॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय चव्वेचाळिसावा ॥
औषधी आणण्याची हनुमंताला प्रार्थना

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


रणीं दंडोनि रावणासी । सावध करावें सौ‍मित्रासी ।
राम आला अति स्नेहेंसी । जीवीं जीवासीं जीवन ॥ १ ॥
राम जगाचें जीवन । राम जीवाचें चिद्धन ।
सखा आत्माराम आपण । राम परिपूर्ण परब्रह्म ॥ २ ॥
तोचि राम स्वयें आपण । वांचवावया लक्ष्मण ।
कृपाळु संतुष्टला संपूर्ण । त्यासीं कल्पांती मरण असेना ॥ ३ ॥
राम निजज्ञानें अति समर्थ । तोही वानरांचे विचारांत ।
अनुसरला स्वयें वर्तत । अनुचरित लक्षूनी ॥ ४ ॥


विश्रम्य स्वस्थमालोक्य सुषेणं राघवोऽब्रवीत् ।
एष रावणवेगेन लक्ष्मणः पतितो भुवि ॥१॥
सर्पवच्चेष्टते वीरो मम शोकमुदिरयन् ॥२॥

लक्ष्मणाला मूर्च्छा आणि रामांचा शोक :

भूत भविष्य वर्तमान । सर्वही जाणे रघुनंदन ।
तरी मनुष्यनट्यविडंबन । स्वयें आपण दावित ॥ ५ ॥
विकळ देखोनि लक्ष्मण । जाणोनि भविष्याचें चिन्ह ।
वृथा करी विलपन । तेंही लक्षण अवधारा ॥ ६ ॥
लक्ष्मण देखोनी रुधिरोक्षित । धरोनी सुषेणाचा हात ।
बंधुस्नेहें कळवळीत । काय बोलत श्रीराम ॥ ७ ॥
प्राणापरीस अधिक जाण । सखा बंधु लक्ष्मण ।
मज एकलें सांडून । स्वयें प्रयाण मांडिलें ॥ ८ ॥
सखे बंधु दोघे जण । येरयेरांचा आश्रम धरोन ।
वना निघलों आपण । पितृवचन पाळावया ॥ ९ ॥
वचन एकें सुषेणा । लक्ष्मणें वेंचलिया प्राणां ।
मज चाड नाहीं निजप्राणां । येरा जणां काय चाड ॥ १० ॥
बुडालें धैर्य वीर्य । बुडालें माझें परम शौर्य ।
बुडालें यश सर्व । बंधु स्वयमेव अंतरला ॥ ११ ॥
बुडाली माझी धृति कीर्ती । बुडाली माझी शौर्यशक्ती ।
बुडाली माझी परम ख्याती । बंधु निश्चितीं अंतरला ॥ १२ ॥
नेत्रा येतसे अंधारी । गात्रें कापती थरथरीं ।
धनुष्य न धरवे करीं । धीर निर्धारी न धरवे ॥ १३ ॥
प्राण जाती विकळ । मति न स्मरे अळुमाळ ।
वाचा जातसे बरळ । शरीर चळचळ कांपत ॥ १४ ॥
आतां मज युद्धाचे कार्य कोण । यश कोण घे आपण ।
कोण कार्य बधून रावण । बंधु लक्ष्मण अंतरला ॥ १५ ॥
चाड नाहीं विजय वृत्ती । चाड नाहीं धृतिगती ।
चाड नाहीं यशकीर्ती । बंधु निश्चिती अंतरला ॥ १६ ॥
जीविताची चाड कोण । उभ्याच मी सांडीन प्राण ।
या जिण्याचें सुख कोण । बंधु लक्ष्मण अंतरला ॥ १७ ॥
धांव पाव रे लक्ष्मणा । कां करितोसी प्रयाणा ।
मज सोडोनि दीनवदना । कोण्या स्थान जातोसी ॥ १८ ॥
वनीं मी पिडलासी रे उपवासीं । म्हणोनियां रुसून जातोसी ।
कीं युद्ध करितां भागलासी । म्हणोनि जासी विसांवया ॥ १९ ॥
इंद्रजितासारिखा रणयोद्धा । रणीं श्रमलासी तूं करितां द्वंद्वा ।
कीं सीता बोलली अपवादा । त्या विषादा मानिलें ॥ २० ॥
लक्ष्मणा ये रे ये रे । परतोनि मज भेटी दे रे ।
मजवरी रुसलासी कां रे । दोघेही वनींचे सांगती ॥ २१ ॥
तुजवीण न घें जीवन । सर्वथा न सेवीं अन्न ।
न करीं अयोध्यागमन । उभ्यां प्राण सांडीन ॥ २२ ॥
सीता न लगे मज सर्वथा । काय तोंड दाखवूं त्या भरता ।
काय उत्तर देऊं तिघी मातां । बंधु सर्वथा अंतरला ॥ २३ ॥
शत्रुघ्न मज पुसेल जेव्हां । काय मी मुख दावूं तेव्हां ।
गेला सर्व सुखाचा ओलावा । जीवीं जीवा आकांत ॥ २४ ॥
म्हणवोनि घातली लोळणी । अंग टाकिलें धरणीं ।
लक्ष्मणें मोकलिलें रणीं । कोण शिराणी जिण्याची ॥ २५ ॥
वक्षःस्थळ पिटी हातें । डोयी पिटी धरणीतें ।
विकळ जातां सर्व सामर्थ्यें । सुषणें तेथें धरियेलें ॥ २६ ॥
महामेरु कडाडितां । की धैर्याचा स्तंभ पडतां ।
की तारूं समुद्रीं बुडतां । झाला राखता सुषेण ॥ २७ ॥
मरतया अमृतपान । कीं दुकाळिया मिष्टान्न ।
कीं अवर्षणीं वर्षे घन । तेंवी वचन सुषेणाचें ॥ २८ ॥


राममेवं ब्रुवाणं तु शोकविह्वलितेंद्रियम् ।
आश्वासयत्‍नुवाचेदं सुषेणः परमं वचः ॥३॥
त्यजेमां नरशार्दूल बुद्धिवैक्लव्यकारिणीम् ।
शोकसंजीविनी चिंता बाणैस्तुल्या चमूमुखे ॥४॥
नैव पंचत्वमापन्नो लक्ष्मणो लक्ष्मिवर्धनः ।
न ह्यस्य विकलं वक्त्रं नैव श्यामत्वमागतम् ॥५॥
सुप्रभं च प्रसन्नं च सुखमस्य निरीक्ष्यताम् ।
पद्मपत्रातिभौ हस्तौ सुप्रसन्ने च लोचने ॥६॥
नेहशं दृश्यते रुपं गतासूनां विशांपते ।
विषादं मा कृथाः शूर सप्राणोऽयमरिंदम ॥७॥
पश्य चास्य प्रसुप्तस्य स्वस्थगात्रस्य भूतले ।
सोल्लासं हृदयं वीर कंपमानं मुहुर्महुः ॥८॥

सुषेणाचे श्रीरामांना आश्वासन :

ऐकें स्वामी रघुनंदन । तुं सर्वदा पैं सावधान ।
बंधुवैकल्यवासना जाण । झणीं मना धरितोसी ॥ २९ ॥
उभा राहोनि चमूमुखासीं । चिंतेचें बाण हृदयीं घेसी ।
तेणें अत्यंत दुःखी होसी । ऐसें मानसीं न धरावें ॥ ३० ॥
नाहीं पंचत्व पावला । नाहीं याचा प्राण गेला ।
जीवनश्रियेनें असे भरला । नाहीं निमाला सर्वथा ॥ ३१ ॥
विशीर्ण न दिसे याचें वदन । नाहीं पालटलें देहचिन्ह ।
नाहीं काळिमा चढली जाण । जीवें लक्ष्मण जीत असे ॥ ३२ ॥
श्रीरामा पाहें सावधान । सुप्रसन्न याचें वदन ।
पद्मदळासारिखें जाण । मुखचिन्ह दिसताहे ॥ ३३ ॥
सुकुमार याचें करकमळ । शीतळ न लागती चरणतळ ।
टवटवीत नेत्रयुगळ । लक्ष्मण विकळ नाहीं रामा ॥ ३४ ॥
प्राणहीन पैं शरीर । याचें न देखों साचार ।
सावधान याचीं गात्रें वक्त्र । शेषावतार हा होय ॥ ३५ ॥
सावध ऐकें रघुनंदना । अरिगजसैन्यपंचानना ।
राक्षसकुळनिभंजना । बंधुरत्‍ना भय नाहीं ॥ ३६ ॥
शक्ति भेदें लक्ष्मण । पडला असतांही जाण ।
सर्वथा नाहीं विसंज्ञ । तेंही चिन्ह अवधारीं ॥ ३७ ॥
जरी दिसताहे विकळ । तरी पाटव्य असे प्रबळ ।
धुकधुकीत नेत्रकमळ । अळुमाळ दिसताहे ॥ ३८ ॥
सर्वथा यासीं भय नाहीं । हें मी जाणतसें पाहीं ।
प्रतिज्ञा करितों तुझे पायीं । भय नाहीं लक्ष्मणा ॥ ३९ ॥
मी जाणतसें वैद्यक् । प्रेतचिन्ह आवश्य ।
सौ‍मित्रा भय नाहीं देख । प्रतिज्ञा सुटंक वदतसें ॥ ४० ॥
शक्ति भेदली हृदयसंधीं । त्यासीं उपाय ऐक कृपानिधी ।
एक वेळां आणोनि दिव्यौषधी । बंधु सुबुद्धि वाचवीं ॥ ४१ ॥
म्हणसी ओषधि येते कैसेन । त्या उपायासी सांगेन ।
एक वेळां प्रार्थून वायुनंदन । औषधि जाण आणाव्या ॥ ४२ ॥
जंव नव्हे सूर्योदयो । तंव ओषधि आणाव्या पहाहो ।
उदया येतां कश्यपतयो । कार्यान्वयो साधेना ॥ ४३ ॥
उदया येतां गभस्ती । ओषधि प्राप्त नव्हती ।
आणी अनावर ब्रह्मशक्ती । ऊर्मिळापती न वांचे ॥ ४४ ॥
साधावया या कर्यासी । सामर्थ्य एक हनुमंतासी ।
इतरांची गति कायसी । लक्ष्मणासी वांचवावया ॥ ४५ ॥
इतुकें सांगोनि श्रीरामासी । सवेंची सांगे हनुमंतासी ।
आजि सौ‍मित्र वांचवावयासी । तूंचि होती प्राणदाता ॥ ४६ ॥


एवमुक्त्वा महाप्राज्ञः सुषेणो राघवं वचः ।
समीपस्थमुवाचेदं हनूमंतं प्लवंगमम् ॥९॥
सौ‍म्य शिघ्रमितो गत्वा शैलं तं तु महोदयम् ।
पूर्वं वै कथितो योसौ वीरजाम्बवता तव ॥१०॥
दक्षिणे शिखरे जातामोषधिं तामिहानय ॥११॥

सुषेणाची हनुमंताला औषधी आणण्याची विनंती :

जवळी बोलावोनी वायुनंदन । गुज सांगे सुषेण ।
लक्ष्मण पडिला विसंज्ञ । त्यासी जीवदान त्वां द्यावें ॥ ४७ ॥
वांचविलिया लक्ष्मण । रामासीं सुखसमाधान ।
सुख सुग्रीवा अंगदा जाण । सुखसंपन्न वानर ॥ ४८ ॥
तूं श्रीरामाचा निजभक्त । तुज सबाह्य श्रीरघुनाथ ।
श्रीरामप्रेमें सदा डुल्लत । राम स्मरत सर्वदा ॥ ४९ ॥
तुज सर्वां भूतीं समसमान । अखंडता रामानुसंधान ।
दृश्य द्रष्टा आणि दर्शन । राम चिद्धन देखसी ॥ ५० ॥
सुग्रीव अंगद जांबवंत । नळनीळादि वानर समस्त ।
तुझेनि आम्ही रामभक्त । श्रीराम सेवित सर्वदा ॥ ५१ ॥
तुझेनि आम्हां श्रीरामभेटी । तुझेनि आम्हां श्रीरामीं गोष्टी ।
तुझेनि राम देखिला दृष्टीं । धन्य सृष्टीं तुझेनि आम्ही ॥ ५२ ॥
तुझेनि वानर वनचर । झाले श्रीरामसेवेचे किंकर ।
तुझेनि भवसमुद्र दुस्तर । झाला समग्र कोरडा ॥ ५३ ॥
जन्ममरणाचे आवर्ती । बुडत होतों मारुती ।
ते तुवां लावोनि श्रीरामभक्ती । वानरपंक्ती उद्धरिल्या ॥ ५४ ॥
हेंचि नवल सांगों किती । तुवां उद्धरिली त्रिजगती ।
तुझेनि पापी उद्धरती । पापनिर्मुक्ती तुझेनि ॥ ५५ ॥
वानरमांदीसमवेत । पीडितां उपवासीं समस्त ।
तुवां नेवोनि विवरांत । केले तृप्त फळें जळें ॥ ५६ ॥
विविरेंसहित हेमा । तुवां उद्धरिली वीरोत्तमा ।
समुद्रतीरी प्लवंगमा । मरणधर्मा चुकविलें ॥ ५७ ॥
पाखेंवीण मांसाचा गोळा । संपाती उद्धरिला कीं हेळा ।
सुद्धि लावोनि त्या काळा । समुद्रजळा आक्रमिलें ॥ ५८ ॥
छायाग्रह राक्षसी । तिणें सगळाचि गिळिलासी ।
काळीज उपटोनि वेगेंसीं । दुष्ट राक्षसी मारिली ॥ ५९ ॥
सुरसा दानवांची माता । न मारोनि गेलासी परता ।
पाय देवोनि पर्वतमाथां । तोही तत्वतां उद्धरिला ॥ ६० ॥
अति दुस्तर समुद्रतीरा । तुझा पराक्रम कपींद्रा ।
जावोनियां परतीरा । केलें चरित्रा तें ऐकें ॥ ६१ ॥
झाडा घेवोनी मध्यरात्रीं । लंका शोधिली मारुती ।
करोनि रावणासभा पालथी । सीता निश्चितीं शोधिली ॥ ६२ ॥
चौदा सहस्र वनचर । तुवां मारिले एकसर ।
झाडें झोडोनि समग्र । वन चौफेर विध्वंसिलें ॥ ६३ ॥
जंबुमाळी प्रधानपुत्र । तुवां मारिला अखयाकुमर ।
इंद्रजितासीं करोनि क्षात्र । रणीं गांजिला ॥ ६४ ॥
देखोनि संमुख रावण । तुवां करोनि पुच्छासन ।
तिखट वाग्बाणीं करुन । हृदयीं दशानन विंधिला ॥ ६५ ॥
आगी लावोनि पुच्छासीं । जाळिलें दाही मुखांसी ।
भस्म करोनि लंकेसी । सीताशुद्धीसी आणिलें ॥ ६६ ॥
एकल्या एकें आपण । अर्धरात्रीं तुवां जाण ।
आणोनि महापाषाण । सेतुबंधन संपविलें ॥ ६७ ॥
अति संकटींहि रिगम करुन । खांदीं वाहून लक्ष्मण ।
वीर इंद्रजित दारुण । तुवां एकलेन मारविला ॥ ६८ ॥
मनीं न धरवती धरितां । तीं तीं कर्में केलीं हनुमंता ।
भक्तोत्तमा कपिनाथा । श्रीरामसुखार्था बंधु उठवीं ॥ ६९ ॥
शिघ्र् जावोनि आपण । उदया न येतां भास्वान ।
वेगीं दिव्यौधींतें आणून । बंधु लक्ष्मण वांचवीं ॥ ७० ॥
पूर्वीं वीरें जांबवंतें । तुजलागीं सांगितलें होतें ।
त्याचि जावोनि द्रोणाद्रीतें । दिव्यौषधींतें आणावें ॥ ७१ ॥
त्या पर्वताच्या दक्षिणशिखरीं । दिव्यौषधि थोरथोरी ।
ऐक त्यांच्या नामांची कुसरी । सविस्तरीं सांगेन ॥ ७२ ॥
शल्यें विशल्य होती पूर्ण । विशल्यकरणीं तीस अभिधान ।
अति युक्तीनें आपण । वेगें शोधून आणावी ॥ ७३ ॥


विशल्यकरणी नाम सुवर्णकरणी शुभा ।
संजीवनार्थं वीरस्य लक्ष्मणस्य महात्मनः॥१२॥

औषधीचे गुणवर्णन :

स्वयें घाय जाती बुजोन । क्षतें कानपती आपण ।
अंगी राहों न शके वण । सुवर्णा जाण तीस नांव ॥ ७४ ॥
पानें शीतळ सुकुमार । खुपों न शकती चंद्रकर ।
फलें हिरवीं सुंदर । रक्तांबर फुलें तिचीं ॥ ७५ ॥
वांचवावया लक्ष्मण । करावें सवेग गमन ।
म्हणोनि धरिले दोन्ही चरण । वेगीं प्रयाण करावें ॥ ७६ ॥
तूं आमुचा जीवदाता । तुवां चुकविली भवव्यथा ।
बहु बोलणें न घडे सर्वथा । सद्‌गुरु तत्वतां तूं आम्हां ॥ ७७ ॥
तुझेनि चुकलों भवभ्रमा । तुझेनि आम्हां श्रीरामीं प्रेमा ।
प्रिय व्हावया वानरां आम्हां । प्लवंगमा ऊठ वेगीं ॥ ७८ ॥
चित्तीं धरोनि रघुनंदन । करावें सवेग प्रयाण ।
तेणें सकळार्थ संपादून । विजयी होऊन येशील ॥ ७९ ॥
माझेनि स्वामी श्रीराम यांसी । माझेनि भक्तिसुख वानरांसी ।
ते मज सांगसी स्मरणासी । ऐसें मानसीं न मानवें ॥ ८० ॥
प्रेमाची जाति ऐसीच आहे । बोलतां मागें पुढें न पाहे ।
ऐसी कोणी एक स्थिती आहे । जाणता होयें तूं एक ॥ ८१ ॥
स्मरणीं नाहीं द्वंद्वबाधा । स्मरणें नाशे सकळापदा ।
छेचोनि द्वंद्वाचिया कंदा । परमानंद पाविजे ॥ ८२ ॥
तें करोंनि रामस्मरण । वेगीं करावें उड्डाण ।
मार्गीं जावें सावधान । मार्गचिन्ह जाणोनी ॥ ८३ ॥


समुद्रं समतिक्राम्य लवणोदं महोदधिम् ।
कुशद्विपमतिक्रम्य क्षीरोदं च महार्णवम् ॥१३॥

औषधीचे ठिकाण, ती आणण्याची कालमर्यादा :

लवणादि सकळ समुद्र । सांडून कुशद्वीप सुंदर ।
ओलांडोनि क्षीरसागर । पर्वतेंद्र आणावा ॥ ८४ ॥
पर्वताच्या उत्तरभागीं । दिव्यौषधि अनेगी ।
सर्वथा न लक्षिती जगीं । त्याही वेगीं परिसें पां ॥ ८५ ॥
अम्लानपुष्पें देदीप्यमान । प्रभा सूर्यतेजासमान ।
पर्णें सदा नित्यनूतन । समूळ जाण सुस्वादा ॥ ८६ ॥
समुद्रमंथनीं अमृत । निघतां दैत्य भांडत ।
पर्वतीं सांडलें त्वरित । औषधि तेथ झालिया ॥ ८७ ॥
तेथें गंधर्व राज्य करिती । दुर्धर तयांची स्थिती ।
ओषधि अति यत्‍नें राखिती । अहोरात्रीं सावध ॥ ८८ ॥
तुझ आणितां ओषधींसी । गंधर्व मिसळती युद्धासीं ।
चुकवोनियां अपायांसी । दिव्यौषधींसी आणावे ॥ ८९ ॥


बहुमायाश्च मार्गेषु राक्षसाः कामरुपिण ।
अप्रमत्तेन गंतव्यं त्वया वीर महाबल ॥१४॥
लक्षत्रयं योजनानां शतानां विशतिर्दश ।
गंतव्यं धीयतां ध्याने द्विगुणं तु गतागतम् ॥१५॥
यावन्न क्षीयते रात्रिर्यावन्नोत्तिष्ठते रविः ।
तावत्वया महाबाहो आगंतव्यं महाबल ॥१६॥
लक्ष्मणोऽपि विनश्येत नियतं शर्वरीक्षये ॥१७॥


राक्षस नष्ट मायावी । कपटें छळिती महालाघवी ।
मार्गीं घालिती महागोंवी । ते चुकवावी अति यत्‍नें ॥ ९० ॥
नानापरींच्या छळणोक्ती । राक्षस छळिती अतर्क्ययुक्तीं ।
तें सांडून मारुती । शीघ्रगतीं परतावें ॥ ९१ ॥
दूरपंथ अति अध्वान । निमेषार्धैसीं क्रमून ।
मनोवेगें तुज गमन । आम्हीं संपूर्ण जाणतों ॥ ९२ ॥
तथापि मार्गाचिया गणिता । तुज सांगेन कपिनाथा ।
गमन करावया आतां । संख्या तत्वतां अवधारी ॥ ९३ ॥
तीन लक्ष दहा शतें । दहा योजनें अधिक तेथें ।
येतां जातां द्विगुणितें । पंथ निश्चितें क्रमावा ॥ ९४ ॥
जंव रात्र आहे मध्यान्ह । सूर्योदय न होतां जाण ।
ओषधि घेवोनि संपूर्ण । शीघ्र आगमन करावें ॥ ९५ ॥
रात्रि अवघी अतिक्रमितां । सूर्य उदयातें न पावतां ।
ओषधि येती हाता । कपिनाथा अवधारीं ॥ ९६ ॥
उदया येतां दिवाकर । ओषधि मंदतेजा समग्र ।
होताती न लागतां क्षणमात्र । न होती गोचर सर्वांर्थीं ॥ ९७ ॥
आणीक बीझ एक कपिनाथा । तुज मी सांगेन तत्वतां ।
दिवाकर उदया येतां कार्य सर्वथा नासेल ॥ ९८ ॥
ब्रह्मशक्तीसीं वरद पूर्ण । उदया येतां सहस्रकिरण ।
ज्यावरी घालिजे आपण । त्याचा प्राण वांचेना ॥ ९९ ॥
यालागीं कपिनाथा । सवेग गमन करीं आतां ।
सौ‍मित्रा वांचवोनि सर्वथा । श्रीरघुनाथा सुख देईं ॥ १०० ॥


गच्छ वीर महाबोहो प्रर्थिंतं मंत्रयस्व नः॥१८॥

राजा सुगीवाची हनुमंताला विनंती :

राजा सुग्रीव आपण । प्रार्थिता झाला वायुनंदन ।
शीघ्र करोनि प्रयाण । बंधु लक्ष्मण उठवावा ॥ १ ॥
बिभीषण लागे पायांसी । सत्वर करावें गमनासी ।
वेगें आणोनि औषधींसी । सौ‍मित्रासी उठवावें ॥ २ ॥
वडील सकळ वानरांस । तो जांबवंत बोले सुरस ।
आणोनियां द्रोणाद्रीस । सुबंधूस वांचवीं ॥ ३ ॥
अंगद युवराजा जो कां । बोलोनियां अति नेटका ।
तोही विनवीतसे देखा । कपिनायका आदरें ॥ ४ ॥
तुझेनि सकळ दुस्तर । तरलों आम्ही वानर ।
तो तुझा उपकार । केवीं सागूं समग्र हनुमंता ॥ ५ ॥
अति संकटीं दुर्गमीं । तुवां वांचविलों आम्ही ।
आम्हां सकळां तूंचि स्वामी । बहू वाचा मी किती बोलूं ॥ ६ ॥
आतां सकळार्थातें सार । ऐकें कपीद्रा साचार ।
प्राण त्यागितां सौ‍मित्र । सर्व संहार होईल ॥ ७ ॥
न देखतां लक्ष्मण । राम तत्काळ सोडील प्राण ।
त्यासवेंचि सुग्रीव जाण । देईल प्राण तत्वरां ॥ ८ ॥
रामसुग्रीवांपाठीं । बिभीषण न राहे सृष्टीं ।
येरां वानरां काय गोष्टी । सकळ सृष्टीं आकांत ॥ ९ ॥
ऐकतांचि सीता सुंदर । न लागतां निमेषमात्र ।
सवेग त्यागील शरीर । अनर्थ थोर होईल ॥ ११० ॥
भरत शत्रुघ्न ऐकतां । प्राण सांडितील सर्वथा ।
ऐकतांचि तिघी माता । प्राण तत्वतां न राखिती ॥ ११ ॥
आकांत होईल अयोध्येसीं । आकांत सकळ लोकांसीं ।
आकांत देवदानवांसीं । सकळ सृष्टीसीं आकांत ॥ १२ ॥
बांधवडी सोडील कोण । वधील कोण रावण ।
देवकार्य न साधे पूर्ण । येवढें विघ्न मांडेल ॥ १३ ॥
यालागीं गा कपिनंदना । वीर शूर सर्वज्ञा ।
ओषधि आणोनि लक्ष्मणा । जीवदाना होई दाता ॥ १४ ॥
इतकें बोलतां अंगद वीर । सकळ वानरांचा भार ।
ऐकोनियां श्रीरामचंद्र । काय उत्तर बोलत ॥ १५ ॥
कपिकुळपंचानना । ऐकें हनुमंता सर्वज्ञा ।
भ्रातृभिक्षेचिया दाना । यालागीं शरण जाण तुज आलों ॥ १६ ॥
लक्ष्मणाचें जीवदान । तुज भिक्षा मागों आलों जाण ।
सर्वथा पराङ्मुख न होणें । बंधुजीवदान मज देईं ॥ १७ ॥
वनीं एकला एक अनाथ । लक्ष्मणेंवीण जालों येथ ।
आम्हां जीवदाता कपिनाथ । तुवां सनाथ करावें ॥ १८ ॥
वांचलिया लक्ष्मण । आम्ही बंधु चौघे जण ।
पांचवा हनुमंत आपण । निश्चयें जाण भाक माझी ॥ १९ ॥
पांच मिळतां एके ठायी । रणीं युद्धाचा पाड कायी ।
रावणाचें भय नाहीं । घायीं ठायीं निमेल ॥ २० ॥
हेंचि नवल सांगू काये । पांचही एक जाले हो पाहें ।
साधों शके महत्कार्य । सहजान्वयें सांगेन ॥ १२१ ॥
होतां पांचांचा एक मेळ । विरे पांचां भूतांचा गोळा ।
पांचां इंद्रियांचा पाळा । एकहेळां भस्म होय ॥ २२ ॥
हे पांचां विषयांची विषयस्थिती । एके निमेषार्धे भस्म होती ।
विषयीं शोभे चिच्छत्ती । जैं पांचही मिळती एकत्र ॥ २३ ॥
इतस्ततां विचरती जाण । ते साम्या येती पंचप्राण ।
चळण सांडोनि आपण । निश्चल जाण स्वयें होत ॥ २४ ॥
एकें आंवरिल्या चौघांस । होय पांचांची एक मूस ।
अहंकार चित्त बुद्धि मान । शज समरस स्वयें होती ॥ २५ ॥
पांचांचिया एकात्मता । कळिकाळातें हाणों लाता ।
कायसा काळ नियंता ब्रह्मसायुज्यता हाता चढे ॥ २६ ॥
जिणोनि जीवशिवपदी । स्वस्वरुप स्वयें अनुभवी ।
पूर्णब्रह्मत्व ठसावे जीवीं । पंचाऐक्यभावीं पद ऐसें ॥ २७ ॥
यालागीं गा कपिनंदना । शीघ्र करोनि प्रयाणा ।
वांचवीं बंधु लक्ष्मणा । बहु प्रतारणा काय बोलूं ॥ २८ ॥
ऐसें श्रीरामाचें उत्तर । तैसेच जुत्पती समग्र ।
ऐकोनि आल्हादें कपींद्र । काय उत्तर बोलत ॥ २९ ॥
समुद्र ओलांडोनि आसका । जेणें पालथी केली लंका ।
भेदरा लाविला दशमुखा । तो हनुमान देखा सरसावला ॥ १३० ॥
हनुमान साटोपतां जीवीं । सुरदुंदुभी त्राहाटिल्या देवीं ।
पुष्पवृष्टि केली अवघी । निजवैभवीं कपींद्रा ॥ ३१ ॥
सत्वर जावोनि कपिपती । ओषधी आणील निश्चितीं ।
सौ‍मित्र उठवील मारुती । उदया गभस्ती न येतां ॥ ३२ ॥
लक्ष्मण उठलिया जाण । श्रीराम स्वयें आपण ।
निमेषार्धे वधील रावण । राज्यीं बिभीण स्थापील ॥ ३३ ॥
फिटेल सकळांची सांकडी । सुटेल देवांची बांधवडी ।
आणोनियां अमरकोडी । स्वर्गीं गुढी उभारिती ॥ ३४ ॥

हनुमंताचे श्रीरामांना वंदन व आश्वासन :

ऐसा सरसावला वानर । करोनि रामनामें भुभःकार ।
काय बोलिला उत्तर । श्रीरघुवीर परिसत ॥ ३५ ॥
लोटांगण श्रीरामचरणां । करुन अनुवादला जाणा ।
सावध ऐक रघुनंदना । विज्ञापना हे माझी ॥ ३६ ॥
स्वामीस येवढी कोण चिंता । दिव्यौषधी समर्था ।
मजसारिखा दूत असतां । क्षणार्धता आणीन ॥ ३७ ॥
ऐकें नरवीरपंचानना । झणीं विकळ करिसी मना ।
तुझेनि नामें दीनजनां । आंगवण जाणा धैर्याची ॥ ३८ ॥
तुझेनि नामें यश कीर्ती । तुझेनि नामें धृति विरक्ती ।
तुझेनि नामें अगाध शांती । प्राणी पावती रघुराया ॥ ३९ ॥
नामीं नाहीं जन्ममरण । नामीं नाहीं निजपतन ।
नामीं सदा स्वानंदघन पूर्ण । नाम चिद्धन रघुवीरा ॥ १४० ॥
अत्यंत जड मूढ पाषाण । नामें उद्धरले संपूर्ण ।
तेथें बापुडें मरण कोण । श्रीलक्ष्मण जिंतावया ॥ ४१ ॥
मुख्य ओषधी सकळ जनीं । नाम अमृतसंजीवनी ।
नामेंनिर्मुक्त भवबंधनीं । चूडामणी नरवीरा ॥ ४२ ॥
कायसें ब्रह्मशस्त्राचें बळ । कायसें बापुडें काळ ।
मृत्युचें मारक सबळ । नाम केवळ रघुनाथा ॥ ४३ ॥ऐ
सें असोनियां स्वामी । मज आज्ञा दिधली तुम्हीं ।
तरी दिव्यौषधी आणीन मी । ज्या दुर्गम तिहीं लोकीं ॥ ४४ ॥
चिंता न करीं रघुनाथा । चित्ता दुःख नेदीं सर्वाथा ।
चिंतेचे बाण हृदयीं घेतां । दुःखावस्था अनिवार ॥ ४५ ॥
चिंता संचरल्या शरीरीं । सुख नेदी तिळभरी ।
लागतां चिंतेची लहरी । सुरासुरी कांपिजे ॥ ४६ ॥
सुख नेदी राजभवन । सुख नेदी भोगायतन ।
दारापुत्रादि जन । सुख जाण न देती ॥ ४७ ॥
सुख नेदी धनसंपत्ती । सुख नेदी सकळ संपत्ती ।
सुख नेदी यश कीर्ती । चिंता चित्तीं प्रवेशतां ॥ ४८ ॥
चिंतेनें न साधे योगसुख । चिंतादाह देख भला नव्हे ॥ ४९ ॥
परमानंदाचें वन समग्र । चिंतेनें जाळिलें चौफेर ।
चिंतेनें परमार्थाचें घर । निरंतर उद्वसे ॥ १५० ॥
परमात्मा श्रीरामचंद्र । चिंतेनें केलासी किंकर ।
इतरांचा कायसा विचार । चिंता दुस्तर् श्रीरामा ॥ ५१ ॥
ते चिंतेचा समूळ दाहो । करितें तुझेंनाम पहाहो ।
एवढा तुझा नामनिर्वाहो । महाबाहो श्रीरामा ॥ ५२ ॥
ते समूळ चिंता सांडूनि पाहीं । स्वस्वरुपीं सावध होयीं ।
सौ‍मित्रासी भय नाहीं । प्रतिज्ञा पाहीं हे माझी ॥ ५३ ॥
आतांचि जावोनि सत्वर । अणोनि ओषधिसंभार ।
क्षणें उठवीन सौ‍मित्र । प्रतिज्ञा साचार हे माझी ॥ ५४ ॥
ऐसें बोलोनी गोळांगूळ । त्राहाटिलें भूमीसीं लांगूळ ।
पुढील कथा अति रसाळ । श्रोते सकळ परिसोत ॥ ५५ ॥
एका जनार्दनाचें तान्हें । भुकाळु परी मागों नेणें ।
यालागीं मजकारणें । मुखीं घांस देणें जननिये ॥ ५६ ॥
जें गोड लागे माउलीसीं । तोंडींचें काढी ते वेगेंसीं ।
ओपी बाळकाच्या मुखासीं । निजमानसीं स्नेहाळ ॥ ५७ ॥
एका जनार्दना शरण । श्रोतीं द्यावें अवधान ।
हनुमान जावोनीआपण । ओषधींसीं आगमन करील ॥ १५८ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
ओषध्यर्थहनुमंतप्रार्थनं नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः ॥ ४४ ॥
ओंव्या ॥ १५८ ॥ श्लोक ॥ १८ ॥ एवं ॥ १७६ ॥


GO TOP