॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय बत्तिसावा ॥
इंद्र रावण युद्धाला प्रारंभ

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

इंद्रजिताचे युद्धार्थ आगमन :

सवित्रवसूनें सुमाळी । मारिलासे रणकल्लोळीं ।
अस्थिमासांची झाली होळी । मेळविला धुळी राक्षसांहित ॥१॥
ऐकोनि रावणाचा ज्येष्ठ सुत । क्रोधा चढलासे बहुत ।
नेत्र करोनि आरक्त । युद्धा प्रवर्तत ते समसीं ॥२॥
पळत्या देवोनि नाभीकार । आपण रणांगणीं राहिला स्थिर ।
कनकरथीं जडित धुर । पोंवळ्यांचीं चाकें हो ॥३॥
रथीं जुंपिलें वारू । पवनातें म्हणती स्थिरू ।
स्वइच्छेनें चराचरू । चरणातळीं दडपिती ॥४॥
आधींच ते श्यामकर्ण । पाखरिले भूषणेंकरून ।
पताकीं झाकोळलें गगन । तेजें लोपोन जाय हो ॥५॥
ऐसिया कनकदिव्यरथीं । आरुढला सुलोचनापती ।
दिव्य शस्त्रें घेवोनि हातीं । गर्जना करित निघाला ॥६॥
ऐसा देखोनि रिपुकुमर । पळाले दश दिशांसी सुर ।
समरांगणीं धरितां धीर । थरथरां वीर कांपती ॥७॥
शैलारीनें ऐसें देखोन । सौन्यातें देतसे आश्वासन ।
भिऊं नका या शब्देकरून । पळतयांतें स्थिरावले ॥८॥

जयंत व इंद्रजिताचे युद्ध :

वज्रपाणि म्हणे वीरांसी । पुत्र करितो संग्रामासी ।
तुम्हीं रहावें त्याचे पाठीसीं । निमेषेंसीं रिपु पराभवील ॥९॥
तदनंतरे ते अवसरीं । शक्रसुत जयंत नामेंकरी ।
बैसला कनकरथावरी । धुरेसि सारथि अति कुशळ ॥१०॥
त्वरेंकरोनि रथ प्रेरिला । जेथें मेघनाद तेथें आला ।
राक्षसपुत्र देखोनि प्रवर्तला । राजपुत्रासीं समरांगणीं ॥११॥
एकावरी एक वर्षती बाण । एकावरी एक शस्त्रें सोडिती दारूण ।
एकाचे एक निवारोनि पूर्ण । पुनरपि संधान पैं करिती ॥१२॥
शक्रपुत्राचें सुटतां बाणजाळ । भेदलें समग्र राक्षसदल ।
कित्येक खोंचले बंबाळ । रक्ताचे पूर चालिले ॥१३॥
शक्रसुतें काय केलें । सौन्य एकवटोनि आपुलें ।
अमोध खोचती बाहे रुधिर । जिकडे पळती रजनीचर ।
तिकडे अमरेंद्रपुत्र मारितसे ॥१६॥
मनोवेगोहूनि बहुत । इंद्रपुत्र फ़िरवी रथ ।
राक्षस भस्म करित । चौतालत दशदिशा ॥१७॥

पुलोमाने जयंताला पळविले :

सुरेंद्रपुत्रें आनेआन केलें । शत्रुसैन्य पराभविलें ।
तदनंतर पुलोम दैत्यें वेळे । रणीं धरिलें इंद्रपुत्रा ॥१८॥
वेगीं वाहोनि खांद्यावरी । अकस्मात निघाला सागरीं ।
हेंदेखोनि उभयतां वीरीं । थोर आश्चर्य पैं केलें ॥१९॥
तो आजा होय शक्रसुतासी । शचीचा पिता श्वशुर इंद्रासी ।
तेणें नेलें जयंतासी । देखोनि देव दुःखी झाले ॥२०॥
राजपुत्र धरोनि नेला । सुरसैन्या पळ सुटला ।
मेघनादें पाळतिया वीरांला । अति सुबद्ध गांजिलें ॥२१॥
देवसैन्य पुढे पळत । राक्षस मागें शस्त्रें मारित ।
पळत पुढें हाका देत । धांव धांव देवेंद्रा ॥२२॥
राक्षस विजयी जाहले । स्वपुत्रातें धरोनि नेलें ।
ऐसें देखोनि इंद्रा चढलें । कोपांचें भरितें अनिवार ॥२३॥

इंद्राचे युद्धार्थ आगमन :

सारथियासी म्हणे शचीपती । रथ आणीं गा शीघ्रगतीं ।
तंव मातलीनें तेचि समयाप्रती । स्यंदन आणिला रत्‍नजडित ॥२४॥
रथीं आरूढोनि इंद्र आपण । केलें मेघासारिखें गर्जन ।
पुढें जातां अपशकून । अमरावतीस पैं झाले ॥२५॥
वैरियावरील पवन । लागला वज्राऐसा कठिण ।
पुढें जाता रथाचे वारू मेटें वळून । भूमीलागून बैसले ॥२६॥
मनीं शंकला अमरपती । पुढें चालिला शीघ्रगतीं ।
सवें आदित्यरुद्रवसुगण अमिती । शस्त्रें झळकतीं सतेज ॥२७॥
शस्त्रें झोडीत वज्रपाणी । प्रवेशला रणांगणीं ।
तंव येरीकडे मेघनादजनक तेच क्षणीं । रथावरी बैसला ॥२८॥

रावण व कुंभकर्णाकडून देवसैन्याचा संहार :

जया रथा निर्माण करिता । विश्वकर्मा जाण तत्वतां ।
तयांची वर्णितां सुंदरता । तरी सुवर्णमय तो असे ॥२९॥
रथीं राक्षसचूडामणी । परिवेष्टित पन्नगसैन्यीं ।
जयाचे गर्जनें अवनी । उलंडों पाहे तळावरी ॥३०॥
दैत्यनिशाचरपरिवेष्टित । रथीं आरुढोनि रणपंडित ।
आवेशें वैरियासमोर येत । जैसा भास्कर पूर्वदिशे ॥३१॥
मेघनादाहूनि मागिलेकडे । स्वयें ठाण मांडोनि पुढें ।
धनुष्य़ा चढवोनियां मेढे । अनेक बाण टाकिले ॥३२॥
देव राक्षस परस्परीं । युद्ध करिती रणसागरीं ।
शस्त्रें वर्षती जैसे अंबरीं । मेघ दाटले अकाळीचें ॥३३॥
तदनंतर कुंभकर्ण । दुरात्मा अति दुर्जन ।
नाना शस्त्रांचें प्रेरण । करिंता झाला कोणा न कळतां ॥३४॥
कुंभकर्णाचें घोर संधान । बाणॆं तोडिता झाला करचरण ।
कित्येक सुर निर्गतप्राणे । रणमंडळीं पडिले ॥३५॥

रुद्र व आदित्यांकडून राक्षसांची दाणादाण :

मग ते आदित्य निशाचर । कोपा चढले परस्पर ।
करिते झाले दुर्धर मार । एकमेकांची वर्मे लक्षोनी ॥३६॥
याउपरीं सुरवरीं । राक्षसां केली घेघेमारी ।
पळतां न पळवे राक्षसवीरीं । धाकें प्राण सांडिले ॥३७॥
कित्येक गतप्राण पडिले । कित्येकां सर्वांगी बाण लागले ।
कित्येक भूमीवरी केश मोकळे । लोळताती रणांगणीं ॥३८॥
कित्येक धाकें पळत । कित्येक योद्धे नव्हे म्हणत ।
कित्येक बोलती आम्ही मार्गस्थ । तीर्थयात्रें हिंडतो ॥३९॥
राक्षस रणीं पडिले जाण । सहित वारू गजगण ।
शस्त्रें पोटीं कवटाळून । बीभत्स वीर पडियेले ॥४०॥
बाबरझोंटी विशाळ मुख । दंत दाढा विक्राळ देख ।
हात पाय पसरोनि संमुख । रणांगणी पडियेले ॥४१॥
अमरगणा जय पावले । निशाचर रणीं भंगले ।
हें देखोनि दशग्रीवा भरलें । कोपाचें अति भरितें ॥४२॥
आपुले राक्षस समरांगणीं । पडिले देखे प्रेत होवोनि ।
तयांच्या शोणिताचा पूर लोटोनि । दोहीं तीरीं वाहतसे ॥४३॥
रणीं मिनले गीध घार । मांस भक्षिती तोडिती शरीर ।
मस्तकावरी खगवर । चंचूनें तोडिती नेत्रांतें ॥४४॥

इंद्र व रावणाचे तुंबळ युद्ध :

ऐसें रावणें देखोन । उरले सैन्यासीं युद्ध दारुण ।
करिता झाला आपण । पाचारोण देवांतें ॥४५॥
येरीकडे अमरपती । उत्तम धनुष्य घेवोनि हातीं ।
ओढितां नादें त्रिजगतीं । पालथी होऊं शके क्षणमात्रें ॥४६॥
शक्रे धनुष्य़ीं चढविला गुण । अग्निवर्ण हेमपुंख बाण ।
टाकिला रावणाच्या मस्तकीं जाण । तो भूमीलागोन पडियेला ॥४७॥
तदनंतरें लंकापती । जयाच्या बळाची त्रिजगी कीर्ती ।
तो धनुष्य़ीं बाण लावी शीघ्रगतीं । शक्रधनुष्य धेदिलें ॥४८॥
इंद्राच्या रथावरी अमित बाण । सोडिता झाला दशानन ।
तेणें अंधार पडिला जाण । शक्रा काहीं न कळेचि ॥४९॥
शक्ररावणांचे युद्ध । घोरांदर होईल प्रसिद्ध ।
एका जनार्दनीं प्रबोध । परमानंद प्रकटेल ॥५०॥
रणीं राक्षसांची मुक्ती । अनेकां करीं देतो रघुपती ।
दीनजन उद्धरावया काकुळती । अवतार धरी श्रीराम ॥५१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
इंद्ररावणयुद्धप्रारंभोनाम द्वात्रिंशोऽध्यायः ॥३२॥ ओव्यां ॥५१॥

GO TOP