॥ श्रीरामविजय ॥
॥ अध्याय एकतिसावा ॥
श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जो रणरंगधीर रघुवीर ॥ रविकुळमंडण राजीवनेत्र ॥ रजनीचरांतक ॥ रमणीयगात्र ॥ राजेश्वर रमापति ॥१॥ आत्माराम अयोध्यानाथ ॥ आनंदरूप अक्षय अव्यक्त ॥ परात्पर अमल नित्य ॥ आद्य अनंत अनादि जो ॥२॥ जो कर्ममोचक कैवल्यदानी ॥ करुणासमुद्र कार्मुकपाणी ॥ बंधच्छेदक कल्मष जाळूनी ॥ करी कल्याण भक्तांचें ॥३॥ परमानंदा पुराणपुरुषा ॥ पद्मजातजनका पयोनिधिवासा ॥ पंकजनेत्रा परमहंसा ॥ पशुपतिहृदयजीवना ॥४॥ मनमोहना मंगलधामा मंगलधामा ॥ मुनिजनहृदया मेघश्यामा ॥ मायातीता मनविश्रामा ॥ मानववेषधारका ॥५॥ दीनदयाळा दशरथनंदना ॥ दशमुखांतका दुष्ट दलना ॥ दानवरिपुदरिद्रच्छेदना ॥ दशावतारवेषधारका ॥६॥ तिसावे अध्यायीं अनुसंधान ॥ सुलोचना प्रवेशली अग्न ॥ यावरी विंशतिनयन ॥ चिंताक्रांत शोक करी ॥७॥ बंधु पुत्र पडिले रणीं ॥ आतां पाठिराखा न दिसे कोणी ॥ तों विद्युज्जिव्ह ते क्षणीं ॥ प्रधान बोलता जाहला ॥८॥ म्हणे अहिरावण महिरावण ॥ पाताळीं राहती दोघेजण ॥ ते कापट्यविद्येंकरून ॥ राम सौमित्रां नेतील ॥९॥ कालिकापुढें तत्काळीं ॥ समर्पितील दोघांचे बळी ॥ ऐसें ऐकतां दशमौळी ॥ परम संतोष पावला ॥१०॥ रावणें पत्र पाठविलें लिहून ॥ तत्काळ प्रकटले दोघेजण ॥ कीं ते कामक्रोधचि येऊन ॥ अहंकारासी भेटले ॥११॥ त्या दोघांसी अलिंगून ॥ मयजापति करी रुदन ॥ इंद्रजिताचें वर्तमान ॥ दोघांप्रति निवेदिलें ॥१२॥ यावरी ते दोघे बोलत ॥ आतां गत शोक ते बहु असोत ॥ सौमित्र आणि रघुनाथ ॥ रजनीमाजी नेऊं तयां ॥१३॥ मग वरकड सेनेचा संहार ॥ करावया तुम्हां काय उशीर ॥ ऐकतां दशकद्वयनेत्र ॥ परम संतोष पावला ॥१४॥ तों बिभीषणाचे दोघे प्रधान ॥ गुप्तरूपें गोष्टी ऐकून ॥ तिहीं पवनवेगें जाऊन ॥ कथिलें रावणानुजासी ॥१५॥ तेणें नळ नीळ जांबुवंत ॥ मारुतीयांसी केलें श्रुत ॥ हनुमंतें पुच्छदुर्ग अद्भुत ॥ सेनेभोंवतां रचियेला ॥१६॥ वेढियावरी वेढे घालूनी ॥ वज्रदुर्ग उंचविला गगनीं ॥ वरी ठायीं ठायीं द्रुमपाणी ॥ गात बैसले सावध ॥१७॥ निशा गहन ते काळीं ॥ कीं काळपुरुषाची कांबळी ॥ कीं जगावरी खोळ घातली ॥ अज्ञानाची अविद्येनें ॥१८॥ निशीमाजी पक्षी बहुत ॥ वृक्षीं नानाशब्द करित ॥ रिसें वडवाघुळें तेथ ॥ लोळकंबती शाखेवरी ॥१९॥ भूतें आणि यक्षिणी ॥ गोंधळ घालिती महावनीं ॥ महाज्वाळरूप दावूनी ॥ गुप्त होती अप्सरा ॥२२॥ स्मशानीं मातले प्रेतगण ॥ भयानक रूपें दारुण ॥ छळिती अपवित्रालागोन ॥ पवित्र देखोनि पळती ते ॥२१॥ पिंगळे थोर किलबिलती ॥ भालवा दिवाभीतें बोभाती ॥ चक्रवाकांचे शब्द उमटती ॥ टिटवे बोलती ते वनीं ॥२२॥ कुमुदीं मिलिंद मिळती सवेग ॥ मस्तकमणी निघती उरग ॥ निधानें प्रकटली सांग ॥ येऊं म्हणती सभाग्या ॥२३॥ असो ऐसी निशा दाटली थोर ॥ तों पातले दोघे असुर ॥ दुर्गावरी गर्जती वानर ॥ मार्ग अणुमात्र दिसेना ॥२४॥ असुरकरीं तीक्ष्ण शूळ ॥ फोडू पाहती दुर्ग सबळ ॥ तों शूळ मोडले तत्काळ ॥ कोट अचळ वज्राहूनी ॥२५॥ मग ते ऊर्ध्वपंथे उडोनी ॥ दुर्गमर्यादा ओलांडूनी ॥ जेथें निजले लक्ष्मण कोदंडपाणी ॥ उतरले तेथें अकस्मात ॥२६॥ तों कनकहरिणचर्मावरी ॥ निद्रिस्थ दोघे लीलावतारी ॥ कीं शिव आणि विष्णु शेजारीं ॥ अवनीवरी निजेले ॥२७॥ आधींच निद्रासुख घन ॥ वरी राक्षसें घातलें मौन ॥ शय्येसहित उचलोन ॥ मस्तकीं घेऊन चालिले ॥२८॥ तेथेंच कोरिलें विवर ॥ लांब योजनें सप्त सहस्र ॥ सप्त घटिकेत यामिनीचर ॥ घेऊन गेले दोघांसी ॥२९॥ पुढें तेरा सहस्र योजन ॥ दधिसमुद्र ओलांडून ॥ तेथें महिकावती नगर पूर्ण ॥ लंकेहूनि विशेष ॥३०॥ काम क्रोध दोघेजण ॥ आत्मयासी घालिती आवरण ॥ तैसे निशाचरीं रामलक्ष्मण ॥ सदनीं दृढ रक्षिले ॥३१॥ नगरमध्यभागीं देऊळ ॥ एकवीस योजनें उंच सबळ ॥ तें भद्रकालीचें मुख्य स्थळ ॥ महाविशाळ भयानक ॥३२॥ असो दधिसमुद्रतीरीं जाण ॥ वीस कोटि पिशिताशन ॥ मकरध्वज बलाढ्य पूर्ण ॥ दृढ रक्षणा ठेविला ॥३३॥ महिकावतींत रामलक्ष्मण ॥ निद्रिस्थ आणि वरी मोहन ॥ त्यावरी नागपाशीं बांधोन ॥ बैसती रक्षण अहिमही ॥३४॥ असो हकडे सुवेळेसी जाण ॥ काय जाहलें वर्तमान ॥ निशी संपतां चंडकिरण ॥ उदयाचळा पातला ॥३५॥ घ्यावया रघुनाथदर्शन ॥ समस्त पावले वानरगण ॥ तों शय्येसहित पूर्ण ॥ दोन्ही निधानें न दिसती ॥३६॥ तंव देखिलें भयानक विवर ॥ घाबरे पाहती वानर ॥ सुग्रीवादिक कपी समग्र ॥ गजबजिले देखोनियां ॥३७॥ मग पाहती वानर ॥ तों द्वादश गांवें पाय थोर ॥ असुरांचे उमटले भयंकर ॥ रघुवीर भक्त पाहती ॥३८॥ या चराचराचें जीवन ॥ जें कमलोद्भवाचें देवतार्चन ॥च ोरीं चोरिलें म्हणोन ॥ हृदय पिटी सुग्रीव ॥३९॥ सकळ वानर तैं आक्रंदती ॥ धरणीवरी अंगें घालिती ॥ एक नाम घेऊनि हाका फोडिती ॥ धांव रघुपते म्हणोनियां ॥४०॥ जगद्वंद्या राजीवनेत्रा ॥ कां उबगलासी आम्हां वानरां ॥ तूं परात्पर आदिसोयरा ॥ कोठें गेलासी उपेक्षोनि ॥४१॥ तों बिभीषण आला धांवोन ॥ म्हणे स्थिर असा अवघे जण ॥ ही गोष्ट जातां बाहेर पूर्ण ॥ येईल रावण युद्धासी ॥४२॥ रामाविण सेना समग्र ॥ जैसें प्राणाविण शरीर ॥ तरी फुटों न द्यावा समाचार पुढें विचार करा आतां ॥४३॥ पिंडब्रह्मांड तत्त्वांसहित ॥ शोधी जैसा सद्रुरुनाथ ॥ मग वस्तु निवडी शाश्वत ॥ सीताकांत शोधा तैसा ॥४४॥ कीं धुळींत हारपलें मुक्त ॥ झारी निवडी सावचित्त ॥ कीं वेदांतींचा अर्थ पंडित ॥ उकलोनियां काढी जेवीं ॥४५॥ कीं समुद्रीं पडले वेद ॥ ते मत्स्यरूपें शोधी मुकुंद ॥ तैसा सीताहृदयाब्जमिलिंद ॥ शोधोनियां काढावा ॥४६॥ तुम्हीं रघुपतीचे प्राणमित्र ॥ भगीरथप्रयत्न करूनि थोर ॥ तुमचा प्रतापरोहिणीवर ॥ निष्कलंक उदय पावूं द्या ॥४७॥ तुमचे भाग्यासी नाहीं पार ॥ सुखरूप आहे वायुकुमर ॥ तो क्षणमात्रें रघुवीर ॥ काढील आतां शोधूनियां ॥४८॥ मग मारुतीपुढें वानर ॥ घालिती कित्येक नमस्कार ॥ म्हणती तुजविण रघुवीर ॥ ठायीं न पडे सर्वथा ॥४९॥ रामप्राप्तीसी कारण ॥ तूं सद्रुरु आम्हांसी पूर्ण ॥ कामक्रोध अहिमही निवटून ॥ आत्माराम दाखवीं ॥५०॥ पुर्वीं सीताशुद्धि केली पाहीं ॥ आतां रामासी पाडीं ठायीं ॥ ऐसें ऐकतां ते समयीं ॥ राघवप्रिय बोलत ॥५१॥ म्हणे न लागतां एक क्षण ॥ विरिंचिगोळ हा शोधीन ॥ बंधुसहित सीतारमण ॥ सुवेळेसी आणितों ॥५२॥ मग म्हणे सुग्रीवा बिभीषणा ॥ तुम्ही रक्षावी कपिसेना ॥ विजयश्रियेसी अयोध्याराणा ॥ असुर निवटूनि आणितों ॥५३॥ नळ नीळ अंगद जांबुवंत ॥ घेऊनि प्रवेशे विवरांत ॥ सात सहस्र योजनें तेथ ॥ अंधकार घोर पैं ॥५४॥ चौघे कासाविस होऊन ॥ मार्गीं पडिले मूर्च्छा येऊन ॥ मग ते मारुतीनें बांधोन ॥ आणिले उचलोनि बाहेरी ॥५५॥ लागतांचि शीतळ पवन ॥ सावध झाले चौघेजण ॥ प्रकाश देखोनियां नयन ॥ उघडिते जाहले ते काळीं ॥५६॥ तंव वीस कोटी राक्षस घेऊन ॥ मकरध्वज बैसला रक्षण ॥ मग पांचही वेष पालटून ॥ कावडी होऊनि चालिले ॥५७॥ तंव दटाविती असुर तयांतें ॥ कोठें रे जातां येणेंपंथें ॥ येरू म्हणती जातों तीर्थातें ॥ महिकावती पाहावया ॥५८॥ अंतरिक्ष करोनि उड्डाण ॥ घेऊं कालिकेचें दर्शन ॥ ऐसें ऐकतांचि वचन ॥ सर्व राक्षस क्षोभले ॥५९॥ सबळ दंड उचलून ॥ कपींसी करिती ताडण ॥ मग हनुमंतें पायीं धरून ॥ मारिलें आपटून तत्काळीं ॥६०॥ ऐसें देखतां विपरीत ॥ राक्षस धांवले समस्त ॥ प्रतापरुद्र हनुमंत ॥ जैसा कृतांत क्षोभला ॥६१॥ असंख्यात कुंजरभारीं ॥ प्रवेशती पांच केसरी ॥ तैसे पांचांनीं ते अवसरीं ॥ राक्षस सर्व मारिले ॥