्ठ हनुमान्‌ जिंवत आहेत ना ? ॥१८॥
श्रुत्वा जाम्बवतो वाक्यं उवाचेदं विभीषणः ।
आर्यपुत्रावतिक्रम्य कस्मात् पृच्छसि मारुतिम् ॥ १९ ॥
जांबवानाचा हा प्रश्न ऐकून विभीषणाने विचारले - ऋक्षराज ! आपण दोन्ही महाराज कुमारांना सोडून केवळ पवनकुमार हनुमानांसंबंधी का विचारत आहात. ॥१९॥
नैव राजनि सुग्रीवे नाङ्‌गदे नापि राघवे ।
आर्य सन्दर्शितः स्नेहो यथा वायुसुते परः ॥ २० ॥
आर्य ! आपण राजा सुग्रीवावर, अंगदावर आणि भगवान्‌ राघवांवरही तसा स्नेह दाखविला नाहीत जसे पवनपुत्र हनुमानांच्या प्रति आपले प्रगाढ प्रेम लक्षित होत आहे. ॥२०॥
विभीषणवचः श्रुत्वा जाम्बवान् वाक्यमब्रवीत् ।
शृणु नैर्ऋतशार्दूल यस्मात् पृच्छामि मारुतिम् ॥ २१ ॥
विभीषणाचे हे बोलणे ऐकून जांबवानांनी म्हटले - राक्षसराज ! ऐका, मी पवनकुमार हनुमानासंबंधी का विचारत आहे - हे तुम्हांला सांगतो. ॥२१॥
अस्मिन् जीवति वीरे तु हतमप्यहतं बलम् ।
हनुमत्युज्झितप्राणे जीवन्तोऽपि मृता वयम् ॥ २२ ॥
जर वीरवर हनुमान जिवंत असतील तर ही मेलेली सेनाही जिवंतच आहे - असे समजले पाहिजे आणि जर त्यांचे प्राण निघून गेले असतील तर मग आम्ही लोक जिवंत असूनही मृतक तुल्यच आहोत. ॥२२॥
धरते मारुतिस्तात मारुतप्रतिमो यदि ।
वैश्वानरसमो वीर्ये जीविताशा ततो भवेत् ॥ २३ ॥
तात ! जर वायुसमान वेगवान्‌ आणि अग्नि समान पराक्रमी पवन कुमार हनुमान्‌ जीवित असतील तर आम्हा सर्वांच्या जीवित होण्याची आशा केली जाऊ शकते. ॥२३॥
ततो वृद्धमुपागम्य नियमेनाभ्यवादयत् ।
गृह्य जाम्बवतः पादौ हनुमान् मारुतात्मजः ॥ २४ ॥
वृद्ध जांबवानांनी इतके म्हणताच पवनपुत्र हनुमान त्यांच्या जवळ गेले त्यांनी त्यांचे दोन्ही पाय धरून विनीतभावाने त्यांना प्रणाम केला. ॥२४॥
श्रुत्वा हनुमतो वाक्यं तथापि व्यथितेन्द्रियः ।
पुनर्जातमिवात्मानं मन्यते स्मर्क्षपुङ्‌गवः ॥ २५ ॥
हनुमानांचे बोलणे ऐकून त्यासमयी ऋक्षराज जांबवानांनी, ज्यांची सारी इंद्रिये बाणांच्या प्रहारांनी पीडित झालेली होती, जणु आपला पुनर्जन्मच झाला आहे असे मानले. ॥२५॥
ततोऽब्रवीन्महातेजा हनुमन्तं स जाम्बवान् ।
आगच्छ हरिशार्दूल वानरांस्त्रातुमर्हसि ॥ २६ ॥
नंतर त्या महातेजस्वी जांबवानांनी हनुमानांना म्हटले - वानरसिंह ! या ! संपूर्ण वानरांचे रक्षण करा. ॥२६॥
नान्यो विक्रमपर्याप्तः त्वमेषां परमः सखा ।
त्वत्पराक्रमकालोऽयं नान्यं पश्यामि कञ्चन ॥ २७ ॥
तुमच्या शिवाय दुसरा कोणी पूर्ण पराक्रमाने युक्त नाही. तुम्हीच या सर्वांचे परम सहायक आहात. हा समय तुमच्याच पराक्रमाचा आहे. मी दुसर्‍या कुणाला या योग्य पहात नाही. ॥२७॥
ऋक्षवानरवीराणां अनीकानि प्रहर्षय ।
विशल्यौ कुरु चाप्येतौ सादितौ रामलक्ष्मणौ ॥ २८ ॥
तुम्ही अस्वले आणि वानरवीरांच्या सेनांना हर्ष प्रदान करा आणि बाणांनी पीडित झालेल्या या दोन्ही भावांच्या-रामलक्ष्मणांच्या शरीरातून बाण काढून यांना स्वस्थ करा. ॥२८॥
गत्वा परममध्वानं उपर्युपरि सागरम् ।
हिमवन्तं नगश्रेष्ठं हनुमन् गन्तुमर्हसि ॥ २९ ॥
हनुमान्‌ ! समुद्राच्या अत्यंत वरून उडून फार दूरचा रस्ता पार करून तुम्हाला पर्वाश्रेष्ठ हिमालयावर जावयास पाहिजे. ॥२९॥
ततः काञ्चनमत्युच्चं ऋषभं पर्वतोत्तमम् ।
कैलासशिखरं चापि द्रक्ष्यस्यरिनिषूदन ॥ ३० ॥
शत्रुसूदन ! तेथे पोहोचल्यावर तुम्हांला फारच उंच सुवर्णमय उत्तम पर्वत ऋषभाचे आणि कैलास शिखराचे दर्शन होईल. ॥३०॥
तयोः शिखरयोर्मध्ये प्रदीप्तमतुलप्रभम् ।
सर्वौषधियुतं वीर द्रक्ष्यसि ओषधिपर्वतम् ॥ ३१ ॥
वीरा ! त्या दोन्ही शिखरांच्या मध्ये एक औषधिंचा पर्वत दिसून येईल; जो अत्यंत दीप्तिमान्‌ आहे. त्यांत इतकी चमक आहे की तिची कशाशीही तुलना होऊ शकत नाही. तो पर्वत सर्व औषधींनी संपन्न आहे. ॥३१॥
तस्य वानरशार्दूल चतस्रो मूर्ध्नि संभवाः ।
द्रक्ष्यस्योषधयो दीप्ता दीपयन्तीः दिशो दश ॥ ३२ ॥
वानरसिंह ! त्याच्या शिखरावर उत्पन्न झालेल्या चार औषधी तुम्हांला दिसून येतील; ज्या आपल्या प्रभेने दाही दिशांना प्रकाशित करत राहातात. ॥३२॥
मृतसञ्जीवनीं चैव विशल्यकरणीमपि ।
सावर्ण्यकरणीं चैव सन्धानीं च महौशधीम् ॥ ३३ ॥
त्यांची नावे या प्रकारची आहेत - मृतसंजीवनी, विशल्यकरणी, सुवर्णकरणी आणि संधानी नामक महौषधि. ॥३३॥
ताः सर्वा हनुमन् गृह्य क्षिप्रं आगन्तुमर्हसि ।
आश्वासय हरीन् प्राणैः योज्य गन्धवहात्मज ॥ ३४ ॥
हनुमन्‌ ! पवनकुमार ! तुम्ही त्या सर्व औषधींना घेऊन शीघ्र परत या आणि वानरांना प्राणदान देऊन आश्वासन द्या. ॥३४॥
श्रुत्वा जाम्बवतो वाक्यं हनुमान् मारुतात्मजः ।
आपूर्यत बलोद्धर्षैः वायुवेगैरिवार्णवः ॥ ३५ ॥
जांबवानाचे हे वचन ऐकून वायुनंदन हनुमान, जसे महासागर वायुच्या वेगाने व्याप्त होऊन जातो तसे असीम बलाने भरून गेले. ॥३५॥
स पर्वततटाग्रस्थः पीडयन् पर्वतोत्तमम् ।
हनुमान् दृश्यते वीरो द्वितीय इव पर्वतः ॥ ३६ ॥
वीर हनुमान एका पर्वताच्या शिखरावर उभे राहिले आणि त्या उत्तम पर्वताला पायांनी दाबून द्वितीय पर्वतासमान दिसू लागले. ॥३६॥
हरिपादविनिर्भग्नो निषसाद स पर्वतः ।
न शशाक तदाऽऽत्मानं वोढुं भृशनिपीडितः ॥ ३७ ॥
हनुमानांच्या चरणांच्या भाराने पीडित होऊन तो पर्वत जमिनीत घुसला. अधिक दाब पडल्यामुळे तो आपल्या शरीरालाही धारण करू शकला नाही. ॥३७॥
तस्य पेतुर्नगा भूमौ हरिवेगाच्च जज्वलुः ।
शृङ्‌गाणि च व्यशीर्यन्त पीडितस्य हनूमता ॥ ३८ ॥
हनुमानाच्या भाराने पीडित झालेल्या त्या पर्वतावरील वृक्ष त्यांच्याच वेगाने तुटून पृथ्वीवर पडले आणि कित्येक तर जळू लागले. त्याच बरोबर त्या पहाडाची शिखरेही हलू लागली, कोसळू लागली. ॥३८॥
तस्मिन् संपीड्यमाने तु भग्नद्रुमशिलातले ।
न शेकुर्वानराः स्थातुं घूर्णमाने नगोत्तमे ॥ ३९ ॥
हनुमानांनी दाबल्यावर तो श्रेष्ठ पर्वत हलू लागला. त्या वरील वृक्ष आणि शिला तुटून फुटून खाली पडू लागल्या, म्हणून वानर तेथे राहू शकले नाहीत. ॥३९॥
सा घूर्णितमहाद्वारा प्रभग्नगृहगोपुरा ।
लङ्‌का त्रासाकुला रात्रौ प्रवृत्तेवाभवत् तदा ॥ ४० ॥
लंकेचे विशाल आणि उंच द्वार ही हलू लागले. घरे आणि दरवाजे पडले. संपूर्ण नगरी भयाने व्याकुळ होऊन त्या रात्री जणु नाचत असल्याप्रमाणे भासू लागली. ॥४०॥
पृथिवीधरसंकाशो निपीड्य पृथिवीधरम् ।
पृथिवीं क्षोभयामास सार्णवां मारुतत्मजः ॥ ४१ ॥
पर्वताकार पवनकुमार हनुमानांनी त्या पर्वताला दाबून पृथ्वी आणि समुद्रातही खळबळ माजविली. ॥४१॥
आरुरोह तदा तस्माद् हरिर्मलयपर्वतम् ।
मेरुमन्दरसंकाशं नानाप्रस्रवणाकुलम् ॥ ४२ ॥
त्यानंतर तेथून पुढे जाऊन ते मेरू आणि मंदराचलाप्रमाणे उंच मलयपर्वतावर चढले. तो पर्वत नाना प्रकारच्या निर्झरांनी व्याप्त होता. ॥४२॥
नानाद्रुमलताकीर्णं विकासिकमलोत्पलम् ।
सेवितं देवगन्धर्वैः षष्टियोजनमुच्छ्रितम् ॥ ४३ ॥
तेथे नाना प्रकारचे वृक्ष आणि लता पसरलेल्या होत्या. कमळे आणि कुमुदे फुललेली होती. देवता आणि गंधर्व त्या पर्वताचे सेवन करत होते तसेच तो साठ योजने उंच होता. ॥४३॥
विद्याधरैर्मुनिगणैः अप्सरोभिर्निषेवितम् ।
नानामृगगणाकीर्णं बहुकन्दरशोभितम् ॥ ४४ ॥
विद्याधर, ऋषि-मुनि तसेच अप्सराही तेथे निवास करीत होत्या. अनेक प्रकारचे मृगसमूह तेथे सर्वत्र पसरलेले होते तसेच बर्‍याचशा कंदराही त्या पर्वताची शोभा वाढवत होत्या. ॥४४॥
सर्वानाकुलयंस्तत्र यक्षगन्धर्वकिन्नरान् ।
हनुमान् मेघसंकाशो ववृधे मारुतात्मजः ॥ ४५ ॥
पवनकुमार हनुमान्‌ तेथे राहाणार्‍या यक्ष, गंधर्व आणि किन्नर आदि सर्वांना व्याकुळ करत मेघासमान वाढू लागले. ॥४५॥
पद्‌भ्यां तु शैलमापीड्य वडवामुखवन् मुखम् ।
विवृत्योग्रं ननादोच्चैः त्रासयन् रजनीचरा ॥ ४६ ॥
ते दोन्ही पायांनी त्या पर्वताला दाबून धरून आणि वडवानलाप्रमाणे आपले भयंकर मुख पसरून निशाचरांना भयभीत करत जोरजोराने गर्जना करू लागले. ॥४६॥
तस्य नानद्यमानस्य श्रुत्वा निनदमद्‌भुतम् ।
लङ्‌कास्था राक्षसव्याघ्रा न शेकुः स्पन्दितुं क्वचित्त् ॥ ४७ ॥
उच्च स्वरांनी वारंवार गर्जना करत हनुमानांचा तो महान्‌ सिंहनाद ऐकून लंकावासी श्रेष्ठ राक्षस भयामुळे किंचित्‍ही हालचाल करू शकले नाहीत. ॥४७॥
नमस्कृत्वा समुद्राय मारुतिर्भीमविक्रमः ।
राघवार्थे परं कर्म समीहत परन्तपः ॥ ४८ ॥
शत्रुंना संताप देणार्‍या भयानक पराक्रमी पवनकुमार हनुमानांनी समुद्रास नमस्कार करून राघवांसाठी महान पुरूषार्थ करण्याचा निश्चय केला. ॥४८॥
स पुच्छमुद्यम्य भुजङ्‌गकल्पं
विनम्य पृष्ठं श्रवणे निकुच्य ।
विवृत्य वक्त्रं वडवामुखाभं
आपुप्लुवे व्योम्नि स चण्डवेगः ॥ ४९ ॥
ते आपले सर्पाकार पुच्छ वर उचलून पाठ वाकवून, दोन्ही कान आखडून घेऊन आणि वडवामुख अग्निच्या समान आपले मुख पसरून प्रचण्ड वेगाने आकाशात उडाले. ॥४९॥
स वृक्षखण्डांस्तरसा जहार
शैलान् शिलाः प्राकृतवानरांश्च ।
बाहूरुवेगोद्धतसंप्रणुन्नाः
ते क्षीणवेगाः सलिले निपेतुः ॥ ५० ॥
हनुमानांनी आपल्या तीव्र वेगाने कित्येक वृक्ष, पर्वतशिखरे, शिला आणि तेथे राहणार्‍या साधारण वानरांनाही बरोबर उडवून नेले. त्यांच्या भुजा आणि जांघांच्या वेगाने दूर फेकले जाण्याने जेव्हा त्यांच्या वेग शांत झाला तेव्हा ते वृक्ष आदि समुद्राच्या जलात जाऊन पडले. ॥५०॥
सतौ प्रसार्योरगभोगकल्पौ
भूजौ भुजङ्‌गारिनिकाशवीर्यः ।
जगाम मेरुं नगराजमग्र्यं दिशः
प्रकर्षन्निव वायुसूनुः ॥ ५१ ॥
सर्पाच्या शरीराप्रमाणे दिसणार्‍या आपल्या दोन्ही भुजा पसरून गरूडासमान पराक्रमी पवनपुत्र हनुमान्‌ संपूर्ण दिशांना जणु खेचत श्रेष्ठ गिरिराज हिमालयाकडे निघाले. ॥५१॥
स सागरं घूर्णितवीचिमालं
तदम्भसा भ्रामितसर्वसत्त्वम् ।
समीक्षमाणः सहसा जगाम
चक्रं यथा विष्णुकराग्रमुक्तम् ॥ ५२ ॥
ज्याच्या तरंगमाला लहरत होत्या तसेच ज्याच्या जलाच्या द्वारे समस्त जल-जंतु इकडे तिकडे फिरविले जात होते त्या महासागराला पहात हनुमान्‌ भगवान्‌ विष्णुंच्या हातून सुटलेल्या चक्राप्रमाणे एकाएकी पुढे गेले. ॥५२॥
स पर्वतान् पक्षि गणान् सरांसि
नदीस्तटाकानि पुरोत्तमानि ।
स्फीतान् जनान्तानपि संप्रवीक्ष्य
जगाम वेगात् पितृतुल्यवेगः ॥ ५३ ॥
त्यांचा वेग आपला पिता वायु याच्या समान होता. ते अनेकानेक पर्वत, पक्षी, सरोवरे, नद्या, तलाव, नगरे तसेच समृद्धशाली जनपदांना पहात अत्यंत वेगाने पुढे जाऊ लागले. ॥५३॥
आदित्यपथमाश्रित्य जगाम स गतश्रमः ।
हनुमांस्त्वरितो वीरः पितुतुल्यपराक्रमः ॥ ५४ ॥
वीर हनुमान्‌ आपल्या पित्याच्या तुल्य पराक्रमी आणि तीव्रगामी होते. ते सूर्याच्या मार्गाचा आश्रय घेऊन जराही न थकता भागता शीघ्रतापूर्वक अग्रेसर होत होते. ॥५४॥
जवेन महता युक्तो मारुतिर्वातरंहसा ।
जगाम हरिशार्दूलो दिशः शब्देन पूरयन् ॥ ५५ ॥
वानरसिंह पवनकुमार हनुमान्‌ महान वेगाने युक्त होते. ते संपूर्ण दिशांना शब्दायमान करत वायुसमान वेगाने पुढे गेले. ॥५५॥
स्मरन् जाम्बवतो वाक्यं मारुतिर्भीमविक्रमः ।
ददर्श सहसा चापि हिमवन्तं महाकपिः ॥ ५६ ॥
महाकपि हनुमानाचे बल-विक्रम फारच भयंकर होते. त्यांनी जांबवानाच्या वचनांचे स्मरण करत एकाएकी पोहोचून हिमालय पर्वताचे दर्शन केले. ॥५६॥
नानाप्रस्रवणोपेतं बहुकन्दरनिर्झरम् ।
श्वेताभ्रचयसंकाशैः शिखरैश्चारुदर्शनैः ।
शोभितं विविधैर्वृक्षैः अगमत् पर्वतोत्तमम् ॥ ५७ ॥
तेथे अनेक प्रकारचे स्त्रोत वहात होते. बर्‍याचशा कंदरा (गुहा) आणि निर्झर त्याची शोभा वाढवीत होते. श्वेत ढगांच्या समूहाप्रमाणे मनोहर दिसणारी शिखरे आणि नाना प्रकारचे वृक्ष यांच्यामुळे त्या श्रेष्ठ पर्वताची अद्‍भुत शोभा होत होती. हनुमान्‌ त्या पर्वतावर पोहोचले. ॥५७॥
स तं समासाद्य महानगेन्द्रं
अतिप्रवृद्धोत्तमहेमशृङ्‌गम् ।
ददर्श पुण्यानि महाश्रमाणि
सुरर्षिसङ्‌घोत्तमसेवितानि ॥ ५८ ॥
त्या महापर्वतराजाचे सर्वात उंच शिखर सुवर्णमय दिसत होते. तेथे पोहोचून हनुमानांनी परम पवित्र मोठ मोठे आश्रम पाहिले, ज्यात देवर्षिंचा श्रेष्ठ समुदाय निवास करत होता. ॥५८॥
स ब्रह्मकोशं रजतालयं च
शक्रालयं रुद्रशरप्रमोक्षम् ।
हयाननं ब्रह्मशिरश्च दीप्तं
ददर्श वैवस्वतकिङ्‌करांश्च ॥ ५९ ॥
त्या पर्वतावर त्यांना हिरण्यगर्भ भगवान्‌ ब्रह्मदेवांचे स्थान, त्यांचेच दुसरे स्वरूप रजतनाभीचे स्थान, इंद्राचे भवन, जेथे उभे राहून रूद्रदेवांनी त्रिपुरासुरावर बाण सोडला होता ते स्थान, भगवान्‌ हयग्रीवांचे वासस्थान तसेच ब्रह्मास्त्र देवतेचे दीप्तिमान्‌ स्थान, ही सर्व दिव्य स्थाने दिसली. याच बरोबर यमराजांचे सेवकही दृष्टिगोचर झाले. ॥५९॥
वज्रालयं वैश्रवणालयं च
सूर्यप्रभं सूर्यनिबंधनं च ।
ब्रह्मासनं शङ्‌करकार्मुकं च
ददर्श नाभिं च वसुंधरायाः ॥ ६० ॥
याशिवाय अग्निचे, कुबेराचे आणि द्वादश सूर्यांच्या समावेशाचेही सूर्यतुल्य तेजस्वी स्थान त्यांना दृष्टिगोचर झाले. चतुर्मुख ब्रह्मा, शंकरांचे धनुष्य आणि वसुन्धरेच्या नाभिच्या स्थानांचेही त्यांनी दर्शन केले. ॥६०॥
कैलासमग्र्यं हिमवच्छिलां च
तं वै वृषं काञ्चनशैलमग्र्यम् ।
सन्दीप्तसर्वौषधिसंप्रदीप्तं
ददर्श सर्वौषधिपर्वतेन्द्रम् ॥ ६१ ॥
त्यानंतर श्रेष्ठ कैलास पर्वत, हिमालय-शिला, शिवाचे वाहन वृषभ तसेच सुवर्णमय श्रेष्ठ ऋषभ यांनाही त्यांनी पाहिले. यानंतर त्यांची दृष्टि संपूर्ण औषधिंच्या उत्तम पर्वतावर पडली, जो सर्व प्रकारच्या दीप्तीमती औषधींनी देदिप्यमान होत होता. ॥६१॥
स तं समीक्ष्यानलरश्मिदीप्तं
विसिस्मिष्मिये वासवदूतसूनुः ।
आवृत्य तं चौषधिपर्वतेन्द्रं
तत्रौषधीनां विचयं चकार ॥ ६२ ॥
अग्निराशी प्रमाणे प्रकाशित होणार्‍या त्या पर्वताला पाहून पवनकुमार हनुमानांना फार विस्मय वाटला. ते उडी मारून औषधींनी भरलेल्या त्या गिरिराजावर चढले आणि तेथे पूर्वोक्त चारी औषधींचा शोध करू लागले. ॥६२॥
स योजनसहस्राणि समतीत्य महाकपिः ।
दिव्यौषधिधरं शैलं व्यचरन्मारुतात्मजः ॥ ६३ ॥
महाकपि पवनपुत्र हनुमान्‌ हजारो योजने ओलांडून तेथे आले होते आणि दिव्य औषधींना धारण करणार्‍या त्या शैल-शिखरावर विचरण करत होते. ॥६३॥
महौषध्यस्ततः सर्वाः तस्मिन् पर्वतसत्तमे ।
विज्ञायार्थिनमायान्तं ततो जग्मुरदर्शनम् ॥ ६४ ॥
त्या उत्तम पर्वतावर राहाणार्‍या संपूर्ण महौषधी हे जाणून की कोणी आपल्याला घेऊन जाण्यासाठी येत आहे, तात्काळ अदृश्य होऊन गेल्या. ॥६४॥
स ता महात्मा हनुमानपश्यन्
चुकोप कोपाच्च भृशं ननाद ।
अमृष्यमाणोऽग्निसमानचक्षुः
महीधरेन्द्रं तमुवाच वाक्यम् ॥ ६५ ॥
त्या औषधी न दिसल्याने महात्मा हनुमान्‌ कुपित झाले आणि रोषामुळे जोरजोराने गर्जना करू लागले. औषधींचे लपणे त्यांच्यासाठी असह्य झाले. त्यांचे डोळे अग्निप्रमाणे लाल होऊन गेले आणि ते त्या पर्वतराजास या प्रमाणे बोलले - ॥६५॥
किमेतदेवं सुविनिश्चितं ते
यद् राघवे नासि कृतानुकम्पः ।
पश्याद्य मद्बाहुबलाभिभूतो
विकीर्णमात्मानमथो नगेन्द्र ॥ ६६ ॥
नगेन्द्र ! तू राघवांवरही कृपा करू शकला नाहीस, असा निश्चय तू कुठल्या बळावर केला आहेस ? आज माझ्या बाहुबलाने पराजित होऊन तू आपण आपल्यालाच सर्वत्र विखुरलेला पहा. ॥६६॥
स तस्य शृङ्‌गं सनगं सनागं
सकाञ्चनं धातुसहस्रजुष्टम् ।
विकीर्णकूटं ज्वलिताग्रसानुं
प्रगृह्य वेगात् सहसोन्ममाथ ॥ ६७ ॥
असे म्हणून त्यांनी वेगाने पकडून वृक्ष, हत्ती, सुवर्ण तसेच अन्य हजारो प्रकारच्या धातुंनी भरलेल्या त्या पर्वत शिखरास एकाएकी उखडून घेतले. वेगाने उपटला गेल्याने त्याची बरीचशी शिखरे विखरून पडली. त्या पर्वताचा वरचा भाग आपल्या प्रभेने जणु प्रज्वलित होत होता. ॥६७॥
स तं समुत्पाट्य खमुत्पपात
वित्रास्य लोकान् ससुरासुरेन्द्रान् ।
संस्तूयमानः खचरैरनेकैः
जगाम वैगाद् गरुडोग्रवेगः ॥ ६८ ॥
त्याला उपटून बरोबर घेऊन हनुमान्‌ देवेश्वर आणि असुरेश्वरांसहित संपूर्ण लोकांना भयभीत करत गरूडासमान भयंकर वेगाने आकाशात उडून चालले. त्यासमयी बरेचसे आकाशचारी प्राणी त्यांची स्तुती करत होते. ॥६८॥
स भास्कराध्वानमनुप्रपन्नः
तं भास्कराभं शिखरं प्रगृह्य ।
बभौ तदा भास्करसंनिकाशो
रवेः समीपे प्रतिभास्कराभः ॥ ६९ ॥
सूर्यासमान चमकणार्‍या त्या पर्वतशिखरास हातात घेऊन हनुमान्‌ सूर्याच्याच मार्गावर जाऊन पोहोचले होते. त्यासमयी सूर्यदेवाच्या समीप राहून त्यांच्या समान तेजस्वी शरीराचे ते पवनकुमार दुसर्‍या सूर्याप्रमाणे प्रतीत होत होते. ॥६९॥
स तेन शैलेन भृशं रराज
शैलोपमो गन्धवहात्मजस्तु ।
सहस्रधारेण सपावकेन
चक्रेण खे विष्णुरिवार्पितेन ॥ ७० ॥
वायुदेवतेचे पुत्र हनुमान्‌ पर्वतासमान भासत होते. त्या पर्वतशिखरासह त्यांची अशी विशेष शोभा होत होती, जशी सहस्रधारांनी सुशोभित आणि अग्निच्या ज्वालांनी युक्त चक्र धारण केल्याने भगवान्‌ विष्णुंची जशी होत होती. ॥७०॥
तं वानराः प्रेक्ष्य तदा विनेदुः
स तानपि प्रेक्ष्य मुदा ननाद ।
तेषां समुत्कृष्टरवं निशम्य
लङ्‌कालया भीमतरं विनेदुः ॥ ७१ ॥
त्यासमयी त्यांना परत आलेले पाहून सर्व वानर जोरजोराने गर्जना करू लागले. त्यांनीही त्या सर्वांना पाहून अत्यंत हर्षाने सिंहनाद केला. त्या सर्वांचा तो तुमुलनाद ऐकून लंकावासी निशाचर आणखीच भयानक चीत्कार करू लागले. ॥७१॥
ततो महात्मा निपपात तस्मिन्
शैलोत्तमे वानरसैन्यमध्ये ।
हर्युत्तमेभ्यः शिरसाभिवाद्य
विभीषणं तत्र च सस्वजे सः ॥ ७२ ॥
त्यानंतर हनुमान्‌ त्या उत्तम पर्वत त्रिकूटावर उडी मारून उतरले आणि वानर सेनेच्या मध्यभागी येऊन सर्वश्रेष्ठ वानरांना प्रणाम करून विभीषणालाही ते मिठी घालून भेटले. ॥७२॥
तावप्युभौ मानुषराजपुत्रौ
तं गन्धमाघ्राय महौषधीनाम् ।
बभूवतुस्तत्र तदा विशल्या
वुत्तस्थुरन्ये च हरिप्रवीराः ॥ ७३ ॥

सर्वे विशल्या विरुजः क्षणेन
हरिप्रवीरा निहताश्च ये स्युः ।
गन्धेन तासां प्रवरौषधीनां
सुप्ता निशान्तेष्विव संप्रबुद्धाः ॥ ७४ ॥
त्यानंतर ते दोन्ही मानव राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण त्या महौषधींचा सुगंध सेवून स्वस्थ झाले. त्यांच्या शरीरातून बाण काढण्यात आले आणि त्यांचे घावही भरून आले. याप्रकारे जे दुसरे प्रमुख वानर वीर तेथे हताहत झाले होते ते सर्वच्या सर्व त्या श्रेष्ठ औषधींच्या सुगंधाने रात्रीच्या अंती झोपून उठलेल्या प्राणांच्या प्रमाणे क्षणभरात निरोगी होऊन उठून उभे राहिले. त्यांच्या शरीरातील बाण निघाले आणि त्यांची सर्व पीडा नाहीशी झाली. ॥७३-७४॥
यदाप्रभृति लङ्‌कायां युध्यन्ते कपिराक्षसाः ।
तदाप्रभृति मानार्थमाज्ञया रावणस्य च ॥ ७५ ॥

ये हन्यन्ते रणे तत्र राक्षसाः कपिकुञ्जरैः ।
हता हतास्तु क्षिप्यन्ते सर्व एव तु सागरे ॥ ७६ ॥
लंकेमध्ये जेव्हा पासून वानरांची आणि राक्षसांची लढाई सुरू झाली, तेव्हापासून रणभूमीमध्ये जे जे राक्षस मारले जात होते, ते सर्व रावणाच्या आज्ञेनुसार प्रतिदिन मरता मरताच समुद्रात फेकून दिले जात होते. हे अशासाठी होत होते की वानरांना बरेचसे राक्षस मारले गेले आहेत हे माहीत होऊ नये. ॥७५-७६॥
ततो हरिर्गन्धवहात्मजस्तु
तमोषधीशैलमुदग्रवेगः ।
निनाय वेगाद्धिमवन्तमेव
पुनश्च रामेण समाजगाम ॥ ७७ ॥
त्यानंतर प्रचण्ड वेगवान्‌ पवनकुमार हनुमानांनी पुन्हा औषधींच्या त्या पर्वताला वेगपूर्वक हिमालयावरच पोहोचवून टाकले आणि नंतर परत येऊन ते श्रीरामचंद्रांना येऊन भेटले. ॥७७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे चतुस्सप्ततितमः सर्गः ॥ ७४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा चौर्‍याहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP