॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ युद्धकाण्ड ॥ ॥ पंचदशः सर्ग: ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीरामांचा राज्याभिषेक श्रीमहादेव उवाच ततस्तु कैकयीपुत्रो भरतो भक्तिसंयुतः । शिरस्यञ्जलिमाधाय ज्येष्ठं भ्रातरमब्रवीत् ॥ १ ॥ श्रीमहादे व म्हणाले - हे पार्वती, त्यानं तर भक्तिसंपन्न अशा कैकेयीपुत्र भरताने आपल्या मस्तकावर हात जोडून रामांना म्हटले. (१) माता मे सत्कृता राम दत्तं राज्यं त्वया मम । ददामि तत्ते च पुनः यथा त्वमददा मम ॥ २ ॥ "हे रामा, तुम्ही मला राज्य दिले आणि त्यामुळे माझ्या मातेचे म्हणणे खरे झाले. जे तुम्ही माझ्या स्वाधीन केले होते ते राज्य मी तुम्हांला पुनः परत देत आहे." (२) इत्युक्त्वा पादयोर्भक्त्या साष्टाङ्गं प्रणिपत्य च । बहुधा प्रार्थयामास कैकेय्या गुरुणा सह ॥ ३ ॥ असे बोलून, रामांच्या पायांना भक्तीने साष्टांग प्रणिपात करून, त्याने कैकेयी आणि गुरू वसिष्ठ यांच्या सह राज्य स्वीकारण्यासाठी रामांना नाना प्रकारे प्रार्थना केली. (३) तथेति प्रतिजग्राह भरताद् राज्यमीश्वरः । मायामाश्रित्य सकलां नरचेष्टामुपागतः ॥ ४ ॥ तेव्हा आपल्या मायेचा आश्रय घेऊन सर्व प्रकारच्या मानवी क्रिया करण्यास प्रवृत्त झालेल्या रामांनी 'ठीक आहें' असे म्हणून, भरताकडून राज्य परत घेतले. (४) स्वाराज्यानुभवो यस्य सुखज्ञानैकरूपिणः । निरस्तातिशयानन्दः रूपिणः परमात्मनः ॥ ५ ॥ मानुषेण तु राज्येन किं तस्य जगदीशितुः । यस्य भ्रूभङ्गमात्रेण त्रिलोकी नश्यति क्षणात् ॥ ६ ॥ यस्यानुग्रहमात्रेण भवन्त्याखण्डलश्रियः । लीलासृष्टमहासृष्टेः कियत् एतत् रमापतेः ॥ ७ ॥ तथापि भजतां नित्यं कामपूरविधित्सया । लीलामानुषदेहेन सर्वमप्यनुवर्तते ॥ ८ ॥ ज्या परमात्म्या रामांना स्वाराज्याचा (स्वात्मसुखाचा) सतत अनुभव होता, सुख, ज्ञान आणि निरतिशय आनंद हेच ज्यांचे स्वरूप आहे, अशा त्या जगाच्या ईश्वराला मानवी राज्याचा काय उपयोग होता ? ज्यांच्या केवळ भ्रूभंगाने एका क्षणात त्रैलोक्य नष्ट होते, केवळ लीलेने ही प्रचंड सृष्टी उत्पन्न होते, ज्यांच्या केवळ अनुग्रहामुळे इंद्राला राज्य, लक्ष्मीची ऐश्वर्ये प्राप्त होतात, त्या लक्ष्मीपती रामांना हे अयोध्येचे मानवी राज्य किती महत्त्वाचे असणार ? तथापि आपली भक्ती करणार्यांच्या कामना सदैव पूर्ण करण्याच्या इच्छेने राम लीलेने धारण केलेल्या मनुष्य देहाचे द्वारा नेहमी सर्व प्रकारचा अभिनय करीत असतात. (५-८) ततः शत्रुघ्नवचनात् निपुणः श्मश्रुकृन्तकः सम्भाराश्चाभिषेकार्थं आनीता राघवस्य हि ॥ ९ ॥ त्यानंतर शत्रुघ्नाच्या आज्ञेवरून कुशल न्हावी आणण्यात आला. तसेच राघवांच्या राज्याभिषेकासाठी आवश्यक ती सामग्री एकत्र केली गेली. (९) पूर्वं तु भरते स्नाते लक्ष्मणे च महात्मनि । सुग्रीवे वानरेन्द्रे च राक्षसेन्द्रे विभीषणे ॥ १० ॥ प्रथम भरताने, नंतर महात्म्या लक्ष्मणाने, त्यानंतर वानरराज सुग्रीव आणि राक्षसराज बिभीषण यांनी स्नान केले. (१०) विशोधितजटः स्नातः चित्रमाल्यानुलेपनः । महार्हवसनोपेतः तस्थौ तत्र श्रिया ज्वलन् ॥ ११ ॥ रामांच्या जटा कापण्यात आल्या. नंतर त्यांनी स्नान केले. रंगीबेरंगी माळा धारण करणारे, उटी लावलेले, आणि अतिशय मौल्यवान वस्त्रे परिधान केलेले राम आपल्या कांतीने देदीप्यमान होऊन विराजमान झाले. (११) प्रतिकर्म च रामस्य लक्ष्मणश्च महामतिः । कारयामास भरतः सीताया राजयोषितः ॥ १२ ॥ महार्हवस्त्राभरणैः अलञ्चक्रुः सुमध्यमाम् । ततो वानरपत्नीनां सर्वासामेव शोभना ॥ १३ ॥ अकारयत कौसल्या प्रहृष्टा पुत्रवत्सला । ततः स्यन्दनमादाय शत्रुघ्नवचनात् सुधीः ॥ १४ ॥ सुमन्त्रः सूर्यसङ्काशं योजयित्वाग्रतः स्थितः । आरुरोह रथं रामः सत्यधर्मपरायणः ॥ १५ ॥ त्यानंतर महाबुद्धिमान लक्ष्मण व भरत यांनी रामांना विभूषित केले. तसेच राजस्त्रियांनी सीतेला अतिशय मौल्यवान वस्त्रे आणि अलंकार यांनी विभूषित केले. पुत्रवत्सल व शोभायमान अशा कौसल्येने आनंदपूर्वक सर्व वानरांच्या पत्नींचाही साजशृंगार करवून घेतला. त्यानंतर शत्रुघ्नाच्या आज्ञेनुसार बुद्धिमान सुमंत्राने सूर्याप्रमाणे देदीप्यमान असा रथ सज्ज करून समोर आणला. तेव्हा सत्य धर्मपरायण राम त्या रथात चढले. (१२-१५) सुग्रीवो युवराजश्च हनुमांश्च विभीषणः । स्नात्वा दिव्याम्बरधरा दिव्याभरणभूषिताः ॥ १६ ॥ राममन्वीयुरग्रे च रथाश्व-गजवाहनाः । सुग्रीवपत्न्यः सीता च ययुर्यानैः पुरं महत् ॥ १७ ॥ त्या वेळी सुग्रीव, अंगद, हनुमान, बिभीषण स्नान करून दिव्य वस्त्रालंकारांनी विभूषित झाले. नंतर रथ, घोडे, हत्ती या वाहनांवर आरोहण करून ते रामांच्या मागे-पुढे चालू लागले, आणि पालख्यांत बसून सीता आणि सुग्रीवाच्या भार्या या त्या महान अथोध्या नगरीकडे निघाल्या. (१६-१७) वज्रपाणिर्यथा देवैः हरिताश्वरथे स्थितः । प्रययौ रथमास्थाय तथा रामो महत्पुरम् ॥ १८ ॥ हिरवे घोडे जोडलेल्या रथात बसून ज्या प्रमाणे वज्रपाणी इंद्र देवांसह गमन करतो, त्या प्रमाणे राम हे रथात आरोहण करून मग महानगरीकडे निघाले. (१८) सारथ्यं भरतश्चक्रे रत्नदण्डं महाद्युतिः । श्वेतातपत्रं शत्रुघ्नो लक्ष्मणो व्यजनं दधे ॥ १९ ॥ महातेजस्वी भरताने रामांच्या सारथ्याचे काम स्वीकारले होते. रत्नजडित दांडा असणारे श्वेतछत्र शत्रुघ्नाने धरले होते, तर लक्ष्मणाने पंखा घेतला होता. (१९) चामरं च समीपस्थो न्यवीजयद् अरिन्दमः । शशिप्रकाशं त्वपरं जग्राह असुरनायकः ॥ २० ॥ रामांजवळ उभे राहू न शमुदमन सुग्रीव हा चंद्राप्रमाणे कांती असणारी एक चवरी ढाळीत होता, तर दुसऱ्या बाजूला उभे असणाऱ्या राक्षसराज बिभीषणाने तशीच चवरी धारण केली होती. (२०) दिग्विजैः सिद्धसङ्घैश्च ऋषिभिर्दिव्यदर्शनैः । स्तूयमानस्य रामस्य शुश्रुवे मधुरध्वनिः ॥ २१ ॥ त्या वेळी रामांची स्तुती करणाऱ्या, दिव्य दर्शन असणाऱ्या, देव व सिद्धांचे समूह आणि ऋषी यांचा मधुर ध्वनी सर्वत्र ऐकू येत होता. (२१) मानुषं रूपमास्थाय वानरा गजवाहनाः । भेरीशङ्खनिनादैश्च मृदङ्ग-पणवानकैः ॥ २२ ॥ प्रययौ राघवश्रेष्ठः तां पुरीं समलङ्कृताम् । ददृशुस्ते समायान्तं राघवं पुरवासिनः ॥ २३ ॥ मनुष्यरूप धारण करून वानर हत्तीवर आरूढ झाले होते. अशा प्रकारे भेरी, शंख, मृदंग, पणव, आनक या वाद्यांच्या निनादात राघवश्रेष्ठ राम उत्तमप्रकारे शृंगारलेल्या त्या अयोध्यानगरीत गेले. तेव्हा त्या नगरवासी लोकांनी येणाऱ्या रामांना पाहिले. (२२-२३) दूर्वादलश्यामतनुं महार्ह- किरीटरत्नाभरणाञ्चिताङ्गम् । आरक्तकञ्जायतलोचनान्तं दृष्ट्वा ययुर्मोदमतीव पुण्याः ॥ २४ ॥ विचित्ररत्नाञ्चितसूत्रनद्ध- पीताम्बरं पीनभुजान्तरालम् । अनर्घ्यमुक्ताफलदिव्यहारै- र्विरोचमानं रघुनन्दं प्रजाः ॥ २५ ॥ सुग्रीवमुख्यैर्हरिभिः प्रशान्तै- र्निषेव्यमाणं रवितुल्यभासम् । कस्तूरिकाचन्दनलिप्तगात्रं निवीतकल्पद्रुमपुष्पमालम् ॥ २६ ॥ ज्यांचे शरीर दूर्वादलाप्रमाणे श्याम होते, अतिशय मौल्यवान अशा किरीट आणि रत्नजडित अलंकार यांनी ज्यांचे शरीर विभूषित झाले होते, ज्यांच्या डोळ्यांच्या कडा आरक्त कमळाप्रमाणे होत्या, रंगीबेरंगी रत्नांनी जडित असा सोन्याचा कंबरपट्टा ज्यांच्या पीतांबरावर बांधला होता, ज्यांचे वक्षःस्थळ विशाल व पुष्ट होते, मौल्यवान मोत्यांच्या दिव्य हारांनी जे शोभायमान झाले होते, अत्यंत शांत अशा सुग्रीव प्रमुख असणाऱ्या वानरांकडून ज्यांची सेवा केली जात होती, जे सूर्याप्रमाणे प्रकाशत होते, ज्यांच्या सर्वांगावर कस्तुरी व चंदन यांचा लेप लावलेला होता, ज्यांच्या कंठात कल्पवृक्षाच्या फुलांची माळ घातलेली होती, अशा त्या रघुनंदन रामांना पाहून पुण्यवान प्रजानन अतिशय आनंदित झाले. (२४-२६) श्रुत्वा स्त्रियो राममुपागतं मुदा प्रहर्षवेगोत्कलिताननश्रियः । अपास्य सर्वं गृहकार्यमाहितं हर्म्याणि चैवारुरुहुः स्वलङ्ंकृताः ॥ २७ ॥ श्रीराम जवळ आले आहेत हे ऐकल्यावर, आनंदामुळे स्त्रियांच्या मुखाची कांती उज्ज्वल झाली आणि ज्या स्त्रिया घरकाम करण्यात गुंग होत्या, त्या सर्व कामे बाजूला सारून आणि स्वतः नटून-थटून रामांना पाहण्यासाठी आपल्या घरांच्या गच्च्यांवर चढून बसल्या. (२७) दृष्ट्वा हरिं सर्वदृगुत्सवाकृतिं पुष्पैः किरन्त्यः स्मितशोभिताननाः । दृग्भिः पुनर्नेत्रमनोरसायनं स्वानन्दमूर्तिं मनसाभिरेभिरे ॥ २८ ॥ सर्वांच्या डोळ्यांना आनंद देणारी अशी ज्यांची मूर्ती होती अशा त्या रामांना पाहिल्यावर, ज्यांच्या मुखावर स्मित झळकत होते, अशा त्या स्त्रियांनी रामांवर फुलांचा वर्षाव केला आणि डोळे व मन यांना आनंद देणाऱ्या व स्वानंदाची मूर्ती असणाऱ्या रामांना नेत्रांनी हृदयात घेऊन, त्यांनी त्यांना मनाने आलिंगन दिले. (२८) रामः स्मितस्निग्धदृशा प्रजास्तथा पश्यन् प्रजानाथ इवापरः प्रभुः । शनैर्जगामाथ पितुः स्वलङ्कृतं गृहं महेन्द्रालयसन्निभं हरिः ॥ २९ ॥ त्यानंतर जणू दुसरा प्रजापती असणारे प्रभू राम स्मितयुक्त मनोहर दृष्टीने प्रजाजनांकडे पाहात, सावकाशपणे व्यवस्थित सजविलेल्या, इंद्रभवनाप्रमाणे असणाऱ्या, आपल्या पित्याच्या राजभवनाकडे गेले. (२९) प्रविश्य वेश्मान्तरसंस्थितो मुदा रामो ववन्दे चरणौ स्वमातुः । क्रमेण सर्वापितृयोषितः प्रभु- र्ननाम भक्त्या रघुवंशकेतुः ॥ ३० ॥ राजभवनात प्रवेश केलेल्या रामांनी आनंदपूर्वक आपल्या मातेच्या चरणांना वंदन केले; त्यानंतर रघुवंशकेतू प्रभू रामांनी भक्तिपूर्वक आपल्या अन्य मातांना क्रमाने नमस्कार केला. (३०) ततो भरतमाहेदं रामः सत्यपराक्रमः । सर्वसम्पत्समायुक्तं मम मन्दिरमुत्तमम् ॥ ३१ ॥ मित्राय वानरेन्द्राय सुग्रीवाय प्रदीयताम् । सर्वेभ्यः सुखवासार्थं मन्दिराणि प्रकल्पय ॥ ३२ ॥ मग सत्यपराक्रमी राम भरताला म्हणाले, "सर्व प्रकारच्या संपत्तींनी युक्त असा माझा उत्कृष्ट महाल माझा मित्र जो वानरराज सुग्रीव याला दे. तसेच इतर सर्वांनाही सुखाने राहाता यावे म्हणून चांगले महाल देण्याची व्यवस्था कर." (३१-३२) रामेणैवं समादिष्टो भरतश्च तथाकरोत् । उवाच च महातेजाः सुग्रीवं राघवानुजः ॥ ३३ ॥ रामांनी अशी आज्ञा दिल्यावर भरताने तशी व्यवस्था केली. नंतर महातेजस्वी भरताने सुग्रीवाला म्हटले. (३३) राघवस्याभिषेकार्थं चतुःसिन्धुजलं शुभम् । आनेतुं प्रेषयस्वाशु दूतांस्त्वरितविक्रमान् ॥ ३४ ॥ "राघवांच्या अभिषेकासाठी चार समुद्रातून पवित्र पाणी आणण्यासाठी शीघ्रगामी दूतांना तू त्वरित पाठवून दे." (३४) प्रेषयामास सुग्रीवो जाम्बवन्तं मरुत्सुतम् । अङ्गदं च सुषेणं च ते गत्वा वायुवेगतः ॥ ३५ ॥ जलपूर्णान् शातकुम्भ कलशांश्च समानयन् । आनीतं तीर्थसलिलं शत्रुघ्नो मन्त्रिभिः सह ॥ ३६ ॥ राघवस्याभिषेकार्थं वसिष्ठाय न्यवेदयत् । ततस्तु प्रयतो वृद्धो वसिष्ठो ब्राह्मणैः सह ॥ ३७ ॥ रामं रत्नमये पीठे ससीतं संन्यवेशयत् । वसिष्ठो वामदेवश्च जाबालिर्गौतमस्तथा ॥ ३८ ॥ वाल्मीकिश्च तथा चक्रुः सर्वे रामाभिषेचनम् । कुशाग्र तुलसीयुक्त पुण्यगन्ध जलैर्मुदा ॥ ३९ ॥ तेव्हा सुग्रीवाने जांबवंत, हनुमान, अंगद आणि सुषेण यांना पाठवून दिले. ते वायुवेगाने गेले आणि सुवर्णकलश पाण्याने भरून घेऊन आले. त्यांनी आणलेले तीर्थजल मंत्र्यांसह शत्रूघ्नाने राघवाच्या राज्याभिषेकासाठी वसिष्ठाजवळ नेले. त्यानंतर ब्राह्मणांना बरोबर घेऊन, वयोवृद्ध इंद्रियजयी अशा वसिष्ठांनी सीतेसह रामांना रत्नमय सिंहासनावर बसविले. नंतर वसिष्ठ, वामदेव, जाबाली, गौतम तसेच वाल्मीकी या सर्वांनी आनंदपूर्वक दर्भ आणि तुळशीपत्रे यांनी युक्त अशा पावन व सुगंधी जलांनी रामांवर अभिषेक केला. (३५-३९) अभ्यषिञ्चन् रघुश्रेष्ठं वासवं वसवो यथा । ऋत्विग्भिर्ब्राह्मणै श्रेष्ठैः कन्याभिः सह मन्त्रिभिः ॥ ४० ॥ सर्वौषधिरसैश्चैव दैवतैर्नभसि स्थितैः । चतुर्भिलोकपालैश्च स्तुवद्भिः सगणैस्तथा ॥ ४१ ॥ वसू नावाच्या देवांनी ज्या प्रमाणे इंद्रावर अभिषेक केला होता, त्या प्रमाणे ऋत्विज, श्रेष्ठ ब्राह्मण, कन्या आणि मंत्री यांच्यासह त्या वसिष्ठ इत्यादी महर्षींनी आकाशात असणारे देव आणि चार लोकपाल आपापल्या गणांसह रामांची स्तुती करीत असताना, सर्व औषधींच्या रसांनी रघुश्रेष्ठ रामांवर अभिषेक केला. (४०-४१) छत्रं च तस्य जग्राह शत्रुघ्नः पाण्डुरं शुभम् । सुग्रीवराक्षसेन्द्रौ तौ दधतुः श्वेतचामरे ॥ ४२ ॥ त्या वे ळी शत्रुघ्नाने श्रीरामांच्या मस्तकावर पवित्र व सुंदर असे श्वेत छत्र धरले होते. तर सुग्रीव व राक्षसराज बिभीषण या दोघांनी पांढऱ्या चवऱ्या धरल्या होत्या. (४२) मालां च काञ्चनीं वायुः ददौ वासवचोदितः । सर्वरत्नसमायुक्तं मणिकाञ्चनभूषितम् ॥ ४३ ॥ ददौ हारं नरेन्द्राय स्वयं शक्रस्तु भक्तितः । प्रजगुर्देवगन्धर्वा ननृतुश्चाप्सरोगणाः ॥ ४४ ॥ इंद्राच्या प्रेरणेमुळे वायूने रामांना सोन्याची माला दिली. स्वतः इंद्रानेसुद्धा भक्तिपूर्वक महाराज रामांना सर्व प्रकारच्या रत्नांनी युक्त आणि मणी व सुवर्ण यांनी सुशोभित असा हार दिला. देव आणि गंधर्व गायन करू लागले. अप्सरांचे समूह नृत्य करू लगाले. (४३-४४) देवदुन्दुभयो नेदुः पुष्पवृष्टिः पपात खात् । नवदूर्वादलश्यामं पद्मपत्रायतेक्षणम् ॥ ४५ ॥ रविकोटि प्रभायुक्त किरीटेन विराजितम् । कोटिकन्दर्पलावण्यं पीताम्बरसमावृतम् ॥ ४६ ॥ दिव्याभरणसम्पन्नं दिव्यचन्दनलेपनम् । अयुतादित्यसङ्काशं द्विभुजं रघुनन्दनम् ॥ ४७ ॥ वामभागे समासीनां सीतां काञ्चनसन्निभाम् । सर्वाभरणसम्पन्नां वामाङ्के समुपस्थिताम् ॥ ४८ ॥ रक्तोत्पलकराम्भोजां वामेनालिङ्ग्य संस्थितम् । सर्वातिशयशोभाढ्यं दृष्ट्वा भक्तिसमन्वितः ॥ ४९ ॥ उमया सहितो देवः शङ्करो रघुनन्दनम् । सर्वदेवगणैर्युक्तः स्तोतुं समुपचक्रमे ॥ ५० ॥ देवांच्या दुंदुभी वाजू लागल्या. आकाशातून रामांवर पुष्पवृष्टी झाली. नवीन दूर्वादलाप्रमाणे श्यामवर्ण कमल-पत्राप्रमाणे दीर्घ नयन असणारे, कोट्यवधी सूर्याप्रमाणे प्रकाशमान असणाऱ्या किरीटाने सुशोभित, कोट्यवधी मदनाप्रमाणे लावण्य-सौंदर्य असणारे, पीतांबर परिधान केलेले, दिव्य अलंकारांनी सजलेले, दिव्य चंदनाची उटी लावलेले, हजारो सूर्याप्रमाणे तेजस्वी, सुंदर बाहू असणारे असे ते रघुनंदन राम होते. त्यांच्या डाव्या बाजूला सुवर्णवर्ण सीता बसलेली होती. सर्व अलंकारांनी युक्त असणाऱ्या तसेच आपल्या करकमलात रक्तकमल धारण करणाऱ्या आणि डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेला रामांनी डाव्या हाताने धरलेले होते. अशा उत्कृष्ट शोभेने संपन्नअसणाऱ्या रघुनंदनांना पाहिल्यावर, देवांनी शंकर व पार्वतीसह भक्तिपूर्वक रामांची स्तुती करण्यास प्रारंभ केला. (४५-५०) श्रीमहादेव उवाच नमोऽस्तु रामाय सशक्तिकाय नीलोत्पल श्यामलकोमलाय । किरीटहाराङ्गद भूषणाय सिंहासनस्थाय महाप्रभाय ॥ ५१ ॥ श्रीमहादेव म्हणाले- 'नील कमलाप्रमाणे श्यामल व कोमल शरीर असणाऱ्या, किरीट, हार व बाहूभूषणे हे अलंकार धारण करणाऱ्या आणि आपल्या सीता या शक्तीसह सिंहासनावर बसलेल्या महातेजस्वी रामांना नमस्कार असो. (५१) त्वमादिमध्यान्तविहीन एकः सृजस्यवस्यत्सि च लोकजातम् । स्वमायया तेन न लिप्यसे त्वं यत्स्वे सुखेऽजस्ररतोऽनवद्यः ॥ ५२ ॥ हे रामा, तुम्ही आदी, मध्य आणि अंत यांनी रहित आहात. तुम्ही अद्वितीय आहात. स्वतःच्या मायेच्या योगाने तुम्ही सर्व लोकांची उत्पत्ती, रक्षण आणि नाश करता; तथापि त्या कर्मांनी तुम्ही लिप्त होत नाही. कारण तुम्ही निर्दोष असून नेहमी स्वतःच्या आनंदात मग्न असता. (५२) लीलां विधत्से गुणसंवृतस्त्वं प्रपन्नभक्तानुविधानहेतोः । नानावतारैः सुरमानुषाद्यैः प्रतीयसे ज्ञानिभिरेव नित्यम् ॥ ५३ ॥ शरण आलेल्या भक्तांना मार्ग दाखविण्याच्या हेतूने तुम्ही आपल्या मायेच्या गुणांनी आवृत्त होऊन, देव, मानव इत्यादी नाना अवतार धारण करून अनेक लीला करता. तरी त्या त्या वेळी तुमचे स्वरूप हे नेहमी ज्ञानी लोकांच्या प्रत्ययाला येत असते. (५३) स्वांशेन लोकं सकलं विधाय तं बिभर्षि च त्वं तदधः फणीश्वरः । उपर्यधो भान्वनिलोडुपौषधि- प्रवर्षरूपोऽवसि नैकधा जगत् ॥ ५४ ॥ स्वतःच्या अंशाने हे सर्व जग निर्माण करून, तुम्हीच शेष नाग होऊन हे जग खालच्या बाजूने धारण करता. तसेच सूर्य, वायू, चंद्र, औषधी आणि पर्जन्य यांची रूपे धारण करून, त्याचे पालन करता. तुम्ही वरून आणि खालून या जगाचे नाना प्रकारांनी रक्षण करता. (५४) त्वमिह देहभृतां शिखिरूपः पचसि भुक्तं अशेषमजस्रम् । पवनपञ्चकरूपसहायो जगदखण्डमनेन बिभर्षि ॥ ५५ ॥ या जगात देहधारी प्राण्यांमध्ये जठरातील अग्निरूप होऊन, प्राण, अपान इत्यादी पाच प्राणांच्या सहाय्याने तुम्ही प्राण्यांनी खाल्लेले संपूर्ण अन्न सतत पचवीत असता. अशा प्रकारे तुम्ही सर्वदा संपूर्ण जगाचे धारण करता. (५५) चन्द्रसूर्यशिखिमध्यगतं यत् तेज ईश चिदशेषतनूनाम् । प्राभवत्तनुभृतामिव धैर्यं शौर्यमायुरखिलं तव सत्त्वम् ॥ ५६ ॥ हे ईश्वरा, चंद्र, सूर्य आणि अग्नी यांच्या ठिकाणी जे तेज आहे, प्राण्यांच्या सर्व शरीरात जे चैतन्य आहे, त्याचप्रमाणे देहधारी प्राण्यांच्या ठिकाणी जे धैर्य, शौर्य, आयुष्य आहे, ते सर्व म्हणजे तुमच्या अस्तित्वाचा प्रभाव आहे. (५६) त्वं विरिञ्चिशिवविष्णुविभेदात् कालकर्मशशिसूर्यविभागात् । वादिनां पृथगिवेश विभासि ब्रह्म निश्चितमनन्यदिहैकम् ॥ ५७ ॥ हे ईश्वरा, तुम्ही ब्रह्मदेव, शिव आणि विष्णू या भेदांनी तसेच काल, कर्म, चंद्र व सूर्य या विभागांमुळे जणू वेगळे आहात असे तुमच्या स्वरूपाविषयी वादविवाद करणाऱ्या लोकांना भासते. तरी एकमेव अद्वितीय ब्रह्म हे तुमच्यापेक्षा वेगळे नाही ही गोष्ट निश्चित. (५७) मत्स्यादिरूपेण यथा त्वमेकः श्रुतौ पुराणेषु च लोकसिद्धः । तथैव सर्वं सदसद्विभाग- स्त्वमेव नान्यद्भवतो विभाति ॥ ५८ ॥ तुम्ही एकट्यानेच मत्स्य इत्यादी अवतारांच्या रूपांत अवतार घेतला होता, ही गोष्ट ज्या प्रमाणे श्रुती, पुराणे आणि जग यांमध्ये प्रसिद्ध आहे, त्या प्रमाणेच सर्व सत् आणि असत् हा विभाग तुम्हीच आहात. तुमच्यापेक्षा वेगळे असे काहीही व कुठेही दिसून येत नाही. (५८) यद्यत्सुसमुत्पन्नमनन्तसृष्टौ- उत्पत्स्यते यच्च भवच्च यच्च । न दृश्यते स्थावरजङ्गमादौ त्वया विनातः परतः परस्त्वम् ॥ ५९ ॥ या स्थावर जंगमात्मक अनंत सृष्टीमध्ये जे जे काही (भूतकाळात) उत्पन्न झाले आहे, जे जे काही (भविष्यकाळी) उत्पन्न होणार आहे, तसेच जे जे आत्ता उत्पन्न होत आहे, ते ते सर्व तुमच्याखेरीज अन्य काही आहे, असे दिसून येत नाही. म्हणून तुम्ही परापेक्षा म्हणजे प्रकृती इत्यादीपेक्षा पर म्हणजे श्रेष्ठ आहात. (५९) तत्त्वं न जानन्ति परात्मनस्ते जनाः समस्तास्तव माययातः । त्वद्भक्तसेवामलमानसानां विभाति तत्त्वं परमेकमैशम् ॥ ६० ॥ तुमच्या मायेमुळे मोहित झालेले समस्त जन हे तुमचे- परमात्म्याचे- खरे स्वरूप जाणत नाहीत. म्हणून तुमच्या भक्तांची सेवा केल्यामुळे ज्यांचे मन शुद्ध झाले आहे, अशा लोकांनाच तुमचे एकमेव, अद्वितीय, श्रेष्ठ, खरे ईश्वरी स्वरूप समजून येते. (६०) ब्रह्मादयस्ते न विदुः स्वरूपं चिदात्मतत्त्वं बहिरर्थभावाः । ततो बुधस्त्वामिदमेव रूपं भक्त्या भजन्मुक्तिमुपैत्यदुःखः ॥ ६१ ॥ बाह्य विषयांवर ज्यांचे प्रेम आहे अशा ब्रह्मदेव इत्यादी देवांना हे तुमचे चिदात्म-स्वरूपाचे ज्ञान नाही, (मग इतर लोकांबद्दल काय सांगावे ?) म्हणून बुद्धिमान लोक तुमच्या याच सगुण श्यामसुंदर स्वरूपाचे भक्तीपूर्वक भजन करून, दुःखरहित होऊन, अनायास मुक्ती प्राप्त करून घेतात. (६१) अहं भवन्नाम गृणन्कृतार्थो वसामि काश्यां अनिशं भवान्या । मुमूर्षमाणस्य विमुक्तयेऽहं दिशामि मन्त्रं तव राम नाम ॥ ६२ ॥ तुमच्या नावाचा उच्चार केल्यामुळे मी कृतार्थ होऊन पार्वतीसहित काशीमध्ये रात्रंदिवस राहात असतो आणि हे रामा, मरणोन्मुख माणसांना मुक्ती मिळावी म्हणून मी त्यांना तुमच्या 'राम' या तारक मंत्राचा उपदेश करीत असतो. (६२) इमं स्तवं नित्यमनन्यभक्त्या शृण्वन्ति गायन्ति लिखन्ति ये वै । ते सर्वसौख्यं परमं च लब्ध्वा भवत्पदं यान्तु भवत्प्रसादात् ॥ ६३ ॥ (आता तुम्हाला माझी प्रार्थना आहे की) ही मी केलेली तुमची स्तुती जे लोक अनन्य भक्तीने नित्य ऐकतील, गातील अथवा लिहितील, ते तुमच्या कृपाप्रसादामुळे संपूर्ण परमानंद प्राप्त करून घेऊन, अंती तुमच्या पदाप्रत जावोत." (६३) इन्द्र उवाच रक्षोऽधिपेनाखिलदेव सौख्यं हृतं च मे ब्रह्मवरेण देव । पुनश्च सर्वं भवतः प्रसादात् प्राप्तं हतो राक्षसदुष्टशत्रुः ॥ ६४ ॥ इंद्र म्हणाला- "हे देवा, ब्रह्मदेवांकडून वर मिळाल्यामुळे राक्षसराज रावणाने माझे संपूर्ण देवोचित सौख्य हरण करून घेतले होते. आता तो दुष्ट शत्रू रावण ठार झाला आहे. तुमच्या कृपाप्रसादामुळे ते सर्व सुख मला पुनः प्राप्त झाले आहे." (६४) देवा ऊचुः हृता यज्ञभागा धरादेवदत्ता मुरारे खलेनादिदैत्येन विष्णो । हतोऽद्य त्वया नो वितानेषु भागाः पुरावद्भविष्यन्ति युष्मत्प्रसादात् ॥ ६५ ॥ देव म्हणाले- "हे मुरारे, विष्णो, पृथ्वीवरील ब्राह्मणांनी आम्हाला दिलेले यज्ञातील भाग तो दुष्ट दैत्य रावण हरण करून नेत असे. तो आता तुमच्याकडून मारला गेला आहे. तेव्हा तुमच्या कृपाप्रसादामुळे आता ते यज्ञातील भाग आम्हांला पूर्वीप्रमाणे मिळू लागतील." (६५) पितर ऊचुः हतोऽद्य त्वया दुष्टदैत्यो महात्मन् गयादौ नरैर्दत्तपिण्डादिकान्नः । बलादत्ति हत्वा गृहीत्वा समस्तान्- इदानीं पुनर्लब्ध्सत्त्वा भवामः ॥ ६६ ॥ पितर म्हणाले- " हे महात्मन्, गया इत्यादी ठिकाणी माणसांनी आमच्यासाठी दिलेले पिंड इत्यादी अन्न बळजबरीने घेऊन आणि आम्हा सर्वांना मारून, तो दुष्ट दैत्य रावण खात असे. आता तो तुमच्याकडून मारला गेला आहे. आता आमचा भाग आम्हांला मिळाल्यावर आम्ही पुनः आमचे सामर्थ्य प्राप्त करून घेऊ." (६६) यक्षा ऊचुः सदा विष्टिकर्मण्यनेनाभियुक्ता वहामो दशास्यं बलाद्दुःखयुक्ताः । दुरात्माहतो रावणो राघवेश त्वया ते वयं दुःखजाताद्विमुक्ताः ॥ ६७ ॥ यक्ष म्हणाले- "आम्ही नेहमी या रावणाकडून बळजबरीने वेठीला धरले जात होतो. तसेच आम्हांला त्याच्या पालखी इत्यादीस जुंपल्यामुळे आम्ही मोठ्या दुःखाने त्याला वाहून नेत होतो. हे राघवेशा, आता तो दुरात्मा रावण तुमच्याकडून मारला गेला आहे. म्हणून आम्ही सर्व दुःखातून मुक्त झालो आहोत." (६७) गन्धर्वा ऊचुः वयं सङ्गीतनिपुणा गायन्तस्ते कथामृतम् । आनन्दामृतसन्दोह युक्ताः पूर्णाः स्थिताः पुरा ॥ ६८ ॥ गंधर्व म्हणाले- "संगीतात निपुण असे आम्ही पूर्वी तुमच्या कथामृताचे गायन करीत आनंदरूपी अमृताच्या डोहात बुडून मग्न होऊन राहात होतो. (६८) पश्चाद्दुरात्मना राम रावणेनाभिविद्रुताः । तमेव गायमानाश्च तद् आराधनतत्पराः ॥ ६९ ॥ स्थितास्त्वया परित्राता हतोऽयं दुष्टराक्षसः । एवं महोरगाः सिद्धाः किन्नरा मरुतस्तथा ॥ ७० ॥ वसवो मुनयो गावो गुह्यकाश्च पतत्त्रिणः । सप्रजापतयश्चैते तथा चाप्सरसां गणाः ॥ ७१ ॥ सर्वे रामं समासाद्य दृष्ट्वा नेत्रमहोत्सवम् । स्तुत्वा पृथक् पृथक् सर्वे राघवेणाभिवन्दिताः ॥ ७२ ॥ ययुः स्वं स्वं पदं सर्वे ब्रह्मरुद्रादयस्तथा । प्रशंसन्तो मुदा रामं गायन्तस्तस्य चेष्टितम् ॥ ७३ ॥ ध्यायन्तस्त्वभिषेकार्द्रं सीतालक्ष्मणसंयुतम् । सिंहासनस्थं राजेन्द्रं ययुः सर्वे हृदि स्थितम् ॥ ७४ ॥ त्यानंतर हे रामा, त्या दुरात्म्या रावणाने आम्हांला जिंकून घेतले म्हणून आम्ही त्याचेच गुणगान करीत, त्याच्याच आराधनेत तत्पर होऊन राहिलो. आता तो दुष्ट राक्षस तुमच्याकडून मारला गेल्यामुळे तुम्हीच आमचे रक्षण केले आहे." अशाच प्रकारे प्रजापतिसह मोठे नाग, सिद्ध, किन्नर, मरुत, वसू, मुनी, गाई, गुह्यक, पक्षी आणि अप्सरांचे समूह हे सर्वजण रामांजवळ आले आणि डोळ्यांना आनंद देणाऱ्या रामांना पाहून ते त्यांची निरनिराळ्या प्रकारे स्तुति करू लागले. त्यानंतर राघवांकडून वंदन केले गेलेले ते सर्वजण आपापल्या स्थानी निघून गेले. मग ब्रह्मदेव आणि महादेव इत्यादींनी आनंदाने रामांची प्रशंसा करीत, त्यांच्या लीलांचे गायन करीत-करीत आणि सिंहासनावर बसलेल्या, अभिषेकानें आर्द्र अशा राजराजेश्वर श्रीरामचंद्रांचे आणि सीता व लक्ष्मण यांच्यासह हृदयात विराजमान असणार्या राजश्रेष्ठ रामांच् ध्यान करीत ते सर्वजण निघून गेले. (६९-७४) खे वाद्येषु ध्वनत्सु प्रमुदितहृदयैर्देववृन्दैः स्तुवद्भिः- वर्षद्भिःपुष्पवृष्टिं दिवि मुनिनिकरै रीड्यमानः समन्तात् । रामः श्यामः प्रसन्नस्मितरुचिरमुखः सूर्यकोटिप्रकाशः सीतासौमित्रिवातात्मजमुनिहरिभिः सेव्यमानो विभाति ॥ ७५ ॥ त्या वेळी आकाशात वाद्ये वाजविली जात होती. आनंदित मनाने स्तुती करणारे स्वर्गातील देवांचे समूह पुष्पवृष्टी करीत होते. सर्व बाजूंनी मुनींचे समुदाय रामांची स्तुती करीत होते. कोटिसूर्याप्रमाणे प्रकाशमान असणारा आणि प्रसन्न स्मिताने मनोहर मुख असणारा श्यामवर्णी, आणि सीता, लक्ष्मण, हनुमान, मुनी आणि वानर यांच्याकडून सेविले जाणारे श्रीराम हे अतिशय शोभून दिसत होते. (७५) इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे पञ्चदशः सर्गः ॥ १५ ॥ इति श्रीमद्अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे पंचदशः सर्गः ॥ १५ ॥ |