[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ द्विपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
दूतवधानौचित्यं प्रतिपाद्य विभीषणेन तस्य कृते दण्डान्तरविधानाय रावणं प्रति प्रार्थनं; रावणेन तदनुरोधस्य स्वीकरणंच -
विभीषणाने दूताचा वध अनुचित असल्याचे सांगून त्याला दुसरा काही दण्ड द्यावा म्हणून सांगणे, रावणाने त्याची सूचना मान्य करणे -
स तस्य वचनं श्रुत्वा वानरस्य महात्मनः ।
आज्ञापयद् वधं तस्य रावणः क्रोधमूर्च्छितः ॥ १ ॥
वानरश्रेष्ठ महात्मा हनुमानाचे भाषण ऐकल्यावर क्रोधाने सन्तप्त झालेल्या रावणाने त्यांच्या वधाची आज्ञा दिली. ॥१॥
वधे तस्य समाज्ञप्ते रावणेन दुरात्मना ।
निवेदितवतो दौत्यं नानुमेने विभीषणः ॥ २ ॥
दुरात्मा रावणाने आपले दूतकर्म योग्य रीतीने केलेल्या हनुमन्ताच्या वधाची आज्ञा दिली तेव्हां विभीषणही तेथेच होता पण त्याने त्या आज्ञेचे अनुमोदन केले नाही. कारण हनुमन्ताने प्रथमच आपण सुग्रीवाचा आणि श्रीरामाचा दूत असल्याचे सांगितले होते. ॥२॥
तं रक्षोधिपतिं क्रुद्धं तच्च कार्यमुपस्थितम् ।
विदित्वा चिन्तयामास कार्यं कार्यविधौ स्थितः ॥ ३ ॥
एकीकडे राक्षसराज रावण क्रोधाने सन्तप्त झाला होता आणि दुसरीकडे ते दूतवधाचे कार्य उपस्थित झाले होते. हे सर्व जाणून यथोचित कार्य संपादन करण्यात गुन्तलेल्या विभीषणाने समयोचित कर्तव्याचा निश्चय केला. तेव्हा योग्य तेच कार्य करावयाचे असा निश्चय केलेला विभीषण त्या क्रोधवश रावणाकडे आणि सर्वांपुढे उपस्थित झालेल्या दूतवधाच्या कार्याकडे लक्ष देऊन, या प्रसंगी आपण काय करावे याचा विचार करु लागला. ॥३॥
निश्चितार्थस्ततः साम्ना पूज्यं शत्रुजिदग्रजम् ।
उवाच हितमत्यर्थं वाक्यं वाक्यविशारदः ॥ ४ ॥
मनाचा ठाम निश्चय झाल्यावर तो संभाषण कुशल शत्रूविजयी विभीषण आपल्या पूज्य श्रेष्ठ भ्रात्याशी अत्यन्त सौम्य रीतीने, अत्यन्त हितकारक असे भाषण करू लागला. ॥४॥
क्षमस्व रोषं त्यज राक्षसेन्द्र
प्रसीद मद्वाक्यमिदं शृणुष्व ।
वधं न कुर्वन्ति परावरज्ञा
दूतस्य सन्तो वसुधाधिपेन्द्राः ॥ ५ ॥
तो म्हणाला - हे राक्षसराजा ! क्षमा करावी. आपण क्रोध सोडून द्या आणि कृपा करून मी काय म्हणतो ते नीट ऐकून घ्या. उच्च-नीचाचे ज्ञान असणारे (सदसद्विचारी) श्रेष्ठ राजे लोक दूताचा वध करीत नाहीत. ॥५॥
राजधर्मविरुद्धं च लोकवृत्तेश्च गर्हितम् ।
तव चासदृशं वीर कपेरस्य प्रमापणम् ॥ ६ ॥
हे राजन ! हे वीरा ! या वानराचा वध करणे हे कृत्य धर्माच्या विरूद्ध असून लोकव्यवहाराच्या दृष्टीनेही निन्द्य मानलेले आहे आणि आपल्या सारख्या वीराला ते कदापि उचित नाही. ॥६॥
धर्मज्ञश्च कृतज्ञश्च राजधर्मविशारदः ।
परावरज्ञो भूतानां त्वमेव परमार्थवित् ॥ ७ ॥

गृह्यन्ते यदि रोषेण त्वादृशोऽपि विचक्षणाः ।
ततः शास्त्रविपश्चित्त्वं श्रम एव हि केवलम् ॥ ८ ॥
आपण धर्माचे ज्ञाते, उपकाराला मानणारे आणि राजधर्माचे विशेषज्ञ आहात, बर्‍या-वाईटाचे ज्ञान आपणाला असून परमार्थाचे ज्ञाते आहात. जर आपल्या सारखे विद्वानही क्रोधाला वश होऊन वागत असतील तर मग समस्त शास्त्रात पाण्डित्य प्राप्त करणे म्हणजे व्यर्थ खटपट आणि प्रयास करणे होय, असेच समजले पाहिजे. ॥७-८॥
तस्मात् प्रसीद शत्रुघ्न राक्षसेन्द्र दुरासद ।
युक्तायुक्तं विनिश्चित्य दूतदण्डे विधीयताम् ॥ ९ ॥
हे अजिंक्य ! हे शत्रुनाशका ! हे राक्षसराजा ! आपण प्रसन्न व्हा, कृपा करा आणि यावेळी योग्य कोणते आणि अयोग्य कोणते याचा निश्चय करून दूताला योग्य असा दंड याला करा. ॥९॥
विभीषणवचः श्रुत्वा रावणो राक्षसेश्वरः ।
रोषेण महताऽऽविष्टो वाक्यमुत्तरमब्रवीत् ॥ १० ॥
हे विभीषणाचे भाषण ऐकून तो राक्षसाधिपती रावण अतिशयच क्रुद्ध झाला आणि त्याला उत्तर देतांना म्हणाला- ॥१०॥
न पापानां वधे पापं विद्यते शत्रुसूदन ।
तस्मादेनं वधिष्यामि वानरं पापकारिणम् ॥ ११ ॥
हे शत्रूसूदना ! पाप्याचा वध करण्यात पातक नाही. म्हणूनच मी या पापी वानराचा वध करीत आहे. याने अशोक वाटिकेचा विध्वंस आणि राक्षसांचा वध करून पाप केले आहे. ॥११॥
अधर्ममूलं बहुरोषयुक्त-
मनार्यजुष्टं वचनं निशम्य ।
उवाच वाक्यं परमार्थतत्त्वं
विभीषणो बुद्धिमतां वरिष्ठः ॥ १२ ॥
रावणाचे वचन अनेक दोषांनी युक्त आणि पापाचे मूळ होते. ते श्रेष्ठ पुरुषांना शोभून दिसणारे नव्हते. ते ऐकून बुद्धिमन्तामध्ये श्रेष्ठ अशा विभीषणाने उत्तम कर्तव्याचे ज्ञान करून देणारे भाषण केले. ॥१२॥
प्रसीद लङ्‌‍केश्वर राक्षसेन्द्र
धर्मार्थयुक्तं वचनं शृणुष्व ।
दूता न वध्याः समयेषु राजन्
सर्वेषु सर्वत्र वदन्ति सन्तः ॥ १३ ॥
तो म्हणाला - हे लंकेश्वर ! प्रसन्न व्हा ! हे राक्षसराज ! धर्म आणि अर्थ यांच्या तत्त्वाला अनुसरून असणारे माझे भाषण आपण नीट ऐकून घ्या. हे राजन ! सत्पुरुषांचे असे सांगणे आहे की दूत आपले कर्तव्य करीत असतांना कोणत्याही वेळी त्याचा वध करता कामा नये. ॥१३॥
असंशयं शत्रुरयं प्रवृद्धः
कृतं ह्यनेनाप्रियमप्रमेयम् ।
न दूतवध्यां प्रवदन्ति सन्तो
दूतस्य दृष्टा बहवो हि दण्डाः ॥ १४ ॥
यात जराही संशय नाही की हा फार मोठा शत्रू आहे. कारण त्याने आपला जो अपराध केला आहे त्याला तुलना नाही. तथापि सत्पुरुष दूताचा वध करणे योग्य नाही असेच सांगतात. दूतासाठी दुसरे अनेक दण्ड सांगितलेले आहेत. ॥१४॥
वैरूप्यमङ्‌‍गेषु कशाभिघातो
मौण्ड्यं तथा लक्षणसंनिपातः ।
एतान् हि दूते प्रवदन्ति दण्डान्
वधस्तु दूतस्य न नः श्रुतोऽस्ति ॥ १५ ॥
एखादा अवयव भंग किंवा विकृत करणे, चाबकाचा मार देणे, मुंडण करणे अथवा एखाद्या चिन्हाने शरीरावर डाग देणे हे दण्ड दूतासाठी उचित आहेत, असे सांगितले गेले आहे. दूतासाठी वधाचा दण्ड तर आमच्या ऐकिवात नाही. ॥१५॥
कथं च धर्मार्थविनीतबुद्धिः
परावरप्रत्ययनिश्चितार्थः ।
भवद्विधः कोपवशे हि तिष्ठेत्
कोपं नियच्छन्ति हि सत्त्ववन्तः ॥ १६ ॥
धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचे संस्कार आपल्या बुद्धिला झालेले आहेत आणि उत्कृष्ट कोणते हे आपणास कळत असल्यामुळे कर्तव्य-अकर्तव्य जाणून योग्य तेच निश्चितपणे करणारा आपल्यासारखा पुरुष क्रोधाच्या आधीन कसा बरे होईल ? (कारण शक्तिशाली पुरुष क्रोध करीत नाहीत.) ॥१६॥
न धर्मवादे न च लोकवृत्ते
न शास्त्रबुद्धिग्रहणेषु चापि ।
विद्येत कश्चित्तव वीरतुल्य-
स्त्वं ह्युत्तमः सर्वसुरासुराणाम् ॥ १७ ॥
हे वीरा ! धर्माची व्याख्या करणे, लोकाचाराचे पालन करणे अथवा शास्त्रीय सिद्धान्त समजून घेणे यात आपल्यासारखा दुसरा कोणीही नाही आहे. आपण, संपूर्ण देवता आणि असुर यामध्ये श्रेष्ठ आहात. ॥१७॥
पराक्रमोसाहमनस्विनां च
सुरासुराणामपि दुर्जयेन ।
त्वयाप्रमेयेण सुरेन्द्रसंघा
जिताश्च युड्धेष्वसकृन्नरेन्द्रा ॥ १८ ॥
पराक्रम आणि उत्साहाने संपन्न जे मनस्वी देवता आणि असुर आहेत, त्यांना ही कोपल्यावर विजय मिळविणे अत्यन्त कठिण आहे. आपण अप्रमेय शक्तिशाली आहात. आपण अनेक युद्धात वारंवार देवेश्वरांना आणि नरेशांना पराजित केले आहे. ॥१८॥
इत्थंविधस्यामरदैत्यशत्रोः
श्रूरस्य वीरस्य तवाजितस्य
कुर्वन्ति वीरा मनसाप्यलीकं
प्राणैर्विमुक्ता न तु भोः पुरा ते ॥ १९ ॥
देवता आणी दैत्यांशी शत्रूत्व करणार्‍या आपल्या सारख्या अपराजित शूरवीराचा कधी शत्रूपक्षीय वीर मनानेही पराभव करू शकत नाहीत. ज्यांनी विरोध केला, ते तात्काळ प्राणास मुकले. ॥१९॥
न चाप्यस्य कपेर्घाते कञ्चित् पश्याम्यहं गुणम् ।
तेष्वयं पात्यतां दण्डो यैरयं प्रेषितः कपिः ॥ २० ॥
या वानराला मारण्यात मला काही लाभ दिसून येत नाही. ज्यांनी याला धाडले आहे, त्यांना हा प्राणदण्ड दिला जावा. ॥२०॥
साधुर्वा यदि वासाधुः परैरेष समर्पितः ।
ब्रुवन् परार्थं परवान् न दूतो वधमर्हति ॥ २१ ॥
हा चांगला असो अथवा वाईट असो, याला शत्रूनी धाडलेला आहे म्हणून त्यांच्या स्वार्थाचीच गोष्ट तो सांगत आहे. दूत सदा पराधीन असतो म्हणून तो वध करण्यास योग्य असत नाही. ॥२१॥
अपि चास्मिन् हते नान्यं राजन् पश्यामि खेचरम् ।
इह यः पुनरागच्छेत् परं पारं महोदधेः ॥ २२ ॥
हे राजन ! हा जर मारला गेला तर आकाशमार्गाने येथे येणारा दुसरा कोणी प्राणी मला दिसून येत नाही आहे, जो महासागर उल्लंघून या बाजूस येऊ शकेल. (या परिस्थितीमध्ये शत्रूच्या गति आणि विधिचा पत्ता आपल्याला लागू शकणार नाही) ॥२२॥
