रावणस्य संदेशं श्रुत्वा पितुराज्ञया लङ्कां हित्वा कुबेरस्य कैलासे गमनं, लङ्कायां रावणस्याभिषेको रक्षसां वासश्च -
|
रावणाचा संदेश ऐकून पित्याच्या आज्ञेने कुबेराचे लंका सोडून कैलासावर जाणे, लंकेमध्ये रावणाचा राज्याभिषेक तसेच राक्षसांचा निवास -
|
सुमाली वरलब्धांस्तु ज्ञात्वा चैतान् निशाचरान् । उदतिष्ठद् भयं त्यक्त्वा सानुगः स रसातलात् ॥ १ ॥
|
रावण आदि निशाचरांना वर प्राप्त झाला आहे हे जाणून सुमाली नावाचा राक्षस आपल्या अनुचरांसहित भय सोडून रसातलातून बाहेर निघाला. ॥१॥
|
मारीचश्च प्रहस्तश्च विरूपाक्षो महोदरः । उदतिष्ठन् सुसंरब्धाः सचिवास्तस्य रक्षसः ॥ २ ॥
|
त्याच बरोबर मारीच, प्रहस्त, विरूपाक्ष आणि महोदर हे त्या राक्षसाचे चार मंत्रीही रसातलांतून वर आले. ते सर्वच्या सर्व रोषावेशाने भरलेले होते. ॥२॥
|
सुमाली सचिवैः सार्धं वृतो राक्षसपुङ्गवैः । अभिगम्य दशग्रीवं परिष्वज्येदमब्रवीत् ॥ ३ ॥
|
श्रेष्ठ राक्षसांनी घेरलेला सुमाली आपल्या सचिवांसह दशग्रीव जवळ आला आणि त्याला हृदयाशी धरून याप्रकारे बोलला - ॥३॥
|
दिष्ट्या ते वत्स सम्प्राप्तः चिन्तितोऽयं मनोरथः । यस्त्वं त्रिभुवनश्रेष्ठात् लब्धवान् वरमुत्तमम् ॥ ४ ॥
|
वत्स ! फार सौभाग्याची गोष्ट आहे की तू त्रिभुवनश्रेष्ठ ब्रह्मदेवांपासून उत्तम वर प्राप्त केला आहेस, ज्यायोगे तुला हा दीर्घकाळापासून चिंतित मनोरथ उपलब्ध झाला आहे. ॥४॥
|
यत्कृते च वयं लङ्कां त्यकत्वा याता रसातलम् । तद् गतं नो महाबाहो महद् विष्णुकृतं भयम् ॥ ५ ॥
|
महाबाहो ! ज्या कारणाने आम्ही सर्व राक्षस लंका सोडून रसातलात निघून गेलो होतो, भगवान् विष्णुपासून प्राप्त होणारे आमचे ते महान् भय आता दूर झाले आहे. ॥५॥
|
असकृत् तद्भयाद् भग्नाः परित्यज्य स्वमालयम् । विद्रुताः सहिताः सर्वे प्रविष्टाः स्म रसातलम् ॥ ६ ॥
|
आम्ही सर्व लोक वारंवार भगवान् विष्णुंच्या भयाने पीडित होण्याने आपले घर सोडून पळून गेलो होतो आणि सर्वच्या सर्व एकदमच रसातलात प्रविष्ट झालो होतो. ॥६॥
|
अस्मदीया च लङ्केयं नगरी राक्षसोषिता । निवेशिता तव भ्रात्रा धनाध्यक्षेण धीमता ॥ ७ ॥
|
ही लंका नगरी, जिच्यात तुझा बुद्धिमान् भाऊ धनाध्यक्ष कुबेर निवास करत आहे, आम्हां लोकांची आहे. पूर्वी या नगरीत राक्षसच राहात होते. ॥७॥
|
यदि नामात्र शक्यं स्यात् साम्ना दानेन वानघ । तरसा वा महाबाहो प्रत्यानेतुं कृतं भवेत् ॥ ८ ॥
|
निष्पाप महाबाहो ! जर साम, दान अथवा बलप्रयोगाच्या द्वारासुद्धा जर पुन्हा लंकेला परत घेता येणे शक्य झाले, तर आपले काम होऊन जाईल. ॥८॥
|
त्वं तु लङ्केश्वरस्तात भविष्यसि न संशयः । त्वया राक्षसवंशोऽयं निमग्नोऽपि समुद्धृतः ॥ ९ ॥
|
तात् ! तू लंकेचा स्वामी होशील यात संशय नाही. कारण तू या राक्षसवंशाचा, जो रसातलात बुडून गेला होता, उद्धार केला आहेस. ॥९॥
|
सर्वेषां नः प्रभुश्चैव भविष्यसि महाबल । अथाब्रवीद् दशग्रीवो मातामहमुपस्थितम् ॥ १० ॥ वित्तेशो गुरुरस्माकं नार्हसे वक्तुमीदृशम् ।
|
महाबली वीरा ! तू आम्हा सर्वांचा राजा होशील. हे ऐकून दशग्रीवाने जवळच उभ्या असलेल्या आपल्या मातामहांस म्हटले - आजोबा ! धनाध्यक्ष कुबेर आमचा मोठा भाऊ आहे म्हणून त्याच्या संबंधी आपण मला अशी गोष्ट सांगता कामा नये. ॥१० १/२॥
|
साम्नापि राक्षसेन्द्रेण प्रत्याख्यातो गरीयसा ॥ ११ ॥ किञ्चिन्नाह तदा रक्षो ज्ञात्वा तस्य चकीर्षितम् ।
|
त्या श्रेष्ठ राक्षसराजाच्या द्वारा शांतभावानेच असे स्पष्ट उत्तर ऐकल्यावर सुमाली समजून चुकला की रावण काय करू इच्छित आहे. म्हणून तो राक्षस गप्प बसला. नंतर काही सांगण्याचे धाडस करु शकला नाही. ॥११ १/२॥
|
कस्यचित् त्वथ कालस्य वसन्तं रावणं ततः ॥ १२ ॥ उक्तवन्तं तथा वाक्यं दशग्रीवं निशाचरः । प्रहस्तः प्रश्रितं वाक्यं इदमाह स कारणम् ॥ १३ ॥
|
त्यानंतर काही काल निघून गेल्यावर आपल्या स्थानी निवास करणार्या दशग्रीव रावणाला, जो सुमालीला पूर्वोक्त उत्तर देऊन चुकला होता, निशाचर प्रहस्ताने विनयपूर्वक ही युक्तियुक्त गोष्ट सांगितली - ॥१२-१३॥
|
दशग्रीव महाबाहो नार्हस्त्वं वक्तुमीदृशम् । सौभ्रात्रं नास्ति शूराणां शृणु चेदं वचो मम ॥ १४ ॥
|
महाबाहु दशग्रीवा ! आपण आपल्या आजोबांना जे काही सांगितलेत तसे सांगावयास नको होते, कारण वीरांमध्ये याप्रकारे भ्रातृभावाचा निर्वाह झालेला दिसून येत नाही. आपण माझे हे वचन ऐका. ॥१४॥
|
अदितिश्च दितिश्चैव भगिन्यौ सहिते हि ते । भार्ये परमरूपिण्यौ कश्यपस्य प्रजापतेः ॥ १५ ॥
|
अदिति आणि दिति दोघी सख्या बहिणी आहेत. त्या दोघीही प्रजापति कश्यपांच्या परम सुंदर पत्नी आहेत. ॥१५॥
|
अदितिर्जनयामास देवांस्त्रिभुवनेश्वरान् । दितिस्तु अजनयत् पुत्रान् कश्यपस्यात्मसम्भवान् ॥ १६ ॥
|
अदितिने देवांना जन्म दिला आहे, जे यासमयी त्रिभुवनाचे स्वामी आहेत आणि दितिने दैत्यांना उत्पन्न केले आहे. देव आणि दैत्य दोन्ही महर्षि कश्यपांचे औरस पुत्र आहेत. ॥१६॥
|
दैत्यानां किल धर्मज्ञ पुरीयं सवनार्णवा । सपर्वता मही वीर तेऽभवन्प्रभविष्णवः ॥ १७ ॥
|
धर्मज्ञ वीरा ! प्रथम पर्वत, वने आणि समुद्रांसहित ही सारी पृथ्वी दैत्यांच्याच अधिकारात होती, कारण ते अत्यंत प्रभावशाली होते. ॥१७॥
|
निहत्य तांस्तु समरे विष्णुना प्रभविष्णुना । देवानां वशमानीतं त्रैलोक्यं इदमव्ययम् ॥ १८ ॥
|
परंतु सर्व शक्तिमान् भगवान् विष्णुंनी युद्धात दैत्यांना मारून त्रैलोक्याचे हे अक्षय राज्य देवांच्या अधिकारात देऊन टाकले. ॥१८॥
|
नैतदेको भवानेव करिष्यति विपर्ययम् । सुरासुरैराचरितं तत् कुरुष्व वचो मम ॥ १९ ॥
|
या तर्हेने विपरित आचरण आपणच करणार आहात असे नाही. देव आणि असुर यांनीही पूर्वी या नीतिचेच अवलंबन केले आहे, म्हणून आपण माझे वचन ऐकावे. ॥१९॥
|
एवमुक्तो दशग्रीवः प्रहृष्टेनान्तरात्मना । चिन्तयित्वा मुहूर्तं वै बाढमित्येव सोऽब्रवीत् ॥ २० ॥
|
प्रहस्ताने असे म्हटल्यावर दशग्रीवाचे चित्त प्रसन्न झाले. त्याने एक मुहूर्तपर्यंत बराच विचार करून म्हटले -फारच चांगले. (तुम्ही जसे सांगत आहा तसेच मी करीन.) ॥२०॥
|
स तु तेनैव हर्षेण तस्मिन्नहनि वीर्यवान् । वनं गतो दशग्रीवः सह तैः क्षणदाचरैः ॥ २१ ॥
|
त्यानंतर त्याच दिवशी त्याच हर्षाने पराक्रमी दशग्रीव त्या निशाचरांना बरोबर घेऊन लंकेच्या निकटवर्ती वनात गेला. ॥२१॥
|
त्रिकूटस्थः स तु तदा दशग्रीवो निशाचरः । प्रेषयामास दौत्येन प्रहस्तं वाक्यकोविदम् ॥ २२ ॥
|
त्या समयी त्रिकूट पर्वतावर जाऊन निशाचर दशग्रीव तेथेच थांबला आणि वाक्यकोविद प्रहस्ताला त्याने दूत बनवून धाडले. ॥२२॥
|
प्रहस्त शीघ्रं गच्छ त्वं ब्रूहि नैर्ऋतपुङ्गवम् । वचसा मम वित्तेशं सामपूर्वमिदं वचः ॥ २३ ॥
|
तो म्हणाला - प्रहस्ता ! तू तात्काळ जा आणि माझ्या कथनानुसार धनाचे स्वामी राक्षसराज कुबेरांना शांतिपूर्वक ही गोष्ट सांग. ॥२३॥
|
इयं लङ्का पुरी राजन् राक्षसानां महात्मनाम् । त्वया निवेशिता सौम्य नैतद् युक्तं तवानघ ॥ २४ ॥
|
राजन् ! ही लंकापुरी महामना राक्षसांची आहे, जिच्यात आपण निवास करत आहात. सौम्य ! निष्पाप यक्षराज ! ही आपल्यासाठी योग्य नाही आहे. ॥२४॥
|
तद्भवान् यदि नो ह्यद्य दद्यादतुलविक्रम । कृता भवेन् मम प्रीतिः धर्मश्चैवानुपालितः ॥ २५ ॥
|
अतुल पराक्रमी धनेश्वर ! जर आपण आम्हांला ही लंकापुरी परत द्याल तर यामुळे आम्हांला फार प्रसन्नता वाटेल आणि आपल्याद्वारे धर्माचे पालन झाले, असे समजले जाईल. ॥२५॥
|
स तु गत्वा पुरीं लङ्कां धनदेन सुरक्षिताम् । अब्रवीद् परमोदारं वित्तपालमिदं वचः ॥ २६ ॥
|
तेव्हा प्रहस्त कुबेर द्वारा सुरक्षित लंकापुरीत गेला आणि त्या वित्तपालाला अत्यंत उदारतापूर्ण वाणीमध्ये म्हणाला - ॥२६॥
|
प्रेषितोऽहं तव भ्रात्रा दशग्रीवेण सुव्रत । त्वत्समीपं महाबाहो सर्वशस्त्रभृतां वर ॥ २७ ॥ तच्छ्रूयतां महाप्राज्ञ सर्वशास्त्रविशारद । वचनं मम वित्तेश यद्ब्रवीति दशाननः ॥ २८ ॥
|
उत्तम व्रताचे पालन करणार्या, संपूर्ण शस्त्रधार्यांमध्ये श्रेष्ठ, सर्वशास्त्र विशारद, महाबाहु, महाप्राज्ञ धनेश्वर ! आपला भाऊ दशग्रीव यांनी मला आपल्याकडे धाडले आहे. दशमुख रावण आपल्याला काही सांगू इच्छितात, ते मी सांगत आहे. आपण माझे बोलणे ऐकावे. ॥२७-२८॥
|
इयं किल पुरी रम्या सुमालिप्रमुखैः पुरा । भुक्तपूर्वा विशालाक्ष राक्षसैर्भीमविक्रमैः ॥ २९ ॥ तेन विज्ञाप्यते सोऽयं साम्प्रतं विश्रवात्मज । तदेषा दीयतां तात याचतस्तस्य सामतः ॥ ३० ॥
|
विशाल लोचन वैश्रवण ! ही रमणीय लंकापुरी प्रथम भयानक पराक्रमी सुमाली आदि राक्षसांच्या अधिकारात होती. त्यांनी दीर्घकाळपर्यंत हिचा उपभोग घेतला आहे. म्हणून ते दशग्रीव या समयी हे सूचित करीत आहेत की ही लंका ज्यांची वस्तु आहे त्यांना परत केली जावी. तात ! शांतिपूर्वक याचना करणार्या दशग्रीवास आपण ही पुरी परत द्यावी. ॥२९-३०॥
|
प्रहस्तादपि संश्रुत्य देवो वैश्रवणो वचः । प्रत्युवाच प्रहस्तं तं वाक्यं वाक्यविशारदः ॥ ३१ ॥
|
प्रहस्ताच्या मुखाने ही गोष्ट ऐकून वाणीचे मर्म जाणणार्यामध्ये श्रेष्ठ भगवान् वैश्रवणाने प्रहस्तास याप्रकारे उत्तर दिले - ॥३१॥
|
दत्ता ममेयं पित्रा तु लङ्का शून्या निशाचरैः । निवासिते च मे रक्षो दानमानादिभिर्गुणैः ॥ ३२ ॥
|
राक्षसा ! ही लंका पूर्वी निशाचरांवाचून शून्य होती, त्यासमयी पित्याने मला येथे राहण्याची आज्ञा दिली आणि मी हिच्यात दान, मान आदि गुणांच्या द्वारा प्रजाजनांना वसविले. ॥३२॥
|
ब्रूहि गच्छ दशग्रीवं पुरं राज्यं च यन्मम । तवाप्येतन्महाबाहो भुङ्क्ष्व राज्यमकण्टकम् ॥ ३३ ॥
|
दूता ! तू जाऊन दशग्रीवास सांग - महाबाहो ! ही पुरी तसेच हे निष्कंतक राज्य जे काही माझ्याजवळ आहे ते सर्व तुझेही आहेच. तू याचा उपभोग कर. ॥३३॥
|
अविभक्तं त्वया सार्धं राज्यं यच्चापि मे वसु । एवमुक्त्वा धनाध्यक्षो जगाम पितुरन्तिकम् ॥ ३४ ॥
|
माझे राज्य तसेच सारे धन तुझ्यापासून विभक्त केले गेलेले नाही आहे. असे म्हणून धनाध्यक्ष कुबेर आपला पिता विश्रवा मुनि यांच्याकडे निघून गेले. ॥३४॥
|
अभिवाद्य गुरुं प्राह रावणस्य यदीप्सितम् । एष तात दशग्रीवो दूतं प्रेषितवान् मम ॥ ३५ ॥ दीयतां नगरी लङ्का पूर्वं रक्षोगणोषिता । मयात्र यदनुष्ठेयं तन्ममाचक्ष्व सुव्रत ॥ ३६ ॥
|
तेथे पित्याला प्रणाम करून त्यांनी रावणाची जी इच्छा होती ती याप्रकारे सांगितली - तात ! आज दशग्रीवाने माझ्याकडे दूत धाडला आणि सांगितले आहे की या लंका नगरीत पूर्वी राक्षस रहात होते म्हणून ही राक्षसांना परत द्यावी. सुव्रत ! आतां या विषयी मी काय केले पाहिजे, हे सांगण्याची कृपा करावी. ॥३५-३६॥
|
ब्रह्मर्षिस्त्वेवमुक्तोऽसौ विश्रवा मुनिपुङ्गवः । प्राञ्जलिं धनदं प्राह शृणु पुत्र वचो मम ॥ ३७ ॥
|
त्यांनी असे म्हटल्यावर महर्षि मुनिवर विश्रवा हात जोडून उभे असलेल्या धनद कुबेरांना म्हणाले -मुला, माझे वचन ऐक. ॥३७॥
|
दशग्रीवो महाबाहुः उक्तवान् मम संनिधौ । मया निर्भर्त्सितश्चासीद् बहुशोक्तः सुदुर्मतिः ॥ ३८ ॥ स क्रोधेन मया चोक्तो ध्वंसते च पुनः पुनः ।
|
महाबाहु दशग्रीवाने माझ्या जवळही ही गोष्ट सांगितली होती यासाठी मी त्या दुर्बुद्धिला खूप खडसावले आणि वारंवार क्रोधपूर्वक म्हटले -अरे ! अशा करण्याने तुझे पतन होईल, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही. ॥३८ १/२॥
|
श्रेयोऽभियुक्तं धर्म्यं च शृणु पुत्र वचो मम ॥ ३९ ॥ वरप्रदानसम्मूढो मान्यामान्यान् स दुर्मतिः । न वेत्ति मम शापाच्च प्रकृतिं दारुणां गतः ॥ ४० ॥
|
मुला ! आता तूच माझे धर्मानुकूल आणि कल्याणकारी वचन ध्यान देऊन ऐक. रावणाची बुद्धि फारच खोटी आहे. तो वर मिळवून उन्मत्त झाला आहे - विवेक हरवून बसला आहे. माझ्या शापामुळेही त्याची प्रकृति क्रूर झालेली आहे. ॥३९-४०॥
|
तस्माद् गच्छ महाबाहो कैलासं धरणीधरम् । निवेशय निवासार्थं त्यक्त्वा लङ्कां सहानुगः ॥ ४१ ॥
|
म्हणून महाबाहो ! आता तू अनुचरांसहित लंका सोडून कैलास पर्वतावर निघून जा. आणि आपल्याला राहाण्यासाठी तेथे दुसरे नगर वसव. ॥४१॥
|
तत्र मन्दाकिनी रम्या नदीनामुत्तमा नदी । काञ्चनैः सूर्यसङ्काशैः पङ्कजैः संवृतोदका ॥ ४२ ॥ कुमुदैरुत्पलैश्चैव तथाऽन्यैश्च सुगन्धिभिः ।
|
तेथे नद्यांमध्ये श्रेष्ठ मंदाकिनी नदी वहात आहे जिचे जल सूर्यासमान प्रकाशित होणार्या सुवर्णमय कमले, कुमुदे आणि इतरही दुसर्या सुगंधित फुलांनी आच्छादित आहे. ॥४२ १/२॥
|
तत्र देवाः सगन्धर्वाः साप्सरोरगकिंनराः ॥ ४३ ॥
विहारशीलाः सततं रमन्ते सर्वदाऽऽश्रिताः । न हि क्षमं तवाने वैरं धनद रक्षसा ॥ ४४ ॥ जानीषे हि यथाऽनेन लब्धः परमको वरः ॥ ४५ ॥
|
त्या पर्वतावर देवता, गंधर्व, अप्सरा, नाग आणि किन्नर आदि दिव्य प्राणी, ज्यांना स्वभावतःच हिंडणे-फिरणे अधिक प्रिय आहे, सदा राहून निरंतर आनंदाचा अनुभव करतात. धनदा ! या राक्षसाशी तू वैर करणे उचित नाही. तू तर जाणतोसच की याने ब्रह्मदेवांपासून कसा उकृष्ट वर प्राप्त केला आहे. ॥४३-४५॥
|
एवमुक्तो गृहीत्वाऽऽशु तद्वचः पितृगौरवात् । सदारपुत्रः सामान्यः सवाहनधनो गतः ॥ ४६ ॥
|
मुनिंनी असे सांगितल्यावर कुबेराने मान राखून त्यांचे वचन मान्य केले आणि स्त्री, पुत्र, मंत्री, वाहन तसेच धन बरोबर घेऊन ते लंकेहून कैलासाकडे निघून गेले. ॥४६॥
|
प्रहस्तोऽथ दशग्रीवं गत्वा वचनमब्रवीत् । प्रहृष्टात्मा महात्मानं सहामात्यं सहानुजम् ॥ ४७ ॥
|
त्यानंतर प्रहस्त प्रसन्न होऊन मंत्री आणि भावांसह बसलेल्या महामना दशग्रीवा जवळ जाऊन म्हणाला - ॥४७॥
|
शून्या सा नगरी लङ्का त्यक्त्वैनां धनदो गतः । प्रविश्य तां सहास्माभिः स्वधर्मं तत्र पालय ॥ ४८ ॥
|
लंकानगरी रिकामी झालेली आहे. कुबेर तिला सोडून निघून गेले आहेत. आता आपण आमच्याबरोबर तिच्यामध्ये प्रवेश करून आपल्या धर्माचे पालन करावे. ॥४८॥
|
एवमुक्तो दशग्रीवः प्रहस्तेन महाबलः । विवेश नगरीं लङ्कां भ्रातृभिः सबलानुगैः ॥ ४९ ॥ धनदेन परित्यक्तां सुविभक्तमहापथाम् । आरुरोह स देवारिः स्वर्गं देवाधिपो यथा ॥ ५० ॥
|
प्रहस्ताने असे म्हटल्यावर महाबली दशग्रीवाने आपली सेना, अनुचर तसेच भावांसहित कुबेरद्वारा त्यागल्या गेलेल्या लंकापुरीत प्रवेश केला. त्या नगरीत सुंदर विभागपूर्वक मोठे मोठे रस्ते बनलेले होते. जसे देवराज इंद्र स्वर्गाच्या सिंहासनावर आरूढ झाले होते त्याप्रकारे देवद्रोही रावणाने लंकेत पदार्पण केले. ॥४९-५०॥
|
स चाभिषिक्तः क्षणदाचरैस्तदा निवेशयामास पुरीं दशाननः । निकामपूर्णा च बभूव सा पुरी निशाचरैर्नीलबलाहकोपमैः ॥ ५१ ॥
|
त्यासमयी निशाचरांनी दशमुख रावणाला राज्याभिषेक केला. नंतर रावणाने ती पुरी वसवली. पहाता पहाता संपूर्ण लंकापुरी नील मेघासमान वर्णाच्या राक्षसांनी पूर्णतः भरून गेली. ॥५१॥
|
धनेश्वरस्त्वथ पितृवाक्यगौरवान् न्यवेशयच्छशिविमले गिरौ पुरीम् । स्वलङ्कृतैर्भवनवरैर्विभूषितां पुरंदरः स्वरिव यथामरावतीम् ॥ ५२ ॥
|
धनाचे स्वामी कुबेर यांनी पित्याच्या आज्ञेचा आदर करून चंद्रम्यासमान निर्मल कांतिच्या कैलास पर्वतावर शोभाशाली श्रेष्ठ भवनांनी विभूषित अलकापुरी वसविली ज्याप्रमाणे देवराज इंद्रांनी स्वर्गलोकात अमरावती पुरी बसविली होती अगदी त्याचप्रमाणे. ॥५२॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकादशः सर्गः ॥ ११ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा अकरावा सर्ग पूरा झाला. ॥११॥
|