वाल्मीकिना सीतायाः शुद्धेः समर्थनम् -
|
महर्षि वाल्मीकि द्वारा सीतेच्या शुद्धतेचे समर्थन -
|
तस्यां रजन्यां व्युष्टायां यज्ञवाटगतो नृपः । ऋषीन् सर्वान् महातेजाः शब्दापयति राघवः ॥ १ ॥
|
रात्र सरली, सकाळ झाली आणि महातेजस्वी राजा राघव यज्ञशाळेत आले. त्यासमयी त्यांनी समस्त ऋषिंना बोलावून घेतले. ॥१॥
|
वसिष्ठो वामदेवश्च जाबालिरथ काश्यपः । विश्वामित्रो दीर्घतमा दुर्वासाश्च महातपाः ॥ २ ॥
पुलस्त्योऽपि तथा शक्तिः भार्गवश्चैव वामनः । मार्कण्डेयश्च दीर्घायुः मौद्गल्यश्च महायशाः ॥ ३ ॥
गर्गश्च च्यवनश्चैव शतानन्दश्च धर्मवित् । भरद्वाजश्च तेजस्वी ह्यग्निपुत्रश्च सुप्रभः ॥ ४ ॥
नारदः पर्वतश्चैव गौतमश्च महायशाः । कात्यायनः सुयज्ञश्च ह्यगस्त्यस्तपसां निधिः ॥ ५ ॥
एते चान्ये च बहवो मुनयः संशितव्रताः । कौतूहलसमाविष्टाः सर्व एव समागताः ॥ ६ ॥
|
वसिष्ठ, वामदेव, जाबालि, काश्यप, विश्वामित्र, दीर्घतमा, महातपस्वी दुर्वासा, पुलस्त्य, शक्ति, भार्गव, वामन, दीर्घजीवी मार्कण्डेय, महायशस्वी मौद्गल्य, गर्ग, च्यवन, धर्मज्ञ शतानंद, तेजस्वी भरद्वाज, अग्निपुत्र सुप्रभ, नारद, पर्वन, महायशस्वी गौतम, कात्यायन, सुयज्ञ आणि तपोनिधि अगस्त्य - हे तसेच दुसरे कठोर व्रताचे पालन करणारे सर्व बहुसंख्य महर्षि कौतुहलवश तेथे एकत्र झाले. ॥२-६॥
|
राक्षसाश्च महावीर्या वानराश्च महाबलाः । सर्व एव समाजग्मुः महात्मानः कुतूहलात् ॥ ७ ॥
|
महापराक्रमी राक्षस आणि महाबली वानर - हे सर्व महामना कौतुहलवश तेथे आले. ॥७॥
|
क्षत्रिया ये च शूद्राश्च वैश्याश्चैव सहस्रशः । नानादेशगताश्चैव ब्राह्मणाः संशितव्रताः ॥ ८ ॥
|
नाना देशांतून आलेले तीक्ष्ण व्रतधारी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हजारोंच्या संख्येने तेथे उपस्थित झाले. ॥८॥
|
ज्ञाननिष्ठाः कर्मनिष्ठाः योगनिष्ठास्तथापरे । सीताशपथवीक्षार्थं सर्व एव समागताः ॥ ९ ॥
|
सीतेचे शपथ ग्रहण पहाण्यासाठी ज्ञाननिष्ठ, कर्मनिष्ठ आणि योगनिष्ठ सर्व तर्हेचे लोक आले होते. ॥९॥
|
तदा समागतं सर्वं अश्मभूतमिवाचलम् । श्रुत्वा मुनिवरस्तूर्णं ससीतः समुपागमत् ॥ १० ॥
|
राजसभेत एकत्रित झालेले सर्व लोक दगडाप्रमाणे निश्चल होऊन बसले आहेत - हे ऐकून मुनिवर वाल्मीकी सीतेला बरोबर घेऊन तात्काळ तेथे आले. ॥१०॥
|
तं ऋषिं पृष्ठतः सीता अन्वगच्छद् अवाङ्मुखी । कृताञ्जलिर्बाष्पकला कृत्वा रामं मनोगतम् ॥ ११ ॥
|
महर्षिंच्या मागे सीता खाली मान घालून चालत येत होती. तिचे दोन्ही हात जोडलेले होते आणि डोळ्यातून अश्रु वहात होते. ती आपल्या हृदयमंदिरात बसलेल्या श्रीरामांचे चिंतन करीत राहिली होती. ॥११॥
|
दृष्ट्वा श्रुतिमिवायान्तीं ब्रह्माणं अनुगामिनीम् । वाल्मीकेः पृष्ठतः सीतां साधुवादो महानभूत् ॥ १२ ॥
|
वाल्मीकिंच्या मागोमाग येणारी सीता ब्रह्मदेवांचे अनुसरण करणार्या श्रुतिसमान भासत होती. तिला पाहून तेथे धन्य धन्यचा मोठा आवाज घुमत राहिला. ॥१२॥
|
ततो हलहलाशब्दः सर्वेषामेवमाबभौ । दुःखजन्मविशालेन शोकेनाकुलितात्मनाम् ॥ १३ ॥
|
त्या समयी समस्त दर्शकांचे हृदय दुःख देणार्या महान् शोकाने व्याकुळ झालेले होते. त्या सर्वांचा कोलाहल सर्वत्र व्याप्त झाला होता. ॥१३॥
|
साधु रामेति केचित् तु साधु सीतेति चापरे । उभावेव च तत्रान्ये प्रेक्षकाः सम्प्रचुक्रुशुः ॥ १४ ॥
|
कोणी म्हणत होते - श्रीराम ! तुम्ही धन्य आहात ! दुसरे म्हणत होते - देवी सीते ! तू धन्य आहेस. तसेच तेथे अन्य काही दर्शक ही असे होते जे सीता आणि राम दोघांनाही उच्चस्वरात साधुवाद देत होते. ॥१४॥
|
ततो मध्ये जनौघस्य प्रविश्य मुनिपुङ्गवः । सीतासहायो वाल्मीकिः इति होवाच राघवम् ॥ १५ ॥
|
तेव्हा त्या जनसमुदायात सीतेसहित प्रवेश करून मुनिवर वाल्मीकि राघवांना याप्रकारे बोलले - ॥१५॥
|
इयं दाशरथे सीता सुव्रता धर्मचारिणी । अपवादैः परित्यक्ता ममाश्रमसमीपतः ॥ १६ ॥
|
हे दाशरथे ! ही सीता उत्तम व्रताचे पालन करणारी आणि धर्मपरायण आहे. आपण लोकापवादाच्या भीतीने हिला माझ्या आश्रमाच्या समीप त्यागले होते. ॥१६॥
|
लोकापवादभीतस्य तव राम महाव्रत । प्रत्ययं दास्यते सीता तां अनुज्ञातुमर्हसि ॥ १७ ॥
|
महान् व्रतधारी श्रीरामा ! लोकापवादामुळे घाबरलेल्या आपल्याला सीता आपल्या शुद्धतेचा विश्वास देईल. त्यासाठी आपण तिला आज्ञा द्यावी. ॥१७॥
|
इमौ तु जानकीपुत्रौ उभौ च यमजातकौ । सुतौ तवैव दुर्धर्षौ सत्यमेतद् ब्रवीमि ते ॥ १८ ॥
|
हे दोन्ही कुमार कुश आणि लव जानकीच्या गर्भापासून जुळे उत्पन्न झाले आहेत. ते आपलेच पुत्र आहेत आणि आपल्या समानच दुर्धर्ष वीर आहेत. ही मी आपल्याला सत्य गोष्ट सांगत आहे. ॥१८॥
|
प्रचेतसोऽहं दशमः पुत्रो राघवनन्दन । न स्मरामि अनृतं वाक्यं इमौ तु तव पुत्रकौ ॥ १९ ॥
|
राघवनंदना ! मी प्रचेताचा (वरुणाचा) दहावा पुत्र आहे. माझ्या तोंडून कधी खोटी गोष्ट निघाली असेल, याची आठवण मला नाही आहे. मी सत्य सांगत आहे, हे दोघे आपलेच पुत्र आहेत. ॥१९॥
|
बहुवर्षसहस्राणि तपश्चर्या मया कृता । नोपाश्नीयां फलं तस्या दुष्टेयं यदि मैथिली ॥ २० ॥
|
मी कित्येक हजार वर्षे भारी तपस्या केली आहे. जर मैथिली सीतेमध्ये काही दोष असेल तर मला त्या तपस्येचे फळ न मिळो. ॥२०॥
|
मनसा कर्मणा वाचा भूतपूर्वं न किल्बिषम् । तस्याः फलमश्नामि अपापा मैथिली यदि ॥ २१ ॥
|
मी मन, वाणी आणि क्रिया द्वाराही पूर्वी कधी कोणतेही पाप केलेले नाही. जर मैथिली सीता निष्पाप असेल तरच मला आपल्या त्या पापशून्य पुण्यकर्माचे फळ प्राप्त होईल. ॥२१॥
|
अहं पञ्चसु भूतेषु मनःषष्ठेषु राघव । विचिन्त्य सीतां शुद्धेति जग्राह वननिर्झरे ॥ २२ ॥
|
राघवा ! मी आपल्या पाची इंद्रिये आणि मन-बुद्धिच्या द्वारा सीतेच्या शुद्धतेचा उत्तम प्रकारे विचार करूनच हिला आपल्या संरक्षणाखाली घेतले होते. ही मला एका निर्झराच्या जवळ मिळाली होती. ॥२२॥
|
इयं शुद्धसमाचारा अपापा पतिदेवता । लोकापवादभीतस्य प्रत्ययं तव दास्यति ॥ २३ ॥
|
हिचे आचरण सर्वथा शुद्ध आहे. पाप हिला स्पर्शही करू शकत नाही तसेच ही पतिलाच देवता मानते; म्हणून लोकापवादामुळे घाबरलेल्या आपल्याला आपल्या शुद्धतेचा विश्वास देईल. ॥२३॥
|
तस्मादियं नरवरात्मज शुद्धभावा दिव्येन दृष्टिविषयेण मया प्रविष्टा । लोकापवादकलुषी कृतचेतसा या त्यक्ता त्वया प्रियतमा विदिताऽपि शुद्धा ॥ २४ ॥
|
राजकुमार ! मी दिव्य दृष्टिने हे जाणले होते की सीतेचा भाव आणि विचार परम-पवित्र आहे, म्हणून ती माझ्या आश्रमात प्रवेश मिळवू शकली. आपल्याला ही प्राणांहूनही अधिक प्रिय आहे आणि आपण हेही जाणत आहात की सीता सर्वथा शुद्ध आहे तथापि लोकापवादामुळे कलुषित चित्त होऊन आपण हिचा त्याग केला आहे. ॥२४॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे षण्णवतितमः सर्गः ॥ ९६ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा शहाण्णवावा सर्ग पूरा झाला. ॥९६॥
|