६२॥ वीस कोटी पिशिताशन ॥ पांच वीरीं भारे बांधोन ॥ पृथ्वीवरी आपटून ॥ समुद्रांत भिरकाविले ॥६३॥ तो मकरध्वज धांवोन ॥ भिडला मारुतीसीं येऊन ॥ मुष्टिप्रहारें करून ॥ एकमेकांसीं ताडिती ॥६४॥ सप्त पाताळें दणाणत ॥ परम क्षोभला हनुमंत ॥ हृदयीं देऊनि मुष्टिघात ॥ मकरध्वज पाडिला ॥६५॥ वक्षस्थळीं मारुती बैसोन ॥ म्हणे तुज आतां सोडवील कोण ॥ येरु म्हणे अंजनीनंदन ॥ जवळी नाहीं ये काळीं ॥६६॥ तो जरी येतां धांवोन ॥ तरी तुज करता शतचूर्ण ॥ तोचि माझा पिता जाण ॥ ऐकोनि मारुती शंकला ॥६७॥ मग तयासी हातीं धरून ॥ म्हणे सांग कैसें वर्तमान ॥ ब्रह्मचारी हनुमंत पूर्ण ॥ तूं सुत कैसा जाहलासी ॥६८॥ मीच हनुमंत रुद्रावतार ॥ तूं म्हणवितोसी माझा कुमर ॥ सांगाती हांसती साचार ॥ सांग प्रकार कैसा तो ॥६९॥ येरू म्हणे लंकादहन ॥ करून येतां वायुनंदन ॥ स्वेदें शरीर संपूर्ण ॥ ओलावलें ते काळीं ॥७०॥ तो स्वेद निपटोन ॥ कपाळींचा टाकिला जाण ॥ तो समुद्रीं पडतां मगरीनें ॥ गिळिला तोचि मी जन्मलो ॥७१॥ ऐसा वृतांत सांगूनी ॥ पुत्रें मस्तक ठेविला चरणीं ॥ तों मगरी आली धांवोनी ॥ वल्लभासी पहावया ॥७२॥ म्हणे स्वरूप दिसतें लहान ॥ जेव्हां केलें लंकादहन ॥ त्याकाळींचे स्वरूप पूर्ण ॥ प्रकटून संशय फेडावा ॥७३॥ मग भीमरूप धरिलें ते क्षणीं ॥ मगरी लागली दृढ चरणीं ॥ म्हणे चिंता न करावी मनीं ॥ अयोध्यानाथ सुखी असे ॥७४॥ अहिमही कपटी दोघेजण ॥ घेऊनि आले रामलक्ष्मण ॥ उदयीक देवीपुढें नेऊन ॥ बळी समर्पितील दोनप्रहरां ॥७५॥ आपण देऊळांत जाऊन ॥ बैसावें गुप्तरूपेंकरून ॥ ते स्थळीं रामलक्ष्मण ॥ भेटतील तुम्हांसी ॥७६॥ ऐसें ऐकतां सीताशोकहरण ॥ बोलता जाहला संतोषोन ॥ म्हणे असुरांतें बधोन ॥ तुझा नंदन स्थापीन त्या स्थळीं ॥७७॥ येरी म्हणे महिकावती नगर ॥ त्रयोदश सहस्र योजनें दूर ॥ आडवा समुद्र दुस्तर ॥ तरी विचार माझा एक ऐका ॥७८॥ तुम्ही पांचही बलवंत ॥ बसावें माझे वदननौकेंत ॥ महिकावतीस नेऊन त्वरित ॥ पुढती आणीन या स्थळीं ॥७९॥ नळ नीळ अंगद जांबुवंत ॥ ऐकतां जाहले भयभीत ॥ म्हणती मगरमिठी अद्भुत ॥ भक्षील उदकांत नेऊनियां ॥८०॥ तरी मारुति ऐके वचन ॥ आम्हीं रक्षितो हें स्थान ॥ तुजवांचोनि सिंधुलंघन ॥ सर्वथा नव्हे कोणासी ॥८१॥ मग तेथें उभा राहोन ॥ हनुमंतें चिंतिले श्रीरामचरण ॥ जय यशस्वी श्रीराम म्हणोन ॥ अकस्मात उडाला ॥८२॥ मनोवेगें हनुमंत ॥ आला तेव्हां महिकावतींत ॥ एकवीस दुर्गे रक्षकांसहित ॥ कोणासी नकळत ओलांडिलीं ॥८३॥ अणुरेणूहूनि लहान ॥ जाहला सीताशोकहरण ॥ भद्रकालींचे देवालय देखोन ॥ आंत संचरला ते काळीं ॥८४॥ कापट्य अनुष्ठानें बहुत ॥ राक्षस करिती देउळांत ॥ मद्य मांस विप्रप्रेत ॥ पूजनासी ठेविलें ॥८५॥ भ्रष्ट शास्त्रें काढिती ॥ एकासी एक वचन देती ॥ ऐसें करितां मोक्षप्राप्ती ॥ प्रमाण ग्रंथी लिहिलें असे ॥८६॥ ऐसें ऐकतां रामभक्त ॥ म्हणे यांसी कैसा मोक्ष प्राप्त ॥ आतां कपाळमोक्ष त्वरित ॥ पावती हस्तें माझिया ॥८७॥ असो देवालयीं जाऊनि महारुद्र ॥ देवी उचलोनि सत्वर ॥ नाहाणींत टाकूनि द्वार ॥ दृढ झांकिलें हनुमंते ॥८८॥ वज्रकपाटें देऊनी ॥ आपण बैसला देवीस्थानीं ॥ सर्वांग शेंदूर चर्चूनी ॥ जाहला भवानी हनुमंत ॥८९॥ देवी मारुतीकडे पाहात ॥ तो भयानक रूप दिसे बहुत ॥ जैसा हरिणीचे गृहांत ॥ महाव्याघ्र प्रवेशला ॥९०॥ तों येरीकडे असुर बहुत ॥ षड्ररस अन्नांचे पर्वत ॥ पूजासामुग्री अद्भुत ॥ घेऊनि अहिमही तेथें पातले ॥९१॥ तों वज्रकपाटें दिधली ॥ ती न उघडती कदाकाळीं ॥ एक म्हणती देवी क्षोभली ॥ म्हणूनि स्तुति करिताती ॥९२॥ ऐसा लोटला एक मुहूर्त ॥ तों रुद्ररूपिणी आंत बोलत ॥ म्हणे धन्य तुम्ही भक्त ॥ बळीसी रघुनाथ आणिला ॥९३॥ लंकेपुढें बहुतांचे प्राण ॥ मींच घेतले सत्यवचन ॥ तुमचें करावया भोजन ॥ येथें साक्षेपें पातलें ॥९४॥ माझें रूप बहुत तीव्र ॥ पाहतां जातील तुमचे नेत्र ॥ तरी पाडूनि गवाक्षद्वार ॥ पूजा आधीं समर्पा ॥९५॥ ऐसें देवी बोले आंतूनी ॥ अहिमही हर्षले ते क्षणीं ॥ म्हणती धन्य आम्हीं त्रिभुवनीं ॥ भक्तशिरोमणी दोघेही ॥९६॥ मग देउळमस्तकी विशाळ ॥ गवाक्ष पाडिलें तत्काळ ॥ पंचामृताचे घट सजळ ॥ स्नानालागीं ओतिले ॥९७॥ तों मुख पसरूनि हनुमंत ॥ घटघटां प्राशी पंचामृत ॥ पाठीं शुद्धोदक ओतीत ॥ प्रक्षाळिलें मुख तेणें ॥९८॥ धूप दीप वास ते समयीं ॥ देवीस म्हणे हे तूं घेईं ॥ सवेंच म्हणे भक्तां लवलाहीं ॥ नैवेद्य झडकरी येऊं द्या ॥९९॥ मग भरोनि विशाळ पात्रें ॥ अन्न ओतिती एकसरें ॥ जय जय देवी म्हणोनि गजरे ॥ असुर सर्व गर्जती ॥१००॥ सव्य अपसव्य हस्तेंकरूनि ॥ स्वाहा करीत रुद्ररूपिणी ॥ जैसा दवाग्नि चेतला वनीं ॥ तो नाना -काष्टें भक्षीत ॥१॥ पंचभक्ष्य परमान्न ॥ बहुत रंगाचें ओदन ॥ शाखा लवण शाखा आणोन ॥ असंख्यात रिचविती ॥२॥ दधि दुग्ध घृत नवनीत ॥ यांचे पाट सोडिले बहुत ॥ जैशा वर्षाकाळीं सरिता धांवत ॥ समुद्रासी भेटावया ॥३॥ पुजारे लोहदंडें घेउनी ॥ मोकळी करिती तेव्हां नाहाणी ॥ प्रसाद बाहेर यावा म्हणोनी ॥ प्रयत्न करिती बहुसाल ॥४॥ तंव तेथें देवी बैसली भयभीत ॥ तिजवरी लोहदंड आदळत ॥ ती म्हणे संकट बहुत ॥ मज येथें ओढवलें ॥५॥ असुरीं आणिले दशरथसुत ॥ नैवेद्य ग्रासितो हनुमंत ॥ मज ताडण होय येथ ॥ कोणासी अनर्थ सांगा हा ॥६॥ असो नाहाणी मोकळी करिती असुर ॥ परी कांहींच नये बाहेर ॥ म्हणती आजि देवीनें समग्र ॥ ग्रासिलें हाचि निर्धार पैं ॥७॥ वृद्ध वृद्ध असुर बोलत ॥ कैंची देवी मांडिला अनर्थ ॥ इहीं चोरूनि आणिला रघुनाथ ॥ बरवा अर्थ दिसेना ॥८॥ रावणें चोरिली सीता सुंदर ॥ तेथें अकस्मात आला एक वानर ॥ तेणें नगर जाळूनि समग्र ॥ केला संहार बहूतांचा ॥९॥ तैसेंच मांडले येथ ॥ ऐसें बोलोनि बुद्धिवंत ॥ निजस्थानासी त्वरित ॥ जाते जाहले ते काळीं ॥११०॥ असो इकडे अन्नाचे पर्वत ॥ ओतितां असुर भागले समस्त ॥ परी देवी नव्हेच तृप्त ॥ पुरे न म्हणे सर्वथा ॥११॥ मग घातलें शुद्ध जळ ॥ सवेंचि अर्पिले तांबूल ॥ तेव्हां हाक फोडूनि प्रबळ ॥ रुद्ररूपिणी बोलतसे ॥१२॥ म्हणे मी तुष्टल्यें आजि पूर्ण ॥ तुम्हांसी अक्षयपद देईन ॥ तुम्ही आणि लंकापति रावण ॥ करीन समान दोहींचें ॥१३॥ माझी प्रसन्नता लवलाह्या ॥ आतांच येईल प्रत्यया ॥ ऐसे शब्द देवीचे परिसोनियां ॥ शहाणे चालिले गृहासी ॥१४॥ देवी म्हणे याउपरी ॥ राम सौमित्र आणा झडकरी ॥ सगळेचि घाला देवळाभीतरीं ॥ याउपरी कौतुक पहा ॥१५॥ सच्चिदानंद रघुवीर ॥ ज्याचिया स्वरूपा नाहीं पार ॥ जो वेदशास्त्रांसी अगोचर ॥ त्यास गिळीन सगळाचि ॥१६॥ ऐसे शब्द देवीचे ऐकोन ॥ हर्षले अहि मही दोघेजण ॥ वीस असुर चालिले घेऊन ॥ रामलक्ष्मण आणावया ॥१७॥ रविकुळींचीं निधानें दोन्ही ॥ ठेविलीं नागपाशीं आकर्षूनी ॥ तीं सोडोनियां ते क्षणीं ॥ रथासी दृढ बांधिले ॥१८॥ मग काढिलें मोहनास्त्र ॥ सावध जाहले रामसौमित्र ॥ राजीवाक्ष उघडी नेत्र ॥ तों सभोंवते असुर दाटले ॥१९॥ श्रीराम सौमित्रासी बोले ॥ बा रे शत्रूंनीं आपणांसी आणिलें ॥ आमचें धनुष्य बाण हिरोनी नेलें ॥ रथीं बांधिलें दृढ आम्हां ॥१२०॥ जानकीसारिखें चिद्रत्न ॥ गेलें दुःखसागरी बुडोन ॥ भरत त्यागील आतां प्राण ॥ हें वर्तमान जातांचि ॥२१॥ कौसल्या सुमित्रा दोघीजणी ॥ प्राण देतील ऐकतांक्षणीं ॥ वसिष्ठादि महामुनी ॥ दुःखचक्रीं पडतील ॥२२॥ बिभीषण सुग्रीव हनुमंत ॥ नळ नीळ अंगद जांबुवंत ॥ माझे प्राणसखे समस्त ॥ प्राण देतील ऐकतां ॥२३॥ देव समस्त बंदीं पडले ॥ त्यांचे धैर्यदुर्ग आजि खचले ॥ क्षुधित पात्रावरूनि उठविलें ॥ तैसें झालें देवांसी ॥२४॥ आतां असावें धैर्य धरून ॥ जरी संकटीं पावेल उमारमण ॥ तरी हें क्षणमात्रें विघ्न ॥ निरसोनि जाईल सौमित्रा ॥२५॥ जो साक्षात रुद्रवतार ॥ तो आमुचा हनुमंत साचार ॥ येथें जरी पातला सत्वर ॥ तरी असुर संहरितां ॥२६॥ साक्षात शेष नारायण ॥ अवतारी पुरुष रामलक्ष्मण ॥ समयासारिखें वर्तमान ॥ दाविती खूण जाणिजे ॥२७॥ असो राक्षसीं रामसौमित्र ॥ रथीं बांधिले दृढ सत्वर ॥ सिंधूरवर्ण पुष्पहार ॥ गळां घातले तेधवां ॥२८॥ वरी उधळिती शेंदूर ॥ पुढें होतसे वाद्यांचा गजर ॥ नग्न शस्त्रें करून समग्र ॥ असुर हांका फोडिती ॥२९॥ चालविले तेव्हां मिरवत ॥ तंव नगरलोक आले समस्त ॥ पहावया श्रीरघुनाथ ॥ एक चढती गोपुरी ॥१३०॥ देखतां दोघे सुकुमार ॥ लोकांसी न धरवे गहिंवर ॥ नेत्रीं स्रवों लागलें नीर ॥ हाहाकार जाहला ॥३१॥ नरनारी आक्रंदत ॥ एकचि वर्तला आकांत ॥ चरचर जीव समस्त ॥ पाहूनि रघुनाथ शोक करिती ॥३२॥ तीन प्रदक्षिणा करून ॥ देउळीं आणिले दोघेजण ॥ देवीचीं कपाटें उघडून ॥ आंत लोटोनि दीधले ॥३३॥ कपाटें देऊन पुढती ॥ राक्षस गोंधळ घालिती ॥ हातीं दिवट्या घेऊनि नाचती ॥ मद्य प्राशिती उन्मत्त ॥३४॥ इकडे देउळांत रामलक्ष्मण ॥ पाहाती देवीसी विलोकून ॥ तंव तिणें पसरिलें वदन ॥ मुख जैसे काळाचें ॥३५॥ हाक दिधली भयंकर ॥ म्हणे तुम्ही दोघे राजपुत्र ॥ तुम्हांसी गिळिन सत्वर ॥ तरी स्मरण करा कुळदैवत ॥३६॥ तुमचा प्राणसखा असेल पाहीं ॥ त्यासी चिंतावें देहांतसमयीं ॥ यावरी तो जनकजांवई ॥ काय बोलता जाहला ॥३७॥ जरी अनर्थी पडिले भक्त ॥ तरी माझें स्मरण करीत ॥ तो मी आजि रघुनाथ ॥ संकटीं स्मरूं कोणासी ॥३८॥ तरी माझिया प्राणांचा प्राण ॥ जिवलग सखा वायुनंदन ॥ तो असतां तरी विघ्न ॥ कदा न लागतें आम्हांसी ॥३९॥ आतां मारुतिऐसा स्नेहें विशेष ॥ माये तूंचि करी कां आम्हांस ॥ कीं जननी पाळी बाळकांस ॥ प्रीति बहुत धरूनियां ॥१४०॥ ऐकतां रघुपतीचें वचन ॥ कपीचे नेत्रीं लोटलें जीवन ॥ स्फुंदस्फुंदोनि वायुनंदन ॥ धरी चरण रामाचे ॥४१॥ तेणें नयनोदकेंकरून ॥ प्रक्षाळिले रामचरण ॥ मग तो सीताशोकहरण ॥ रूप आपुलें प्रकट करी ॥४२॥ दृष्टीं देखतां हनुमंत ॥ प्रेमें दाटला रघुनाथ ॥ उठोनि हृहयीं आलिंगित ॥ काय दृष्टांत देऊं येथें ॥४३॥ कवींनी तर्क केले बहुत ॥ परी त्या सुखास नाही दृष्टांत ॥ पाठिराखा कैवारी भक्त ॥ मारुतीऐसा नव्हेचि ॥४४॥ मारुतीस म्हणे रघुवीर ॥ म्यां घेतले अनंत अवतार ॥ तुझे न विसरे उपकार ॥ कल्पांतींही हनुमंता ॥४५॥ तुझिया उपकारा नाहीं भिती ॥ काय काय आठवूं मारुती ॥ असो यावरी उर्मिलापती ॥ हनुमंतासी भेटला ॥४६॥ श्रीराम म्हणे हनुमंता ॥ कैसा शत्रु वधावें आतां ॥ येरू म्हणे तुम्ही चिंता ॥ न करावी कांही मानसी ॥४७॥ तुम्ही मागें असा लपोन ॥ एकेक असुर बोलावून ॥ तयांचीं शिरें छेदून ॥ करीन चूर्ण येथेंचि ॥४८॥ राम म्हणे माझे धनुष्यबाण ॥ जरी देशील आणून ॥ तरी हे असुर संहारीन ॥ क्षणमात्र न लागतां ॥४९॥ तंव बोले वायुनंदन ॥ मी मारीन अहिरावण ॥ मग कपाटें उघडोन ॥ महिरावण वधा तुम्ही ॥१५०॥ तेंव्हा गुप्तरूपें हनुमंते जाऊन ॥ दोघांचे आणिले धनुष्यबाण ॥ पाठीसी लपवूनि रामलक्ष्मण ॥ आपण देवी होउनि बैसला ॥५१॥ मग म्हणे अहिरावणा ॥ तूं आधी घेईं माझ्या दर्शना ॥ ऐकातांचि ऐशा वचना ॥ येरू प्रवेशे देउळीं ॥५२॥ जैसा पंचाननाचें दरींत ॥ वारण प्रवेशे उन्मत्त ॥ कीं व्याघ्राचिये जाळीत ॥ मृग अकस्मात संचरे ॥५३॥ कीं भुजंगाचे बिळीं देख ॥ प्रवेशला जैसा मूषक ॥ कीं मरण नेणोनि पतंग मूर्ख ॥ दीपासी भेटों पातला ॥५४॥ तैसा प्रवेशे अहिरावण ॥ भयानक देवी देखोन ॥ धाकें धाकें चि नमन ॥ करिता जाहला तेधवां ॥५५॥ देवीचरणीं मस्तक ठेविला ॥ देखोनि महारुद्र क्षोभला ॥ असुर पायीं रगडिला ॥ शतचूर्ण केला मस्तक ॥५६॥ हस्त पाद झाडी ते क्षणीं ॥ तेणें दणाणली मंगळजननी ॥ तो दणाण भयंकर ऐकोनी ॥ शाहाणे उठोनि पळाले ॥५७॥ अहिरावणाचा गेला प्राण ॥ मग महिरावण बोले वचन ॥ म्हणे चार घटिका जाहल्या पूर्ण ॥ बंधु बाहेरी नयेचि ॥५८॥ काय तो पाहावया वृत्तांत ॥ पूजारी जाय देउळांत ॥ तयाचा दायदही जात ॥ त्याचे पाठीं हळूहळू ॥५९॥ देउळीं अन्नप्रसाद समूळ ॥ तो अवघा पैं नेईल ॥ म्हणोनियां उतावेळ तो देउळीं प्रवेशला ॥१६०॥ पुढील काळें ओढिला ॥ देवी नमावया गेला ॥ मत्कुणप्राय रगडिला ॥ पायांतळीं हनुमंतें ॥६१॥ ऐसें देखोनि विपरीत ॥ दुसरा चळचळां कांपत ॥ म्हणे हा होय हनुमंत ॥ लंका जेणें जाळिली ॥६२॥ आंगीं मुरकुंडी वळोन ॥ दारांत आपटला येऊन ॥ दोन्हीं हस्तेंकरून ॥ शंख करी आक्रोशें ॥६३॥ म्हणें जेणें लंका जाळिली ॥ तोच काळ बैंसला देउळीं ॥ देवी मोरींत दाटिली ॥ पूजा घेतली सर्व तेणें ॥६४॥ पूजारियासहित अहिरावण ॥ यमपुरीस पाठविला पूर्ण ॥ पिशिताशन नाम ऐकतां जाण ॥ पळों लागलें चहूंकडे ॥६५॥ राक्षसां जाहला आकांत ॥ एक एकांतें धरूनि हनुमंत ॥ तेथेंचि पाववी मृत्यु ॥ दिशा लंघोनि एक जाती ॥६६॥ मग शस्त्रें कवचें बांधोन ॥ सेनासागर एकवटून ॥ सिद्ध झाला महिरावण ॥ युद्धालागीं ते काळीं ॥६७॥ म्हणे बाहेर येई रे मर्कटा ॥ कोठें प्रवेशलासि महाधीटा ॥ आजि मृत्युपुरींचिया वाटा ॥ रामासहित लावीन तूंतें ॥६८॥ तों देऊळामाजी वायुपुत्र ॥ स्कंधी घेत राम सौमित्र ॥ कीं तें विष्णु कर्पूरगौर ॥ एका वहनीं बैसले ॥६९॥ कीं शशी आणि दिनपती ॥ बैसले दिसती एक रथीं ॥ कीं इंद्र आणि वाचस्पति ॥ एक वहनीं आरूढले ॥१७०॥ तैसें दोघे स्कंधी घेऊन ॥ बाहेर निघे वायुनंदन ॥ पादप्रहारें करून ॥ कपाटें फोडिली ॥ तत्काळीं ॥७१॥ बाहेर प्रकटतां तत्काळ ॥ पुच्छें उडवूनियां देऊळ ॥ आकाशीं भिरकाविलें सकळ ॥ जेवीं बाळ कंदुक टाकी ॥७२॥ देवालय विदारूनी ॥ देविसहित समुद्रजीवनीं ॥ टाकितां राक्षसीं मिळूनी ॥ अंजनीतनय वेढिला ॥७३॥ खालीं रामसौमित्र उतरले ॥ श्रीराम कोदंड चढविलें ॥ अचळ ठाण मांडिलें ॥ बाण लाविला चापासी ॥७४॥ महिरावणास म्हणे रघुनंदन ॥ कपटिया साहें माझे बाण ॥ तुझी वाट पाहतो अहिरावण ॥ तुज धाडीन त्याजपासी ॥७५॥ तों राक्षसें धनुष्य ओढून ॥ रामावरी सोडिले बाण ॥ रघुनाथें शिर छेदोन ॥ क्षणमात्रें टाकिलें ॥७६॥ नरवीरश्रेष्ठ रघुनंदन ॥ महिवरी सोडीत शत बाण ॥ त्याचे लल्लाटीं जाऊन ॥ एकपंक्ती बैसले ॥७७॥ परी नवल वर्तलें अद्भुत ॥ रुधिर बिंदु खालीं पडत ॥ त्याचे महिरावण होत ॥ एकसारिखे सर्वही ॥७८॥ लक्षांच्या लक्ष महिरावण ॥ त्यावरी राम टाकी बाण ॥ त्यांचिया रक्तबिंदुंपासून ॥ कोट्यनुकोटी निपजती ॥७९॥ तितुकेही रामावरी असुर ॥ करिते जाहले शस्त्रमार ॥ मग घाय टाळित रघुवीर ॥ चकित पाहे चहूंकडे ॥१८०॥ मग बोले चापपाणी ॥ वैरी वधावे शस्त्रेंकरूनी ॥ तंव आगळेचि होती ते क्षणीं ॥ न कळे करणी कैसी हे ॥८१॥ तंव तो निर्वाणीचा भक्त ॥ वज्रदेही वीर हनुमंत ॥ दृष्टी देखोनि विपरीत ॥ चिंताक्रांत पडियेला ॥८२॥ मग तो लोकप्राणेशनंदन ॥ मगरीपासी आला उठोन ॥ तीस पुसे वर्तमान ॥ समूळ महिरावणाचें ॥८३॥ ती म्हणे रंभा देवांगना ॥ जात होती इंद्र भुवना ॥ तंव भृगुऋषि जाणा ॥ तिणें अकस्मात देखिला ॥८४॥ त्यासी नाही केले नमन ॥ म्हणे हा कुरूप वृद्ध ब्राह्मण ॥ तंव तो महाराज तपोधन ॥ दिधला शाप दारुण तीतें ॥८५॥ म्हणे तूं सर्पिणी होऊनी ॥ विचरें सदा घोर वनीं ॥ धांवून येरी लागे चरणीं ॥ म्हणे मज उःशाप देईंजे ॥८६॥ येरू म्हणे तूं होशील सर्पिणी ॥ क्षणएक दिससी पद्मिणी ॥ एकदां सूर्यरेत पडतांक्षणी ॥ जासी उद्धरून निजपदा ॥८७॥ मग अहिरूप हिंडे वनीं ॥ क्षणएक जाहली असे पद्मिणी ॥ तों सूर्याचें विर्य वरूनी ॥ अकस्मात वर्षलें ॥८८॥ अहिंचे मुखीं वीर्य पडत ॥ तो अहिरावण जाहला अद्भुत ॥ महीवरी पडलें जे रेत ॥ महिरावण तोचि जाहला ॥८९॥ रंभा गेली उद्धरून ॥ परी रक्तबिंदूंचे होती महिरावण ॥ हें चंद्रसेनेस वर्तमान ॥ जाऊनियां पुसावें ॥१९०॥ अहिरावणाची पत्नी ॥ चंद्रसेना ते सत्यवचनीं ॥ हें हनुमंतें ऐकोनी ॥ उडे गगनीं अकस्मात ॥९१॥ महिकावतीस येऊनी ॥ प्रवेशला तेव्हां राजसदनीं ॥ तों चंद्रसेना बैसली ध्यानीं ॥ चापपाणी आठवित ॥९२॥ दृष्टीं देखोनि रघुवीर ॥ तीस वाढला कामज्वर ॥ म्हणे श्रीरामाऐसा भ्रतार ॥ जन्मोजन्मी भोगावा ॥९३॥ त्चाचि वेधेंकरून जाण ॥ तीस लागलें श्रीरामध्यान ॥ सकळ विसरली देहभान ॥ गुंतले मन राघवीं ॥९४॥ तंव तीजजवळी आला हनुमंत ॥ बळें हस्तटाळिया वाजवित ॥ येरी नेत्र उघडोनि पाहत ॥ तंव तो रामदूत देखिला ॥९५॥ हनुमंते करूनि नमन ॥ सांगे सर्व वर्तमान ॥ पुराणपुरुष रघुनंदन ॥ परम संकटीं पडियेला ॥९६॥ येरी म्हणे हें वर्तमान ॥ तुज अवघे मी सांगेन ॥ माझा मनोरथ पूर्ण ॥ जरी तूं सिद्धी पावविसी ॥९७॥ रामप्रिय म्हणे अवश्य ॥ येरी म्हणे देईं भाष ॥ पुढील कार्य जाणोनि विशेष ॥ प्रमाण दिधलें हनुमंतें ॥९८॥ येरी म्हणे ऐक वचन ॥ सुरतसुखें रघुनंदन ॥ एकदां तरी भोगीन ॥म्हणोनि भाष घेतली ॥९९॥ आतां रामासी होईल जय प्राप्त ॥ तो ऐका सावध वृत्तांत ॥ महिरावणें तप अद्भुत ॥ करूनि शिव तोषविला ॥२००॥ हा वर मागितला त्वरित ॥ युद्धसमयीं वर्षावें अमृत ॥ ऐक्य होतां सुधारसमुक्त ॥ उद्भवती महिरावण ॥१॥ भ्रमरमाळा शिवकंठी ॥ ते मिलिंद पाताळा जाती उठाउठी ॥ अमृत चंचू भरूनि वृष्टी ॥ रक्तावरी करिती त्या ॥२॥ एकत्र होतां रक्त अमृत ॥ महिरावण निजपती तेथ ॥ ऐसें ऐकतांचि हनुमंत ॥ पाताळ धुंडीत गेला असे ॥३॥ तों अमृतकुंड परम गहन ॥ तेथें लोकपाळांचे रक्षण ॥ तें तोडित वायुनंदन ॥ अमृताजवळी पातला ॥४॥ तों चंचू भरूनि अपार ॥ असंख्यात जाती भ्रमर ॥ पर्वताऐसें तयांचे शरीर ॥ केले चूर सर्वही ॥५॥ त्यांमाजी श्रेष्ठ भ्रमर ॥ मेरुपर्वताऐसें त्याचें शरीर ॥ क्रोधें धांविन्नला सत्वर ॥ वायुकुमर लक्षूनियां ॥६॥ हनुमंतें मुष्टिघात दिधला ॥ भ्रमर पृथ्वीवरी पाडिला ॥ पक्ष उपडितां ते वेळां ॥ काकुळती आला मारुतीसी ॥७॥ मज देई प्राणदान ॥ मी तुझ्या कार्यासी येईन ॥ हनुमंतें भाष घेऊन ॥ तेव्हां भ्रमर सोडिला ॥८॥ सवेंच उडाला तेथून ॥ राघवाजवळी येऊन ॥ म्हणे आतां ब्रह्मास्त्र घालोन ॥ वैरी एकदांचि आटावे ॥९॥ ऐसें बोलतां वायुसुत ॥ रघुनाथ बाणीं ब्रह्मास्त्र स्थापित ॥ शर सुटतांचि समस्त ॥ भस्म जाहले महिरावण ॥२१०॥ जैसी होतां ब्रह्मप्राप्ति ॥ संसारदुःखें वितळती ॥ कीं उगवतां गभस्ति ॥ जेवीं लपती तारागणे ॥११॥ तैसें सुटतां ब्रह्मास्त्र ॥ मुख्य रूपसहित असुर ॥ भस्म जाहले समग्र ॥ जयजयकार सुर करिती ॥१२॥ पडली देखतां मुख्य धुर ॥ पळों लागले ते असुर ॥ हनुमंतें पुच्छ समग्र ॥ सेनेभोवतें वेष्टिलें ॥१३॥ मग लोहर्गळा घेउनी ॥ सैन्य झोडी तयेक्षणीं ॥ कित्येक अंतरिक्ष उडोनि ॥ राक्षस पळती तेधवां ॥१४॥ तों वरून पुच्छें सत्वर ॥ बांधिले सर्व निशाचर ॥ सागरीं बुडविलें समग्र ॥ पुच्छें घुसळूनि आणिले ॥१५॥ एक जाती दिशा लंघून ॥ तों पुच्छ येत तिकडून ॥ ब्रह्मांड व्यापिलें संपूर्ण ॥ पुच्छेंकरूनि हनुमंतें ॥१६॥ मारुति केवळ ईश्वर ॥ त्याचे पुच्छासी नाहीं पार ॥ ब्रह्मांडाबाहेर समग्र ॥ आढेवेढे करी पुच्छ ॥१७॥ असो दशदिशा धुंडोन ॥ पुच्छें असुर आणिले ओढून ॥ महिकावतीस जाऊन ॥ पुच्छ रिघे घरोघरीं ॥१८॥ पुरुष ओढोनि काढी बाहेरी ॥ अर्गळाघायें चूर्ण करी ॥ भ्रतारा लपवोनि नारी ॥ दारीं उभ्या राहती ॥१९॥ परी पुच्छ न सोडी साचार ॥ गूढ स्थळाहून काढी असुर ॥ आकांत वर्तला थोर ॥ सांगती हेर चंद्रसेनेसी ॥२२०॥ ती म्हणे घाला जानकीची आण ॥ तेणें निरसेल हे विघ्न ॥ मग त्याचि युक्तीकरून ॥ जन सकळ वांचले॥२१॥ जयजयकार करून सुर ॥ वर्षती पुष्पसंभार ॥ रामसौमित्र वायुकुमर ॥ एके ठायीं मिळाले ॥२२॥ शत्रुक्षयाचें कारण ॥ कैसा निमाला महिरावण ॥ सौमित्रासी म्हणे सीतारमण ॥ तेणें प्रत्युत्तर दीधलें ॥२३॥ म्हणें हनुमंतें जाऊन ॥ शत्रुक्षय होय पूर्ण ॥ तें साधून आला कारण ॥ त्यास वर्तमान पुसा हें ॥२४॥ मग मारुतीचे गळां सप्रेम ॥ मिठी घाली श्रीराम ॥ तंव तो चिंताच्रकी परम ॥ पडला असे मारुती ॥२५॥ मग राम म्हणे प्राणसखया ॥ कां मुख गेलें उतरोनियां ॥ ते मज सांग लवलाह्या ॥ म्हणेन वदन कुरवाळिलें ॥२६॥ मग हनुमंत वर्तमान ॥ रामासि सांगें मुळींहून ॥ चंद्रसेनेसी भाषदान ॥ दृढ देऊनि मी आलों ॥२७॥ ऐकोनि हांसें रामचंद्र ॥ म्हणे बा रे तूं चातुर्यसमुद्र ॥ मी एकपत्नीव्रती वीर ॥ हे तुज काय न ठाऊकें ॥२८॥ तुझी भाषा नव्ह अप्रमाण ॥ मजही न गमे दुर्व्यसन ॥ तूं चतुरमुकुटरत्न ॥ युक्ति करून वारीं हें ॥२९॥ मग चंद्रसेनेच्या गृहाप्रति ॥ आला तत्काळ मारुति ॥ म्हणे आणितों अयोध्यापति ॥ मंचक दृढ घाली कां ॥२३०॥ चंद्रसेना हर्षलीं चित्तीं ॥ दृढ मंचक घातला एकांती ॥ सुमनशेज रचूनि युक्तीं ॥ नाना उपभोग ठेविले ॥३१॥ मग बोले हनुमंत ॥ मंचक मोडतां अकस्मात ॥ तरी न बैसे रघुनाथ ॥ बोल मग मज नाहीं ॥३२॥ चंद्रसेना म्हणे हनुमंता ॥ मंचक न मोडे हा तत्वंतां ॥ मग जो भ्रमर रक्षिला होता ॥ तो आणिला गुप्तरूपें ॥३३॥ रंभापत्रप्रमाण पूर्ण ॥ मंचक आंत अवघा कोरून ॥ तेणें तत्काळ आज्ञा वंदून ॥ तैसाचि केला ते काळीं ॥३४॥ चंद्रसेनेच्या गृहीं सत्वर ॥ हनुमंतें आणिला रघुवीर ॥ मंचकीं बैसतां जगदोद्धार ॥ तत्काळ चूर्ण जाहला ॥३५॥ उठोनि चालिला रघुनंदन ॥ येरी विलोकी दीनवदन ॥ वायुसुताकडे पाहून ॥ चंद्रसेना बोलतसे ॥३६॥ म्हणे कपटी तूं वानर देख ॥ तुवांचि कोरविला मंचक ॥ शेवटी नेतोसी रघुनायक ॥ मनोरथ माझे न पुरतां ॥३७॥ मी तुज शाप देईन आतां ॥ ऐकतां कृपा उपजली रघुनाथा ॥ हस्त ठेवीत तिचे माथां ॥ म्हणे चिंता न करावी ॥३८॥ माझी ध्यानमूर्ति सुंदर ॥ हृदयीं भोगीं निरंतर ॥ पुढें सत्यभामा चतुर ॥ कृष्णावतारीं होसी तूं ॥३९॥ ऐसें बोलतां रघुनाथ ॥ ती तेथेंचि जाहली समाधिस्थ ॥ पुढें महाकावतींत नृपनाथ ॥ मकरध्वज स्थापिला ॥२४०॥ स्कंधीं वाहून रामलक्ष्मण ॥ हनुमंतें केलें उड्डाण ॥ नळ नीळ अंगद जांबुवंत पूर्ण ॥ तेही पुढें भेटलें ॥४१॥ जैसा उदय पावे आदित्य ॥ तैसा सुवेळेसी येत हनुमंत ॥ बिभीषण आणि किष्किंधानाथ ॥ सामोरे धांवती दळभारेंसी ॥४२॥ सप्रेंमें सुग्रीव बिभीषण ॥ आले हनुमंतासी देखोन ॥ म्हणती बा रे हा देह ओवाळून ॥ तुजवरून टाकावा ॥४३॥ सुग्रीव आणि बिभीषण ॥ आश्चर्य करिती दोघेजण ॥ म्हणती धन्य धन्य वायुनंदन ॥ भरिलें त्रिभुवन प्रतापें ॥४४॥ जाहला एकचि जयजकार ॥ सर्वांसी भेटला रघुवीर ॥ हनुमंताचा प्रताप समग्र ॥ राजीवनेत्र स्वयें वर्णीं ॥४५॥ या ब्रह्मांडमंडपांत ॥ मारुतिऐसा नाही भक्त ॥ याचे प्रतापें आम्ही समस्त ॥ वानर धन्य जाहलों ॥४६॥ ब्रह्मांनंद म्हणे श्रीधर ॥ अग्निपुराणीं हे कथा सुंदर ॥ बोलिला सत्यवतीकुमर ॥ तेंचि सार कथियेलें ॥४७॥ स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत पंडित चतुर ॥ एकत्रिंशत्तमोऽध्याय गोड हा ॥२४८॥ ॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥ |