रावणस्य महिष्मत्यां गमनं, तत्रत्यं राजानं अर्जुनं अनुपलभ्य मन्त्रिभिः सह तेन विन्ध्यगिरिपार्श्वे नर्मदायां स्नात्वा भगवतः शिवस्य समाराधनम् -
|
रावणाचे महिष्मतीपुरीत जाणे, तेथील राजा अर्जुन याची भेट न झाल्याने मंत्र्यांसहित त्याचे विंध्यगिरिसमीप नर्मदेमध्ये न्हाऊन भगवान् शिवाची आराधाना करणे -
|
ततो रामो महातेजा विस्मयात् पुनरेव हि । उवाच प्रणतो वाक्यं अगस्त्यं ऋषिसत्तमम् ॥ १ ॥
|
त्यानंतर महातेजस्वी श्रीरामांनी मुनिश्रेष्ठ अगस्त्यांना प्रणाम करून पुन्हा विस्मयपूर्वक विचारले - ॥१॥
|
भगवन् राक्षसः क्रूरो यदाप्रभृति मेदिनीम् । पर्यटत्किं तदा लोकाः शून्या आसन् द्विजोत्तम ॥ २ ॥
|
भगवन् ! द्विजश्रेष्ठ ! जेव्हा क्रूर निशाचर रावण पृथ्वीवर विजय प्राप्त करीत फिरत होता, त्या समयी येथील सर्व लोक काय शौर्यसंबंधी गुणरहित झालेले होते की काय ? ॥२॥
|
राजा वा राजमात्रो वा किं तदा नात्र कश्चन । धर्षणं यत्र न प्राप्तो रावणो राक्षसेश्वरः ॥ ३ ॥
|
त्या काळात येथे कोणीही क्षत्रिय नरेश अथवा क्षत्रियेत्तर राजा रावणापेक्षा अधिक बलवान् नव्हता कां ? की ज्यायोगे या भूतलावर पोहोचून राक्षसराज रावणाला पराजित अथवा अपमानित व्हावे लागले नाही ? ॥३॥
|
उताहो हतवीर्यास्ते बभूवुः पृथिवीक्षितः । बहिष्कृता वरास्त्रैश्च बहवो निर्जिता नृपाः ॥ ४ ॥
|
अथवा त्या समयी सर्व राजे पराक्रमशून्य तसे शस्त्रज्ञान रहित झाले होते, ज्यायोगे बहुसंख्य श्रेष्ठ नरपालांना रावणाकडून परास्त व्हावे लागले. ॥४॥
|
राघवस्य वचः श्रुत्वा ह्यगस्त्यो भगवानृषिः । उवाच रामं प्रहसन् पितामह इवेश्वरम् ॥ ५ ॥
|
राघवांचे हे वचन ऐकून भगवान् अगस्त्यमुनि खदखदून हसू लागले आणि ब्रह्मदेव महादेवांना काही गोष्ट सांगत असावेत त्याप्रमाणे रामांना म्हणाले - ॥५॥
|
इत्येवं बाधमानस्तु पार्थिवान् पार्थिवर्षभ । चचार रावणो राम पृथिवीं पृथिवीपते ॥ ६ ॥
|
पृथ्वीनाथ ! भूपाल शिरोमणे ! हे रामा ! याप्रकारे सर्व राजांना सतावत आणि पराजित करत रावण या पृथ्वीवर विचरण करू लागला. ॥६॥
|
ततो माहिष्मतीं नाम पुरीं स्वर्गपुरीप्रभाम् । सम्प्राप्तो यत्र सान्निध्यं सदासीद् वसुरेतसः ॥ ७ ॥
|
फिरत फिरत तो स्वर्गपुरी अमरावती समान सुशोभित होत असलेल्या महिष्मती नामक नगरात जाऊन पोहोचला, जेथे अग्निदेव सदा विद्यमान राहात असतात. ॥७॥
|
तुल्य आसीत् नृपस्तस्य प्रभावाद् वसुरेतसः । अर्जुनो नाम यत्राग्निः शरकुण्डेशयः सदा ॥ ८ ॥
|
त्या अग्निदेवाच्या प्रभावाने तेथे अग्निसमानच तेजस्वी अर्जुन नामक राजा राज्य करीत होता, ज्याच्या राज्यकाळात कुशास्तरणाने युक्त अग्निकुण्डात सदा अग्निदेव निवास करीत होते. ॥८॥
|
तमेव दिवसं सोऽथ हैहयाधिपतिर्बली । अर्जुनो नर्मदां रन्तुं गतः स्त्रीभिः सहेश्वरः ॥ ९ ॥
|
ज्या दिवशी रावण तेथे पोहोचला, त्याच दिवशी बलवान् हैहयराज राजा अर्जुन आपल्या स्त्रियांसह नर्मदा नदीमध्ये जलक्रीडा करण्यासाठी गेलेला होता. ॥९॥
|
तमेव दिवसं सोऽथ रावणस्तत्र आगतः । रावणो राक्षसेन्द्रस्तु तस्यामात्यानपृच्छत ॥ १० ॥
|
त्याच दिवशी रावण महिष्मती पुरीमध्ये आला. तेथे येऊन राक्षसराज रावणाने राजाच्या मंत्र्यांना विचारले - ॥१०॥
|
क्वार्जुनो नृपतिः शीघ्रं सम्यगाख्यातुमर्हथ । रावणोऽहमनुप्राप्तो युद्धेप्सुर्नृवरेण ह ॥ ११ ॥
|
मंत्र्यांनो ! शीघ्र आणि ठीक ठीक सांगा की राजा अर्जुन कोठे आहे ? मी रावण आहे आणि तुमच्या महाराजांशी युद्ध करण्यासाठी आलो आहे. ॥११॥
|
ममागमनमप्यग्रे युष्माभिः संनिवेद्यताम् । इत्येवं रावणेनोक्तास्ते अमात्याः सुविपश्चितः ॥ १२ ॥ अब्रुवन् राक्षसपतिं असान्निध्यं महीपतेः ।
|
तुम्ही लोक प्रथम जाऊन त्यांना माझ्या आगमनाची सूचना द्या. रावणाने असे सांगितल्यावर राजाच्या विद्वान मंत्र्यांनी राक्षसराजाला सांगितले की आमचे महाराज या समयी राजधानीत नाही आहेत. ॥१२ १/२॥
|
श्रुत्वा विश्रवसः पुत्रः पौराणामर्जुनं गतम् ॥ १३ ॥ अपसृत्यागतो विन्ध्यं हिमवत्संनिभं गिरिम् ।
|
पुरवासी लोकांकडून राजा अर्जुनाच्या बाहेर जाण्याची गोष्ट ऐकून विश्रवाचा पुत्र रावण तेथून बाजूस सरून हिमालयासमान विशाल विंध्यगिरिवर आला. ॥१३ १/२॥
|
स तमभ्रमिवाविष्टं उद्भ्रन्तमिव मेदिनीम् ॥ १४ ॥ अपश्यद् रावणो विन्ध्यं आलिखन्तमिवाम्बरम् । सहस्रशिखरोपेतं सिंहाध्युषितकन्दरम् ॥ १५ ॥
|
तो इतका उंच होता की त्याचे शिखर जणु ढगात सामावले गेल्यासारखे भासत होते तसेच तो पर्वत पृथ्वी फोडून वर आल्याप्रमाणे प्रतीत होत होता. विंध्याची गगनचुंबी शिखरे आकाशात जणु रेखा ओढावी तशी भासत होती. रावणाने तो महान् शैल पाहिला. तो आपल्या हजारो शृगांनी सुशोभित होत होता आणि त्याच्या कंदरांतून सिंह निवास करीत होते. ॥१४-१५॥
|
प्रपातपतितैः शीतैः साट्टहासमिवाम्बुभिः । देवदानवगन्धर्वैः साप्सरोभिः सकिन्नरैः ॥ १६ ॥ स्वस्त्रीभिः क्रीडमानैश्च स्वर्गभूतं महोच्छ्रयम् ।
|
त्याच्या सर्वोच्च शिखराच्या तटापासून ज्या शीतल जलधारा पडत होत्या त्यांच्या द्वारा जणु तो पर्वत अट्टहास करीत असावा असे वाटत होते. देवता, दानव, गंधर्व आणि किन्नर आपापल्या स्त्रिया आणि अप्सरांसह तेथे क्रीडा करत होते. तो अत्यंत उंच पर्वत आपल्या सुरम्य सुषमेने स्वर्गासमान सुशोभित होत होता. ॥१६ १/२॥
|
नदीभिः स्यन्दमानाभिः स्फटिकप्रतिमं जलम् ॥ १७ ॥ फणाभिश्चलजिह्वाभिः अनन्तमिव विष्ठितम् । उत्क्रामन्तं दरीवन्तं हिमवत्संनिभं गिरिम् ॥ १८ ॥
|
स्फटिकासमान निर्मळ जलाचे स्त्रोत वाहविणार्या नद्यांमुळे तो विंध्यगिरि चंचल जिव्हांच्या फणांनी उपलक्षित शेषनागाप्रमाणे स्थित होता. अधिक उंचीमुळे तो जणु उर्ध्वलोकास जात असल्या सारखा भासत होता. हिमालयासारखा विशाल आणि विस्तृत विंध्यगिरि बर्याच गुफांनी युक्त दिसून येत होता. ॥१७-१८॥
|
पश्यमानस्ततो विन्ध्यं रावणो नर्मदां ययौ । चलोपलजलां पुण्यां पश्चिमोदधिगामिनीम् ॥ १९ ॥ महिषैः सृमरैः सिंहैः शार्दूलर्क्षगजोत्तमैः । उष्णाभितप्तैस्तृषितैः सङ्क्षोभितजलाशयाम् ॥ २० ॥
|
विंध्याचलाची शोभा पहात रावण पुण्यसलिला नर्मदा नदीच्या तटावर गेला, जिच्यामध्ये शिलाखण्डांनी युक्त चंचल जल प्रवाहित होत होते. उन्हांनी संतप्त झालेले तृषित रेडे, हरणे, सिंह, व्याघ्र, अस्वले आणि गजराज त्याच्या जलाशयाला विक्षुब्ध करून राहिले होते. ॥१९-२०॥
|
चक्रवाकैः सकारण्डैः सहंसजलकुक्कुटैः । सारसैश्च सदा मत्तैः सुकूजद्भिः समावृताम् ॥ २१ ॥
|
सदा मत्त होऊन कलरव करणारे चक्रवाक, कारण्डव, हंस, जलकुक्कुट आणि सारस आदि जलपक्षी नर्मदेच्या जलराशीवर पसरले होते. ॥२१॥
|
फुल्लद्रुमकृतोत्तंसां चक्रवाकयुगस्तनीम् । विस्तीर्णपुलिनश्रोणीं हंसावलिसुमेखलाम् ॥ २२ ॥ पुष्परेण्वनुलिप्ताङ्गीं जलफेनामलांशुकाम् । जलावगाहसंस्पर्शां फुल्लोत्पलशुभेक्षणाम् ॥ २३ ॥ पुष्पकादवरुह्याशु नर्मदां सरितां वराम् । इष्टामिव वरां नारीं अवगाह्य दशाननः ॥ २४ ॥ स तस्याः पुलिने रम्ये नानामुनिनिषेविते । उपोपविष्टैः सचिवैः सार्धं राक्षसपुङ्गवः ॥ २५ ॥
|
सरितांमध्ये श्रेष्ठ नर्मदा परम सुंदर प्रियतम नारीप्रमाणे प्रतीत होत होती. फुललेले तटवर्ती वृक्ष जणुं तिची आभूषणे होती. चक्रवाकांच्या जोड्या तिच्या दोन्ही स्तनांचे स्थान ग्रहण करीत होत्या. उंच आणि विस्तृत पुलिन नितंबासमान भासत होते. हंसांच्या पंक्ति मोत्यांच्या बनलेल्या मेखले (कमरपट्या) प्रमाणे शोभत होत्या. पुष्पांचे परागच अंगराग बनून तिच्या अंगोपांगी अनुलिप्त होऊन राहिले होते. जलाचा उज्ज्वल फेनच तिच्या स्वच्छ श्वेत साडीचे काम करीत होता. जलात बुडी मारणे हाच तिचा सुखद संस्पर्श होता आणि फुललेली कमळेच तिचे सुंदर नेत्र भासत होते. राक्षस शिरोमणी दशमुख रावणाने तात्काळच पुष्पक विमानांतून उतरून नर्मदेच्या जलात बुडी मारली आणि बाहेर निघून तो नाना मुनिंच्या द्वारा सेवित तिच्या रमणीय तटावर आपल्या मंत्र्यांसह बसला. ॥२२-२५॥
|
प्रख्याय नर्मदां सोऽथ गङ्गेयमिति रावणः । नर्मदादर्शने हर्षं आप्तवान् स दशाननः ॥ २६ ॥
|
ही साक्षात् गंगा आहे असे म्हणून दशानन रावणाने नर्मदेची प्रशंसा केली आणि तिच्या दर्शनाने हर्षाचा अनुभव घेतला. ॥२६॥
|
उवाच सचिवांस्तत्र सलीलं शुकसारणौ । एष रश्मिसहस्रेण जगत् कृत्वेव काञ्चनम् ॥ २७ ॥ तीक्ष्णतापकरः सूर्यो नभसो मध्यमास्थितः ।
|
नंतर त्याने शुक, सारण तसेच अन्य मंत्र्यांना लीलापूर्वक म्हटले -हे सूर्यदेव आपल्या सहस्त्र किरणांनी संपूर्ण जगताला जणु कांचनमय बनवून प्रचण्ड ताप देत या समयी आकाशाच्या मध्यभागी विराजत आहेत. ॥२७ १/२॥
|
मामासीनं विदित्वैव चन्द्रायति दिवाकरः ॥ २८ ॥ नर्मदाजलशीतश्च सुगन्धिः श्रमनाशनः । मद्भयाद् अनिलो ह्येष वात्यसौ सुसमाहितः ॥ २९ ॥
|
परंतु मला येथे बसलेला जाणूनच ते चंद्रम्यासमान शीतल झाले आहेत. माझ्याच भयाने वायुही नर्मदेच्या जलाने शीतल, सुगंधित आणि श्रमनाशक होऊन अत्यंत सावधानपणे मंदगतिने वहात आहे. ॥२८-२९॥
|
इयं वापि सरिच्छ्रेष्ठा नर्मदा नर्मवर्धिनी । नक्रमीनविहङ्गोर्मिः सभयेवाङ्गना स्थिता ॥ ३० ॥
|
सरितांमध्ये श्रेष्ठ ही नर्मदाही क्रीडारस आणि प्रीतिला वाढवीत आहे. तिच्या लहरींमध्ये मगर, मत्स्य आणि जलपक्षी खेळत राहिले आहेत आणि ती भयभीत नारीसमान स्थित आहे. ॥३०॥
|
तद्भवन्तः क्षताः शस्त्रैः नृपैरिन्द्रसमैर्युधि । चन्दनस्य रसेनेव रुधिरेण समुक्षिताः ॥ ३१ ॥
|
तुम्ही लोक युद्धस्थळी इंद्रतुल्य पराक्रमी नरेशांच्या द्वारा अस्त्र-शस्त्रांनी घायाळ केले गेलेले आहात आणि रक्ताने अशा प्रकारे न्हाऊन निघाला आहात की जणु तुमच्या अंगाला रक्तचंदनाच्या रसाचा लेपच लावला गेला आहे, असे वाटत आहे. ॥३१॥
|
ते यूयमवगाहध्वं नर्मदां शर्मदां शुभाम् ।
सार्वभौममुखा मत्ता गङ्गामिव गहागजाः ॥ ३२ ॥
|
म्हणून तुम्ही सर्वच्या सर्व सुख देणार्या या मंगलकारिणी नर्मदा नदीमध्ये स्नान करा. ज्याप्रमाणे सार्वभौम आदि महान् दिग्गज मत्त होऊन ज्याप्रमाणे गंगेत अवगाहन करतात (तसे तुम्ही येथे करा.) ॥३२॥
|
अस्यां स्नात्वा महानद्यां पाप्मानं विप्रमोक्ष्यथ । अहमप्यद्य पुलिने शरदिन्दुसमप्रभे ॥ ३३ ॥
पुष्पोपहारं शनकैः करिष्यामि कपर्दिनः ।
|
या महानदीत स्नान करून तुम्ही पाप-तापापासून मुक्त होऊन जा. मीही आज शरद ऋतुच्या चंद्रम्याप्रमाणे उज्ज्वल नर्मदा-तटावर हळू हळू जटाजूटधारी महादेवांना फुलांचा उपहार समर्पित करीन. ॥३३ १/२॥
|
रावणेनैवमुक्तास्तु प्रहस्तशुकसारणाः ॥ ३४ ॥
समहोदरधूम्राक्षा नर्मदां विजगाहिरे ।
|
रावणाने असे म्हटल्यावर प्रहस्त, शुक, सारण, महोदर आणि धूम्राक्षाने नर्मदेत स्नान केले. ॥३४ १/२॥
|
राक्षसेन्द्रगजैस्तैस्तु क्षोभिता नर्मदा नदी ॥ ३५ ॥
वामनाञ्जनपद्माद्यैः गंगा इव महागजैः ।
|
राक्षसराजांच्या सेनेतील हत्तीनी नर्मदा नदीत उतरून, तिच्या जलाला मथून काढले, जणु वामन, अञ्जन, पद्म आदि मोठ मोठ्या दिग्गजांनी गंगेच्या जलाला विक्षुब्ध करून टाकले असावे. ॥३५ १/२॥
|
ततस्ते राक्षसाः स्नात्वा नर्मदायां महाबलाः ॥ ३६ ॥
उत्तीर्य पुष्पाण्याजह्रुः बल्यर्थं रावणस्य तु ।
|
तदनंतर ते महाबली राक्षस नर्मदेत स्नान करून बाहेर आले आणि रावणाच्या शिवपूजनासाठी पुष्पे एकत्रित करू लागले. ॥३६ १/२॥
|
नर्मदापुलिने हृद्ये शुभ्राभ्रसदृशप्रभे ॥ ३७ ॥
राक्षसैस्तु मुहूर्तेन कृतः पुष्पमयो गिरिः ।
|
श्वेत ढगांप्रमाणे शुभ्र आणि मनोरम नर्मदा पुलिनवर त्या राक्षसांनी एका मुहूर्तामध्ये फुलांचा डोंगरासारखा ढीग तयार केला. ॥३७ १/२॥
|
पुष्पेषूपहृतेष्वेवं रावणो राक्षसेश्वरः ॥ ३८ ॥
अवतीर्णो नदीं स्नातुं गङ्गामिव महागजः ।
|
याप्रकारे पुष्पांचा संचय झाल्यावर राक्षसराज रावण स्वतः स्नान करण्यासाठी नर्मदेत उतरला, जणु कुणी महान् गजराज गंगेत अवगाहन करण्यासाठी घुसला असावा. ॥३८ १/२॥
|
तत्र स्नात्वा च विधिवत् जप्त्वा जप्यमनुत्तमम् ॥ ३९ ॥
नर्मदासलिलात् तस्माद् उत्ततार स रावणः ।
|
तेथे विधिपूर्वक स्नान करून रावणाने परम उत्तम जपनीय मंत्राचा जप केला. यानंतर तो नर्मदेच्या जलातून बाहेर निघाला. ॥३९ १/२॥
|
ततः क्लिन्नाम्बरं त्यक्त्वा शुक्लवस्त्रसमावृतः ॥ ४० ॥
रावणं प्राञ्जलिं यान्तं अन्वयुः सर्वराक्षसाः । तद्गतीवशमापन्ना मूर्तिमन्त इवाचलाः ॥ ४१ ॥
|
नंतर ओले कपडे उतरवून त्याने श्वेतवस्त्र धारण केले. यानंतर तो हात जोडून महादेवांच्या पूजेसाठी निघाला. त्यासमयी सर्व राक्षसही त्याच्या मागे निघाले जणुं मूर्तिमंत पर्वतच त्याच्या गतिच्या अधीन होऊन खेचले जाऊन चालत राहिले आहेत. ॥४०-४१॥
|
यत्र यत्र च याति स्म रावणो राक्षसेश्वरः । जाम्बूनदमयं लिङ्गं तत्र तत्र स्म नीयते ॥ ४२ ॥
|
राक्षसराज रावण जेथे जेथे जात होता, तेथे तेथे एक सुवर्णमय शिवलिंग आपल्या बरोबर घेऊन जात असे. ॥४२॥
|
वालुकावेदिमध्ये तु तल्लिङ्गं स्थाप्य रावणः । अर्चयामास गन्धैश्च पुष्पैश्चामृतगन्धिभिः ॥ ४३ ॥
|
रावणाने वाळूच्या वेदीवर त्या शिवलिंगाची स्थापना केली आणि चंदन तसेच अमृतासमान सुगंध असलेल्या पुष्पांनी त्याचे पूजन केले. ॥४३॥
|
ततः सतामार्तिहरं परं वरं वरप्रदं चन्द्रमयूखभूषणम् । समर्चयित्वा स निशाचरो जगौ प्रसार्य हस्तान् प्रणनर्त चाग्रतः ॥ ४४ ॥
|
जो आपल्या ललाटावर चंद्रकिरणांना आभूषणरूपाने धारण करतो, सत्पुरूषांची पीडा हरण करतो, त्या श्रेष्ठ आणि उत्कृष्ट देवतेचे, भगवान् शंकारांचे उत्तम प्रकारे पूजन करून तो निशाचर त्यांच्या समोर गाऊ आणि हात पसरून नाचू लागला. ॥४४॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकत्रिंशः सर्गः ॥ ३१ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा एकतिसावा सर्ग पूरा झाला. ॥३१॥
|