तस्मान्नास्य वधे यत्‍नः कार्यः परपुरञ्जय ।
भवान् सेन्द्रेषु देवेषु यत्‍नमास्थातुमर्हति ॥ २३ ॥
म्हणून शत्रूंच्या नगरीवर विजय मिळविणार्‍या महाराजा ! आपण या दूताच्या वधासाठी काही प्रयत्‍न करू नये. आपण तर इन्द्रासहित संपूर्ण देवांवर चढाई करण्यास समर्थ आहात. ॥२३॥
अस्मिन् विनष्टे नहि दूतमन्यं
पश्यामि यस्तौ नरराजपुत्रौ ।
युद्धाय युद्धप्रिय दुर्विनीता-
वुद्योजयेद् वै भवता विरुद्धौ ॥ २४ ॥
युद्धप्रेमी महाराज ! ह्याचा वध झाला तर आपल्याला विरोध करणार्‍या त्या दोन्ही स्वतन्त्र प्रकृतीच्या राजकुमारांना युद्धासाठी तयार करू शकेल असा दुसरा कोणी दूत आढळून येत नाही. ॥२४॥
पराक्रमोत्साहमनस्विनां च
सुरासुराणामपि दुर्जयेन ।
त्वया मनोनन्दन नैर्ऋतानां
युद्धाय निर्नाशयितुं न युक्तम् ॥ २५ ॥
राक्षसांच्या हृदयाला आनन्दीत करणार्‍या वीरा ! आपण देवता आणि दैत्यासाठीही दुर्जय आहात म्हणून उत्साह आणि पराक्रम ज्यांच्या हृदयान्त भरलेला आहे अशा या राक्षसांच्या मनान्त युद्ध करण्याविषयी जी उत्कंठा वाढलेली आहे तिचा भंग करणे हे आपल्याला कदापिही योग्य नाही. ॥२५॥
हिताश्च शूराश्च समाहिताश्च
कुलेषु जाताश्च महागुणेषु ।
मनस्विनः शस्त्रभृतां वरिष्ठाः
कोपप्रशस्ताः सुभृताश्च योधाः ॥ २६ ॥

तदेकदेशेन बलस्य तावत्
केचित् तवादेशकृतोऽद्य यान्तु ।
तौ राजपुत्रावुपगृह्य मूढौ
परेषु ते भावयितुं प्रभावम् ॥ २७ ॥
माझे तर असे मत आहे की आज आपणाजवळ असलेले योद्धे, मोठ्‍या गुणवान कुळात उत्पन्न झालेले आहेत, ते आपले हित करणारे आहेत, शूर आहेत. कर्तव्याविषयी दक्ष आहेत, विचारी आहेत. आपण त्यांचे उत्तम तर्‍हेने पोषण केलेले आहे आणि अपमान सहन न करण्याविषयी त्यांची प्रसिद्धी आहे; म्हणून थोडेसे सैन्य बरोबर घेऊन आपल्या आज्ञेप्रमाणे वागणारे काही थोडे योद्धे शत्रूंच्या प्रदेशात आपला प्रभाव दाखविण्याकरिता आज जाऊ देत आणि त्या मूढ राजपुत्रांना कैद करून येथे घेऊन येऊ देत. ॥२६-२७॥
निशाचराणामधिपोऽनुजस्य
विभीषणस्योत्तमवाक्यमिष्टम् ।
जग्राह बुद्ध्या सुरलोकशत्रु-
र्महाबलो राक्षसराजमुख्यः ॥ २८ ॥
आपला धाकटा बन्धु विभीषण याचे हे उत्तम आणि प्रिय भाषण ऐकून निशाचरांचा स्वामी आणि देवलोकाचा शत्रू महाबलाढ्‍य राक्षसराज रावणाने बुद्धिने नीट विचार करून ते मनापासून आवडल्याने त्याप्रमाणे वागण्याचे ठरविले. ॥२८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे द्विपञ्चाशः सर्गः ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा बावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५२॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP