॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीरामविजय ॥

॥ अध्याय तिसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जो पद्मिनीवल्लभकुलभुषण ॥ जो पद्मजातजनक पद्मलोजन ॥
विषकंठहृदय दशकंठदलन ॥ सच्चिदानंदतनु जो ॥१॥
जो रघुकुलकमलदिवाकर ॥ अजित भ्रांतिविपिनवैश्वानर ॥
जो भक्तहृदयाब्जभ्रमर ॥ लीलावतार धरी जो ॥२॥
जो षड्गुणैश्वर्यसंपन्न ॥ यश श्री कीर्ति विज्ञान ॥
जो औदार्यवैराग्यपरिपूर्ण ॥ सत्यज्ञान शाश्वत जो ॥३॥
जो कां निर्विकल्प अनंत ॥ हेतुदृष्टांत विवर्जित ॥
तो सुवेळाचळीं रघुनाथ ॥ राक्षसवधार्थ पातला ॥४॥
जो भवगजविदारक मृगनायक ॥ मोक्षफळाचा परिपाक ॥
तो राम ताटिकांतक ॥ सुरपाळ जगद्‌गुरु ॥५॥
गतकथाध्यायीं निरूपण ॥ गुणसिंधूचा बंधु लक्ष्मण ॥
इंद्रजिताचा वध करून ॥ शिर घेऊन पैं गेला ॥६॥
शरीराचे प्राक्तन विचित्र ॥ ऋषभें सुवेळेसी नेलें शिर ॥
धड रणीं भुजा सत्वर ॥ लंकेवरी पडियेली ॥७॥
भुजा आपटोनि मागुती उडत ॥ जैसा कंदुक आदळोनि उसळत ॥
तैसा भुजदंड अकस्मात ॥ निकुंभिलेंत पडियेला ॥८॥
सुलोचनेचे आंगणीं ॥ भुजदंड पडिला ते क्षणीं ॥
तों रावणस्नुषा अंतरसदनीं ॥ सुखरूप बैसली असे ॥९॥
ते दशशतवदनाची कुमरी ॥ कीं लावण्यसागरींची लहरी ॥
ज्येष्ठ स्नुषा निर्धारीं ॥ राघवारीची ती होय ॥१०॥
जे नगारिशत्रूची राणी ॥ यामिनाचरांची स्वामिणी ॥
जिचें स्वरूपलावण्य देखोनी ॥ सुरांगना होती लज्जित ॥११॥
देवगणगंधर्वराजकुमरी ॥ सेवा करिती अहोरात्री ॥
सहस्रनेत्राची अंतुरी ॥ न पवे सरी जियेची ॥१२॥
आंगींचा सुवास अद्‌भुत ॥ धांवे एक कोशपर्यंत ॥
विषकंठरिपूची कांता यथार्थ ॥ तुळितां न पुरे इयेसीं ॥१३॥
नैषधजाया परम सुंदर ॥ वर्णिती काव्यकर्ते चतुर ॥
परी शेषकन्येसी साचार ॥ उपमा द्यावया पुरेना ॥१४॥
आंगींच्या प्रभेने भूषणें ॥ झळकती अत्यंत दिव्य रत्‍नें ॥
किन्नरकन्या गायनें ॥ मधुरस्वरें जवळ करिती ॥१५॥
एक शृंगार सांवरिती ॥ एक चामरें घेऊनि वारिती ॥
एक उपभोग आणोनि देती ॥ संतोषविती नानाशब्दें ॥१६॥
सुलोचनेचे आनंदु ॥ तों अमृतीं पडे विषबिंदु ॥
तैसा तो भुज सुबुद्धु ॥ अंगणीं येऊन पडियेला ॥१७॥
भुज पडतांचि ये धरणी ॥ दणाणिली तये क्षणीं ॥
दूती कित्येक धांवूनी ॥ पहावया बाहेर आल्या ॥१८॥
ते पाचबंध अंगणांत ॥ वीरपाणि पडिला अद्‌भुत ॥
देखोनि दासी भयभीत ॥ आल्या शंकित सांगावया ॥१९॥
म्हणती नवल वर्तलें वो साजणी ॥ महावीराचा तुटोनि पाणी ॥
येऊन पडिलासे अंगणीं ॥ निराळमार्गें अकस्मात ॥२०॥
ऐकोनि दासींचे वचन ॥ दचकलें सुलोचनेंचें मन ॥
रत्‍नपादुका त्वरेंकरून ॥ अंध्रियुगुळीं लेइल्या ॥२१॥
तडित्प्राय झळके अंबर ॥ आंगणांत आली सत्वर ॥
उतरला तेव्हां मुखचंद्र ॥ विव्हळनेत्र जाहले ॥२२॥
अंग जाहलेसें विकळ ॥ पुढें न घालवेचि पाऊल ॥
वदनींचें काढोनि तांबूल ॥ एकीकडे भिरकाविलें ॥२३॥
सखियांसी म्हणे सुलोचना ॥ प्राणपति आज गेले रणा ॥
सीतेलागीं अयोध्याराणा ॥ सुवेळाचळीं बैसला ॥२४॥
ऐसें बोलतां शेषनंदिनी ॥ भुजेसमीप येतां ते क्षणीं ॥
तंव ते शक्रजिताचा पाणी ॥ पतिव्रतेनें ओळखिला ॥२५॥
पंचांगुळीं मुद्रिका मंडित ॥ वीरकंकणें दिव्य विराजित ॥
दंडीं कीर्तिमुखें झळकत ॥ चपळेहूनि विशेष पै ॥२६॥
आजि माझें जहाज बुडालें ॥ म्हणोनि वदन हातीं पिटिलें ॥
परम आंकंत ते वेळे ॥ वाटे बुडाले ब्रह्मांड ॥२७॥
सुमनकळिकेवरी सौदामिनी ॥ पडतां उरी न उरे ते क्षणीं ॥
तैसी निस्तेज होउनी ॥ भोगींद्रनंदिनी पडियेली ॥२८॥
लोभियाचे गेलें धन ॥ कीं जळचरें जीवनावांचून ॥
तैसी पतिवियोगेंकरून ॥ सुलोचना तळमळे ॥२९॥
म्हणे विपरीत काळाची गती ॥ मृगाजळी बुडाला अगस्ती ॥
दीपतेजें रोहिणीपती ॥ आहाळोनि खालीं पडियेला ॥३०॥
तमकूपीं बुडाला तरणी ॥ पाडसें सिंह धरिला वनी ॥
पिपीलिकेनें मुखी घालोनि ॥ मेरु कैसा रगडिला ॥३१॥
अळिकेनें गिळिला सुपर्ण ॥ मशकीं ग्रासिला महाअग्न ॥
भूतांनीं काळ धरून ॥ समरांगणीं मारिला ॥३२॥
मग सुलोचनेसी उचलोनी ॥ सखिया बैसविती सांवरूनी ॥
पतीची भुजा हृदयीं धरूनी ॥ आक्रंदत सुलोचना ॥३३॥
मग भुजेप्रति बोले वचन ॥ कैसें प्राणपतीस आलें मरण ॥
तरी तें सर्व वर्तमान ॥ लिहून मज विदित करीं ॥३४॥
पतिचरणीं माझें मन ॥ जरी असेल रात्रंदिन ॥
तरीच पत्रीं लिहून ॥ वर्तमान दृश्य करीं ॥३५॥
हाटकरसपात्र पुढें ठेविलें ॥ भूर्जपत्र उकलोनि पसरिलें ॥
लेखनी हाती देतां शीघ्रकाळें ॥ भुजेनें लिहिलें ते समयीं ॥३६॥
नवल अद्‌भुत वर्तलें ॥ सर्व वर्तमान पत्रीं लिहिलें ॥
सुलोचनेनें पत्र घेतलें ॥ मस्तकीं वंदिलें ते वेळे ॥३७॥
नयनीं लोटले अश्रुपात ॥ शेषकन्या पत्र वाचित ॥
भोंवत्या ललना समस्त ॥ ऐकती निवांत ते काळीं ॥३८॥
ऐकें दशशतमुखकन्यके ॥ सुकुमारे चंपककलिके ॥
मम मानससरोवरमरालिके ॥ प्राणवल्लभे सुलोचने ॥३९॥
जयआशा अंतरीं धरून ॥ गूढस्थळीं करितां हवन ॥
अग्नींतून दिव्य स्यंदन ॥ निघाला पूर्ण राजसे ॥४०॥
फळप्राप्तीचा समय लक्षून ॥ शत्रू आलें तेथें धांवून ॥
चंउ शिळा वरी घालोन ॥ आराध्यदैवत क्षोभविलें ॥४१॥
पर्वत चढला संपूर्ण ॥ शिखरीहून दिधला ढकलून ॥
कीं नदी अवघी उतरून ॥ तीरासमीप बुडाला ॥४२॥
प्रगटतां वैराग्यज्ञान ॥ वरी विषयघाला पडे येऊन ॥
कीं प्राप्त होतां निधान ॥ विवसी येऊनि वरी पडे ॥४३॥
कष्टें करितां वेदाध्ययन ॥ वरी धाड घाली अभिमान ॥
सूर्य सर्व अंबर क्रमून ॥ राहुमुखीं सांपडें जेवीं ॥४४॥
वल्लभे तैसेंच येथे जाहलें ॥ शत्रूंनीं शेवटी वैर साधिलें ॥
प्रारब्धबळ उणें पडलें ॥ होणार न टळे कल्पांतीं ॥४५॥
पुढें दारुण संग्राम मांडिला ॥ परी जय आम्हांस पारखा जाहला ॥
जाऊनि सौमित्रासी मिळाला ॥ शत्रूचा वाढला पराक्रम ॥४६॥
सौमित्र परम निधडा वीर ॥ धनुर्विद्या त्याची अपार ॥
देखोनि उचित दिधलें शिर ॥ राम मित्र जोडिला ॥४७॥
देहआशा जीवीं धरून ॥ भयें शरण गेला बिभीषण ॥
म्यां देहत्रय निरसून ॥ विदेहजामात मित्र केला ॥४८॥
सौमित्र तपस्वी पूर्ण पवित्र ॥ बहुत दिवस निराहार ॥
उतरूनियां सिंधु समग्र ॥ मागावया शिर पातला ॥४९॥
मग मी कृपणता टाकून ॥ निजशिराचें केले दान ॥
तेणें रामचरणीं नेऊन ॥ शिर माझे समर्पिलें ॥५०॥
शरीर उभें आहे रणीं ॥ शिर पाहूं गेलें चापपाणी ॥
तुज मूळ धाडिला पाणी ॥ वेगेंकरून येईं कां ॥५१॥
मायानदी उल्लंघूनि दुर्घट ॥ पाहें पैलतीरीं तुझी वाट ॥
प्राणवल्लभे येऊनि भेट ॥ सत्वर आतां मजलागीं ॥५२॥
दुःखरूप परम संसार ॥ रामचरणीं सुखी अपार ॥
हें जाणोनि धाडिला कर ॥ येई सत्वर प्राणप्रिये ॥५३॥
असो ते धराधरकुमरी ॥ पत्र वाचूनि ते अवसरीं ॥
शरीर टाकूनि धरित्रीवरी ॥ शोक करी अपार ॥५४॥
आजि बळाचा समुद्र आटला ॥ कीं धैर्याचा मेरु खचला ॥
प्रतापवृक्ष उन्मळला ॥ समरभूमींसीं अकस्मात ॥५५॥
इंद्रजितसूर्याच्या किरणें ॥ मावळती शत्रुतारागणें ॥
तो आजि सौमित्राहूनें ॥ खग्रास केला समूळीं ॥५६॥
रणसरोवरी शत्रकमळें ॥ तूं वारणें छेदिलीं निजबळें ॥
सौमित्रासिंहें कुंजरा बळें ॥ विदारून नेलें शिरमुक्त ॥५७॥
ऐरावतीसमवेत पाकशासन ॥ समरीं पाडिला उलथोन ॥
तो आजि मानव लक्ष्मण ॥ तेणें रणीं मारिलासे ॥५८॥
माझें सौभाग्यभांडार ॥ त्यावरी पडिला तस्कर ॥
माझिया भाग्याचा समुद्र ॥ सौमित्रअगस्तीनें प्राशिला ॥५९॥
इंद्रजित माझा रोहिणीवर ॥ सौमित्रप्रतापराहू थोर ॥
कलांसहित न दिसे चंद्र ॥ पुनः मागुता सहसाही ॥६०॥
वृत्रारिशत्रूची अंतुरी ॥ नानाप्रकारें विलाप करी ॥
पशुपक्षी ते अवसरीं ॥ रुदती करुणा ऐकोनियां ॥६१॥
सखिया म्हणती सुलोचने ॥ आतां किमर्थ शोक करणें ॥
आपुलें परत्रसाधन देखणें ॥ संसारमाया त्यजोनियां ॥६२॥
जें जें दिसे तें तें नाशिवंत ॥ मुळीं मिथ्या अहिकुंडलवत ॥
पदीं नेपुरें बांधोनि नाचत ॥ मीन भूमीसी मिथ्या पैं ॥६३॥
उदिमा गेला वंध्यासुत ॥ रात्रीं मृगजळीं मत्स्य धरीत ॥
गंधर्वनगर वाटत ॥ मिथ्या समस्त तैसें हें ॥६४॥
असो नगारिशत्रूची गृहिणी ॥ प्रवेशोनि आत्मसदनीं ॥
नानासंपत्ति देखोनी ॥ मनीं विटे तत्काळ ॥६५॥
परापवादें विटती सज्जन ॥ कीं चिळसी ये देखतां वमन ॥
कीं सुंदर ललना देखोन ॥ विटे जैसा विरक्त ॥६६॥
तैसी नानासंपदा देखतां ॥ विटली शक्रारीचा कांता ॥
शुकपिकादि द्विजां समस्तां ॥ मुक्त केलें स्वहस्तें ॥६७॥
सदनासी नमन करूनी ॥ शिबिकेंत भ्रतारहस्त घालोनी ॥
चपळ अश्विनीवरी बैसोनी ॥ लंकेसी तेव्हां चालिली ॥६८॥
तों पुढे दूत येऊन ॥ सांगती सर्व वर्तमान ॥
मग लघु कपाटें उघडून ॥ सुलोचना प्रवेशली ॥६९॥
अस्ता गेला वासरमणी ॥ प्रवर्तली घोर रजनी ॥
रजनीचर ते क्षणीं ॥ नगददुर्गींचे गजबजिले ॥७०॥
सभेत बैसला लंकानाथ ॥ तों स्नुषा देखे अकस्मात ॥
गजबजिला मयजानाथ ॥ चिन्ह विपरीत देखोनियां ॥७१॥
सुलोचना सद्रद होऊनी ॥ मस्तक ठेवी श्वशुचरणीं ॥
रावण म्ण्हे वो साजणी ॥ माये किमर्थ आलीस ॥७२॥
तों भुजेसहित पत्र ॥ श्वशुरापुढें ठेविलें सत्वर ॥
म्हणे स्वर्गा गेले भ्रतार ॥ त्यां समागमें जाईन मी ॥७३॥
ऐसें ऐकतांचि रावण ॥ घेत वक्षःस्थळ बडवून ॥
खालीं पडे सिंहासनावरून ॥ महाद्रुम उन्मळे जेवीं ॥७४॥
मृत्तिका घेऊनि लंकानाथ ॥ दाहीं मुखीं तेव्हां घालित ॥
वर्तला एकचि आकांत ॥ नाहीं अंत महाशब्दा ॥७५॥
गजर ऐकोनि तये वेळीं ॥ मयकन्यां तेथें पातली ॥
वार्ता पुत्राची ऐकली ॥ मूर्च्छित पडली धरणीये ॥७६॥
ऐशीं सहस्र राजअंगना ॥ आल्या महामंडपस्थाना ॥
शोकार्णवीं पडली मयकन्या ॥ सर्वही तियेसी सांवरिती ॥७७॥
मंदोदरी म्हणे स्नेहाळा ॥ मेघनादा माझिया बाळा ॥
मज न पुसतां रणमंडळा ॥ सखया कैसा गेलासी ॥७८॥
त्रिभुवन शोधितां समग्र ॥ न देखो तुजऐसा धनुर्धर ॥
बंदीं घातले समस्त सुरवर ॥ शत्रु समग्र खिळिले शरीं ॥७९॥
पूर्वीं मी व्रते तपें आचरलें ॥ पूर्ण न होता मध्यें सांडिलें ॥
म्हणूनि तुजऐसें निधान गेलें ॥ आड ठाकलें पूर्वकर्म ॥८०॥
कीं म्यां केला पंक्तिभेद ॥ संतांस बोलिल्यें दोषशब्द ॥
कीं शिव आणि मुकुंद ॥ वेगळे दोघे भाविले ॥८१॥
हरिकीर्तन रंग मोडिला ॥ क्षुधार्थी पात्रींचा उठविला ॥
कीं परद्रव्याचा अभिलाष केला ॥ किंवा घडला गुरुद्रोह ॥८२॥
कीं परलाभाची केली हानी ॥ कीं दोष ठेविला गंगेलागुनी ॥
की कुरंगिणी पाडसा वनीं ॥ बिघड पूर्वीं म्यां केला ॥८३॥
कीं भिक्षा न घालितां साचार ॥ द्वारींचा दवडिला यतीश्वर ॥
म्हणोनि इंद्रजिताऐसा पुत्र ॥ गेला निश्चित त्या दोषें ॥८४॥
असो काद्रवेयकुलभूषणकुमारी ॥ दशकंठजाया तिसी हृदयीं धरी ॥
दोघीं शोक करिती तेणें धरित्री ॥ कंपित झाली तेधवां ॥८५॥
मग शेषकन्या बोले वचन ॥ मज द्यावें आजि शिर आणून ॥
वाट पाहतां पतीचे नयन ॥ शिणले जाईन सांगातीं ॥८६॥
ऐसें बोलतां सुलोचना ॥ परम क्रोध चढला दशवदना ॥
घाव घातला निशाणा ॥ म्हणे सत्वर सेनां सिद्ध करा ॥८७॥
आजि संग्राम करीन निर्वाण ॥ रामसौमित्रांचीं शिरें आणीन ॥
अथवा पुत्रपंथ लक्षून ॥ मी जाईन आतांचि ॥८८॥
दशमुख कोपला देखोनी ॥ मयजा सांगे सुनेच्या कर्णीं ॥
म्हणे तूंचि तेथे जाऊनी ॥ शिर मागून घेईं कां ॥८९॥
मंगळजननीकुमरीवर ॥ तयापासीं तूं मागें शिर ॥
तो भक्तवत्सल परम उदार ॥ दयासिंधु दीनबंधु ॥९०॥
जो या चराचराचें जीवन ॥ जनकजा वेगळी करून ॥
सकळ स्त्रिया मातेसमान ॥ एकबाणी एकवचनी ॥९१॥
दुःखामाजी हे सुख थोर ॥ दृष्टीं पाहें वैदेहीवर ॥
इतुकेन तुझा सार्थक संसार ॥ इह -परत्र सर्वही ॥९२॥
पुण्यपरायण श्रीरामभक्त ॥ सुग्रीव जांबुवंत हनुमंत ॥
न्यायसिंधु बिभीषण तेथ ॥ पाठिराखे सर्वस्वें ॥९३॥
ऐसें बोलतां मयकन्या ॥ आलें सुलोचनेचिया मना ॥
मग श्वशुरासी मागे आज्ञा ॥ सुवेळाचळीं जावया ॥९४॥
दशद्वयनेत्र बोले ॥ तुज जरी त्यांही ठेवून घेतलें ॥
कैसे करावें तये वेळे ॥ सांग वहिलें आम्हांतें ॥९५॥
उरग बैसला धुसधुसित ॥ तया मुखीं केवीं घालिजे हात ॥
यावरी शेषकन्या बोलत ॥ दशकंठासी तें ऐका ॥९६॥
परसतीचा अभिलाष समूळ ॥ करी ऐसा कोण चांडाळ ॥
त्याचा वंश भस्म होईल ॥ विपरीत कर्म आचरतां ॥९७॥
पतिव्रतेचा अभिलाष धरून ॥ कोण पावला जय कल्याण ॥
रावण बोले अधोवदन ॥ तरी अवश्य जाइंजे ॥९८॥
तुजसीं विपरीत करितां जाण ॥ शत्रु अवघे भस्म करीन ॥
शेषतनया खरें म्हणून ॥ तत्काळ तेव्हां निघाली ॥९९॥
बृहस्पतीऐसे विचक्षण ॥ घेतले शिष्ट आणि बंदीजन ॥
सहस्रार्ध दासी घेऊन ॥ अश्विनीवरी आरूढली ॥१००॥
संसारमाया टाकून ॥ संत स्वरूपीं होती लीन ॥
तैसी लंका उपेक्षून ॥ चालिली शरण रामचंद्रा ॥१॥
परम वेगें ते वेळीं ॥ आली श्रीरामसभेजवळी ॥
कृपाब्धीस भेटों आली ॥ पुण्यगंगा सुलोचना ॥२॥
कीं संतांचिया गृहाप्रती ॥ विश्रांतीस येई शांती ॥
तैसा शेषकन्या झाली येती ॥ सीतापति लक्षूनियां ॥३॥
कनकाद्रीभोंवते तरुवर ॥ तैसे राघवावेष्टित वानर ॥
कोटिकंदर्पलावण्यसुंदर ॥ अवनिजावर देखिला ॥४॥
भोंवते कपी यंत्राकार ॥ उभे असती जोडूनि कर ॥
मध्यें रघुनाथपीठ पवित्र ॥ विराजमान घवघवित ॥५॥
अवनीखालीं उतरूनि जाणा ॥ मनीं आठवी कैलासराणा ॥
हंसगती चाले सुलोचना ॥ शेषकन्या चतुर जे ॥६॥
एक धांवोनि वानर येती ॥ हर्षे श्रीरामासी सांगती ॥
रावणें पाठविली सीता सती ॥ भयभीत होऊनियां ॥७॥
मग बोले चापपाणी ॥ रावण पडिला नाही जों रणीं ॥
तोंवरी जनकनंदिनी ॥ दृष्टी न पडे तुमच्या पैं ॥८॥
शेषकुमरी जवळी देखोन ॥ बिभीषणाकडे पाहे रघुनंदन ॥
तों तेणें आंसुवे भरलें नयन ॥ सद्‌गद कंठ जाहला ॥९॥
म्हणे जगद्वंद्या राजीवनेत्रा ॥ ही शक्रजितललना परम पवित्रा ॥
इचें नाम घेतां विषकंठमित्रा ॥ सर्व दोष हरतील ॥११०॥
कर्मगति परम गहन ॥ जिचे अंगुष्ठीं न पडे सूर्यकिरण ॥
शेषकन्या सुकुमार पूर्ण ॥ आली धांवून शिरालागीं ॥११॥
तों सुलोचनेनें जवळ येऊन ॥ विलोकून श्रीरामध्यान ॥
जयजयकारें लोटांगण ॥ राघवाचरणीं घातलें ॥१२॥
श्रीरामचरणकमळावरी ॥ शेषकन्या जाहली भ्रमरी ॥
ज्याचे चरणजरें निर्धारीं ॥ पद्मजाततनया उद्धरली ॥१३॥
दरिद्रियास सांपडे धन ॥ कीं जन्मांधासी आले नयन ॥
कीं जलद ओळतां देखोन ॥ मयूर जैसा आनंदे ॥१४॥
कीं पूरीं वाहोन जातसे ॥ त्यास प्राणसखा लावी कांसे ॥
कीं योगी पावे वृत्तिदशे ॥ निजमन जिंकोनियां ॥१५॥
तैसा देखोन श्रीरामचंद्र ॥ उल्हासे सुलोचनाचित्तचकोर ॥
कीं रघुनाथ होय दिनकर ॥ कमळिणी ते सुलोचना ॥१६॥
संसारतापें तापोनी ॥ दृढ जडली श्रीरामचरणीं ॥
तेथोनी उठावयासी मनीं ॥ आळस येतसे सुलोचने ॥१७॥
आतां हे सुख सांडोनी ॥ पुढती काय पहावें नयनीं ॥
सुलोचना मस्तक म्हणोनी ॥ पायांवरूनि उचलीना ॥१८॥
जैसा सुधारस गाळी इंदु ॥ तैसा बोले कृपासिंधु ॥
जो जगदीश दीनबंधु ॥ लाविला वेधु त्रिनेत्रासी ॥१९॥
म्हणे माते उठीं वो झडकरी ॥ परम श्रमलीस संसारीं ॥
आतां सुखीं राहें परत्रीं ॥ अक्षय सुख भोगीं तूं ॥१२०॥
ऐसें ऐकोनि झडकरी ॥ उभी ठाकली शेषकुमरी ॥
पाणिद्वय जोडूनि ते अवसरीं ॥ स्तवन करी सद्‌भावें ॥२१॥
म्हणे जयजय रामा विषकंठमित्रा ॥ रघूत्तमा राजीवनेत्रा ॥
जलदवर्णा चारुगात्रा ॥ मित्रकुळमुगुटमणे ॥२२॥
जगद्वंद्या जगन्नायका ॥ जनकजापति जगद्रक्षका ॥
जन्ममरणभयमोचका ॥ जनकजामाता जगद्‌गुरु ॥२३॥
जामदग्न्यजिता जलजनयना ॥ जगदीश्वरा जलदवर्णा ॥
जगद्यापका दुःखहरणा ॥ जन्मजरारहित तूं ॥२४॥
पुराणपुरुषा रघुनंदना ॥ भक्तवत्सला जगन्मोहना ॥
मायाचक्रचालका निरंजना ॥ निष्कलंका निर्गुण तूं ॥२५॥
आनंदअयोध्यापुरविहारा ॥ वेदवंद्या वेदसारा ॥
परम उदारा रघुवीरा ॥ अहल्योद्धारा मखपाळका ॥२६॥
जयजय रामा विश्वपाळणा ॥ विश्वव्यापका विश्वकरणा ॥
विश्वचाळका जगज्जीवना ॥ विश्वरक्षणा विश्वेशा ॥२७॥
विबुधललाटपटलेखना ॥ सनकसनंदनमनरंजना ॥
हे रघुवीर दानवदलना ॥ भवभंजना भवहृदया ॥२८॥
मंगलरूपा मंगलकारका ॥ जय मंगलजननी उद्धारका ॥
मंगलभगिनीप्राणनायका ॥ मंगलसहिता मंगलधामा ॥२९॥
कमलोद्‌भवजनका कमलनयना ॥ कमलानायका कमलशयना ॥
कमलनाभा कमलवदना ॥ कमलसदना कमलप्रिया ॥१३०॥
नमो भववारणपंचानना ॥ नमो पापरण्यकुठारतीक्ष्णा ॥
हे श्रीरामा त्रिविधतापशमना ॥ अनंतशयना अनंता ॥३१॥
तुज स्तवावया चापपाणी ॥ न चले सहस्रवदनाची वाणी ॥
नेति नेति म्हणूनी ॥ आगम जेथें तटस्थ ॥३२॥
तेथें एकजिव्हेचे स्तवन ॥ मांडेल माझें कोठोन ॥
जैसें भागीरथीस मज्जन ॥ थिल्लरोंदके मांडिलें ॥३३॥
पितळेचें पुष्प नेऊन ॥ केलें कनकाद्रीचें पूजन ॥
कीं जलार्णवासी अर्ध्यदान ॥ कूपोदके करावें ॥३४॥
अर्कास वाहिलें अर्कीसुमन ॥ मलयानिलासी अंचलपवन ॥
किंवा क्षीराब्धीपुढें नेऊन ॥ तक्र जैसे समर्पिलें ॥३५॥
केवी होय धरेचे वजन ॥ स्तंभ कैंचा टेंकावया गगन ॥
सप्तसमुद्रींचें जीवन ॥ टिटवीस केवीं मोजवे ॥३६॥
सकळप्रकाशनिशाकर ॥ त्यास दशी वाहिली अणुमात्र ॥
कीं धत्तूरपुष्पीं उमावर ॥ दरिद्रियानें पूजिला ॥३७॥
तुझें देखतांचि चरण ॥ तुटलें देहत्रयबंधन ॥
मन होऊन ठेलें उन्मन ॥ जन्ममरण तुटलें असे ॥३८॥
घागरीं आणि रांजणी ॥ एकचि बिंबला वासरमणी ॥
तैसा स्त्रीपुरुष अभिधानी ॥ चापपाणि व्यापक तूं ॥३९॥
तरी या स्त्रीदेहाची आकृती ॥ शक्रजिताची अंगना म्हणती ॥
पतिशिरासवें रघुपती ॥ अग्नीमाजीं घालिजे ॥१४०॥
तूं अयोध्याधीश उदारा ॥ अनाथ याचक मी मार्ग शिरा ॥
मी चातक तूं जलधरा ॥ कृपानिधी वर्षें कां ॥४१॥
जेव्हां उदया पावे गभस्ति ॥ तेव्हां चक्रवाकें मिळती ॥
तैसेंच आतां करी रघुपती ॥ मित्रुळप्रकाशका ॥४२॥
क्षीर आणि जळ ॥ वेगळें काढिती मराळ ॥
तैसा श्रीराम तमालनील ॥ भवपुरींहूनि काढीं कां ॥४३॥
पतीचें ऐकिलें वर्तमान ॥ तेव्हांच गेले माझे पंचप्राण ॥
परी शिराचें निमित्त करून ॥ तुझे चरण पाहूं आल्ये ॥४४॥
तूं चित्तपरीक्षक रघुनाथ ॥ जाणसी सर्वांचे मनोगत ॥
ऐसें सुलोचना म्हणत ॥ जगन्नायक तटस्थ जाहला ॥४५॥
म्हणे धन्य धन्य सहस्रवदन ॥ ऐसें उदरीं जन्मलें रत्‍न ॥
कीं भोगींद्राचें तप पूर्ण ॥ कन्यारूपें प्रगटलें ॥४६॥
सुलोचनेचें चातुर्य देखोन ॥ कपी सकळ तुकाविती मान ॥
श्रीरामासी म्हणे मित्रनंदन ॥ ईतें शिर देऊनि बोळवा ॥४७॥
जांबुवंत म्हणे हे पुण्यसरिता ॥ अंगद म्हणे धन्य पतिव्रता ॥
मारुति म्हणे इचें नाम घेतां ॥ पाप नुरें सहसाही ॥४८॥
सायुज्यता मुक्तिसमवेत ॥ इयेसी शिर द्यावें जी त्वरित ॥
असो यावरी जनकजामात ॥ पुसे दशकंठस्नुषेतें ॥४९॥
आम्हीं येथें आणिलें शिर ॥ तुज केवीं कळला समाचार ॥
येरी म्हणे पतीच्या करें ॥ पत्र लिहून दिधले ॥१५०॥
भूजपत्र दाविलें त्वरित ॥ आश्चर्य करी कौसल्यासुत ॥
तों वानर म्हणती समस्त ॥ आम्हांसी सत्य न वाटे ॥५१॥
निर्जीव हस्ते लिहिले पत्र ॥ तरीच आम्ही मानूं साचार ॥
जरी हें हांसवील शिर ॥ आपुल्या पतीचें ये काळी ॥५२॥
राम म्हणे इचा महिमा थोर ॥ काय एक न करी निर्धार ॥
तंव ऋषभाहातीं आणविलें शिर ॥ अर्कपुत्रें ते काळीं ॥५३॥
महाविशाल भयंकर ॥ जिव्हा लोळे मुखाबाहेर ॥
झांकिला असे सव्य नेत्र ॥ भाळीं शेंदूर चर्चिलासे ॥५४॥
बाबरझोटी धरूनी ॥ ऋषभें ठेविलें आणोनी ॥
तें सुलोचनेनें धरूनी ॥ हृदयी तेव्हां आलिंगिलें ॥५५॥
स्फुंदस्फुंदोनि सती रडत ॥ त्रिभुवनीं बळिया इंद्रजित ॥
त्याचें शिर पडिलें येथ ॥ कर्म विचित्र पूर्वींचें ॥५६॥
खालीं पसरी उत्तरीय वस्त्र ॥ त्यावरी बैसविलें तेव्हां शिर ॥
सतीनें करूनि नमस्कार ॥ विनवितसे कर जोडोनियां ॥५७॥
अयोध्यानाथ श्रीरामचंद्र ॥ पाहती स्वर्गींचे सुरवर ॥
तरी तुम्हीं हास्य करावें सत्वर ॥ जेणें श्रीराम धन्य म्हणे ॥५८॥
मजसीं विनोद नाना रीती ॥ करीतसां प्राणपती ॥
तरीच आजि क्रोध चित्तीं ॥ काय म्हणोनि धरियेला ॥५९॥
आजि अपराध समस्त ॥ समर्थें घालावे पोटांत ॥
माझा पतिव्रताधर्म बहुत ॥ रघुपतीसी दाविजे ॥१६०॥
होम विध्वंसिला म्हणोन ॥ तेणें क्रोध धरिलें मौन ॥
कीं समरीं जय न देखोन ॥ म्हणोनि खेद वाटला ॥६१॥
कीं रामदर्शना शिर आणिलें ॥ सायुज्यपद प्राप्त जाहलें ॥
म्हणोनि बोलणें खुंटलें ॥ जन्ममरण तुटले पैं ॥६२॥
इत्यादि भाव ते अवसरीं ॥ बोलिली फणिपाळकुमरी ॥
किंचित विनोदही करी ॥ सुलोचना हांसवावया ॥६३॥
शूर्पणखा तुमची आत ॥ ते जयस्थानीं गौरविली बहुत ॥
कर्ण नासिक सुमित्रासुत ॥ घेऊनि गेला आरंभीं ॥६४॥
भगिनीचें देखोनि भूषण ॥ आनंदला पितृव्य कुंभकर्ण ॥
तेणें नासिक आणि कर्ण ॥ सुग्रीवासी समर्पिले ॥६५॥
ऐसा विनोद करितां ॥ परी शिर न हांसे तत्वतां ॥
मग सहस्रवदनदुहिता ॥ खेद परम करीतसे ॥६६॥
म्हणे मी पूर्वीं चुकल्ये यथार्थ ॥ जरी पितयासी साह्य आणित्यें येथ ॥
तरी तुमचे शत्रू समस्त ॥ पराभविता क्षणार्धें ॥६७॥
ऐसी ऐकतांचि मात ॥ गदगदां तेव्हां शिर हांसत ॥
सव्य नेत्र उघडोनि पाहत ॥ जेवीं विकासे कमळिणी ॥६८॥
श्रीरामास पुसती वानर ॥ काय गोष्टीस हांसले शिर ॥
याउपरी राजीवनेत्र ॥ काय बोलता जाहला ॥६९॥
म्हणे इचा पिता सहस्रवदन ॥ तोचि अवतरला लक्ष्मण ॥
त्या श्वशुरें मज मारिलें म्हणोन ॥ शिर हांसलें गदगदां ॥१७०॥
अज्ञानरूप वामनयन ॥ मी त्यास न दिसे सगुण ॥
ज्ञानमय सव्य नयन ॥ उघडोनि मज विलोकी ॥७१॥
वानर डोलविती मान ॥ सुलोचना देवी धन्य धन्य ॥
सकळ सतियांमाजी निधान ॥ शिर अचेतन हांसविलें ॥७२॥
तंव तो वीर लक्ष्मण ॥ व्यापिला मायामोहेंकरून ॥
सुलोचनेकडे पाहोन ॥ आंसुवें नयन भरियेले ॥७३॥
रघुत्तमाप्रती बोलत ॥ अन्याय केला म्यां यथार्थ ॥
प्रत्यक्ष मारून जामात ॥ कन्या सुलोचना श्रमविली ॥७४॥
ऐसा शोकार्णवीं लक्ष्मण ॥ पडतां देखोनि रघुनंदन ॥
म्हणे बारे क्षत्रियधर्म दारुण ॥ देवें पूर्वींच निर्मिला ॥७५॥
बंधु अथवा पितापुत्र ॥ समरीं आलिया समोर ॥
त्यासी वधितां अणुमात्र ॥ दोष नसे सहसाही ॥७६॥
सौमित्र म्हणे श्रीरामा ॥ विश्वफलांकितद्रमा ॥
अजअजित पूर्णकामा ॥ तुम्हीं बोलिलां ते सत्य सर्व ॥७७॥
मायाचक्र महादुर्गम ॥ प्रियावियोगें वाटे श्रम ॥
सीतेलागीं तुम्हीं कष्टोनि परम ॥ वृक्ष पाषाण आलिंगिलें ॥७८॥
ऐसी ऐकातांचि मात ॥ कृपेनें द्रवला रघुनाथ ॥
म्हणे मी उठवीन इंद्रजित ॥ करीन ऐक्य उभयतांसी ॥७९॥
इंद्रकरीं आणोनि अमृत ॥ आतांचि उठवीन शेषजामात ॥
ऐकतां महावीर तेथे ॥ गजबजिले ते काळीं ॥१८०॥
खूण दावी सूर्यनंदन ॥ हे मनी न धरावें आपण ॥
विमानीं देव संपूर्ण ॥ भयभीत जाहले ॥८१॥
अंगद दावी करपल्लवीं ॥ बिभीषण किंचित मान हालवी ॥
जांबुवंत नेत्रसंकेत दावी ॥ नका करूं हे अघटित ॥८२॥
मग निर्भिडपणें वायुतनय ॥ बोलिला जो सर्वांसी प्रिय ॥
म्हणे तुमचें ठेवा औदार्य ॥ एकीकडे नेऊनियां ॥८३॥
अजा म्हणोनि न पाळिजे वृक्र ॥ मित्र म्हणों नये दंदशूक ॥
विषतरूचें काय सार्थक ॥ दुग्ध घालोनि वाढवितां ॥८४॥
इंद्रजिताचें बळें देव ॥ रावणें घातले बंदी सर्व ॥
याचें कापट्य वासव ॥ तोही नेणें सर्वथा ॥८५॥
सौमित्र बोलिला वचन ॥ जेणें होय सर्वांचे समाधान ॥
तैसें करावें आपण ॥ रघुनंदन यथार्थ म्हणे ॥८६॥
सुलोचनेसी म्हणे मित्रपुत्र ॥ पतीचें शिर घेऊनि जाय सत्वर ॥
निराशा देखोनि उत्तर ॥ सती सुलोचना बोलतसे ॥८७॥
दृष्टीं देखिला रघुनाथ ॥ इतुकेन सर्व कृतकृत्य ॥
म्हणोनि रामचरणीं ठेवित ॥ मस्तक पुन्हां सुलोचना ॥८८॥
सव्य घालोनि रघुवीर ॥ मागुता घाली नमस्कार ॥
उभी राहिली जोडोनि कर ॥ काय उत्तर बोलिली ॥८९॥
म्हणे आदिपुरुषा वैकुंठनायका ॥ मत्स्यरूपा वेदोद्धारका ॥
कमठरूपा सृष्टिपाळका ॥ आदिवराहस्वरूप तूं ॥१९०॥
तो तूं स्तंभोद्‌भव नरहरी ॥ वामनरूप मधुकैटभारी ॥
तीन सप्तके धरित्री ॥ केली निःक्षत्री तुवांचि ॥९१॥
तोचि तूं आतां रघुनाथ ॥ कौसल्यात्मज जनकजामात ॥
माता पिता बंधु सर्व गोत ॥ तूंचि माझें जगद्वंद्या ॥९२॥
मदनशत्रुहृदयआरामा ॥ परत्रींचा सोयरा तूं श्रीरामा ॥
दीनबंधु सर्वोत्तमा ॥ पूर्णब्रह्मा जगद्‌गु ॥९३॥
लंकेकडे आजि तत्वतां ॥ कपी न धाडावे सर्वथा ॥
मज अग्निप्रवेश करितां ॥ विक्षेप कोणी न करावा ॥९४॥
अवश्य म्हणोनि जगदुद्धार ॥ सतीचे मस्तकीं ठेविला कर ॥
सुलोचना वारंवार ॥ नमस्कार करी राघवा ॥९५॥
नेत्रद्वारें न्याहाळून ॥ हृदयी रेखिला रघुनंदन ॥
जयजय राम म्हणोन ॥ शिर घेऊनि चालिली ॥९६॥
मग रणमंडळीं येऊन सत्वर ॥ घेतलें पतीचें शरीर ॥
समुद्रतीरीं भयंकर ॥ विस्तीर्ण कुंड रचियेले ॥९७॥
मंदोदरीसहित लंकानाथ ॥ सहपरिवारें पातला तेथ ॥
विमानीं देव समस्त ॥ पाहती कौतुक सतीचें ॥९८॥
सुलाचनेनें करूनि स्नान ॥ सौभाग्यकारक देत वाण ॥
कुंडी पतीची तनु घालून ॥ महाअग्नि चेतविला ॥९९॥
कुंडासी प्रदक्षिणा करूनि येरी ॥ धर्मशिळेवरी शेषकुमरी ॥
उभी ठाकोनि ते अवसरीं ॥ पाहे अंबरीं न्याहाळूनि ॥२००॥
धडकत दुंदुभीचे ध्वनी ॥ सुरांची दाटी झाली विमानी ॥
सकळ सुरांगना गगनीं ॥ अक्षय्य वाणें घेऊनि उभ्या ॥१॥
तंव दिव्य शरीर पावोनी ॥ इंद्रजित देखिला विमानी ॥
ऐसे देखतांचि नयनीं ॥ प्राण जाहला कासाविस ॥२॥
शरीर टाकूनि त्वरितगती ॥ आंतूत निघाली आत्मज्योती ॥
दिव्य देह पावोनि निश्चिंतीं ॥ पतीपाशीं पावली ॥३॥
मग शरीर उलंडोन ॥ अग्निमुखीं घातलें नेऊन ॥
तेव्हां मंदोदरी आणि रावण ॥ शोक करिती अत्यंत ॥४॥
सिंधुसंगमीं करूनि स्नान ॥ सहपरिवारें परतला रावण ॥
मंदोदरीसहित करीत रुदन ॥ लंकेमाजी प्रवेशला ॥५॥
घरोघरी लोक वानीत ॥ म्हणती यशस्वी अयोध्यानाथ ॥
एकपत्‍नीव्रत सत्य ॥ केलें सार्थक सुलोचनेचें ॥६॥
परिसोत सर्व पंडित ॥ अग्निपुराणीं सत्यवतीसुत ॥
बोलिला कथा हे यथार्थ ॥ नाहीं विपरित सर्वथा ॥७॥
कथा रसिक बहु पाहीं ॥ म्हणोनि योजिली श्रीरामविजयीं ॥
श्रोते धरोन सदा हृदयीं ॥ ब्रह्मानंदेंकरूनियां ॥८॥
पुढें कथा गोड गहन ॥ अहिरावण महिरावणाख्यान ॥
पाताळासी रामलक्ष्मण ॥ चोरूनियां नेतील ॥९॥
तेथें धांवण्या धांवेल हनुमंत ॥ ते कथा ऐकोत प्रेमळ भक्त ॥
ब्रह्मानंद अत्यद्‌भुत ॥ हृदयीं तेणें ठसावें ॥२१०॥
श्रीधरवरदा ब्रह्मानंदा ॥ पुराणपुरुषा अनादिसिद्धा ॥
निर्गुणा जगदंकुरकंदा ॥ जगद्वंद्या अभंगा ॥११॥
स्वति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतूर ॥ त्रिंशत्तमोऽध्याय गोड हा ॥२१२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥




GO TOP