[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ विंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामकर्तृकः खरप्रहितानां राक्षसानां वधः -
श्रीरामांच्या द्वारा खरानी धाडलेल्या चौदा राक्षसांचा वध -
ततः शूर्पणखा घोरा राघवाश्रममागता ।
रक्षसानाचचक्षे तौ भ्रातरौ सह सीतया ॥ १ ॥
त्यानंतर भयानक राक्षसी शूर्पणखा श्रीरामचंद्रांच्या आश्रमावर आली. तिने सीतेसहित त्या दोन्ही भावांचा परिचय त्या राक्षसांना करून दिला. ॥१॥
ते रामं पर्णशालायामुपविष्टं महाबलम् ।
ददृशुः सीतया सार्धं लक्ष्मणेनापि सेवितम् ॥ २ ॥
राक्षसांनी पाहिले - महाबली श्रीराम सीतेसह पर्णशाळेत आहेत आणि लक्ष्मणही त्यांच्या सेवेत उपस्थित आहेत. ॥२॥
तां दृष्ट्‍वा राघवः श्रीमानागतांस्तांश्च राक्षसान् ।
अब्रवीद् भ्रातरं रामो लक्ष्मणं दीप्ततेजसम् ॥ ३ ॥
इकडे श्रीमान् राघवांनी ही शूर्पणखा तसेच तिच्या बरोबर आलेल्या त्या राक्षसांनाही पाहिले. पाहिल्यावर ते उद्दीप्त तेज असणार्‍या आपल्या भाऊ लक्ष्मणास या प्रकारे म्हणाले- ॥३॥
मुहुर्तं भव सौमित्रे सीतायाः प्रत्यनन्तरः ।
इमानस्या वधिष्यामि पदवीमागतानिह ॥ ४ ॥
’सौमित्र ! तुम्ही थोडा वेळ सीतेजवळ उभे राहा. मी या राक्षसीचे सहाय्यक बनून तिच्या पाठोपाठ आलेल्या या निशाचरांचा येथे आता वध करून टाकतो.’ ॥४॥
वाक्यमेतत् ततः श्रुत्वा रामस्य विदितात्मनः ।
तथेति लक्ष्मणो वाक्यं राघवस्य प्रपूजयन् ॥ ५ ॥
आपल्या स्वरूपाला समजणार्‍या रामांचे ते बोलणे ऐकून लक्ष्मणांनी राघवाची खूप खूप प्रशंसा करीत ’तस्थातु’ म्हणून त्यांची आज्ञा शिरोधार्य केली. ॥५॥
राघवोऽपि महच्चापं चामीकरविभूषितम् ।
चकार सज्यं धर्मात्मा तानि रक्षांसि चाब्रवीत् ॥ ६ ॥
तेव्हा धर्मात्मा राघवांनी आपल्या सुवर्णमण्डित विशाल धनुष्यावर प्रत्यंचा चढविली आणि त्या राक्षसांना म्हटले - ॥६॥
पुत्रौ दशरथस्यावां भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
प्रविष्टौ सीतया सार्धं दुश्चरं दण्डकावनम् ॥ ७ ॥

फलमूलाशनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
वसन्तौ दण्डकारण्ये किमर्थमुपहिंसथ ॥ ८ ॥
’आम्ही दोघे भाऊ राजा दशरथांचे पुत्र राम आणि लक्ष्मण आहोत तसेच सीतेसह या दुर्गम दण्डकारण्यात येऊन फल-मूलाचा आहार करीत इंद्रिय संयमपूर्वक तपस्ये मध्ये संलग्न आहोत आणि ब्रह्मचर्याचे पालन करीत आहोत. या प्रकारे दण्डकवनात राहाणार्‍या आम्हा दोघा भावांची तुम्ही कशासाठी हिंसा करू इच्छित आहात ? ॥७-८॥
युष्मान् पापात्मकान् हन्तुं विप्रकारान् महाहवे ।
ऋषीणां तु नियोगेन प्राप्तोऽहं सशरासनः ॥ ९ ॥
’पहा तुम्ही सर्वच्या सर्व पापात्मा तसेच ऋषिंचे अपराध करणारे आहात. त्या ऋषि- मुनिंच्या आज्ञेनेच मी धनुष्य-बाण घेऊन महासमरात तुमचा वध करण्यासाठी येथे आलो आहे.’ ॥९॥
तिष्ठतैवात्र सन्तुष्टा नोपावर्तितुमर्हथ ।
यदि प्राणैरिहार्थो वा निवर्तध्वं निशाचराः ॥ १० ॥
’निशाचरांनो ! जर तुम्हांला युद्धाने संतोष होत असेल तर येथे उभेच राहा, पळून जाऊ नका आणि जर तुम्हांला प्राणांचा लोभ असेल तर परत जा. (एक क्षणासाठी येथे थांबू नका)’ ॥१०॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा राक्षसास्ते चतुर्दश ।
ऊचुर्वाचं सुसङ्‌क्रुद्धा ब्रह्मघ्नाः शूलपाणयः ॥ ११ ॥

संरक्तनयना घोरा रामं संरक्तलोचनम् ।
परुषा मधुराभाषं हृष्टा दृष्टपराक्रमम् ॥ १२ ॥
श्रीरामांचे हे बोलणे ऐकून ते चौदा राक्षस अत्यंत कुपित झाले. ब्राह्मणांची हत्या करणारे ते घोर निशाचर हातात शूल घेऊन क्रोधाने लाल डोळे करून कठोर वाणीने, हर्ष आणि उत्साहासह स्वभावतःच लाल नेत्र असणार्‍या मधुरभाषी श्रीरामांना, ज्यांचा पराक्रम ते पाहून चुकले होते, असे म्हणाले- ॥११-१२॥
क्रोधमुत्पाद्य नो भर्तुः खरस्य सुमहात्मनः ।
त्वमेव हास्यसे प्राणान् सद्योऽस्माभिर्हतो युधि ॥ १३ ॥
’अरे ! तू आमचे स्वामी महाकाय खर यांना क्रोध आणला आहेस, म्हणून आमच्या हातून युद्धात मारला जाऊन तू स्वतःच तात्काळ आपले प्राण गमावून बसशील.’ ॥१३॥
का हि ते शक्तिरेकस्य बहूनां रणमूर्धनि ।
अस्माकमग्रतः स्थातुं किं पुनर्योद्धुमाहवे ॥ १४ ॥
’आम्ही बरेच जण आहोत आणि तू एकटा आहेस, तुझी काय शक्ती आहेस की तू आमच्या समोर रणभूमीवर उभा तरी राहू शकशील ? मग युद्ध करणे तर फारच दूरची गोष्ट आहे.’ ॥१४॥
एभिर्बाहुप्रयुक्तैश्च परिघैः शूलपट्टिशैः ।
प्राणांस्त्यक्षसि वीर्यं च धनुश्च करपीडितम् ॥ १५ ॥
’आमच्या भुजांच्या द्वारे सोडले गेलेल्या या परिध, शूल आणि पट्टिशांचा मार खावून तू आपल्या हातात दाबून धरलेल्या या धनुष्याचा बल पराक्रमाच्या अभिमानाचा तसेच आपल्या प्राणांचाही एकाच वेळी त्याग करशील.’ ॥१५॥
इत्येवमुक्त्वा संरब्धा राक्षसास्ते चतुर्दश ।
उद्यतायुधानिस्त्रिंशा राममेवाभिदुद्रुवुः ॥ १६ ॥
असे म्हणून क्रोधाने भडकलेले ते चौदा राक्षस तर्‍हे-तर्‍हेची आयुधे आणि तलवारी घेऊन श्रीरामांवर तुटून पडले. ॥१६॥
चिक्षिपुस्तानि शूलानि राघवं प्रति दुर्जयम् ।
तानि शूलानि काकुत्स्थः समस्तानि चतुर्दश ॥ १७ ॥
त्या राक्षसांनी दुर्जय वीर श्रीराघवेन्द्रांवर ते शूल फेकले परंतु काकुत्स्थांनी त्या समस्त चौदा शूलांना तितक्याच सुवर्णभूषित बाणांनी तोडून टाकले. ॥१७॥
तावद्‌भिरेव चिच्छेद शरैः काञ्चनभूषितैः ।
ततः पश्चान्महातेजा नाराचान् सूर्यसंनिभान् ॥ १८ ॥

जग्राह परमक्रुद्धश्चतुर्दश शिलाशितान् ।
गृहीत्वा धनुरायम्य लक्ष्यानुद्दिश्य राक्षसान् ॥ १९ ॥

मुमोच राघवो बाणान् वज्रानिव शतक्रतुः ।
तत्पश्चात महातेजस्वी राघवांनी अत्यंत कुपित होऊन सहाणेवर घासून तेज केले गेलेले सूर्यतुल्य तेजस्वी चौदा नाराच हातात घेतले. नंतर धनुष्य घेऊन त्याच्यावर ते बाण ठेवले आणि कानापर्यंत खेचून राक्षसांना लक्ष्य करून ते बाण सोडले; जणू काही इंद्राने वज्रांचाच प्रहार केला असावा. ॥१८-१९ १/२॥
ते भित्त्वा रक्षसां वेगाद् वक्षांसि रुधिरप्लुताः ॥ २० ॥

विनिष्पेतुस्तदा भूमौ वल्मीकादिव पन्नगाः ।
ते बाण अत्यंत वेगाने त्या राक्षसांची छाती भेदून रक्तात बुडून बाहेर पडले आणि वारूळांतून बाहेर आलेल्या सर्पांप्रमाणे तात्काळ पृथ्वीवर पडले. ॥२० १/२॥
तैभग्नहृदया भूमौ छिन्नमूला इव द्रुमाः ॥ २१ ॥

निपेतुः शोणितस्नाता विकृता विगतासवः ।
त्या नाराच्यांनी हृदय विदीर्ण झाल्यामुळे ते राक्षस मुळापासून तोडून टाकलेल्या वृक्षांप्रमाणे धराशायी झाले. ते सर्वच्या सर्व रक्ताने न्हाऊन निघाले होते. त्यांची शरीरे विकृत झाली होती. याच अवस्थेत त्यांचे प्राण निघून गेले. ॥२१ १/२॥
तान् भूमौ पतितान् दृष्ट्‍वा राक्षसी क्रोधमूर्च्छिता ॥ २२ ॥

उपगम्य खरं सा तु किञ्चित्संशुष्कशोणिता ।
पपात पुनरेवार्ता सनिर्यासेव वल्लरी ॥ २३ ॥
त्या सर्वांना पृथ्वीवर पडलेले पाहून ती राक्षसी क्रोधाने मूर्च्छित झाली आणि खराजवळ जाऊन पुन्हा आर्तभावाने जमीनीवर कोसळली. तिचे कापलेले कान आणि नाक यांचे रक्त सुकून गेले होते त्यामुळे गोंदयुक्त लतेप्रमाणे ती प्रतीत होत होती. ॥२२-२३॥
भ्रातुः समीपे शोकार्ता ससर्ज निनदं महत् ।
सस्वरं मुमुचे बाष्पं विवर्णवदना तदा ॥ २४ ॥
भावाजवळ येऊन शोकाने पीडित झालेली शूर्पणखा फार जोराने आर्तनाद करून स्फुंदून स्फुंदून रडू लागली आणि अश्रु ढाळू लागली. त्यावेळी तिच्या मुखाची कांती फिकी पडली होती. (ती विवर्णवदना झाली होती.) ॥२४॥
निपातितान् प्रेक्ष्य रणे तु राक्षसान्
प्रधाविता शूर्पणखा पुनस्ततः ।
वधं च तेषां निखिलेन रक्षसां
शशंस सर्वं भगीनी खरस्य सा ॥ २५ ॥
रणभूमीत ते राक्षस मारले गेलेले पाहून खराची बहीण शूर्पणखा पुन्हा तेथून पळून आली. तिने त्या समस्त राक्षसांच्या वधाचा समाचार भावाला ऐकविला. ॥२५॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे विंशः सर्गः ॥ २० ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा विसावा सर्ग पूरा झाला. ॥२०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP